याला म्हणतात नशीब...... (शेवटचा भाग)

Submitted by कौतुक शिरोडकर on 10 May, 2009 - 11:44

(पहिला भाग http://www.maayboli.com/node/6778. दुसरा भाग मेंदूतून स्क्रीनवर यायला बराच वेळ गेला. जरा पोटापाण्यासाठी बिजी होतो. कितपत जमलाय ते कळेलच. तसा दुसरा भाग आहे हे ही एक रहस्यच होत म्हणा. )

इन्स्पेक्टर जगताप

"बोला डोंगरे, काय बातमी ?" डोंगरेना समोर पाहताच मी विचारपूस सुरू केली.
"मिरजेवरून फोन आलेला. गावडे नाही तिकडे. त्याची एक बहीण आहे गुहागरला. जाधव आहेत मागावर." डोंगरेनी डोक्यावरची टोपी काढून घाम पुसला.
"डोंगरे, देशमाने मॅडमना म्हणावं एकदा गावडेच्या बायकोशी गप्पा मारून या म्हणून. तिच्याकडूनच काही ना काही तरी कळेल." माझं बोलणं संपते ना संपते तोच फोन वाजला. डोंगरेंनी फोन उचलला.
"हॅलो, काळाचौकी पोलिस स्टेशन. हवालदार डोंगरे बोलतोय........... हां बोल गण्या...." डोंगरेंनी माझ्याकडे सुचकपणे पाहीलं. माझी नजर चमकली. गण्याचा फोन म्हणजे नक्कीच काहीतरी खास खबर असणार.
"कुठे.....? सारथी बार. परळला. डेपोच्या समोर. ठीक हाय. चल ठेव." फोन ठेवून डोंगरे माझ्याकडे वळले. "साहेब, भुषण तोकडा येतोय उद्या रात्री अकराला.... सारथी मध्ये." डोंगरेंच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून जात होता. मागच्या वेळेला तो हातातून निसटला तेव्हापासून त्यांना ते जिवाला खात होतं.
भुषण तोकडा...... त्याच्या उजव्या पायापेक्षा डावा पाय किंचित आखूड असल्याने तो लंगडत चालायचा. अंडरवर्ल्डमध्ये त्यामुळेच तो भुषण तोकडा या नावाने ओळखला जायचा. साजिद पठाणचा शार्प शुटर. डझनवारी केसेस त्याच्या नावावर. पण पोलिटिकल साटेलोटे जबरदस्त. त्यामुळे हातात गवसत नव्हता. पण आता ही सुवर्णसंधी सोडायची नव्हती.
"डोंगरे, साहेबांना फोन लावा जरा." मी वाक्य संपवायच्या आतच डोंगरेनी तत्परतेने फोन लावला.
"साहेब, जगताप बोलतोय. भुषण तोकडा भेटतोय उद्या रात्री. उचलायचा की पोचवायचा........ वाट बघतो मी फोनची." साहेबांना पुढे काही बोलायची संधी न देता मी फोन ठेवला.
"साहेब, यावेळेस पोचवायचाच. सध्या साजिद पठाणच जास्त जुळलय ओपोझिशनशी. त्यामुळे ग्रीन सिग्नल मिळणारच." डोंगरेना बरीच माहीती असते. ऑफ द रेकोर्ड देखील. मी काही बोलणार तोच सेल वाजला. पाहील तर माट्या. मी स्पीकर ऑन केला.
"बोल माट्या, काय झाल ?"
"रविंदला ये उद्या संध्याकाळी आठला. शिंदेच्या नव्या नाटकाचा पहिला प्रयोग आहे."
"उद्या नाही रे. उद्या आमच्याच एका जुन्या नाटकाचा शेवटचा प्रयोग आहे."
"जग्या, साल्या तू ही नोकरी सोड. काहीच पर्सनल लाईफ नाही तुला."
"माट्या, हे व्यसन आहे रे. भंगीकामाच."
"भंगीकाम ? "
"घाण साफ करतो ना मी. म्हणजे भंगीकामच. परवा पेपर वाच." मी फोन कापला व तोच पुन्हा रिंग वाजवू लागला. मी पाहीलं तर प्रताप नाईक. मी डोंगरेंना खुण केली. पुन्हा स्पीकर ऑन केला.
"बोला प्रतापराव, काय काम काढलत? "
"जगतापसाहेब, एक प्रोब्लेम झालाय. म्हणून म्हटल तुम्हाला फोन करावा." प्रतापच्या आवाजात चिंता झळकली.
"बोला. काय झाल ? "
"साहेब, मकरंदने काढलेले फोटो मी एका माणसाला सांगून त्याच्या घरून उडवले होते. पण आता तोच माणूस मला ब्लॅकमेल करतोय."
"आयला, तुम्ही काय नेहमी ब्लॅकमेल ब्लॅकमेल खेळत असता का ?" तिरकसपणा डोकावलाच माझा. पण पुढच्याच क्षणी मी स्वत:ला सावरलं. " नाव- गाव काय त्याच ? "
"नाव आहे भालेराव. पत्ता नाही माझ्याकडे. त्याचा सेल नंबर आहे." मी इशारा करताच डोंगरे पेन घेऊन सरसावले.
"द्या नंबर." प्रताप नाईकांनी नंबर दिला.
"ठीक आहे. तुम्ही आहात कुठे आता ?" मी सहज चौकशी केली.
"महाबळेश्वरला. आल्यावर भेटतोच."
"या तुम्ही. तेव्हाच रंगेहाथ पकडू त्याला. " मी सेल ऑफ केला.
"साहेब, संध्याकाळपर्यंत याची कुंडली देतो तुम्हाला." डोंगरे उठून उभे राहीले. मी मागे ख्रुर्चीत रेललो.
"डोंगरे, जरा चहा सांगता काय ?"
"सांगतो साहेब." डोंगरे वळले आणि मी थोडा सुखावलो. ते फोटो कुठे गेलेत हा अनुत्तरीत प्रश्न आता सुटला होता. आता लक्ष मात्र एकच होतं. भुषण तोकडा. पण खरं सांगतो, माझ्याच नशीबाचे फासे मला चांगलाच नाचवतील असे मला वाटले देखील नव्हते त्या वेळेस.

प्रताप नाईक

जगतापांना फोन केल्यावर थोडसं हायसं वाटलं. भालेरावला ते उचलतील याची खात्री होतीच. भालेरावचा पत्ता होता माझ्याकडे पण म्हटलं आपले सगळेच पत्ते पोलिसांसमोर ओपन न केलेले बरे. म्हणतात ना याची ना दोस्ती अच्छी ना दुश्मनी. सेल खिशात टाकणार तोच पुन्हा वाजला. पाहीलं तर मेघना. या सगळ्या प्रकरणात तिला भेटणं टाळलच होतं. फोनवरही जुजबी बोलणं होत होतं. तिचा फोन आला नि वाटलं सुलूएवजी ही इथे असती तर खरोखर सगळाच क्षीण ओसरला असता. पण सालं नशीब ...... फोन ऑन केला व तोच समोरून सुलू आली. न बोलताच डिसकनेक्ट करावा लागला. नंतर बोलायचं राहील ते राहीलच.
रात्री बंगलीवर परतलो तेव्हा खिशातला फोन व्हायब्रेट झाला. मेघनाचा मिस कॉल. सुलू फ्रेश व्हायला बाथरूममध्ये शिरली आणि मी पटकन हॉलमध्ये येऊन तिला कॉल केला.
"बोल"
"मला तुम्हाला भेटायचय." तिच्या शब्दात घाई जाणवली.
"हे बघ, सध्या मी महाबळेश्वरला आहे. मुंबईला पोहोचताच तुला फोन करेन." मी आवाज शक्य तेव्हढा दबका ठेवला.
"पण गेले किती दिवस तुम्ही मला टाळताय." ती मुद्द्यावरच आली.
"इलाज नव्हता. आपल्या लोणावळ्याच्या सेलेब्रेशनचे एकाने फोटो काढून मला ब्लॅकमेल केले. त्याचा आवाज बंद करण्यातच वेळ गेला."
"फोटो मिळाले ?" तिच्या स्वरातील काळजी जाणवली मला.
"नाही. पण ते माझ्याच एका माणसाकडे, भालेरावकडे आहेत. मुंबईला आल्यावर भेटेन मी तुला. तेव्हा बोलू." मी सेल खिशात टाकला. आतून दार वाजल्याचा हलका आवाज आला. मी वळलो व आत शिरलो. सुलू अजून आतच होती. पाण्याचा आवाज तर येत होता. मग हा आवाज कुठून आला ? मनात शंकेची पाल चुकचुकली आणि तोच समोरची खिडकी वाजली. बहुधा जाताना बंद करायला विसरलो होतो. मी खिडकीकडे वळलो. मकरंदच्या प्रकरणानंतर सगळ्याबाबतीत संशय सारखा अधूनमधून डोकावायला लागला होता.

मेघना

शीट !! हे आणि काय नवीनच ? अशाने माझ्या सगळ्या स्वप्नांची वाट लागणार. प्रतापला भेटून लवकरात लवकर या फोटो प्रकरणाचा निकाल लावायला हवा, नाहीतर सगळीच मेहनत केरात जायची.

इन्स्पेक्टर जगताप

"जगताप, फक्त धरायची ऑर्डर आहे. धरायची. ऑपरेशनचे इंचार्ज साळवे असतील.
"साळवी ?"
"का ? काही प्रोब्लेम ?" साहेबांच्या भुवया उंचावल्या.
"नाही."
"यावेळेस चुक नको. चुकलात तर माझ्याकडून कसल्याच मदतीची अपेक्षा बाळगू नका." साहेबांचा स्वर ठाम होता. मी त्यांचा रोख समजलो.
"यस सर. मी माझ्या बोटांवर पुर्ण नियंत्रण ठेवेन. त्यालाही तेच कर म्हणावं." उगाच तिरकस बोलत मी सॅल्युट ठोकला आणि बाहेर पडणार तोच मागून आवाज आला.
"महेन्द्रा..." मी वळलो.
"नियंत्रण मेंदूवर हवं. यावेळेस जर काही वरखाली झालं तर खरचं प्रोब्लेम होईल. काळजी घे." साहेबांच्या स्वरातला ओलावा जाणवला. ट्रेनिंगकॅंपमधले प्रधानसाहेब पुन्हा डोकावले त्यांच्यात. हा माणूस चुकीच्या क्षेत्रात आहे. यांच्यासारख्या हळव्या लोकांनी हे डिपार्टमेंट जॉईन करूच नये. मान डोलावून मी बाहेर पडलो. चौकीवर पोहोचलो तेव्हा डोंगरे वाट पहात बसलेले होते.
"काय झाल डोंगरे ? " मी खुर्ची ओढून बसताच विचारलं.
"साहेब हे दोघं आलेत." त्यांनी कोपर्‍यातल्या बेंचवर बसलेल्या दोघांकडे हात दाखवला.
"कोण आहेत हे ? " मी त्या पोरसवदा तरूणांकडे पाहील.
"गावडेला पैसे दिलेले यांनी नोकरीसाठी." डोंगरेनी दोघांची ओळख दिली आणि मी दोघांना जवळ बोलावलं.
"हे बघा, पैसे विसरा आपले. गावडे मर्डरकेसमध्ये फरार आहे. तो मिळाला तरी तुमचे पैसे काही त्याच्याकडे मिळणार नाहीत. तेव्हा... विसरा. आणि दुसरी गोष्ट. यासाठी त्याच्या बायको व मुलांना त्रास देऊ नका. तसला काही मुर्खपणा केलात तर मग तुम्हालाच त्रास होईल. निघा आता." दोघे निमुट माघारी फिरले व मी डोंगरेंकडे वळलो.
"गावडेची काही बातमी ? "
"नाही. कुठे गायबलाय काय कळतच नाही. सगळीकडे त्याचे फोटो टाकलेत."
"सापडेल. जाईल कुठे ?" माझ्याप्रमाणे डोंगरेंना खात्री होतीच. त्यांनी मान डोलावली.
"साहेब, भालेरावची कुंडली मिळालीय. वाकोला, सांताक्रुजला राहतो तो. सोबत बायको आणि दोन मुलगे. एकेकाळी भुरट्या चोर्‍या करायचा. सध्या एक सेक्युरिटी एजन्सी चालवतोय. शिवाय सोबत प्रायव्हेट डिटेक्टीव सर्विसही देतो. माणूस सरळ दिसतो पण बिल्कुल सरळ नाही. नाक जरी दाबलं तरी तोंड उघडायला बराच वेळ लागेल." डोंगरेंनी एका दमात भालेरावची माहीती दिली.
"इंटरेस्टिंग. प्रतापला बरोबर माणूस भेटलाय."
"भुषणचं काय साहेब ?" डोंगरेंनी मुख्य विषयाकडे गाडी वळवली.
"धरायची ऑर्डर आहे. साळवे साहेब इन्चार्ज आहेत या ऑपरेशनचे."
"साळवे साहेब ? " डोंगरेंच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह. मी हसलो.
"आपल्या खास माणसांना गोळा करा आणि निघायची तयारी करा. मराठे तिथेच भेटतील आपल्याला."
"साहेब, आज बांद्रा कोर्टात हजर व्हायचयं तीन वाजता. नाना काणेच्या एनकाऊंटरचा मॅटर आहे."
"लक्षात आहे माझ्या. तुम्ही सगळ्यांना घेऊन वेळेवर पोहोचा. ठरल्याप्रमाणे फिल्डींग लागली पाहीजे. डोंगरे, आज हा तोकडा भुषण हातातून सुटायला नकोय. काहीही झाल तरी." माझ्या वाक्यातल्या रिकाम्या जागा डोंगरेना नीट कळतात. पण माझ्या डोक्यात मात्र साळवीचं या ऑपरेशनमध्ये असणं घुमत होतं. पण माझा निर्धार पक्का होता. मग साळवी असो वा दुसरं कोणी.... काय फरक पडतोय ?

