मराठी स्टॅन्डअप

Submitted by GANDHALI TILLU on 1 December, 2017 - 03:15

मराठी स्टॅन्डअप -गंधाली टिल्लू
बुरगुंडा होईल बाया गं तुला बुरगुंडा होईल !!! बुगरगुंडा म्हणजे ज्ञान जे देण्यासाठी गावो गावी भारूड सादर करणारे कलाकार फक्त एकनाथांचा वारसा पुढे चालवत नाही आहेत तर मिश्किल पद्धतीने समाज प्रबोधनाचे काम करत आहेत. अर्थात ह्या कलाकारांची संख्या दिवसंदिवस कमी होताना दिसत आहे पण अशाच प्रकारचे अनेक वेगळे कार्यक्रम करून "कॉमेडी मे ट्रॅजेडी " हा मंत्र वापरून एकट्याने किंवा फार तर तीन चार जणांनी लोकांसमोर सादर केली जाणारी हि कला कालानूरूप बदलते आहे. आबूराव बाबुरावची बतावणी, संभाषण, भाषण,चारोळी, कविता तसेच अर्थातच पु.लंचे कथाकथन , प्राध्यापक लक्ष्मण देशपांडेंचं एकपात्री "व्हराड निघालाय लंडनला" असेल किंवा दिलीप प्रभावळकरांचे "हसवा- फसवी "असेल आणि अगदी रामदास पाध्येंच्या बोलक्या बाहुल्या ह्यांनी समाजावर विनोदीमाध्यमातून टिपणी केली. ह्यालाच पुढे स्टॅन्डअप कॉमेडीचे स्वरूप प्राप्त झाले! तंत्रज्ञानाबरोबर मेळ घालत मराठी माध्यमांनी "घडलंय बिघडलंय" च्या माध्यमातून प्रहसन किंवा मिमीक्री ह्याला वाव दिला. पण खऱ्या अर्थाने आधुनिक स्टॅन्ड अप कॉमेडीला घराघरात पोहचवण्याचे काम "हास्यसम्राटने" केला .ह्या कार्यक्रमाने स्टॅन्ड अप कॉमेडीअन्स ना वेगळी अशी स्वतःची ओळख निर्माण करून दिली आणि त्यांना त्यांचे मानधन मिळवून दिले! पुढे ह्याच धाटणीचे अनेक कार्यक्रम प्रेक्षकांना बघायला मिळाले पण त्यात सगळ्यात उजवा ठरला तो "चला हवं येऊ द्या" हा कार्यक्रम ! ह्या कार्यक्रमाची मांडणी जरी" कपिल शर्मा शो" आणि "कुमारस ऍट नो .४२"ह्यांच्याकडून स्पुर्ती घेऊन तयार झालेली असली तरी त्यात अनेक बदल करून तो मराठी माणसाला हस्ताय ना ? म्हणत आपलंसं करण्यात यशस्वी झाला.स्लॅपस्टिक कॉमेडीच्या माध्यमातून, कोट्यांमधून, उपहासात्मक किंवा फार्सिकल सादरीकरणातून जरी टीव्हीवर सर्वसाधारण लोकांना आनंदाचे क्षण मिळत असले तरी आजच्या तरुण पिढीला आता इंटरनेटवर त्यांच्याशी संबंधित मराठी कन्टेन्ट उपलब्ध होत आहे.
24259777_10155842247625883_286264293_o.jpg

