तुळस (Holy Basil)

Submitted by अक्षता08 on 11 April, 2020 - 23:29

हिंदू संस्कृतीमध्ये, वास्तुशास्त्रात आणि आयुर्वेदात तुळशीला फार महत्त्व आहे. तुळस संपत्ती, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जेच प्रतीक आहे. एखाद्या नवीन घरी आपण गेलो आणि आपल्याला तुळशीचं छोटंसं का होईना रोपटं दिसलं की सकारात्मक ऊर्जेचा (क्षणिक का होईना) अनुभव येतो.
जुन्या धाटणीच्या घरात, गावी अंगणात तुळशी वृंदावन असतं. हल्ली इमारतींमध्ये अंगणच नसतं. परंतु, तरीही आपण बाल्कनीमध्ये, खिडकीत तुळशीचं रोपटं नक्कीच लावू शकतो. तुळस indoor plant म्हणूनही लावू शकतो म्हणजेच बेडरूम किंवा living room मध्ये तुळशीचं रोपटं लावू शकतो.
Basil ही वनस्पती बऱ्याच देशांमध्ये आढळली जाते. भारतात प्रामुख्याने Holy basil म्हणजेच तुळस हा प्रकार आढळतो.
भारतात तुळशीचे प्रामुख्याने आढळणारे प्रकार :
१. कृष्ण तुळस २. राम तुळस ३. रान तुळस ४. कापूर तुळस. ह्याव्यतिरिक्तही अनेक तुळशीचे प्रकार आहेत.
तुळस घरात, घराबाहेर लावण्याचे प्रामुख्याने फायदे म्हणजे
१. हवा शुद्ध करण्याचं काम करते आणि mosquito repellent म्हणजेच तुळस असल्यास डासांचा प्रादुर्भाव कमी होतो.
२. तुळशीची पानं गरम पाण्यात चार-पाच तास ठेवावी व नंतर त्या पाण्याचा फवारा खोलीत, बाल्कनीमध्ये मारावा.( हा नुस्का फेसबुकवर एका ग्रुप मध्ये आला होता).
३. रोज सकाळी उठल्या-उठल्या दोन तुळशीची पानं खाणं आरोग्यदायी आहे (मात्र पानं जास्त चाऊ नये ).
४. पाळीव प्राण्यांना उलट्या होत असतील तरीही तुळशीचा रस दिला जातो.
५. तुळस ही उष्ण प्रकृती असलेली वनस्पती असली तरी तिच्या बिया शीतल प्रकृतीच्या असल्याने शरीरात उष्णता अधिक झाल्यास त्यांचे सेवन केले जातं

अशी ही बहुगुणी तुळस लावायला आणि वाढवायला अगदी सोप्पी आहे फक्त नियमितपणे पाणी द्यावे लागते आणि भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असते. तुळशीला खताची आवश्यकता नसते. परंतु, पानं चांगली टवटवीत दिसण्यासाठी महिन्यातून एकदा खत द्यावे (ज्यात नायट्रोजनचे प्रमाण अधिक असेल)
कधीकधी काही केल्या तुळस वाढतच नाही. याची कारणं बरीच असू शकतात.
१. तुळस सारखी मरत असेल तर माती बदलून बघावी किंवा दर 20 ते 25 दिवसांनी मातीचा वरचा layer खणावा (मुळांना त्रास होऊ न देता) ह्यामुळे मुळांना ऑक्सीजन मिळतो. म्हणजेच मातीत aeration चांगलं राहतं
२. सूर्यप्रकाशाअभावी, ३. अनियमितपणे पाणी दिल्याने तुळस मरते.
४. उन्हाळ्यात मातीत कमी वेळ ओलावा टिकून राहतो. त्यामुळे मातीत cocopeat घालावे.

अश्या ह्या बहुगुणी तुळशीचं किमान एक तरी रोपटं घरी असणं गरजेच आहे
IMG20200411140852.jpgIMG20200411173451.jpgIMG20200411172646.jpgIMG20200411174252.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आता काळी तुळस कुठे गायबच झाली. इंडोर प्लान्ट नक्कीच नाही. दोन तीन कुंड्या बाहेर उन्हात ठेवून त्यातली एकेक आलटून पालटून घरात ठेवता येते.