प्रताप नाईक

मकरंद समोरच उभा होता. दार अडवून. एका हातात मग व दुसर्‍या हातात थर्मास. निसटायला कुठे जागाच नव्हती.
"कॉफी, साहेब. "त्याने कॉफी मगात ओतली आणि माझ्याकडे पाहून कुत्सित ह्सला. दातखीळ बसल्याच जाणवलं मला.
"साखर हवी का साहेब ? " त्याचा मग धरलेला हात पुढे सरत होता. घाम दरदरून फुटलेला. तेवढ्यात त्याने मगातील कॉफी माझ्या चेहर्‍यावर फेकली. दोन्ही हात समोर करून मी चेहरा वाचवण्याचा प्रयत्न केला आणि....
... जाग आली. झटक्यात उठून बसलो. पाचशे मीटर एका दमात धावल्यासारखा धापा टाकत होतो मी. आपण स्वप्न पाहीलं हे पुढच्या काही क्षणात जाणवलं. तरीही घाईघाईने चौफेर नजर टाकली. सगळं नेहमीसारखं जागच्या जागीच होतं. बाजूला पाहीलं. सुलु निवांत झोपलेली. एक अख्खा ग्लास पाणी रिचवलं पोटात. बरं वाटलं. क्षणभरासाठी मकरंद पुन्हा डोळ्यासमोर आला. आता झोपायचा प्रयत्न केला तरी झोप येणार नाही हे जाणवलं मला. हॉलमध्ये आलो. घड्याळाकडे नजर टाकली. चार वाजलेले. पहाटेचे. पहाटेची स्वप्ने खरी होतात म्हणे. नकळत एक थंड शिरशिरी डोक्यातून पायापर्यंत गेली. बाहीने घाम पुसला मी कपाळाचा. विनाकारण संपुर्ण हॉलमध्ये नजर फिरवली. विचारांचं वादळ चौफेर घोंगायला लागलेलं. शेवटी टिव्ही लावला. रिमोट घेऊन सर्फींग सुरू केलं आणि झरकन इन्स्पेक्टर जगताप डोळ्यासमोरून गेल्यासारखे भासले. मी पुन्हा मागच्या चॅनल्सकडे वळलो. झी २४ तास चालू झालं. समोर एका चौकटीत इन्स्पेक्टर जगताप. अनबिलिव्हेबल. मी टिव्हीचा आवाज वाढवला. कुठल्याश्या रस्त्यावर उभा तो रिपोर्टर बोलत होता. पाठीमागे असणारी पोलिसांची वर्दळ, ऍम्बुलेन्स ठळक जाणवत होती. पहाटेचं स्वप्न...... मी विचार झटकले आणि आवाज आणखी वाढवला.
"...........पोलिस साधारण साडे बाराला आत शिरले. त्यांनी भुषण तोकडाला शरण येण्याचा इशारा दिला तेव्हा त्याने फायरिंगला सुरूवात केली. साधारण अर्धा तास ही चकमक चालू होती आणि त्यात भुषण तोकडा मारला गेला."
दुसर्‍याच क्षणी एक इन्स्पेक्टर त्या रिपोर्टरच्या शेजारी दिसले. त्याने माईक त्यांच्या समोर धरला
"भुषण तोकडाला जिवंत पकडण्याचा आमचा प्रयास होता. पण त्याने केलेल्या गोळीबारात हवालदार डोंगरे जखमी झाले असून त्यांच्या हाताला गोळी लागली. तो हवालदार डोंगरेवर गोळी झाडण्यासाठी पुढे सरसावला तेव्हा त्यांना वाचवण्यासाठी इन्स्पेक्टर जगताप यांनी भुषण तोकडाच्या पायावर गोळी झाडली. पण तो गोळी चुकविण्यासाठी वाकला व त्याच्या कपाळाचा वेध त्या गोळीने घेतला."
"आदिती, हा एक अपघात होता असं इन्स्पेक्टर साळावींच म्हणणं आहे. हवालदार डोंगरेना इस्पितळात भरती करण्यात आले असून वरिष्ठ अधिकारी या बाबतीत जास्त काही बोलण्यास तयार नाहीत. गुन्हेगारांचा एनकाऊंटर करण्यात इन्स्पेक्टर जगतापांचा हातखंडा असून सध्यातरी त्यांच्यावर नाना काणेंच्या फेक एनकाऊंटरची केस चालू आहे. आपण निर्दोष असून आपण फक्त आपले कर्तव्य करतोय असं इन्स्पेक्टर जगतापांचे म्हणणे आहे."
त्या पाच बाय सहाच्या चौकटीतील इन्स्पेक्टर जगतापांच्या चेहर्‍यावर कोणतेही वैफल्याचे भाव मला दिसले नाही. ह्या माणसाने ठरवून त्याला गोळी घातली असेल हे नक्की. इतका तरी त्यांना मी ओळखायला लागलो होतो.
"काय झाल ?" टिव्हीच्या आवाजाने जाग आलेल्या सुलूने अंथरूणातूनच आवाज दिला.
"काही नाही तू झोप." मी तिला प्रत्युत्तर देऊन टिव्ही बंद केला व बेडरूमकडे वळलो. तोच सेलचा बीप उचलला. इनबॉक्समध्ये मॅसेज होता. काल रात्रीचा. तोही वीपींचा. सरप्रायजिंग. ताबडतोब फोन करण्याचा निरोप. मी सेल तेथेच ठेऊन पलंगावर आडवा झालो.

इन्स्पेक्टर जगताप

"पुन्हा.... पुन्हा तेच जगताप." साहेब जाम चिडलेले.
"माझा नाईलाज होता सर. मी फक्त डोंगरेना वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. भुषणने माझ्यावर झाडलेली गोळी त्यांनी झेलली. मी भुषणच्या पायावरच नेम धरला होता. तोच वाकला त्याला मी काय करणार ?"
"ही असली फिल्मी उत्तरं देऊ नको महेंद्रा. एनकाऊंटर स्पेश्यालिस्ट व्हायचं भुत डोक्यावर बसलय तुझ्या. काढ ते लवकर नाहीतर तुझाही........ तुला माहीत आहे आपल्या खात्यात त्यांच काय होतं ते शेवटी. दुर्देवाने ते साळवीही सामिल झाले तुला. वरिष्ठांकडून झाल्या प्रकाराची शहानिशा करण्याची ऑर्डर आली आहे. कदाचित सस्पेंन्शनची ऑर्डरही निघेल. साजिदच्या हवाला रॅकेटचा मास्टरमाईंड होता तो. म्हणून त्याला जीवंत धरायचा होता. मी आधीच सांगितल होतं की माझ्याकडून कसल्याच अपेक्षा बाळगू नको. आय वॉन्ट फेवर यु दिस टाईम." साहेब एकेक शब्द ठासून उच्चारत होते.
"यस सर. " सॅल्युट ठोकून मी बाहेर आलो. सगळ्यांच्या नजरा दाराकडेच लागलेल्या. मला पहाताच पुन्हा सगळे आपापल्या डेस्ककडे वळले. मी मुख्यालयाच्या बाहेर पडलो. बाईकला किक मारली व गाडी हॉस्पिटलच्या दिशेला वळवली. गोळी डोंगरेंच्या दंडाला चाटून गेलेली. धोका असा नव्हताच. पण भुषणने माझ्यावर झाडलेली गोळी त्यांनी आपल्या हातावर झेलली. कर्जदार केलं मला. मग घातली गोळी त्या भुषणच्या कपाळात. असल्यांचा असून तरी काय उपयोग समाजाला ! जे होईल ते होईल. डोंगरेंना लागलेल्या गोळीमुळे माझी बाजू मजबूत होती याची मला खात्री होती. पण साळवींचा या बाबतीत पुर्ण सपोर्ट होता हे जरा खटकलं. नाना काणेच्या मॅटरमध्ये त्यांनी माझ्या विरोधात साक्ष दिलेली. मुख्य म्हणजे यावेळेस त्यांनी पुढे व्हायला पाहीजे होतं. पण ऐनवेळी त्यांनी मला लीड करायला सांगितलं.... म्हणे मी भुषणला ओळखत नाही.... नंतर ते म्हणाले ही,' तू त्याला ठोकशील याची खात्री होती. बट डोन्ट वरी. मी घेईन सांभाळून.' कुठेतरी पाणी मुरतय. साळवींना यात पुढे ठेऊन प्रधानांचा काही डाव ...... ? छ्या........ एक नस्ता विचार मनावर येऊन बसू पाहताच मी नकळत डोकं झटकलं. तोच समोरून हॉर्न वाजला आणि अंगावर आलेल्या त्या ऍम्बुलेन्सला जागा देऊन मी बाईक पार्क केली.

प्रताप नाईक

अकराच्या सुमारास मी व्ही.पी.ना फोन केला.
"आहेस कुठे तू प्रताप ? तुझा फोनही लागत नाही."
"सर, महाबळेश्वरला. आपल्याच बंगलीवर. नेहाकडे सगळी इन्फोरमेशन आहे माझी."
"लेट इट बी. हे बघ गुड न्युज आहे तुझ्यासाठी. मेहता रिटायरमेंट घेताहेत आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मिटींगमघ्ये मी तुझं नाव रेकमंड करतोय."
"थॅक यु सर. थॅक यु व्हेरी मच."
"ते नंतर. आधी तू ती लाईफ सायन्सची पाच करोडची ऑर्डर मिळव. आय नो यु कॅन डू इट. माझ्या रेकंमडेशनला जोर येईल त्यामुळे."
"ओके सर. मी आजच परत येतो."

डोंगरे

आयुष्यात काही तरी करू शकलो जगताप साहेबांसाठी. त्यांच्यासाठी जीव गेला असता तरी चालला असता. पण आई भवानीच्या मनात अजून काही तरी आहे, नायतर गोळी अशी हाताला चाटून गेली नसती.
"मी काय म्हणतो डॉक्टर, किती दिवस तुमच्याकडे मुक्कामाला ठेवणार आहात ?"
"एखाद दुसरा दिवस. जखम जास्त खोल नाही तुमची. रुटीन चेक अपसाठी थांबा दोन दिवस. उगाच रिस्क घेण्यात अर्थ नाही. जखम चिघळली तर भारी पडेल." डॉक्टरांनी बॅंडेज चेक करत उत्तर दिलं.
"डॉक्टर, सांगताय का घाबरवताय ? "
"सांगतोय. आता आराम करा तुम्ही."
"मी पण तेच म्हणतेय त्यांना. चार दिवस आराम करा. पण यांना तर ड्युटीची पडलीय." बायकोने पटकन आपलं दु:ख डॉक्टरांसमोर मांडलं.

