दिल का भंवर करे पुकार प्यार का राग सुनो…

Submitted by अतुल ठाकुर on 27 March, 2020 - 22:59

hqdefault_9.jpg

कुतुबमिनारमध्ये दरवळलेला रफीचा स्वर, त्याला हसरत जयपुरीचे शब्द आणि एसडीचे संगीत. त्यातच पडद्यावर दिसते कोण तर साक्षात देव आनंद आणि नूतन. १९६३ साली आलेल्या “तेरे घरके सामने” मधले “दिल का भंवर करे पुकार” नेहेमीच आवडायचे. जेव्हा पाहिले तेव्हा त्यातले वेगळेपण आणखी जाणवले. बाकी गोल्डी आनंद साहेब जेव्हा काही दिग्दर्शित करतात तेव्हा त्यात काहीन काहीतरी वेगळेपणा असतो एक आमचे एक निरिक्षण. नाहीतर कुतुबमिनारच्या (असं म्हणतात तो सेट लावला होता) आतल्या अरूंद चिंचोळ्या भागात आमचा मदन देव आनंद आणि रती नूतन यांना नेऊन रफीचे गाणे तेथे छायाचित्रित करण्याची कल्पना कुणाच्या डोक्यात येणार? आणि कसल्याही तर्काचा आगापिछा नसलेले आमचे दुसरे निरिक्षण म्हणजे गोल्डीच्या दिग्दर्शनात नायिका कसलिशी जादू होऊन आणखीनच आकर्षक भासतात. एक सुरेल चाल असलेले गाणे, पायर्‍यांच्या वर सुरु होते. पायर्‍या उतरताना नायक आपल्या मनीचे गुज सांगतो आणि पायर्‍या संपताना गाणेही संपते. या साध्याशा वाटणार्‍या घटनेत सर्वांनी चमत्कार केले आहेत.

एसडीची मान डोलायला लावणारी चाल आणि त्यासाठी विजय आनंदने निवडलेला कुतुबमिनारचा आंतरभाग. एसडीने दिलेली चाल नायक नायिकांच्या पाय उतरण्याच्या तालाशी चपखल जुळली आहे. कधी कधी मला हा प्रश्न पडतो विजय आनंदने आधी आपल्याला अशा तर्‍हेने गाणे चित्रित करायचे आहे हे एसडीला सांगितलं असेल की एसडीची चाल ऐकून विजय आनंदला असे चित्रिकरण करण्याची कल्पना सुचली असेल? “दिल का भंवर सुरु होते” आणि दिसते ते एकमेकांच्या प्रेमात पार गुरफटून गेलेले जोडपे. तिला त्याने केलेली स्तुती खुप हवीहवीशी वाटते. पण ती त्याच्यावर अनुरक्त झाली आहे हे ही तिला दाखवायचे नाही. त्यामुळे प्रियकराने केलेल्या स्तुतीचा स्विकार, त्यामुळे झालेला आनंद तर नूतनने चेहर्‍यावर दाखवलेला आहेच. पण त्याचवेळी ती स्वामिनी आहे. या स्तुतीने ती वाहून गेलेली नाही हेही तिला दाखवायचे आहे. ही कसरत नूतनच करु जाणे. तिने तिच्या चालण्यात, हळूच तिरपे पाहण्यात हे सारे भाव दाखवले आहेत. संपूर्ण गाण्यात नूतनच्या चेहर्‍यावर लोभस हसु सतत दिसत राहते.

“दिल का भंवर” म्हणताना देव आनंदचाच भुंगा झालेला आहे. कमळाच्या अवती भवती गुणगुणत फिरणारा आणि संध्याकाळ होताच त्यात अडकणारा.लाकूड फोडू शकणारा मात्र कमळाच्या कोमल पाकळ्यांसमोर हार मानणारा भुंगा. देवआनंदचे दिसणे, त्याचे मान हलवणे आणि त्याचे पायरी पायरीने खाली उतरणे सारेच आकर्षक. देवसाहेब हे फार सहजतेने करून जातात. त्यात रफीने त्याच्या शरीरात केलेला परकायाप्रवेश. एकेक शब्द अक्षरशः देवाअनंदच्या मुखातून उमटला आहे अशा तर्‍हेने रफी हे गीत गावून गेला आहे. अनेकदा गाणे ऐकताना रेडियोवर तीनच कडवी ऐकू येतात. गाणे पाहताना मात्र चौथे कडवेही ऐकायला पाहायला मिळते.

आप का ये आँचल, प्यार का ये बादल
फिर हमें ज़मीं पे ले चला
अब तो हाथ थाम लो, इक नज़र का जाम दो
इस नये सफ़र का वस्ता…

यात भरारणार्‍या वार्‍यासमोर हात पुढे करून हसतमुख नूतन उभी राहते आणि तिची ओढणी फडफडत देव आनंदच्या चेहर्‍यावर स्थिरावते. अशा भरारणार्‍या वार्‍यात आपल्या स्वामिनीचा “आंचल” प्यार का बादल बनून ज्याच्या मुखावर स्थिरावला “तेची पुरुष दैवाचे” हेच खरं.

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Repeat ?