मस्त दिसतीये तुळस.. तुळशीच्या रोपाला मंजुळा आल्या कि त्या सुकण्याआधीच काढव्यात. त्यामुळे तुळशी रोपाला नव्याने पालवी फुटून तिचे आयुष्य वाढते.

तुळस लावायला आणि वाढवायला अगदी सोप्पी आहे फक्त नियमितपणे पाणी द्यावे लागते आणि भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असते. @लेख
_______

इंडोर प्लान्ट नक्कीच नाही.
Submitted by Srd >>+१
_______

पानं चांगली टवटवीत दिसण्यासाठी महिन्यातून एकदा खत द्यावे (ज्यात नायट्रोजनचे प्रमाण अधिक असेल) >>> ह्यासाठी अझोला हां उत्तम आणि सोप्पा उपाय आहे. ज्यांच्या घरी फिश टैंक असेल त्यांनी त्यातील जुने पाणी ज्यात नाइट्रेट इत्यादी घटक फार जमलेले असतात त्याचा वापर सर्वच कुंडीतील झाडाना केला तरी छान रिझल्ट मिळतो.

@वावे
धन्यवाद Happy
.
.
@उपाशी बोका
धन्यवाद Happy
हाहाहाहाहा Lol
वास्तुशास्त्रामधली संज्ञा आहे, म्हणून वापरली...
.
.
@मन्या ऽ
धन्यवाद Happy
सहमत !
(त्यामुळे तुळशी रोपाला नव्याने पालवी फुटून तिचे आयुष्य वाढते.)
.
.

@Srd
काळी तुळस म्हणजे कृष्ण तुळस, बरोबर ना ?
गावी अजूनही मोठ्या प्रमाणात कृष्ण तुळस बघायला मिळते.
@अज्ञानी
तुळस ही indoor plant नाही हे अंशतः बरोबर आहे कारण, बरेच indoor plants हे low light plants ही असतात.
परंतु, ज्या खोलीत तुम्हाला तुळस लावायची आहे तिथे जर मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाश तुळशीला मिळत असेल तर नक्कीच तुळस आपण घराच्या आतही लावू शकतो. फक्त तुळशीचे रोपटं खिडकीशेजारी किंवा खिडकीच्या जवळपास ठेवावं (tried and tested !!)

काळ्या तुळशीची झाडे मोठी होतात, पानांना दर्प खूप असतो. जांभळट काळा रंग . खोडाचे मणी करून माळ करतात. त्याचा वास जात नाही. पण आता मी पाहिली नाही.

रोज सकाळी उठल्या-उठल्या दोन तुळशीची पानं खाणं आरोग्यदायी आहे (मात्र पानं जास्त चाऊ नये ) >>> काळ्या तुळशीत काही प्रमाणात पारा असतो. दातांवर पाऱ्याचे परिणाम होऊ नये म्हणून तुळशीची पाने चावून न खाता तुकडे करून गिळण्यास सांगतात. (अर्थात हे सांगायला फार थोडेच शिल्लक असतील)
जी मुख्य उपयोगी काली तुळस आहे ती तर दिसलीच नाही लेखात

आमच्याकडे ३ प्रकारच्या तुळशी आहेत. कृष्ण तुळसही आहेच त्यात. तुळस हल्ली डासांना लांब ठेवायला तर फारशी उपयोगी पडत नाही पण अजूनही शेतात सापांना मात्र नक्कीच दूर ठेवते.

@Srd
माहिती बद्दल धन्यवाद !
काळी तुळस (Hoary basil) म्हणजेच ज्यापासून सब्जा मिळतो. ती मलाही कुठल्या nursery मध्ये नाही मिळाली.

