करोना विषाणू आणि आरोग्याची कवचकुंडले !

Submitted by SureshShinde on 6 May, 2020 - 00:58

मित्रहो, करोना आजाराने संपूर्ण जगामध्ये हाहाकार माजवला आहे. भारतात देखील गेले अनेक दिवस आपण लॉक-डाऊन चा सामना करत आहोत. पुणे मुंबई या ठिकाणी रुग्णांची संख्या दर दिवशी वाढतच आहे आणि म्हणूनच या आजाराच्या कारणांची माहिती करून घेणे आवश्यक आहे. हा आजार कसा होतो, कुठल्या जंतूंमुळे होतो, ज्या व्हायरसमुळे होतो तो व्हायरस आपल्या शरीरात प्रवेश केल्यानंतर त्याचे पुढे काय होते हे कथारूपाने समजावून देण्यासाठी हा प्रयत्न आहे...
********
coronaPic.jpg

********
हॅलो, मला ओळखलं काय? मी आहे कोरोनाचा विषाणू! मी कोरोना व्हायरस बोलतोय, हो माझ्यामुळेच करोना हा आजार संपूर्ण जगामध्ये पसरलेला आहे परंतु तुम्हाला मात्र माझ्यापासून आत्ता घाबरण्याचे कारण नाही कारण मी तुमच्या पासून दहा फूट अंतरावर उभा आहे. व्हायरस म्हणजे काय याची उत्सुकता आपल्या मनामध्ये जरूर असणार. आम्ही व्हायरस म्हणजे एक प्रकारचे अतिसुक्ष्म जंतू! आमच्यापेक्षा जास्त सूक्ष्म जंतू असू शकत नाहीत. तुमच्या डोक्यावरील जो केस आहे हे त्याच्या एक दहा हजाराव्या पटी इतका माझा आकार आहे. आम्ही म्हटलं तर सजीव म्हटलं तर निर्जीव प्राणी आहोत! आम्ही सजीव आणि निर्जीव यांच्या संधीप्रदेशात आहोत. आपण बाटलीतल्या राक्षसाची गोष्ट ऐकली असेलच. एका राक्षसाला बाटलीमध्ये कैद करून ठेवलेले असते. जो पर्यंत कोणी व्यक्ती त्या बाटलीचे बूच काढीत नाही, तोपर्यंत तो राक्षस सुप्त स्वरूपात असतो. पण जर का कोणी ते बूच काढले कि तो राक्षस बाहेर येतो. आणि हो, सर्वच राक्षस अल्लाउद्दीनच्या राक्षसासारखे परोपकारी नसतात. ते कोरोना सारखे विध्वंसक देखील असतात.

