कुंडीतल्या वेलास आधार देणे

Submitted by Srd on 1 January, 2019 - 05:34

कुंडीतल्या वेलासाठी आधार

कुंडीमध्ये वेल लावले तर त्यांना आधार कसा द्यायचा?
अ) कुंडीत वेल लावण्या अगोदरच तळाशी असलेल्या भोकातून दोन ती नायलॅान देऱ्या बांधून ठेवायच्या. वरची टोके वर कुठेतरी आडव्या आधाराला बांधली की वेल त्यावर वाढतात. मग वर माती घालून भाज्यांचे वेल लावायचे. पण हा आधार पक्का बांधल्याने वेलाची वाढ झाल्यावर कुंडी हलवता येत नाही.

ब ) स्वतंत्र आधार

लागणाऱ्या वस्तू आणि कृती -
प्लास्टिक कुंडी, पिविसी पाइप चारपाच फुट एक इंच २५एमएम साइज, नायलॅान दोरी, रंगाच्या डब्यांची प्लास्टिक झाकणे, प्लास्टिक ट्रे, साइकल स्पोक किंवा /छत्रीची तार भोके पाडण्यासाठी. जुनी सुरी/चाकू झाकण कापण्यासाठी.

फोटो १ तयार रचना -

फोटो २ पाइपचे वरचे झाकण.

फोटो ३ प्लास्टिक ट्रेमध्ये कुंडी.

कुंडीच्या तळाशी आतमध्ये बसेल असे एखादे रंगाच्या डब्याचे झाकण किंवा जुनी प्लास्टिक प्लेट घेऊन त्याला मध्याभगी पिविसी पाइप जाईल असे भोक पाडले. खाली पाइपच्या टोकाला सळीने आडवी भोके पाडून दोरी घातली की झाकण सटकणार नाही. हे झाकण कुंडीच्या तळाला भोके असतात त्यातून दोरी घालून बांधले की पाइप मध्यभागी उभा राहतो.
आता पाइपच्या वरच्या टोकालाही एक झाकण बसवले. तेही खाली सरकू नये म्हणून खाली आडवी भोके पाडून दोरी घातली आहे.
वरच्या झाकणाला तीन (अथवा चार) भोके पाडून दोऱ्या बांधल्या आणि त्या खाली कुंडीच्या काठाला बांधल्या आहेत.
( सळी गरम करून भोके पाडावीत. दोरीची टोके जाळून चिकटवून घ्यावीत. झाकणाचे मधले भोक सुरी गरम करून पाडावे, फार मोठे करू नये पाइप घट्ट बसेल एवढेच.)

कुंडीत माती भरून आख्खी कुंडीच वेलासह पाइपला धरून उचलता येते,हलवता येते.
पण हे सर्व बाल्कनित असल्याने खालचा ट्रे गरजेचा आहे. त्यात तळाला एक इंच मातीचा थर आहे. पाणी वाहिले की यात जमा होते. खताचा अंश वाहून जात नाही, डास होत नाहीत. ट्रेमधली कुंडी ही ट्रेसह हलवायची कारण तळाच्या भोकातून खालच्या मातीमध्ये पसरलेली मुळे तुटत नाहीत.

यामध्ये चवळीचे (वाली) वेल लावले आहेत. रोग पडताहेत म्हणून खळ (मैद्याची कांजी) फवारतो . खळ वाळली की किटक जखडले जातात. कधी मिरचीचं पाणी फवारतो.

थोडा खटाटोप करून असा आधार तयार करता येईल. मातीच्या कुंडीत खालचे झाकण बांधताना तळ फुटणार नाही याची थोडी काळजी घ्यावी लागेल.
भाज्यांचे वेल लावल्यास ते एक शोभा म्हणून हॅालमध्ये एखादा दिवस ठेवता येतील.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कृती फार डिटेलमध्ये दिलेली नाही पण करता येईल अशी आशा आहे.

( फोटो क्र १ मध्ये मागे लाल माठ आहे, भाजी म्हणून, शोभा म्हणून .