प्रताप नाईक

मुंबईत परतल्यावर आधी मेघनाला फोन लावला. तिने सबर्ब मधील आडबाजूच्या रेस्टोरंटमध्ये बोलावलं मला. फारच सो-सो होती जागा.
"फोटोंच काय झाल प्रताप ?" तिचा पहिलाच प्रश्न.
"हे बघ, अजून मी भालेरावशी बोललो नाही. " तेव्हढ्यात सेल वाजला. पाहीलं तर व्ही.पी. मी फोन रिसीव्ह केला.
"यस सर..... मी आजच आलोय..... उद्या सकाळी भेटतो तुम्हाला..... माझं बोलण झालय गुप्तेंशी. लाइफ सायन्स ची ऑर्डर आपल्यालाच मिळणार. नथिंग टु वरी..... यस सर....... थॅक यु सर...... ओ.के सर." मी सेल टेबलावर ठेवला.
"प्रताप, ते फोटो.... "
"तू एवढ त्या फोटोंच का टेंशन घेतेस तेच कळत नाही मला ? " मी तिचं वाक्य मध्येच कट करत बोललो. "फोटो भालेरावकडे आहेत व ते मी कलेक्ट करतोय. तुला विश्वास नाही का माझ्या बोलण्यावर ? वन सेक. " मी सेल उचलून भालेरावला डायल केलं.
"भालेराव, मी प्रताप बोलतोय. मी परतलोय. तू लवकरात लवकर ते फोटो माझ्यापर्यंत पोहोचव. ओ.के." मी सेल कट करून तिच्याकडे पाहीलं. "नाऊ, हॅप्पी. नथिंग टू वरी." बोलता बोलता सेल खाली ठेवताना माझा हात चमच्याला लागला आणि सुप कपड्यांवर उडालं.
"डॅम इट. मी दोन मिनिटात आलोच. " मी तसाच वॉशबेसीनकडे वळलो. वॉशबेसीनकडून मी वळलो तेव्हा लक्ष समोरच्या आरशात गेलं. त्यात हॉटेलचं प्रवेशद्वार दिसत होतं. एक बाई झपाटयाने गेल्यासारखी वाटली. चेहरा नीट दिसला नसला तरी पेहरावावरून ती सुलू असावी असं वाटलं. मी त्या दिशेला वळलो. चार पावलं पुढे जाऊन पाहीलं. पण तशी कोणतीच बाई तिथे नव्हती. हल्ली आपल्याला भास होतात असं मनाला वाटायला लागलं. मी त्वरेने परतलो तेव्हा मेघना चमच्याने सुप ढवळत बसली होती.
"काय झालं ? " तिने विचारलं.
"काही नाही." मी सुप ढवळत पुन्हा दाराकडे पाहीलं व मेघनाकडे वळलो. "हे बघ मेघना, फोटो कलेक्ट केल्यावर आधी ते जाळीन, मग मी तुला कळवेन. तू उगाच चिंता करू नकोस. आता आपण दुसर्‍या एखाद्या विषयावर बोलूया."
"प्रताप.... मला फार महत्वाचं बोलायचय." तिचा स्वर अचानक बदलला.
"बोल मग." मी सुप टेस्ट करत बोललो.
"वेल प्रताप, मी खुप विचार केलाय आपल्या या रिलेशनचा आणि आता मला वाटते यापुढे आपण भेटू नये." सुपमध्ये चमचा फिरवत ती बोलली.
"वॉट नोन्सेन्स ? " मला विश्वासच बसेना माझ्या कानावर.
"प्रताप, आज तुझ्या बायकोला या गोष्टींची कल्पना नाही. उद्या झाली तर तुझं फॅमिली लाईफ पुर्ण संपेल. मला वाटत आता आपण थांबायलाच हवं" तिचा स्वर ठाम होता. बहूधा निर्णय घेऊनच ती आली होती.
"हा असा अचानक डिसीजन घ्यायला तुला झालय तरी काय ? माझ्या फॅमिली लाईफचं तू टेंशन घेऊ नकोस. ते मी पाहून घेईन." मला अजूनही तिच्या या अचानक बदललेल्या रुपाचं गमक कळेना.
"प्लीज प्रताप. लेटस पार्ट हॅप्पीली." ती उठून उभी राहीली. एक पाऊल पुढे टाकून पुन्हा वळली.
"ते फोटो कलेक्ट करून प्लीज मला कळव." दुसर्‍याच क्षणी ती तिथून निघून गेली.
मला काहीच कळेना. मेघनासाठी केलेली सगळी मेहनत फुकट गेली. कारण काय तर माझं फॅमिली लाईफ. व्हॉट नॉनसेन्स. एवढा सगळा वेळ, पैसा उधळला हिच्यावर आणि ही असल्या फडतूस हॉटेलमध्ये मला बोलवून सरळ टाटा करून जाते. याला काय अर्थ ? सगळं सालं त्या फोटोंमुळे........... फोटो.......... फोटो.............. माझं मलाच हसू आलं. फोटो....... ट्रंपकार्ड हातात होतं अजून माझ्या. जोपर्यंत ते फोटो आहेत तोपर्यंत तरी मेघना मला सोडू शकत नव्हती. काय गंमत आहे ना ? थोड्या क्षणापर्यंत ते फोटो लवकरात लवकर जाळून टाकावे असा विचार करणारा मी आता त्याच फोटोंच्या या नव्या उपयोगाने आनंदीत झालो. मेघनाला एवढ्या सहज आयुष्यातून जाऊ देणं मला तरी शक्य नव्हतं. अजून माझ्या इनव्हेस्टमेंटसचे रिटर्नस घेतले कुठे होते ? ते तर हवेच. मग त्यासाठी थोडं वाकड्यात शिरण्यात काय हरकत आहे ? शिरू. नथिंग टू वरी. सो, लेटस एन्जॉय सुप.

मेघना

त्याला पटलं असेल मी दिलेलं कारण ? त्याला खर तर सांगायला हवं होतं. पण मग म्हटल नकोच. शिवाय इतक्या सहजी तो मला गुडबाय म्हणेल असं मला तरी वाटत नाही. नाहीतरी त्याच्याशी रिलेशन पुढे कॅरी करण्यात काहीच मिनिंग नव्हतं म्हणा. जो बायकोचा झाला नाही तो माझा काय होणार ? उद्या अजून कोणी भेटली की तिच्यामागे. ह्या असल्या रिलेशन्समध्ये प्रेम वगैरे सगळं झुटच. त्याचं माझ्यावर प्रेम नाही हे नक्की. त्याला फक्त सुंदर स्त्रियांशी संबंध ठेवायचेत आणि मी माझ्या सुंदर असण्याचा उपयोग करून घेतला. बट नाऊ दिस इज इनफ. कारण या सुंदरतेमुळेच आता मला लॉटरी लागलीय आणि असला गोल्डन चान्स घालवणं म्हणजे मुर्खपणाच. म्हणतात की देअर आर थ्री 'ओ फॉर ओपोर्चुनिटी’ इन टुमारो. पण मला नाही वाटत तसं. संधी एकदाच येते व तिला झडप घालून हस्तगत करायचं. कसही. मला अशी संधी चालून आली आहे महेश लालवाणीकडून. माय बॉस. एन आर आय. आय लव्ह अमेरिका. ही वान्ट टू मॅरी मी. वॉव. मला तर तेव्हा वाटलं की मी एखादं स्वप्नचं पहातेय. ड्रीम.... स्वीट ड्रीम. पण मी माझ्या बॉसशी लग्न करणार आहे हे प्रतापला झेपलं असतं का ? त्याचा इगो हर्ट नाही का होणार ? पण मी दिलेलं कारण त्याला पटलं नाही तरी काय फरक पडतोय ? तो माझा नवरा नाही की फियान्सी नाही. लेटस फर्गेट अबाऊट हीम. महेश तसा थोडा मोठाच आहे वयाने. कमीत कमी दहा वर्षांचा तरी फरक असेलच. पण त्यानेही काय फरक पडतोय ? ही इज हॅंडसम ऍंड रिच. जगातील सगळी सुख माझ्या पायात आता लोळण घेतील आणि मी असेन राणी. आता मला माझ्या स्वप्नांना पुर्ण करण्यात कोणताच अडथळा नाही. अहं .... आहे मेघना. ते फोटो.... ते लवकरात लवकर मिळवायला हवेत. प्रताप बोललाय तो ते डिस्ट्रोय करणार म्हणून. आणि नाही केले तर.......... ? प्रतापचा यासाठी पाठपुरावा करायलाच हवा. प्रताप विश्वास ठेवण्याचा लायकीचा नक्कीच नाही.

प्रताप नाईक

"यस." मी इंटरकॉम ऑन केला.
"कॉंग्रेटस सर." नेहा.
"कशाबद्दल ? " मला लक्षातच आल नाही.
"तुम्ही आता डायरेक्टर होणार आहात." नेहा.
"अरे व्वा, माझ्या आधी सगळ्यांनाच न्युज मिळालेली दिसतेय. एनीवे थॅक्स."
"सर, माझ्याबद्दल लक्षात आहे ना ? "
"यस नेहा. तुझं काम होईल."
"थॅक्स सर. मी कंटाळले आहे या टेलिफोन ऑपरेटरच्या जॉबला."
"मला माहीत आहे ते. ओके."
"वन सेक सर. देशपांडेपासून जरा सावध रहा."
"म्हणजे ? "
"सर ते सिनियर असून तुम्हाला चान्स मिळालाय हे खुपतय त्यांना. ही इज जेलस. ते तुमच्याबद्दल बोलत होते कुणाशीतरी. तुम्हाला भेटायला ते यायचे बघा मि. मकरंद. त्यांचीही चौकशी करत होते ते माझ्याकडे. बी केअरफुल."
"अस्स होय. थॅक्स नेहा. युअर जॉब इज फायनल. पण तू देशपांडेंवर वॉच ठेव जरा. जमलच तर मला त्यांच्या सेल फोनच्या बिलाची एक कॉपी पाठव."
नेहाशी गोडीने राहण्याचे फळ मिळाले होते. देशपांडेबद्दल मला संशय होताच की तो माझ्यामागे काही ना काही काड्या घालत असणार त्याची. पण मकरंदची चौकशी करण्याचं काय कारण त्याला ? थोड्याच वेळात नेहाने देशपांडेंच्या सेलफोनची कॉपी पाठवली. देशपांडेंच्या बिलाच्या कॉपीत कुठेही मकरंदचा नंबर नव्हता. मी त्यात भालेरावचा नंबरही चेक केला. काही ठराविक रिपीटेड नंबर्स मात्र होते. पण ते माझ्याशी रिलेटेड नंबर नसल्याने मी निर्धास्त झालो. कॉपी फाडून मी डस्टबीनमध्ये टाकली. लाईफ सायन्सच्या ऑर्डरची कॉपी मी व्ही.पी.ना पास ऑन केली आणि डोळे मिटून डायरेक्टर झाल्याची सुखद स्वप्ने पाहू लागलो.

देशपांडे

"हे बघ, कोणत्याही परिस्थितीत ते फोटो मला मिळायले हवेत. तुला काय करायचेय ते तू कर. मला मात्र फोटो हवेत." मी सेल ठेवला.
गेल्या काही दिवसातल्या सगळ्या घटना डोळ्यासमोरून तरळल्या. मॅनेजमेंट प्रतापच्या फेवरमध्ये जाणार याची कुणकुण मला केव्हाच लागलेली. सेल्समध्ये त्याने बरेच दिवे लावलेत ना ! एवढी वर्षे मी कंपनीसाठी झक मारली ती फुकट. मॅनेजमेंटशी वाकड्यात शिरणं परवडणारं नव्हतं, म्हणून मग बबनला सांगून प्रतापवर वॉच ठेवला. मकरंद नावाचा कोणी तरी फडतूस माणूस त्याला रेगुलर भेटतो हे तर कळलचं बबनकडून. शिवाय प्रतापचे कोणा बाईबरोबर अनैतिक संबंध आहेत हेही कळलं. बस... आता फक्त या गोष्टींचा पुरावा हाती यायला हवा. त्यातच कोणी भालेराव नावाचा माणूस प्रतापला भेटणार आहे हे बबनने सांगितलं. मी ठरवलं की याला गाठायचाच आणि गाठला. सेकुरिटी एजन्सी चालवणारा होता कोणी. मीही त्याच्याकडून कार्ड घेतलं. म्हटलं, उपयोगी पडेल. प्रतापने त्याला फोटो कलेक्ट करायला हायर केला होता हे बबनने चोरून ऐकल आणि मला कळवलं. मी तेव्हाच समजलो की प्रताप आता माझ्या जाळ्यात सापडणारचं.
व्ही.पी.नी प्रतापसाठी फिल्डींग लावली तसा मी जन्याला गाठला. जन्या ते फोटो मिळवेल याची खात्री होतीच मला. मॅनेजमेन्टच्या समोर प्रतापचे प्रताप असे पुराव्यानिशी सादर केले की झालं. आता डायरेक्टरच्या पोस्टमध्ये व माझ्यामध्ये फक्त फोटोभर अंतर होतं.

इन्स्पेक्टर जगताप

"हे बघा प्रतापराव, त्याला भेटायला बोलवा. वेळ आणि जागा ठरली की मला कळवा. तिथेच अरेस्ट करतो मी त्याला. " मी प्रतापला आशंकीत करत सेल ठेवला आणि खुर्चीत रेललो. डोंगरेना उद्या डिसचार्ज मिळणार आहे. म्हणजे उद्यापासून पुन्हा माझा उजवा हात कार्यरत होणार. या डोंगरेंची इतकी सवय लागलेली की मला उगाच त्याच्या शिवाय चाचपडल्यासारखं होतं होतं.
"जाधव, गावडेच्या केसमध्ये काही डेवलपमेंट ?"
"एक धागा सापडलाय साहेब. जळगावला त्याच्या एटीएममधून विड्रॉवल झालय. मी जळगाव पोलिसांना डिटेल्स पाठवलेत."
"चला. म्हणजे ही फाईल लवकर क्लोज व्हायला हरकत नाही. जाधव या आनंदाप्रीत्यर्थ एक चहा सांगा."
डोळे मिटून मी गेल्या काही दिवसांचा मागोवा घेऊ लागलो. क्षणभरासाठी वाटून गेलं की नाना काणेची टांगती तलवार डोक्यावर असताना भुषणला उडवायला नको होतं. माकडांच्या हातात कोलित दिल्यासारखं झाल ते. विधानसभेचा एक दिवस याच गदारोळात गेला. हे होणार होतच म्हणा. साजिदचा मणकाच मोडला होता मी. माट्या, निफाडकर, शिंदे, भोसले सगळ्यांनी अभिनंदन केलं. गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून नवाकाळने चक्क अग्रलेख टाकला. नाक्यानाक्यावर लोकांनी तो एनलार्ज करून लावला. लोकांचा खरचं सपोर्ट असतो या गोष्टींना. शेण खातात ते हे राजकारणीच.
"साहेब, चहा" जाधवांच्या आवाजावर मी डोळे उघडले. ते समोर चहा घेऊन उभे होते.

