क्लिक!

Submitted by पूनम on 29 April, 2009 - 01:48

शनिवार संध्याकाळ- ७ वाजत आलेले.. सुनिता लेकीची वाट पहात होती.. इतक्यातच श्वेता आली, चेहरा उतरलेला, वैतागलेला होता..सुनिताने दार उघडले आणि श्वेताला काही विचारायच्या आतच ती तरातरा आत आली आणि धपकन सोफ्यावर बसली...

श्वेताचं लक्षण सुनिताला ठीक दिसलं नाही, थोडी उदास, थोडी चिडचिडी वाटली तिला ती..
"काय गं, कसा वाटला?"

"आई, नाही गं! तसा ठीक होता, कॉफी प्यायली, गप्पा मारल्या, पण क्लिक नाही झालं गं काही.. असं कसं होतं आई.. म्हणजे तसं बोट दाखवू शकत नाही मी.. पण नाहीच! जाऊदे" श्वेताने झटकूनच टाकलं आणि थोडी मरगळून तिच्या खोलीत गेली.. इकडे सुनिता विचारात पडली..

श्वेता तिची सुविद्य, तरूण मुलगी.. engineer होऊन एका आघाडीच्या IT कंपनीत नोकरीला होती.. आता जगरहाटीनुसार तिच्या लग्नाचे पहायला नुकती सुरुवात केली होती..तिला खरतर कॉलेज आणि नोकरीच्या ठिकाणी इतके मित्र होते की ही वेळ तिच्यावर येऊ नये अशी इच्छा सुनिताचीच होती. लेकीवर विश्वास होता, त्यामुळे तिने एखाद्या मित्रालाच जोडीदार म्हणून समोर उभा केला असता तरी त्यांनी positively विचार केला असता..पण.. श्वेताचे 'तसे' काही कोणाशी जुळल्यासारखे दिसले नाही..

सुरेश-सुनिताने तिला विचारलेही होते विवाहमंडळात नाव नोंदवण्यापूर्वी. पण ती म्हणली 'आई तसे काही असते तर तुला सांगीतले नसते का मी?' असं म्हणल्यावर गप्पच बसले ते आणि एक-दोन नावाजलेल्या वधू-वर सूचक मंडळात नाव घालून आले मुलीचं. तसच hi-tech जमाना म्हणून online विवाहमंडळात पण श्वेतानी नाव घातले होते स्वत:च. सुनिताला स्वत:लाही ही 'दाखवून घेणे' कार्यक्रम मनापासून आवडत नव्हते, त्यामुळे शक्यतो जितके कमी प्रोग्रॅम होतील तितके बरे असे वाटून तिनेही श्वेताला online नाव नोंदणी साठी प्रोत्साहन दिले होते. ही मुलं ईमेलवरच बरीच माहिती करून घ्यायची आणि मग आधी आपापली भेटायची. तिथे अनुकूल मत झालं तरच पुढे घरी भेटायचं असा संकेत होता. श्वेता अश्या प्रत्येक स्थळाची माहिती, ईमेल हे सुनिता-सुरेशला दाखवायची आणि त्यांनाही सगळं ठीक वाटलं तरच भेटायची वेळ नक्की करायची..

हे असं कोणाला भेटाची तिची तिसरी वेळ. तिन्ही वेळा ईमेलवर भेटलेली मुलं प्रत्यक्ष भेटीत पसंत पडली नव्हती. पहिल्या दोन वेळा सुनिताने फारसं मनावर घेतल नव्हतं.. पण नक्की कुठे, काय आणि कोणाचं चुकतंय याचा अंदाज लेकीच्या उतरलेल्या तोंडाकडे पाहून आता घ्यायची वेळ आली होती..

सुनिता श्वेताच्या खोलीत गेली.. श्वेता पलंगावर नुसतीच बसली होती विचार करत. सुनिताला एकदम भरून आले. श्वेताच्या शेजारी बसली ती आणि तिचा हात हातात घेतला..

