’अंगा‌ई ते गझल-रुबा‌ई- समग्र वा. न. सरदेसा‌ई’

Submitted by मानस६ on 3 May, 2009 - 14:14

मराठीतील जेष्ठ गझलकार, श्री. वा. न. सरदेसा‌ई ह्यांच्या, ’अंगा‌ई ते गझल-रुबा‌ई- समग्र वा. न. सरदेसा‌ई’ , ह्या काव्य-संग्रहाच्या, दि. २६-४-२००९ रोजी, कल्याण पश्चिम येथे संपन्न झालेल्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहण्याचा योग आला. हिंदी-उर्दूचे गाढे अभ्यासक श्री. राम पंडित,पी.एच.डी.(हिंदी-उर्दू) ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याच दिवशी श्री. वा. न. सरदेसा‌ई, ह्यांच्या संकेत-स्थळाचे देखील उदघाटन झाले.(www.sardesaikavya.com)
श्री. वा. न. सरदेसा‌ई हे, अक्षरगण वृत्ताचे नियम काटेकोरपणे पाळून गझल लिहिणारे म्हणून, गझल वर्तुळात सुपरिचीत आहेत. सदर कविता-संग्रहात त्यांच्या गझला, कविता, भावगीते, पोवाडा, लावणी, ओवी-अभंग, मुक्त-छंद, हायकू, बाल-कविता इ. काव्य-प्रकारांचा समावेश आहे. ह्या काव्य-संग्रहाचे प्रमुख वैशिष्ठ्य म्हणजे, श्री. राम पंडित ह्यांची एकूण अठ्ठेचाळीस पानांची विस्तॄत प्रस्तावना, आणि तब्बल नव्वद वृत्तातील, एकूण एकशे त्रेचाळीस गझलांचा, आणि सर्व मान्यताप्राप्त वृत्तातील, तसेच अद्यापही अस्वीकृत असलेल्या वृत्तातील काही, अश्या एकूण एकशे सव्वीस रुबायांचा, ह्यात असलेला समावेश! फक्त होतकरु गझलकारांसाठीच नाही, तर सर्व काव्य-प्रेमी रसिकांसाठी हा ग्रंथ नक्कीच मार्गदर्शक ठरु शकतो.
काही महिन्यांपूर्वी त्यांच्या कल्याण येथील निवास-स्थानी जाण्याचा योग आला होता. तेव्हा त्यांच्या संग्रही असलेली, गझल-सम्राट कै. सुरेश भटांची, त्यांच्या गझलांची प्रशंसा करणारी बरीच पत्रे त्यांनी मला दाखविली होती.निघताना त्यांनी, त्यांचा ’चांदण्यांची तोरणे’ हा गझल-संग्रह मला स्नेह-पूर्वक भेट म्हणून दिला.
श्री. वा. न. सरदेसा‌ई, ह्यांच्या पुढील काव्य-प्रवासाला, त्यांचाच, -कविच्या ’शेरा’सारख्या वॄत्तीचे प्रतिबिंब असलेला एक ’शेर’ उधॄत करुन अनेक शुभेच्छा देतो!
केवढीही का असेना त्यांस लोकर...
एवढीशी, पण मला आयाळ आहे!

प्रकाशक- इंद्रनील प्रकाशन,
३१६ अ, हेमराज वाडी नाका, दुसरा मजला,
जं. शं. रोड, (गिरगाव रोड), ठाकुरद्वार, मुंब‌ई-४००,००२

पत्र-व्यवहाराचा पत्ता- श्री. वा.न. सरदेसा‌ई,
ए-१, अन्नपूर्णा प्रासाद, मोडक गल्ली,
गांधी चौक , कल्याण(प)-४२१३०१
फोन-०२५१-२२००६३१, मो- ९८६७१५४५०२

-मानस६

गुलमोहर: