जगरहाटी की काय?

Submitted by रैना on 6 May, 2009 - 06:45

मंदीवर, कामाच्या अत्यंत निराशाजनक परिस्थीतीवर, जगातल्या सगळ्या वांझोट्या रागांवर आणि डब्यातल्या त्याच बेचव भाजीवर वैतागून ती तिरमिरीत बाहेर पडली. उन्हं अंगावर घेत सपासप चालू लागली. वैशाख वणवा वस्त्र भेदून आत शिरत होता. निदान जिवंतपणाची तरी लखलखीत जाणीव होते ऋतू अंगावर घेतले की, तिच्या मनात विचार आला. एकदोन शिट्या आणि आपादमस्तक न्याहाळणा-या नजरा तिला दिसल्याच नाहित. त्या नजरा सुद्धा बहुधा सवयीनीच होत्या, बघणा-यांचा नाईलाज म्हणून.

एक भिकारीण पदपथावर शासकीय रंगरंगोटी केलेल्या झाडाखाली पाय पसरुन, भंगाराशी तन्मयतेने भातुकली खेळत बसली होती. शेजारी तिचा शेंबडा पोरगा नसलेली माती उकरत बसला होता, भकास नजरेने वाहतूक न्याहाळत होता. सगळी वाहनं कुठेतरी नेहमीसारखी धूर ओकत सैरावैरा निघाली होती. तिचं खरं लक्ष कशातच नव्हतं, तरी जाणीवेच्या परिघापाशी पुसटसं तिला जाणवत होतच हे सर्व. विचारही नव्हते फारसे, किंवा एवढे होते की एकाच वेळी समोर यायला त्यांची आपापसात झोंबाझोंबी चालली होती.
कुठे जावं? फारसे पर्याय नव्हतेच, किंवा ते पर्याय निवडायला लागणारं धाडस तिच्याकडे नव्हतं. एखाद्या अतीव कंटाळ्याच्या क्षणी, आता आपल्याला चाकोरीचीच ओकारी होते की काय असं वाटताना मग कधी कधी त्या न पाहिलेल्या प्रतिमा बेदीच्या ऐकीव स्वैर वर्तनाचा तिला ऐकीव हेवा वाटत असे, तसंच एखाद्या गोसावड्याच्या गांजेकस धुंदीमग्नतेचाही. फार काय, आपल्यात तर त्या भिकारणीशेजारी बसून भातुकली खेळायचही त्राण नाही.

अवचित टॅक्सी तिच्या अंगावरच येतायेता राहिली .मोडकळीस आलेल्या,आतून उघडता न येणा-या दारांच्या, अंबाबाईची तसबीरवाल्या टॅक्सीवाल्याच्या करकचून आवळलेल्या ब्रेकनी, आणि जोरजोरात दिलेल्या शिव्यांनी भानावर येउन ती त्यातल्या त्यात ब-या कॉफी हाउस असे लिहीलेल्या उड्प्यात शिरली. खाली जानपद पंख्यात बसले होते आणि माशा हाकलत, घाम टिपत, बचाबचा बोलत खात होते. तिच्या एकंदर अवताराकडे बघून आणि एकटी बाई पाहून पो-यानी तिला वर वातानूकुलीत काचेत पाठवलं. तिनं काहीबाही मागवलं आणि पाणी घशाखाली ओतून, ती सभोवती सावध नजर टाकू लागली.

