रोज शाम आती थी मगर ऐसी ना थी…

Submitted by अतुल ठाकुर on 24 March, 2020 - 21:31

hqdefault_8.jpg

दोन देखणी माणसं पडद्यावर दिसतात. लताची जिवघेणी लकेर ऐकू येते..ला ला ला ला आणि सुरु होतं संध्याकाळच्या पार्श्वभूमीवरचं रोज शाम आती थी…खरं तर तिन्ही सांजेची वेळ तशीही हुरहुर लावणारी. त्यातच आकाशात संध्याकाळी झालेली रंगाची उधळण. अवतीभवती त्या रंगांशी स्पर्धा करणारी वनश्री, रंगीबेरंगी फुलं. आणि या सार्‍यांना पाठीशी घेऊन उभी राहीलेली ती टेकडी. त्या टेकडीवर जेव्हा तनुजासारखी सौंदर्यवती उभी राहते तेव्हा एक नक्की होतं ते म्हणजे इथे काहीतरी “क्लासिक” पाहायला ऐकायला मिळणार. काही माणसांचे सौंदर्य समोरच्याच्या मनात शालीन भावच निर्माण करतं. या गाण्यात तनुजा अगदी तशीच वाटते. तरूण पण शालीन सौंदर्य, कारण अंगावर येणारं सौंदर्य दाखवायला गाण्यात बिंदू आहेच.

आणि तनुजा कुणाची प्रेयसी आहे? तर एका कॉलेज प्रोफेसरची. म्हणजे तेथे थिल्लरपणाला जागाच नाही. हा प्रोफेसर त्याच्या सारख्याच व्यक्तीच्या प्रेमात पडणार. प्रोफेसर कोण आहे तर विनोद खन्ना. विनोद खन्ना या राजहंसाचे सारेच देखणे. त्याचे चालणे, त्याचे उभे राहणे, त्याचे पाहणे सारेच देखणे. एका ठिकाणी खन्ना साहेब काही पावले टेकडी चढतात. त्या काही पावलातच त्याने पडदा व्यापून टाकला आहे. बाकी डॉन मधलं बच्चनचं धावणं आणि कुठल्याही चित्रपटातलं विनोद खन्नाचं चालणं याला तुलना आहे काय?

लक्ष्मीकांत प्यारेलाल हा मला हिन्दी चित्रपटसृष्टीतला चमत्कारच वाटतो. मोजक्या चित्रपटात चांगले संगीत देणे वेगळे आणि दोस्ती, पारसमणी पासून अनेक दशके बदलत्या काळाची पावले ओळखून चित्रपटसृष्टीत टिकून राहणे वेगळे. या गाण्यात माझ्या कल्पनेप्रमाणे त्यांनी अनेक वेगळ्या वाद्यांचा वापर केला आहे. पण गाण्याचा बँड होऊ दिलेला नाही. अतिशय कर्णमधून वाटणारे संगीत. “अरमानों का रंग हैं जहा पलकें उठाती हूँ मैं..” नवथर कोवळे प्रेम सांगणार्‍या या ओळी लिहिल्या आहेत मजरुह सुलतानपुरी यांनी. नवीनच प्रेमात पडलेली ती तरुणी. तिला सगळीकडे प्रेम आणि प्रेमच दिसते आहे. आणि अशा तरुणीला जेव्हा लताचा आवाज मिळतो तेव्हा पडद्यावर गारुड झालेले असते.

गाण्यात लताचा आवाज ऐकू आला की तो आपल्याला बांधून ठेवतो. गाण्याच्या सुरुवातीला विनोद खन्ना तनुजाला फुलाप्रमाणे उचलून खाली ठेवतो. आणि ती त्याच्यापासून दूर होऊन क्षणभर त्याच्याकडे पाहते. तेथेच प्रेमाची खूण पटते. सुरुवातीच्या सॅक्सोफोन आणि गिटारच्या सुरावटींवर दिसणारी, रंगांनी उजळलेली संध्याकाळ प्रेमिकांच्या मनात देखिल रंगाची उधळण करुन जाते.

प्रेयसीला नेहेमी येणारी संध्याकाळ आज वेगळीच वाटते आहे. प्रेमात पडल्यावर सारेच वेगळे आणि सुंदर वाटू लागते. अगदी सुरुवातीला “ये आज, मेरी, जिंदगी, में, कौन, आ गया…” म्हणताना तनुजा प्रत्येक शब्दाला त्या तालात एक एक पाऊल पुढे टाकते ते खास पाहण्याजोगे. या गाण्याचे मला जाणवलेले एक वैशिष्ट्य म्हणजे दोघेही या गाण्यात नुसते काही पावले चालले आहेत किंवा उभे राहिले आहेत. तनुजानेही गाणे म्हणताना फार हालचाली केलेल्या नाहीत. पण ही एकमेकांच्या प्रेमात पडलेली दोन देखणी माणसे आपल्या नुसत्या “असण्यानेच” गाणे आकर्षक करून टाकतात. त्यांना छेद देणारी दुसरी सौंदर्यवती बिंदूही काही क्षण गाण्यात दिसते. बहुधा जळफळणारी दुसरी स्त्री म्हणून. पण एकमेकांत त्या संध्याकाळ सारखेच रंगून गेलेल्या त्या प्रेमी युगुलांचे त्याक्षणी तरी कुणाकडीही लक्ष जाण्याची शक्यता नसते. त्यामुळे तो जळफळाट तसाच राहतो. सांज जास्त गडद होत जाते आणि लताचे अवीट मधूर “हमिंग” ऐकू येत असताना ते प्रेमिक एकमेकांचा हात हातात घेऊन टेकडी उतरु लागतात…

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर लिहिलेय. माझ्या अत्यंत आवडत्या गाण्यात हे आहे.

विनोद खन्नाला राजहंसाची उपमा.... पटतेच एकदम Happy

कसला प्रचंड स्क्रीन प्रेझेंस होता या माणसाला आणि कसले जीवघेणे देखणेपण. अमिताभचे नशीब जोरदार होते म्हणून करियर ऐन भरात असताना हा सगळे सोडून रजनीश आश्रमात दाखल झाला.

तनुजाही खूप आवडते. एक अवखळपणा होता तिच्या चेहऱ्यावर आणि देहबोलीत. त्यामुळे चित्रपटाच्या नेहमीच्या सौंदर्याच्या न कल्पनेत बसणारा तिचा चेहरा व ती खूपच आकर्षक दिसायची. तिचा ड्रेस सेन्स पण खूप उत्तम होता.

चित्रपट दूरदर्शनवर पाहिलेला. कथा थोडी वेगळी आहे, नेहमीची प्रेमकथा नाही.

लताने तुफान गायलेय गाणे. दुसरी कोणी असती तर निश्चित कुठेतरी बेसुरी झाली असती पण लताने अजिबात बेसूर न होता उंच स्वरातले हे गाणे सुश्राव्य केलेय.

किती सुंदर लिहिलंय!
स्टारडस्टमधे विनोद खन्नाच्या फोटोखालची कॉमेंट आठवते....एकाचवेळी सेक्सी आणि विरागी.

वाह! बहोत खूब.
>>>>“अरमानों का रंग हैं जहा पलकें उठाती हूँ मैं..” नवथर कोवळे प्रेम सांगणार्‍या या ओळी लिहिल्या आहेत मजरुह सुलतानपुरी यांनी.>>>> छान ओळी टिपल्यात.