मी पहिल्यांदाच - स्वतः पंग्चर काढलं ...

Submitted by सॅम on 19 May, 2009 - 20:45

सायकल मला लहानपणापासुनच आवडते. आधी तीन चाकी, मग धडपडत शिकलेली दोन चाकी, मग दहावीमधे चांगले मार्क मिळाल्यामुळे घेतलेली माझ्या मनासारखी सायकल... इंजिनियरिंग होइपर्यंत त्या सायकलनी साथ दिली. त्यानंतर मात्र ती विकावी लागली :(. नोकरी लागल्यानंतर, लग्न झाल्यानंतर [जुनी सायकल विकल्यावर ५ वर्षांनी] पुन्हा एकदा सायकल घेतली. पण तिचं आणि माझं काय जमल नाही... काय ते तरंगलांबी (वेवलेंथ हो..) जुळली नाही म्हणतात ना, तसं झालं.

मग इथे, पॅरीसमधे, आलो. इथे ऑफिसला जायला आधी मी चालत मेट्रो स्टेशनला जायचो, तिथुन मेट्रोनी दोनच स्टेशन पुढे जाउन नंतर बसनी ऑफिसला. या रोजच्या प्रवासात चालणे आणि मेट्रो यात बराच वेळ जायचा. मग ठरवल सायकल घ्यायची.

पॅरिसमधे तशी सायकल हे काही दळणवळणाचे साधन नाही. इथे सायकल चालवणे हा खेळ म्हणुन प्रसिद्ध आहे. मला नाही वाटत 'टूर दी फ्रान्स' बद्दल काही सांगायची गरज आहे! माझ्या घराजवळ एक छोट जंगल आहे (woods ला मराठित काय म्हणणार? छोटं जंगलच ना? किंवा मोठी बाग म्हणा वाटलंतर) शनिवार-रविवारी बरेच लोक 'तयार' होउन रेसिंग ट्रॅकवर सायकल चालवायचा (खरतर पळवायचा) सराव करतात. त्यांच्यासाठी खास ट्रॅक आहे. या खेळाडूंशिवाय, सहकुटुंब सायकल चालवणारेही दिसतात. आई आणि/किंवा बाबा मोठ्या सायकलवर, छोटी मंडळी मागुन छोट्या सायकलवर, अगदीच छोटा आयटम असेल तर आई/बाबांच्या मागच्या सीटवर! सर्वजण हेलमेट वगैरे घालुन तयार!!

पण हे सगळ खेळापुरतच! रोज कोणी सायकल वापरताना दिसत नाही. हे पण बरोबरच आहे म्हणा, एकतर थंडी आणि वर्षभरात कधीही पडणारा पाउस यामुळे सायकल चालवण्याला पोषक वातावरण नाही. तश्या मोटार सायकल, स्कुटर (हो... चक्क व्हेस्पा) आणि मोपेड बर्‍याच आहेत. म्हणजे मला वाटलं होत त्याहुन जास्त प्रमाणात. पॅरिस शहरातील छोटे रस्ते व ट्राफिकमुळे कारपेक्षा हे दुचाकीस्वार लवकर पोचत असावेत.

खरतर मी मोटार-सायकलंच घेतली असती. पण म्हणलं सुरवात सायकलनी करु. एकतर सुटत चाललेच्या पोटाला थोडा व्यायाम होइल. अजुन एक जमेची बाजु म्हणजे रोजचे चालणे+मेट्रो या ऐवजी सायकलनी गेलो तर तीस-चाळीस मिनिटे वाचणार होती. माझे हे मनोदय कळल्यावर फ्रेंच बॉसनी मला सेकंड-हँड सायकल घेण्याचा सल्ला दिला. तो अंदाज मलाही आधी आला होताच. कारण इथे आसपास लावलेल्या सायकल पाहिल्या तर, सायकलच्या मानानी त्याला बांधलेली साखळी आणि कुलुपच हे भलं मोठ्ठ असतं. इतर दुचाकींचीपण तीच तर्‍हा, जसकाही त्या 'स्वंयंचलीत' दुचाकी स्वयं चालुन कुठेतरी जाणारच आहेत. पण कुलुप-साखळी लाउनही पुर्ण सायकल राहील याची शाश्वती नाही!

