मेघदूत आणि तुम पुकार लो तुम्हारा इंतजार है...

Submitted by अतुल ठाकुर on 5 May, 2020 - 09:04

tum-pukar-lo-02 (1).jpg

काही चित्रपट झपाटणारे असतात. त्याची कथा, गीत, संगीत, अभिनय, दिग्दर्शन सारं काही जमून आलेलं असतं. १९६९ सालचा वहिदा रेहमानचा "खामोशी" हा असाच एक चित्रपट. जितका वहिदा रेहमानचा तितकाच हेमंतकुमारचा आणि तितकाच गुलजार आणि किशोरकुमारचादेखील. त्याचं एकच गाणं "वो शाम कुछ अजीब थी" बहुधा त्याच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एकात जाऊन बसेल. गुलजारचे "हमने देखी है उन आखोंकी महकती खुशबू" हे मला गुलजारच्या सर्वोत्कॄष्ट गीतापैकी एक वाटतं. या सर्व गाण्यांबद्दल स्वतंत्र लिहिता येईल. इथे लिहायचंय ते "तुम पुकार लो" बद्दल. हेमंतकुमारच्या ज्याला हिन्दीतील माईलस्टोन म्हणता येईल अशा गाण्याबद्दल.

हेमंतकुमारचे संगीत गंभीर आणि काहीवेळा गूढ विषयाला जास्त गडद बनवते असे मला नेहेमी वाटते. यात तर चित्रपटाला मेंटल हॉस्पिटलची पार्श्वभूमि आहे. एका पेशंटच्या प्रेमात पडलेल्या नर्स राधाचा झालेला प्रेमभंग. पेशंट बरा झाल्यावर तिला कळतं की त्याचे मन तर दुसरीकडेच आहे आणि आपल्याला जे काही वाटलं ती त्याची आजाराच्या अवस्थेत झालेली वागणूक होती. प्रेम नव्हतं. अगदी याच पार्श्वभूमिवर हे गाणं सुरु होतं. धर्मेंद्र पाहुणा कलाकार आहे. आणि अगदी क्वचित त्याचा चेहरा एका बाजुनेच दाखवला आहे. बाकी त्याला मागून त्याच्या अंगकाठीवरुनच ओळखावे लागते. राधाला आपल्या प्रेमाचे भवितव्य कळून चुकले आहे आणि त्याच्या वेदना वहिदा रेहमानने मूकपणे चेहर्‍यावर बोलक्या केल्या आहेत. तिच्या हातात कालिदासाचे मेघदूत आहे. बहुधा त्याला देण्यासाठी आणलेले पण ते ती आता परत नेते आहे. कारण त्याचा काहीही उपयोग नाही.

मेघदूतातील यक्षाला कुबेराने वर्षभर पत्नीपासून दूर राहण्याचा शाप दिलेला असतो. त्याला आपली पत्नी वर्षभराच्या शापाचा अवधी संपल्यावर तरी मिळणार आहे. कालिदासाने येथे तिच्यासाठी मुद्दाम कान्ता (लाडकी पत्नी) हा शब्द वापरला आहे. इथे धर्मेंद्र नावाच्या यक्षालाचादेखिल आजारामुळे आपल्या प्रियेशी विरह झालेला आहे. आणि बरे वाटु लागल्याबरोबर त्याला तिची आठवण येऊ लागते. कालिदासाने लिहिलेल्या मेघदूताचा संदर्भ या गाण्याशी इतका चपखल बसला आहे की ही जुन्या चित्रपटाच्या वेळची मंडळी इतका सूक्ष्म विचार करताना पाहून थक्क व्हायला होतं आणि माझ्यासारखा माणूस त्या माणसांच्या आणखीनच प्रेमात पडतो. कालिदासाच्या यक्षाचा त्याचा विरह एक वर्षानंतर संपणार आहे. खामोशीतल्या यक्षाचा विरह आजारातून पूर्ण बरे झाल्यावर संपणार आहे. पण राधाचा विरह मात्र संपणारा नाही.

आमच्या काव्यशास्त्रात विरहात केलेली आपल्या प्रियेची आळवणी शृंगाराचीच निर्मिती करते. दु:खाची नाही. कारण हा विरह तात्पुरता असतो. यालाच विप्रलम्भ शृंगार म्हणतात. या विरहानंतरच्या मिलनाची, प्रणयाची खुमारी काही वेगळीच असणार. त्यामुळे विरहाचा एक एक दिवस देखिल ओढ जास्त वाढवणारा. मेघदूतात कालिदासाच्या यक्षाला पत्नीची एकेक गोष्ट आठवते आहे. येथे धर्मेंद्रही "रात ये करार की बेकरार है" असे सूचकपणे म्हणून जातो. अर्थातच ही कमाल गुलजार यांची. एका बा़जूने या गाण्यात शृंगार असला तरी राधासाठी म्हणजेच वहिदासाठी हे गाणे अतिशय कटू सत्य समोर उभे करणारे आहे. आणि म्हणूनच करुण रस निर्माण करणारे आहे. एकाच गाण्यात एकाचवेळी शृंगार आणि करुण रसाची इतकी प्रभावी निर्मिती क्वचितच झाली असेल.