"काय झालं गं? अशी का बसलीस? काय विचार करतेस?"

"काही नाही गं आई.. असं का झालं असा विचार करत होते.. analyse करत होते की नक्की माझं काही चुकतंय का? मेल मधे जी काही info सांगतात ना त्यामुळे एक image तयार झालेली असते आणि तश्या image मधे तो मुलगा बसला नाही की एकदम अपेक्षाभंग होतो गं! आई आमची पध्दत चुकतीये का गं? तुमची ती 'कांदापोहे' पध्दतच बरी होती का?"

"छे गं.. तुला वाटतंय, पण ते अगदी क्लेशकारक असतं.. चार लोक आपल्याला बघत आहेत, प्रश्नं विचारत आहेत आणि त्यावरून एक आयुष्यभराचा निर्णय घ्यायचाय आपल्याला.. आमच्यावेळी गोष्टी वेगळ्या होत्या.. साधारणपणे माणसं एकाच पध्दतीने विचार करायची, माहितीतली स्थळं असायची आणि आमच्या अपेक्षाही साधारणच होत्या.. आता सगळच इतकं बदललं आहे.. तुम्ही इतक्या शिकलेल्या, एवढाले पगार तुमचे, सुखवस्तू राहणी, स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाची जाणीव.. त्यामुळे गोष्टी साध्या राहिल्या नाहीत.."

"आई मग यावर काहीच उपाय नाही का गं? "

"अगं वेडाबाई अशी एकदम उदास होऊ नकोस. सांग ना मला आज काय झालं नक्की? आपण ठरवू की कोणाचं काय चुकलं ते.."

"आई खरं तर काहीच झालं नाही.. आम्ही भेटलो ठरल्याप्रमाणे.. गप्पा मारल्या छान, ईमेल मधे लिहिलेले टॉपिक्स पुढे बोललो, ऑफिसचं discussion , कामावर गप्पा, family background बद्दल, general अपेक्षांबद्दल.. सगळं normalच..पण बाहेर पडल्यावर मी स्वत:ला हा प्रश्नं विचारला की ’याच्याबरोबर आपण आख्खं आयुष्य काढू शकू का, ज्याला संसार म्हणतात असा करू का?’, तेव्हा का कोणास ठाऊक माझं gut feeling म्हणालं 'नाही'! हा 'क्लिक' नाही झाला अजिबातच त्या दृष्टीनी.. आणि मीच अस्वस्थ झाले..त्यामुळे confuse झालेय थोडी.. आई, तुम्ही कसं ठरवलत गं की तुला बाबांशीच लग्न करायचंय? आणि त्यांनी की तुझ्याशीच लग्न करायचय ते?" श्वेता जरा लाडात आली..

सुनिता तिच्या प्रश्नानी जरा लाजलीच! "चल! काहीतरीच विचारतेस!"

"आई सांग ना पण.. आपण या विषयावर कधीच नाही बोललो.. तुझा experience share की माझ्याशी.."

"अगं असं क्लिकबिक होणं नव्हतं गं आमच्यावेळी.. ओळखीओळखीतून बाबांचं स्थळ तुझ्या आजोबांना कळलं.. चौकशी केली थोडी.. कुटुंब इथलंच होतं, आमच्यासारखंच होतं, फार मोठी उडी नव्हती, म्हणजे मानपान करता आला असता, म्हणून दादांनी पत्रिका नेऊन दिली.. ती जुळली म्हणून बघण्याचा कार्यक्रम झाला.. तेव्हा मला बाबा आवडले, म्हणजे नाव ठेवण्यासारखं काही नव्हतं, त्यांनाही तसच वाटलं असणार.. कारण त्यांचाच निरोप आला २ दिवसांनी पसंतीचा आणि मग काय, याद्या आणि लग्न!"

"my God! it was so simple ! आई काय मज्जा ना.. तुम्ही एकटे भेटलाच नाहीत का गं? आणि तसंच लग्न ठरवायला संमतीही दिलीत! सहीच ना! पण तुला बाबांमधलं काहीतरी आवडलं असणार ना, काहीतरी क्लिक झालं असणारच की, उगाच कशी हो म्हणशील तू!"