धन्यवाद, उपयुक्त माहिती. मला झाड / वेल जरा फुलली आणि छान दिसायला लागली की entrance पॅसेज, लिविंग रूममध्ये ठेवायला आवडतात, मग मी सुट्टीच्या दिवशी टेरेसमधून आत आणि परत बागेत अशी हलवाहलव करत रहाते. तुमची आयडिया फार उपयोगी आहे. :Thumbs up:

आता थंडीच्या दिवसांत मोठ्या वृक्षांच्या खाली वाळक्या डहाळ्या पडलेल्या सापडतात. ( आंबा, रेनट्री - पर्जन्यवृक्ष इत्यादि. ) अगदी अंगठ्याएवढ्या किंवा दोतीन इंच जाडीच्या. त्या मोडून तीनचार इंचाचे तुकडे केले. कुंडीत माती भरताना हे तुकडे आणि माती असे थर दिल्याने मातीला हलकेपणा आलाय. हवेशिरपणा मुळांसाठी राहिला आहे.

ट्रेसह हलवल्याने मातीची राड होत नाही. पॅसेज, लिविंग रूममध्ये ठेवायला आणलेली कुंडी एकच दिवस ठेवावी. अन्यथा पाने पिवळी पडतात.

छान आहे.. थोडा वेगळा प्रश्न विचारते रागावू नका..
पालेभाज्यांच्या बिया online चांगल्या मिळतात का?
तुम्ही कुठुन घेता?

रागवयचं कशाला?

काहीही विचारा. पालेभाज्यांचं बियाणं विकत आणत नाही , गरज नाही. म्हणजे खूप मोठी जागा आणि भरपूर पालेभाज्या लावणे हा उद्देश नसतोच. कारण भराभर वाढतात आणि एकाचवेळी इतकी भाजी येऊन उपयोग नसतो. पानं योग्यवेळी खुडली नाहीत तर वातड होतात. वीस रोपे खूप होतात.

आता बियाण्याची गरज का नाही ते -
माठ, चवळी, पालक, चुका, चाकवत, मेथी,अंबाडी यांच्या मुळं असणाऱ्या छोट्या ताज्या जुड्या बाजारातून आणायच्या. फक्त पानं काढून घ्यायची. मुळं काड्या शेंडेवाला भाग पन्नास सहज असतात. ती पाण्यात तीनचारवेळा धुऊन माती साफ काढून टाकायची. त्या मातीत गोगलगायींची बारीक अंडी असतात ( पांढरे मणी, टाचणीच्या डोक्यावर चार राहतील एवढी बारीक असतात,) ती गेली पाहिजेत. हे पुढे बागेची वाट लावतात.
(( भाज्यांचे उरलेले भाग जे लोक ओले खत करण्यासाठी बागेत ,कुंडीत पुरतात त्यांनी विशेष काळजी घ्यावी. गोगलगायी झाडांची मुळे खातात, नवीन अंकूर खातात.))
तर हे लावा. पन्नासात ४८ जगतात. रोपे वाढल्यावर दोन वेळा पानं काढता येतात, तिसऱ्या वेळी रोपच उपटायचे. माठ,चवळी,अंबाडी यांची दोन झाडे राखल्यास त्यांचे बी खाली पडून पुढे त्यांतून नवीन भाजी वाढत राहते.
पालकास गारवा लागतो, मार्चनंतर वाढत नाही.
घेवडा,चवळी,फरसबी बीन्स, यांच्या जून शेंगा दोन चार घेऊन पेरल्या की वेल येतात. वाल वाण्याकडचे लावता येतात, पण उशिर झाला आहे.

-----
तुमच्याकडे पालेभाजी बियाणे असेलच तर ते कसे वापरायचे ते लिहितो नंतर. ( बियाणं, माती तापवावी लागते उन्हात. वरती जाळी झाकली नाही तर चिमण्या खातात हे अगदी थोडक्यात. )

गोगलगायी झाडांची मुळे खातात, नवीन अंकूर खातात.>>>>>> माझ्या कुंडीत असेच बारीकुले शंख झाले आहेत.त्यावर काय उपाय आहे?

कुंडीत माती भरताना हे तुकडे आणि माती असे थर दिल्याने मातीला हलकेपणा आलाय. हवेशिरपणा मुळांसाठी राहिला आहे. >>>>>>. मी मोठमोठे शंख शिंपले आणले होते, ते दोनेक महिने कडक उन्हात वाळवून (अंडी असतील तर मरण्यासाठी) मग कुंडीत लेअर तयार केला होता. उद्देश तुम्ही लिहिला तोच - माती हलकी आणि हवा जाण्यासाठी.