मेघना

"प्रताप, फोटो मिळाले का ?"
"नाही अजून. मी जरा दुसर्‍याच व्यापात होतो." प्रताप थोडा घाईत वाटला मला. काय माणूस आहे हा ? याला यातला सिरियसनेस कसा कळत नाही.
"प्रताप, ते फोटो भलत्यासलत्याच्या हातात लागले तर पुर्ण आयुष्याची राखरांगोळी होईल आपल्या." माझा आवाज जरा वाढलाच. साहजिकच होतं ते.
"मेघना, मला कळतय ते आणि मी लवकरच ते मिळवतोय. तू उगाच काळजी करू नकोस. रिलॅक्स. नाहीतर असं करतेस का? भेटतेस का आज सीलॉर्डला ? " प्रतापच्या बोलण्यातला अर्थ मला कळला.
"हे बघ प्रताप, मला वाटते या विषयावर आपलं बोलणं झालय. तेव्हा आता भेटणं नाही. तू फक्त ते फोटो लवकरात लवकर डिस्ट्रोय कर." मी त्याला बजावलं.
"ठिक आहे मेघना. मी फोन करीन तुला. सी यु सून हनी." त्याने सेल ठेवला आणि त्याच वेळेस मागून महेशने आवाज दिला.
"हनी, वी आर लिविंग सुन फॉर युएस."

प्रताप

"भालेराव, मी प्रताप बोलतोय."
"बोला साहेब." त्याचा तोच घाई नसलेला स्वर.
"भालेराव, तुझे पाकीट तयार आहे. माझी वस्तू घेऊन कधी येतोयस?" मला मात्र माझ्या बोलण्यातली घाई जाणवत होती.
"तुम्ही सांगाल तेव्हा. पण तुमची बोली कितीची आहे ?"
"बोली ? काय मुर्खपणा आहे हा ? " मी चिडलो.
"त्याच कस आहे साहेब, आता चार - चार जण लागलेत त्या निगेटिव्हज मागे. म्हटल ज्याची बोली जास्त त्याला द्यावी. अशी संधी रोज रोज मिळत नाही." तोच स्वर बेशरमपणासकट.
"भालेराव, काही एथिक्स आहेत की नाहीत ? तुम्हाला मी काम दिलेले त्याचे पैसे तयार आहेत. माझी वस्तू द्या व पैसे न्या." मी चिडलो.
"एथिक्सच्या गोष्टी करू नका साहेब. वस्तू तुमची म्हणून पहिला मान तुम्हाला. बोला काय भाव देताय ?" त्याचा स्वर अजूनही तसाच थंड.
"एक मिनिट." त्याच्या वाक्याचा अर्थ आता माझ्या मेंदूत शिरला. " चार-चार जण म्हणजे ? माझ्याव्यतिरिक्त अजून कोणाला इंटरेस्ट आहे यात ?" हे माझ्यासाठी फारच धक्कादायक होतं.
"ते सिक्रेट आहे साहेब. धंद्यात थोडीतरी इमानदारी असायला हवी." भालेरावच्या मला चिडवतोय असं वाटायला लागलं मला.
"ठिक आहे. तुझा आकडा बोल आणि घेऊन जा." मी ऑफर दिली.
"दहाचा बंदोबस्त करा. मी भेटतो तुम्हाला परवा संध्याकाळी खार जिमखान्याला. साडेपाचला." त्याने फोन ठेवला.
दहा...... याच्या उभ्या आयुष्यात याने पाहीले आहेत काय ? दहा तर दहा... इथे द्यायचेत कोणाला... पण माझ्याव्यतिरिक्त ते तिघे कोण ज्यांना त्या फोटोत इंटरेस्ट आहे ?..... ही वाट आता भलत्या वळणाकडे चालली होती. खरोखरच कोणी आहेत यात की भालेराव हाती आलेल्या संधीचा फायदा घेण्यासाठी मला घाबरवून पैसे उकळायला पहातोय. हेल विथ ऑल. त्याच्याकडून आधी फोटो काढूया आणि मग इन्स्पेक्टर जगताप वदवतील बाकी त्याच्याकडून. मी इन्स्पेक्टर जगतापांना फोन लावला.
"साहेब, प्रताप बोलतोय."
"काय ठरलय ? "
"परवा संध्याकाळी, खार जिमखाना, साडेपाच वाजता. पण एक नवीच भानगड आहे आता."
"अजून कोणी नवा ब्लॅकमेलर भेटला का ? " इन्स्पेक्टर जगतापाचा विनोदी सुर.
"नाही साहेब. भालेराव म्हणत होता की चार-चार जणांना यात इंटरेस्ट आहे. आता हे आणखी तिघे कोण ? "
"आणखी तिघे ? हि कसली नवीन भागनड ? आता तर तुमच्या या भालेरावांना लवकरच भेटायला हवं." इन्स्पेक्टर जगतापांच्या आवाजात कुतूहल जाणवलं मला.

भालेराव

दरवाजा खेचून बाहेर पडलो तर लॅच लागलच नाही. पाहतो तर नेहमीप्रमाणे अडकलेलं. घाईच्या वेळेला नडायची सवयच आहे म्हणा दरवाज्याला. सालं लफडच म्हणायचं. आता टाळं शोधावं लागेल. टाळं कुठं टाकलं ? टाळं ............
शायद मेरी शादी का खयाल....... आयला मोबाईल नेमका नको तेव्हा वाजतो. कोण तडमडलं? .... मॅडमचा नंबर.... हि बाई पिकवेल आता. कट केलेला बरा. पुन्हा वाजला. पुन्हा कट करण्याएवजी सरळ स्विच ऑफच केला. काय बाई म्हणायची ही. जराही धीर नाही या बाईला. गेली उडत. आपल्याला प्रतापरावांना भेटायचय. ते महत्त्वाचं. दहा लाखांचा प्रश्न आहे. एकदा का हातात आले की मग मुंबईला रामराम. गावाकडं मस्त जमीन घ्यायची आणि हरी हरी करायचं. बकुळेची इच्छा पुर्ण करायची. बरं झाल तिला आधीच धाडली पोरांसकट गावाला. आयच्यान हे टाळं.......... सापडलं. टाळं घेऊन दाराकडे वळलो तोच दरवाजा वाजला. जाऊन दरवाजा उघडला तर समोर एक बाई.
"बोला."
"भालेराव ? "
"मीच. आपण ? "
"मी सुलेखा. सुलेखा प्रताप नाईक."

सुलेखा प्रताप नाईक

खर तर बाबांचच चुकलं. फक्त पैसा आणि नावलौकीक पाहीला मुलाचा. काय तर म्हणे सहा आकडी पगार आहे. आता काय करू त्या पगाराचं ? त्यापेक्षा तो पाच आकडी मंदार साने बरा होता. चष्मा असला तरी माणूस सरळ वाटलेला. आईची पण पसंती होती त्याला. पण नाही 'मी म्हणतो तेच बरोबर’ बाबांच्या या असल्या अट्टहासाने नशीबात हा माणूस आला. नव्याचे नऊ दिवस किती छान गेलेले. वाटलं होतं सगळ कसं मनासारखं. नंतर मात्र मग सुरू झाल ते येता जाता हिणवणं. काय ते काकुबाईंसारखं केसांना तेल चापतेस ? काय बघावं तेव्हा त्या साड्या घालतेस ? काय हे एवढ्या लांब बांह्यांचे ब्लाऊज ? काय ते टिपीकल मिडलक्लास थिंकींग ? काय ते फ़ुकटच विंडो शोपिंग ? कसल्या त्या चपला घालतेस ? प्रत्येक गोष्टीत उणीधूणी. मग मी पण मिनी घालून मिरवायचं ? आमच्या घराण्यात असला असभ्यपणा कधी कुणी केला नाही आणि करणार नाही. हे असलं नट्यांसारखं वागणं, मुरडणं, दिसणं... शी......... मला नाही जमायचं ते. पण आता जे आहे नशीबात ते आहे. त्याच्याबरोबरच दिवस काढायचे. दुर्दैव आणखी हे की घरात तिसरं कोणी आल नाही. आता यांना तर वेळही नसतो माझ्यासाठी. पण विचारल्यावर चक्क महाबळेश्वरला जायला तयार झाले तेव्हा तर खरच वाटल नव्हतं. एकदा तर वाटलं की आपलं नशीबच पालटल की काय ? पालटल म्हणा पण नुसतं नशीब नाही तर त्या रात्री सगळंच चित्र पालटलं.
फ्रेश व्हावं म्हणून मी बाथरूममध्ये गेले तोच लक्षात आलं की फेसवॉश बॅगेतच राहीला. हल्लीच घेतला तो सुमेच्या नादाने. सुमा माझी बालमैत्रीण. सध्या मला मॉडर्न बनवायचा वसा घेतलाय तिने. म्हणाली, चेहरा धुवायला वापर. फ्रेश वाटेल. म्हणून घेतला बरोबर......... बाहेर आले तर हे गायब. म्हटलं गेले कुठे... तर हॉलमध्ये मोबाईलवर बोलत उभे. सहज म्हणून ऐकलं आणि अवघं आभाळच कोसळलं. खरच वाटल नाही आधी. माझ्या नशीबात हा अस्सा माणूस. विश्वासच बसेना कानांवर. एवढे उपासतापास केले ते सगळे फुकट गेले. संकष्ट्या, महाशिवरात्री, एकादश्या..... सगळं सगळं फुकट. शेवटी मन घट्ट केलं आणि गेले वॉश घ्यायला. चुकून राग मात्र दरवाज्यावर काढला. हलकाच आवाज झाला. त्यांना कळू नये म्हणून पटकन नळ चालू केला. पुर्ण फोर्सने. पण तेव्हाच ठरवलं. बस्स. झाली तेवढी फसवणूक पुरे. आता या माणसाबरोबर संसार करायचा नाही. नाही म्हणजे नाहीच. घटस्फोट घ्यायलाच हवा. म्हणून लगोलग हे नसताना आदित्यला फोन लावला. आदित्य, माझा मावसभाऊ.
"आदित्य, सुलेखा बोलतेय."
"बोल. आज बर्‍याच दिवसांनी."
"अरे, एक महत्त्वाचं काम होत. माझ्या एका मैत्रीणीच्या नवर्‍याने लग्नानंतर दुसर्‍या एका बाईशी संबंध ठेवलेत. तिला आता त्याच्यापासून घटस्फोट घ्यायचाय."
"तिच्याकडे त्याच्या या बाहेरख्यालीपणाचे काही पुरावे आहेत का ?"
"पुरावे ?"
"सुलेखा, कोर्टात हे सिद्ध करण्यासाठी पुरावा लागेल. एखादा व्हिडीयो किंवा फोटोग्राफ्स किंवा...."
"आहेत. फोटो आहेत." मला पटकन प्रतापने उल्लेख केलेला माणूस आठवला.
"बस मग. तिला नक्की घटस्फोट मिळेल. तू नेक्स्ट विक तिला ऑफिसला घेऊन ये. पुढचं आपण समक्ष भेटीतच बोलू."
"ठिक आहे. थॅक्स आदित्य. ठेवते मी." आदित्यशी बोलले आणि बरं वाटलं.
प्रतापच्या मोबाईलमध्ये भालेरावचा नंबर होता. मुंबईला पोहोचल्या पोहोचल्या मी सर्वप्रथम त्यालाच फोन केला. हो नाही करता शेवटी तो भेटायला तयार झाला. मध्ये एकदा प्रतापचा पाठलाग केला तेव्हा त्याच्या त्या नटवीला पाहीलं. काय ती मेलीची फॅशन !

