चित्रपट परिचय : The Big Short

Submitted by मित्रहो on 9 May, 2021 - 01:16

The Big Short, २०१५ सालातील Adam MacKey लखित दिग्दर्शित हा चित्रपट २००७-२००८ सालातील सत्य घटना आणि खऱ्या पात्रांवर आधारीत एक महत्वाचा चित्रपट, हा चित्रपट Michael Lewis यांच्या The Big Short: Inside the Doomsday Machine या पुस्तकावर आधारीत होता. चित्रपटाने इन्व्हेस्टमेंट बॅकींग विश्वाचा बुरखा फाडला.

विषय
चित्रपटाचा विषय आहे २००७-२००८ सालातील Subprime Mortgage Crisis. साधारणतः सामान्य माणूस शेअर मार्केट, बाँड मार्केट, बँकेचे काउंटरपलीकडीले व्यवहार या साऱ्या विषयी अनिभिज्ञ असतो. या साऱ्याशी माझा संबंध नाही अशीच एक सर्वसाधारण धारणा असते. आपण बॅकेत जमा केलेला पैसे, विमा, आपले EPF मधील पैसे कुठल्यातरी रुपाने शेअर मार्केट किंवा बाँड मार्केट मधे वापरले जातात. विचार करा बँकेत जर एक करोड लोकांच्या सरासरी फक्त एक लाख रुपयांची जरी ठेव आहे असे म्हटले तरी एक लाख करोड रुपये येवढा मोठा आकडा तयार होतो. त्या पैशाची गुंतवणुक तितकीच महत्वाची ठरते. त्यामुळेच त्या व्यवहाराचा सामान्यांवर परीणाम होतो. चित्रपटाच्या अगदी सुरवातीलाच गंमतीने म्हटल्याप्रमाणे १९७० पर्यंत बँकेचे व्यवहार कंटाळवाणे होते. कुणीतरी कर्ज घेणार तो ते तीस वर्षात फेडणार आणि बॅका त्यावर व्याज घेणार. सत्तरच्या दशकात Lewis Ranieri या व्यक्तीने Mortgage Backed Securities चा शोध लावला. कल्पना तशी भन्नाट होती. Investment Bank कंपनी बॅकेने दिलेले कर्ज विकत घेणार त्या कर्जांना एकत्र करुन त्यांचे वेगवेगळे गट करणार. त्यांचे बाँड काढून विकणार. त्यावर लोकांना बाँड कुपनवर ज्या पद्धतीने परतावा दिला जातो तसा परतावा दिला जाणार. कर्ज देणे, कर्ज जमा करणे ही कामे बँका करणार तर बँकेने केलेल्या मेहनीतीच्या जोरावर Investment Bank पैसे मिळविणार. बँकेसाठी हा फायदा होता की तारण कर्जाची बँकेची जोखीम आता कुणीतरी दुसरा शेअर करणार होता. बऱ्याच बँका हेच बाँड विकत घेऊन पैसे मिळवित होते. हा सारा व्यवहार दोन मोठ्या गृहीतकांवर आधारीत होता १. हे गृहतारण कर्ज आहे तेंव्हा कर्ज घेणारा ते फेडणारच अन्यथा त्याला घर गमवावे लागनार. तेंव्हा कर्ज न फेडण्याचा प्रश्नच उदभवत नाही. २. नाहीच फेडले तर तारण असल्याने घर ताब्य़ात घेता येते. घराच्या किंमती वाढतच असतात. बँकांनी, पेन्शन फंडांनी कोणते बाँड विकत घ्यावे यासाठी प्रसिद्ध क्रेडीट रेटींग कंपन्या बाँडला AAA, BBB असे रेटींग देत होते. त्यामुळे हा व्यवहार खूप फोफावला. जगातल्या कितीतरी पेंशन फंडापासून ते बँकापर्यंत साऱ्यानी यात पैसा गुंतवला पण जेंव्हा वरील गृहीतक खोटी ठरायची वेळ आली तेंव्हा सारा व्यवहार कोसळला. सुरवातीला हा व्यवहार बँकेपासून इनव्हेस्ट बँक आणि तेथून हे विकत घेणारे फंड असा जात होता. बँका कर्ज देत होत्या, ती कर्जे विकत होत्या जगातले मोठे फंड, बँका बाँड विकत घेत होते. परंतु तो कालांतराने व्यवहार उलट व्हायला लागला. बाँड, MBS याची मागणी प्रचंड वाढली. बाँडची मागणी वाढल्यामुळे अधिकाधिक कर्ज देण्याची गरज पडू लगाली. त्यात Alan Greenspan ने व्याजाचे दर खूप कमी केले. त्यामुळे बँकांवर कर्ज देण्यासाठी दबाव वाढत गेला. बँकांनी कर्ज देताना जी पथ्थे पाळायची असतात ती पाळली गेली नाहीत. अशात जी व्यक्ती कर्ज फेडू शकत नाही त्यांना सुद्धा कर्ज देण्यात आली. हीच ती Subprime Mortgage. Freddie Mac and Fanne Mae या सारख्या कपंन्या तयार झाल्या ज्यांनी सारे नियम, पथ्थे धाब्यावर बसवून कर्जे दिलीत. २००७-२००८ साली जी काही अर्थव्यवस्थेची घसरण झाली त्याविषयी Panic या नावाचा एक माहितीपट सुद्धा आहे. ज्यात या अमेरीकन फेडरल बँकेच्या Hank Paulson, Henry Bernanke यांच्या मुलाखती तर आहेच शिवाय जॉर्ज बुश, बराक ओबामा यांच्या सुद्धा मुलाखती आहेत. काही प्रमाणात तो माहितीपट पॉलसनने जे बँकांचे बेलआउट केले ते यो्ग्यच होते हे सांगण्याचा प्रयत्न करतो त्या दृष्टिकोनाशी सहमती असेलच असे नाही. तरीही तो माहितीपट चांगला आहे. तसे बरेच माहितीपट आहे पण ते फक्त बँकेचे अधिकारी मोठे झाले आणि सामान्यांना मात्र त्रास झाला हा तुम्हा आम्हाला माहिती असलेलाच मु्द्दा सांगतात पण त्यामागची कारणे सांगत नाही.

