बाल्कनी बाग - एक विरंगुळा. ( डिसेंबर २०२०)

Submitted by Srd on 10 December, 2020 - 09:05
चिनी गुलाब किंवा ओफिस टाइम.

बाल्कनीतल्या अपुऱ्या जागेत आणि फारतर पाच तासांचे मिळणारे ऊन यात बागकामाची हौस भागवणे एक कसरतच असते. सर्वच प्रकारची झाडे हवीहवीशी वाटतात पण जागा पुरत नाही. एक काढले तर दुसऱ्याला जागा मिळते. इनडोर्स पद्धतीची सर्वच लावून चालत नाहीत. कामाचीही लागतात. पुन्हा त्यात वेलवर्गीय भाज्या, साध्या हिरव्या पालेभाज्या, फुलझाडे, मसाले, शेंगाभाज्या, पक्षी / फुलपाखरे यावेत म्हणून त्यांच्यासाठी वेगळी असे नाना प्रकार. सर्वप्रथम ठरवून टाकलेले की रासायनिक फवारे मारायचे नाहीत. ते बाजारात मिळतातच. रोग पडलाच तर सोपा उपाय करायचा अथवा झाड उपटून टाकायचे. फळे,फुले नाही आली तर बदलायचे. उपाय शेवटी दिले आहेत.

तर सध्या( 2020_डिसेंबर) जे काही आहे ते फोटोमाध्यमातून.

फोटो १
.पुदिना

फोटो २
.पुदिना एका ट्रेमध्ये आहे त्यामुळे सतत ओलावा मिळतो. कापडी पिशवीमुळे मुळांना गारवा राहतो.पाणी तुंबत नाही.

फोटो ३
.गवती चहा हवाच.

फोटो ४
.गवती चहा खूप वाढला की हिरवी पाने कापून जुडी करून पंख्याखाली वाळवली की वापरता येतात.

फोटो ५
.मिरची. भाजीसाठी आणलेल्या हिरव्या मिरच्यातील एखादी लाल करून बी टाकून ठेवायचे. उगवलेल्या रोपांतून एक दोन ठेवायचे. वेगवेगळ्या वेळी आणलेल्या मिरचांचे असे केल्यावर एखादा लॉट चांगला लागतो. काही खटपट न करता त्यास मिरचा लागतात. मिरचा लागणाऱ्या रोपाचे शेंडे कापून वाढवल्यास त्यास खात्रीने मिरचा लागतात. काम सोपे होते. बाजारातून बी आणण्यापेक्षा हा प्रयोग साध्य होतोच. आणि चारपाच प्रकारची झाडे वाढवल्याने दीड महिना वाया जात नाही. फक्त फुलेच येणारे एक झाड मात्र कायम ठेवायचे.

फोटो ६
.पालक. थंडीचे दिवस सरेपर्यंत म्हणजे महा शिवरात्रीपर्यंत पालक वाढवणे मुंबईकडच्या गरम हवामानात साध्य होते. बी आणून वाढवण्यापेक्षा बाजारातून भाजीसाठी मुळे असलेली लहानसर पालक जुडी उपयुक्त. वरची पाने काढून खालचा मुळांचा भाग मातीत लावल्यावर पाने येतात. तीनदा पाने काढता येतील नंतर मार्चमध्ये काढून घ्यायचा. माती चिकट लाल नको आणि ऊन फार तडतडीत सोसत नाही. मातीत पाणी साठता कामा नये.

फोटो ७
.विड्याचे पान. नागवेल. छोटे पान.

फोटो ८
.विड्याचे पान मोठे. यास नर्सरीवाले मघई पान म्हणून विकतात. पण खरे मघई पान बिहारमध्ये डिसेंबर ते फेब्रवारीत पिकते. तिथून खात्रीशीर वेल आणला पाहिजे. या पानांस तडतडीत थेट ऊन नको. गारवा हवा.

फोटो ९
.मनी प्लांटचा उपयोग सावलीची जागा झाकण्यासाठी होतो. आणि ऊन्हाऐवजी फक्त उजेडावरही वाढते ही जमेची बाजू.