इन्स्पेक्टर जगताप

"प्रतापराव, नक्की इथेच भेटायच ठरलेलं का ? अजून आला नाही तुमचा भालेराव." मी कॅफेटरियाच्या शेवटच्या खुर्चीत बसल्या बसल्या प्रतापला फोन केला.
"इथेच साहेब, येईल तो एवढ्यात."
"दुसरा कॉल येतोय. तुम्ही त्याला फोन लावा. तोवर मी हा फोन घेतो." मी दुसरा फोन घेतला. प्रधानसाहेबांचा फोन.
"यस सर,"
"कुठे आहेस ?"
"खार जिमखाना."
"तिकडे काय करतोयस ? "
"मित्राला भेटायला आलो होतो. बोला साहेब."
"रंगशारदाला ये ताबडतोब."
"येतो सर." मी ताबडतोब प्रतापला फोन लावला.
"प्रतापराव, काय झालं ? "
"भालेराव, फोन उचलत नाही."
"गेल्या दिडतासात तो फिरकला नाही. मला तर तो येईल की नाही याचीही शंका वाटतेय, प्रतापराव, मला आता रंगशारदाला जायचं आहे अर्जंट. तूम्ही एक काम करा. भालेरावचा फोन लागला की मला फोन करा. मी पोहोचतो पुन्हा इथे".
रंगशारदाला पोहोचायला जास्त वेळ लागला नाही. प्रधानसाहेब आत गृहमंत्र्यांसोबत बिजी होते. मी बाहेरच थांबलो. साधारण तासाभराने भेटायचा निरोप मिळाला. पाचच मिनिटात ते समोर होते. मी सॅल्युट ठोकला.
"यस सर."
"हे घे."
"हे काय ? " मी फाईल उघडली.
"हे सज्जादचे टोप ट्वेंटी. सज्जादच्या टोटल नेटवर्कचे मेन पिलर."
"म्हणजे ?" शंका वळवळली.
"तुला काय वाटते ? "
"हेच की मंत्रालयाला माझी आता शार्पशुटर म्हणून बढती करायची आहे."
"तसच काहीसं महेंद्र." प्रधानसाहेबांनी नजर चोरली.
"भुषणला ठोकायचं नक्की होतं तर. फक्त धरण्याचा हुकुम म्हणजे वरवरचा फार्स. त्यात साळवींच्या हातात ऑपरेशनची किल्ली आणि ऐनवेळी मला मिळालेला लीड. हे सगळं ठरवून झालेलं. व्वा प्रधानसाहेब, तुमच्या बद्दलची माझी मतं वेगळी होती. पण सगळीच चुकीची. नाना काणे नंतर भुषण तोकडा... हे आता तुमच्या हातातले हुकमी एक्के. म्हणजे तुमचं ऐकण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही." आता सगळं कोडं उलगडलं मला.
"फार विचार करतोस तू महेंद्रा. ड्युटी आहे ती. ही संधी आहे फेमस व्हायची. पेज थ्रीवर असशील नेहमी." साहेबांनी माझ्याकडे पाहीलं.
"हरकत नाही. पण एक लिस्ट माझ्याही खिशात आहे." मी साहेबांच्या नजरेत नजर मिसळली.
"महेंद्र, आपल्याला सौदेबाजी करण्याचा अधिकार नाही." त्यांनी पुन्हा नजर चुकवली.
"मग मलाही कुणाच्या ताटाखालचं मांजर व्हायचं नाही. निघतो मी." मागे वळून पाहण्याचा त्रास न घेता मी बाहेर पडलो.
जिमखान्याला पोहोचलो, तेवढ्यात सेल वाजला. लॅंडलाईन नंबर होता.
"हॅलो, जगताप बोलतोय."
"साहेब, मी डोंगरे"
"डोंगरे, कुठुन बोलताय ? सेल कुठाय तुमचा ? "
"बॅटरी ढेपाळली साहेब. इथल्याच एका दुकानातून बोलतोय. इथे सगळं ठिक आहे. पाखरू अजून पिंजर्‍यातच आहे. म्हटलं तुमच्या कानावर टाकावं. इथे कुठं चार्जिंगची सोय होते का बघतो ? चार्ज झाल्या झाल्या फोन करतो. ठेवतो साहेब." डोंगरेनी फोन ठेवला. प्रताप तिथे नव्हता. मी कॅंफेटेरियाकडे वळलो. चहा सांगून कोपर्‍यातल्या बेंचवर बसलो. प्रतापचा सेल ट्राय केला पण रिंग वाजूनही त्याने तो उचलला नाही. मी शांतपणे एकेक तुकडे जोडून आयुष्यातलं नवं जिगसॉ पझल सोल्व करू लागलो. चहाच्या एकेका गरमागरम घोटाबरोबर मेंदू धावायला लागला आणि भालेरावपर्यंत पोहोचला. भालेरावचा हा मॅटर आता लवकर संपवणे गरजेचे होते. नाहीतर या प्रकरणाला जर आणखी फाटे फुटले तर मग माझ्यासोबत डोंगरेही गोत्यात येण्याची शक्यता होती. मकरंदच्या फोटोंना त्याच्याच मार्गाने पाठवणे गरजेचे होते. शिवाय आजच्या प्रकारानंतर माझी लवकरच उचलबांगडी होणार यात शंकाच नव्हती. मी प्रतापचा सेल पुन्हा ट्राय केला आणि आता तो रिचेबल नव्हता. हा कदाचित त्या भालेरावच्या घरी तर गेला नसेल .... ? शंका डोकावली आणि ठाण मांडून घुमू लागली. मी भालेरावच्या घराच्या दिशेने निघालो.
नेहरू रोडला लागून असलेल्या ’वाकोला मेंशन’ तशी फार जुनीच दिसत होती. गेटवर साधा वॉचमन ठेवण्याचा त्रासदेखील घेतला नव्हता. आव जाव घर तुम्हारा.
तिसर्‍या माळ्यावर एकूण चार फ्लॅट होते. त्यातील दोन बंद होते. त्यांच्यावर योगेश शहा या सी.ए.चे व मेनका एक्स्पोर्ट या कंपनीचे बोर्ड लागलेले. मी घड्याळात पाहीलं. नऊ वाजलेले. मी दाराला कान लावला. आतून कुणाच्या तरी बोलण्याचे अस्पष्ट आवाज येत होते. मी क्षणभर थांबलो. पुन्हा आवाजांचा अदमास घेतला. अचानक गोळी चालल्याचा आवाज आला. पुढच्याच क्षणी रिवॉल्वर माझ्या हातात होतं. आत शांतता पसरलेली. मी दाराचा अंदाज घेतला. दार उघडचं होतं. मला आश्चर्य वाटलं. मी दार ढकललं. आत पुर्ण अंधार होता. अचानक घरात उजेड झाला व मी वळलो. समोर टिव्ही चालू होता. मी आता हॉलमधून आतल्या खोल्यांकडे वळलो. बाहेरून येणार्‍या कवडशात दोन्ही रूमस, टॉयलेट, बाथरूम सगळं चेक करून झालं पण आत कोणीच नव्हतं. गोळीचा आवाज आला हे नक्की. मी टिव्हीकडे पाहीलं. कसलीतरी साबणाची जाहीरात चालू होती. मी पुन्हा हॉलमध्ये नजर फिरवली. जाहीरातींच्या अंधूक उजेडात कोपर्‍यात फुटलेलं टिपॉय दिसलं. मी पुढे सरलो. बुट कशावर पडले ते लक्षात यायच्या आतच पाय घसरला. स्वतःला सावरण्यासाठी समोरच्या खिडकीचा पायघोळ पडदा पकडला. एका झटक्यात पडदा खेचला गेला. त्याबरोबर कोणीतरी अंगावर कोसळलं आणि माझा तोल गेला. चाप ओढला गेला आणि गोळी सुटली. गोळी पडदासह त्याच्या पोटातून आरपार होत समोरच्या भिंतीत वरच्या अंगाला शिरली. मी त्या धुडासकट कोसळलो. त्याचवेळेस दरवाजा उघडला गेला आणि मी आवाजाने वळलो. समोर कोणीतरी उभा होता. पण चेहरा नीट दिसत नव्हता.

डोंगरे

"डोंगरे, या सगळ्या गोष्टी ’ऑफ द रेकॉर्ड’ आहेत. त्यामुळे सगळ्या हालचाली सांभाळून करायला हव्यात. भालेरावबरोबर आणखी कोण कोण आहेत ते कळायला हवं. तेव्हा साध्या वेशात तुम्ही त्याच्या घरावर लक्ष ठेवा. तो बाहेर पडला की त्याच्या मागावर रहा. शिवाय प्रतापच्या म्हणण्याप्रमाणे अजून तिघेजण आहेत त्याच्यामागे. ते कोण तेही पहायला हवं." जगतापसाहेबांनी सगळ्या बाबींचा बारकाईने विचार केलेला. माणूस हुशार आहे. वाकोला मेंशन रस्त्याला लागूनच असलेली इमारत. गेटच्या जवळच बसस्टॉप. मी रस्त्याच्या पलिकडेच बसस्टॉपवर उभा होतो, नजर ठेवून. भालेराव ठरल्या वेळेला काय निघाला नाही. वाटलं होतं एकदा आत जाऊन पहावं. पण साहेबांची तशी काय ऑर्डर नव्हती. मोबाईल ढेपाळल्याने प्रोब्लेम झालेला. समोरच्या पीसीओतून साहेबांना फोन केला आणि मग त्या दुकानदाराकडे चार्जरची चौकशी केली पण त्याच्याकडे एलजीचा चार्जरच नव्हता. रिलायन्सचा हाच लफडा आहे. नेहमी ऐनवेळेला घोळ होतो. पावणेनऊच्या सुमारास मात्र जोरदार लागली. जमला तेव्हढा कंट्रोल केला पण मग मात्र राहावलं नाही. गेलो आडोसा शोधायला. परतलो तेव्हा बघीतलं तर साहेबांच्या बाईकसारखी बाईक गेटच्या आत लावलेली. मघापासून नव्हती तिथे. तसा धावलो. रस्ता क्रॉस करून पलिकडे पोहोचलो आणि खात्री करून घेतली. बाईक साहेबांचीच होती. धावलो वर. गोळीचा आवाज आला तितक्यात. पोहोचलो तोपर्यंत सगळं गणितच बदललेलं.
"साहेब, तुम्ही ?"

इन्स्पे. जगताप

जाहीराती संपल्या आणि समोर ब्रेकच्या आधीचा सीन सुरू झाला.
आर्यनने झाडलेली गोळी अनिकेतला चाटून गेली आणि मग........
.........माझी ट्युब पेटली. ते अस्पष्ट आवाजातील भांडण व तो गोळीचा आवाज टिव्हीतला होता. मी डोंगरेकडे वळलो. त्यांनी दार चुकून उघडचं ठेवलं होतं. गोळीच्या आवाजाने समोरच्या घरातला बाहेर आला होता व डोकावत होता. आम्ही दोघेही युनिफॉर्ममध्ये नव्हतो. पण तो आत येण्याचं धाडस करू शकला नाही. डोंगरेंचं तिथे असणं आता या प्रकरणाला वेगळे वळण लावायला पुरेसं होतं हे सटदिशी माझ्या मस्तकात चमकून गेलं आणि मी डोंगरेकडे वळलो.
"बाहेर.... बाहेर.... पोलिस आहे मी. चला बाहेर व्हा." डोंगरे क्षणभर गोंधळले. पण त्यांनी स्वत:ला सावरलं आणि ते बाहेर पडले.
"क्या हुवा ? " बाहेरच्या माणसाने त्यांना विचारलं.
"मालूम नै. मेरेको लगा कुछ गिरा, इसलिए देखनेको गया. लेकीन वो तो पुलिसवाला है." डोंगरे मला ऐकू जाईल एवढ्या जोरात बोलले.
मी अंगावरील धुड पडद्यासकट बाजूला सारलं आणि उठलो. दाराजवळ गेलो. डोंगरे निघून जात होते आणि सोसायटीतील बघे जमायला लागले. मी एकाला इशार्‍याने बोलावलं.
"नाव काय तुमचं ? "
"राजेंद्र... राजेंद्र कोदे." तो घाबरलेल्या स्वरात बोलला.
"इकडे या. कुठे हात लावू नका." मी लाईट लावले. तो मागोमाग आत आला.
"भालेराव... " लाईट लागताच तो जवळ जवळ किंचाळलाच. मी मयत इसमाकडे पाहीलं. सावळा म्हणता येईल असा वर्ण. डोक्यावरचे पुढचे केस उडालेले. शरीरयष्टी मध्यम. वय असेल साधारण पंचेचाळीसपर्यंत. अंगातल्या पेहरावावरून व पायातल्या बुटांवरून इतकं लक्षात येत होतं की भालेराव घरातून बाहेर पडण्याच्या तयारीत होता पण त्याआधीच त्याला कोणीतरी गाठून ढगात पोह्चवला.
""एक काम करा. इथल्या जवळपासच्या पोलिसस्टेशनला जाऊन इथल्या या मर्डरची माहीती द्या ताबडतोब." माझा शेवटचा शब्द तोंडातून बाहेर यायच्या आत तो खोलीच्या बाहेर होता. माझ्या हातात अजूनही रिवॉल्वर आहे याची मला जाणिव झाली. बाहेर कुजबुज वाढली. मी बाहेर वाकलो.
"कुणीही आत येऊ नका आणि दाराला हात लावू नका." तो मघासचा इसम अजून तेथेच होता. मी त्याच्या रोखाने पाहीलं.
"तुम्हाला बोललो ना पोलिसांना बोलवा म्हणून." एकदा माझ्या हातातल्या रिवॉल्वरवर नजर टाकून तो खाली पळाला. मी आत वळलो व भालेरावला न्याहाळू लागलो. त्याच्या उजव्या कानाच्या वर जखम होती व तशीच मागच्या बाजूस छोट्या मेंदुजवळही होती. काचेचा एक तुकडा गळ्याच्या आत शिरलेला. पलिकडे खिडकीच्या उजव्या कोपर्‍यात काचेचे टिपॉय चकनाचूर अवस्थेत होतं. हॉलमध्ये बरचं रक्त सांडलेलं. त्यात आता माझ्या बुटांचे घसरलेले आणि पसरलेले ठसेही होते. घराची कोणीतरी कसून झडती घेतली आहे हे सगळीकडे झालेल्या उलथापालथीवरून लक्षात येत होतं.
मी शोधाशोध सुरू केली. डायनिंग टेबलजवळ गोदरेजचं रक्ताने माखलेले टाळे होते. चावीसकट. टाळ्याचा आकार गोलाकार होता व ते आकारानेही थोडे मोठे होते. फारच जुने वाटत होते. शोधाशोध करताना माझ्या मेंदूत चक्रे सुरू होतीच. कोणीतरी त्या टाळ्याने भालेराववर हल्ला केला असावा आणि त्याच झटापटीत भालेराव टिपॉयवर पडला असावा आणि त्याच्या डोक्याच्या मागच्या मार लागला असावा. यातच त्याच्या भाराने टिपॉयची काच तुटली असेल आणि काचेचा तुकडा त्याच्या गळ्यात शिरला असावा किंवा टिपॉयच्या काचेचे झटापटीत तुकडे झाल्यावर मारेकर्‍याने त्यातलाच एक तुकडा भोसकला असावा. म्हणजे मी तिथे पोहचायच्या आतच भालेराव संपला होता. संपलेल्या भालेरावला पडद्याआड उभं करून मारेकरी निघून गेला पण घरात कोणीतरी आहे हे भासवण्यासाठी त्याने टिव्ही चालू केला. पण दरवाजा... तो उघडा का ठेवला ? मी दाराकडे वळलो. लॅच खराब होतं. पुन्हा भालेरावकडे वळलो. भालेरावच्या पोटातून माझ्या रिवॉल्वरची गोळी आरपार झालेली. नाना काणे, भुषण तोकडा व आता भालेराव. त्यातच मी गृहखात्याला फाट्यावर मारून इथे आलेलो. म्हणजे या गोष्टीचा इशु होणार. एकतर ऑफ ड्युटी. युनिफॉर्मचा प्रश्नच नव्हता. माझ्या इथे येण्याची कोठेच नोंद नव्हती. हा एरिया माझ्या अंडर नव्हता. मी व्यवस्थित अडकलो होतो. पोलिस यायच्या आत भालेरावच्या घरातील सगळे पुरावे नाहीसे करणे गरजेचे होते.
मी आता तपासाला सुरूवात केली. मला सर्वात आधी फोटो शोधायचे होते. मी माझे फिंगरप्रिंटस कुठेही येणार नाहीत याची काळजी घेत शोधाशोध सुरू केली. पण फोटो काही सापडले नाहीत. मी भालेरावकडे वळलो. त्याच्या कपड्याची तपासणी सुरू केली. त्याच्या पॅंटच्या डाव्या खिशात एक पाकीट सापडलं. मी ते माझ्या खिशात सारलं. बेडरूममध्ये मला एक बसचं तिकीट सापडलं. फोटोंचा मागमुस नव्हता. दुसरं आक्षेपार्ह असं काही तिथे सापडलचं नाही. माझी शोधाशोध चालू असतानाच वाकोला पोलिसस्टेशनचे इन्स्पेक्टर गायकवाड तिथे पोहोचले. मी माझी ओळख दिली. माझं रिवॉल्वर त्याच्या सुपुर्द केलं. त्यांनी पुढची कार्यवाही सुरू केली. मी थोडा वेळ तिथेच निवांत बसून सगळा कार्यक्रम पहात होतो. घरी जाईपर्यंत पहाट उजाडली.

