माझा पहिला मद्यप्रयोग !

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 July, 2016 - 13:00

मायबोली उपभोक्ता क्रमांक ६२११७ आणि ३३२९६ यांनी माझ्या मायबोली धागा क्रमांक ५९४३१ वर प्रतिसाद क्रमांक ५२, ५४, १०५, ११६ आणि ११७ मधून वारंवार केलेल्या विनंती विशेषला मान देत हा धागा काढत आहे. तरी उगाच त्रागा करू नये.

गंमत केली हं, धागा-त्रागा यमक जुळले म्हणून.. बिनधास्त करा Happy

..............................

तर, ‘पाणी हेच जीवन आणि दारू हाच मृत्यु!’ या संस्कारांना सोळा वर्षे उराशी कवटाळल्यानंतर मी अखेर दारूची परीक्षा घ्यायचे ठरवले. लोकं दारूला वाईट वाईट म्हणतात आणि तरीही ती ढोसतात, तर नेमकी ती चीज तरी काय आहे हे स्वत:च चाखून बघूया म्हटले.

दारू म्हटले की पार्टनर हवा. एका हाताने टाळी वाजत नाही तसे एक बेवडा स्वताशीच चीअर्स करू शकत नाही. अश्यावेळी आपण नवखे आहोत तर पार्टनर अनुभवी असावा ईतकीच माफक ईच्छा होती. पण त्याचबरोबर तो जवळच्या मित्रांपैकी नसावा ही अपेक्षाही होती. अन्यथा पिणार छटाकभर आणि बोभाटा गावभर हे नको होते. बुद्धीला ताण देता अब्दुल्ला आठवला!

अब्दुल्ला! आम्ही क्रिकेट खेळायला जायचो त्या गल्लीत एक जुगाराचा अड्डा होता. तिथे तो पार्टटाईम जॉबला होता. माझ्याच वयाच होता, पण त्याचा जॉब प्रोफाईल पाहता तो नक्कीच पोहोचलेला असावा असा माझा कयास होता. तर त्यालाच गाठले. मधल्या काळात त्याचा जुगाराचा अड्डा बंद होऊन तिथे कॅरमचा अड्डा सुरू झाला होता. त्या कॅरमवर लटकलेल्या फोकसच्या प्रकाशात, झळाळून निघालेला त्याचा खूनशी चेहरा पाहून, मला खात्री पटली की हाच तो दिव्यपुरुष, जो आपल्यासाठी या मदिरापान जन्नतचे दरवाजे उघडणार. तो देखील या कल्पनेने खुश झाला. पण माझ्या दुर्दैवाने त्यालाही काही पिण्याचा अनुभव नव्हता.

आमचे संभाषण ऐकत असलेला, जवळच उभा असलेला त्याचा एक मित्र - नाव बेंजामीन - "मी पण, मी पण" म्हणत हट्ट धरून बसला. मी आणखी एका अननुभवी आणि अनोळखी व्यक्तीला सोबत घ्यायला उत्सुक नव्हतो, पण आपल्याला चढली तर कोणीतरी सांभाळायला हवे असा युक्तीवाद करत अब्दुल्लाने मला राजी केले.

कोणी ओळखीचे भेटावे ईतके घराच्या जवळ नाही, तसेच लुडकल्यास घरी पोहोचायचे वांधे व्हावेत ईतके घरापासून लांब नाही, असे एक ठिकाण ठरवण्यात आले आणि लवकरच तो दिवस उजाडला.

मी माझे डार्क ब्राऊन शर्ट आणि जळल्या तसल्याच रंगाची प्यांट घालून तयार झालो. पिऊन कुठे रस्त्यात पडलो, चिखलात लोळलो, तर कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून ही खबरदारी होती. त्याऊपर जास्तीची सावधगिरी म्हणून उग्र वासाचे अत्तरही सोबत घेतले होते. तर या प्रकारे नटूनथटून अर्धा तास आधीच ईच्छित स्थळी पोहोचलो, तर बेंजामीन माझ्याही आधी तिथे येऊन पोहोचला होता. त्याला बघून मला माझे हसू आवरले नाही. तो चक्क पांढराशुभ्र कुर्ता आणि जळली तसलीच विजार घालून आला होता. काय तो कॉन्फिडन्स! मी त्याच्या जवळ जात म्हणालो, "छातीवर एखादे गुलाबही लावायचे होतेस मित्रा. पक्का चाचा नेहरू वाटला असतास." .. तसे त्याचा चेहरा आंबट पडला. मी म्हटले, "जोक होता रे, आवडला नसेल तर ईट्स ओके, सॉरी!" .. तसे तो म्हणाला, "नाही रे ऋ ब्रो, उलट मी तर लाजलो. पण सकाळपासून काय होतेय समजेनासेच झालेय. कुठलेही एक्स्प्रेशन द्यायचे म्हटले की चेहर्‍यावर आंबट भावच येत आहेत... मी काय म्हणतो, खूप कडवट असते का रे? जमेल ना आपल्याला??"

अश्या नकारात्मक विचारांच्या भेदरलेल्या इसमास आपण का घेऊन आलो याचा मला प्रचंड पश्चाताप झाला. पण आता करणार काय होतो. ईतक्यात समोरून अब्दुल्ला येताना दिसला. त्याने आणखी एक मित्र बरोबर आणला होता, जो अनुभवी होता. जास्तीच्या चांभारचौकश्या करता समजले की त्या मित्राला पिण्याचा नाही तर केवळ बारमध्ये जाण्याचा अनुभव होता. आपल्या भावाच्या मित्रांबरोबर एकदा तो बारमध्ये जाऊन लेमन ज्यूस पिऊन आला होता. आमच्या या मोहीमेत बारमध्ये न कचरता कसे शिरावे, तिथे आत्मविश्वासाने कसे वावरावे, काय ऑर्डर करावे आणि समोर ताटात, नव्हे ग्लासात वाढून ठेवलेल्या पदार्थांचा समाचार कश्या पद्धतीने घ्यावा याबाबत तो आम्हाला मार्गदर्शन करणार होता. चला काही हरकत नाही, हे ही नसे थोडके आणि भूक लागली की दोडके, असे मनातल्या मनात म्हणत आम्ही त्याचे स्वागत केले.

"साईश्रद्धा बार!" - नाव पाहताच उगाचच आमच्या घरच्या तस्विरीतले साईबाबा आणि त्याखालची टॅगलाईन ‘सबका मालिक एक’ डोळ्यासमोरून तरळून गेली. बाबांचा आशिर्वाद आपल्या पाठीशी आहे म्हणत बारमध्ये प्रवेश केला. पुढे रघुराम चालत होता आणि त्याच्यामागे वानरासारखे उड्या मारत आम्ही चाललो होतो. मुख्य दारावरच्या दरवानाने न हटकता, उलट सलाम ठोकत आत घेतले तेव्हा माझ्या डोळ्यातून बस्स पाणी यायचे शिल्लक राहिले होते. कारण त्याच वर्षी दोन महिन्यांपूर्वी मी माझ्या आयुष्यातील पहिलावहिला अ‍ॅडल्ट सिनेमा बघायला थिएटरात गेलो होतो. तेव्हा तेथील डोअरकीपरने हाताच्या चिमटीने माझे गाल कुस्करत मला तिथूनच हाकलले होते. त्या पार्श्वभूमीवर हा छोटासा विजयच होता.

बारच्या मुख्य दरवाजातून आत प्रवेश करताच एक अंधुक प्रकाशाची लांबलचक आणि चिंचोळी गल्ली लागली. एखाद्याच्या मनात काय चालू असते हे ज्याचे त्यालाच ठाऊक, पण मला मात्र पक्की खात्री होती की त्यावेळी बारमध्ये पहिल्यांदाच प्रवेश करणार्‍या आम्हा तिघांच्या मनात काय चालू असणार. एक हुरहुर, एक अनामिक उत्सुकता.. ही अंधारी गल्ली संपताच एक प्रकाशझोतात झळाळून निघालेला प्रशस्त दिवानखाना.. असावा सुंदर दारूचा गुत्ता, चंदेरी सोनेरी डिस्कोलाईटचा.. पण हाय रे दैवा, त्या अंधेरी गल्लीच्या दुतर्फा पसरलेली त्याहून अंधेरी दालने हाच बार होता. तिथेच आम्हाला जायचे होते. अपेक्षाभंगातून आलेले नैराश्य तिथेच झटकून आम्ही एका दालनात शिरलो. पण आत शिरताच सत्तर प्रकारचे वास आणि त्यावर कडी करत एक श्वास घुसमटवून टाकणारा दर्प! नव्हे सर्प, आम्हाला विळखा घालून बसला. तिथूनच परत फिरावेसे वाटले. दोन पावले मागच्या दिशेने सरकलोही. तरी मग विचार केला की आपले मुख्य काम दारूची चव घेणे आहे. त्यावर फोकस करू. स्वत:ला थोडा वेळ दिला तर कदाचित येथील वातावरणाशी जुळवूनही घेता येईल.

रघुरामला विचारले, "ईथे फॅमिली सेक्शन नसतो का रे?"

तर त्याचा उलट प्रश्न, "आपण फॅमिली आहोत का रे?"

"चल मग जाऊया घरी.. लग्न झाल्यावर परत येऊया" पाठीमागून बेंजामीन कुजबुजला.

योद्ध्यांचे पाय पिण्याआधीच लडखडत होते. ना पुढे जात होते ना मागे हटत होते. मन बनवण्यातच वेळ खर्ची होत होता. ईतक्यात एका वेटरने हटकले,

- किधर बैठोगे साब?