फोटो १०
.घेवडा. बाजारात जो चपटा चंद्रकोरीसारख्या शेंगांचा मिळतो त्यातल्याच जून शेंगा वाळवून बिया लावल्या की चार दिवसांत रोपे उगवतात. आधाराच्या काटक्या आणि दोऱ्या तयारच ठेवाव्या लागतात. कारण वेल भराभर वाढतात आणि दहा पाने आली की कळ्यांचे शेंडे डोकावू लागतात. तसे बारमाही पीक आहे. दोनदोन महिन्यांनी नवीन दाणे रुजवावे म्हणजे शेंगा सतत मिळतात. एका वेळेला आठदहा वेल असावेत.

फोटो ११
.चिनी गुलाब. सतत फुलं दिसायला हे सोपे झाड. फक्त थंडीत कोमेजते. ऊन भरपूर हवं.छोटंसं आटोपशीर आणि रंग वेगवेगळे.

फोटो १२
.कर्दळ. ही दोन फुटी जात आहे। फूल नावालाच पण लाल आहे. पानेही उपयोगी मोदकासाठी किंवा इतर कामाला.

फोटो १३
.इनडॉरमध्ये भरपूर वरायटी आहेत. त्यातले हे एक. मोठ्या कुंड्या ( तळाची भोके बुजवली आहेत. त्यात ही झाडे ठेवून दोन दिवस आत ठेवता येतात. परत बाल्कनीत न्यायची.

फोटो १४
.टेडीलाही आवडतो मनीपॉट.

फोटो १५
.काळी मिरी. लावून ठेवली आहे. पाहू मिरी येते का.तीन वर्षांनी येते म्हणतात. मोठ्या झाडांचा गारवा हवा.

फोटो १६
.छोटी लिली. दिसते छान, वाढवायला सोपी. पांढरी मोठी फुलेही येतात.

फोटो १७
.छोटे गवत. यात बऱ्याच जाती आहेत. हँगिगची एक वेगळी सुंदर जात असते.
हाफ राउंड कुंड्या प्लास्टिकच्या हुकसह मिळतात. भितींला लावता येतात. पण प्रत्येक कुंडीसाठी दोन भोके पाडावी लागतात. माझ्याकडे एक दुसऱ्या कामासाठी शिडी केली होती ती उपयोगात आणली. दोन्ही बाजूने वर खाली हलवता येतात कुंड्या.

------------------------

माती आणि कुंड्या -

लाल मातीमध्येच नर्सरीवाले रोपे देतात. पण बाल्कनीतल्या कुंड्यांत फार त्रासदायक असते.लाल पाणी होऊन फरशी घाण होते. शिवाय लाल मातीतले पाणी वाळले की धोंडा होतो. भुसभुशीत राहात नाही.

कुंड्यांना भोके असली की पाणी बाहेर वाहते. ते वाहू नये म्हणून ट्रे ठेवावे लागतात. किंवा भोके नसलेल्या कुंड्या/टब घेऊन त्यात पिशवी ठेवणे हा उपाय करतो. हँगिग कुंड्यांना भोके असतात त्यातून पाणी ठिबकत राहाते. त्याखाली दुसरी भोके नसलेली कुंडी ठेवावी लागते. दुसरी साधी माती असणे उत्तम. पण रोपाची लाल माती काढून यात लावणे अवघडच.किंवा कटिंग लावणे,बिया लावणे वगैरे.

बी/बियाणे उगवण्यासाठी साधी भुसभुशीत माती हवी. वापरलेली माती असेल तर ती प्रथम प्रेशर कुकरमधून वाफवून घेतो. यात बी लावले की उगवते. मातीतले शंख गेल्याने कोंब खायची भीती राहात नाही.

रोग निवारण -

चवळी/घेवडा या भाज्यांच्या वेलांवर कळ्या येण्याच्या सुमारास हमखास रोग पडतो. ते काळे/पांढरे कीडे झाडाचा रस शोषतात. त्यास सोपा निर्धोक उपाय म्हणजे खळ ( कांजी) फवारणे. खळ वाळली की किडे थिजतात. हलता उडता येत नाही. रोज रात्री नवे कीडे हल्ला करतात. रोज एकदा/ दिवसाआड फवारणी करायची. साधारणपणे पंधरा दिवस धाड येते. नंतर येत नाही. पाव लिटर पाण्यात दोन चहाचे चमचे मैदा घालून उकळून गार केले की फवारण्यायोग्य पातळ खळ तयार होते. फवारणी झाल्यावर स्प्रेअर साध्या पाण्याने धुऊन ठेवायचा.