तशीही इथे नवीन सायकल घेण शक्यच नव्हत. सायकल ही गरज नसल्यामुळे दुकानात साधी सायकल नाहीच! सायकलींचे प्रकार म्हणजे, डोंगरी (Mountain bike), शर्यतीची (racing bike) आणि पुरातन (vintage bike). किमंत, १३० युरोपासुन सुरु!! आणि ही जर चोरिला गेली तर?!! त्यामुळे सेकंड-हँड शिवाय पर्याय नाही.

आता इथे सेकंड्-हँड सायकल घ्यायची म्हणजे ebay.com शिवाय पर्याय नाही. पण मला काही ते पटेना, सायकलला हातही न लावता ती विकत घ्यायची... आणि तिच माझं जमलं नाही म्हणजे!! मग बरीच शोधाशोध केल्यावर एक दुकान सापडलं.

मग काय, पुढच्याच शनिवारी दुकानात जाउन, चांगल्या २-३ सायकली चालवून बघुन, एक शर्यतीची (बारीक चाकांची) सायकल आणली... फक्त ५० युरो! ही गोष्ट ऑक्टोबरची, ऐन थंडीत मी नेहमीच मोठ्ठ जॅकेट न घालता, आतनं एक जास्त टी-शर्ट घालुन साध जॅकेट घातल्यावरच बायकोच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे... मी तर ठरवलंच होतं की सायकल बघायला गेल्यावर घेउनच परत यायचं!! दुकानापासुन घर १० कि.मी., त्या थंडीत मी बसच्या नकाशाच्या मदतीने दीड तास सायकल चालवून घर गाठलच!

लगेच बाकीची खरेदी पण झालीच... पुढचा छोटा दिवा, हवेचा छोटा(सा) पंप, रात्री चमकणारे सुरक्षा जॅकेट... सगळं कमीत कमी किमतीमधलं, तरी २० युरो झालेच!

तेंव्हा पासुन आत्तापर्यंत, पावसात-थंडीत-उन्हात मी रोज सायकल चालवतोय. (तसा पाउस इथे आपल्या सारखा धो-धो पडत नाही म्हणा.) मस्त वाटतं... आधी अगदी लक्ष देउन उजवीकडुन सायकल चालवावी लागायची, खासकरुन, डावीकडे वळताना सवयीप्रमाणे मी डाव्या रस्त्याच्या डाव्या बाजुला जायचो, पण आता सवय झालीये. मधे तर मला स्वप्न पडलं होतं की मी भारतात मोटारसायकल चालवतोय... तेही उजवीकडुन!! काय भयानक ना!!! ह्या सायकलचं आणि माझं चांगलं जमलय बर! फक्त दोनदाच सायकल घेउन जाता आलं नाहं, जेंव्हा बर्फ पडला होता त्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आणि सायकल पंग्चर झाली होती तेंव्हा... अरे हो लेखाच नावच ते आहे ना!!!

तर झालं असं की एका सकाळी रस्त्यात मला काही काचा दिसल्या, पुढचं चाक चुकवण्यात मी यशस्वी झालो पण मागच्या चाकाचा बळी गेला Sad

आता इथे काय आपल्यासारखे कोपर्‍यावर सायकल रिपेअरची टपरी नाही. मला वाटलं, आता नवीन टायर, नवीन ट्युब... तरी म्हणलं बघाव तरी दुकानात, डीकॅथलॉन मधे एक आटोपशीर कीट मिळाला.

मग माझ्या आयुश्यात पहिल्यांदाच - लहानपणी पंग्चर काढताना पाहिलं होतं अगदी तश्याच पद्धतीने - मी स्वतः पंग्चर काढलं!

