हर्‍याकाका

Submitted by दाद on 12 December, 2007 - 20:15

'वाजे नभी चौघड्डा.... धडधड्डा.....
वाजे नभी .... हा हा... वाजे नभी हा हा... वाजे नभी... चौघड्डा!'

अरे पळा.... असं म्हणायच्याही आधी आम्ही गुल्ल व्हायचो...
साधारणपणे रस्त्याच्या कोपयावरूनच हर्‍याकाकाचा आवाज यायचा. कुठेतरी बंगल्याच्या फाटकापाशी त्याची ती 'हा हा' ची तिहाई सुरू व्हायची आणि शेवटच्या चौघड्याला दारावर दणका बसायचा, दार बंद असलं तर. बहुतेकदा पळण्यापूर्वी आमच्याचपैकी कुणीतरी दार पटकन उघडून सटकन पळ काढलेला असायचा.

माझे आजोबा व्हरांड्यात खुर्चीवर बसलेले असले तर मात्र अगदी ठ्ठ्या लावून नाही पण तारसप्तकातच 'काय, मालsssssक!' अशी हाळी घालायचा आपल्या वडलांना. सगळ्यात मोठ्या आत्येसकट सगळे त्यांना बाबा म्हणायचे....
हयाकाका?.... बिनदिक्कत 'मालsssssक'!

आजोबा नुसतच हातातली काठी उचलून स्वीकार करायचे आणि आपलं चघळणं चालू ठेवायचे. आजोबा टोपलीत गहू पेरून त्याचं गवत रोज सकाळी चघळायचे, आम्हीही त्यांच्या बरोबर अगदी अख्खी पेंडी नाही पण घास घास (??) चघळलाय. आजोबांच्या तोंडाकडे बघत आम्ही दोन माकडी पोरं लयीत त्यांच्या बरोबर रवंथ करायचो.
"रवंथ?" एव्हढच शब्दात विचारून मग त्या रवंथाच्या लयीत मान हलवत हर्‍याकाका घरात जायचा.
हा शब्द त्या वयात मला काकाकडूनच कळला पण अर्थ आईकडून. कारण एकदा आईने विचारल्यावर 'आजोबा रवंथ करतायत' असं सांगितल्याने मी फटका खाल्ला होता, ते आठवतय व्यवस्थीत.

माझ्या एका चुलत भावाचं बरेच वर्षं 'ट, ठ, ड, ढ, ण' चं 'त, थ, द ध, न' व्हायचं. तो आजूबाजूला दिसलाच तर काका म्हणायचा, 'गोट्या, घोडा म्हण, घोssssड्डाsssss'. एव्हाना काकाला नुसता सापडल्यानेच मुळात गोट्या, 'गोत्या' खायच्या गतीला. त्यामुळे पुढे पुढे व्यवस्थीत 'ड' म्हणता येऊनही हर्‍याकाकाने विचारलं की तो 'घोदा'च म्हणायचा'.

हर्‍याकाका म्हणजे उंच सहा फूट. 'गडी अंगाने उभा नि आडवा' सुद्धा. कमावलेलं शरीर आणि राखलेली तब्येत अन "मिजाज". भेदक डोळे. झुबकेदार मिशा आणि भुवया सुद्धा. वाघ डुरकावल्या सारखा नॊर्मल बोलण्याचा आवाज.... चिडला की, डरकाळ्या, हसताना साताच्या वरचे मजले आणि त्याला कुजबुजत बोलताना कुणी ऐकल्याचंन सांगत नाहीत.

हाताची घट्ट घडी, मान तिरकी, डोळे मिटलेले.... वर्षाच्या बारक्या पोरापासून मोठ्ठ्यांपर्यंत कुणाचही बोलणं तो ह्या पोजमध्ये ऐकत असे. हीच पोज रेडिओ-टीव्हीच्या बातम्या ऐकतानासुद्धा. त्यांना काका दिसायचा नाही म्हणून.... नाहीतर त्यांना ही पुढची बातमी सुचली नसती... अगदी वाचायलाही.

'वैनी, वैनी (उच्चारी वैने).... चहा टाक', हे शर्टाची वरची बटणं सोडत
'चिमे, पाणी आण. धावत जा आणि उडत ये, पळ्ळ', हे पँटचा पट्टा सैल करत
'कसली रे वीज तुमच्याकडे.... आमच्याकडे काय येतेय....', हे पंखा लावत.
मला तरी त्यावेळी वीज ही पाण्यासारखीच पण वायरमधून येते आणि काकाकडच्या वायर्स मोठ्ठ्या मोठ्ठ्या जाड आहेत असंच वाटायचं. त्याच्या घरातल्या त्या जाड जाड, खूप वीज ओतणार्‍या वायरी आम्हाला दिसायच्या नाहीत त्यामुळे जोरात पाणी यायला शेजारच्यांनी चोरून मोठ्ठा पाईप आणि पंप लावलाय ना, तशा त्या वायर्स काकाने माळ्यावर ठेवल्यात आणि रात्री वगैरे वापरत असणार असलं कायतरी वाटायचं.