खत -
घालायचे झाल्यास शेणखत - मिरची,झेंडू,मोगरा, टोम्याटोसाठी.

घरातला ओला कचरा - वेलवर्गीय भाज्यांना.

नवी ऊन खाल्लेली माती - पालक, पुदीना,गवती चहा, चमेली, सायली,जाई,जुई,कढीपत्ता.

गांडुळ खत - पुदीना.

----------------------------------------

नवीन २०२०_१२_११;

काही प्रश्न आले आहेत प्रतिसादांत. त्याबद्दल-

१) अधिक माहिती टाका धाग्यात - सतीश.
२) बाल्कनीत बाग करायची आहे कशी सुरवात करावी.
खूप सारी आयुधे, कुंड्या, रोपे जमा केली आहेत. तर कुंड्यांसाठी प्ल्आस्टिक ट्रे आणा आणि त्यात खाली मातीचा थर एक इंच देऊन त्यावर कुंडी ठेवा. वाहणारे पाणी फरशीवर किंवा भिंतीवर जाणार नाही. खतामध्ये असलेली पोषक द्रव्येही वाहून न जाता खालच्या मातीत जमा राहतील. पाणी उघडे नसल्याने डास होणार नाहीत. त्या मातीत दुर्वा लावू शकता.

३) बाल्कनीच नाही. - हर्पेन.
हा मुद्दा माझ्या लक्षातच आला नव्हता. काही घरांत बाल्कनी आत घेतलेली असते आणि स्लाइडिंग खिडक्या लावलेल्या असतात. बाहेरच्या बाजूस बॉक्स ग्रिलसुद्धा काही सोसायट्यांत लावून देत नाहीत किंवा त्या ग्रिलमध्ये झाडे लावू देत नाहीत. कारण मातीचे ओघळ वाहून इमारतीचा भिंतीचा रंग खराब होतो.

उपाय -

फोटो १८
.छोटा टब, तळाला भोके न पाडलेला मिळतो. यात काळ्या प्लास्टिकचे उन्हाला टिकाऊ असे या साईजमध्ये मिळत नाहीत. मिळाले तर उत्तमच.


फोटो १९
.ही जी कापडी ( पॉलीएस्टरची कुजत नाही.) पिशवी केली आहे तशा दोन या टबमध्ये राहतात. त्यात झाडे लावता येतील.

हा टब तळाला साडेचार इंच आहे तो खिडकीच्या स्लाइडिंग खिडक्याच्या आतल्या बाजूस राहू शकेल. किंवा टांगता येईल. खिडकीतून उजेड मिळेल, भोके नसल्याने खाली पाणी सांडणार नाही. घराच्या आत असल्याने कुणाची तक्रार नसणार. चार पाच टब ठेवल्यास आठ दहा झाडे येतील. लाल माठाचे शेंडे लावल्यास वाढतात. पालकही लावता येईल. नर्सरीतून आणलेल्या तुळस,सदाफुली,शेवंती इत्यादी रोपांच्या छोट्या पिशव्या यात राहतात. म्हणजे काही खटपट करावी लागणार नाही. वरती मनी प्लांट लावलेले फोटो क्रमांक (९) मधले टब फारच निमुळते आहेत ते घेऊ नका. त्यात पिशवी बसत नाही.

------------------------
विड्याच्या पानांचा उपयोग.
फोटो २०
साधारण तीस चाळीस पाने महिन्याने मिळाली की ती घेतो.
पानांचे तुकडे करून त्यात थोडा गुलकंद, थंडक उर्फ मेंथॉल, बडीशेप भरडून, कात, चुना टाकून मिक्सरमध्ये भरड दळायचे. तो लगदा सावलीत पंख्याखाली वाळवलेला विडा तयार होतो. असा दुकानातही मिळतो. यात नंतर बारीक सुपारी मिसळणे ऐच्छिक.

फोटो २१
.विडा वाळवल्यावर.फ्रिजमध्ये ठेवतो.

पुदिनाचा उपयोग.
फोटो २२
.ओली पाने वापरतोच. पण खूप वाढला तर त्याचे लांब शेंडे कापून घ्यायचे.ते सावलीत चाळणीवर वाळवायचे. चार दिवसांनी कुरकुरीत वाळल्यावर चुरायचे आणि चाळले की आपोआपच काड्या वेगळ्या होऊन खाली बारीक चुरा मिळतो तो बॉटलमध्ये भरून ठेवायचा. फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नसते. भेळेत वापरता येतो. पाणीपुरीच्या पाण्यासाठी वापरता येतो. शिवाय दह्यात घातल्यावर फळाच्या फोडींसाठी डिप तयार होते.