पद्धत तीच - लहानपणी बघितलेली, आणि मदतीला मॅनुअल होतचं. तर मी पंग्चर काढलं ते खालीलप्रमाणे,
१. सायकल आडवी केली.
२. एक काळा फोर्क वापरुन टायर रिममधुन काढलं, त्या फोर्कची दुसरी बाजु स्पोकला अडकवली. (नाहीतर टायर परत आत जात!)
३. दुसरा फोर्क वापरुन अजुन थोडं टायर काढलं, असंच पुढे करत गेलो आणि सगळ टायर निघालं.
४. ट्युब बाहेर काढली.
५. ट्युबमधे हवा भरली.
६. बादलीत पाणी घेउन पंग्चर नक्की कुठे आहे ते बघितलं.
७. ट्युबमधली हवा काढुन टाकली, ट्युब पुसुन कोरडी केली.
८. पंग्चरची जागा सँड पेपर वापरुन थोडी खडबडीत केली.
९. त्या जागेवर डिंक लाउन त्यावर पॅच लावला, थोडा वेळ दाब दिला, पाच मिनीटं तसंच ठेवलं.
-- इथे एक गडबड केली, तो पॅच चुकुन उलटा लावला, मग परत काढुन सरळ केला Happy
१०. परत हवा भरुन पंग्चरची जागा चेक केली. सगळं व्यवस्थित असेल तर हवा काढली.
११. जिथे पंग्चर झालं होतं तिथलं टायर चेक केलं (एक काचेचा बारिक तुकडा सापडला)
-- हे महत्वाचं, नाहीतर सगळ होउन ट्युब आत टाकली की पुन्हा हवा जाणार!)
१२. ट्युब आत टाकली, टायर रीमवर चढवलं, हवा भरली...
... आणि सायकल तयार!

पॅरीसमधे पण सायकलीचा उपयोग वाढत आहे. काही वर्षांपासुन वेलिब नावाची सायकल भाड्यानी देण्याची सेवा इथे सुरु करण्यात आली. या सेवेअंतर्गत तुम्ही दिवसाचा/महिन्याचा/वर्षाचा पास घ्यायचा. (दिवसाचा पास १ युरो). या सायकली जागोजागी पार्क (लॉक) केलेल्या असतात. त्या मशिनला पास 'दाखवला' की तुम्ही सायकल घेउ शकता, पहिली ३० मिनिटे फुकट, मग प्रत्येक तासाला १ वा २ युरो चार्ज. या जागादेखिल बर्‍याच आहेत, अगदी प्रत्येक १००-२०० मीटरला! खासकरुन उन्हाळ्यात बरेच (पर्यटक) याचा लाभ घेतात. जर व्यवस्थीत नियोजन केले तर १ युरोत संपुर्ण दिवसभर सायकल चालवू शकता (दर आर्ध्या तासाच्या आत सध्याची सायकल परत करुन नवीन सायकल घ्यायची!!)

पण येवढी सायकल चालवुनही पोट सुटायचं ते सुटतच आहे... अगदी सिक्सपॅक पैकी दोन पॅक झालेत (ढेरीला दोन घड्या पडतात!!) आता चार राहिले Lol
थोडक्यात काय तर या सायकलवर मी जाम खुष आहे त्यामुळे मुठभर मांस चढलय... अजुन काही नाही!!!

गुलमोहर: 

मस्त रे! ते पहिल्या चित्रात सायकल ची चाके गायब झाली आहेत का?

लोल. तुला मग माझ्यासारख्या सायकल प्रेमींची नितांत गरज आहे. Happy उन्हाळ्यात रोजचे किमान १० ते १५ मैल रपेट मारल्याशिवाय मी घरी येत नाही. माझी बाईक हायब्रिड आहे. २६ इंची. ही मांउटेन वर आणि रोड दोन्हीवर चालते. अजुन पंक्चर झाली नाही. Happy इथेही साधारण ३०० डॉलर्सच्या पुढेच चांगल्या बाईक मिळतात. तश्या वॉलमार्ट मध्ये ७०-८० ला ही मिळतात. फेरारी कंपनीची पण बाईक आहे, फक्त $ ३५००. Happy पहिली बाईक चोरीला गेली. पण नविनच घेतली. इथे भाड्याने सायकली मिळत नाहीत. (फक्त बिचवर मिळतात.)

चांगले लिहीलय. अजुन माझ्यावर पंक्चर काढायची कधी वेळ आली नाहीये, मला फार उत्सुकता आहे पंक्चर स्वतः कसे काढायचे याबद्दल पण अजुन काही चान्स मिळाला नाहीये. भारतात कॉलेज नंतर सायकल चालवलीच नव्हती, मग भारत सोडल्यावर परत सायकल चालवली, खूप मस्त वाटते.
बाकी सायकल चोरीच्या बाबतीत मी तेवढी सुदैवी नव्हते, माझी सायकल ट्रेन स्टेशनवरुन लॉक कापून नेली होती.