प्रताप नाईक

रात्री साधारण साडेबाराला मोबाईल वाजला. संध्याकाळपासून मी त्याला सायलेंट मोडवरच ठेवला होता. इन्स्पेक्टर जगताप निघून गेल्यावर मी रिकामाच होतो. गुप्तेंचा फोन आला तेव्हा मग अंधेरीच्या ’नाईट लव्हर’मध्ये त्यांच्याबरोबर बसलो. फोन मेघनाचा होता.
"यावेळेस ? काय झालं ? " मी हलक्या आवाजात तिला विचारलं.
"प्रताप, आपले फोटो ज्या माणसाकडे आहेत तो भालेराव सांताक्रूजला राहतो का ? "
"का ? काय झालं ? " हिच्याकडे इतके डिटेल्स कसे काय ? माझी उत्सुकता ताणली गेली.
"त्याचा खुन झाला. कोणी इन्स्पेक्टर जगताप आहेत त्यांच्या हातून ? "
"व्हॉट ? " माझ्या आवाजाची पट्टी कुठे पोहोचली ते मला कळलचं नाही. समोर गुप्तेच्या हातातला ग्लास हिंदकळला. आजुबाजुचे सगळेच माझ्याकडे पहायला लागले हे माझ्या गावीही नव्हतं.
"तूला कुणी सांगितलं ?" मी आवाज संयत करत बोललो.
"टिव्ही लाव." ती वैतागली. "पण हा तोच माणूस आहे का ? "
"मी नंतर फोन करतो तुला. मला आधी पाहू दे." मी सेल ठेवून वेटरला बोलावलं. त्याने न्युज चॅनेल लावलं. बातमी खरी होती. पण अस्पष्ट होती.
"............ नक्की काय झाल ते अजूनही स्पष्ट नाही. पण मयत इसम हा एक सेकुरीटी एजन्सी चालवत होता. इथल्या रहिवाश्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा माणूस सरळमार्गी होता. त्याची बायको व दोन मुलं मागच्या आठवड्यात गावाला गेलेले असून अजून त्यांना हे कळवण्यात आलेलं नाही. मयत भालेराव यांचे शेजारी श्री. राजेश कोदे यांच्याशी आम्ही बोललो.
"गोळीचा आवाज झाला म्हणून मी बाहेर आलो. भालेरावचा दरवाजा उघडा होता. दाराजव़ळ एक माणूस उभा होता. पण तो चटकन बाहेर आला. त्यानेच आत पोलिस आहे म्हणून सांगितलं. मी आत गेलो तेव्हा भालेराव खाली रक्ताच्या थारोळयात पडलेला आणि इन्स्पेक्टर जगतापाच्या हातात बंदूक होती."
इन्स्पेक्टर गायकवाड पुढील तपास करत आहेत. मी, अविनाश पाठक, कॅमेरामन निनाद राऊत याच्यासोबत ...."
भालेराव संपला. म्हणजे एक महत्त्वाचा अडसर नाहीसा झाला. पण फोटो ? त्यांच काय ? ते इन्स्पेक्टर जगतापांना मिळाले की नाही ? पण इन्स्पेक्टर जगतापांना त्याला गोळी घालायची काय गरज ?

इन्स्पेक्टर गायकवाड

"साहेब, इन्स्पेक्टर जगतापांच्या स्टेटमेंटची कॉपी मिळाली का ? "
"मिळाली गायकवाड. यातल्या एकेका बाबीची लवकरात लवकर शहानिशा करून मला कळवा. जगतापच्या म्हणण्याप्रमाणे मला भेटून निघाल्यावर त्याला एक निनावी फोन आला. वाकोला मेन्शनमध्ये गडबड असल्याचा. त्या फोनची तपासणी करा."
"यस सर."
" गायकवाड, वाकोला पोलिसस्टेशन रस्त्यात लागतेच ते विसरला का जगताप ?"
"मी विचारलं सर. पण अनोळखी नंबरवरून आलेल्या त्या बातमीची पुर्ण खात्री झाल्याशिवाय काय सांगणार, म्हणून ते पोलिसस्टेशनला आले नाही."
"म्हणजे मिळालेल्या माहीतीवर त्याला विश्वास नव्हता की एखाद्या इन्स्पेक्टरच्या बोलण्यावर वाकोला पोलिस स्टेशन विश्वास ठेवणार नाहीत असं वाटलं त्याला ? " मी यावर काहीच बोलू शकलो नाही.
"ते टिव्हीवरचं जे काय तो बरळलाय ते पण चेक करा. बाकी पॉस्टमार्टम रिपोर्ट मध्ये कळेलच. पण एक गोष्ट नक्की की या सगळ्यात कुठे तरी पाणी मुरतयं. ओल नेमकी कुठे आहे ते कळेलच."

इन्स्पेक्टर जगताप

"महेंद्र, काही दिवसांची रजा घे."
"सस्पेंशन म्हणा सर." मी त्यांना थोडं सोपं करून दिलं.
"तुझा नकार मी वर पोहोचवलाय आणि मला वाटते तुझी बदली आता काही दिवसातच होईल. तोपर्यंत आराम कर. नवीन अपघात घडणार नाही याची काळजी घे. शिवाय गायकवाडांच्या तपासकामात तुझ्यामुळे कोणताच अडथळा येणार नाही याचीही काळजी घे."
"नक्कीच. पण चौकशी तर करू शकतो ना की त्यालाही बंदी आहे ?" फोन दुसर्‍या बाजूस आपटला गेला वाटतं. मी बाईक पार्क केली व वाकोला पोलिसस्टेशनच्या पायर्‍या चढायला सुरूवात केली.
"नमस्कार गायकवाड, काही बातमी आहे माझ्यासाठी ?"
"नाही जगताप. अजून तरी नाही. रिपोर्ट उद्यापर्यंत मिळेल. पण एक न्युज आहे. भालेराव हा ब्लॅकमेलर होता. त्याच्या घराच्या झडतीत, देव्हार्‍यामागे काही नॅगेटिव्हज सापडल्या."
"मी पाहू शकतो."
"नाही. जो माणूस सर्वप्रथम आत आलेला त्याला तुम्ही पुन्हा ओळखाल ? "
"नाही. अंधार होता तेव्हा. मला वाटलं की तो कोणीतरी तिथलाच रहीवासी असावा."
"नाही जगताप. तो तिथला नव्हता. पण तो कोण हे आम्ही शोधून काढूच."
"नक्कीच. पण हे मला अडकवण्याचे कारस्थान आहे हे मी खात्रीने सांगतो गायकवाड. मला पुर्ण संशय त्या माणसावर आहे ज्याने मला फोन करून तेथे जायला सांगितलं."
"बघू." गायकवाड माझ्याकडे नजर रोखून बोलले.
आता पुढे काय घडणार याची वाट पहाण्याशिवाय पर्याय नव्हता. कालचा हिरो आज वर्तमानपत्रातून खलनायक झाला होता. विधानसभेचा आणखी एक दिवस माझ्यामुळे कुर्बान झाला.

मेघना

"प्रताप, फोटोंच काय झाल ?" माझा राग अनावर झालेला.
"हे बघ मेघना, फोटो मला मिळालेले नाहीत आणि तो भालेराव आता या जगात नाही. मी फोटोंसाठी प्रयत्न करतोय. माझे काही सोर्सेस आहेत. पण अजून काही कळलेलं नाही." प्रताप बहुधा माझ्या टोनमुळे किंचित चिडला.
"प्रताप, ते फोटो मला हवेत." मी त्याला निर्वाणीचं सांगितलं. ते फोटो त्याच्याकडे नाहीत यावर विश्वास ठेवणं मला जड जात होतं.
"मलाही हवेत, मेघना ऍंड आय एम डूईंग माय बेस्ट फॉर दॅट. मी ओलरेडी बराच पैसा ओतलाय यात." प्रतापच्या आवाजाची पट्टी वाढली.
मुर्खासारखा या माणसावर विश्वास ठेवलेला मी. कदाचित याच्याकडे फोटो असतीलही आणि उद्या याने मलाच ब्लॅकमेल केलं तर ...
"प्रताप, अस तर नाही ना की ते फोटो तुझ्याकडेच आहेत आणि...... " मी वाक्य अर्ध्यावर सोडलं.
"वॉट नॉनसेन्स मेघना. फोटो माझ्याकडे असते तर मी तसं तुला सांगितलं असतं. भालेरावचा खुन झालाय आणि आता या प्रकरणात उघड चौकशी करता येणार नाही. मला फोटोंच काही कळलं की मी तुला फोन करेन. तू फोन करायची काही गरज नाही. बाय." प्रतापने फोन आपटला. माझ्याप्रमाणे त्यालाही ते फोटो हवे आहेत हे नक्की. प्रश्न हा होता की फोटो आता कुणाकडे असतील. याच आठवड्याअखेर फ्लाईट होती. जाण्यापुर्वी हा फोटोंचा मॅटर संपायलाच हवा. हा आता नव्या आयुष्याचा प्रश्न होता.

नेहा

"सर, मघाशी लंच ब्रेकमध्ये एक माणूस भेटला देशपांडेना. स्टेटसमध्ये. तो जो मधला पिलर आहे ना त्याच्या डाव्या बाजूस बसलेले ते व मी उजव्या बाजूस. मी पाठमोरी असल्याने त्यांच्या लक्षात आलं नाही काही. ते दोघे फारच हळू बोलत होते. पण मी त्यात तुमचं नाव ऐकलं... दोनदा आणि एकदा ते कोणा भालचंद्र का कोणाबद्दल .."
"भालेराव ?"
"यस भालेराव.... बरोबर... बी कॅअरफुल सर. देशपांडे तुमच्या एमडी होण्याच्या मार्गात मोठा अडसर बनणार." मी सरांना धोक्याचा इशारा दिला.
"थॅंक्स नेहा." त्यांनी इंटरकॉम ठेवला.