मी, छानपैकी जपून पावलं टाकीत, न सांडवता पाणी आणुन दिलं की, 'चिमा काय कामाची' असा शेरा ही मिळायचा.

'वैनी, जेवायला काय केलय आज?' हे त्याला विचारायला लागायचच नाही. आईने तोपर्यंत केलेली छानशी भाजी, किंवा खास आमटी यातलं त्याच्यासाठी काढून ठेवलेलं गरम करून आणलेलं असायचं. आई त्याला 'काकबळी' म्हणायची, काकाच्या मागे.
बाबा आणि त्यांचं कुटुंब वसईकडलं. पण माझ्या आईसकट तमाम 'काक्या' कोकणातल्या. खास मालवणी पद्धतीचं तिरफळं वगैरे घालून केलेलं माशाचं धबधबीत, मिटक्या मारत, बोटं चाटत खातानासुद्धा "कोकण्यांचा" उद्धार चालायचा. आईसुद्धा जशास तशी उत्तरं द्यायची. पण हे सगळं अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हं.

हा माझा धाकटा काका. प्रचंड प्रेमळ. पण त्याचं प्रेम करण्याची पद्धत 'अनावर' होती, अस्वलाने गुदगुल्या करण्यासारखी. मला आठवतं ते म्हणजे काका 'सँडो' ची पोज घेऊन दोन्ही हाताच्या दंड-बेडकुळ्या फुगवून उभा आहे. दोन्ही बाजूला आम्ही दोन दोन पोरं लोंबकाळतो आणि काका आम्हाला गर गर फिरवतोय. मग वेग अनावर होऊन, किंवा आमच्याच हाताची पकड सुटून आमच्यापैकी कुणीतरी फेकलं जातं (बरेचदा मीच). मग आमची रडारड. आजोबांकडून काकाला ओरडा. 'कसली तुझी लेचीपेची पोरं' असा काकाकडून आईला अहेर. 'कोकणी नाहीत बहुतेक वसईकर झालीत', असा आईकडून काकाला उलट.

खरतर मला आठवतय तितकं तरी, आमच्यापैकी कुणीच काकाकडून मार वगैरे खाल्लेल्ला नाही. तरीही त्याचे इतर पराक्रम ऐकून जरा टरकूनच असायचो. त्यामुळे 'काकाला सांगेन' एव्ह्ढंच पुरायचं.

त्याच्या लहानपणीचे उद्योग म्हणजे कहरच म्हटले पाहिजेत. ते ऐकले की, सगळ्यात जास्त मार त्याने खाल्लाय हे सांगायलाच लागलं नसतं.
घरात झोपलेल्या बहिणींच्या, एकमेकींच्या वेण्या बांधून ठेवणे, गावातल्या गाढवांच्या शेपटाला डब्यांची माळ बांधणे, सायकलच्या पंपाने सायकल सोडून अजून कशाकशात हवा भरता येते, ते तपासण्यासाठी बाजूच्या एका मुलाला नको त्या प्रयोगासाठी तयार करणे (मग प्रयोग आणि पुढचं सगळं), लोकांच्या बागेतले चोरून कैया, जांभ, पेरू खाणे इ.
होळीला लाकूड देतो असं सांगून एका वखारवाल्याने हा आणि ह्याच्या गँग कडून वखार साफ करून घेतली मग दिली गचांडी. त्या होळीला त्या वखारवाल्याच्या डमीची प्रेतयात्रा कढली. गावा बाहेरच्या मैदानात आधी डमी जाळली, मग गावच्या होळीला त्याच्या नावाने बोंबा आणि मग बाकी उरलेला नेहमीचा आरडाओरडा. म्हटलं तर सरळ पण म्हटलं तर फुरशासारखा तिरका. ज्याला विपरित धंदे म्हणता येतील असले धंदे असायचे बहुतेक.

जरा मोठा झाल्यावर, स्वातंत्र्याच्या लढ्यात पत्रकं वाटणे, प्रभात फेर्‍या असली एकदम जबरदस्त 'कार्य'. आणीबाणीच्या काळातही त्याचा हा उद्योग बघितलाय.
शिवाय मग रेल्वे लाईनच्या पलिकडल्या, वेस्टच्या कुणातरी पोराने आपल्या भागातल्या मुलीची छेड काढली म्हणताना, पाच-दहा पोर घेऊन त्यांच्या "मोहोल्ल्यात" जाऊन धुडगूस घालून धडा शिकवून येणे ('राडा' हा शब्दं तेव्हा पहिल्यांदा ऐकला होता), गावात श्रमदान करून जिमखाना बांधण्याच्या वेळी गावातल्या समस्त तरूण आणि तरूणींना गोळा करून श्रमदान करायला लावणॆ, स्वत:ही बेदम काम केलय म्हणा. सगळ्या गावातल्या पोरांना जिमखान्यात, खेळात घालण्याचा, पोहणे शिकवण्याचा वगैरे मक्ता घेणे असली फुटकळ विधायक कामं.

पोहण्यावरून एक अतिशय मजेशीर (आता मजेशीर) आठवण येतेय. मी साताठ वर्षांची असेन. माझ्याबरोबरच्या सगळ्या पुतणे, भाचरंडं यांना पोहणी शिकवून झाली होती. मी कशीतरी सुटले होते. त्यावर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत काकाने 'चिमे चल, असशील तश्शी....' म्हणून हाळी घातली.
त्याच्यासाठी रस्त्यावर थांबलेली वानरसेना, त्यांच्या हातातले टॊवेल्स वगैरे बघून मी 'अभ्यास आहे रे खूप.....' मधला 'अ' सुद्धा म्हणायच्या आधीच काकाने बखोटीला धरून उचलून काखोटीला मारली होती-अख्खी मी आणि दारवरचा टॊवेलही.
आई ओरडली बहुतेक, 'अरे जपून रे. वेडवाकडं फेकू नकोस.... पोरीची जात...'
आईचं पुढलं वाक्य तिलाच ऐकू आलं की नाही कोणास ठाऊक कारण मी प्रच्चंड मोठ्ठं भोकांड पसरलं होतं. मला पाण्याची अतिशय भिती वाटायची.

विहीर! हो! विहीरीवर शिकवायचा तो, जवळच होती घरापासून. मी त्याच्या पाठीत वगैरे मारलेल्या बुक्क्या, झाडलेल्या लाथा वगैरेचा काहीही परिणाम झाला नाही. काकाला सवय होती असल्या नाटकांची. तिथे पोचल्यावर सगळ्यात आधी त्याने मला विहिरीत फेकून दिली आणि मागोमाग आपण उडी घेतली.
विहिरीच्यां हिरव्यां काळ्यां पाण्यातून मी वरती तोंड काढल्याचं आठवतं. वर बघितलं तर सगळी माकडं डोकावून बघत होती. परत डोकं आत जाणार, इतक्यात काकाचा दणकट हात आला आधाराला.

जरा श्वास घेता आल्यावर मी परत रडायला सुरूवात केली. मला अजून अगदी व्यवस्थीत आठवतय, 'देवा मी खोटं बोलणार नाही, पाप करणार नाही, आई-बाबांचं ऐकेन.... मला वाचव.....' असल्या दारूण भाषेत करूणा भाकणं चालू होत. ते सुद्धा देव, विहिरीच्या बाहेर दोन-तीन मैलाच्या परिघात कुठेही असला तरी ऐकू जाईल एव्हढ्या जोरात!

सगळी पोरं हसतायत. काका ओरडतोय, 'इथे हर्‍याकाका आहे. काय बिशाद तुझ्या बापाची सुद्धा यायची? आ? देवसुदधा येणार नाही आता. हात मारायला सुरूवात कर नाहीतर हात काढून घेतो पोटाखालचा...'
मला अजून चिडवतात सगळी चुलत, आत्त्ये भावंड माझ्या त्या 'देवा मला वाचव...' भोकांडावरून.

त्याच्या तरूण वयात त्याने केलेले 'उद्योग', जे आम्हाला सांगण्यासारखे होते, ते.... प्रचंड धडाडी आणि विनोदी. आम्हालातरी काका अतिशय शूर वाटायचा.
जिमखान्यात बसणाया सार्वजनिक गणपतीच्या कार्यक्रमावरून झालेल्या भांडणात एका श्रीमंत, आढ्यताखोर वकिलांशी वैर जोडलं. मग त्यांना छळण्याच्या विविध प्रकारात, कोलंबीची सालं पिशवीत बांधून पिशवी त्यांच्या कौलावर चढून कौलं काढून त्यात कुठेतरी लपवली. त्या अंडीही न खाणाया घरातल्यांचं काय झालं असेल ते कल्पना करवत नाही.

आमच्या घरामागे एक छान मैदान होतं. त्यापलिकडे काही बिल्डिंग्स आणि त्यापलिकडे मोठ्ठा वहाता रस्ता. तसाच वाहता रस्ता आमच्या घरासमोरही. त्या मागच्या रस्त्याच्या पलिकडे एक छोटेखानी इंडस्ट्रीयल वसाहत होती. छोटे कारखाने आणि बैठी चाळवजा घरं.

त्यापैकी एका घरात कुणी ड्रग्स डीलर पोलिसांपासून लपून रहात होता म्हणे. त्यावर पोलीसांनी पाळत ठेवली होती. एक दिवस त्याला कन्फ़्रंट केल्यावर तो हातात चाकू घेऊन पळाला, आणि त्याच्यामागे पोलीस. ते मैदान पार करून तो घरामागची भिंत एका उडीत ओलांडून आमच्या अंगणात शिरला. पुढच्या गेटमधून त्याने मुसंडी मारायला आणि हर्‍याकाकाची 'वाजे नभी' ची तिहाई यायला एक गाठ. त्याचा हर्‍याकाकाला धक्का लागला, जोरात. हर्‍याकाकाने आपला नेहमीचा 'दादागिरीचा' आवाज काढल्यावर त्याने चाकू दाखवला.

काकाचा आटा सरकलाच असणार जबरदस्त, असं माझ्या भावाचं मत. कारण अतिशय संतापून 'चाकू कोणाला दाखवतो रे? आ? आ? xxxxxxx?' करत काकाने त्याच्या कानफटीत एव्हढ्या जोरात लगावली की तो नुसताच खाली पडला नाही, तर त्याला भोवळ आली. त्याला असलं काही अपेक्षितच नसावं बहुतेक.

काही मिनिटांतच मागची भिंत कशीतरी ओलांडून वगैरे, आणि पुढच्या रस्त्यावरूनही पोलीस आले, दोन्ही बाजूंनी! गाड्यांतून, शिट्ट्या वाजवत, काही साध्या वेषात, दोघांच्या हातात बंदुकी, बाकीचे नुसतेच दंडुके सावरत.... नुसता गोंधळ आमच्या दारात!

कहर म्हणजे, 'कसले तुमचे फडतुस चोर.... उचला साल्याला' असं म्हणून काकाने त्यालाच नाही तर पोलिसांनाही लाजेने मान खाली घालायला लावली.

एकदा बाबांना हॊस्पिटलमध्ये ठेवलं होतं कसल्याशा ऒपरेशननंतर. डिस्चार्ज द्यायच्या दिवशी हर्‍याकाका आईला घेऊन बाबांना आणायला गाडी घेऊन निघाला. नाही म्हटलं तरी बरोबर बरेच पैसे होते, आईच्या गळ्यातलं, बांगड्या असलं नेहमीचं होतच. मधल्या एका गल्लीत चाकाखाली काहीतरी खण्णकन वाजलं आणि फुटपाथवरची पोरं 'अरे, गाडी को क्या हुआ, दे खो देखो...' असलं ओरडली. काकाने गाडी बाजूला घेतली. कोपयावरच्याच गराजमधून मवाली दिसणारी दोन पोरं आली.

काका, आईला गाडीत सोडून गाडीबाहेरही उतरायला तयार नव्हता. त्यांनीच गाडीखाली बघून 'कुच लीक हो रहा है, गाडी गराज को लेलो साब, अब्बी देखता है.' म्हटलं आणि त्यांच्यातला एक काकाच्या बाजूला येऊन बसलाही. समोरच्या सीटवर बाबांचे क्रचेस ठेवल्याने आई मागे बसली होती.

गाडीत बसताच त्याने मोठ्ठा स्क्रूड्राईव्हर काकाच्या बगलेत खुपसून धरला आणि म्हणाला 'ज्यादा आवाज नय मंगताय. अब्बी गाडी गराजको लो'. आईने हे बघितलं पण काहीच करू शकेना.

'देखो, जो है वो लेलो. लेकिन किसिको हात नय लगानेका. पैले ये दरवाजा ठीकसे बंद करने दे...." असं म्हणून आईकडे वळून म्हणाला, 'वैनी, गळ्यातलं, बांगड्या ह्या रुमालात काढून ठेव....' हे बोलत बोलत काका त्या गुंडाच्या बाजूचा दरवाजा नीट बंद करायला वाकला.
त्या बावळट गुंडाने मागे आई काय करतेय ते बघत हर्‍याकाकाला ते करू दिलं.
काकाने खरतर नीट बंद झालेला दरवाजा हलकेच उघडला होता. त्याच्या गाडीची ही ट्रिक त्यालाच ठाऊक.

'कितनी दूर है गराज?' असं म्हणून काकाने गाडी सुरू केली. आणि पहिल्याच क्रॊसिंगला तो, 'यहा लेफ़्ट टर्न लेलो...' वगैरे सांगत असताना, अतिशय जोरात ऍक्सिलरेट केली. त्याचवेळी त्याला धक्काही मारला. दरवाजा उघडला जाऊन तो बाहेर फेकला गेला.

हे सगळं झाल्यावरही आईला शांत केलं, बाबांना काही कळू न देता, घरी व्यवस्थित आणून सोडलं.
या झटापटीत काकाला स्क्रूड्रायव्हर बगलेत लागलाच होता. घरी आल्यावर आईला म्हणाला 'वैने, तुमची ती कोकणी हळद-आंबेहळद, तिखट, काय तरी आण. मगासच्या भानगडीत लागलय बहुतेक, थोडं'

आई बघत्ये तर चांगली बोटभर जखम होती. तेव्हातर कोसळलीच पण आम्हाला नंतर हे सांगतानाही कातर झाली होती. त्याला मारुतीराया म्हणाली!

*****************************************************************************************************
आमच्या घरी गोकुळाष्टमीचा मोठ्ठा कार्यक्रम व्हायचा. कृष्णाची पुजा, कृष्णजन्माची गाणी वगैरे व्हायची. सगळे नातेवाईक जमायचे. कांदेपोहे, काळ्या वाटाण्यांची गरम मसाल्याची उसळ, नारायणदास लाडू आणि जायफळ घातलेली घट्ट कॊफी असा बेत, वर्षानुवर्षं.