####################

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान!
तुम्ही खूप सुंदर फुलवली आहे बाल्कनी बाग!!

छान आहे बाग तुमची. गवती चहा वाळवून ठेवायचं लक्षात नाही आलं, खूप आला होता या वर्षी Sad चिनी गुलाब उर्फ मॉस रोझ इथे पण मिळतो. वेगवेगळ्या रंगांची रोपं एकत्र केलेली असे सहा गुच्छ एका ट्रे मध्ये. उन्हाळा चांगला तापला की एकदम झळाळतात फुलं.

छान आहे बाल्कनी बाग.
माझ्या साठी उपयुक्त धागा.. मी नुकतीच बाल्कनी बाग करायला सुरुवात करतीए..म्हणजे माती आणि कुंड्या आणून झाल्या आहेत.. आता काय काय लावायचे हि माहिती गोळा करणे सुरू आहे.

मस्त!
पालक, कोथिंबीर, पुदिना, टॉमेटो, कढीलिंब, गाजर, अंबाडी अशा काही भाज्या मीपण केल्या होत्या बाल्कनीत. पण जास्वंद आणली आणि काही दिवसांनी मिलीबग्जनी धुमाकूळ घातला. सुरुवातीला दुर्लक्ष केलं ते महागात पडलं. शेवटी मला कंटाळा आला. आता काहीच नाही. ब्रह्मकमळ ( तेच ते cactus वर्गातलं, रात्री फुलणारं) आहे फक्त.

खूपच छान आहे बाग Happy चिनी गुलाब मस्त. आमच्याकडेही विड्याचा वेल आहे. सहज वाढतो आणि खूप पसरतो. कीड वगैरे कधी दिसत नाही त्यावर.

मस्तच आहे. .
मी नर्सरीमधुन भेंडी बी आणून लावले. वीत- दोन वीत रोपांना 3-4 / 3-4 भेंड्या आल्यात. नुसत्या खायला पण छान लागतात. भाजी मस्तच लागते पण एका वेळी खूपच कमी होते.

मस्त फुलवली आहे बाग..

लोकं बागेत ईतके काय काय करतात की ते बघून मला बागकामाची का आवड नाही याचे कधी कधी वाईट वाटते Happy

>>>लोकं बागेत इतके काय काय करतात ??? >>>>by ऋन्मेऽऽष

हे सर्व झाडांच्या प्रकारावर आहे @ऋन्मेऽऽष .
इनडॉर्स प्रकारची भरपूर झाडे आहेत. छान छान कुंड्यांत ती लावायची आणि थोडेफार पाणी घालायचे. ऊन कमी झाले तरी काही फरक पडत नाही. रोग पडत नाहीत. बाहेरगावी आठ दिवस गेल्यावरही फारशी मरत नाहीत आणि बाग सतत छान रंगीत दिसते. कुठूनही कटिंग्ज आणून वाढवता येतात.
असे एकदा केले होते. पण नंतर कंटाळा आला. सर्व प्रकार थोडे थोडे लावले.
(( हल्ली या इनडॉरस झाडांच्या किंमती नर्सरीवाल्यांनी फार वाढवल्या आहेत.))
भाज्या, फुलझाडे यांना सतत लक्ष ठेवावे लागते. पाणी कमी जास्त होणे, रोग,आणि अस्ताव्यस्त दिसणे हे सर्व असते. खूप खटपट असते.

गुलाब कलमी असले तर मुंबईतील उष्ण दमट हवेने फार रोग पडतात. खवल्या रोग फार भयंकर. साधे गावठी गुलाब मात्र चांगले वाढतात, कटिंग्ज लावून सहज वाढतात, रोग कमी पडतात. पण यात पांढरा आणि लाल या दोनच जाती आहेत. शिवाय ही कटफ्लावरस ( लांब देठ, दहा दिवस टिकणारी फुले) नसतात. पुजेसाठी उत्तम. झाड खूप भरमसाठ वाढते. काट्यांमुळे बाल्कनीत जाणे अवघड होते.