डोंगरे

"डोंगरे, गायकवाड तुम्हाला शोधताहेत. तुमच्या हाताचे ठसे असतील दरवाजावर. कदाचित तुमचं डिस्क्रीप्शन त्या माणसाकडून त्यांना मिळालं असेल. अलर्ट रहा. त्या बसच्या तिकीटाचा काही माग मिळाला का ? " साहेबांचा पहिलाच प्रश्न.
"साहेब, ते ९१ नंबरच्या बसचं तिकीट होतं. सेनापती बापट मार्गावर लोअर परेल आणि एलफिन्स्टनच्या दरम्यान काढलेलं. ती बस साधारण पावणेपाचच्या सुमारास तिथे पोहोचली होती. त्याला मी पाहीलं आहे. बटाट्यासारखं नाक आहे त्याचं आणि त्यावर देवीचे व्रण. त्याच्या खांद्याला डोर टू डोर कॉरियरची बॅग होती. त्याला शोधायला जास्त वेळ लागणार नाही."
"बोला डोंगरे. त्या दिवशी कोण कोण येऊन गेलं ?"
"साहेब, त्या माणसांच्या मागोमाग प्रताप नाईक आलेले. "
"प्रताप ? "
"पण ते दहा मिनिटात परतले. तो कॉरीयरवाला पावणेसहाला बाहेर आला व मग रिक्षा करून सांताक्रुज स्टेशनच्या दिशेने गेला."
"यांच्याव्यतिरिक्त अजून कोणी .. ?"
" मी संध्याकाळी साडेतीन वाजल्यापासून बाहेर होतो. बरीच ये - जा होती. लोकांची परतायची वेळ. बहुतेक लोक सोसायटीत राहणारेच होता. काही ठराविक लोक नोंद घेण्याजोगे होते." मी खिशातली डायरी काढली. "मी समोरच्या बसस्टॉपवर होतो. जवळपास सगळ्यांची यात नोंद केली आहे. " मी डायरी साहेबांना दिली.
"डोंगरे, प्रताप आणि तो कोरियरवाला भालेरावच्या घरी गेले हे नक्की. पण आणखी कोण तिथे गेले होते त्याचा सध्यातरी आपल्याकडे पुरावा नाही. पॉस्टमार्टेम रिपोर्टमध्ये बर्‍याच गोष्टी स्पष्ट होतील. थोड थांबाव लागेल. तोपर्यंत त्या तुमच्या बटाट्याला शोधा. "
"२४ तासात हजर करतो त्याला साहेब." मी साहेबांना शब्दच दिला
"आणखी एक डोंगरे. तुम्ही केलेला फोनला मी सस्पेक्टच्या नावावर फिरवलाय. गायकवाड तिथे पोहोचतील. तिथे तुम्हाला कोणी नोट केलं असेल का ? "
"नाही साहेब. मी दुकानाबाहेरच्या पीसीओमधून तुम्हाला फोन केला होता. तिथल्या वर्दळीत ते कुणाच्या लक्षातही आलं नसणार. इथे कुणाला फुरसत आहे दुसर्‍याची उठाठेव करायला ? "

प्रताप

"मी गेलो होतो भालेरावच्या घरी. तुम्ही गेल्यावर मी थोडा वेळ वाट पाहीली आणि मग निघालो तडक त्याच्या घरी. त्याचा पत्ता होता माझ्याकडे. मी त्याच्या घरी गेलो तेव्हा दार उघडच होतं. मी त्याला आवाज दिला. पण आतून काहीच रिस्पॉन्स आला नाही. मग दार ढकललं. आत अंधार होता. मी हॉलमध्ये पाहील आणि पुन्हा आवाज दिला पण भालेराव आत नव्हताच. घराचं दार उघडं टाकून तो कुठे गेला असावा याचा विचार करत शेवटी मी बाहेर पडलो."
"तेव्हा टिव्ही चालू होता प्रतापराव ? "
"नाही. का ? "
"काही नाही.
"जगतापसाहेब, त्या फोटोंच काय ?"
"प्रतापराव, पोलिसांना भालेरावच्या घरातून काही निगेटिव्हज मिळाल्यात. कदाचित तुमच्यापर्यंत पोलिस पोहोचतील."
"पोहोचले. गायकवाड आले होते. त्या दिवशी बरेच कॉल माझेच गेलेले."
"मग ? "
"मी सांगितलं त्यांना. आमच्या कंपनीला सेक्युरिटी सर्विस देण्यासाठी तो पाठी लागला होता आणि एक दोनदा ऑफिसला येऊनही गेला. मला आमच्या काही कॉम्पेटिटर्सच्याबद्दल माहीती काढायची होती व त्यासाठी मग मी त्याला कॉन्टेक्ट केले होतं. आमचं भेटायचं ठरलं होतं पण तो काही आलाच नाही. म्हणून त्याला मी कॉल केले."
"फोटोंचा उल्लेख केला का गायकवाडांनी ? "
"नाही."
"नाही. म्हणजे ते फोटो त्या तिघांपैकी कोणीतरी नेले असावेत." इन्स्पेक्टर जगतापांच्या या बोलण्यावर छातीत धस्स झालं.
"जगतापसाहेब, या फोटोंनी मला नागवलंही आणि नाचवलंही. त्यामुळे ते मिळणं फार गरजेचं आहे. "
"प्रतापराव, हा खेळ आता आपल्या हातात राहीलेला नाही. आता सगळी पावलं सावधगिरीने टाकावी लागतील. तुमच्या हाताचे ठसे दारावर नक्की असतील. शिवाय तुमची गाडी कोणी ना कोणी नोट केल्याची शक्यता आहे. जर गायकवाड त्या संदर्भात परतले तर भालेरावच्या घरी गेलो होतो हे कबूल करा. भीतीपोटी आधी बोललो नव्हतो असही सांगा. जर तुम्ही हा खून केला नसेल तर तुम्हाला कसलीच भीती नाही. "
"नसेल... खरचं मी हा खून केलेला नाही."

इन्स्पेक्टर जगताप

"बोला गायकवाड, काय म्हणतोय पॉस्टमार्टेम रिपोर्ट ?" मी बसल्या बसल्या पहिला प्रश्न टाकला.
"महत्त्वाचं म्हणजे तुमची गोळी डेड बॉडीला छेदून गेली." इन्स्पेक्टर गायकवाडच्या चेहर्‍यावर स्मितहास्य होतं.
"मला कल्पना होतीच याची." मी यातून सुटल्याची खात्री झाली मला.
"जगतापसाहेब, दारावरच्या, घरातल्या व टाळ्यावरच्या ठश्यांमध्ये पडताळणी केली त्यात टाळ्यावर दोन ठसे सापडलेत. पण रिपोर्ट अजून हाती आलेला नाही."
"भालेरावच्या उजव्या कानावर व मागच्या बाजुला घाव होते. शिवाय गळ्यात काचेचा तुकडा. भालेराव नेमका कोणत्या घावाने मेला ? "
"मानेवरच्या घावामुळे श्वासनलिका कापली गेली व शिवाय प्रचंड रक्तस्त्राव झालाय आणि त्यामुळेच त्याला मृत्यु आला. त्या काचेच्या तुकड्यावर फिंगरप्रिन्टस चेक करतोय आम्ही."
"तुमची थिअरी काय म्हणतेय ? " मी मुद्द्याला हात घातला.
"एक तर ती व्यक्ती जिला भालेराव ब्लॅकमेल करत होता किंवा चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेला एखादा चोर.." गायकवाड विचारपुर्वक थिअरी मांडत होते. "पण हा खून नक्कीच नसावा. मला वाटते हा एक अपघात आहे."
"कशावरून ? "
"टाळयाचा फटका जीवघेणा नव्हता. भालेराव टिपॉयवर पडला आणि फुटलेल्या काचेपैकी एक त्याच्या मानेत शिरली. पण फटका मारणार्‍याला शोधायला तर हवं. टाळं रक्ताने माखलेलं असल्याने ठसे मिळवणं थोडं कठीण जातयं."
"गायकवाड, तुम्ही मला जर ते फोटो दाखवलेत तर कदाचित मी तुम्हाला काही मदत करू शकेन."
"आता तुम्हाला फोटो दाखवायला हरकत नाही." मी फोटो पाहीले. त्यात प्रतापचे फोटो नव्हते.
"जगताप, भालेरावच्या सेलफोनवरून आम्हाला ही लिस्ट मिळाली आहे. यात तुमच्या ओळखीचा कोणी आहे का ? ही त्याच्या सेलमधली सेव्ह केलेल्या नंबरची लिस्ट आणि हे मागच्या काही आठवड्यात त्याला आलेल्या व त्याने केलेल्या नंबरची लिस्ट." मी लिस्ट हातात घेतली. काही नावे माझ्यासाठी नवीन नव्हती पण काही नावे मला बरचं काही सांगून गेली.
"नाही. यातलं एकही नाव माझ्याशी रिलेटेड नाही."
"जगतापसाहेब, ज्याने तुम्हाला फोन केला होता त्याच्याबद्दल तुम्हाला अजून काही सांगता येईल का ? "
"मला जेवढं माहीत होतं ते मी तुम्हाला आधीच सांगितलय." मी उठून हात मिळवला. फोन कुठून आलेला हे जरी गायकवाडांना कळलं असलं तरी कोणी केला हे शोधणं भारी काम होतं. मला डोंगरेंबद्दल खात्री होती.

डोंगरे

"साहेब, त्या बटाटा नाकाचा पत्ता लागलाय. इथे लोअरपरळच्या पेनिनसुलासमोरच्या चाळीत राहतोय तो."
"डोंगरे, उचला त्याला आणि सुलेमानच्या मटक्यावर घेऊन या. तुम्ही कुणाच्या नजरेत येणार नाही याची काळजी घ्या. " साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जन्याला उचलून सुलेमानच्या अड्ड्यावर नेलं. हा साहेबांचा खास खबरी. थोड्याच वेळात साहेब पण पोहोचले.
"बोला जन्या." जगताप साहेबांनी जन्याला समोर बसवलं. त्याच्या सुजलेल्या गालावर माझ्या हाताची पाचही बोटे अजून ठळक होती.
"जगतापसाहेब, आयच्यान खर सांगतो, खुन मी केला नाय. मी पोचलो तेव्हा भालेराव खपलेलाच होता. मला फोटो उचलायचं काम मिळालं होतं. भालेरावशी फोटोंचा सौदा झालेला. म्हणून गेलो. पण तिथे भालेरावची डेड बॉडी होती. माझ्यामागोमाग एकजण आला होता. त्याने बाहेरून आवाज दिला तसा मी भालेरावला पडद्याच्यामागे उभा केला. तो माणूस आत आला आणि आवाज देऊन परत गेला. मी आख्खं घर शोधलं पण फोटो काही मिळाले नाहीत. मी बॉडी पडद्याच्या मागेच ठेवली आणि टिव्ही चालू केला. दरवाजा उघडा पाहून जर कोणी आत शिरला असता तर लफडा झाला असता. आत कोणीतरी आहे असं बाहेरच्या माणसाला वाटावं म्हणून टिव्ही लावला होता. मला पण तिथून सटकायका टाईम पायजे होता."
"हे काम कोणी दिलं तुला ? "
"देशपांडे. केमीफार्मचे पर्चेस मॅनेजर."
"ठिक आहे. आता त्या देशपांडेना म्हणावं की वीआरएस घ्या आणि गावी जा. नाहीतर भालेरावच्या खुनाच्या आरोपाखाली पोलिस त्यांना उचलतील."
"सांगतो साहेब."
"चल निघ आता." साहेबांच्या इशार्‍यावर जन्या बाहेर धावला.

सुलेखा प्रताप नाईक

इन्स्पेक्टर गायकवाड घरी आले हे फारच धक्कादायक होतं.
"काय गंमत आहे मिसेस. नाईक. ज्या माणसाला तुमचे मिस्टर डिटेक्टीवगिरीचं काम देणार होता तो माणूस त्याच दिवशी मरतो. आणि त्याच माणसाला दोन दिवसापुर्वी तुमचा फोन जातो. हे जरा विचित्र नाही वाटत तुम्हाला ? " माझ्या ओठावर यायची कोणत्याच शब्दांची इच्छा नव्हती. प्रताप धक्का बसाबा तसा खुर्चीत कोसळला.
"भालेरावला तू फोन केला ? का ? " मी त्याच्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही.
"सुलेखा प्रताप नाईक. तुम्ही भालेरावला फोन का केलात ? " गायकवाडनी सरळ माझ्या उलट तपासणीला सुरूवात केली.
"भालेराव एक डिटेक्टीव एजन्सी चालवतो हे मला यांच्या खिशातल्या विजिटिंग कार्डमुळे कळलं. यांचं एका बाईबरोबर अफेअर आहे आणि मला या गोष्टीची शहानिशा करायची होती. त्यासाठी मी भालेरावला भेटणार होते. त्या दिवशी मी त्यांना भेटायला गेले आणि हे काम त्यांच्यावर सोपवलं. पण त्यांनी माझं काम करायला नकार दिला."
"आणि म्हणून तुम्ही त्याचा खुन केलात." गायकवाडांनी अंधारात बाण मारला हे मला जाणवलं.
"नाही. मी नाही मारलं. मी तिथून निघाले तेव्हा तो जिवंत होता. त्याला कुठे तरी जायचं होतं. हातात टाळं घेऊनच होता तो. " गायकवाडांनी जाता-जाता माझ्या हाताचे ठसे घेतले आणि कुठेही न जाण्याची सक्त ताकीद देऊन ते गेले. त्यांच्या जाण्यानंतर घरात बरचं रामायण झालं. शेवटी घटस्फोट घ्यायचं नक्की झालं.
दोन दिवसांनी गायकवाडांकडून कळलं की माझा या खूनात काहीच हात नाही याची त्यांना खात्री पटली आहे. पण स्टेटमेंट देण्यासाठी व इतर बाबी पुर्ण करण्यासाठी एक फेरी मारावीच लागली.