डावीकडे तिघं होते. एक नुकतीच मिसरुड फुटलेला काळाकुट्ट बारीक केसवाला मुलगा, नसलेली बेफिकरी दाखवायच्या अतोनात प्रयत्नात डोळ्यांच्या कडेने सगळीकडे हळूच पाहात होता. त्याची आईअसावीशी एक गबाळीशी बाई, चष्म्यातून, कुंकवा/बांगड्या/मंगळसूत्रातून, साडीच्या करकचून आवळलेल्या पदरातून, पण ब्लाउजच्या खालून डोकावणा-या चांगल्या इंचादोनईंचाच्या अंतर्वस्त्रातून उसंत काढून, थाळी जेवत बसली होती. बाईचा सुसह्य प्रेमळपणा चेह-यावरुन आणि आईला आणि मुलाला हे घे, ते घे म्हणून ताटातले देताना उतू जात होता. तिच्या बाजूला तिची म्हातारीशी सधवा आई, लेकीच्या वाटीतले श्रीखंड बोटाने चापत, आपल्या चाराण्यायेवढ्या कुंकवाला, पांढ-याधोप केसांवर माळलेल्या अबोलीच्या गज-याला, आणि पोरीपेक्षा चापूनचोपून नेसलेल्या साडीला साजेसा खाष्टपणा करत होती. म्हातारीने तेव्ढ्यात एकट्याच बसलेल्या हिच्याकडे बघून पारदर्शक नापसंती व्यक्त केली, आणि पो-याला उशीरा आणण्याबद्दल सणसणीत खडसावले. नातवाने हिच्याकडे पाहून, एकदम बोटं चाटणा-या आपल्या आज्जीला चमच्यानी खायला सांगीतलं,आणि आपण उजव्या हातात काटा धरुन खायला गेला.उत्तप्पा टूणकन उडी मारुन टेबलावर सांडला. खाष्ट बाईने उलट पोरालाच फटकारलं, आणि आपण टेबलावर पडलेला तुकडा खाल्ला. प्रेमळ बाई खातच होती आणि तिनी पोराच्या कालेजाबद्दल उघड स्वगत चालू केलं. आज्जी आणि नातू दोघांनाही फारसा रस नव्हता तरी तिच्या समाधानासाठी दोघं हुंकार भरत खात होते. नातवानी उत्तप्पा प्रकरणानंतर एकदा हिच्याकडे चोरुन डोळे भरुन पाहून घेतलं आणि नजरेला नजर मिळताच परत तो काट्याचमच्याच्या झटापटीला लागला.

उजवीकडे दोन पोटसुटलेली माणसं ईंग्रजीमिश्रीत गुजरातीतून व्यवहारांच आणि मंदीच काय काय बोलत, प्रचंड कायकाय खात होती. त्यांनीही एकदा हिच्याकडे बघून परत आपल्या बिजनेससंदर्भात गोष्टी चालू केल्या. नातवाची नजर जिथपर्यंत पोचली, त्याच्या पल्याड विवक्षीत ठिकाणी त्यांची नजर सवयीने पोचल्याचं तिच्याही सवयीनंच लक्षात आलं. त्यातल्या एकाला सतत फोन येत होते, दुसरा बा आणि परेस वगैरेंची गोष्ट सांगत होता मध्येच. केमछो ? मजामा. हितेसभाई... वगैरे.

तिच्या समोरची दोन टेबलं मात्र खास होती.

एकावर एक मध्यमवयीन जोडपं एकमेकांकडे न पाहता पुढ्यातला पदार्थ निरखून तन्मयतेने खात होती. सुटलेली बायको, सडसडीत नव-याला जगातली सर्व गा-हाणी ऐकवत होती. नवरा तिच्याकडे तितक्याच आर्ततेने दुर्लक्ष करत होता. मधूनमधून दोघंही आपापल्या भ्रमणद्वनींवर वाट्टेल त्या विसंवादी विषयांवर बोलत होती.

शेवटच्या टेबलावर एक तसं तरुण जोडपं, तश्या तरुण विषयांवर माफक चर्चा करत होतं. ती फॅशनचा चष्मेवाली, लांब मोकळे केस, सडपातळ, जाणुनबुजून काळजीपूर्वक गबाळेपणाचा आव आणलेली, हसरी पण रुढार्थाने सुंदर नाही, पण या क्षणी रंगून जाऊन फारच मोहक दिसणारी, त्याला हसत हसत आपल्याला पाह्यला आलेल्या येडचाप मुलाबद्दल सांगत होती. तो चष्मेवाला ऊंच, उगीचच धीरगंभीर दिसण्यासाठी प्रयत्न करणारा, तिला 'समजूतदारीने घे, येडीच आहेस" या मतितार्थाचे काही सांगत असावा. मैत्री असावी, घष्टनही. आपापल्या कार्यालयातून वेळकाढून भेटायला आले असावेत. मग ते देशी राजकारणावर घसरले आणि वाद घालू लागले.

आत्तापावेतो हिला त्यांच्या "मैत्र" चे कौतूक वाटत होते. जगात अनेक शहरात असलेल्या अनेक मित्रमैत्रिणींच्या अपरिहार्य आठवणी हिच्याही डोळ्यात तरळल्या.