@जिद्दु
सहमत.
(काळ्या तुळशीत काही प्रमाणात पारा असतो. दातांवर पाऱ्याचे परिणाम होऊ नये म्हणून तुळशीची पाने चावून न खाता तुकडे करून गिळण्यास सांगतात)

हि तुळस मी लावलेली नाही. त्यामुळे मला स्वत:ला ह्या तुळशीबद्दल फारसा अनुभव नाही. त्यामुळे इथे त्याबद्दल माहिती देणं चुकीचं वाटलं मला.
(जी मुख्य उपयोगी काली तुळस आहे ती तर दिसलीच नाही लेखात)

तुम्ही लिहिलेला तुळशी वरचा लेख खूप सुंदर आहे,लेख सोबत चा फोटो बघून मला माझ्या आईच्या दारातली तुळस आठवली.जी अंगणातली शोभा वाढवत असते.आलेल्या पाहुण्यांचा स्वागत अगदी हसत मुखाने डोलत करत असते.तिच्या जवळ लावलेल्या संध्याकाळच्या दिवा ,उदबत्ती नि घर अगदी उजळून निघायचं.
फ्लॅट सिस्टिम आल्यामुळे ना अंगण राहील ना वृंदावन,ना ती स्वागताला उभी असणारी तुळस.
माझ्या लहान पणी सगळ्या सणसोबत साजरा होणारा माझा आवडता सण म्हणजे दिवाळी नंतर येणार तुळशी च लग्न.
दिवस भर माझी नुसती धमाल असायची गेरू नि वृंदावन रंगवायच तुळशी ला चॅन नटवायच,गुरुजींचे मंगलाष्टक नंतर चा तो मुरमुर्याचा चिवडा ,तिळाची वडी..........आहाहा

तुम्ही लिहिलेला तुळशी वरचा लेख खूप सुंदर आहे,लेख सोबत चा फोटो बघून मला माझ्या आईच्या दारातली तुळस आठवली.जी अंगणातली शोभा वाढवत असते.आलेल्या पाहुण्यांचा स्वागत अगदी हसत मुखाने डोलत करत असते.तिच्या जवळ लावलेल्या संध्याकाळच्या दिवा ,उदबत्ती नि घर अगदी उजळून निघायचं.
फ्लॅट सिस्टिम आल्यामुळे ना अंगण राहील ना वृंदावन,ना ती स्वागताला उभी असणारी तुळस.
माझ्या लहान पणी सगळ्या सणसोबत साजरा होणारा माझा आवडता सण म्हणजे दिवाळी नंतर येणार तुळशी च लग्न.
दिवस भर माझी नुसती धमाल असायची गेरू नि वृंदावन रंगवायच तुळशी ला चॅन नटवायच,गुरुजींचे मंगलाष्टक नंतर चा तो मुरमुर्याचा चिवडा ,तिळाची वडी..........आहाहा

नाही अक्षता, सब्जा काळ्या तुळशीपासून नाही मिळत. आपण जी तुळस पुजतो ती होली बेसिल म्हणजे कृष्ण तुळस/ श्वेत तुळस असते. काही लोक श्वेत तुळशीलाच राम तुळस मानतात पण ते चूक आहे. राम तुळस वेगळी असते. सब्जा हा स्वीट बेसिल म्हणजे बुबई तुळशीपासून मिळवतात जी मुसलमानांत पूज्य असते. ते लोक हिला लग्न, धर्मकार्य,मशीद आणि कब्रस्तानात वापरतात. अजून एक दवणा तुळस किंवा मुरवा तुळस असते जिचा वास फार उग्र असल्याने साप/किडे येउ नये म्हणून वापरतात, तिच्या बिया सुद्धा सब्जा म्हणून विकतात. सारख्या दिसणाऱ्या वेगवेगळ्या तुळशींमुळे लोकांचा गोंधळ उडतो. प्रत्येकाचे काही खास उपयोग आहेत पण वेळेअभावी नाही लिहीत. एकमेकांसदृश दिसणाऱ्या/गुणधर्माच्या बऱ्याच तुळशी आहेत.

श्वेत/कृष्ण तुळस
http://envis.frlht.org/plantdetails/4c808d6b6fed02b74cbf99f5a4279449/c18...
मुरवा तुळस
http://envis.frlht.org/plantdetails/3941b882011f74f5629c8fdb230c89d7/ff1...
सब्जा
http://envis.frlht.org/plantdetails/29a5342f50ca6a186dcb9f7409a33cd2/da2...
रान तुळस
http://envis.frlht.org/plantdetails/e92812ea0896038cd6a6c4bdcdc78022/32a...
राम तुळस
http://envis.frlht.org/plantdetails/7ec4454a0809d2ab45a5bc90b6324752/62a...