कथा
चित्रपटाच्या कथेत तीन धागे आहेत प्रत्येक धाग्याचे स्वतंत्र नायक आहेत असे एकून सहा नायक कथेत आहे. पहिला धागा आहे Scion Capital या कंपनीचा मालक असनाऱ्या डॉ. मायकेल बरीचा, खऱ्या पात्राचे नाव सुद्धा मायकेल बरी असे होते. याला कॅलिफोर्निया येथील हाउसिंग मार्केटचा अभ्यास करताना असे जाणवते की २००० साली डॉट कॉम कंपन्यांचा फुगा फुटल्यावर कॅलिफोर्नियात पगार वाढले नाहीत परंतु घराच्या किंमती मात्र भरमसाट वाढल्या. याचा अभ्यास करता त्याच्या लक्षात आले की या साऱ्याच्या मुळाशी आहे सहज मिळणारी कर्जे. त्यामुळे कुणीही कर्ज घेतो, घर घेतो वर्षभरात त्यावर नफा मिळवून ते विकतो, दुसरा घर विकत घेतो. बँका हे कर्ज पुरवित आहेत कारण MBS मुळे त्यांची जोखीम जवळजवळ संपली आहे. त्याने जसाजसा अभ्यास केला तर त्याला जाणवले की हा एक मोठा फुगा आहे आणि तो लवकर फुटणार. त्यामुळे तो हाउसिंग मार्केटच्या विरोधात बेट करायचे ठरवितो म्हणजे Short करायचे ठरवितो . हा एक वेडा आहे असे समजून साऱ्या बँका त्यासाठी तयार होतात कारण हाउसिंग मार्केट कधी पडणार नाही याची सर्वांनांच खात्री असते.
दुसरा धागा आहे Jared Vennett (खऱ्या आयुष्यातील व्यक्तीचे नाव Greg Lippman) आणि Mark Baum (खऱ्या आयुष्यातील व्यक्तीचे नाव Steve Eisman) या दोघांचा. जॅरेड हा Deutsche Bank मधे कामाला असतो. एका पबमधे त्याला त्याच्या मित्रांकडून कुणीतरी मूर्ख डॉ. बरी हाउसिंग मार्केटच्या शॉर्ट कतोय असे कळते. तो त्याकडे दुर्लक्ष न करता त्याचा अभ्यास करतो आणि त्याला डॉ. बरी असे का करीत असेल याचा अंदाज येतो आणि तो असे हाउसिंग मार्केटचे शॉर्ट विकायचे ठरवितो. त्यासाठी तो Front Point Partner या कपनीला फोन करतो. त्याचा फोन त्याच नावाच्या भलत्याच कंपनीला लागतो. त्या कंपनीचा मुख्य असतो मार्क बाम. त्या चौघांनाही कुणीतरी जारेड हाउसिंग मार्केटचे शॉर्ट विकत आहे हे कळते. सुरवातीला त्यांनाही हा मूर्खपणा वाटतो परंतु Deutsche Bank या सारख्या प्रतिष्ठित कंपनीतील व्यक्ती असे कसे करील म्हणून ते त्याला भेटायचे ठरवितात. जारेड त्यांना समजावून सांगतो की AAA रेटींग असनाऱ्या ९८ कर्जात