आमच्या वयाच्या दुप्पट वयाचा म्हणजे साधारण बत्तीसेक वर्षांचा माणूस आम्हा चार सोळा वर्षांच्या मुलांना ‘साहेब’ बोलत होता. बहुधा आमच्या चौघांच्या वयाची टोटल त्याच्या वयाच्या दुप्पट भरत असल्याने बोलत असावा. पण त्याच्या त्या संबोधनाने धीर आला. त्याला आमचा प्रॉब्लेम सांगितला. तसे त्याने शेजारच्या एका दालनाकडे बोट दाखवले. तो देखील काही फॅमिली सेक्शन नव्हता. पण तो नॉन स्मोकिंग झोन होता आणि हा स्मोकिंग झोन होता. त्या जीव गांगरून टाकणार्‍या दर्पाचा आता आम्हाला उलगडा झाला. आयुष्यात कधी सिगारेट प्यायची नाही हा निश्चय करतच आम्ही तिथे प्रस्थान केले.

तिथे जाऊन स्थानापन्न होतो न होतो तोच तेथील वेटरने हातात मेनूकार्ड आणून दिले. पण त्यात डोके न खुपसता आम्ही आजूबाजुच्या टेबलवर डोकावू लागलो. प्रामुख्याने दोन प्रकार आढळले. एक व्हिस्की आणि एक बीअर. व्हिस्की पिणारे छोटे छोटे घोट मारत होते आणि तोंड किंचित वेडेवाकडे करत होते. तर बीअर घेणारे मोठमोठे घोट घेऊनही चिल्ल मारत होते. त्यावरून बीअर हा आत ढकलायला कमी त्रासदायक प्रकार असावा असा निष्कर्श काढून आम्ही आमच्या कारकिर्दीची सुरुवात बीअरने करायचे ठरवले.

एक बीअर! मी ठसक्यात ऑर्डर केली.

एक चिल्लड् किंगफिशर स्ट्रॉंग बीअर! रघुरामने ऑर्डर विस्तारीत केली. और शायद ईसी को एक्सपिरंन्स कहते है, असे मनातल्या मनात म्हणत मी मनातल्या मनातच त्याचे कौतुक केले.

वेटर मात्र अजूनही थांबला होता. आळीपाळीने आम्हा चौघांच्या तोंडाकडे अविश्वासाने बघत होता. ईतकी बाळबोध ऑर्डर त्याला का समजत नव्हती याचा आम्हाला अर्थबोध होत नव्हता. आमचे काही चुकले का मित्रा, असे त्याला विचारावे ईतक्यात तोच म्हणाला, ईतनाही?? बस्स एक बीअर.. और क्या लाऊ?

एक शेवचकली
एक पाकिट खारा काजू
एक मसाला पापड
एक प्लेट तळलेल्या कोलंबीचे तुकडे ..

त्याने और क्या विचारायचा अवकाश, आम्ही धडाधड एकेक करत आमच्या आवडीचे चखना आयटम सांगितले.. त्याच्या चेहर्‍यावरच्या अविश्वासाची जागा आता कुत्सितपणाने घेतली होती. त्याच कुत्सितपणाने हसत तो तिथून निघून गेला.

विविधरंगी, विविधढंगी, आणि त्याच्या रोजच्या सवयीची नसलेली, म्हणजेच ‘दारू कम और चखना ज्यादा’ ऑर्डर पुर्ण करायला त्याला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागणार असे म्हणत आम्ही बसल्याबसल्या, पहिल्यांदाच शांतपणे आजूबाजुचा माहौल न्याहाळू लागलो.

मी दूरवर नजर लावली. समोरच्या दालनाचा दरवाजा फक्त पाचच क्षणांसाठी उघडला. आणि बंद झाला. पण त्या पाच क्षणांत जे दिसले ते माझ्या हृदयाचे ठोके दसपट वाढवून गेले.

आईशप्पथ! समोरच्या दालनात दारू सर्व्ह करायला मुली आहेत.. मी किंचाळलोच.

कुठे कुठे, म्हणत माझ्या शेजारी बसलेल्या अब्दुल्लाने आपले डोळे गरागरा फिरवले. फार वाट पहावी लागली नाही त्याला. पुढच्याच मिनिटाला दरवाजा पुन्हा उघडला आणि त्यानेही तो अजब गजब नजारा पाहिला. दार बंद होताच त्याने रघुरामकडे अगतिक नजरेने पाहिले आणि म्हणाला, "भाईजान, आपण तिथे का नाही गेलो?"

रघुरामलाही बहुधा याची कल्पना नसावी. पण तरीही तो सावरून म्हणाला, "काही नाही रे, उगाचच दुप्पट पैसे लावतात. आपल्याला दारू पिण्याशी मतलब, कोणीही का सर्व्ह करेना, चव बदलणार आहे का?"

पॉईंट होता!

पण त्यात ईतका दम नव्हता.

कारण, ईथे अब्दुल्लाची नजर त्या दरवाज्यावरून हटत नव्हती, तर बेंजामीन आपण पाठमोर्‍या टेबलवर का बसलो म्हणून हळहळत होता. आणि खुद्द रघुराम आपल्याला याचे काही कौतुक नसल्याचा आव आणत चोरून चोरून बघत होता.

