तो रॉजहंस एकच!

Submitted by ओबामा on 2 February, 2017 - 20:15

Rojer Federer.jpg

देवाधिराज रॉजर,

तुला देवाधिराज संबोधण्याचे कारण, आम्हां भारतीयांचा देव, साक्षात सचिन तेंडुलकर तुझ्या प्रेमात आणि तुझा निस्सीम चाहता. कलात्मक खेळासाठी प्रसिध्द त्यालादेखील आपल्या खेळाची तू भुरळ पाडलीस. त्या नियमाने तू देवाधिराज!

परवाची ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेतली तुझी नदाल विरूध्दची लढत पहायला मिळावी यासाठीच्या जुगाडात असतानाच, येथील चायनीज नव वर्षाची सुट्टी आमच्यासारख्या तुझ्या इतर चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच. सगळ्या वाहिन्या सलग चार दिवस चक्क मोफत व फुकट. ही सुवर्णसंधी कोण वाया घालवेल?

त्याच दिवशी असणारी भारत व इंग्लड मधील लढत किंवा ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेतली तुझी नदाल विरूध्दची लढत असे दोन पर्याय समोर असताना, मी क्षणभर देखील विचार न करता दुसर्या पर्यायाची निवड केली. तसेही माझ्या देवाने खेळायचे थांबवल्यापासून माझे चेंडू फळीचे वेड अगदीच बंद नाही पण कमी झाले आहे. असो. पत्रास कारण की...तुझे प्रथम १८ ग्रॅंडस्लॅम जिंकल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! राफेल नदालसारख्या मातब्बर योद्धयाला चीतपट करत तू १८व्या ग्रँड स्लॅम जेतेपदाला गवसणी घातलीस. मी माझ्या चेहरेपुस्तकात (Face Book) नमूद केल्याप्रमाणे, “There's a lot at stake when giants like Federer and Nadal face off each other.”

तू आणि राफेल नदाल म्हणजे आधुनिक टेनिसचे शिलेदार. तुझी हातातली रॅकेट एखाद्या सराईत कलाकारासारखी कुंचल्यासमान तर नदालसाठी रॅकेट म्हणजे जणू मर्द मराठ्याची तलवारच. ठेवणीतला एकहाती बॅकहँड ही तुझी खासियत तर ताकदवान पल्लेदार फोरहँड हे नदालचे धारदार अस्त्र. गेल्या दशकभराहून अधिक काळ ग्रँड स्लॅम जेतेपदांवर मक्तेदारी राखणाऱ्या तुम्हां दोघांमधल्या रविवारी रंगलेल्या बावनकशी टेनिस मैफलीत तू बाजी मारलीस. या जेतेपदासह तू तब्बल पाच वर्षांचा ग्रँड स्लॅम जेतेपदांचा दुष्काळही संपविलास. दुखापतींचे गंभीर स्वरूप लक्षात घेता तू या वर्षी खेळशील की नाही अशी शंका वाटली. तू खेळणार हे कळल्यावर तुझी प्रत्येक लढत पहात होतो. जर, अव्वल मानांकित अँडी मरे आणि द्वितीय मानांकित व गतविजेता नोव्हाक जोकोव्हिच यांचे आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आले नसते तर आम्हां चाहत्यांना या लढतीचा आनंद लुटता आला नसता. रॉनिक, चिवट मॉन्फीलीस व दिमीत्रेव या युवा खेळाडूंच्या ऊर्जेला टक्कर देत अंतिम फेरी गाठलेला नदालकडेच या लढती अगोदरचा संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात होते. त्यामानाने तुला निशीकोरी व तुझ्याच शैलीने खेळणारा तुझा देशबांधव मित्र वावरिंका याखेरीज फारसे तगडे आव्हान नव्हते. पण असे म्हणून मी तुझा विजयाचा आनंद हिरावून घेऊ ईच्छित नाही. पाचव्या सेटपर्यंत गेलेल्या मॅरेथॉन मुकाबल्यात नदालच्या शक्तिशाली खेळाला कलात्मक खेळाने उत्तर देत श्रेष्ठ कोण, हे तू आपोआप सिद्ध केलेस.

तुझ्या खेळाची शैली एफर्टलेस म्हणावी अशीच आहे. टेनिसचे सगळे शॉट्स मग तो दणदणीत फोरहँड असो की हळुवार मारलेला ड्रॉपशॉट असो. सगळं काही एकाच प्रकारे, शांतपणे आणि हा शांतपणा दाखवतानाही कुठे दिखाऊपणा नाही. पॉईंट गेला म्हणून कोर्टात आदळआपट करणारे कितीतरी खेळाडू टेनिसविश्वाने पाहिले. अगदी मॅचदरम्यान आपल्या सगळ्याच्या सगळ्या रॅकेट्स रागारागात तोडून दिल्याने मॅचमधून हाकलले गेलेलेही अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. पण तुझा असा उद्रेक कोणी पाहिला नाहीये.