माझ्या शरीर रचनेविषयी थोडीशी माहिती आपणास असणे आवश्यक आहे. माझा आकार एखाद्या गोल चेंडू प्रमाणे आहे. माझ्या अंगावर काही काटे देखील आहेत. या काट्यांचा उपयोग मी माझ्या भक्ष्याच्या शरीरात प्रवेश करण्यासाठी करतो. ज्याप्रमाणे चंद्र-यानाचे चंद्रावर अवतरण झाल्यानंतर, त्याचे पाय बाहेर येऊन ते यान चंद्रावर स्थिर होते त्याच प्रमाणे आम्हीदेखील आमच्या भक्ष्याच्या शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर या काट्यांच्या साहाय्याने तेथे स्थिरावतो. माझा आकार अतिसूक्ष्म आहे त्यामुळे तुमच्या शरीरातील कुठल्याही पेशींमध्ये हे मी शिरू शकतो. आमचे नेहमीचे भक्ष्य म्हणजे निरनिराळे पक्षी, वटवाघळे अथवा अन्य सजीव प्राणी हेच असतात. कधीतरी अपघाताने आमचा संपर्क एखाद्या मनुष्यप्राण्याशी देखील येतो आणि मग आम्ही एका माणसापासून अनेक माणसांपर्यंत पसरू शकतो. नुकतेच चीन देशामधील वूहान या शहरामध्ये काही वटवाघळांपासून काही माणसांना संसर्ग झाला. हि आमची नवीन प्रजाती आत्तापर्यंत मानव जातीच्या संसर्गात कधीच आली नव्हती. त्यामुळे या जातीच्या विषाणूंचा सामना कसा करावा हे मनुष्य प्राण्यांना ज्ञात नव्हते आणि म्हणूनच या प्रजातीच्या आमच्या भाऊबंदांनी आज संपूर्ण जगामध्ये हाहाक्कार माजवलेला आहे. असो.
तेंव्हा मी आपणाला सांगत होतो कि आम्ही संधी मिळताच आम्ही आमचे पाय आमच्या लक्ष्याच्या फुफ्फुसामधील पेशीमध्ये घट्ट रोवतो आणि त्यानंतर डॉक्टर ज्याप्रमाणे एखाद्या रुग्णाला इंजेक्शन देतात त्याच प्रमाणे आम्ही आमच्या शरीराच्या आत असलेला केंद्रक त्या पेशीच्या पोटामध्ये सोडतो. हा केंद्रक म्हणजे आमची जणू जन्मकुंडलीतच असते. तुमच्या आईच्या पोटामध्ये एका पेशीपासून पूर्ण मानवी देह तयार होतो कारण त्या पेशींच्या केंद्रकामध्ये हे शरीर कसे तयार करावे याची सर्व माहिती जिन्सच्या स्वरूपात उपलब्ध असते. तसेच आमच्या केंद्रकामध्ये आमच्याच सारखे विषाणू त्यातील केंद्रक व आवरणासह कसे तयार करावेत याची माहिती असते. पण नवीन विषाणू तयार करण्यासाठी लागणारी यंत्रणा आमच्याकडे नसते. म्हणून आम्हाला प्रजननासाठी भक्ष्य पेशींची गरज असते. मनुष्याच्या श्वसन संस्थेमध्ये दोन मुख्य भाग आहेत, एक म्हणजे स्वरयंत्राच्या वरील भाग व दुसरा स्वरयंत्राच्या खालील भाग. बरेचसे आजार स्वरयंत्राच्या वरील भागाला होतात परंतु स्वरयंत्राच्या खालील भागाला लवकर संसर्ग होत नाही. आम्ही कोरोना व्हायरस संपूर्ण श्वसनसंस्थेला बाधित करू शकतो. कोरोना आजार खालील श्वसनसंस्थेला लवकर बाधा निर्माण करतो आणि त्यामुळे अशा व्यक्तीला पटकन न्युमोनिया होतो. फुफ्फुसाला आलेली सूज म्हणजे न्यूमोनिया! आमचे केंद्रक फुफ्फुस पेशीत प्रवेश केल्यानंतर त्या बाटलीतील राक्षसाप्रमाणे जणू जागे होते. फुफ्फुस पेशींमधील केंद्रक त्या पेशींना लागणारी प्रथिने तयार करणारी यंत्रणा स्वतःसाठी वापरत असते. पण आमचा विषाणू केंद्रक हि संपूर्ण यंत्रणा काबीज करून तिला आपली गुलाम करतो. हि यंत्रणा आता फुफ्फुसपेशींसाठी काम न करता, विषाणूसाठी काम करू लागते. आणि मग सुरु होते आमचे प्रजनन, पण फुफ्फुसपेशींच्या सौजन्याने! एका पेशीमध्ये आमचे हजारो सहोदर क्लोन्स तयार होतात आणि त्यातच शेवटी ती पेशी बिचारी गतप्राण होते. त्यपेशींमधून बाहेर पडलेले हजारो विषाणू आता नवीन पेशींना बाधित करतात. पण मानवी शरीर आमचा हा हल्ला इतक्या सहजपणे सहन करीत नाही. शरीरामध्ये धोक्याची घंटा वाजते आणि बाधित व्यक्तीला ताप येऊ लागतॊ. हा ताप म्हणजे आमचा एक नंबरचा शत्रू! तापामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. आम्हाला मारण्यासाठी बाहेर येतात काही केमिकल्स ज्यांना अँटीबॉडीज म्हणतात. ह्या अँटीबॉडीज आमच्यावर हल्ला करून आमच्या शरीरावरील काटे मोडून टाकतात व त्यामुळे आम्ही नवीन पेशींना चिकटूच शकत नाही. शरीरातील आमचा दुसरा शत्रू म्हणजे सैनिक