जर BBB रेटींग असनारी २ कर्ज मिसळली तरी रेटींगमधे फरक पडत नाही. जर का अशा BBB मधून कर्ज न फेडनाऱ्या व्यक्तींची संख्या वाढत गेली तर संपूर्ण व्यवस्था कोसळेल. त्या चौघांना त्याचे मत पटलेच असे नाही पण पटले नाही असेही नाही. त्यामुळे ते फिल्ड स्टडी करुन शहानिशा करायचे ठरवितात. फिल्ड स्टडी करायला ते रियल इस्टेट एजंटला भेटतात ती त्यांना सांगते कसे घराचे भाव सतत वाढत आहेत. कशी लोक दरवर्षी मोठी घरे घेत आहेत. ते कर्ज गोळा करनाऱ्या एजंटला भेटतात ते त्यांना सांगतात की ते शुक्रवारी फॉर्म भरतात आणि बँका सोमवारी कर्ज देतात. कोणत्याही प्रकारचे चेकींग होत नाही. आजपर्यंत त्यांनी दिलेली कर्जे कधी बँकेने रिजेक्ट केली नाही. ते कोणालाही कर्ज देतात. त्यांनी स्ट्रिप डांसरला कर्जे दिली आहेत. मार्क बाम अशाच एका स्टिप डांसरला जाऊन भेटतो आणि ती त्याला सांगते कसे तिने पाच घरे घेतली आहेत. एका कर्जाने दुसरे आणि दुसऱ्याने तिसरे. हे सारे बघितल्यावर त्याची खातरी होते का हा मोठा फुगा आहे आणि तो लवकर फुटनार आहे. Front Point Partner हाउसिंग मार्केट शॉर्ट करायचे ठरवितात.
तिसरा धागा आहे जेमी आणि चार्लीचा. ती दोघे Brownfield Capital नावाचा छोटा फंड चालवत असतात. त्यांचे गणित अगदी साधे असते. जी गोष्ट घडण्याची शक्यता फार कमी आहेत असे जगाला वाटत असते त्यावर पैसा लावायचा म्हणजे येणारा परतावा खूप जास्त असतो. ते जे. पी मॉर्गन चेझ या कंपनीत गेले असताना एक रिपोर्ट वाचतात ( प्रत्यक्षात थोडे वेगळे घडले होते ते सिनेमातच समजते). तो रिपोर्ट जारेडने लिहिलेला असतो. त्यात त्याने हाउसिंग मार्केट हा कसा फुगा आहे आणि तो फुटनार हे समजावून सांगितले असते. त्यांना हे Credit Default Swap विकत घ्यायचे असतात पण त्यासाठी त्यांना तिसऱ्या व्यक्तीची गरज लागत असते कारण त्यांचे कॅपिटल कमी असल्याने तसे लायसेंस नसते. यात त्यांना एकेकाळचा सरकारी कंपनीसाठी काम करीत असलेल्या Ben Rickert (खऱ्या आयुष्यातील नाव Ben Hockett) मदत करतो. ते हाउसिंग मार्केट शॉर्ट करतात.
पुढे काय होते तो सारा इतिहास आणि बहुतेकांना माहित आहे तो चित्रपटात बघण्यातच मजा आहे.

