द गुड, द बॅड, अँड द अग्ली - पडद्यावरील महाकाव्य - भाग १ - टुको, द अग्ली - १

Submitted by अतुल ठाकुर on 16 April, 2020 - 00:19

vlcsnap-2020-04-16-09h28m11s925.png

इली वलाच या अभिनेत्याने अजरामर केलेली टुको, द अग्ली ही व्यक्तिरेखा सिनेजगतात एक मैलाचा दगड मानता येईल अशी आहे. या व्यक्तिरेखेला अनेक कंगोरे आहेत. माणसात सरसकट चांगली आणि वाईट अशी विभागणी करणे अनेकदा कठिण जाते. वाईट माणसातही काहीतरी चांगले सापडू शकते आणि चांगल्या माणसाचे पायही मातीचे असु शकतात. टुको म्हणजे प्रथमदर्शनी आपल्याकडे जसं गावावरून ओवाळून टाकलेली माणसं असतात तसा माणुस. ओबडधोबड, अशिक्षित (मात्र असंस्कृत म्हणता येणार नाही) अशा टुकोची एंट्री या चित्रपटात सर्वप्रथम आहे. मात्र त्याला अग्ली का म्हटले आहे हे कळायला आपल्याला अर्धा चित्रपट पाहावा लागतो. सर्व तर्‍हेचे गुन्हे करून आपली गुजराण करणारा आणि अनेक ठिकाणी फासावर लटकवण्यासाठी हवा असलेला टुको हा गावंढळ असला तरी चलाख आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो पट्टीचा नेमबाज आहे. त्याच्यावर उगाचच काही हजार डॉलर्सचे बक्षिस लावलेले नाही. या बक्षिसाच्या लालसेपोटी अनेकजण त्याच्या मागे आहेत. काहींना कदाचित जुने हिशोब चुकवायचे असतील. पण त्याला पकडण्यासाठी सगळीकडे जाळे लागलेले आहे. चित्रपटाचे पहिले दृश्य टूकोवरील हल्ल्याचेच आहे. या दृश्यात लियॉनीचे प्रसिद्ध टाईट क्लोजप्स दिसतात. ओसाड, निर्मनुष्य म्हणता येईल अशा ठिकाणचं ते सलून आणि तेथे आलेले ते तीन घोडेस्वार. लियॉनी काही क्षणांकरताही जी माणसे घेतो त्यावर बराच विचार करत असावा असे मानण्यास वाव आहे. कारण अधूनमधून या माणसांचे चेहरेच फक्त फ्रेममध्ये दिसतात. काही सेकंदांकरीता जरी ही माणसे आली तरी ती आपल्या लक्षात राहतात.

ही रापलेल्या खडबडीत चेहर्‍याची, कठोर माणसे दिसताक्षणी हे लोक काहीतरी भयंकर करायला आले आहेत हे सांगायला आता ज्योतिषाची गरज नसते. एक माणूस एकीकडे तर दोघे त्याच्या विरुद्ध दिशेला घोड्यावरून पायउतार होतात आणि एकमेकांच्या दिशेने येऊ लागतात. आधी वाटतं हे एकमेकांवरच हल्ला करण्यासाठी येत आहेत. हा एकमेकांकडे येण्याचा काही सेकंदाचा प्रवासही लियॉनी बारीक सारीक गोष्टींसकट रंगवतो. एकदा तर त्याने बोळकांडीत कॅमेरा ठेवून त्यांना येताना दाखवले आहे. ही मंडळी एकमेकांकडे येत असताना पार्श्वसंगीत म्हणून फक्त नैसर्गिक आवाज येत असतात. पक्ष्यांचे आवाज येतात. तेही धडकी भरेल असेच. वार्‍याची शीळ ऐकू येते. हा गरजणारा वारा या वातावरणात आणखीनच तणाव निर्माण करतो. धूळ उडत असते. आणि दूरवर दिसणार्‍या डोंगरांच्या पार्श्वभूमीवर येथे एक नाट्य रंगणार असते. एकमेकांकडे येताना लियॉनी यांचे चेहरे पुन्हा पुन्हा दाखवतो. दगडातून कोरल्यासारखी दिसणारी ही माणसे त्या दगडासारखीच निर्विकार, कसल्याशा अंतिम क्षणांचा निर्णय घेतल्यासारखी. कमरेवर लटकवलेले पिस्तूल दाखवणारी. त्यांच्या त्या वैशिष्ट्यपूर्ण हॅट्स तर असायलाच हव्या अशावेळी. आणि वार्‍यावर उडणारे त्यांचे ओव्हरकोट्स. आता येत राहतो तो फक्त त्यांच्या पावलांचा आवाज. लाँगशॉटमध्ये काही घोडा न जोडलेल्या रिकामी गाड्या इकडे तिकडे उभ्या आहेत. या गाड्यांवर छप्पर म्हणून घातलेलं कापड वार्‍याने उडत आहे. आता या तिघांशिवाय परिसरात चिटपाखरूही दिसत नाही. आणि ही माणसे एकमेकांसमोर येऊन उभी ठाकतात.