इनडॉर्स किंवा ओर्नमेंटलसचे प्रदर्शनातले फोटो पुढच्या लेखात देत आहे.

खूप मस्त धागा. तुम्ही बाग पण छान , वेळच्या वेळी लक्ष देऊन सुंदर फुलवली आहे. चिनी गुलाब- सध्या चिनी म्हणायचं नाही , बॅन आहे तो शब्द आमच्याकडे Proud . विंचू फुलं म्हणतात आता. मस्त दिसतोय हेडरमधला फोटो.
ऑफिसटाईम आणि ह्या फुलांच्या फुललेल्या कुंड्या छान दिसतात. थँडीत फारशी नाही फुलत मात्र.
गावठी/ देशी गुलाबात फिका गुलाबी पण एक रंग असतो ना? मी पावसाळ्यात 4 कटिंग आणून लावले होते 2 ली च्या बाटल्या अर्ध्या कट करून, दालचिनी पावडर मध्ये घोळवून , सगळ्याला फूट फुटली होती ,ते मोठ्या कुंडीत ट्रान्सफर करताना काही मुळं दुखावली गेली बहुतेक आणि एकच तरारलं. भरपूर फुलं दिली त्याने. आता परत फिक्या गुलाबांच्या 2 कांड्या डायरेकत मोठ्या पत्र्याच्या डब्यात खोचल्यात , बघूया येतंय का.
मी 2 दिवस निगुतीने लक्ष देते परत 15,20 दिवस पाणी देण्यापलीकडे बघत नाही. नन्तर बघू, उद्या बघू असं होतय. सध्या शेवंती वर काळे काळे कण दिसतायत. त्यामुळं फुलं खुरटलेली येतायत.
खळ फवारणी पहिल्यांदा वाचलं, करून बघेन.
तुनळी वर घरच्या घरी फवारणी मध्ये कांदा, लसूण, लाल तिखट उकळून गार करून फवारणी दाखवलीय, लिलीवर चंदेरी किडे शेकडो झाले होते म्हणून तशी फवारणी केली तर किडे मेले पण बरोबरीने लिलीच्या पाती पण सुकत गेल्या. मग दोन कंद काढून परत वेगलीकडे लावले ,आता परत चांगले वाढलेत. त्यामुळं तुनळी प्रकार बंद केले.

>> देशी गुलाबात फिका गुलाबी पण एक रंग असतो ना? >>
हो. आणखी एक पूर्ण गुलाबी असतो तो गुलकंदाचा. फूल एक दोन दिवस टिकते. अप्रतीम गुलाबाचा सुगंध. एप्रिल-मे-जून मोसम.

>>>पावसाळ्यात 4 कटिंग आणून लावले होते 2 ली च्या बाटल्या अर्ध्या कट करून, दालचिनी पावडर मध्ये घोळवून , सगळ्याला फूट फुटली होती ,ते मोठ्या कुंडीत ट्रान्सफर करताना काही मुळं दुखावली गेली >>>

गावठी गुलाबाचे कटिंग्जला मुळे फुटतातच. पण बांबूच्या टोपलीत लावा आणि ती टोपलीच मातीत ठेवा. टोपली सावकाश कुजेल. गुलाबाची मुळे दोन तास पाण्यात बुडून राहिली तर ती कुजतात कायमचीच. त्यामुळे उंच करणे/ठेवणे.

मस्तच आहे तुमची बाग
हौस खूप आहे पण आमाला बाल्कनी नाय
खळ फवारणी नव्यानेच कळली. धन्यवाद.

IMG-20201008-WA0017.jpg

हे आमच्या गावाकडचे गावठी गुलाब. याच्या काड्या आणून लावल्या होत्या. म्हणाव्या तशा काही तरारून वाढल्या नाहीत. Sad

मस्तच आहे तुमची बाग
हौस खूप आहे पण आमाला बाल्कनी नाय >>> + १००० .
खिडकीत २-४ कुंड्या ठेवल्यात .
छान माहिती दिली आहेत , आणखी काही झाडे लावून प्रयोग करण्यात येईल .

>> आमाला बाल्कनी नाय >>>
_
यासाठी उपाय आता धाग्यात शेवटी वाढवला आहे.

-------------
@वावे, हा गुलाब येईल. फक्त कुंडी १२" रुंद आणि खोल घ्या. पाणी तुंबले नाही पाहिजे.

photo_2020-12-11_13-46-14.jpg

Srd ,
ह्यावर काही उपाय, मझ्या तुळस, ओवा, मिरचि वर धाग्यासरखे दिस्तात, पाने खातात.....