घरातले सगळेच काहीना काही वाजवणारे, गाणारे, गमत्ये होत्ये. थोडा गरबा, काही नकला वगैरे कार्यक्रम व्हायचे. सामुहिक गाणी व्हायची. 'काय कराल ते सगळ्यांनी मिळून करा, रे' ह्या त्याच्या दरडावणीचा अतिरेक म्हणजे मग 'प्रिया आज माझी नसे साथ द्याया' सारखं गाणं कुणी नुकता कॊलेजात जाऊ लागलेला सुरू करायचा किंवा पालथी मांडी घालून बांगडीशी चाळा करीत एखाद्या नवीन वहिनीने किनर्‍या कापया आवाजात 'उठी गोविंदा उठी गोपाळा' सुरू केलेलं असायचं. पण दुसर्‍या कडव्या पर्यंत त्यांचं समरगीत झालेलं असायचं.

एकाचवेळी चाळीस-बेचाळीसजणांनी एकसाथ म्हणायचं मग कोणत्याही गाण्याची कव्वाली नाही तर भजन होणारच.

आमची जराजरी पुळपुळीत गाणी सुरू झाली की हा एकदम सुरसुरी येऊन, 'जय जय महाराष्ट्र माझा', 'जय हिंद हिंद आनंद भुवन जय भारत वर्षं महान', असली गाणी सुरू करायचा. अगदीच नाही तर 'गोविनंदा आला रे आ ला जरा मटकी संभाल ब्रिज बाला' सुरू करायचा. एकदा का तो बाल्या ठेका सुरू झाला की वय मानाचा विचार नकरता प्रत्येक जण उठून नाचायला लागायचा. आमच्यातले वाजवणारेही नव्याने कार्यक्रम सुरू झाल्यासारखे दात-ओठ खाऊन बडवायचे.

पुढे 'एक दोन तीन चार हर्‍याकाकाची पोरं हुश्शार' ला जागा असलेलं आमच्यातलं प्रत्येकजण खच्चून ओरडायचा. ह्या गाण्याचे खरे शब्द अजूनही आम्हाला माहीत नाहीत... गरजही वाटत नाही.
पेंगत असलेली बिट्टी पोरंही तरतरून उठायची.

कॊफीचं आधण उतरायला किंवा पोहे ढवळायला आत गेलेला काका मध्येच येऊन खांद्यावरचं फडकं, हातातला डाव, झारा बॅटनसारखा नाचवत समुहगीत चालू करून देऊन जायचा.
'तुझ्या कामामधून तुझा घामामधून उद्या पिकल सोन्याचं रान
चल उचल हत्त्यार गड्या होऊन हुश्शार तुला नव्या जगाची आण'

असल्या गाण्यांच्या त्याने सांगितलेल्या ओळींपलिकडे कुणालाच काहीही यायचं नाही. मग आत काय ते ढवळून-बिवळून तो परत येईपर्यंत आम्ही सगळे हुश्शार गडी सोन्याचं रान पिकवत बसायचो, त्याच दोन ओळी घोटत. एकदा तो असाच बाहेर कॉफीचा जग भरून घेऊन आला होता 'तुला नव्या जगाची आण....' करीत. आम्ही सगळे हसून लोळलो होतो.... त्यात आणि त्याला कळलच नाही शेवटपर्यंत काय झालं ते!

काकीचा हात धरून 'गल्यान साकली सोन्याची ही पोरी कोनाची' हे काका अतिशय भसाड्या आवाजात म्हणातोय, काकी लाजून कोळ झालीये, काकाचा त्याच्यामते 'बॉलडांस' सुरू असायचा. काका-काकी ठरवूनही एकाचवेळी सारख्या बाजूला वळायचे नाहीत. इथे आमची हसून हसून पोटं दुखायला आलेली.

जरा मोठे झाल्यावर कॅसेट्स लावून आम्हा पोरांचा धागडधिंगा सुरू झाला. आम्हाला जरा बॉलीवूड स्टाईलमध्ये नाचताना पाहून त्याने एकदा 'थांबा तुम्हाला आमच्या वेळचा इंग्रजी नाच दाखवतो म्हणून...... गाणं म्हणायला सुरूवात केली. आम्ही एका बाजूला उभे, काही जण खाता खाता, कॉफी पिता पिता थांबलेले, काकी तिसरीचकडे बघत इथे न बघण्याच्या प्रयत्नात.
'आओ ठ्ठिस्स करे'
त्याचं "ट्विस्ट" बघून समस्तांच्या नाकातून कॉफीचे फवारे उडले होते.

अजूनही इतक्या अनेक वर्षांनंतरही आम्ही काकाच्या त्या ट्विस्टची आठवण करून देताना आजूबाजूला कुणी काही खात-पीत नाहीत याची काळजी घेतो, असलेच तर छत्र्या उघडायचीच पाळी.

****************************************************************************************
माझं लग्न झालं. दूर रहायला गेले. मग प्रसंगा प्रसंगाने नुसतच येणं जाणं राहिलं. पूर्वी सारख्या ट्रिप्स वगैरे व्हायच्या नाहीत. 'भेटलीयेस हल्ली? हयाकाका निवळलाय' वगैरे ऐकलं की वाटायचं नकोच ते... आपल्याला आठवतोय तसाच असू दे....
लेकाच्या वेळी आईकडे होत्ये. घरातला पहिला नातू. सगळच पहिलं. कौतुकच कौतुक होतं. त्यामुळे माझी तब्येत जरा जास्तच सुधारली होती.
एक दिवस गर्जना झालीच, 'वैने, आता लाड पुरे. त्यांच्या ब्लॉकच्या दारातून जाईल काय ही आत?... उद्यापासून घर-आंगण झाडून घे'. वर आणखी मुकादमगिरी करायलाही हाजिर असायचा. तेव्हा परत एकदा तोच हया काका बघितला.