हिचं पुन्हा लक्ष गेलं, तोवर त्यांच गाडं एकदम लहान शहरातून येऊन मायानगरीत एकटे राहणारे कसं वाहावतात यावर आलं. गहनच विषय तो. आपल्या बरोबर असणा-या एका मैत्रिणींच कुठे थांबावं हे न कळल्यामुळे कसं माकड झालं- याबद्दल ती त्याला सांगत होती. ""ती नंतर सोडुनच गेली सगळं ! वेड लागेल की काय तिला असं वाटायचं रे तिला तेव्हा. त्या मेल्या मारवाड्यानी तिचा सत्यानाश केलान !. आपलं काय होईल याचीच मला भिती वाटायची रे त्या वेळेला"... तिच्या डोळ्यात न तरळलेलं पाणी गालांवर ओघळतं की काय या भितीनं ती कसनुशी हसली. तो ऐकत होता लक्षपूर्वक, त्याच्या चेह-यावरची गडद छाया अजून गडद झाली. तिला इतक्या सहजपणे आणि सौहार्दाने तो म्हणाला, " माय माझे. मी नाही तुझं असं काही होऊ देणार. तू फालतू विचार करु नकोस. कामात लक्ष दे जरा"
त्याच्या सरळपणाने ती इतकी काही चमकली, की तिला उगीच खाकरुन पाणी प्यायचा आधार घ्यावा लागला. तिच्या लपवलेल्या एका कटाक्षात, उगीच सावरलेल्या कपड्यात आणि पाणी प्यायच्या घाईत हिला तिच्या हृदयातली वाढलेली धडधड ऐकु गेली...

हिला वाटलं, गदागदा हलवून सांगावे का त्याला ? "गाढवा, जे मला दिसतय, ते तुला दिसत नाहीये की तू मुद्दाम करतोयस ? मुद्दाम करत असशील तर, निदान तिला आश्वासनं तरी देऊ नकोस." नंतर हाच म्हणायला मोकळा होईल की आपली फक्त मैत्री आहे म्हणून. पण असं थोडीच कोणी कुणाला काही सांगू शकतं !! सांगायची वेळ येणारच असेल तर सांगून तरी काय फरक पडणारेय? सोडवू देत यांना यांची जगण्याची देणी, घालू देत ताळमेळ.. तीच जगरहाटी आहे !
आणि घेतलाच समजा त्यानी हात हातात, आणि झालाच आनंदी आनंद तरी आयुष्यात पुढे हा कितीवेळा दिलेल्या आश्वासनाला जागेल? आणि ती तरी, आहे तशीच स्वानंदी राहीलच, असं तरी कुठे आहे? कदाचीत तीच आधी कंटाळेल - कुणी सांगाव? मग शाश्वत ते काय आणि दोघांमधले कोण ? की कुणीच नाही आणि काहिही नाही ? मग आपण अर्थ कसला शोधतोय ? काय की... !!!
मघाच्या त्या शासकीय झाडाखाली भंगाराची भातुकली खेळणा-या भिकारणीसारखी आपणही ही नसत्या झगड्यांची नुसती भातुकलीच खेळतोय का ? तीही माफक ?

गुलमोहर: 

निदान जिवंतपणाची तरी लखलखीत जाणीव होते ऋतू अंगावर घेतले की>> छान
एकुणच मस्त.. Happy

अंगावर आलं, इतकं जबरदस्त लिहिलयं. फार आवडलं. सगळेच उदास उदास लिहितायत. Sad

रैना, छान.
(मध्ये मध्ये काही ठिकाणी टाईपण्याच्या नादात स्पेस द्यायची राहिली आहे.)

सुंदर !!
शीर्षकातल्या 'की काय?' साठी ... अगदीच ! कुठे (कुठे) अर्थ शोधायचा ? अर्थ सापडेल ही अपेक्षाही माफकच.

    ***
    लख्ख लाखेरी देहाच्या निळ्या रेषा मापू नये
    खुळ्या, नुस्त्या डोळ्यांनी रान झेलू जाऊ नये (महानोर)

    मस्त लिहीलय.

    -------------------------------------------------------------------------------
    Donate Eye - Bring Light to Blind

    रैना मस्त लिहिलय.. वाचताना असेच आजूबाजूला पाहिलेले कैक प्रसंग अठवले. Happy
    --------------
    नंदिनी
    --------------

    मस्त. फक्त 'सधवा' असा उल्लेख जरा खटकला. साधारणपणे आपण असं म्हणत नाही असं वाटलं. दुसरा काही शब्द वापरता येईल तिथे?