सहीच रे! मस्त लिहिला आहेस लेख. मी नेदरलँडमध्ये दणकून सायकल चालवली. तिथे जा कधीतरी. सायकलचे स्वतंत्र रस्ते असल्यामुळे जबरी मजा येते. दिवसात ५०-६० किमी आरामात चालवता येते तिथे.

मस्त लिहिलं आहे! आवडलं!

वा! स्वतः पहिल्यांदा पंक्चर काढलंत ? मस्तच.
आमच्याकडे पण एक नव-याची डोंगरदुचाकी होती. त्यावर मी जपानात भाजी वगैरे आणून सायकलीचं अवमुल्यन केलं होतं. अगदीच Infradig .
आणि जपानातल्या रस्त्यांवर आळीपाळीने एकजण सायकलीवर आणी दुसरा पायी अशा आम्ही बरोबर केलेल्या अनेक सायकलफे-या आठवल्या.
ती जीव की प्राण सायकल तोक्यो ते मुंबई सुखरुप आली आणि इथे पावसानी गंजताना पाहून दूधवाल्याच्या ताब्यात गेली. का ते विचारु नका. मुंबईत सायकल चालविणे हा जीवाशीच खेळ.

सही. असे पंक्चर मी पण काढले Happy
बे एरिया मध्ये मी ऑफिसला जाण्या करता सायकल चालवत जायचो. Lawrence Expway वर २ दा पंक्चर झाली. कारण काय तर झाडाचे काटे घुसले होते टायर मध्ये Sad
पहिल्यांदा दुकानात काढले पंक्चर पण दुसर्‍या वेळेस कीट असल्याने घरीच Happy
----------------------------------------
मै जिंदगी का साथ निभाता चला गया ...

>>>> woods ला मराठित काय म्हणणार? >>>> दाट झाडी आहे अस म्हण
मस्त आटोपशीर पण माहितीपूर्ण लिहिल आहेस रे! Happy मजा आली वाचताना
नव्वद सालापर्यन्त मी सायकल चालवत होतो, नन्तरही जवळपास ९४ पर्यन्त अधेमधे चालवावी लागे
९४ नन्तर मात्र सायकल चालविणे पूर्णपणे थाम्बले! Happy
इकडील सायकल वर आम्हि काय काय सामान लादायचो त्याची गणतीच नाही! तीच सवय अजुनही आहे, गेल्या एक दीड वर्षापूर्वी, बिजलिनगरपासच्या बन्गल्यातून, बजाज कब स्कूटरवरुन तब्बल ३० पेक्षा जास्त ठोकळा वीटा मी आणल्यात, अन अशा दोन फेर्‍या केल्या!
माझ्या जुन्या फियाट कार वर बाकी कसला नाही तरी टपावर सामान ठेवायच्या क्यारेजकरता खर्च केलेले आठवतय! Happy असले फोटो तर टाकीन कधी तरी, की कस नि किती किती सामान लादून गाड्यान्चा पुरेपुर वापर करायचा अस्तो! Proud
तिकडे भाड्याने मिळणार्‍या सायकल्स्चे अप्रुप वाटते! Happy
चान्गल लिहिलस रे भो! Happy

छान लिहिलयस श्याम.. आवडलं Happy
---------------------------------
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

छान लेख!
माझ्याकडे ती जुनी हीरो सायकल होती, त्यानंतर त्याकाळी स्टायलिश मानली जाणारी बीएसए.. आता पुन्हा विचार करत्ये, सायकल घ्यावी आणि आठवड्यातून दोनदातरी ऑफिसला यावे.. तेही नाही जमलं तर घराच्या आसपास तरी व्यायाम म्हणून सायकल चालवावी.. पण पंक्चर झाली, तर सायकलवाल्याकडेच नेईन.. मी नाही काढणार Happy
----------------------------------------------------
No matter how you feel, get up, dress up and show up.