@Kashvi
धन्यवाद Happy
तुम्ही खरच खूप छान आणि ओघवत लिहिता !!

@जिद्दु
माहितीबद्दल धन्यवाद Happy
नाहीतर चुकीची माहिती डोक्यात राहिली असती.

आमच्याकडे नर्सरीतुन कृष्ण तुळशीचे रोप आणले होते. त्याला नवीन पाने फुटायला लागल्यावर हिरवीच पाने येऊ लागली.कालांतराने ती तुळस हिरवी तुळसच झाली.

तुळशीच्या रोपावर मोहरीच्या दाण्यासारखी किड पडली आहे.. कोवळ्या मंजिऱ्या ऑलरेडी सुकल्यात आता पानसुद्धा सुकायला सुरवात झालीये.. Sad आत्ता नर्सरी बंद आहेत. काय करु?? Please.. Help..

लेख छान आहे.
तुळशीच्या पानात पारा असतो म्हणून चावून खाऊ नये हे नाही पटत. पारा विषारी आहे. सुरक्षित पातळीपेक्षा जास्त पारा पोटात गेला तर जे काही दुष्परिणाम व्हायचे आहेत ते होतात; मग पारा चावून खा की गिळून टाका.
तुळशीच्या पानात माणसाला उपद्रव होईल इतका पारा असल्याबाबत काही ठोस पुरावा असल्यास कृपया इथं द्यावा ही प्रामाणिक विनंती.

एक गोष्ट नक्की, पुण्या- मुंबईजवळ प्रदूषित पाण्यावर पिकणारा जो भाजीपाला आपण घेतो, त्यातली पा-यासह इतर जड धातूंची आणि कीटकनाशकांची पातळी जर पाहिली, तर चक्कर येईल.

@मन्या ऽ
कीड खूप जास्त नसेल तर हातानं पुसून काढून टाकणं उत्तम.
मोहरीच्या दाण्यासारखी कीड म्हणजे 'मावा'. पण मावा हिवाळ्यात पडतो. इतक्या उन्हाळ्यात कसा आला बुवा? घरच्या घरी करण्यासारखं म्हणजे ओंजळभर निंबोळ्या कुटून पाण्यात १०-१२ तास ठेवा. संध्याकाळी पाणी गाळून कीडीवर फवारा. दुसरा उपाय लसूण मिरचीचं पाणी फवारणे. जालावर याबाबत माहिती मिळेल सविस्तर.

धन्यवाद अरिष्टनेमी,
लॉकडाऊनमुळे आत्ता निंबोळ्या मिळण अशक्य वाटतंय. लसुण-मिरचीच्या फवारा मारुन बघते.. गुगलवर अजुन काही माहीती मिळते का बघते. इथे अपडेट करेनच..
पुन्हा एकदा धन्यवाद.. Happy

चांगला प्रश्न आहे. तुळस चावून खाल्यास दातावर परिणाम होतो म्हणून चाउ नये असा प्रघात आहे. पडताळण्यासाठी एखाद्याने काही महिने रोज नियमित चावून खाऊन पाहन्यास हरकत नाही. तुळशीत काही प्रमाणात पारा असतो हे पारंपारिक ज्ञान झालं. यावर गुगल्यावर एक शोधनिबंध सापडला त्याचा स्क्रीनशॉट टाकतोय. त्यांच्या सॅम्पलमध्ये मर्यादेपेक्षा बराच जास्त पारा सापडला. आता यातील कन्टामिनेशन मधून आलेला हानिकारक पॅरा किती आणि औषधी उपयोगाचा नैसर्गिक पारा किती हयाचा कोणीतरी अभ्यास करावा लागेल. बाहेरच्या मातीतून इतका पारा झाडात येत असेल असं वाटत नाही. पण तरी कोणीतरी शोध घ्यावा. अशुद्ध पारा हानिकारक असला तरी शुद्ध पारा हे आयुर्वेदातील सर्वश्रेष्ठ औषधांपैकी एक आहे . त्यावर अख्खी रसशास्त्र हि शाखा उभी आहे. तुळशीतील पाऱ्याचं जे खालील सॅम्पल स्टडीत प्रमाण सापडलंय तो सर्व जर अशुद्ध पारा असता तर आपल्याआजूबाजूला असणारी तुळस खाऊन लोकांना आरोग्य लाभण्याऐवजी दुर्धर आजार जडले असते. यावर जास्त शास्त्रीय अभ्यासाची गरज आहे.
B6-B890-CD-5472-43-AF-B6-B7-C996-CA426-F3-C