तेल-पाण्याला भलतिच भरभक्कम दिसणारी रखमाबाई यायची. नातू आपल्या सारखा अंगाने उभा आडवा असल्याचा त्याला प्रचंड आनंद झाला होता. तेव्हा काकाची रोज सकाळी फेरी असायची. मग त्या बाईला आपल्यामते हळू आवाजात सूचना.
हळू चोळा हा....
जपून.... अजून मान धरत नाहीये तो.
अजून तेल जिरवा बरं टाळूत... टाळू भरली पाहिजे... सगळ्यात नाजुक भाग तो....

मग आंघोळीला काढलेल्या पाण्यात आपलं स्वत:चं कोपर घालून... अजून विसाण आण वैने... भाजतय, मलाच. कोवळं किती अंग बाळाचं? त्याला इतकं गरम पाणी.... वगैरे!
बाळाच्या आंघोळीला आपल्यामते भरपूर जागा हवी म्हणून त्याने आमचं अख्खं बाथरूम "मोकळं" केलं होतं.... फळीवरचे इतरांचे साबण, शँपूच्या बाटल्या वगैरे सकट सगळं बाहेर!

बाथरूममध्ये पायावर बाळाला घेऊन रखमाबाईचं 'अले अले... ललू आलं का.. च्यला झालं... भूश्श... .'
त्याच्यावर आवाज काढून लेकाची सनई.... चुलत आजोबाचा वारसा!
रखमाबाईच्या मागे उभं राहून, वाकून बघत, त्या सगळ्याच्याही वरताण उच्च आवाजात बाळाला आंघोळ घालायच्या सूचना देत हर्‍याकाका.

मग जास्तं धूप नको, किती धूर, जोरात आवळून बांधू नका.... वगैरे वगैरे.... ती रखमाबाई खमकी म्हणूनच टिकली. तरी तिने आईला अल्टिमेटम दिला होताच, 'हे आजोबा रोज येणार असतिल तर....'
मग माझी आत्या, आई, बाबा त्याला डिंकाचा लाडू वगैरे खायला घालत बाहेरच अडकवायचा प्रयत्नं करायचे.

बाळाचं रासन्हाण वगैरे उरकल्यावर, 'आणा गुलामाला इकडे आणि आमच्या लेकीचं बघा' म्हणून कित्ती कित्ती हळूवारपणे घ्यायचा बाळाला.
मग गडबडीने, हळूवार हातांनी ते घट्ट बांधलेलं ते गाठोडं सैल करायचा. नातू काय, लगेचच हाताचे झेंडे बाहेर काढायचा. आपल्यामते हलक्या आवाजात, मृदू स्वरात 'ओ लो लो लो...' करीत बोबडं बोलणं चाललेलं ऐकू यायचं. एक दिवस आईने हळूच बघितलं तर नेहमीचं 'ओ लो लो लो...' सोडून 'कल हा कली धलिला शुभांगे' चाललं होतं.....

मला एकदम आजोंबांच्या शेवटच्या दिवसांची आठवण झाली.
आजोबा पंच्याण्णव वर्ष जगले. शेवटचे पंधरा-अठरा महिने अंथरुणातच होते. बेड-सोअर्स झाली होती. त्याचं ड्रेसिंग करायला दुसरे एक चुलत काका यायचे, त्यांना मदत करायला कधी कधी हर्‍याकाका असायचा. त्यांचं सगळं करताना हर्‍याकाका जे बोलायचा ते पाहून हा दुसराच कुणीतरी असल्यासारखा वाटायचा.

"वैने, आण मी पाजतो मालकांना चहा",
"बाबा, जरा पाय चेपून देऊ का?",
"बाबा, खूप दुखतय का? हळू हळू औषध लावतो, हा."
नेहमी त्याच्या डरकाळ्या ऐकायची सवय. असलं त्याचं मृदू बोलणं ऐकून आम्हाला त्यावेळी कसतरीच वाटायचं.

आजोबा गेले.
क्रियाकर्म वगैरे आटपून काका सगळ्यांबरोबर घरी आला. व्हरांड्यात जिथे आजोबा बसायचे तिथे कमरेवर हात घेऊन उगा-मुगा उभा राहिला.
कुठेतरी नजर लावून बघत शर्टाच्या बाहीने, पालथ्या मनगटाने डोळे पुसणारा हर्‍याकाका मला आमच्याच वयाचा एखादा मुलगा असावा तसा वाटला होता, .... फक्तं जरा दांडगट!

समाप्त.

