मनाचा उत्तम वैद्य -ध्यान

Submitted by दीपा जोशी on 27 August, 2016 - 03:19

मनाचा उत्तम वैद्य -ध्यान

भाग १) प्रस्तावना
या जगात सर्वांची धडपड अव्याहतपणे चालू असते -ती सुख मिळवण्यासाठी. अन्न, वस्त्रं , निवारा या प्राथमिक गरजा भागल्यानंतर यश, पैसा, किर्ती यांच्यामध्ये सुखाचा शोध चालू होतो. पण ‘ पाहिजे होते ते सर्व मिळाले ; आता मी खरा पूर्ण सुखी झालो/झाले ‘ असं ठामपणे माञ आपल्याला वाटत नाही. सर्व काही मिळाल्यावरदेखील अजून काहीतरी कमी आहे अशी मनातली हुरहूर पाठ सोडत नाही. किंवा काम ,क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह या षड -रिपूंच्या तावडीत सापडलेले मन आपल्याला शाश्वत, टिकाऊ आनंद काही मिळवू देत नाही.समर्थांच्या श्लोकांमध्ये म्हटलंय तसं ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे ..’ असा अनुभव सर्वांनाच कधी ना कधी येतो. याच्या जोडीला आधुनिक जीवनशैलीतील ताण आणि तणाव आहेतच.
मन जेव्हा असं अस्थिर आणि असमाधानी होतं तेंव्हा साहजिकच कुठला ना कुठल्या स्वरूपात त्याचा शरीरावर परिणाम होत राहतो . बऱ्याचश्या शारीरिक आजारांचे मूळ मनाच्या अशांती मध्ये असते असं नवं संशोधन सांगतं . बघा, म्हणजे समस्या आणखीच बिघडली! म्हणजे काही झाले तरी मनाची शांती जाऊ नये, मनाचे आरोग्य बिघडू नये म्हणून काहीतरी उपाय करायला हवा.
एक उपाय म्हणजे ‘ध्यान’- असं आपल्या ऋषि- मुनींनी सांगितलं असलं तरी , आधुनिक जगात ध्यान-बिनाच्या भानगडीत पडायला कुणी सहजा - सहजी तयार होत नाही. पण जेव्हा मोठमोठे शास्त्रज्ञ् ,वैज्ञानिक- वर्षानुवर्षे चालणाऱ्या सखोल संशोधनातून तीच जुनी गोष्ट परत उगाळत ध्यानाचे महत्व जगन्मान्य वैज्ञानिक मासिकं , जर्नल्स , परिषदा या माध्यमांतून जगापुढे मांडतात तेव्हा तरी आपणही जरा ‘ध्यान’ समजून घ्यावं हे बरं .
गौतम बुद्धांच्या ध्यान पद्धतीवर संशोधन झाले असून, त्याचा उपयोग मानवी जीवनास व्हावा या हेतूने ध्यानाचा अनेक वर्षे सन्शोधनात्मक अनुभव असणारे जगद्विख्यात वैज्ञानिक, मानसोपचार तज्ज्ञ, तत्वज्ञ, डॉक्टर्स, न्यूरो -सायंटिस्ट,यांची दलाई लामा यांच्याबरोबर एक परिषद ‘ माईंड अँड लाईफ XI ‘ या नावाने २००३ साली अमेरिकेतील MIT(मॅसॅच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ) येथे, आणि दुसरे ‘ माईंड अँड लाईफ XIII ‘ या नावाने २००५ साली अमेरिकेतील वॉशिंग्टन डी सि येथे घेतले गेले होते . तर २०१० साली पुढची परिषद नवी दिल्ली येथे घेतली गेली . दिल्लीच्या परिषदेत योग आणि ध्यानाच्या इत्तर पदध्ती यांवरही चर्चा झाली होती.
२००५ च्या परिषदेचा विषय होता ‘द सायन्स अँड क्लिनिकल ऍप्लिकेशन ऑफ मेडिटेशन’. या परिषदेमध्ये मेंदू व चेतातंतूंचे विज्ञान आणि त्यात ध्यानामुळे होणारे बदल यामुळे आपली क्षमता कशी वाढू शकते अशा अर्थाची चर्चा झाली . तसेच स्वतःला बरे करायची क्षमता प्रत्येकात असते .एवढेच नवे तर सहृदयता, अंतर्मुखता, मनाचा चांगुलपणा अशा गुणांची आत्ताच्या जगाला ताबडतोबीची , आणिबाणीची गरज आहे ; असा या चर्चेचा सूर होता.
वरील परिषदेमध्ये मांडले गेलेले मुद्दे ‘द माईंड’स ओन फिजिशिअन‘ या नावाने प्रकाशित झालेल्या एका पुस्तकात संकलित केले आहेत . त्याचा अनुवाद थोडक्यात मी पुढील काही भागातील लेखनात देत आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ध्याना बद्दल माहिती वाचायला आवडेल.पण सांसारिक जिवनात ध्यानाचा फारसा फायदा होणार नाही असे वाटते.प्रपंच नसलेला व्यक्ति हे करू शकतो .

वाचायला, समजुन घ्यायला आवडेल>>>>> +१

सांसारिक जिवनात ध्यानाचा फारसा फायदा होणार नाही >>>>>> नाही. ओळखीच्या बर्‍याच व्यक्तींनी ध्यानाचा बराच फायदा होतो असे सांगितले आहे.त्याचबरोबर ध्यान ही स्वतः अनुभवायची स्थिती असल्याकारणाने योग्य व्यक्तींद्वारे शिकून घेणे गरजेचे आहे हे त्यांचे मत होय.