भारतीय मध्यमवर्गातील समाजाला त्यांची भाषा हि आजही प्रिय आहे त्यामुळे जरी इंग्रजी किंवा हिंदी स्टॅन्ड अपचे प्रमाण जास्त असले तरी मातृभाषा हा माणसाला लगेच जोडणारा विषय ठरतो ज्यामुळे शिव्या, शब्द ,राजकीय परिस्थिती , सामाजिक परिस्थिती ह्या बद्दल बोलणं सोपं जातं आणि त्याचाच उपयोग करून आज मराठी स्टॅन्ड अपचे खालावलेले प्रमाण वाढत आहे. चांगले लिखाण आणि जीवनशैलीतील आधुनिकता ह्यांना एकत्र बांधून रोजच्या घटनांचा उपहास केला जात आहे . लोकशाहीसाठी हे कार्यक्रम गरजेचे आहेत कारण त्यातून मुक्तपणे मत मांडण्याची एक ताकद मिळते .अशोक नायगावकर एका मुलाखतीत म्हणाले होते की, समाजव्यवस्थेवरील राग ते त्यांच्या कवितांमधून मांडतात. ह्या नवीन माध्यमातून आपल्या भाषेतील आजची कथा हे माध्यम कोपरखळ्या आणि चिमटा घेत सांगते आहे ज्यामुळे ह्याला तरुण वर्गाचा जास्त प्रतिसाद लाभत आहे. त्यात "ALT बालाजी" ह्या youtube चॅनेलने मराठी तसेच अन्य भारतीय भाषांमधील स्टॅन्डअपला वाव देण्यासाठी कार्यक्रम सुरु केला आहे . इथे भारत गणेशपुरे , सागर कारंडे, अनिरुद्ध माडेसिया , सुरेश अलबेला, प्रताप फौजदार अशा अनेक मातब्बर मंडळींना एकत्र आणून खुमासदार विनोद निर्मिती करून राजनीकांत पासून लखनऊपर्यंत विषय मांडले आहेत तसेच इंग्लिश Subtitlesमुळे ते जगभरातील प्रेक्षकांना आस्वाद घेण्यासाठी खुले आहेत.24281649_10155842247620883_818925977_o (1).jpg

त्याचप्रमाणे "सीक्रेट मराठी स्टॅन्ड" अप हा भारतीय डिजिटल पार्टी अर्थातच "भाडिपा" ह्या youtube चॅनेलचा कार्यक्रम "गिग" किंवा "ओपन माइक" ह्या संकल्पनांना महाराष्ट्रात रुजवायचे काम करत आहे! ह्यात नवीन लोकांना एक संधी आणि मंच दिला जाणार आहे आणि तसेच तिकीट लावून जे कार्यक्रम होतील त्यासाठी तयार केला जाणार आहे .त्यामुळे smsbhadipa@gmail.कॉम ह्यावर ई-मेल करून इच्छुक संपर्क साधू शकतात असे अभिनेता, दिग्दर्शक आणि सहसंस्थापक सारंग साठ्ये ह्यांनी सांगितले . ह्यात अनेक नवखे पण कसलेले कॉमेडीअन्स आणि दरवेळी एक "सीक्रेट" असलेला नवीन विनोदवीर सहभागी होणार आहे. ह्यातला अजून एक सीक्रेट घटक म्हणजे हा गिग कुठेही विडिओ किंवा ऑडिओ स्वरूपात कुठल्याही माध्यमावर उपलब्ध नसणार आहे . त्यामुळे दरवेळी नवीन सेट लोकांना अनुभवता येईल! ह्यात हाताळले जाणारे विषय हे जागेप्रमाणे बदलणार आहेत त्यामुळे पुतळ्यापासून पॉर्न पर्यंत आणि राजकारणापासून पाट्यांपर्यंत विषयांची मांडणी केली जाणार आहे. प्रहसन किंवा रोस्ट अश्या माध्यमातून ते नवीन प्रयोग पुढील काळात करणार आहेत आणि तसेच महिलांचा सहभाग वाढण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत.सध्या त्यांचा महाराष्ट्रभर दौरा सुरु आहे आणि
३ डिसेम्बरला पुण्यात "द रूम" येथे रात्री ८ वाजता सादर होणार आहे .

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी त्यांच्या टिपिकल मराठी घर आणि दिवळी , मराठी घर आणि गणपती अशा छोट्या विनोदी क्लिप्स पाहिल्या होत्या. नक्की टायटल नाही आठवत, पण खुसखुशीत होत्या. घराघरातले संवाद होते अगदी. माझ्या लेकीने पण एंजॉय केल्या त्या. मी तेव्हापासून फेबु वर त्यांना फॉलो करत आहे.