हौस खूप आहे पण आमाला बाल्कनी नाय
खळ फवारणी नव्यानेच कळली. >>>>>>>>>>>>१००१.
ग्रिलमधे कुंड्या ठेऊन त्यात पुदिना,लिंबू(ह्या झाडाला ४-५ वर्षे झालीत.नुसते आपले आहे म्हणून आहे.),आले,पुदिना,हळद आणि अलीकडचे पाहुणे कोथिंबीर ,मिरच्या लावल्या आहेत.मोगरा नुसताच आहे.गुलाबाच्या झाडंनी गेल्या वर्षी मान टाकली,त्यानंतर लावू वाटेनाच.ब्रह्मकमळ सोसायटीत दिले. तिथून गायब झाले.

मी सुद्धा बाग फुलवण्याचा प्रयत्न करतेय पण पहिल्यांदाच करत असल्यामुळे खूप चुका होतात नर्सरी मधून रोपं आणते काही मरून जातात मग परत आणायचा कंटाळा येतो.
भाजीपाला लावायचा विचार खूप दिवसापासून चालू आहे पण कुठली भाजी कशी आणि कुठल्या मातीत लावायची काही आयडिया नाही त्यांच्या बिया कुठून आणायच्या आणि त्यांची काळजी कशी घ्यायची हे पण माहित नाही म्हणून अजुन धाडस च केलं नाही.
जागा भरपूर आहे..एक सोडून तीन बाल्कनी आहेत माझ्या रूम समोर सुद्धा बेंचेस आहेत झाडांसाठी. पण सूरवात कशी करू काहीच समजत नाहीये. भाजीपाला लावण्यासाठी सुरवातीपासून शेवटपर्यंत कुणी सांगू शकत असेल तर खरचं मदत करा.
ही काही फुलांची आणि इतर झाडे लावली आहेत.

IMG_20201211_144252.jpgIMG_20201211_144238.jpgIMG_20201211_144205.jpgIMG_20201211_144153.jpgIMG_20201211_144132.jpgIMG_20201211_144116.jpgIMG_20201211_144103.jpgIMG_20201211_144953.jpgIMG_20201211_145321.jpgIMG_20201211_145310.jpgIMG_20201211_145258.jpgIMG_20201211_145248.jpg
हे शेवटचं माझ्या रूम समोर ठेवलेलं आहे. ती कुंडी ( जुना पाण्याचा गुंड ) सुद्धा मीच रंगवलेली आहे . हे माझं सगळ्यात आवडीच झाड आहे.

तुमची बाग खुपचं सुंदर आहे.. एकदम फ्रेश आणि विशेष म्हणजे भरपूर उपयुक्त झाडे आहेत. मला सुद्धा अशीच बाग हवी आहे. बघू आता कितपत जमतंय ते.

मी नर्सरी मधून आणलेले 2 गुलाब मेलेत. आता फक्त एकच लाल गुलाब जिवंत आहे. आणलेत तेव्हा मस्त फुले आणि कळ्या होत्या. नंतर एकदम कसे मेले काय माहीत.

माझं पण असच होतं. नर्सरीतुन आणलेली फुलांची झाडं 4 ,6 महिने गुणानं राहतात, मग खत द्या. माती मोकळी करा हळूहळू मरून जातात.

@अमृताक्षर , काय छान सजवलंय आणि आणखी काय पाहिजे!!
कुठली भाजी कशी आणि कुठल्या मातीत लावायची काही आयडिया नाही
माठ,पालक,लावा सुरवातीला. बियावगैरे काही नकोत. माठाचे शेंडे लावले की जगतात. लाल आणि हिरवा. मग त्यातली काही झाडे दोन तीन फुट उंच झाली की कळ्यांचे तुरे, फुलणे आणि आलेलं बी खायला चिमण्या हजर. ते बी खाली पडून पुढे दोनतीन महिने सगळीकडे माठच उगवतात.

घेवडा वर लिहिलं आहेच.
फरसबी/बीन्स याच्या शेंगा आणल्या की त्यातली जून शेंग वाळवली की बी मिळते. ते लावले की जेमतेम एक फुट वाढून भरपूर शेंगा येतात.

Pages