"नाही गं बाई.. सांगितलं की.. पसंतीचा निरोप आल्यावर दादांनी मला विचारलं की असा निरोप आलाय, पुढे जाऊया ना? म्हणजे त्यांना पुढे जायचं होतच.. मलाही नाही म्हणण्यासारखं काही नव्हतं.. झालं लग्न! इतका विचार करत कुठे होतो आम्ही वेडाबाई.. दादा करतील ते योग्यच असेल असा आंधळा आणि सार्थ विश्वास होताच, त्यामुळे शंकाही आली नाही मनात!"

"आई तुमचं बरय, पण आई, असा कोणी 'क्लिक' झाल्याशिवाय मी नाही उचलणार पुढचं पाऊल, चालेल ना तुम्हाला?"

"बघू आपण..तू इतक्या ठाम निर्णयावर येऊ नकोस.. कधीकधी आडाखे चुकूही शकतात गं, माणसं पहिल्याच भेटीत कशी सगळीच्या सगळी समजतील? असे सरळसोट नियम करू नकोस..मी बाबांशीही बोलते.. आपण सगळ्या बाजूनी विचार करून ठरवू.. हे तुमचं 'क्लिक' प्रकरण नवंच आहे आम्हाला.. चल, मी स्वयंपाकाचं बघते.. बाबा आणि अक्षु येतीलच इतक्यात.."

आई गेलेल्या दिशेकडे श्वेता बघत राहिली.. आईला खरच कधीतरी कळेल का हे पटकन कोणी क्लिक होणं.. कसे काहीतरीच होते आधीचे दोघे.. काय कपडे, काय बोलायची पद्धत.. आणि आजचा अश्विन! कसे प्रश्नं विचारत होता.. अरे! असशील तू तुझ्या कंपनीत सिनियर, पण म्हणून माझा job interview च घेत होता जणू.. वाटलं होतं की आपले platforms एकच आहेत, तर थोडं interesting बोलणं होईल, पण साहेब जणू दाखवायच्या मूड मधे होते की मला 'तुझ्यापेक्षा' कसं जास्त कळतं! असे बेसिक मधे राडे असतील तर कसले संसार करणार! हे सगळं कळेल का आई बाबांना? नुसतं on paper सगळं ठीक असेल तरी प्रत्यक्षात कुठेतरी काहीतरी क्लिक व्हायला हवं ना.. आपली DTPH ची माधुरी तर होत नाहीये ना?

श्वेताही उलट-सुलट विचारात अडकली..

सुनिता स्वयंपाकाला लागली, पण मनात अनेक विचार येत होते..
खरंच हे 'क्लिक' होणं इतकं महत्त्वाचं आहे का? आपला आणि आपल्यासारख्या अनेकांचा संसार झालाच ना.. आपल्याला कुठे काही क्लिक झालं होतं?

या विचारावर अचानक सुनिता थबकली.. नव्हतं का झालं काहीच क्लिक? तिला ते दिवस आठवले.. आधी तिची पत्रिका जुळत नाही म्हणून बरेच नकार आले, मग आलं होतं ते अशोक साठेचं स्थळ.. त्याला पाहून का कोणास ठाऊक वाटलं होतं की याने होकार देऊ नये.. कारण होकार आला असता तर आपल्याकडे 'नाही' म्हणायला काहीच नव्हतं.. त्याचं ते आपल्याकडे बघणं, प्रश्नं विचारायची पद्धत, काहीसा व्यवहारी वाटला होता स्वभाव आणि वाटलं होतं की याच्याशी नको लग्न करायला.. आणि बरं झालं बाई की तेच 'नाही' म्हणले ते.. आणि ते सुहास कुलकर्णीचं स्थळ- तो तसा माहित होता.. कॉलेजमधे २ वर्ष पुढे होता आणि त्याचं वागणं-बोलणं माहित होतं.. तोही 'नवरा' म्हणून पसंत नव्हता पडला.. आणि 'हे' आले बघायला तेव्हा तसं क्लिकबिक झालं नव्हतं, पण थोडं आश्वस्त वाटलं होतं खरं यांच्याकडे पाहून..त्यांचे डोळेच पसंती सांगून गेले होते, आणि ते स्मितहास्य, नम्रतेनी दादा-आईशी बोलणं.. मत कुठेतरी आपलंही अनुकूल झालं होतच की.. अगंबाई म्हणजे हेच का ते क्लिक होणं?!