वैशिष्टे
एका सर्वेक्षणानुसार हा चित्रपट ९० टक्क्याच्या वर सत्य आहे असे सांगतात. (संदर्भ विकिपिडिया) या गोष्टीचा अभिमान वाटत नाही तर त्याची धडकी भरते. हे सारे व्यवहार असे चालतात असा प्रश्न मनात निर्माण होतो. बँकेचे डिपॉझीट, विमा पॉलीसी, पेन्शन फंड यात आपण विश्वासाने ठेवलेला पैसा जर अशा रितीने कसलीही शहानिशा न करता कर्ज देण्यासाठी वापरात येत असेल तर धडकी भरनारच. २००८ सालानंतर काही रेगुलेशन आले त्यामुळे हल्ली हा सारा व्यवहार इतका राजरोसपणे चालत नाही.
हा चित्रपट आम्ही चित्रपट तयार करतोय असा आव आणत नाही जे घडले ते जसेच्या तसे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. सत्य जितके उघडे नागडे करुन सांगता येईल तसे सांगितल्या जाते. त्यामुळे चित्रपट बनविताना दिग्दर्शक किंवा लेखक ज्या तंत्रांचा वापर करतात तसलं काहीही लेखक दिग्दर्शक Adam MacKey याने केलेले नाही. या चित्रपटात कुठलीही प्रतीके, उगाच दिसनारा विरोधाभास, पात्रांच्या काही लकबी किंवा वैशिष्टे, पात्रांच्या तोंडून आलेले तत्वज्ञान (बऱ्याचदा ही मते लेखकाची असतात आणि तो पात्रांच्या तोंडी देत असतो) असल काहीही आढळत नाही. याच विषयावरील दुसरा चित्रपट Margin Call यात या साऱ्या चित्रपट तंत्रांचा वापर केल्याचे जाणवते. फारच शोधायचे म्हटले तर क्रेडीट रेटींग एजंसीत काम करनाऱ्या स्त्रीला धड न दिसणे तिच्या डोळ्यावर असनारा काळा चष्मा असे काहीतरी सापडेल पण तेही तुरळकच. कदाचित हा या चित्रपटाचा दोष सुद्धा म्हणता येऊ शकतो. त्यामुळे नामांकन मिळूनही या चित्रपटाला फक्त एकच अॅकेडेमी पुरस्कार मिळाला.
दुसरे वैशिष्ट असे की या चित्रपटात तीन समांतर धागे आहेत आणि सहा नायक आहे पण कुणीही एक खलनायक नाही. संपूर्ण व्यवस्था ही खलनायकी आहे त्यात काम करनारे सारे मोहरे या खलनायकी व्यवस्थेचा भाग आहे. मग तो अॅलन ग्रीनस्पॅन असो, कुण्या मोठ्या बँकेचा सीईओ असो की कुण्या मोठ्या बँकेत नुकतेच जॉइन झालेला असोसियेट असो सारे या व्यवस्थेचा भाग आहे. ही सारी मंडळी त्या प्रसंगात जरी खलनायकी पद्धतीची वाटत असली तरी ते सारे या व्यवस्थेचा एक भाग आहे. त्यांना स्वतःला सुद्धा कल्पना नाही नाही की आपण एका मोठ्या खलनायकी व्यवस्थेचा भाग आहोत. त्यामुळे सहा नायक विरुद्ध एक खलनायकी व्यवस्था असे चित्र उभे करण्यात चित्रपट यशस्वी होतो. मार्क बाम हे पात्र ज्या व्यक्तीवर आधारीत आहे त्या स्टिव्ह आइझमेनने एका मुलाखतीत सांगितले होते की तो अशा कितीतरी व्यक्तींना भेटला होता ज्यांना पूर्ण खातरी होती की ते कधीच चुकनार नाहीत ते चुकुच शकत नाही. त्याच्या मते वॉलस्ट्रिटमधे काम करनाऱ्यांची ही मानसिकता २००७ च्या अर्थव्यवस्थेच्या घसरणीस कारणीभूत ठरली.
