नैनोंमे दर्पन है दर्पन में कोई…

Submitted by अतुल ठाकुर on 22 August, 2018 - 11:21

vinod.jpg

महागड्या चारचाकीत बसून किंवा रुबाबदार दुचाकीवर गॉगल वगैरे घालून पडद्यावर प्रेक्षकांना भुरळ पाडणार्‍या अभिनेत्यांची कमतरता नाही. पण सायकलवर बसून प्रेक्षकांना आकर्षित करणे हे फक्त जातीच्या देखण्या माणसाचेच काम. हे विनोद खन्नाच करु जाणे. १९७४ साली आलेल्या “आरोप” चित्रपटातील हे गाणे मला अनेक कारणांसाठी आवडते. अतिशय सुरेख, गुणगुणावीशी वाटणारी भूपेन हजारिकांनी लावलेली चाल. मला खुप पूर्वी पाहिलेल्या मुलाखतीत अंधुकसे आठवतेय. हजारिका म्हणाले होते की एका धनगराच्या तोंडून त्यांनी “दा रा रा, रा रा, रा रा , रा रा रा…” अशी ही धून ऐकली होती. आणि त्यावरून त्यांनी ही चाल बसवली. त्यामुळे आधीच लोकगीताचा सुवास या गोड चालीत मिसळला आहे. माया गोविंद यानी प्रियकर प्रेयसी दोघांनी एकमेकांना गमतीशीर कोडे घातल्याप्रमाणे हे गीत लिहिले आहे. त्यात थट्टा आहे आणि त्यामागे एकमेकांबद्दलची गाढ प्रिती देखील आहे. त्यातूनच अनोखे आहे ते या गाण्याचे देखणे चित्रिकरण.

अगदी सुरुवातीलाच गुरांच्या कळपसमोर आल्यावर सायकवर बसलेले हे युगुल स्क्रिनवर येते. सायरा बानू आणि विनोदच्या केमिस्ट्रीबद्दल वेगळ्याने लिहावे लागेल. पण एकमेकांच्या प्रेमात पार बुडालेले हे दोघे आहेत हे चित्रपट न पाहता नुसतं गाणं पाहिलं तरी कळेल. पांढर्‍या टोप्या घातलेली गुरं हाकणारी, मराठी वाटणारी मंडळी, मध्येच दिसणारी बैलगाडी आणि एकंदरीत हिरवागार निसर्ग पाहता आपल्या घाटाच्या आसपासचं हे चित्रिकरण असावं. विनोद खन्ना घंटी वाजवतो आणि त्या कळपातून वाट काढत मस्त शीळ घालु लागतो. आणि गाणे सुरु होते. नैनोंमें दर्पन है दर्पन मे कोई…दोघेही सायकलवर बसले आहेत. तगड्या विनोदखन्नाने सहजपणे सायकल चालवली आहे आणि त्यामुळे सायरा एखाद्या फुलाप्रमाणे त्यावर बसलेली वाटते. या गाण्यात ही सायकल हेही जणु काही एक पात्रच आहे. जुन्या प्रकारची, घंटी असलेली सायकल विनोदखन्ना निरनिराळ्या प्रकारे गोल, नागमोडी चालवतो. आणि या दोघांबद्दल काय बोलणार?

राणी कलरचा ब्लाऊझ आणि त्याच रंगाची साडी नेसलेली एकच एक लांबसडक वेणी घातलेली सायरा साडीत सुंदरच दिसते. आणि तिचा वावर अतिशय सहज झाला आहे. विनोद खन्ना काही विशिष्ट प्रकारची गाणी, ज्यात नृत्याला जागा नसेल अशी, पडद्यावर मस्त रंगवतो. हे गाणंही त्यातलंच. दोघेही सायकलवर बसले असताना त्याचे भुरभुरणारे केस, सतत प्रेयसीच्या कानाजवळ ओठ आणून त्याचं काहीतरी कुजबुजणं, सायराचं त्याला त्याचप्रमाणे उत्तर देणं, सगळंच अतिशय लोभसवाणं. सायकलवरुन येत असताना सायरा गाणे म्हणत अगदी सहजपणे विनोद खन्नाच्या बाहुभोवती आपला हात गुंफते. एकदा हात मागे करुन हळूवारपणे त्याच्या चेहर्‍याला स्पर्श करते. अगदी छोट्याशा कृतीतून तिने आपला विश्वास आणि प्रेम ज्या तर्‍हेने व्यक्त केलं आहे ते केवळ अप्रतिम. सायराचा हा सहजसुंदर अभिनय पुन्हा पुन्हा पाहण्याजोगा. दोघांच्या या केमिस्ट्रीइतकीच पडद्यामागे किशोर आणि लताचीही केमिस्ट्री रंगलेली आहे.

लताने मृदुमुलायम आवाजात सायराच गात असावी अशी सुरुवात केल्यावर किशोरनेही “बोलो जी बोलो ये राज खोलो” म्हणत मर्दानी विनोदखन्नाच्या आवाजात गाणे गायिल्यासारखे वाटते. या गाण्यात आणखी एक आकर्षक भाग म्हणजे लताच्या काही लकेरी आणि किशोरचे हमिंग. गाणे संपताना किशोरचं “ला ला, ला ला ला, ला ला, ला ला ला” मस्त वाटतं आणि त्याबरोबरंच लक्षात राहतं हे एकमेकांत मिसळून गेलेलं, रस्त्यावरून नागमोडी सायकल चालवत जाणारं ते अतिशय देखण जोडपं.

अतुल ठाकुर

हे गाणे येथे पहता येईल.
https://www.youtube.com/watch?time_continue=10&v=Ig11dxP9_vE

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वाह, छान लिहिलंय.

गाणं आत्ता न बघता आठवलं. हा पिक्चर लहान असताना tv वर बघितलेला. विनोद खन्ना खूप आवडलेला. गाणं बघेन परत.

गोड लिहिलय. दोन्ही गाणी पाहिलीत. ते मुमुचे दुसरे गाणे ही छान आहे.

फार पुर्वी हे सायकलवर डबलसिट बसण्याच्या क्रेझ मधे, लग्न ठरल्यानन्तरच्या रोमॅन्टीक दिवसात एक सायकल घेउन पुणे विद्यापीठाच्या आवारात अशी डबलसिट चक्कर मारलेली आठवतेय. Lol

छान लिहिलंय. आजवर फक्त ऐकलं होतं हे गाणं.
आता पाहिल्यावर कळलं की सायकलवर आहे. आणि मग शाहरुख - नग्मा चं इस जहाकी नही है तुम्हारी आखे किती सेम आहे, अगदी कॉपीच हे लक्षात आलं.

> फार पुर्वी हे सायकलवर डबलसिट बसण्याच्या क्रेझ मधे, लग्न ठरल्यानन्तरच्या रोमॅन्टीक दिवसात एक सायकल घेउन पुणे विद्यापीठाच्या आवारात अशी डबलसिट चक्कर मारलेली आठवतेय. > Lol Lol

===
> मग शाहरुख - नग्मा चं इस जहाकी नही है तुम्हारी आखे किती सेम आहे, अगदी कॉपीच हे लक्षात आलं. > शारुख -नग्माचा सिनेमा होता हेच आठवत नाहीय Uhoh