एक होता अवचट --- भाग ६

Submitted by देवभुबाबा on 8 July, 2021 - 23:56

हार फुलांचा धंदा चालू करून आता महिना लोटला होता. धंदा व्यवस्थित चालू होता. शाम्भवीने केलेल्या मदतीची परतफेड करण्याचा विचार मनात येऊनही अवचट ते टाळत होता, कारण तिचे ते कर्ज त्याला हवेहवेसे वाटत होते. अवचट बातम्या पाहत नसला तरीही अधून मधून चर्चेतून भारतातील corona केसेस वाढल्याच्या बातम्या त्याच्या कानावर आल्याचं होत्या. धंद्यात जम बसतच होता आणि शेवटी नको ती बातमी येण्याचा दिवस आला.

Enter Caption

दिनांक २४ मार्च २०२० पासून भारतात २१ दिवसांचा संपूर्ण lockdown जाहीर झाला.
दुसऱ्या दिवसापासून रेल्वे पासून सर्वच गोष्टी बंद होणार होत्या. पंतप्रधानांच्या भाषणानंतर अवचट चिंतेने व्याकुळ झाला. आता उद्यापासून फुले आणायची कोठून? शिवाय ऑर्डर्स बंद झाल्या तर पुन्हा शून्यात येणार, मग एवढा खटाटोप, एवढी मेहनत पूर्ण मातीत मिळणार. आई पुढे हौसेने चालू केलेला धंदा २१ दिवस बंद करायचा मग एवढे दिवस करायचं तरी काय?
(शहरात सुद्धा तेवढा corona आजार पसरला नसल्याने त्याची दाहकता, त्याचे गाम्भीर्य अजून कुणालाही नव्हते, त्यात अवचट सुद्धा आलाच.)
काहीतरी करायला हवे, पण काय करणार?
विचारात रात्र सरली.

फुले आणायला जायचं नाही म्हणून अवचट सकाळी उठून मॉर्निंग वॉल्क ला आला. नेहमीप्रमाणे त्याचे स्वागत कुत्र्यांच्या भुंकण्याने सुरु झाले. अवचट त्यांना हाकलताना मध्येच बडबडही करायचा. "अरे गप्प बसा रे, तुम्हाला नाय का lockdown". त्याची बडबड पाहून, पोरांना रस्त्याच्या बाजूला बसवणारी म्हातारी सुद्धा हसत होती. अवचट त्या म्हातारीशी बोलता बोलता पाठीमागे हात नेवून हळूच त्या लहान पोरांना खडे देखील मारत होता.

नेहमीपेक्षा रस्त्यावर वर्दळ तशी कमीच होती. रेडिओ tv चे आवाज येऊ लागले होते. पण त्या गोंधळातही अवचट चे पूर्ण ध्यान केंद्रित होते ते बंद दरवाज्या उघडण्याच्या आवाजाकडे. आज तसे हेड फोन बाजूलाच ठेऊन तो फेऱ्या मारत होता.
शाम्भवीने दरवाज्या उघडताच आतील अभंगवाणीचा आवाज त्याच्या कानापर्यंत पोहोचू लागला. सावध पावले टाकत हळुवारपणे तो डोळ्याचा एक कोना १८० अंशात फिरवत शाम्भवीला पाहत होता. पुढच्या टोकाला गेल्यावर थोडा घाईतच पावले उचलत पुन्हा शाम्भवी दृष्टीक्षेपात येईतोवर चाल जलद आणि शाम्भवी दृष्टीक्षेपात आल्यावर पावले संथ टाकायचा.