फायदा होत असेल पण संकटकाळात त्यांचे वर्तन तसेच शांत राहिल का? या बाबत शंका आहे.

उदा. एखाद्याने पहाटे उठुन दोन तास ध्यान केले मन अगदी शांत झाले.शांत मनाने अॉफिसात गेला तेथे साहेबाने झापझाप झापले तर मन तसेच प्रसन्न राहिल का याबाबत शंका आहे. ध्यानाचा लाभ हा एकाग्रता लाभण्यासाठी होउ शकते असे वाटते.अर्थात मी यातला अधिकारी व्यक्ति नसल्याने पुढील धाग्यांनुसार मत बदलुही शकते.

मन जेव्हा असं अस्थिर आणि असमाधानी होतं तेंव्हा साहजिकच कुठला ना कुठल्या स्वरूपात त्याचा शरीरावर परिणाम होत राहतो . बऱ्याचश्या शारीरिक आजारांचे मूळ मनाच्या अशांती मध्ये असते असं नवं संशोधन सांगतं . बघा, म्हणजे समस्या आणखीच बिघडली! म्हणजे काही झाले तरी मनाची शांती जाऊ नये, मनाचे आरोग्य बिघडू नये म्हणून काहीतरी उपाय करायला हवा.
एक उपाय म्हणजे ‘ध्यान’- असं आपल्या ऋषि- मुनींनी सांगितलं असलं तरी ,)))))))))))))

ऋषी मुनी जे ध्यान करत ते मनासंबंधित समस्येसाठी नव्हे तर तर त्यांना देव भक्तीची आस लागून देवाला प्रसन्न करण्यासाठी..

ध्यान ही अनुभवण्याची गोष्ट आहे. थोरवी समजावून सांगावी अशी गोष्ट नाही. सांगताच येणार नाही. शिवाय पी ह्ळद आणि हो गोरी नसतं. माणूस ध्यान करायला लागला म्ह्णजे दुसर्‍याच क्षणी तो संत पदाला पोहोचला असं होत नाही ना...

आणि ध्यान करायला शिकणं म्ह्णजे ध्यानाबरोबर काही लाईफ टाईम कमिट्मेण्ट देणं नव्हे की कधी सोडता येणार नाही. योग्य व्यक्तीकडून ध्यान करायला शिका. काही काळ अनुभवा मग ठरवा की त्याचा उपयोग आहे की नाही.

आणि ध्यान करायला शिकणं म्ह्णजे काही नॉनव्हेज खाणं नव्हे की ते खाल्लं म्हणून धर्म बुडेल.

सो स्वतः अनुभव घ्या आणि मगच ठरवा उपयोगी आहे की नाही

माझं म्ह्णणं एवढच की सांसारिक माणसांना अधिक गरज आहे ध्यान शिकायची.

समजून घ्यायला आवडेल, उपयोगीही होईल.
<< आणि ध्यान करायला शिकणं म्ह्णजे काही नॉनव्हेज खाणं नव्हे की ते खाल्लं म्हणून धर्म बुडेल.>> हें मात्र माहित नव्हतं !

<<ऋषी मुनी जे ध्यान करत ते मनासंबंधित समस्येसाठी नव्हे तर तर त्यांना देव भक्तीची आस लागून देवाला प्रसन्न करण्यासाठी..>>
<<पण सांसारिक जिवनात ध्यानाचा फारसा फायदा होणार नाही असे वाटते>>
ध्यान हे शारिरिक क्रियेनं सुरुवात होतं. शारिरिक म्हणतेय त्यात शरीर, मन, बुद्धी तिन्ही आलं. तर.. ध्यान हे ह्या तिन्हीचा "वापर" आहे. पण सुरुवातीला.
ध्यान ही जीवन शैली करून त्यातून मोक्ष मिळवणारे ऋषी वगैरे होते. म्हणून कदाचित सचिन म्हणतायत ते <<ऋषी मुनी जे ध्यान करत ते मनासंबंधित समस्येसाठी नव्हे तर तर त्यांना देव भक्तीची आस लागून देवाला प्रसन्न करण्यासाठी..>>
म्हणून असं म्हणतात की ध्यानाचा उपयोग फक्तं मनःशांती किंवा, शारिरीक आजार ह्यांच्यासाठीच करणं म्हणजे एखाद्या बोईंगचे पंख छाटून त्याचा उपयोग बस म्हणून करण्यासारखं आहे.

तेव्हा... आयुष्याचा नक्की उद्देश काय हे जाणून घेण्यासाठी ध्यान करावं. ध्यानानं मनाचा आयाम वाढवायचाय.
त्याचे साईड एफेक्ट्स म्हणजे मनःशांती, एकाग्रता. एकुणात अनारोग्याकडून "आरोग्य" ह्या स्थितीकडे प्रवास इ. इ. आहेत. जिममधे जाऊन विशिष्टं उद्देशानं व्यायाम केल्यानं एका दिवसांत नाही पण हळू हळू शरीराची क्षमता त्या दिशेनं वाढतेच. मनाच्या सुदृढतेसाठी ध्यान करावं. हळू हळू त्याची क्षमता वाढते.
मनाचा समतोल राखता येणं... अगदी घरातल्या किंवा बाहेरच्या बॉसने झाप झाप झापल्यावरही हे शक्य आहे.

तेव्हा कुणी बोईंगचा उपयोग बस म्हणून करत असेल तर का नाही? ध्यान ही ऋषी-मुनींची मक्तेदारी नाही. ती एक जीवनशैली आहे. मला व्यक्तीशः त्याच्या उपयोग झालाय... होतोय. आणि मी संसारी आहे Happy