पण, सोनेरी चंदेरी वळणदार बाटली टेबलवर हजर होताच सर्वांचे लक्ष तिच्यावर केंद्रीत झाले. वेटर ती चार ग्लासात ओतणार ईतक्यात, तो नेमके आपल्यालाच जास्त ओतेल, या भितीने आम्ही चौघेही ओरडलो, "नको नको, आमची आम्ही घेऊ." तसे तो वेटर निघून गेला.

आम्ही पुन्हा आजूबाजुच्या टेबलवर पाहिले. लोकं ग्लासात थोडी दारू घेत होते, वरतून थोडे पाणी टाकत होते, आणि सर्वात शेवटी त्यात बर्फाचे खडे सोडत होते.

आम्हीही तसेच करायचे ठरवले. पाव पाव ग्लास बीअर घेतली. आणि उरलेला ग्लास पाण्याने भरणार ईतक्यात, पुन्हा तो वेटर मध्ये कडमडला. आमच्या हातातील पाण्याचा जग खेचून घेतला आणि असा काही लूक दिला, की त्याने एकही शब्द न ऊच्चारता आम्हाला आमची चूक समजली. बाटलीतील बीअर त्यानेच मग सर्वांना समसमान वाटून दिली.

आम्ही सर्वांनी आपापले ग्लास उचलले. चीअर्स केले. आणि पुन्हा खाली ठेवले. चौघे जण आता एकमेकांमडे टकामका बघत होतो. पहिला घोट कोण घेणार?

आणि ईथे माझ्यातला ‘रिशी पकूर’ जागा झाला. अश्यावेळी हा बहुमान पटकवायला मी फार उत्सुक असतो. कारण एखादा पराक्रम जो पहिला करतो त्यालाच जग ओळखते, दुसर्‍याला तितकीशी किंमत नसते. असे कुठेतरी वाचले होते.

तर मी तो ग्लास उचलला आणि लावला तोंडाला. सरबताचा घोट घ्यावा तसे प्यायलो. घशाखाली उतरणे दूरची गोष्ट, तोंडातलेच पचकन चूळ मारून थुंकावे असे वाटून गेले. निम्मे त्याच ग्लासात ओतलेही. काही का असेना! दारूचा स्पर्श माझ्या तोंडाला झाला होता. दारूची चव मी चाखली होती. माझे आयुष्यातील पहिलेवहिले मद्यप्राशन झाले होते. मी अधिकृतरीत्या ‘बेवडा’ झालो होतो!

माझीच री अब्दुल्लाने ओढली. त्याने माझे जवळून निरीक्षण केले असल्याने त्याने छोटासाच घोट घेतला. त्याचे वेडेवाकडे तोंड बघून मला आरसा बघत असल्याचा भास झाला. आता सारे बेंजामीनकडे बघू लागले. पण ग्लास उचलतानाचा त्याचा गळपटलेला हात बघून आम्ही काय ते समजलो.

वासरात लंगडी गाय शहाणी म्हणतात, पण ईथे वासरेच लंगडी होती. रघुराम मात्र त्यातल्या त्यात मोठा वासरू होता. त्या बिरुदाला जागत त्याने आपला कोटा संपवला. अगदी टॉप टू बॉटम म्हणता येणार नाही, कारण ग्लास अर्ध्यापेक्षा कमीच भरला होता. मात्र जिथवर भरला होता तिथून बॉटमपर्यंत त्याने एकाच दमात रिचवला. आणि ग्लास टेबलवर आदळून मोठ्याने "हांह" केले. त्या ‘हांह’ चा अर्थ नक्की काय होता त्याचे त्यालाच ठाऊक, मात्र ईथे बेंजामीनची आणखी टरकली.

मी न राहवून त्याला म्हणालो, "अरे मित्रा बेंजामीन, तू ख्रिश्चन असून सुद्धा इंग्लिश दारू प्यायला ईतके आढेवेढे का घेत आहेस?"

तसे तो म्हणाला, "भाई कोण ख्रिश्चन? मी ज्यू आहे ज्यू .."

"अरे मग आम्ही काय चु आहोत का चु? दारू सर्व धर्मांना सारखीच प्रिय! आता पितोयस मुकाट्याने की पाजू?" मी चेकाळलो.

तसे भितीने बेंजामीनचा चेहरा आणखी आंबटशार झाला.

आता मी खरेच वैतागलो, "आता बस्स झाले हा बेंजामीन गोन्साल्वीस.. ईनफ इज इनफ!"

"हायला!, तुला माझे पुर्ण नाव कसे समजले?" बेंजामीनचा चेहरा आश्चर्याने आणखी आंबट पडला.

मी कपाळाला हात लावला. उचलला ग्लास आणि बेंजामीनच्या तोंडाला लावला. रघुरामने पुन्हा आपला एक्सपिरंन्स दाखवत त्याचे नाक दाबले. अब्दुल्लानेही आपला आतातायीपणा दाखवत ग्लासला मागून धक्का मारला. आणि तोंडात दारू घ्यायला कचरणारा बेंजामीन, अखेर नाकाने दारू प्यायला.

...