    - गौरी
    http://mokale-aakash.blogspot.com/

    रैना
    .. बस्स .. ना आये चैना .. कित्ती म्हणजे कित्ती ते 'जिवंत' आणि डोळस लिहीलंय ..
    विशेषतः --> "चाकोरीचीच ओकारी" , "गांजेकस धुंदीमग्नतेचाही","वांझोट्या रागांवर" आणि
    "त्याच्या सरळपणाने ती इतकी काही चमकली, की तिला उगीच खाकरुन पाणी प्यायचा आधार घ्यावा लागला. तिच्या लपवलेल्या एका कटाक्षात, उगीच सावरलेल्या कपड्यात आणि पाणी प्यायच्या घाईत हिला तिच्या हृदयातली वाढलेली धडधड ऐकु गेली... "

    जय हो!! Happy

    उत्तम आहे कथा आणि खरतर ही कथा वाटतच नाही येता-जाता घड्लेले प्रसंग आणि ते पाहुन समोरच्या व्यक्तीच्या मनात काय आहे हे इथ्यभुत पणे मांडण्याचा यशस्वी प्रयत्न्न केलात तुम्ही ''सलाम तुमच्या मनकवडेपनाला''.

    छान लिहीले आहे. सुक्ष्म निरिक्षणशक्ती Happy

    बाप रे! अगदी अंगावर आलेलं वास्तव!

    कुठे कुठे जातायत हिचे विचार म्हणेपर्यंत पुन्हा आलीच की ती तिच्या अपरिहार्य परिघात! शब्द प्रयोगही लिखाणाच्या बाजाला साजेसे..!

    एकदम कडक!

    मस्त लिहीलं आहेस.

    आईशप्पथ रैना... अशक्य लिहिलंयस. सगळं सगळं उभं केलंस. एकटीने उडप्याकडे खायला जाण्याचा अनुभव तसा नेहमीचाच अगदी रोजचा नसला तरी त्यामुळे अजूनच पटलं..
    क्या बात है!!

    ----------------------
    हलके घ्या, जड घ्या
    दिवे घ्या, अंधार घ्या
    घ्या, घेऊ नका
    तुमचा प्रश्न आहे!

    पहिला पॅरा ओढून ताणून जमवलेला (कि सहज न जमलेला) वाटत होता पण नंतरचे सगळे फर्मास, पकड घेणारे ..... स्लार्ट्याला शीर्षकाबद्दल दुजोरा ....

    काय स्सह्ही लिहीलंय!! जाम आवडलं!
    काही काही शब्दप्रयोग तर अफलातून!

    www.bhagyashree.co.cc

    व्वा! Happy

    पुन्हा एकदा शांतपणाने वाचली आणि सगळी गोष्ट पिक्चर चालू असल्यासारखी डोळ्यासमोर आली. Happy

    रैना, हे जे काही लिहिलयस (अगं-जागं करतेय... तुझा आयडीच तसा आहे), ते एका वाचनातही इतकं भिडलं की काय सांगू...
    जाई म्हणतेय तसं अंगावर येतय. तुझे शब्दं, उपमा, हे सगळं अधिक जाणून घ्यायला, मी परत दोनदा वाचला लेख.
    *****निदान जिवंतपणाची तरी लखलखीत जाणीव होते ऋतू अंगावर घेत******
    *****आता आपल्याला चाकोरीचीच ओकारी ****
    ****न पाहिलेल्या प्रतिमा बेदीच्या ऐकीव स्वैर वर्तनाचा तिला ऐकीव हेवा वाटत****
    ****सोडवू देत यांना यांची जगण्याची देणी, घालू देत ताळमेळ.. तीच जगरहाटी आहे !***
    हे आणि असे अनेक....

    आणि हो! शेवटचा अख्खाच्या अख्खा परिच्छेद!
    जियो! सुंदर लिहिते आहेस.

    रैने मस्तच लिहिलयस ग! "चाकोरीची ओकारी" आणि "तीच आधी कंटाळेल" इ. आवडेश!

    मस्त लिहीलंय! एवढे सगळे तपशील एकाच वेळेला टिपले असतील तर कमाल आहे.

    प्रतिक्रिया देणा-या आणि वाचणा-या सगळ्यांचेच आभार. Happy

    रैना, अतिशय ओघवतं आणि सुंदर लिहिलं आहेस,
    लिहिताना तू नक्कीच बेभान झाली असशील, शब्दा-शब्दांतून जाणवतंय ते. सुरेखच एकदम.

    मस्त लिहिलंयस एकदम!

    Pages