दिग्दर्शक असीत सेन यांनी गाण्यात दाखलेले लांबलचक निर्मनुष्य करिडॉर्स, जाळीचा दरवाजा, प्रशस्त जीना आणि खाली असलेल्या पुन्हा निर्मनुष्यच टेबल खुर्च्या वातावरणाला आणखी उदास बनवतात. त्या लांब करिडॉर मधून काळ्या साडीत येणारी आणि तशीच उदासपणे परत जाणारी वहिदा सतत डोळ्यासमोर येते. पेशंट आपल्या प्रेयसीसाठी, तिच्या मिलनासाठी उत्सुक होऊन गात आहे पण प्रेक्षकाच्या मनावर मात्र वहिदाच्या उदासवाणेपणाची गडद छाया पडते आहे. या सार्‍यामुळे गाण्यातला शृंगाराचा लोप होऊन कारुण्याचीच भावना हळुहळु मनाला झाकोळून टाकते. हेमंतकुमारचे सुरुवातीचे हमिंग आजही प्रचंड लोकप्रिय आहे. आणि गाण्याच्या शेवटची शीळ तर गाण्याला परिपूर्णतेकडे नेणारी. होंठपे लिये हुवे दिल की बात हम, जागते रहेंगे और कितनी रात हम...

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुन्हा एक्दा मस्त लेख आणि विवेचन. आवडत गाण.

हेमंत कुमारची ही गाणी पण आवडतातः है अपना दिल तो आवारा.., ये नयन डरे डरे.., तेरी दुनिया में जिने से तो बेहतर है की मर जाए.., याद किया दिलने.., बेकरार करके हमे.., ना तुम हमे जानो ना हम तुम्हे जाने.., ये रात ये चांदनी फिर कहा...

मला सर्वात जास्त 'तेरी दुनिया में जिने से तो बेहतर है की मर जाए' आवडत. एक शांतपणा, सुकून (?) आहे त्यांच्या आवाजात.

अप्रतिम गाणं आहे. ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट मधे धर्मेंद्र खूप छान दिसलाय. गाण्याचा एक हाँटेड इफेक्ट पण जबरदस्त जमून आलाय. हेमंतकुमारचा आवाज गाण्याला एक soothing effect देतो. पण हे गाणं जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा तेव्हा त्या ‘मुख़्तसर’ शब्दाच्या रचनेत, त्याच्या परिणामात हरवून जायला होतं. इतका हटके शब्द योजणारा गुलझार आणी तो तितक्याच समर्थपणे पोहोचवणारा हेमंतकुमार, दोघांनाही प्रणाम!!

सुंदर लिहिलंय. चित्रपटाची कथा साधारण माहिती होती, वहिदा रहमानच्या हातातलं मेघदूतही चांगलंच लक्षात आहे, पण मेघदूताचा असा संबंध या गाण्याशी जोडून बघितला नव्हता. वाह!
लंपन, एकापेक्षा एक सुंदर गाण्यांची आठवण करून दिलीत!

भारी गाणं आहे हे. आणि ब्लॅक अँड व्हाईट मधल्या धर्मेंद्र वरून तर नजर हटत नाही माझी. आणि तो काय तर यक्ष Happy . मेघदूत चा संदर्भ आवडला. हेमंत कुमार चे सर्वच गाणी class वाटतात. एक युनिक आणि गूढ आवाज आहे. मस्त. मजा आणलीत.

आणखी एक मस्त गाणं , अतुलदा .
फेफ + १०००० .

......................" दिल बहल तो जायेगा ईस खयाल से , हाल मिल गया तुम्हारा अपने हाल से "

माझं खुप आवडतं गाणं, पण मला मेघदूताचा भाग काहीही आठवत नव्हता. थँक्यू परत गाण्याची नव्याने भेट घडवून दिल्याबद्दल.

लंपन, एकापेक्षा एक सुंदर गाण्यांची आठवण करून दिलीत!>>>++१११

खूप सुंदर लिखाण. मेघदूत पाहिले होते पण संदर्भ आज समजला. धन्यवाद.

आयुष्य किती विचित्र असते. धर्मेंद्रला बरे करता करता ती त्याच्या प्रेमात पडते पण तो मात्र कुठल्या दुसऱ्याच दुनियेत असतो. पुढे तसाच दुसरा पेशंट बरा करताना तो पेशंट तिच्यात गुंततो पण ही मात्र तोवर दुसऱ्याच दुनियेत हरवलेली असते.