मी रात्री मला उपलब्ध गबाळात तुळशीतील पाऱ्याचा सन्दर्भ बराच शोधला पण काही सापडला नाही. माझा भ्रम आहे का म्हणून होली बेसिल मर्क्युरी असे गुगलल्यास बऱ्याच लिंक भेटतात म्हणजे असा समज अस्तित्वात आहे हे नक्की. अगदी शुद्ध पारा सुद्धा दातांना खराब करू शकतो याचा सन्दर्भ खाली टाकलाय. बहुतेक तुळशीत लोह जास्त असते त्याचा कदाचित दातांशी सन्दर्भ असावा.
photo-2020-05-06-09-25-34

बाकी हे शोधताना मला एक विष चिकित्सेवरील अत्यंत चमत्कारिक असा सन्दर्भ सापडला, त्यावरून जुने वैद्य किती सिद्धहस्त असत याची कल्पना येते.
photo-2020-05-06-09-25-53

@जिद्दू, धन्यवाद. खूप खोदून काढलं आहे. छान माहिती तुम्ही दिली आहे.

तुळशीच्या पानातल्या पा-याच्या पातळीबाबत जो आधीचा तक्ता दिलेला आहे, त्या संकेतस्थळाला भेट देऊन काही पानं आताच वाचली. ही तुळस भिलाईच्या खाणीजवळ उगवलेली आहे. त्या मातीत मुळातच पारा जास्त आहे. त्यामुळं तिथली तुळसच काय, माणसं तपासली तरी पारा जास्त मिळणारच. पण हे पा-याचं प्रमाण इतर वनस्पतींपेक्षा जास्त आहे यासाठी त्याचा काही ‘कंट्रोल प्लॉट’ आणि ‘तुलनात्मक निरीक्षणं’ असणं आवश्यक आहे.

उदा. माझ्या अंगणातल्या तुळशीच्या पानात समजा ०.२ टक्के पारा मिळाला तर अंगणातल्या इतर झाडांच्या पानांमध्ये किती होता? तो तुळशीइतकाच असू किंवा नसू शकतो. मग माझ्या अंगणातली माती तपासून पाहणं आवश्यक आहे की मातीत पारा किती आहे?

आता मातीव्यतिरीक्त बाहेरुन कुठूनही, कोणत्याच स्वरुपात पारा तिथं येत नाही असं समजलं तर ढोबळ शक्यता तीन –
अ) मातीत पारा जास्त – म्हणून तुळशीत जास्त - इतर झाडांत जास्त
ब) मातीत पारा जास्त – म्हणून तुळशीत जास्त – पण इतर झाडांत कमी
क) मातीत पारा कमी – पण तुळशीत जास्त – इतर झाडांत कमी

यातील (अ) ही सर्वसाधारण स्थिती मानता येईल. १०० गुणांनी उत्तीर्ण. निर्दोष.

(ब) शक्यता सिद्ध झाली तर तुळस जास्त पारा शोषते हे सिद्ध झालं म्हणता येईल.

पण शक्यता (क) जर सिद्ध झाली, तर ही चिंतेची गोष्ट आहे. पण माझ्या ज्ञानाप्रमाणे झाड कोणतंही मूलद्रव्य तयार करु शकत नाही. मग पारा कुठूनच मिळत नसेल तर तो साहजिकच तुळशीतही येणारच नाही. म्हणून तुळशीच्या पानात पारा जास्त आहे असं म्हणणं शास्त्रीय कसोटीला टिकणं कठीण आहे.