पुढची पंचवीस मिनिटे बेंजामीन डोके गरगरतेय म्हणून धरून बसला होता.

अब्दुल्ला छातीवर हात धरून उचक्या काढत होता.

रघुरामने या संधीचा फायदा उचलत त्याच्याशी आपली जागा बदलून घेतली होती. आणि तो आता समोरच्या मुलींच्या दरवाजाकडे नजर लावून बसला होता.

मी मात्र ईमानईतबारे चौंघांच्या वाटणीचा चखणा संपवत होतो.....

तो संपल्यावर मगासचा वेटर पुन्हा आला. यावेळी तुच्छतेने हसला. आणि आमच्या हातात बिल कोंबत आम्हाला एक्झिटचा दरवाजा दाखवला.

....

स्टोरी इथेच संपत नाही.

त्या रात्री मला फार भयानक स्वप्न पडले...

असाच आम्हा चौघांचा एक दारूचा कार्यक्रम झाल्यावर आम्ही बारमधून बाहेर पडलो. ते टॅक्सी पकडून घरी गेले, तर मी दादर चौपाटीवरच्या एका घोड्यावर टांग मारली. माझ्या तोंडच्या दारूच्या वासाने घोड्यालाही झिंग चढली आणि तो अचानक उधळला. कदाचित अरबी घोडा असावा. कारण त्याने मला थेट अरबी समुद्रात नेऊन आदळले. माझ्या अंगातली चरबी एका क्षणात बाहेर निघाली. आणि मला तडक कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करावे लागले. तिथे एका प्रशस्त जनरल वॉर्डमध्ये मी जमिनीवर मधोमध झोपलो होतो. माझ्यासभोवताली तीन खाटांवर तीन मुले झोपली होती. ज्यांचे रक्त मला एकाच वेळी चढवले जात होते.

होय! तुम्ही बरोबर ओळखलंत!

ती तीन मुले होती रघुराम, अब्दुल्ला आणि बेंजामीन. त्यांचे अल्कोहोलयुक्त तांबडे रक्त वेगाने माझ्या शरीरात मिसळत होते आणि तितक्याच वेगाने शरीरातून आत्मा बाहेर पडावा तसे माझ्या रक्तातील पांढर्‍या पेशी बाहेर पडत होत्या. ते द्रुश्य पाहून आजूबाजूला दबा धरून बसलेले कित्येक रोगांचे काळेकरडे विषाणू, दात विचकावत माझ्या शरीरात शिरत होते. माझ्या नरड्याचा आतल्या बाजूने घोट घेत होते. आणि मी हताश निराश हतबल, जमिनीवर पडल्यापडल्या एकच विचार करत होतो. एकदा का हे स्वप्न संपले, की आयुष्यात पुन्हा कधी दारूच्या वाटेला जायचे नाही.

बस्स, आजपर्यंत तरी त्या रात्री स्वत:लाच स्वप्नात दिलेले ते वचन निभावण्यात यशस्वी ठरलोय Happy

यापुढे मात्र कसे वागावे हे तुम्ही मला प्रतिसादांत सुचवा ..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दारूबंदी भाषण क्र. "x"

while x tends to इन्फिनिटी.

ओ पळपुटे रुन्मेस, पहिलं अर्धवट उष्टावून ठेवलं ते पूर्ण करा. मग नवी चपाती कुरतडा.

काय त्रासे! तिथे १३ छोटे प्रतिसाद. मग उत्तर देनारच अशी घोषणा. अन मग इथे नवा धागा.

खिक्क!

ती तीन मुले होती रघुराम, अब्दुल्ला आणि बेंजामीन.
<<

स्वतःला मूर्ख बनवणे. अमर अकबर अँटनी जुने झाले, म्हणून नवी नांवं शोधली. फिक्शन तरी किती लिहावं माणसाने!

*

पहिली दारू पिण्याआधीच गटारात लोळण्याची खात्री असल्याने ब्राऊन पँट व शर्ट.

>>त्याने और क्या विचारायचा अवकाश, आम्ही धडाधड एकेक करत आमच्या आवडीचे चखना आयटम सांगितले.. <<
दारूसोबत चखना आयटम आवश्यक हे डीऽप ज्ञान सोळाव्याच वर्षी. इतकेच नव्हे, आपापल्या आवडीचे चखना आयटम असतात बरं का. शिवाय सोळाव्या वर्षी मुंबईतल्या बारमधे दारूसोबत फुकट मिळणारा चखना सोडून काजूबिजू विकत घेण्याइतका पॉकेटमनी चाळीत राहणार्‍या रुन्म्याला 'भेटत' होता. यार ठीकै, येडी घालावी माणसाने. पण किती?

तिथे बायका दारू सर्व करतात हे नवे ज्ञान!

देवा, या भाऊला माफ कर, अन याला पुढच्या जन्मी थोडं खरं बोलायला शिकव, ही नम्र विनंती.