वर सांगितल्याप्रमाणे चित्रपटात तीन समांतर धागे आहेत. तिनही धागे एकाच विषयाशी संबंधित आहेत. हे तीनही धागे समांतर पातळीवर पुढे जात असतात तरी चित्रपट पकड तशीच कायम ठेवतो. तीन धाग्यातील नायक कधीही एकमेकांना भेटत नाहीत किंवा ओढूत ताणून त्यांची भेट घडवून आणण्याचा प्रयत्न दिग्दर्शकानी केलेला नाही. प्रत्येक व्यक्ती त्याचा संघर्ष त्याच्या पातळीवर हाताळत असतो. डॉ बरी त्याच्या कंपनीतील गुंतवणुकदारांशी भांडत असतो कारण त्यांना त्याचा हा व्यवहार आवडला नसतो. मार्क बाम ज्या व्यवहाराच्या विरोधात भांडत असतो त्याच व्यवहारात त्याच्या फंडाची मालक कंपनी मेरील लिंच मोठ्या प्रमाणात अडकली असते. तो प्रत्येकाचा स्वतःतचा संघर्ष आहे.
चित्रपटात मोठ्या कलाकारांची मांदियाळी आहे. रायन गोसलिंगचा जॅरेड प्रभावी आहे. प्रत्यक्षात ग्रेग लिपमॅन हे पात्र कसे होते याविषयी फार माहिती नाही परंतु रायन गॉसलिंगने त्याच्या पात्राला एक विनोदी ढंग दिला आहे. तो कथेचा सूत्रधार आहे त्यामुळे अजून मजा आणली आहे. डॉ. बरी हे पात्र Asperger Syndrome ने त्रस्त आहे तसेच त्याला एक डोळा नाही त्यामुळे त्याला संवाद साधताना त्रास होतो. हे सारेच क्रिस्टिन बेल या कलाकाराने मस्त उभे केले आहे. सहा नायकात तसा दुय्यम तरीही तितक्याच प्रभावीपणे वठविला गेला तो ब्रॅड पिटचा Ben Rickert. जेमी आणि चार्लीमधला चार्ली त्याच्या बोलक्या डोळ्यांमुळे जास्त लक्षात राहिला. खरी कमाल आणली आहे ती Mark Baum हे पात्र निभावनाऱ्या Steven Carelli या कलाकराने. तसा हा विनोदी भूमिका करनारा कलाकार आहे. The Office या मालिकेतील त्याची बॉसची भूमिका खूप गाजली. मार्क बामची व्यवस्थेविषयी असलेली चीड, कुणालाही जे आहे ते सरळ सांगण्याची त्याची पद्धत त्याने मस्त उभे केले. एकदा तो भाषण देत असताना Bears Sterns या कंपनीचा सीईओ त्याची चेष्टा करायची म्हणून काहीतरी विचारतो त्याला प्रत्युत्तर म्हणून तो सांगतो माझी परिस्थिती जर तुझ्यासारखी असती तर मला आता विनोद सुचला नसता. अप्रतिम. तसेच शेवटी शॉर्ट विकायला जेंव्हा तो परवानगी देतो तो प्रसंग सुद्धा अप्रतिम अभिनयाने उभा केला आहे.

