दिल का भंवर करे पुकार प्यार का राग सुनो…

Submitted by अतुल ठाकुर on 6 March, 2020 - 17:35

hqdefault_6.jpg

कुतुबमिनारमध्ये दरवळलेला रफीचा स्वर, त्याला हसरत जयपुरीचे शब्द आणि एसडीचे संगीत. त्यातच पडद्यावर दिसते कोण तर साक्षात देव आनंद आणि नूतन. १९६३ साली आलेल्या “तेरे घरके सामने” मधले “दिल का भंवर करे पुकार” नेहेमीच आवडायचे. जेव्हा पाहिले तेव्हा त्यातले वेगळेपण आणखी जाणवले. बाकी गोल्डी आनंद साहेब जेव्हा काही दिग्दर्शित करतात तेव्हा त्यात काहीन काहीतरी वेगळेपणा असतो एक आमचे एक निरिक्षण. नाहीतर कुतुबमिनारच्या (असं म्हणतात तो सेट लावला होता) आतल्या अरूंद चिंचोळ्या भागात आमचा मदन देव आनंद आणि रती नूतन यांना नेऊन रफीचे गाणे तेथे छायाचित्रित करण्याची कल्पना कुणाच्या डोक्यात येणार? आणि कसल्याही तर्काचा आगापिछा नसलेले आमचे दुसरे निरिक्षण म्हणजे गोल्डीच्या दिग्दर्शनात नायिका कसलिशी जादू होऊन आणखीनच आकर्षक भासतात. एक सुरेल चाल असलेले गाणे, पायर्‍यांच्या वर सुरु होते. पायर्‍या उतरताना नायक आपल्या मनीचे गुज सांगतो आणि पायर्‍या संपताना गाणेही संपते. या साध्याशा वाटणार्‍या घटनेत सर्वांनी चमत्कार केले आहेत.

एसडीची मान डोलायला लावणारी चाल आणि त्यासाठी विजय आनंदने निवडलेला कुतुबमिनारचा आंतरभाग. एसडीने दिलेली चाल नायक नायिकांच्या पाय उतरण्याच्या तालाशी चपखल जुळली आहे. कधी कधी मला हा प्रश्न पडतो विजय आनंदने आधी आपल्याला अशा तर्‍हेने गाणे चित्रित करायचे आहे हे एसडीला सांगितलं असेल की एसडीची चाल ऐकून विजय आनंदला असे चित्रिकरण करण्याची कल्पना सुचली असेल? “दिल का भंवर सुरु होते” आणि दिसते ते एकमेकांच्या प्रेमात पार गुरफटून गेलेले जोडपे. तिला त्याने केलेली स्तुती खुप हवीहवीशी वाटते. पण ती त्याच्यावर अनुरक्त झाली आहे हे ही तिला दाखवायचे नाही. त्यामुळे प्रियकराने केलेल्या स्तुतीचा स्विकार, त्यामुळे झालेला आनंद तर नूतनने चेहर्‍यावर दाखवलेला आहेच. पण त्याचवेळी ती स्वामिनी आहे. या स्तुतीने ती वाहून गेलेली नाही हेही तिला दाखवायचे आहे. ही कसरत नूतनच करु जाणे. तिने तिच्या चालण्यात, हळूच तिरपे पाहण्यात हे सारे भाव दाखवले आहेत. संपूर्ण गाण्यात नूतनच्या चेहर्‍यावर लोभस हसु सतत दिसत राहते.

“दिल का भंवर” म्हणताना देव आनंदचाच भुंगा झालेला आहे. कमळाच्या अवती भवती गुणगुणत फिरणारा आणि संध्याकाळ होताच त्यात अडकणारा.लाकूड फोडू शकणारा मात्र कमळाच्या कोमल पाकळ्यांसमोर हार मानणारा भुंगा. देवआनंदचे दिसणे, त्याचे मान हलवणे आणि त्याचे पायरी पायरीने खाली उतरणे सारेच आकर्षक. देवसाहेब हे फार सहजतेने करून जातात. त्यात रफीने त्याच्या शरीरात केलेला परकायाप्रवेश. एकेक शब्द अक्षरशः देवाअनंदच्या मुखातून उमटला आहे अशा तर्‍हेने रफी हे गीत गावून गेला आहे. अनेकदा गाणे ऐकताना रेडियोवर तीनच कडवी ऐकू येतात. गाणे पाहताना मात्र चौथे कडवेही ऐकायला पाहायला मिळते.

आप का ये आँचल, प्यार का ये बादल
फिर हमें ज़मीं पे ले चला
अब तो हाथ थाम लो, इक नज़र का जाम दो
इस नये सफ़र का वस्ता…

यात भरारणार्‍या वार्‍यासमोर हात पुढे करून हसतमुख नूतन उभी राहते आणि तिची ओढणी फडफडत देव आनंदच्या चेहर्‍यावर स्थिरावते. अशा भरारणार्‍या वार्‍यात आपल्या स्वामिनीचा “आंचल” प्यार का बादल बनून ज्याच्या मुखावर स्थिरावला “तेची पुरुष दैवाचे” हेच खरं.

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच रसग्रहण!
एका पॉइन्टला एक टुरिस्ट गाईड, चष्मा सावरत या प्रणयी जोडप्याकडे 'आजकालची तरुण पिढी ना .....' अशा अविर्भावात बघत बघत जातो - तो सीन आवडतो मला.
खरच एवढ्याश्या सेटवर किती विविध मूड, भाव टिपलेत.

मस्त! 'ओ निगाहे मस्ताना' हे ह्यापेक्षा जुने गाणे... ते इतकं मास्टरपीस आहे की त्यानंतर पुन्हा देव-नूतन ह्यांना घेवून दुसरा मास्टरपीस करायचा म्हणजे एस.डी. च हवे!