>>
रात्रीच्या वेळी मोबाईलवरून मैत्रीणीशी चॅट करता करता अध्येमध्ये येथील पोस्ट लिहित होतो त्यामुळे एकेक मुद्दा घेत होतो आणि ईतक्या अंतराळाने पोस्ट येत होत्या. गैरसोयीबद्दल क्षमस्व. बाकी चांगले मुद्दे एकत्र संकलित झाले पाहिजे या मताचा मी देखील आहे स्मित

आपल्या आताच्या पोस्टला मात्र आता ऑफिसात पोहोचत असल्याने त्वरीत उत्तर देता येणार नाही. पण अर्थात, देणार जरूर स्मित
<<

हे 'तिकडूण' साभार.

आज मैत्रिणीशी चॅट नाही वाट्टं? की हापिसात कामचुकारपणा केलात? एकदम मस्त चार हात लांबीचा धागा पाडलात म्हणून इच्चरतोय...

अन "देणार जरूर स्मित"चं काय झालं? अच्चे दिन चे वादे होते की काय?

इथे मी फुरसतीत एकेक मुद्दा 'घेणारे' Wink

लोल्स!!

कै च्या कै लेख आहे. उगीच ओढून ताणून विनोद तयार करायचा प्रयत्न केला आहे.

प्यायला गेलात कुठे तर "साईश्रद्धा बार" मध्ये? आणि एकदम किंगफिशर स्ट्राँग?

मोहितो, मार्टिनी, मार्गरिटा तरी ट्राय करायचे ना?

मोहितो ट्राय करा. आय मीन चाखुन बघा. Biggrin
काय प्यायलात ते कळणारच नाही.

जमल्यास मिपा वरची कॉकटेल लाऊंज मालिका वाचा.

हे चाखायचे, निभावयाचे कसब असावे लागते. येरागबाळ्याचे काम नोहे!

आणि हो श्रेयनामावलीसाठी धन्यवाद!!

कांदाजी, का लेकराला बोलताय अजूनही?

ऋन्मेष, दारू फार फार वाईट असते. जगातली सगळी दारू पिऊन संपवून टाक!
Wink

ऑन अ सिरीयस नोट , मी कधीच दारू पिणार नाही, प्यायलो तर मला कधी चटक लागणार नाही, चटक लागलीच तरी मी बेवडा बनणार नाही अश्या वल्गना करणारे कित्येक दारूच्या नादाने वेडे झालेले पाहिलेत.
तुला ही सवय नसेल तर मुळीच लावून घेऊ नकोस.
तुझ्या त्या ५९४३१ धाग्यावरचे हर्पेन यांचे प्रतिसाद अत्यंत योग्य आहेत.

आणि हो, हा लेख मस्तं झालाय हां , एकदम पकाऊ!
तुला पकाऊच बनवायचा होता ना?

साती, तसा हेतू तर नव्हता. लिखाण उत्स्फुर्त नसल्याने, कोणाला तरी प्रतिसाद देण्यासाठी लिहिता लिहिता मोठे झाल्याने तसे झाले असावे.

बेफिकीर, हा हा, हो खरेय Proud
धन्यवाद Happy

कांदाजी, मी हा धागा काढला याचा अर्थ तो धागा सोडला असे होत नाही. तिथे तुमच्या मुद्द्यांना उत्तरे देणार आहेच.
एकंदरीतच सोशलसाईटवर हा प्रकार फार दिसतो. एखाद्या चर्चेच्या मध्ये कोणी पाच मिनिटांसाठी बाथरूमला गेला तर सहाव्या मिनिटाला समोरच्याची पोस्ट असते, पळाला पळाला.. अहो कुठे पळणार मी, फक्त काय आधी करायचे आणि नंतर याच्या प्रायोरीटी ठरवतो. तिथे मानव पृथ्वीकर यांनी आपल्या पोस्टना छान उत्तर्र् दिलीत ती आधी पटताहेत का पाहिले ईतकेच. अन्यथा माझा एखादा धागा शतकी करायला आपण मदत करत आहात आणि मीच आपली साथ देणार नाही हे शक्य तरी आहे का Happy

एखाद्या चर्चेच्या मध्ये कोणी पाच मिनिटांसाठी बाथरूमला गेला तर सहाव्या मिनिटाला समोरच्याची पोस्ट असते, पळाला पळाला..
<<
हो का? दोन दिवस बाथरूमातच का? Wink

मी तुमच्याशी बोलतो आहे. त्यांच्याशी बोलेन तेव्हा त्यांना प्रश्नोत्तरे देईन. माझ्या प्रश्नांची उत्तरे सोडून तिसरे ताणू नका. बोलायला जमत नसेल, तर तसं सांगा Lol

दारु आणि सिगारेट ह्या स्वतःसाठी आणि प्रियजंनाच्या आयुष्यासाठी इतक्या घातक आणि जीवघेण्या गोष्टी आहेत की गम्मत म्हणूनही कुणी असे प्रयोग करु नये. एकदा का चव चांगली लागली की माणूस परत परत त्याच्या वाट्याला जातो आणि मग अशा सवयी मरेपर्यंत पिच्छा सोडत नाहीत आपला. सो प्लीज स्टे अवे!