इन्स्पेक्टर जगताप

"मला वाटलच होतं की तुमची बदली होणार. मी आधीच सामान पॅक करून ठेवल होतं. तुमच्याशी लग्न झाल आणि मला वर्षभरातच कळलं की माझ्या संसाराची ही चाकं काही एका जागी टिकणारी नाहीत. कधी निघायचयं ?" सौभाग्यवतींनी पदर खोचला.
"आधी मला तर जाऊ दे. नागपुर माझ्यासाठीही नवीनच आहे. मग बोलवतो तुला निवांत." मी रिवॉल्वर टेबलावर ठेवलं.
"निवांत ?" डोळे वटारलेच तिने.
"नाही ग बाई. पण दोन-चार दिवस तरी देशील की नाही. जागा नको का शोधायला ? तिथे काय क्वार्टर्स रेडी असणार का माझ्यासाठी ? एवढी सोय केली नाही अजून सरकारने आमची." मी युनिफॉर्म काढून खुंटीला लटकवला.
"बरं बरं. हे घ्या." एक पाकीट तिने समोर ठेवलं.
"हे काय ? " मी पाकीट उलटून पालटून पाहीलं.
"हे तुमच्या पॅंटच्या खिशात मिळालं होत मागे. त्या दिवशी पहाटे आलात बघा त्या सांताक्रुजच्या मर्डरनंतर. कपडे धुवायला टाकताना सापडलं. तुम्हाला द्यायचं राहीलं ते प्रशांतच्या लग्नाच्या गडबडीत."
मी पाकीट खोललं आणि माझी ट्युब पेटली. हे मी भालेरावच्या खिशातून काढलं होत आणि माझ्या खिशात सारलं होतं. त्यानंतर त्या सगळ्या गदारोळात पहायच राहीलं आणि मग विसरूनच गेलो.
पाकीटात नॅगेटिव्हज होत्या. प्रतापला देण्यासाठी त्या त्याने खिशात ठेवल्या होत्या. नेमकी तिच जागा जन्याने शोधली नव्हती आणि खून्याने देखील.

गायकवाडांकडून सेलफोनची लिस्ट हातात पडली. तेव्हा त्यात सुलेखा प्रताप नाईक हे नाव वाचलं. त्याच दिवशी डोंगरेसोबत सुलेखाला भेटून मी सगळी माहीती घेतली. इन्स्पेक्टर गायकवाड तिच्यापर्यंत पोहचणार याची मी तिला आधीच कल्पना दिली. काय बोलावं आणि काय बोलू नये याचीही तालिम करून घेतली. त्या फोटोंचा तिने उल्लेख करू नये यासाठी तिच्या मिनतवार्‍या कराव्या लागल्या. बर्‍याच गोष्टी तिला न सांगता. प्रतापबरोबर घटस्फोट घ्यायचा तिचा निर्णय पक्का होता व त्याने मला काहीच फरक पडत नव्हता. डोंगरेंच्या लिस्टप्रमाणे त्या दिवशी कोण-कोण येऊन गेले त्याचा उलगडा बर्‍यापैकी झाला होताच. आणखी चौथी व्यक्ती राहीली होती तिच्यावर सुलेखाने शिक्कामोर्तब केलं कारण सुलेखापाठोपाठ इमारतीत शिरलेल्या त्या व्यक्तीने सुलेखालाच भालेरावचा पत्ता विचारला होता. सुलेखाने त्या व्यक्तीला पाहताक्षणीच ओळखलं आणि ते नाव गायकवाडांच्या लिस्टमध्ये होतं. शेवटचा फोन भालेरावला त्याच व्यक्तीचा होता.
मी डोंगरेसोबत तिथेही पोहोचलो.
"बोला, तुमचं काय म्हणणं आहे ? "
"प्रतापच्या सेलमधून मला भालेरावचा नंबर मिळाला. त्याला अनेकवेळा फोटोंसाठी रिक्वेस्ट केली पण त्याला दहा लाख पाहीजे होते. शेवटी त्या दिवशी मी त्याला फोन केला. त्याने तो कट केला व फोन स्विच ऑफ केला."
"त्या दिवशी काय झालं ? "
"मी खाली पोहोचले. एका बाईला त्याच्याबद्दल विचारलं आणि वर गेले. तो दाराला टाळं लावत होता. मला पाहून तो थांबला. मी त्याला फोटोसाठी पुन्हा रिक्वेस्ट केली. पण तो ऐकायला तयार नव्हता. मला ते फोटो कोणत्याही परिस्थितीत हवे होते. मी टेबलावरचं टाळं उचललं आणि त्याच्या डोक्यावर मारलं. ते त्याच्या कानशिलावर बसलं. त्याचा तोल गेला आणि तो टिपॉयवर पडला. त्याचा चेहरा रक्ताने माखलेला. त्या अवस्थेत त्याने उठायचा प्रयत्न केला. त्याच्या हाताच्या वजनाने टिपॉयची काच फुटली. त्याचा पुन्हा तोल गेला आणि तो खाली कोसळला. काचेचा एक तुकडा त्याच्या मानेत शिरला. माझ्या डोळ्यादेखत तो आचके देत मेला. माझ्या अंगातलं त्राणच गेलं. काय करावं तेच सुचेना. तरी मी धीर करून तिथे फोटो शोधले पण ते काही मला सापडले नाही. त्याला ठार मारायचा माझा हेतू नव्हता. मला फक्त ते फोटो पाहीजे होते."
"तुमच्या हाताचे ठसे त्या टाळ्यावर असतील. आज ना उद्या पोलिस तुमच्यापर्यंत पोहोचतील."
"म्हणजे तुम्ही ... ?"
"आम्हीही पोलिस आहोत. पण या प्रकरणात तुम्हाला आम्ही अटक करणार नाही. जर जीव वाचवायचा असेल तर फरार व्हा. तेच तुमच्या हिताचं आहे."

माझा सल्ला मेघनानेने मानला आणि ती त्याच रात्री महेश लालवाणीसोबत अमेरिकेला निघून गेली. तिची तिकिटे आधीच बुक होती म्हणा. कायद्याचा रक्षक असून स्वत:च्या हितासाठी मला कायदा मोडावा लागला. शेवटी मीही माणूसच. स्वार्थ साधायला हवाच.

देशपांडेनी अचानक वीआरएस घेतली हे प्रतापकडून कळलं. त्याच्यामते सुंठीवाचून खोकला गेला. त्यानंतर दोन दिवसात बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये त्याची वर्णी लागली. त्याच दिवशी सुलेखाने घटस्फोटाची नोटीस हातात ठेवली. माझ्या माहीतीप्रमाणे सध्या तो नेहा नावाच्या त्याच्या सेक्रेटरीबरोबर असतो

भालेरावचा भुतकाळ आणि त्याच्या घरात सापडलेल्या फोटोमुळे पडलेला ब्लॅकमेलरचा शिक्का या दोन गोष्टी त्याच्या विरोधात गेल्या. पुर्ववैमनस्यातून वा एखाद्या ब्लॅकमेलींगच्या शिकार झालेल्या माणसानेच त्याचा खुन करण्याचा प्रयत्न केला या शोधापर्यंत गायकवाड पोहोचले. सापडलेल्या फोटोतील जवळपास सगळ्यांना त्यांनी गाठलं पण गाडी पुढे सरकली. नाही. मला फोन करून त्या मर्डरची सुचना देणाराही त्यांना भेटला नाही. मला या प्रकरणात अडकवण्यासाठीच मला तो फोन करण्यात आला होता ही माझी थिअरी मान्य झाली. पोलिस तपास एका वळणावर येऊन खुंटला तो खुंटलाच. गायकवाड मेघनापर्यंत पोहचायच्या आतच मेघना नाहीशी झालेली. तिच्यापर्यंत पोहचण्याचा त्यांचा प्रयत्न अजून चालू आहे कारण टाळ्यावर असलेले दुसरे ठसे एका बाईचे होते एवढं त्यांना फिंगरप्रिंट रिपोर्टमध्ये कळलं होतं. फक्त मेघनाचेच ठसे मिळवायचे राहीलेले. शेवटी फाईल "तपास चालू आहे" याच सदरात अडकली.

नियतीच्या मनात काय असते हे तिचे तिलाच ठाऊक पण नशीबाचे हे खेळ कधी माणसाला माकड बनवतात तर कधी मदारी. भुषण तोकडाच्या एनकाउंटरमधून सुटलो आणि भालेरावच्या केसमध्ये अडकलो. त्यातूनही सुटलो. प्रधानसाहेबांची ऑफर घेतली असती तर कदाचित आतापर्यंत त्या वीस जणांचा मी एनकाऊंटर केलाही असता. पण त्याच्या पुढे काय होते याची मला कल्पना होती म्हणून मी त्यांना नकार दिला. मला एका शार्पशुटरच्या नावाने पोलिसखात्यात करिअर करायची नव्हती. शिवाय प्रतापचा पैसा वापरून मी डोंगरेंना जी मदत केली ती बुमरँगसारखी माझ्यावर उलटू नये म्हणून नाना कसरती कराव्या लागल्या. काही दिवसाची शांतता लाभावी म्हणून नागपुरची बदली मी स्विकारली. मुंबईत लवकर परतण्याचा मानस आहे. प्रधानांची ऑफर अजून ओपन आहेच म्हणा.

समाप्त.

गुलमोहर: 

यावर एक जबरदस्त सिनेमा काढा राव. आपल्या मा. बो. वरच कुणितरी सापडेल सिनेमा काढणारे.

झक्कींच्या पहिल्या सुचनेला अनुमोदन. पिक्चर नाही पण गेला बाजार एकद्या सिरिअलचे २-३ भाग तर सहज होतील. Happy

Kautuk,

वाव!!! एक thriller cinema बघितल्यासारखे वाटले!!! मूड मस्त लागला!!!

Happy योगेश Happy
======

वा, जबरदस्त.. एखादा सिनेमा पाहातोय असं वाटलं.. Happy

कौतुक... प्रचंड गुंतागुंतीची व प्रदिर्घ कथा.. पण तुझ्या प्रभावी लेखनशैलीत ती तु मस्तच गुंफली आहेस.

डोकं गरगरले ते एकामागोमाग धक्के वाचून. मस्त. Happy

झक्कींना अनुमोदन,
सिनेमा छान निघेल !!
मस्तं

माझे पण झक्कींच्या म्हणण्याला मोदक..

भट्ट कंपनीला ऐकवा ही स्टोरी.. दोन-चार भारी गाणी घुसडून आणि इमरान हश्मीला घेऊन एकदम टेरर चित्रपट निर्माण करतील ते.. Wink

=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

कौतुकराव, किती वाट पहायला लावली राव. भन्नाट एकदम. आपले पण मोदक.
..............................................................................
किती पायी लागू तुझ्या
किती आठवू गा तुते
किती शब्द बनवू गा
अब्द अब्द मनी येते (मर्ढेकर)

कौतुकराव कथा आवडली ,पहिल्या भागानंतर वेगळिच कलाटणी आहे.
*******************************************
बीज जसे अंकुरते मनी कल्पना येते,व्याकुळ होते,तीळ तीळ तुटते,खोल कुठे गलबलते

कौतुक कथा जबरदस्त आहे. फारच्च आवडली.
१) १/२ उपकथानकं आणि बरीच पात्र असुनही कुठेही कसलाही गोंधळ न होता व्यवस्थित कथा पोचतेय.
२) कुठेलाही दुवा सुटलेला नाही. (No loose ends असं म्हणायचं आहे.), कथानक फूल प्रुफ आहे.
३) सगळ्या कलाटण्या, कथेचा वेग मस्तच!
४) येवढं सगळं टाईपलत! _/\_

जरा श्वास घ्या आणि चला आता पुढच्या कथेच्या तयारीला लागा बरं. Happy

छान जमली आहे कथा..

-----------------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

बाप रे कसली गुंतागुंत आहे! झक्कींना अनुमोदन - एक रहस्यपट काढता येईल या कथेवर!!!
मस्तच जमली आहे कथा.

- गौरी

सहीच..... जबरदस्त..... मजा आली वाचायला.

सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....

छान जमलेय कथा. गुंतागुंतीची आणि वेगवानहि तितकिच

कौतुक,कौतुक !

मला पुसटशी शंका वाटत होती हा पुढचा भाग येइलशी ...खरंच ! Happy
पण हा भाग असा असेल याची कल्पना नव्हती ! अगदी क्ल्यूलेस.....जबरदस्त !!

झक्कींना अर्थातच अजुन एक मोदक !

हुश्श! केवढि गुंतागुंत पण, कुठेही गोंधळ न होता मांडलिये कथा.. पहिल्या भागा इतकिच आवडली.smiley32.gif

सुरेख कथा कौतुक... एकदम खिळवून ठेवलं कथेने...

कौतुक कथा एकदम मस्त... पण माझा एक प्रश्न... ते फोटो आता कुठेत? म्हणजे जगतापांनी त्याचे काय केले??? की पुढच्या कथेत त्याचे उत्तर????

मस्त फ्लो.. एकदम खास कथा!

झक्कींना अर्थातच अजुन अजुन एक मोदक !

कौतुक,
सुरेख्......मस्तच. झक्कींना माझेहि अनुमोदन.
====================================
कितीक हळवे, कितीक सुंदर, किती शहाणे....आपुले अंतर.....

सगळ्यांना आभाराचा थोरला मोदक.
'लाजो' याचा पुढचा भाग नाही. इन्स्पेक्टर जगतापांना त्या फोटोंना मकरंदच्या वाटेने पाठवायचे होते. याचा उल्लेख आहे त्यात. फोटो तसेच गेले असतील असं समजायला हरकत नाही. कधीकाळी इन्स्पेक्टर जगताप मुंबईत परतले तर पाहू. सध्यातरी ते नागपुरला आराम करताहेत.

.........................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

जबरदस्त कथा कौतुक...मानलं तुम्हाला...एवढी मोठी कथा..इतकी पात्रं...इतकी गुंतागुंत...इतकी रहस्ये..आणि तरीही कुठेही कसलीच चूक नाही....मस्तच!! खुप छान

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

Pages