सुनिताला हसूच आलं एकदम आणि श्वेताचं मतही खूपच पटलं! अगदी पूर्णं जरी नाही, तरी विचार करण्यासारखं तरी नक्कीच होतं ते..

एवढ्यात सुरेश आणि अक्षय आलेच..

"आई या शनिवारी बोलवू का गं मित्रांना? project पूर्ण करतोय गं आणि काही महत्त्वाच्या गोष्टी discuss करून final करायच्या आहेत.."

"झालंच म्हणजे आई.. हे घोडे नुसते धुमाकूळ घालतील रात्रभर.. यांचा अभ्यास शून्य आणि टीपीच जास्ती.. आणि आपल्याला रात्रभर त्रास.." श्वेता आलीच चिडवायला..

"ए गपे! माहिते तुम्ही किती sincere होतात ते.. जरा मी दोन मित्र घरी आणले की झालाच हिला त्रास.. आणि तू आणि तुझ्या टुकार मैत्रिणी.. तुम्ही काय खुसुरफुसुर करत असता.. बोअर नुसतं.."

"तू येतोसच कशाला पण आमच्यात? चोंबडा.."

"ए, तू जा की आता लग्न करून इथून म्हणजे मला सगळी खोली मिळेल.. मग आम्ही आत कितीही कल्ला केला तरी तुम्हाला त्रास होणार नाही.. पण तुला कोण पसंत कुठे करतंय?" अक्षयनेही चिडवायला सुरुवात केली..

"आई, बघ ना गं"..चिडवणं नेहेमीचच होतं, पण श्वेताला आज लागलं थोडं ते..

"अक्षू, नको रे तिला त्रास देऊस. बोलाव तुझे मित्र.. जा आता हातपाय धुवून ये जेवायला आणि बाबांनाही सांग.. आत्ता ती आहे म्हणून इतका बोलतोयस, पण एक क्लिकचा अवकाश आहे.. पटकन इथून कधी गेली कळणारही नाही तुला.."

श्वेता आईकडे पहातच राहिली.. आईनी चक्क 'क्लिक' शब्द वापरला.. तिलाही थोडं थोडं कळतंय आपल्या मनातलं.. आपल्याला कुणी क्लिक न का होईना अजून, पण आईला आपले विचार नक्कीच क्लिक झालेत..

"आईऽऽऽ!" म्हणत श्वेताने सुनिताला मीठी मारली.. आणि सुनितानेही तिच्या पाठीवर आश्वासक थोपटलं.

समाप्त.

(ही कथा जुन्या मायबोलिवर पोस्ट केली होती. या कथेला 'चारचौघी' मासिकाच्या कथास्पर्धेमध्ये नुकतंच द्वितीय क्रमांकाचं बक्षिस मिळालं, म्हणून पुन्हा इथे पोस्ट करत आहे. आशा आहे, नवीन वाचकांनाही आवडेल ही कथा)

गुलमोहर: 

धन्यवाद सगळ्यांचेच Happy
मी माझ्या जुन्या मायबोलीवरच्या सगळ्या कथा इथे नाही आणलेल्या, हिचं थोडं कौतुक करावं असं वाटलं, इतकंच Happy बक्षिस मिळाल्याचा आनंद सगळ्यांबरोबर वाटावा, इतकाच हेतू.