विलक्षण इच्छाशक्तीचे प्रतीक असणार्या तूझ्यातल्या त्या जिगरबाज खेळाडूने पुन्हा एकदा मीच टेनिसचा खरा राजा असल्याचे सिद्ध करून दाखवले. मेहनतपूर्वक जपलेली तंदुरुस्ती, कसोशीने उंचावत नेलेला खेळाचा दर्जा आणि खेळावरचं निस्सीम प्रेम या गुणवैशिष्टयांनी परिपूर्ण अशा तू, उंचावलेला टेनिसचा दर्जा आजही कायम राखलास. वाढत्या वयावरून नेहमी तुझ्यावर निवृत्तीसाठी दडपण येत असताना व टीका होत असतानाच त्या सगळ्यावर मात करून तू आपल्या टीकाकारांची तोंडं व्यवस्थित बंद केलीस. खरंतर या हार्ड कोर्टवरच्या लढतीतही नदालकडे ९-७ अशी आघाडी होती. ती या विजयाने ९-८ अशी कमी झाली आहे. माझी बायको नादालच्या खेळाची चाहती. या विजयाने माझी पण तिच्याबरोबर लावलेल्या पैजांच्या विजयाची आघाडी अजून एका क्रमांकाने कमी झाली. Lol

पाचव्या आणि निर्णायक सेटमध्येही नदालने ३-० अशी आघाडी घेतली, तेव्हा काळजात कलकलले. वाटले, बहुतेक आज परत इतिहासाची पुनरावृत्ती होणार. पण, जिंकण्याची अवीट उर्मी असलेल्या तुझ्यातल्या त्या खेळाडूने थरारक खेळ करत ३-३ अशी बरोबरी केली. पुढच्या गेममध्ये सर्व्हिस राखत ४-३ अशी महत्वपूर्ण आघाडी घेतली. पुढच्या गेममध्ये नदालने केलेल्या चुकांचा फायदा उठवत त्याची सर्व्हिस भेदत ५-३ अशी आघाडी घेतलीस. माझा आवाज टिपेला पोहोचला होता. चॅम्पियनशिप पॉइंटची संधी असताना नदालने टक्कर देण्याचा प्रयत्न केला, पण तंत्रज्ञानाने शेवटी तुझ्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

तिकडे तुझ्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आणि इकडे माझ्या. विजय मिळाल्यानंतर एखाद्या निरागस लहान बालकाप्रमाणे तू उडी मारलीस. खर सांगतो, तेव्हा मला जाणवले, देव सुध्दा एक माणूस असतो.

“टेनिस हा खूपच कठीण खेळ आहे. त्यात हार किंवा जीत हे दोनच मार्ग असतात. ड्रॉ हा प्रकार असता तर आज मी नादालविरोधात तोही स्वीकारला असता.”

स्पर्धेचं अजिंक्यपद हातात असतानाही एवढी संयत आणि प्रतिस्पर्ध्याचा आदर करणारी तुझी प्रतिक्रिया ऐकून तुझ्याबद्दलचा आदर अधिकच दुणावला. तुझ्या सिंहासनाला सारखे हादरे देणाऱ्या आणि कित्येक प्रसंगी तुला तिथून खाली खेचणाऱ्या नादालची खरीखुरी प्रशंसा करताना तुझ्यातला खरा माणूसही दिसतो. टेनिस विश्वात तुला जेंटलमन प्लेअर म्हणून का ओळखले जाते ते कळाले.

फेडरर-नदाल युग आता शेवटच्या टप्प्यात आहे असं म्हणतात पण जगभरातल्या लाखो टेनिसचाहत्यांसाठी हा काळ त्यांच्या मनातल्या एका कोपऱ्यात कायमच राहणार आहे. तुझ्या निवृत्तीचे संकेत वृत्तपत्रातून वाचले. क्षणभरासाठी का होईना पण मन ही गोष्ट खरी मानायलाच तयार होत नाही. “ये दिल है के मानता नाही.”

जेव्हा आमच्या देवाने निवृत्ती घेतली त्या रात्री जेवणाचे दोन घास सुध्दा घश्याखाली उतरले नाहीत. तूझ्या बातमीने पाणीपण जहाल विषासारखे वाटेल. तेव्हा असाच खेळत रहा व आम्हा चाहत्यांना आनंद देत रहा. कदाचित तुला हरताना पाहताना मनाला लाखो-करोडो इंगळ्या डसतील. पण, तुला खेळताना पाहताना आयुष्याकडे सकारात्मकेने पाहण्याचा दृष्टीकोन वाढतो आणि आमच्या वाढत्या वयाची जाणीव तुझ्यातल्या ऊर्जेला, जिद्दीला पाहून आपोआप गळून पडते. तुला पाहून फक्त एकच विचार मनात येतो,

तो रॉजहंस एकच!

तुझाच एक निस्सीम भक्त

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख Happy
पाचव्या आणि निर्णायक सेटमध्येही नदालने ३-० अशी आघाडी घेतली,>>> नदालने फेडररची सर्विस पहिल्या गेममध्ये भेदली, त्यानंतर २-० अशी आघाडी, मग फेडरर एकही गेम हरला नाही. (मला आठवतं त्याप्रमाणे)

जर, अव्वल मानांकित अँडी मरे आणि द्वितीय मानांकित व गतविजेता नोव्हाक जोकोव्हिच यांचे आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आले नसते तर आम्हां चाहत्यांना या लढतीचा आनंद लुटता आला नसता
>>>>
Asahamat...

छान लेख.
ओबामा पण मायबोलीवर लिहु लागले Happy