सायकलींग माझा सुद्धा आवडीचा विषय. दर वर्षी जुलैमधे tour de france न चुकता बघण्याएवढा आवडीचा. शाँझेलिझे वर चालवलीस का सायकल? इथे tour de france ची सांगता होते.
(उच्चार बरोबर आहे का ते माहित नाही.)

मी सुद्धा २ वेळा घरीच कीट आणून पंग्चर (पुण्यात ज्याला पंचर म्हणतात Proud ) काढलं आहे.
लहान असताना अनेक वेळा सायकलच्या दुकानात पंग्चर काढताना बघीतल्याचा फायदा.
तुझा अनुभव एकदम सही !

मस्त.. Happy मी दहावी ते १७ वी रोज कित्त्ती तरी चालवली.. माझी होती अ‍ॅटलास रेसर.. निळी.. Happy
आता मी गेल्या महिन्यात रोज मुलीची सायकल १५ मि. चालवायची अस ठरवून दोनदा चालवली.. Sad आता पुन्हा सुरू करीन सायकलिन्ग. पण मी सुध्दा पंक्चर नाय काढणार. Happy

मस्त रे.. मी पण इथं एक सायकल घेतली होती. पण जास्त नाही वापरली. शेवटी युनिव्हर्सिटीत शिकणार्‍या एका मित्राला देउन टाकली..

छान.
ए ते पंक्चर (puncture) आहे. पंग्चर का म्हणताय?

बरोबर आर्च. मी ही तोच विचार करत होते. पंग्चर काय नी पंचर (वाचलं डेट्रॉईटकर?) काय, दोन्ही चूकच Wink
लिखाण चांगलंय. लहानपणी सायकल चालवायला शिकले होते पण जपानमध्ये जाऊन जमेचना. मारे नवीन सायकल आणून बिणून प्रयत्न केले पण बॅलन्सच जमत नव्हता मग ती विकून टाकली.

तिथेच असताना नवर्‍याकडे माऊंटन बाईक होती. इथे हौसेने घेऊन आला. घरात मूव्ह झाल्यावर गराजमध्ये सामान खूप होतं म्हणून म्हणाला जरा वेळाकरता बाहेर ठेवतो. आणि विसरला. दुसर्‍या दिवशी कचरेवाल्यांनी उचलून नेली. परत विकत घेण्याचा योग काही आलाच नाही.

छान लिहिले आहे...

ते पहिल्या चित्रात सायकल ची चाके गायब झाली आहेत का?
>>
फारेंडा, बहुतेक भुरट्या चोरांनी चाकं चोरुन नेली आहेत. इथे अमेरिकेतसुध्दा सर्रास चालतात हे प्रकार.. Happy

जसे लोक भारता मध्ये रात्री गाडी पार्क केल्यावर गाडीतला टेप/सिडी प्लेयर काढुन घरी नेतात. तसे चालकाने २ ही चाके काढुन ठेवलेली आहेत सायकल पार्क केल्यावर Happy
----------------------------------------
मै जिंदगी का साथ निभाता चला गया ...

सर्वांना अभिप्रायाबद्दल धन्यवाद! जरा घाबरतंच लिहिलं होतं, बरं वाटलं अभिप्राय बघुन Happy

फारेंड,
>>सायकल ची चाके गायब झाली आहेत का?
त्या सायकलची चाकं चोरली आहेत. इथे बाईक्/स्कुटर पण दोन-दोन जाडजुड साखळ्यांनी बांधुन ठेवतात. तरीही फक्त चाकं व साखळी उरलेली आणि बाकीची बाइक गायब असही मी पाहिलं आहे.

केदार,
>>माझी बाईक हायब्रिड आहे.
म्हणजे electrically assisted म्हणायच आहे का तुम्हाला?

टण्या,
>>नेदरलँडमध्ये दणकून सायकल चालवली. तिथे जा कधीतरी.
गेलो होतो ना... बापरे, किती सायकली आहेत... टोटल माणसांपेक्षा जास्त असतील!

डेट्रोइटकर,
>>शाँझेलिझे वर चालवलीस का सायकल?
दुकानातुन आणताना तिथुनच आलो, परत कधी गेलो नाही. पॅरिसमधे रस्ते सायकल फ्रेंडली नाहीत :(. (आणि तो उच्चार बरोबर आहे... आश्चर्य आहे... spelling बाघितलं नाहीये वाटत तुम्ही.. Happy )

रैना,
>>पावसानी गंजताना पाहून दूधवाल्याच्या ताब्यात गेली
अरेरे...

