१६ जुलै २००४

Submitted by केदार१२३ on 17 December, 2007 - 06:07

१६ जुलै २००४, हा दिवस मला कायम डंख मारत रहातो. काही जखमा भरण्यासाठी नसतातच मूळी. कायम वहातच रहातात त्या. अस वाटत की जीवनाच्या अंतापर्यन्त ह्या जखमा वहातच रहाणार आहेत. त्यानंतर्च विश्व अजून तरी ज्ञात नाही. आणि अगदी काळ ही त्यांच्यासाठी औषध नसणारै.

दिनांक ०९ नोव्हेम्बर २००३, पहिल्यान्दाच इतक्या लाम्बच्या प्रवासाला निघालोय. मनात कायम धाकधूक - होईल ना सर्व व्यवस्थीत? अजून पर्यन्त अगदी मुम्बई- पुणे प्रवास सुद्धा एकट्याने कधी केलेला नाहीये. आणि हा तर एक्दम परदेश प्रवास. रडून रडून आईचे डोळे भरलेत. माझाही जीव तूटतोय. एक मन म्हणतय- वळून बघ रे आई कडे एकदा. फक्त एक्दाच बघ. साठव की रे आईची मूर्ती डोळ्यात. दूसर दूष्ट मन म्हणतय नकोच बघूस. आधीच तू हळवा आहेस. आईला रडताना बघून जाऊ शकणार नाहीस. शेवटी दूष्ट मनाचा सुष्ट मनावर विजय. आईकडे न बघताच गेलो मी.

बाहेरदेशी गेल्यावर आईशी अधून मधून बोलण हाच काय तो दिलासा कातर मनाला. सगळ कस व्यवस्थीत चाललय. मन दिवस मोजतय. दिवस कसे सम्पता सम्पत नाहीत. फक्त दोनच महीने कळ काढ, मग तू घरीच असणारेस. वेड मन कीतीदातरी दिनदर्शिकेची पान उलटून बघतय. आणि अचानक एक दिवस फोन-
"आई सीरीयस स्टार्ट इमीजीयेटली."

ही काय मस्करी आरम्भलीयेत माझी? ही मस्करी करायची पद्धत का? माझी धडधाकट आई- काय झाल अचानक तीला? आणि ईतक होईपर्यंत का रे लपवलत माझ्यापासून? कूठे फेडाल ही पाप? का रे खेळता असे माझ्याशी?

१६ जुलै २००४ ची रात्र. मी जाजम टकून पडलोय हॉस्पीटलच्या पेसेज मध्ये. झोप तर नाहीच. दर दोन तासानी कोणाला ना कोणाला तरी पर्मनंट डिस्चाज मिळतोय पून्हा कधीही एडमीट न होण्यासाठी. पन माझी खात्री आहे - आईला काहीच होणार नाहीये. ती खूप खम्बीर आहे, सहनशील आहे. आता बाहेर येइल आणि म्हणेल " आलास का रे? चल, तूला चहा देते. खायला काय करू? तूला आवडतो तसा उपमा करू? काजू मनूके घालून?.
मध्येच विचारांची लिंक तूटते. कोणी तरी पेशंट दगावलाय. त्याचे नातेवाईक हम्बरडा फोडतायत. मी देवाला विनवतोय- देवा मझी तूझ्यावर श्रद्धा असेल तर आईला बर कर. वाटल्यास माझे आयुष्य घे पण माझ्या आईला आयुष्य दे. तिचे सर्व आजार मला दे.

पण नाही, माझ्या पूण्याचा अकाऊंट्ला तेवढी शिल्लक नाहीये. आणि देव क्रेडीट कार्ड वगैरे ओळखत नाही. सगळा कसा अगदी रोखीचा व्यवहार. इतक्यात कोणीतरी म्हणतय १३ नम्बरचा पेशंट क्रीटीकल आहे. मी जाऊ का बघायला तीला? पण तेवढीही हिम्मत नाहीये माझ्यात. पायच गोठलेत माझे. मला मामा येताना दिसतोय बाहेर. पण हे काय? रडतोय का तो? माझ मन म्हणतय - सर्व ठीक असणारेय. देवाला मी सांगीतलय तस. विपरीत काही होईलच कस?