ट्रेसह हलवल्याने मातीची राड होत नाही. >>>> आतापर्यंत वेळ हलवता येत नव्हते, तुमची कल्पना फार भारी आहे ती नक्की करून पहाणार.

हे तुमची पॅसेज, लिविंग रूममध्ये ठेवायला आणलेली कुंडी एकच दिवस ठेवावी. अन्यथा पाने पिवळी पडतात. >>>> अर्थातच. ऊन हवंच. हे कुंड्या हलवणे नाटक फक्त विशेष ऑकेजन किंवा सुट्टी, पार्टी अशा वेळी. मग कुंड्या परत टेरेसमध्ये. करक्तखुफोते, पण लिविंग रूम इतकी लाइव्हली दिसते की बाकी झंझट मी आणि मेड मिळून आनंदाने करतो.

@DShraddha,
लाल रंगाची पालेभाजी एकच असते तीच लाल माठ. बाजारात भैये लोक त्यास लाल चवळाई म्हणतात. याचाच हिरवा रंगही असतो. राजगिरा (उपासातला) हासुद्धा याच वर्गातला आहे.
ही भाजी आणून चारपाच इंच लांबीचे शेंडे चांगले धुऊन घेतले. एका मोठ्या प्लास्टिक पिशवीत तळाला चमचाभर पाणी घालून पिशवीत शेंडे घातले. पिशवी फुगवून तोंड बांधून ठेवले. दोन दिवसांनी हे शेंडे संध्याकाळी मातीत लावले. आठ दिवसात मुळे फुटतात.

मराठीत चवळाई /तादुळजा म्हणतात ती किंचीत वेगळी लांबट पानाची भाजी हिरवीच असते.

-------
@देवकी,
शंखांसाठी -
१) माती उन्हात वाळवणे,
२) प्रेशर कुकरमध्ये तीन शिट्ट्या,
हे दोन उपाय लहान बागेसाठी आहेत.
मोठ्या ओपन बागेसाठी काही नाही. थोडा चौकोन मोकळा ठेवून माती सुकू देणे, वाळवणे.
केमिकल, वगैरे शक्यतो वापरू नये. पाण्यातून जवळच्या विहिरीत जाऊ शकते.

------------
@मीरा...
काटक्यांचे तुकडे केवळ तळालाच नाही तर तुकडे आणि माती यांचे एकावरएक तीन थर दिलेत.

माती उन्हात वाळवणे,
२) प्रेशर कुकरमध्ये तीन शिट्ट्या,
हे दोन उपाय लहान बागेसाठी आहेत.>>>> कुंड्या ग्रीलमधे आहेत.त्यात कढीलिंबाची झाडे आहेत.ट्यामुळे वरचे उपाय नाही करता येणार.

पालेभाज्या लावताना बॅच मध्ये लावा. आज लावली तर अजून चार दिवसांनी दुसरी बॅच, अजून चार दिवसांनी तिसरी बॅच. सगळी भाजी एकदम तयार होऊन वाया जात नाही. चार चार दिवसांनी मिळत राहते.

पालेभाज्या लावताना बॅच मध्ये लावा. आज लावली तर अजून चार दिवसांनी दुसरी बॅच, अजून चार दिवसांनी तिसरी बॅच. सगळी भाजी एकदम तयार होऊन वाया जात नाही. चार चार दिवसांनी मिळत राहते.