शाम्भवी बाहेर बाल्कनीत आली, केस सावरले, बाल्कनीच्या ओसरीवर हात ठेऊन ती रस्त्याकडे नजर लावू लागली. कुणाच्या शोधात असावी ती? अवचट च्या मनात शंका उपस्थित झाली. आपल्याला असं चोरून पाहताना तिला काय वाटेल? तिने आपल्याकडे पाहून smile दिली तर? अनेक प्रश्न एकापाठोपाठ मनात घालमेळ वाढवू लागले. आवडती व्यक्ती डोळ्यासमोर असेल तर आपसूक छातीत धडधड वाढतेच. आपल्याकडे कोणी पाहत नाही याच बेफिकिरीत तो शाम्भवीच्या नजरेत येण्यासाठी धडपडत होता.

खिडकीत उभी असलेली पवळ्याची आई बऱ्याच वेळापासून आतूनच अवचट ला न्याहाळत होती. हा असं का वागतोय, याचा अंदाज घेण्यासाठी ती बाहेर येणार तोच शाम्भवीची नजर अवचट वर पडली. अवचट हि तिच्याकडे अचानकपणे पाहू लागला. काही क्षण दोघे एकमेकांकडे पाहू लागले. चेहऱ्यावर शून्यभाव, नजरेत अबोला. मागून येऊन पवळ्याच्या आईने शाम्भवीच्या हाताला हात लावला. शाम्भवीच्या मनात काहीच नव्हते, त्यामुळे ती सहजच वळून पवळ्याच्या आईशी गप्पा मारू लागली. शाम्भवीशी बोलता बोलता पवळ्याची आई हळूच डोळे फिरवून अवचट च्या हालचालींवर लक्ष देत होती. थोड्याच वेळात अवचट तेथून नाहीसा झाला. खात्री नसली तरीही पवळ्याच्या आईने हेरले होते नक्की.

अंघोळ करून काही वेळातच अवचट पवळ्या कडे आला. पवळ्या अंघोळीला गेला होता. पवळ्या ची आई अवचट बरोबर गप्पा मारू लागली.
पवळ्याची आई:- (अवचट ला चहा देत) काय रे अव्या... आता दुकानाचं काय?
ऑर्डर बंद राहतील का? दुसरीकडून फुले नाय का भेटणार?
अवचट:- मावशी तोच विचार करतोय मी पण. वाहतूक पूर्ण बंद आहे. माल कसा आणि कुठून आणायचा?. कोणी ओळखीचा आहे का बघावं लागेल. माल इथपर्यंत पोच मिळाला तर बर होईल.

पवळ्याची आई:- बरं, मला एक सांग. सकाळी सकाळी रस्त्यावर काय करत असतोस?
अवचट:- मॉर्निंग वॉल्क .
पवळ्याची आई:- (हसतच) हो... ते माहित आहे. पण आणखी काय करत असतोस?
अवचट:- म्हणजे? (काहीतरी आठवत) अरे हा... पोरांना रस्त्याच्या कडेला बसवायची जागा आहे का ती? म्हणून आपलं फेकलं दगड गुपचूप.
पवळ्याची आई:- बरं, आणखी? (थोडं खोदून विचारत)
अवचट:- आणखी काही नाही.
पवळ्याची आई:- माझ्यापासून लपवतोस? मी पाहिलंय हा तुला. तुझे सगळे चाळे आलेत माझ्या लक्ष्यात.
अवचट:- (थोडा लाजतच, मनातल्या मनात "मावशी ने पाहिलं वाटतंय")
नाही मावशी तस काही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय.
पवळ्याची आई:- गैरसमज ना. ठीक आहे... गैरसमज तर गैरसमज... उद्यापासून बाल्कनीकडे बघून फेऱ्या मार, मग भुरकटरावांना सांगते.
अवचट:- मावशी... तुमचा काहीतरी गैरसमज होतोय....चला मी येतो.
पवळ्याची आई:- कुठे पळतोस? .... थांब जरा... पवळ्या येईल आता ...
अवचट:- नको मी जातो... जरा काम आहे... पवळ्याला फोन करतो मी.
(अवचट लाजतच तेथून पळ काढतो, पवळ्याची आई त्याला हसते.)

Group content visibility: 
Use group defaults