बाकी, जमेल तसं, जमेल तेव्हा तुम्हा सर्वांच्या शुभेच्छेने नवीन लेखन करायचाही प्रयत्न करत असतेच. क लो अ.

छान. आवडली कथा.
आणि हो, बक्षिसाबद्दल खूप खूप अभिनंदन Happy

~~~
हम 'मत'वाले...

पूनम,
तुमच्या वि.पु. त लिहील्याप्रमाणे माझ्या पोस्ट मधून "ते" विधान ऊडवून टाकतोय. तुम्ही गैरसमज करून घेतला नाहीत त्याबद्दल आभार! Happy
योग
__________________________
***हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यूं है
अब तो हर वक्त यही बात सताती है हमे..***

अभिनंदन psg!! आणि पुढच्या लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा! Happy
कथा तेंव्हाही खूप आवडली होती आणि आत्ताही खूप आवडली. पून्हा एकदा कथा समोर आणल्याबद्दल आभार!

छान कथा!

बक्षिस मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..

दोस्तहो,
तुम्हाला कोणाचा आनंद वाटता येत नसेल तर कृपया दुसर्‍यांच्या आनंदावर विरजण तरी घालु नका.
(बघा पटतय का? Happy

पूनम, जुन्या माबोवर होती ना ही गोष्ट?

हार्दिक अभिनंदन पूनम Happy

सहीच पूनम. मनापासून अभिनंदन. Happy

हीच तुझी पहिली कथा होती नं मायबोलीवर?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
There is no charge for awesomeness.... or attractiveness.

वहिनी हार्दिक अभिनंदन......................

पार्टी पाहिजे.....................आणि आंबा बर्फी सुद्धा.................

पूनम , अभिनंदन. आणि सॉरी, मी बाकीची गोष्ट न वाचताच पोस्ट केलं होतं. (तू 'जुन्या मायबोलीवर लिहिली होती' हे न वाचताच )

बक्षीस मिळाल्याबद्दल अभिनंदन.. Happy

अभिनंदन!
चांगली आहे. मी पहिल्यान्दाच वाचली.

पूनम, सर्वप्रथम तुझे हार्दीक अभिनंदन!! Happy

कथा आधी वाचली होती, तेव्हाही आवडली होती. परत वाचताना पण छान वाटली.
मुलीच्या चष्म्यातून आई बघते, तीला समजून घेते हे खूप आवडलं. Happy

बक्षीस मिळाले म्हणून अभिनंदन. एव्हढ्या थोर लेखिकेसमोर बसून मी पुण्यात वैशालीत किती थिल्लर वागलो! लाज वाटते.
"क्लिक" - मला वाटते आजकाल मुला मुलींची जरा अपेक्षा जास्तच असते, 'पहिल्या भेटीत प्रेम!' ते भाग्य काही जणांनाच, नि त्यातूनहि, लग्न झाल्यावर ते टिकेलच असे नाही! कारण त्यात तारुण्यसुलभ भावनांचा भाग अधिक असतो, दीर्घकाळ, रोजच्या जीवनात ते प्रेम टिकेल का, जमेल का, याचा विचार थोडा असतो.

आमच्या वेळी आई, बाबा स्थळे शोधायची. म्हणजे जर आपल्याच स्तरावरील, आपल्यासारखीच माणसे असतील, तर त्यांचे संस्कार एकाच प्रकारचे असतात, त्यामुळे 'क्लिक' ताबडतोब झाले नाही तरी, पुढे मागे होईलच नि संसार दीर्घकाळ टिकेल अशी आशा असे, नि तसे घडतहि असे. मुख्य म्हणजे डेटिंग तेंव्हा फार कमी, मुले मुली एकमेकांशी बरीच ओळख असल्याशिवाय बोलतहि नसत.