काही प्रयोग
यात काही प्रयोग केले आहेत. जसे या चित्रपटातील पात्रे मघेच थांबून तुमच्याशी संवाद साधतात. संवाद तसा फार छोटा असतो बऱ्याचदा प्रत्यक्षात काय घडले आणि आम्ही सिनेमात काय दाखवतो ते सांगनारा असतो.
चित्रपटाच्या विषयाशी संबंधित बऱ्याच क्लिष्ट अर्थशास्त्रीय संकल्पना आहेत. उदा. MBS (Mortgage backed Securities), CDO (Collateralized Debt Obligation), Synthetic CDO. या संकलपना समजल्याशिवाय चित्रपट कळनार नाही. या संकलपना समजावून सांगण्याची एक वेगळीच पद्धत चित्रपटात वापरली आहे. चित्रपटात नसनारी पण त्यांच्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती येऊन एकेक संकलपना जेव्हा गरज असते तेंव्हा येऊन समजावून सांगते. उदा. कधी कुणी हॉलीवुडची प्रसिद्ध अभिनेत्री तर कधी प्रसिद्ध शेफ तर कधी प्रसिद्ध अर्थशास्त्री येतो. हे असे पात्र अचानक येते तरी चित्रपट बघण्याची लिंक तुटत नाही की चित्रपटातला रस जात नाही. हा एक अभिनव असा प्रयोग आहे असेच म्हणावे लागेल.
हा ना व्यावसायिक चित्रपट आहे ना फेस्टीवलचा चित्रपट आहे याला कदाचित मनोरंजनात्मक माहितीपट म्हणता येईल. हा चित्रपट एक असे जग ज्याची सामान्य माणसाला फारशी कल्पना नसते ते जग त्या गुणदोषासकट लोकांसमोर उभे करण्यात नक्कीच यशस्वी होतो. वॉलस्ट्रीटची दुनिया ज्या काही चित्रपटांनी अत्यंत प्रभावीपणे उभी केली त्यात या चित्रपटाचा नंबर बऱाच वरचा असेल. वॉलस्टीट संबंधित मी पाहिलेल्या चित्रपटात या चित्रपटाला त्याच्या विषयाशी पूर्णपणे प्रामाणिक राहण्याच्या प्रयत्नांमुळे मी पहिला क्रमांक देईल.
चित्रपट संपल्यानंतर लक्षात राहतात ते चित्रपटातील काही ह्रद्य प्रसंग. ज्या कंपनीच्या रिसेप्शनमधे बसले तरी खूप अभिमान वाटत होता ती कंपनी जेंव्हा आतून बघायचा योग आला तेंव्हा ती पूर्णपणे उध्वस्त झाली होती फक्त रिकाम्या खुर्च्या आणि कांपुटर उरले होते. ते बघितल्यावर चार्ली म्हणतो मला हे असे बघायचे नव्हते. मला आवडलेला आणि लक्षात राहिलेला प्रसंग म्हणजे मार्क बाम आणि Synthetic CDO कंपनीच्या सीईओ मधील लंच टेबलवरचा प्रसंग. लंच टेबलवर तो सीईओ मार्कला Synthetic CDO काय ते समजावून सांगत असतो. जिथे CDO ही पूर्पणपे पोकळ संकल्पना आहे असे मार्कचे ठाम मत असते तिथे Synthetic CDO विषयी ऐकण्यात त्याला अजिबात रस नसतो. त्याला माहित होते हे सारे ज्या कर्जाच्या आधारावर चालले आहे तिथे सारे गोडबंगाल आहे. हे न्यूयॉर्कमधल्या फाइव्ह स्टार ऑफिसमधे बसून कारभार करनाऱ्याला समजनार नाही. अशी कितीतरी मंडळी होती ज्यांना खाली काय चालले याची काहीही माहिती नसताना वर ते आपला खेळ खेळत असतात. मार्क बाम त्या व्यक्तीसोबत बऱ्याच पद्धतीने आपला मुद्दा मांडतो ती व्यक्ती ते समजावून घेण्याच्या मानसिकतेत नसते. त्या व्यक्तीला मार्कचे बोलणे आवडत नाही आणि ती व्यक्ती म्हणते.
Lets talk how much worth you are. How much money you made last year? I made मार्क बाम उठतो आणि त्याला म्हणतो
You do not know how much shit you are in.
आपण कुठल्यातरी खलनायकी व्यवस्थेचा भाग तर नाही ना, या साऱ्याची खरी किंमत काय हे असे प्रश्न स्वतःलाच विचारले नाही तर मार्क बाम चित्रपटात म्हणतो तशी आपली अवस्था होऊ शकते. प्रवाहासोबत धावत असताना हे धावणे कितपत योग्य आहे हा प्रश्न सतत विचारायला हवा नाहीतर आपल्याला कल्पनाच नाही की आपण कुठल्या गर्तेत अडकत जातोय. चित्रपटाच्या विषयाशी प्रामाणिक राहण्याच्या या भूमिकेमुळेच चित्रपट अप्रतिम होतो. त्याचमुळे हा चित्रपट मला भयंकर आवडला आणि कायम लक्षात राहिल.

अवांतर
१. वॉलस्ट्रीट विषयावरील चित्रपटांची भाषा ही एखाद्या क्राइम थ्रीलर चित्रपटासारखी शिवराळ का असते हे कधी समजले नाही. तिथे वापरली जाणारी भाषा तशीच असते की चित्रपटांनी ते पण गँगवॉर पेक्षा कमी नाही हे दाखविण्यासाठी तशी भाषा वापरली.
२. नुकत्याच घडलेल्या Game Shop Short च्या किस्सानंतर हा चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या अचानक वाढली.

~मित्रहो
https://mitraho.wordpress.com/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहीले आहे! हा चित्रपट थिएटर मधे पाहिला होता पण इतके डीटेल्स लक्षात नाहीत. पुन्हा बघायला हवा.

सबप्राईम आणि इतर फायनान्शिअल क्रायसिस किंवा ब्लंडरविषयी वाचायला आवडतं. त्यामुळे हा चित्रपट पहायची उत्सुकता लागली आहे. कुठल्या प्लॅटफॉर्मवर आहे? भारतातून ॲमेझॉन प्राईमवर दिसला नाही काल.

https://www.amazon.com/Aftershock-Protect-Yourself-Financial-Meltdown/dp...

हे पुस्तक एकदा जरुर वाचा!
आज काय होइल हे २०११ सालीच तंतोतंत लिहिले आहे. फक्त टाइम्फ्रेम चुकली लेखकाला २०१८ ते २०२० मध्ये होइल असे वाटले ते आता होत आहे.
१) सर्व सेन्ट्रल बॅन्का रेट कमी करतील, त्यांना रेट वाढवायलाच पॉलिटिशियन्स आणि बिझनेसेस देणार नाहित.
पण पुढे रेट झिरो झाल्यावर त्यांचा नाइलाज होइल कारण इन्फ्लेशन आणि रिसेशन एकाच वेळी येइल.
२) स्टॉक, घरे आणि असेट प्रायसेस आर्टिफिशली वाढवल्या जातिल.
सर्व तंतोतंत २०११ मध्ये लिहिले होते.

कालच पाहिला.
सबप्राईम क्रायसिसवरची शेकडो टेक्निकल प्रेझेंटेशन्स जे करत नाहीत ते हा चित्रपट करतो. हा बुडबुडा आपल्यासभोवती निर्माण झालाय याची घुसमट आणि तो कधी फुटतोय याची काळजीमिश्रीत उत्सुकता यांचं जबरदस्त चित्रीकरण आहे हा. टेक्निकल बाबी ओवरसिम्प्लीफाईड केल्या आहेत असं वाटतं. पण या विषयाशी संबंध नसलेल्या लोकांसाठी ते गरजेचं असेल कदाचित. शेवटीशेवटी येणारी (बेअर स्टर्नवाली)डिबेट तर खतरनाक आहे. आणि आत्ता मायकल बरी काय ट्रेड करतोय ते वाचून अंगावर शहारा येतो.
वॉलस्ट्रीटवरची भाषा शिवराळ वापरलेय ते बहूतेक अग्रेशन, कटथ्रोट कॉंपीटीशन, त्यामुळे येणारा तणाव आणि त्याचवेळी करोडो रुपयात खेळत असल्यामुळे आलेला सर्वज्ञपणाचा आविर्भाव दाखवण्यासाठी...

या चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल मनापासून आभार.

सुरूवातीचे काही परिच्छेद वाचून असे वाटले की आधी सिनेमा पहावा. आता सिनेमा पाहिला की पूर्ण लेख वाचेन आणि पुन्हा लिहेन. धन्यवाद या ओळखीसाठी!

धन्यवाद निरु
लेख लिहण्यामागचा उद्देष हाच की वाचकांना विषयाची जुजबी का असेना ओळख करुन द्यावी. तसेच त्यांनी चित्रपट बघावा तुम्ही लेख वाचून चित्रपट बघितला म्हणजे उद्देष सफल झाला.

धन्यवाद ऋन्मेऽऽष

धन्यवाद निलिमा. तुम्ही सुचवलेले पुस्तक नक्की वाचेन. ज्यावेळी इंटरेस्ट कमी होत जातात आणि मग महागाई वाढते. अशा वेळेला जेव्हा सरकार इंटरेस्ट वाढवते तेंव्हा Taper Tantrum होऊ शकते. हे २०१३ साली झाले होते.

धन्यवाद MazeMan वाह तुम्ही चित्रपट बघून त्याविषयी थोडक्यात मस्त लिहिले. असा थरार मला लिहिता येत नाही तुम्ही चार ओळी मस्त लिहिल्या. अवांतर हल्ली मायकेल बरी पाण्याव्यतिरीक्त (सिनेमात फक्त पाणी असेच सांगितले) इतरही स्टॉक मधे गुंतवणुक करतो. माझ्या माहितीप्रमाणे Apple मधे सुद्धा त्याची गुंतवणुक होती. Steve Eisman ने टेसला शॉर्ट केले होते परंतु नंतर त्याने कव्हर केले. त्याच्या Analysis शी मी सहमत आहे. सध्या मार्केटने टेसला डोक्यावर घेतले आहे.

धन्यवाद जिज्ञासा सिनेमा नक्की बघा आणि मग लिहा.