@ डूडायडू,
ही केमिकल पद्धत आहे.
वरती २ जानेवारीच्या पोस्टमध्ये मी तीन नावं लिहिली होती पण नंतर काढली. मर्क्युरी,कॅापरची असतात. एका प्रसिद्ध ब्रँडचं फ्युरान वापरलं होतं. काही दिवसांनी मी टबामध्ये कमळं लावण्यासाठी माती तळाला घातली पाणी भरलं कमळाचा वेल लावला आणि फिशटँकमध्ये मासे होते त्यातले चारपाच सोडले. ते लगेच कासाविस होऊन उलटेपालटे होऊ लागले. ताबडतोब त्यांना परत टँकमध्ये सोडले.
मला शंका आली फ्युरानची. त्याचं विघटन झालेलं नसणार. मासे विषारीपणास फार संवेदनाशील असतात.
मातीत घालायचं केमिकल वापरू नका.
एकदा वसई बाजारातल्या बीबियाणं दुकानात गेलो होतो तेव्हा तो मालक सांगत होता "एक गिऱ्हाइक एक किलो कॅलोमेल मागायला आलं. त्याला म्हटलं अरे, मी देईन माझा धंधाच होतोय पण किती घातक आहे मला माहिती आहे. ते विहिरीत जाईल."
थोडक्यात उन्हाचा प्रयोग करणे.

srd
त्या लिंक वर अनेक उपाय आहेत फक्त उघडले ते पान केमिकल असले तरी बायोलॉजिकल इराडीकेशन वगैरे सुद्धा मागील पानावर मिळेल. आणि केमिकल मध्ये सौम्य प्रकार जे मानवास कमी हानिकारक असेही दिले आहेत.
आणि सर्वात सोप्पा आणि सेफ उपाय bait लावून मैन्युअल इराडीकेशन तेसुद्धा दिलय

>>सर्वात सोप्पा आणि सेफ उपाय bait लावून मैन्युअल इराडीकेशन तेसुद्धा दिलय>>

भिजलल्या पोळीचा तुकडा ठेवून त्यावर एक टाइलचा तुकडा झाकून ठेवला संध्याकाळी की सकाळी त्या पोळीवर पंचवीसेक शंख गोळ होतात ते काढून फेकायचो तरी शंख कमी होत नाहीत. पण हे सर्व वीसपंचवीस कुंड्यांपर्यंत ठीक आहे.
उघड्या जमिनीवर बंगल्याभोवतीवगैरे बाग असेल तर मात्र जमणार नाही.
गोगलगायी खाणारे पक्षी - ग्लॅासी आइबिस( डोसक्यावर शेंदरी टक्कलवाला) आणि हुदहुद ( हुप्पो .) पण ते आणायचे कुठून!!
हुप्पोवर एक छानशी डॅाक्यु(१तास) आहे युट्युबवर.

परदेशी उदाहरणे इकडे भारतात कशी चालतील Happy आपल्याकडे उपयोगी प्राणी म्हणजे बेडुक आणि टोड. पक्षी उपयोगी नाही जसे की बदक किंवा देशी कोंबड़ी कारण आपल्या मळ्यातील भाजीचा पण फडशा आणि नासधुस होते. पण मी एक फ़ार्म पाहिला होता ज्यात देशी कोंबड्या रोज फक्त एक तास त्या लागवडी खालील फळबागेत सोडतात आणि त्यामुळे इतर तण व हानिकारक कृमि कीटक नष्ट होतात.

Assassin snails हां प्रकार रोचक आणि जास्त उपयोगी वाटतोय.
एका लिंक वर अजून रक आयडिया मिळाली --Snails and slugs find sawdust to be unattractive and will avoid crossing it unless they are starving. They also do not like to crawl over sand. जी आपल्याकडे पावसाळा व्यतिरिक्त वापरणे कमी खर्चाचे आणि रिझल्ट देणारे संभवते. https://bugofff.com/how-to-get-rid-of-slugs-and-snails/

खरय.
शेतीपासून प्राणी वेगळे होऊ लागले तशी शेतीची साखळी तुटली. गावातले लोक पुर्वी राख टाकायचे. आता त्यांनाच लाकडे मिळत नाहीत तर राख कुठली?
ओस्ट्रेलियाची गोष्ट वेगळी आहे. ( साइट तिकडचीच आहे.)

हेच ते शंख . मोठे फुल साइज आहेत.
लहान शंख तुळशीच्या बियांएवढे असतात पण मुळं खाण्यात कमी नसतात.
( मेलेले आहेत )

जेव्हा जमीन वाळते तेव्हा प्रत्येक गोगलगाय शंखाच्या आत वीसेक अंडी ठेवून मरते. जेव्हा ओलावा येतो तेव्हा या अंड्यांतून नवीन पिले बाहेर पडतात.

Pages