सुदैवाने आजकाल तसे नाही. मुले मुली एकमेकांशी मोकळेपणाने बोलतात, डेटिंग करू शकतात, जरा चार पाच वेळा डेटिंग केल्यावर एकमेकांचा अंदाज येतो की हे केवळ आकर्षण आहे की खरेच एकमेकांचे बर्‍याच बाबतीत मत सरखे आहे. मग पहिल्या भेटीत 'क्लिक' नाही झाले तरी एकमेकांना भेटायला आवडते, प्रदीर्घ काळ एकमेकांबरोबर काढता येईल याची खात्री पटते. ते 'क्लिक' वगैरे खरे तर नुसतेच लेखक कवींनी जरूरीपेक्षा जास्त romanticize' करून ठेवले आहे.

क्षमा करा. म्या म्हातार्‍याने चांगल्या रोमॅन्टिक गोष्टीचा चुथडा केला. सांगितलेत तर काढून टाकीन.

पुनम अभिनंदन!smiley32.gif

पूनम, आठवली. तेव्हाही आवडलीच होती. आणि अगदी मनापासून अभिनंदन, गं.

पूनम, मनःपूर्वक अभिनंदन!!

मायबोलीवर जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा तुझी ही कथा मुखपृष्ठावर झळकत होती. तेव्हापासूनच मी गुलमोहरमध्ये कथा विभागाची आणि तुझ्या लेखनाची फॅन झाले आहे.

श्र, तिची पहिली कथा बहुतेक 'लग्नाचा वाढदिवस' होती.

पूनम, खूप खूप अभिनंदन...
अशीच लिहीत राहा ग.
---------------------------------------------------
फूलोंसे कांटे अच्छे होते है,
जो दामन थाम लेते है.
दोस्त से दुश्मन अच्छे होते है
जो जलकर नाम लेते है.

अभिनंदन पूनम .. कथा छान आहे .. Happy

>>>>> ते 'क्लिक' वगैरे खरे तर नुसतेच लेखक कवींनी जरूरीपेक्षा जास्त romanticize' करून ठेवले आहे.
आयला, आता या कथेत, या वयात हो झक्की तुम्हाला कुठला रोम्यान्टिझम दिस्ला???? Proud कै च्च्या कैच हं!
रोम्यान्टिझमच्या तुमच्या व्याख्या तरी काय आहेत? कळू दे की म्या पामराला (या वयातहि नविन काही शिकायची हौस आहे)
अहो झक्की, एक रोम्यान्टिझमच नाही, तर माणसाची प्रत्येक भाव भावना सापेक्ष अस्ते! अगदी पन्चेन्द्रियान्नी अवगत केलेली जाणिव देखिल कित्येकदा सापेक्ष ठरू शकते! एकट्या लेखकमण्डळीन्ना दोष देण्यात काय अर्थ हे?
कितीही झाल तरी तुमचा अनुभव मोठा- थोर! त्यात "अमेरिकेतला अनुभव" Proud मग आम्ही काय बोलणार बापडे त्यावर? Lol
असो
तर, पूनम
स्पष्टच बोलतो, अनुल्लेखाच्या धबडग्यात, जुन्या मायबोलीवर ही कथा मी वाचली की नाही, वाचल्यास काही प्रतिक्रिया दिली की नाही ते आठवत नाही, पण झक्कीन्च्या निमित्ताने इथे आलोच्चे तर प्रतिक्रिया देतो
विषय छान फुलवला आहे! त्या त्या वयातील नाजुक कोमल भावभावनान्चे चित्रण चान्गले झाले आहे. जोडीदार "क्लिक" होणे या बद्दलच्या असन्ख्य कल्पना करण्यास अप्रत्यक्षरित्या वाचकान्वरच जबाबदारी टाकली ते जास्त चान्गले झाले! "क्लिक" होण्याबद्दलच्या ठोस कल्पना आधिक्याने मान्डल्या गेल्या अस्त्या तर कथेच्या "शेवटास धरून" ती परिणामकारक झाली नस्ती. रोम्यान्टिझमचे वर्णन "क्लिकचे" निमित्त करुन करायचेच झाले अस्ते तर शे पाचशे पाने पुरणार नाहीत! तसे केले गेले नाहीये! अन यामुळेच, झक्कीन्ना मी टोकले!