पेशी. ह्या किलर-टी पेशी आम्हाला गिळून टाकतात आणि पचवून टाकतात. आमचे मुख्य ठाणे असते फुफ्फुस जेथे आम्ही सूज म्हणजे न्यूमोनिया तयार करतो. न्युमोनिया झाल्यानंतर प्राणवायूची देवाण-घेवाण होण्याची क्रिया कमी होते आणि अशा व्यक्तीच्या शरीरातील प्राणवायूचे प्रमाण खूप कमी होते. शरीरातील प्राणवायु कमी झाल्यामुळे शरीराच्या इतर पेशींना होणारा प्राणवायूचा पुरवठा कमी होतो आणि त्यामुळे शरीराच्या कार्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागतो. आमच्या भक्ष्याची प्रतिकारशक्ती कमी असल्यास आमची प्रजा भरपूर वाढू लागते. आम्ही श्वसनलिकेमध्ये जो स्त्राव असतो त्यात जमा होतो. मग त्या व्यक्तीला खोकला येऊ लागतो. त्या खोकल्याबरोबर थुंकीकणांबरोबर आम्ही बाहेर फेकले जातो. नशीबवान असलो तर आमच्या संपर्कात आलेल्या दुसऱ्या नवीन व्यक्तीला आम्ही शिकार बनवतो. यानंतर तर आमची संख्या म्हणजे ‘व्हायरल लोड’ इतका वाढतो कि आम्ही फुफ्फुस सोडून शरीरातील इतर अवयव म्हणजे हृदय, मूत्रपिंड, मेंदू आणि लिव्हर यांच्यावर हल्ला करतो. फुफ्फुसाचे मुख्य काम आहे शुद्ध आणि अशुद्ध हवेची देवाण-घेवाण करणे व संपूर्ण शरीराला प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन पुरविणे. फुफ्फुसाचे काम कमी होऊ लागले कि प्राणवायूची पातळी जी नेहमी १०० असते ती कमी होऊ लागते. हि पातळी ७० पर्यंत खाली आल्यानंतर त्या व्यक्तीला प्राणवायूची कमतरता भासू लागते व दम लागू लागतो. इतर अवयवांवर आमचा कब्जा झाला कि ब्लड प्रेशर कमी होवे लागते आणि त्या व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण होतो. मूत्रपिंडांचे काम कमी झाले कि शेवट जवळ येतो.
विज्ञानाच्या मदतीने मानवांनी आमचा संसर्ग थांबवण्यासाठी अनेक उपाय शोधले आहेत. काही औषधे आमच्या आवरणाला कमजोर करतात तर काही आमचे केंद्रक तयार होण्याचे कार्य थांबवतात. पण आम्हीही काही कमी हुशार नाही आहोत. आम्ही सतत आमच्यामध्ये बदल करून या औषधांवर मात करत असतो. आज लागू पडणारे औषध काही दिवसानंतर काम करणे बंद होते. अर्थात प्राणवायूचे प्रमाण कमी झाले तर कृत्रिम श्वसन यंत्र म्हणजे व्हेंटीलेटरचा उपयोग करून प्राणवायूची पातळी वाढवली जाते. या सर्व उपायांनी थोडा वेळ मिळतो तोपर्यंत शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि ती व्यक्ती आमच्यावर मात करून बरी होऊ शकते. तसे पहिले तर आम्ही मनुष्य प्राण्यांना फार त्रास देत नाही. सत्तर टक्के बाधितांना आम्ही काहीहि त्रास न देता त्यांच्या शरीराबाहेर पडतो. पंचवीस टक्के लोकांना जास्त त्रास होतो तर २ ते ३ टक्के व्यक्ती दगावतात. प्रतिकारशक्ती चांगली असेल तर फारसा त्रास होत नाही.
साबण, अल्कोहोल, हायड्रोजन पेरॉक्साइड अशी औषधे म्हणजे आमचे जणू शत्रूच कारण ही औषधे आमच्या संपर्कात आली तर आमचे आवरण नष्ट करतात व त्यानंतर आमचा केंद्रक निकामी होतो. तो आजार तयार करू शकत नाही. बाहेरच्या जगामध्ये आमचे आयुष्य चार तास किंवा एखाद्या धातूवर फार तर दोन ते तीन दिवस असू शकते म्हणून आम्हाला जर पुढील भक्ष्य मिळाले नाही तर आमची साखळी तुटते व साथ संपुष्टात येते. परंतु जोपर्यंत आम्हाला काही मूर्ख माणसांची शिकार मिळत राहील तोपर्यंत आमचे प्रजाजन सुरूच राहणार आणि साथ वाढतच राहणार!
खरे सांगायचे म्हणजे आमचे आवडते आणि नेहमी राहण्याचे, वाढण्याचे मुख्य ठिकाण हे पक्षी आणि प्राणी हे आहे. केवळ अपघातामुळे आम्ही मानवाच्या संपर्कात आलो आहोत. जर मानवाने अक्कलहुशारीने आमची साखळी तोडली तर आम्ही पुन्हा आमच्या मूळ ठिकाणी जाऊ. आम्ही मानव मानव जातीमध्ये पाहुणे म्हणून आलेलो आहोत.
मानव मित्रहो, आतापर्यंत आमच्या जीवनशैली विषयी काही महत्त्वाच्या गोष्टी मी आपणाला सांगितल्या त्यावरून बोध घेऊन आपण जर प्रयत्न केलात तर लवकरच तुम्ही आम्हाला आमच्या नेहमीच्या घरी पाठवण्यास मदत कराल, धन्यवाद!