गुलमोहर: 

अतीव सुंदर! नेहमीप्रमाणेच म्हणा ...... Happy

परागकण

किती सुरेख लिहिलय! आणि शेवटी डोळ्यांतून पाणी काढलं अगदी!!

नेहमीप्रमाणेच अगदी सुरेख... आवडलं.

-प्रिन्सेस...

खुपच सुरेख.... नेहमीप्रमाणेच Happy

माणुस आणि लिहिलय सुद्धा जबराच. Happy
नेमकेपणा म्हणतात तो हाच.
अशी एखादी व्यक्ती असावीच आपल्या संस्कारक्षम वयात त्याशिवाय व्यक्तिमत्वाला "अंगावर येइल ते शिंगावर घेवु" हा पैलु पडत नाही. Happy

दाद, अशी मायेची माणसं होती तुझी.. नो वंडर तुझे अनुभव, तुझी लेखणी इतकी सशक्त आहे! Happy
तू फक्त लिहित रहा!! Happy

'गडी अंगानी उभा नी आडवा' डोळ्यासमोर उभा राहीला. छानच वर्णन केलंयस.

"सायकलच्या पंपाने सायकल सोडून अजून कशाकशात हवा भरता येते, ते तपासण्यासाठी बाजूच्या एका मुलाला नको त्या प्रयोगासाठी तयार करणे (मग प्रयोग आणि पुढचं सगळं)," अगदिच ह. ह. पु. वा.

खुपच मस्त !!! एकदम पु.ल. च "व्यक्ति वल्ली"वाचत आहे अस वाटल.........

खुपच छान लिहिले आहे. शेवटी स्क्रिन धुसर झाला आहे.

दाद सम्रुद्ध लेखणि आहे तुझि... पु.लंच्या हरितात्यांचि आठवण झालि...

एक दिवस आईने हळूच बघितलं तर नेहमीचं 'ओ लो लो लो...' सोडून 'कल हा कली धलिला शुभांगे' चाललं होतं.....

.....मला एकदम आजोंबांच्या शेवटच्या दिवसांची आठवण झाली.

या दोन ओळींमध्ये थोडा तुकडा मोडल्यासारखा वाटला.... म्हणजे मी इतकी छान बाळाला खेळवत होते आणि तु एकदम आजोबांकडे घेउन गेलीस सिरीयस नोटवर
पण तरीही माझी आधीची प्रतिक्रिया कायम आहेच Happy
मला खरतर व्हाईट फोन्ट मध्ये हे टाकायच होत पण माहित नाही कसे टाकतात ते.... sorry Sad

नेहमीप्रमाणेच उच्च!!

वाचताना कित्येक वेळा खदाखदा हसले तर शेवटी खरचच पाणि आलं डोळ्यात.

लिखते रहो रे!

दाद, शब्द संपदेबरोबरच अनुभवांची शिदोरीही भरगच्च आहे तुझी. डोळ्यासमोरच उभा केलास हर्याकाका. पु. लं. ची खरच आवर्जुन आठवण होते.

मलाही पोहायला शिकवायला माझे आजोबा, मामा आणि नागा म्हणुन एक गडी होता त्यांनी शर्थ केलेली आठवली. पोहायचे नाही म्हणुन चार मैल पळत सुटले होते, शेतातुन मेन रोडपर्यन्त. शेवटी शिकलेतर नाहीच, शिकायला पाहीजे होते.

अतिशय सु.न्दर... नाव बघुनच मला पुल.न्च्या "हरितात्या.न्चि" आठवण झालि होती,त्याच्याच तोडिस तोड लिहिलय... अप्रतिम...

दाद, खुप छान लिहिलयस. खरच आवडल. अगदी डोळ्यासमोर सगळ घडतय असं वाटलं वाचताना.

खास!!!दाद टच असलेले सुरेख व्यक्ती चित्र..
आजोळ आले डोळ्यासमोर ,
मी सुध्दा अजोबांसोबत विहिरीत पोहायला शिकली. (आज तो छंद इथे indoor sweemming pool मध्ये भागवावा लागतोय )
सगळ वाचुन लिहावेसे वाटायला लागलेय.

दाद जबरी ( हे लिहायची आवशक्ताच नाही आता).
हर्‍या काका चे वाचुन मला माझा नारायण काका आठवला. तो ही असाच आडदांड आहे. दिसायला मात्र एकदम धर्मेंद्र. आता ६७/६८ वर्षाचा आहे पण अजुनही सलग १०० डिप्स करु शकतो. सलग १००० करायचा म्हने. ६५ च्या युध्दात पाकड्यांनी मारलेली गोळीची जखम दाखवतो व वर त्याला कसा मारला हे पण सांगतो. ( तो मिलट्रीत जॉईन होन्यासाठी घरातुन पळुन गेला होता आधीचे दोघेही मिल्ट्री मध्ये होते त्यामुळे त्याला परवानगी दिली न्हवती. )
अगदी स्सेम जोरात बोलन अन मोकळाचाकळा. त्याचावर एखादा लेखच लिहायची उर्मी आली आहे. आज त्याला कॉल करावाच लागनार.