एक क्षण हे तिघेही पवित्रा घेतल्याप्रमाणे उभे राहतात. हात पिस्तूलांकडे असतात. आणि दुसर्‍याच क्षणी तिघेही दरवाज्याला लाथ मारून आत शिरतात. धाड धाड गोळ्यांचे आवाज ऐकू येतात आणि बाजूची काच फोडून बाहेर पडतो तो आपला टूको, द अग्ली. तेथेच फ्रेम फ्रिज होते. पडद्यावर येते "द अग्ली".

हा खास सर्जियो लियॉनी टच...

टूकोच्या उजव्या हातात पिस्तूल, डाव्या हातात दारुची बाटली आणि चिकन. तो तसाच इकडे तिकडे एक क्षण पाहतो आणि घोड्यावर उडी मारून निसटतो. गोळीबारात वाचलेला एक माणूस बाहेर येऊन जखमी हाताने पुन्हा गोळी झाडण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो आणि मग धडपडत शुद्ध हरपून मेलेल्या सहकार्‍यांच्या बाजूला कोसळतो. हा वाचलेला गडी पुढे एका अविस्मरणीय प्रसंगात पुन्हा येणार आहे.

या चित्रपटात टूकोची एंट्री सर्वप्रथम असली तरी त्याच्या स्वभावाचा आपल्याला थांगपत्ता यात लागत नाही. हा पट्टीचा नेमबाज आहे. एकावेळी तिघांना लोळवण्याची याची कुवत आहे इतकंच कळतं. टूको काय आहे हे कळायला आणखी थोडावेळ जाऊ द्यावा लागतो. इतर दोघांचं मात्र तसं नाही. "द बॅड" आणि "द गुड" हे तसे का आहेत हे त्यांच्या एंट्रीलाच लियॉनीने दाखवून टाकलं आहे. या दोघांपेक्षाही टूकोची या चित्रपटातील व्यक्तीरेखा मला जास्त गुंतागुंतीची वाटते. या रोलला अनेक कंगोरे आहेत. आणि इली वलाचने ते समर्थपणे पेलले आहेत. टूको लोभी असला तरी या माणसाचे स्वतःचे एक तत्त्वज्ञान आहे. तो त्याप्रमाणे वागतो,बोलतो आणि चालतो. निरनिराळ्या तर्‍हेचे चमत्कारिक प्रसंग याच्यावर कोसळतात आणि तो त्याच्या समजूतीप्रमाणे त्यांना तोंड देत राहतो. त्याचे राग, लोभ, खंत, प्रेम सारे काही अतीतीव्र आहे. त्यात कसलीही लपवाछपवी नाही. तो चलाख असला तरी काही ठिकाणी भाबडा आहे. त्यामुळे चित्रपटातील टूकोचा वावर एखादं वांड मुल त्याच्या वांडपणामुळे सगळ्यांच्या कौतूकाचा विषय व्हावा तसा आहे. आणि इली वलाचने व्यक्तीरेखेतील नेमकी ही नस अचूक पकडली आहे. यातच त्या भूमिकेचे यश आहे. तो ओबडधोबड असेल. त्याच्याकडे मॅनर्स एटीकेट्स नसतील पण तरीही तो लव्हेबल आहे. आणि म्हणूनच त्याला बॅड म्हटलेले नाही. तो "अग्ली" आहे.

(क्रमशः)

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याच्या नावाचा उच्चार "इलाय वॉलख".
चांगला पिक्चर आहे पण त्याला पडद्यावरील महाकाव्य वगैरे म्हणणं जरा जास्तच होतय.