तर त्याचा उलट प्रश्न, "आपण फॅमिली आहोत का रे?"

"चल मग जाऊया घरी.. लग्न झाल्यावर परत येऊया" पाठीमागून बेंजामीन कुजबुजला.>>>>>>>

हसुन हसुन पोट दुखले, खुप छान अशेच तुमचे अनुभव लिहित रहा.

मित्रा...आपल्याला बुवा आवडला रे लेख..झ्याक.... Lol

"भाई कोण ख्रिश्चन? मी ज्यू आहे ज्यू....अरे मग आम्ही काय चु आहोत का चु?" हा हा हा हा !!

हे ललित कथा मधे ढकला.
>>>>

हो. हे आधीच करायला हवे होते. चुकून कथामध्ये काढल्याने काही जणाना हा अनुभव किंवा यातील काही तपशील काल्पनिक वाटत आहेत Happy

दारु आणि सिगारेट ह्या स्वतःसाठी आणि प्रियजंनाच्या आयुष्यासाठी इतक्या घातक आणि जीवघेण्या गोष्टी आहेत की गम्मत म्हणूनही कुणी असे प्रयोग करु नये. 

>>>>

सहमत बी.
म्हणूनच हा अनुभव शेअर केला.
यात काहीही मजा, थ्रिल नसते हे सांगायला.

लेखात सुरवातीचे पंचेस भारी आहेत, शेवटी शेवटी जरा कंटाळवाणा झाला. पण एकंदरीत मजा आली.

और शायद ईसी को एक्सपिरंन्स (खिलाडी) कहते है > चक दे मधला माझ्या आवडत्या सीनमधला आवडता डायलॉग Happy

Happy

आणि हो ऋन्मेष, त्या कांदा आयडीने ज्या भाषेत प्रतिसाद लिहिले आहेत ते वाचुन त्यांना उत्तरे देण्याची अजुनही तुमची इच्छा आहे हे वाचुन कौतुक वाटले. Happy

छान लिहिल आहे. मनोरंजन झालं वाचून.
बरोबर च्या मित्रांची सुरुवात ही अशीच झालेली आठवते १५-१६ च्या वयात.
बरेच वेळा peer pressure मुळे सुद्धा तरुण मुलं दारू च्या वाट्याला जातात.

दारु आणि सिगारेट ह्या स्वतःसाठी आणि प्रियजंनाच्या आयुष्यासाठी इतक्या घातक आणि जीवघेण्या गोष्टी आहेत की गम्मत म्हणूनही कुणी असे प्रयोग करु नये. एकदा का चव चांगली लागली की माणूस परत परत त्याच्या वाट्याला जातो आणि मग अशा सवयी मरेपर्यंत पिच्छा सोडत नाहीत आपला. सो प्लीज स्टे अवे!
+१११११

माझा पहिला किस प्रयोग पण होऊन जाऊदे. मी घेतलेला पहिला किस आणखी काय काय ते .
किती किती प्रयोग ते. ऋणम्या तुला साष्टांग रे Happy

सुनिधी धन्यवाद,
माझी मायबोली वा एकंदरीतच सोशल साईटवर वापरायची स्टाईल फार साधी आणि सिंपल आहे. माझ्यावर ईथे कोण टीका करतेय वा कोण माझे कौतुक करतेय हे मला तात्काळ विसरून जाता यावे याप्रकारे मी त्या पोस्टला इग्नोर करतो. अन्यथा त्याचा परीणाम आपल्या पुढील चर्चेवर होतो. कोणी चिथवल्याने चिडणे किंवा कोणी कौतुक केले म्हणून हुरळून जाणे, दोन्ही वाईटच. कारण मग एखाद्याला आपण आपला टिकाकार समजू लागतो आणि त्याचे चांगले मत पाहूनही नाक मुरडतो किंवा ते खोडायला जातो. किंवा एखाद्याने आपले कौतुक केले म्हणून त्याला आपला हितचिंतक, समर्थक वगैरे समजू लागतो आणि त्याच्या चुकीच्या मताकडेही कानाडोळा करतो किंवा वाह वाह करत प्लस वन देतो.

असो,
ज्यांना हा लेख आवडला, मनोरंजक वाटला त्या सर्वांचे धन्यवाद Happy
तांत्रिक अडचणींमुळे जळळपास नव्वदपंच्याण्णव टक्के मोबाईलवरच लिहिणे झालेले. अन्यथा एवढी मोठी पोस्ट याआधी कधी मोबाईलवर लिहिली नव्हती. मेहनत अगदीच फुकट नाही गेली Happy

सुजा, स्पेशल धन्यवाद, पुढचा विषय फार भारी सुचवलात... भले लिहेन न लिहेन, पण आज त्या आठवणींत झोप तरी छान येईन Happy

तेव्हा चक दे नुकताच रिलीज झाल्याने माझ्या मनात तो डायलॉग आला असावा स्मित
>>
चक दे २००७ मध्ये रिलीज झाला होता.
२००७ : वय १६
२०१६ : वय २५

मग खुप लहानच आहेस की. मी पण ३० वर्षांपर्यंत कट्टर दारु विरोधी होतो.
जेव्हा प्यायली तेव्हा इतके वर्षे उगाचच नाक मुरडत होतो हे कळे.