thanks heaps रे. आवडलं म्हणायच तर. काका आहेच तसला, भन्नाट.
ह्या काकाचं नाव बदललय फक्त. काका आता सत्तरीच्या जवळपास आलाय. अजून त्याला बघणारा तिरका जाताना विचार करेल. पण काका खरच मवाळलाय. माझ्याकडे सिडनीला येऊन गेला तेव्हा सकाळी चहाआधी गुरूचरित्र वाचायला बसला, तेव्हाच ओळखलं.
लेकाने जाम धमाल केली तो होता तेव्हा. काय काय शिकला त्याच्याकडे. मराठीतल्या शिव्यांसकट. (इफेक्ट उलटवायला वर्ष जावी लागली).
लेकाने त्याला इंटर्नेट दाखवलन. काकाकडे बघून माऊस हलवायला आणि योग्य लिंन्क वर क्लिक करायला किती concentration लागू शकतं ते कळलं. जीभ बाहेर काढून, मान वाकडी करून, डोळे बारिक करून शेवटी माऊस पोझिशन करून काकाने मारलेली (हा त्याचाच शब्द) क्लिक खोली ओलांडून ऐकू यायची. मग त्याचं आणि लेकाचं 'हुर्रे....'.

हर्‍याकाका ,
मस्तच व्यक्तीरेखा आणि रेखाटन पण मस्तच.
>>काकाकडे बघून माऊस हलवायला आणि योग्य लिंन्क वर क्लिक करायला किती concentration लागू शकतं ते कळलं. जीभ बाहेर काढून, मान वाकडी करून, डोळे बारिक करून शेवटी माऊस पोझिशन करून काकाने मारलेली (हा त्याचाच शब्द) क्लिक खोली ओलांडून ऐकू यायची. मग त्याचं आणि लेकाचं 'हुर्रे....'.
>> खी खी खी......

दाद्,खूपच सुंदर.. कुणीतरी म्हट्लय तसं पुलंची आठवण होते.... मात्र हर्‍याकाका केवळ पात्र नसून एक माणूस आहे हे वाचून बरंच वाटलं!

दाद, किती सुरेख लिहिले आहेस गं! अगदि डोळ्यासमोर आला हर्‍याकाका... पोलादि व्यक्तिमत्व आणि हळुवार मन...
अजुन काही आठवणी असतील तर प्लिज लिहा नं!

दाद. कसलं लिहितेस गं तू. खरंच खूपच छान. Happy

अप्रतिम! दाद द्यायला शब्द्च अपुरे पडत आहेत. फारच मस्त जमलेय. पुढील लिखाणाची उत्सुकतेने वाट पहातोय.

कितीही ऊशीर झाला तरी प्रतिक्रिया दिल्याशिवाय चैन पडत नाही....
कुठुन आणतेस हे सगळ?
तुझ्या आईचं आणि काकाचं नातं वाचुन अस वाटल, आपल्यालाहिइ असा एखादा दिर हवा---आपल्यालाही मोकळ वागु देणारा--नाहीतर आपणच अस व्हावं.
शेवटी धुसर झाली स्क्रीन.

छान! आवडला तुमचा हर्‍या काका. भाग्यवान जिव आहात तुम्हि, मायेची माणसं आणि सुंदर बालपण.

मस्त वाटले वाचून.
>>>सायकलच्या पंपाने सायकल सोडून अजून कशाकशात हवा भरता येते, ते तपासण्यासाठी बाजूच्या एका मुलाला नको त्या प्रयोगासाठी तयार करणे (मग प्रयोग आणि पुढचं सगळं)<<<
हे तर माझ्या मावसभावाने एकदम सेम केलेला प्रयोग आठवला उन्हाळ्यात गावी गेलो असताना... अतिशय वार्त्य १०-१२ वर्षाच्या मावसभांवडाने एकाला शोधले व तो त्याच्या कूल्या* घुसवणार इतक्यात मावशीने बघितला म्हणून वाचला तो शेजारचा मुलगा. फेमस आहे हा प्रकार वाटतो दांडगट मुलांच्याबाबतीत. Happy

जरा श्वास घेता आल्यावर मी परत रडायला सुरूवात केली. मला अजून अगदी व्यवस्थीत आठवतय, 'देवा मी खोटं बोलणार नाही, पाप करणार नाही, आई-बाबांचं ऐकेन.... मला वाचव.....' असल्या दारूण भाषेत करूणा भाकणं चालू होत. ते सुद्धा देव, विहिरीच्या बाहेर दोन-तीन मैलाच्या परिघात कुठेही असला तरी ऐकू जाईल एव्हढ्या जोरात! >>>
तू लहानपणी एवढी विनोदी असशील याची कल्पनाच केली नव्हती.
पूर्ण जमलेलं व्यक्तिचित्रण. हसून हसून पुरेवाट झाली.
हे काका सिडनेला आल्यावर काय काय धमाल केली याचे जरा सविस्तर वर्णन कर बरं पुढच्या लेखात, आता ते अगदी थोडंस लिहिल्यामुळे तोंड काय डोळ्यांना जरा खवळल्यासारखं झालंय.
काकांना शिरसाष्टांग नमस्कार सांगणे.

Pages