एव्हडे बोलून तो विषाणू अंतर्धान पावला.

मित्रहो, महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णाने कौरवांच्या योद्ध्यांच्या काही त्रुटी पांडवांच्या लक्षात आणून देऊन त्यांना युद्धामध्ये विजय मिळवून दिला. त्याच प्रमाणे विज्ञानाच्या सहाय्याने आपण कोरोनारुपी राक्षसावर विजय मिळवणे आवश्यक आहे. महाभारताचा विषय निघताच आणखी एक गोष्ट मला आठवते ती म्हणजे नल दमयंती आख्यान. आपणास आठवत असेल की नळराजा हा अतिशय देखणा होता व दमयंतीदेखील खूप सुंदर होती. तिच्या स्वयंवरामध्ये कली नावाच्या दुष्ट प्रवृत्तीच्या राक्षसाला दमयंतीशी विवाह करण्याची इच्छा होती, परंतु ती सफल न झाल्यामुळे कलीला नळराजाचा खूप राग आला व त्याने त्याला अद्दल घडविण्याचे ठरवले. त्यासाठी नळराजाच्या शरीरामध्ये प्रवेश करून त्याला दुष्ट प्रवृत्तीसाठी प्रवृत्त करावे असे त्याने ठरवले. कली सूक्ष्म रूप धारण करून परकायाप्रवेश करू शकत असे आणि त्यानंतर प्रवेश केलेल्या व्यक्ती वर पूर्ण नियंत्रण करू शकत असे. नळराजा हा अतिशय धार्मिक प्रवृत्तीचा होता आणि धर्माच्या नियमाचे तंतोतंत पालन करत असे. त्यामुळे कली त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करू शकत नव्हता. परंतु दुष्ट कलीने आपला हेका सोडला नाही. बारा वर्षे वाट पाहूनही कलीला नळराजाच्या शरीरामध्ये प्रवेश करण्याची संधी मिळाली नाही. पण एके दिवशी अतिशय घाईत असल्यामुळे देवपूजेच्या पूर्वी हातपाय पूर्ण स्वच्छ न धुतल्यामुळे त्याच्या पायाचा थोडासा भाग अस्वच्छ राहिला आणि आणि तीच संधी कलीला मिळाली व कलीने नळराजाच्या शरीरामध्ये प्रवेश केला. त्यानंतर कलीने नळराजाला द्यूत खेळण्यास प्रवृत्त केले आणि नळराजा संपूर्ण राज्य गमावून बसला. अर्थात नंतर त्याला त्याचे राज्य पुन्हा मिळाले परंतु त्यासाठी खूप कष्ट सोसावे लागले. याठिकाणी ही गोष्ट सांगण्याचा उद्देश असा की धर्माची शिकवण केवळ एक कर्मकांड नसून त्यामागे काही शास्त्रीय कारण दडलेले असते. बऱ्याच वेळेला आपल्या पूर्वजांनी काही गोष्टी आपण नित्यनेमानं कराव्यात म्हणून काही नियम तयार केलेले होते त्याचा अर्थ आज लक्षात येत आहे.
आरोग्य विषयक नियम काटेकोरपणे पाळल्याने कुठलाही आजार, कुठलाही जंतू आपल्या शरीरामध्ये प्रवेश करू शकणार नाही. म्हणजेच आपण एक प्रकारची संरक्षण व्यवस्था आपल्या कृतीने करत असतो. महारथी कर्णाला कवचकुंडले मिळाले होती ज्या मुळे त्याचे शरीर अभेद्य झाले होते. आरोग्याचे नियम पाळणे म्हणजे ती कवच-कुंडले परिधान करण्यासारखेच आहे. आजच्या परिस्थितीमध्ये आपण आपल्या शरीराचे जंतूंपासून संरक्षण करणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठी ज्याप्रमाणे डॉक्टर्स आणि इतर कोरोनाचे लढवय्ये जो प्रतिबंधक पेहराव वापरतात तसा रोगप्रतिबंधक सवयींचे एक संरक्षक कवच आपण आपल्या दैनंदिन सवयीमुळे आपल्याभोवती तयार केले पाहिजे आणि त्यासाठी आरोग्याचे नियम कडेकोटपणे पाळणे अतिशय महत्वाचे आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी स्वतःच्या आरोग्याच्या सवयी काटेकोरपणे पाळणे, हातांची योग्य काळजी घेणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, बाहेरचे पदार्थ न खाणे, गरम ताजे पदार्थ खाणे, भरपूर पाणी पिणे, नियमितपणे आपल्याला सोसेल तेव्हढा व्यायाम करणे, रोज थोडा वेळ दीर्घश्वसन करणे, योगाभ्यास करणे, भरपूर झोप घेणे इत्यादी गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. या द्वारे आपण या महामारीवर निश्चितच विजय मिळवू याची मला खात्री आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Dr.,
धन्यवाद ह्या लेखाकरता !!!
अन तुम्ही दिलेल्या मोलाच्या सल्ल्याबद्दल....