का देवाने लबाडी केली माझ्याशी ? आईच आयुष्य घेतल त्याने आणि बरोबर माझ सुद्धा. अस का केल त्याने?अरे, एका माणसाला किती आजार द्यावेत त्याने? कशाकशाशी म्हणून लढायच त्याने? इट वॉज नॉट अ फेयर गेम. देवाला मी कधीच क्षमा करणार नाहीये त्यासाठी.

१६ जुलै २००४. काही दिवस विसरता येऊनही विसरता येत नाहीत. काही दुख्ख तर कधीच विसरायची नसतात. आता त्यांच्याबरोबर जगायची सवय करायला हवीये.

मला आपल का कोण जाणे सारख वाटत रहात. तो जो कोणी चित्रगूप्त म्हणून वर कोण आहे ना, तो प्रत्येक माणसाच्या आयुष्याच सार त्याच्या वहीत लीहून काढत असतो. फार तर २ ते ३ ओळीत. मी जेन्व्हा त्याला भेटेन, तेन्व्हा माझ पान काढून वाचणारेय नक्की. कुतूहल किंवा औत्सूक्य म्हणून नव्हे फक्त खातर जमा करण्यासाठी. कारण मला माहीतीये त्यात काय लीहीलेय ते.

" केदार साखरदांडे. फारच विचीत्र माणूस. प्रत्यक्ष मरण्याच्या कितीतरी आधी तो मरण पावला. आणि कस कोण जाणे? आयुष्यभर हे रहस्य त्याने जगापासून, इतकच नव्हे तर स्वतः पासून ही लपवून ठेवल. दिनांक १६ जुलै २००४"

गुलमोहर: 

छान लिहीलेय....

केदार, Sad
खुप दुखतं आतुन. असं कुणाच्याही आयुश्यात घडु नये.

वाचल रे
तुझ दु:ख जाणवतं रे.
पण ह्या जगातल अंतिम सत्य म्हणजेच मृत्यु कोणी काही करु शकत नाही.

केदार! Sad
पाणी आलं रे डोळ्यात...
आईचा फोन आला की ती सारखी 'लवकर ये रे, अजुन किति दिवस राहणार तिथे? खुप आठवण येते तुझी' म्हणत असते. आणि मी 'येईल गं...अजुन २ महिने, अजुन १ महिना...मि काय लहान आहे का आता?, मि राहु शकतो एकटा' असली उत्तरं देत असतो!
लाज वाटतेय स्वत:ची!

>>देव क्रेडीट कार्ड ओळखत नाही...
लिखाण मनाला भिडल!

केदार, अगदी आतून फोडून आलेलं लिहिलयस. कधी कधी आपण, 'आपण मरणार आहोत' हे जितक्या सहज पचवतो तितक्या सहज... इतरांचं मरण नाही पचवता येत.... कारण ते मोठं सत्य आहे.... आपल्या मरणापेक्षाही मोठं.

केदार, वाचून खूप वाईट वाटल.

काय लिहु काहीच कळत नाही.........

खुप छान लिहिलेस केदार .

तुझे दु:ख खुप मोठे आहे रे. अरे यालाच तर जीवन म्हणतात.

डोळ्या॑त पाणि आले वाचताना. मी आता लगेच माझ्या आईला फोन करणार आहे.

केदार, खरंच खूप मोठं दु:ख आहे रे हे!!!!!!! डोळे पाणावले....... Sad

आता या कथेवर प्रतिसाद द्यायला येतोय तो शेवटचाच यापुढे ही कथा मी आजिबात वाचणार कसली उघडूनही पहाणार नाही. वडील गेले तेंव्हाची जखम आजुन भरुन यायचिये. आई.................. कल्पनाच वाचवत नाही सहन करण फार दुर!

केदार, मला वडील आहेत पण असून नसल्यासारखे...नसते तरी बरं...आई माझं सर्वस्व...आज ती जीवनाशी लढ्ते आहे...तीच्याक्डे बघवत नाही....तीची सुटका व्हावी असं वाट्तं.....ती विस्म्रुतीत गेली...मला विसरली....तुझ्या कवितेनं खपल्या निघाल्या.....कधी कधी खपली निघाली तर बरं वाट्तं, आपण जीवंत असल्याचं संवेदन जागतं.....