आता त्या वयात विदेशात राहूनही अस्सल स्काॅच न चाखल्याचा पश्चात्ताप होतोय. Proud

ऋन्मेऽऽष बघ बर झालं ना सुचवलं ते Happy
<<आज त्या आठवणींत झोप तरी छान येईन >> आजच कशाला रोजच छान झोप Wink

माझ्या तोंडच्या दारूच्या वासाने घोड्यालाही झिंग चढली

दारू पिऊन घोड्याचा मुका घ्यायला जावेच कश्याला म्हणतो मी ऋन्मेष भाऊ!! . का तुमच्यावर सुप्रसिद्ध हडळीचा मुका नामक प्रकाराने गारुड घातले होते

Dhagyache title vachunach kalale konacha asel te ...lekh changla ahe but kalpanik vatato (as usual Happy )

N about last dhaga "lok daru ka pitat" che answer pn ahe ya lekhat , tuzyasarkhe try kartat aadhi n mg tyachya aahari jatat..

'Tu' mhnale mhanun rag ala asel tar sorry....
Ky ahe na indirectly age kalale ahe na so te lihle gele ..

साती ताई, तो ऋ आहे तो काहीही करू शकतो!! त्याच्या कल्पनेचा वारू (मद्य अन मुक्याशिवायच) तुफान उधळतो कायम

भाग्या, नो प्रॉब्लेम. खरे तर मला कोणी अरे तुरे केल्यास आनंदच होतो. फक्त वाईट एकाच गोष्टीचे वाटले की जी गोष्ट तुम्हाला माझ्या विचारांवरून समजायला हवी होती तिच्यासाठी असे संदर्भ गरजेचे झाले Wink

सोन्याबापू_>>.
दारू पिऊन घोड्याचा मुका घ्यायला जावेच कश्याला म्हणतो मी ऋन्मेष भाऊ!!
>>>>

गूड ऑब्जर्वेशन बापू. पण थोडे रीडींग बीटवीन द लाईन्स की काय असते ते तिथे आहे.
आपल्या तोंडच्या दारूच्या वासाचा त्रास एखाद्याला मुका घेण्याईतपत जवळ गेल्यावरच होतो या सोयीस्कर गैरसमजावर केलेली ती एक टिप्पणी होती.
घोड्यावर बसायच्या नॉर्मल पोज मध्ये आपण आणि घोडा यांच्या तोंडात जेवढे अंतर असते तेवढे त्रास देण्यास पुरेसे ठरते. अर्थात जे पित नाहीत त्यांनाच हा त्रास समजतो. जे पितात त्यांचे नाक त्या वासाला सरावलेले असल्याने त्यांना काही वाटत नाही ईतकेच.

असो सोन्याबापू, तरी बरे झाले तुम्ही आलात. मला सांगा आर्मीमध्ये दारू नक्की कोणत्या कारणास्तव देतात? आर्मीचे नाव घेऊन परवा त्या दुसर्या धाग्यावर दारूचे उदात्तीकरण करायचा छोटासा प्रयत्न झाला होता. त्यासंदर्भात नेमके कारण जाणून घ्यायचे होते.

घोड्याचा मुका घ्यायची वेल का यावी .
>>>>

गूड वन श्री !
चांगला अर्थ काढलात..
कारण मी नशेत होतो..
घोड्याच्या चेहर्याजागी मल आणखी कोणाचा तरी चेहरा दिसला असावा..
सारे फसाद की जड दारू..

ख्खिक्क .... ऋन्मेषचा कोणताही धागा प्रतिसादांतुन बहुतेकवेळा मनोरंजन करतोच करतो. Proud

बाकी ऋ, 'अन्यथा त्याचा परीणाम आपल्या पुढील चर्चेवर होतो. कोणी चिथवल्याने चिडणे किंवा कोणी कौतुक केले म्हणून हुरळून जाणे, दोन्ही वाईटच. कारण मग एखाद्याला आपण आपला टिकाकार समजू लागतो आणि त्याचे चांगले मत पाहूनही नाक मुरडतो किंवा ते खोडायला जातो. किंवा एखाद्याने आपले कौतुक केले म्हणून त्याला आपला हितचिंतक, समर्थक वगैरे समजू लागतो आणि त्याच्या चुकीच्या मताकडेही कानाडोळा करतो किंवा वाह वाह करत प्लस वन देतो.' >> हे बाकी छान हो.

mala ter khup aavadla ..office madhe evdhi hasley ki aajubajuche veglya najrene pahat aahet Happy

जबरदस्त राव, हे काल्पनिक/अकाल्पनिक हा विचार आपण बाजूला ठेवू
पण खरोखर अप्रतिम लिहिलं आहे, मला वाटते तुम्ही खूप चांगले कथा लेखक होऊ शकाल/असाल

Pages