धन्यवाद डॉक्टर. आज या रोगावरील अगदी सखोल माहिती मिळाली. व्हेंटिलेटर का वापरावं लागतं लगेच याचं कारण कळलं. विषाणू चं मनोगत अशी शैली पण आवडली. खूप खूप आभार

जीवघेण्या रोगाबद्द्ल असलं तरी वाचायला आवडलं. ती कलीची गोष्ट माहित नव्हती. मुलांना सांगता येईल.
धन्यवाद सोप्या भाषेत लिहिल्याबद्द्ल. Happy

छान लेख, आवडला.

<< खरे सांगायचे म्हणजे आमचे आवडते आणि नेहमी राहण्याचे, वाढण्याचे मुख्य ठिकाण हे पक्षी आणि प्राणी हे आहे. केवळ अपघातामुळे आम्ही मानवाच्या संपर्कात आलो आहोत. जर >>
------ बॅट (इतर पक्षांमधे) मधे असे काय विशेष आहे जेणे करुन त्यांच्या शरिरांत हा कोरोना व्हायरसांचा परिवार सुखानैव वास्तव्य करतात. त्यांना त्रास होत नाही.
बॅट के साथ दोस्ती, मगर मनुष्य के साथ दुश्मनी क्यु ?

खूप छान लेख. विषाणूचे मनोगत या स्वरुपात माहिती लिहीण्याचा प्रकार आवडला.
अतिशय सोपी, सरळ भाषा चटकन समजते.

एक प्रश्न आहे डाॅक्टर, कागद( नोटा, वर्तमानपत्र) आणि प्लास्टिक तसेच फळे, भाज्या यावर हा विषाणू किती काळ अस्तित्वात राहू शकतो??