लहानपणी आमच्या घरी तुळस भरपूर होती. खोटं नाही सांगत पण अक्षरशः कमरेच्या वर गेलेल्या ५-७ तुळशींच्या दाटीखाली सावलीत बसून आम्ही उन्हाच्या वेळी खेळत असू. (आता दारात प्लास्टीकच्या वीतभर वृंदावनातली ती मोजून दीड फूट उंच तुळस पाहिली की तिची दया येते.) तर या तुळशीखाली खेळताना भरपूर पानं आम्ही खात असू; चावून-चावून. त्याचा दातांवर काही परिणाम कधी जाणवला नाही. अजूनही मला मोठी स्वच्छ तुळस दिसली की मी २-४ पानं हळू खुडून रवंथ करतो.

हो, एक शक्यता मात्र आहे. तुळशीच्या पानांत लोह जास्त असतं. लोहाचे डाग पडू शकतात दातांवर. अर्थात ही एक शक्यता. आम्ही इतकी पानं खाऊन कधीच डाग पडले नाहीत.

दुसरा मुद्दा असा की पारा दाताच्या संपर्कात आल्यामुळं दात खराब होतात का? मला याबाबतही शंकाच आहे. कारण दात असतात कॅल्शिअमचे. पा-याबरोबर कॅल्शिअमची काही अभिक्रिया होणार नाही. मात्र पारद भस्म दाताच्या संपर्कात आलं तर तोंडातल्या ओलाव्यामुळं त्यातलं गंधकाम्ल मुक्त होईल. त्याची दाताच्या कॅल्शिअमसोबत अभिक्रिया होऊ शकते. याचा किरकोळ परिणाम दातावर होऊ शकतो. कदाचित जाणवणारसुद्धा नाही.
तज्ज्ञ यावर प्रकाश टाकू शकतात.

@अरिष्टनेमी, तुमचं शास्त्रीय दृष्टीकोनातून केलेलं विश्लेषण चांगलं आहे. मलाही एवढ्या शेकडो पुस्तकांत सन्दर्भ न मिळाल्याने शंकाच आहे. तरी तज्ञांनी अजून शोध घेतल्यास काही नविन माहिती हाती लागेल. ४०च्या दशकातील एका पुस्तकात एक उल्लेख आहे . एका संन्याशाने दीर्घवयात देखील नियमित तुळशीच्या वापराने आरोग्य टिकून ठेवलेलं होतं. त्यात देखील त्याने तुळस न चावता गिळून घेण्याबद्दल असाच ठराविक पद्धतीने वापरण्याचा काहीतरी कल्प आहे पण नेमकं ते पुस्तक सापडल नाही. उद्या शोधतोच. ओगले वैद्यांचे तुळशीवर एक स्वतंत्र पुस्तक आहे तेबी राहिलय पाहायच. पारा हा मुद्दा जरी वगळला तरी न चावून गिळण्याचा प्रघात का पडला असेल ते कळत नाहीये.
बाकी रसशास्त्राच्या बहुतेक ग्रंथात पारा, सोमल यांच्या अनेक कल्पांत भसम रूपात असेल तर दाताला न लागता लोण्यात टाकून गिळण्यास स्प्श्त सांगितलेले आहे.
बाहेरच्या तज्ज्ञांनी युकॅलिप्टस आणि अजून काही प्लांट्सची जमिनीतून सोने शोषून घेण्याची क्षमता सिद्ध केलीय तशी आपली तज्ज्ञांनी आयुर्वेदातील सगळ्या नाही तर काही प्रमुख वनस्पतींच्यावर सखोल शोध घेऊन नवीन माहिती गोळा केल्यास औषधीशास्त्राला बराच उपयोग होईल.

Android वर अक्षता ह्यांचे तुळशीचे फोटो दिसत नाहीयेत.
जिद्दी ने टाकलेले सगळे फोटो मात्र दिसत आहेत
Chrome वर देखील हाच प्रॉब्लेम

तुळशीचे बी पेरायची काय पद्धत आहे? त्यातूनही रोप येईल ना? (उन्हाळ्यात बरं म्हणून घरी तुळशीचे बी आणलेले आहे.) आणि ऊन चांगलं हवं म्हणजे दुपारचं कडकडीत ऊन की अकरापर्यंत येणारं माफक ऊन पुरेसं असतं? आमची तुळस म्हणावी तितकी फोफावत नाही, खत घरचंच कंपोस्ट घालते पण उन्हाचं तंत्र काय ते माहीत नाही,म्हणून विचारले.