अतिशय छान...पण हात थोडा आखडता घेतलात अस वाटलं. कितीही वेळा पाहिलं तरी समाधान होत नाही.
त्यात असणारी कडव्यानंतरची.... हुं हुं ओ ओ.... ही तान तर अप्रतिमच !!!

अरे वा किती छान चॉइस. मस्त गाणे. हे माझे व नवर्‍याचे फेवरिट गाणे. त्याचा जुन्या हिंदी गाण्यांचा जबरदस्त व्यासंग असल्याने तो मला नेहमी गाण्यांतून भेटतच असतो. नव्याने भेटलो तेव्हा आमची परिस्थिती बेताचीच होती पण एक स्टिरिओ सिस्टिम होती फिलिप्सची व त्या काळी एको टाइप रेकॉर्डिंग असे काहीतरी एक होते त्यात बनवलेली लताच्या गाण्यांची कॅसेट, व रफी लता, मन्नाडे , तलत व हेमंत कुमार ह्यां नी गायलेली युगल गीते अश्या प्रत्येकी एक क्यासेटी होत्या. ही ऐकणे व ऐकत घरकामे करणे फार मजेची गोष्ट होती. रात्रीच्या वेळी प्रत्येक गाणे चवी चवीने ऐकत वारे खात बसत असू. कारण हैद्रा बादेस उकाडा फार.

अग्दी कमी वाद्यवृंदांच्या साथीने रफीने गाण्याला एक वेगळीच खुमारी दिली आहे. नूतन चा चेहरा पण तसाच आहे. अगदी कमी प्रसाधने पण
सुरेख फीचर्स, तो गाइड देव आनंदच आहे मला वा टते. व्हिडीओ परत बघायला हवा.

रफी, किशोर, मुकेश, तलत मन्नाडे, हेमंत कुमार व आशा लता हे सर्व् च गायक व शंकर जयकिशन, सलील चौधरी, एस्डी आर्डी, लक्ष्मिकात प्यारेलाल, आणि इतर दिग्गज दिग्दर्शक व कवी शायर एकाच काळात सुपर प्रॉडक्टिव्ह असणे व उत्तम नायक नायिकांनी पण पडद्यावर त्यांचे कार्य साकार करणे हे आपलेच चांगले नशीब वाट्ते मला. स्वरगंगेत नुसत्या डुबक्या घ्यायच्या. आणि तृप्त व्हायचे.

छान लिहिलंय. चिरतारुण्याचं वरदान असलेलं गाणं आहे. शब्द, चाल, नायक-नायिका आणि त्यांचं एकमेकांवर अनुरक्त असणं, सगळं सदैव तरूण!

रात्रीच्या वेळी प्रत्येक गाणे चवी चवीने ऐकत वारे खात बसत असू. >> Happy क्या बात!
आठवणींचं म्हणाल तर - पहिल्यांदा यूट्यूबवर गाणे पाहिले तर किती किती वेळा परत-परत पाहिले. मैत्रिणी विचारायच्या - "सध्या काय बघतेस?" "किती पायर्‍या उतरतात ते मोजतीये!" Wink Happy झालं मग, इतक्या दिवसात आजवर कुणाशी एकमत नाही किती पायर्‍या ह्या गाण्यात. म्हणून कधी एकत्र कधी इतरत्र बघत राहतो नि काय Wink असंच दुसरं - "झूठाही सही" मध्ये किती खिडक्या हेमामालिनी बंद करते? Happy १८ उत्तर आहे पण त्यावर एकमत करायचं टाळतो... Wink

अतुल जी खुप छान रसग्रहण केलंय, आवडलं. माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक.
जमल्यास कभी आर कभी पार बद्दल पण लिहाल का? अर्थातच आपल्याला आवडत असेल तर Happy

प्लीज 'खिलते है गुल यहां' बद्दलही लिहा अतुल ठाकूर. शशी कपूरचे जिवघेणे स्मितहास्य आणि रुपगर्विता राखी, भोवती तरुणाईची हिरवळ, सिमल्यातली थंड बॅकड्रॉप. हे गाणे खलास आवडते मला. निव्वळ अप्रतिमच, बेतोड. त्याबद्दलचे किस्से किंवा रसग्रहण प्लीज लिहा.

विजय आनंद - ब्रिल्यंट डायरेक्टर. एस्पेशियली व्हेन यु वे इन हिम ऑन साँग पिक्चरायझेशन (गाईड, तेरे मेरे सपने, जॉनी मेरा नाम, तिसरी मंझिल, अँड ऑफकोर्स तेरे घर के सामने...). पण तितकाच टुकार अ‍ॅक्टर, मे बी मिसफिट (कोरा कागज, मै तुलसी...), अर्थात त्याच्या डायरेक्टोरियल टॅलंटच्या तुलनेत... Wink

अवांतराबद्दल क्षमस्व, अतुल ठाकुर...

एक गोष्ट खटकते.
एकाच वाक्यात एखाद्या व्यक्तीला आप आणि लगेच तुम. पुन्हा पुढच्या एका कडव्यात तोच प्रकार. हे जरा विचित्र आहे.
फूल तुम गुलाब का, क्या जवाब आपका.
मराठीत तू गुलाबाचे फूल आहेस, तुम्ही लाजवाब आहात. हे वाक्य कसे वाटते?
असो. संगीत श्रवणीय आहे. विजय आनंदसाहेबांचे चित्रीकरण उत्कृष्ट आहे ह्यात शंकाच नाही.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार Happy सर्वांनी सुचवलेली गाणी मलाही आवडतात. जमेल तसं लिहित जाईन. मायबोलीवर असे समानधर्मी मिळतात म्हणूनच लिहायला मजा येते Happy