अर्च, सायोनारा,
>>ते पंक्चर (puncture) आहे
मला तेही चालेल... पण उच्चार [puhngk-cher] असा आहे... त्यातला 'ग' चा उच्चार 'क' पेक्षा जास्त वाटतो मला.

शान्की,
>>जसे लोक भारता मध्ये रात्री गाडी पार्क केल्यावर गाडीतला टेप/सिडी प्लेयर काढुन घरी नेतात.
तसं इथे लोक सायकलच सीट काढुन नेतात, चाकं कोणी काढताना मी पाहिलं नाही. एका हॉलिवुड फिल्ममधे पाहिलं होतं. बहुतेक अमेरीकेत तशी पद्धत असेल.

म्हणजे electrically assisted म्हणायच आहे का तुम्हाला? >> नाही. फ्रेम आणि चाक. अल्युमिनीयमची हलकी फ्रेम असते, आणि चाकं देखील माउंटेन पेक्षा कमी जाड, पण रोड बाईक पेक्षा थोडे जाड असतात. आपल्या भारतातील टायरांपेक्षा थोडे कमीच मात्र. Happy मांउटेन बाईक रोडवर चालवल्यावर काही वेळाने गुडघे, पाय दुखन्याची शक्यता असते तसेच रोड बाईक ट्रेलवर नेली तर फ्रेम लोड सहन करु शकत नाही. ज्यांना ट्रेल व रोडवर चालवायची आहे, त्यांना ही एकदम आयडियल बाईक आहे.

http://bicycling.about.com/od/howtoride/a/hybrids.htm इथे तुम्हाला हाय्रब्रिडची जास्त माहीती मिळेल.

सॅम
पंक्चर कसे काढले त्याच्या स्टेप्स लिही ना. आणि त्यात काही गडबड झाली का वगैरे.
पण लेख खूप इंटरेस्टिंग आहे.

केदार,
बरं, समजलं आता. माउंटन बाइकिंग करता का तुम्ही? करत असाल (आणि नसाल तरीही) हे बघा, http://www.dailymotion.com/video/x2m62b_mondial-du-vtt-descente-de-venosc-c

आफताब,
धन्यवाद. पद्धत तीच - लहानपणी बघितलेली, आणि मदतीला मॅनुअल होतचं. तर मी पंग्चर काढलं ते खालीलप्रमाणे,
१. सायकल आडवी केली.
२. एक काळा फोर्क वापरुन टायर रिममधुन काढलं, त्या फोर्कची दुसरी बाजु स्पोकला अडकवली. (नाहीतर टायर परत आत जात!)
३. दुसरा फोर्क वापरुन अजुन थोडं टायर काढलं, असंच पुढे करत गेलो आणि सगळ टायर निघालं.
४. ट्युब बाहेर काढली.
५. ट्युबमधे हवा भरली.
६. बादलीत पाणी घेउन पंग्चर नक्की कुठे आहे ते बघितलं.
७. ट्युबमधली हवा काढुन टाकली, ट्युब पुसुन कोरडी केली.
८. पंग्चरची जागा सँड पेपर वापरुन थोडी खडबडीत केली.
९. त्या जागेवर डिंक लाउन त्यावर पॅच लावला, थोडा वेळ दाब दिला, पाच मिनीटं तसंच ठेवलं.
-- इथे एक गडबड केली, तो पॅच चुकुन उलटा लावला, मग परत काढुन सरळ केला
१०. परत हवा भरुन पंग्चरची जागा चेक केली. सगळं व्यवस्थित असेल तर हवा काढली.
११. जिथे पंग्चर झालं होतं तिथलं टायर चेक केलं (एक काचेचा बारिक तुकडा सापडला)
-- हे महत्वाचं, नाहीतर सगळ होउन ट्युब आत टाकली की पुन्हा हवा जाणार!)
१२. ट्युब आत टाकली, टायर रीमवर चढवलं, हवा भरली...

छान!

काही जण पमचर देखील म्हणतात.

वूड्स म्हणजे जंगल, रान म्हणता येईल.