बक्षिसाबद्दल अभिनन्दन! Happy (अन श्यामलीचेही कौतुक पाठपुराव्यासाठी)
...;
***** या राष्ट्रास निधर्मी म्हणून घोषित करणे व पुरुषासारख्या पुरुषाने स्वतःस हिजडा म्हणवुन घेऊन तसे वागणे या दोन्हीत अर्थाअर्थी, मला तरि फरक वाटत नाही! ****

बक्षिसाबद्दल अभिनंदन. कथा तेव्हाही आवडली होतीच.

----------------------
चंद्राचा पहारा आभाळाचे कायदे
हंस उडू पाही अवघड इरादे

पुनम.. बरेच महिन्यांनी 'कथा' विभागावर क्लिक केले नि निदान नव्या मायबोलीवर तरी (जुन्या मायबोलीवर नव्हती वाचली) 'क्लिक' वाचायला मिळाली.. मस्त लिहीलेस ! नि मिळालेल्या यशाबद्दल मनपुर्वक अभिनंदन Happy

पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद! Happy

झक्की, काय बोलताय अहो! लाज-बिज काय! असो.
'लग्न जुळणं/ जुळवणं' या पद्धतीत दोन पिढ्यांमध्ये तफावत आहे नक्कीच.. 'कांदापोहे' असोत की 'डेटींग'. आणि काळानुरूप ती होणारच.. पण कुठेतरी, काहीतरी आतून ओळख पटावी लागते, जुळून यावं लागतं, हे सूत्र अजूनही कायम! कधी हे पहिल्याच भेटीत जाणवेल, कधी ४-५ भेटींनंतर..

ही रोमँटीक कथा नाही Happy एक रोमँटीक कथाही लिहिली होती जुन्या मायबोलीवर, पण ती नाही आणत इथे, लोकांना किती त्रास (होतो!) द्यायचा? Proud

'मायबोली'वरच मी लिहायला सुरूवात केली. आधी लिहिल्याप्रमाणे, मला झालेला आनंद वाटण्यासाठी हा प्रपंच केला. मायबोलीची आणि तुम्हा वाचकांची नेहेमीच ऋणी आहे, राहीन. लोभ ठेवा..

ह्म्म्म्म वाचली होतीच आधी पण आता तुला बक्षीस मिळालय ना त्या बद्दल अभिनंदन Happy

एक रोमँटीक कथाही लिहिली होती जुन्या मायबोलीवर, पण ती नाही आणत इथे>> ती ही आणावी अशी आग्रहवजा विनंती आहे.

*********************

प्रतिकार आणि प्रतिहल्ला यात फरक असतो! Biggrin स्वसंरक्षणार्थ असतो तो प्रतिकार अन् दुसर्‍याला स्वरक्षणाची संधी देतो तो प्रतिहल्ला! Wink

>>>> दोन पिढ्यांमध्ये तवाफत आहे नक्कीच
म्याडम, तो एक शब्द तेवढा दुरुस्त करा की! तफावत हवे तिथे Happy
वाचताना तवायफ वाचल जातय! Proud

लिंबुदा अस कस चालेल वाचून?? Wink

*********************

प्रतिकार आणि प्रतिहल्ला यात फरक असतो! Biggrin स्वसंरक्षणार्थ असतो तो प्रतिकार अन् दुसर्‍याला स्वरक्षणाची संधी देतो तो प्रतिहल्ला! Wink

>>> लिंबुदा अस कस चालेल वाचून??
खरच की, ते ही खरच! अस कस चालेल मी वाचून? Happy
पण काही का असेना, त्या आधी(ची) माझी पोस्ट (तरी) वाचली जाते की नाही हे मला कस कळणार???
त्यासाठीच ते "टोकन" विधान! Proud

पूनम अभिनंदन तुझं. कथा पुन्हा वाचली, पुन्हा आवडली Happy

Pages