मी पाहीलेला अपघात...!!

Submitted by मोकाट on 17 February, 2009 - 04:32

'मी पाहीलेला अपघात...!!'

हे वाक्य ओळखीचे वाटते ना?
लहानपणी निबंधलेखणाचा हमखास विषय होता हा! तसे बाकीचे नेहमीचे विषय म्हणजे 'माझी आई', 'माझा आवडता ॠतु', 'माझा आवडता पाळीव प्राणी' वगैरे वगैरे. मी एकदा आमच्या कुत्र्यावर निबंध लिहीला, मग दोन-तीन पावसाळे लिहून झाल्यावर, एकदा अपघातावर निबंध लिहीला व तोच अपघात मी अगदी नववीपर्यंत लिहीत होतो!

तर हा असाच एक 'मी पाहीलेला अपघात...' आहे.
हा प्रसंग पुण्यातला आहे. तसा मी कोल्हापुरचा आहे, पण विद्येच्या माहेरघरात पदव्युत्तर शिक्षणासाठी आलो होतो.

पावसाळ्याचे दिवस....सकाळची वेळ....मी आणि माझा मित्र पक्या, (नेहमीप्रमाणे) पहिले लेक्चर बंक करून कॉलेजसमोरच्या आण्णाच्या टपरीवर चहा पीत उभे होतो. रात्रभर पाऊस झाल्यामुळे (पुण्याच्या महान) रस्त्यांवर पाणीच पाणी होते, ठिक ठिकाणी पाण्याची डबकी साचली होती, काही ठिकाणी चिखलामुळे रस्ता निसरडा झाला होता. लहान मुले पांढरी-खाकी कपडे घालुन लगबगीने शाळेत चालली होती. काही नोकरदार लोकं बससाठी थांबलेली दिसली, काही बसमागे धावत होती. कॉलेजची पोरे गाडीवरून जाता जाता कुणा पोरीच्या अंगावर मुद्दाम पाणी उडवत (पोरींच्या शिव्या खात खात) जात होती.
आम्ही उभे असलेल्या रस्त्याला काटकोनात मोडणार्‍या कर्वे रोडवर, शाळेच्या-कंपनीच्या बसेस, कार, दुचाकी वाहाने, सायकली यांची नुसती वर्दळ चालू होती....

आण्णाने नुकत्याच तळलेल्या भज्यांचा मस्त वास सुटला होता...
'आण्णाSSS, दो प्लेट भजी दे दो.' पक्या.
'हां एक मिनिट..देता हूं.' आण्णा.
'पक्या....तुला मराठी येत नाही काय? त्या आण्णाशी तू हिंदीतून कशाला बोलतो रे?' मी वैतागून विचारले.
'अरे तो आण्णा साऊथ ईंडियन आहे ना? त्याला मराठी येत नाही.'
'अरे तुम्हा लोकांमुळेच सोकावलेत त्याच्यासारखी लोकं.'
'अरे तसे नाही रे...'
'तू गप रेSSSS....' मी वैतागून म्हणालो.

मला खरे म्हणजे कधी कधी या नॉन महाराष्ट्रियन लोकांचा फार राग येतो. आता हा आण्णा- कुठला कर्नाटक की आंध्रातला आहे म्हणे, गेली ६-७ वर्षे इथेच रहातोय, आतापर्यंत मराठी शिकला नाही काय? आता आपली महाराष्ट्रियन लोकं फारच adjust करून घेतात बुवा...त्याच्याशी आमची शंभर लोकं हिंदीतून बोलणार...म्हणजे शंभर लोकं, त्याला मराठी येत नाही म्हणून हिंदीतून बोलणार. त्यापेक्षा आण्णाला मराठी शिकायला काय प्रॉब्लेम आहे? आता एकासाठी शंभरांनी adjust करायचे का शंभरांसाठी एकाने?

अर्थातच.....ही माझी फिलॉसॉफी आहे....(जिला कोणीही भिक घालत नाही!)

तशीही मराठी आणि हिंदी थोडी थोडी सारखी असल्याने आणि वर बॉलिवूडचा फारच प्रभाव असल्याने, लहानपणापासूनच आपण 'जानीSSS जिनके घर शिशे के होते है... ', 'बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना!...', 'मै तुम्हारे बच्चे की मां बनने वाली हूं!', 'राहुल... नाम तो सुना होगा', 'तेरा तेरा तेरा सुरुंSSSSSSSSSSSर' वगैरे वगैरे ऐकत
मोठे होतो, त्यात आपला काय दोष?

मी मात्र अशा आण्णासारख्या लोकांशी मुद्दामच मराठीत बोलतो...कुणी पत्ता विचारला की मराठीतच सांगतो...म्हणजे अगदीच गयावया केल्याशिवाय हिंदीवर किंवा ईंग्लिशवर येत नाही...(अगदी पोरींनापण सोडत नाही!). माझे मित्र मला खडुस, नालायक वगैरे वगैरे म्हणतात, पण मी आपला मराठी बाणा सोडत नाही.

तेवढ्यात आण्णाने दोन प्लेट भजी पुढे केली.....मी पण मग सगळे विसरून (बहुतेक पोटातल्या आगीने डोक्यातल्या आगीवर मात केल्याने).....भजी गिळून गप्प झालो!

भजी खात खात आम्ही इकडे तिकडे (पोरी) बघत उभे होतो. सकाळी सकाळी सुंदर चेहरे बघितले की दिवस कसा मस्त जातो!

तसेही पुण्यात पोरींचे चेहरे बघायचे भाग्य कमीच लाभते!...कायम नुसत्या ममी (मम्मी नव्हे!) होऊन फिरत असतात. डोक्यापासून पायाच्या नखांपर्यंत (अपादमस्तक काय?) रंगीबेरंगी कपड्यांनी गुंडाळलेल्या असतात. चेहर्‍यावर रंगीबेरंगी दुपट्टा की मफलर गुंडाळलेला.....डोळ्यांवर गॉगल.
पोरांनी करायचे तरी काय?

मागे एकदा माझा ३-४ वर्षांचा पुतण्या पुण्यात आला होता. तो....हे असले सोंग(ममी) बघितले की, घाबरून 'बागुलबुवाSSSSSSSSSSS.....' करत रडायचा!

एकदा मी आणि पक्या कॉलेजला जात होतो...मी गाडी चालवत होतो...सिग्नलला थांबलो असताना, बाजूला थांबलेल्या गाडीवरची मुलगी (डोका-तोंडाला मफलर....डोळ्यांवर गॉगल) माझ्याकडे एकटक पहात होती...
पक्या तिच्याकडे बघत म्हणाला...'सोम्या, काल काय कहर केलास काय रे? ही का अशी तुझ्याकडे मारक्या म्हशीसारखी बघायला लागले?'
'अरे नाही रे! मी कसला कहर करणार?' मी वैतागून बोललो. काही न बोलता आम्ही तिथून निघालो.
कॉलेजला पोहोचलो..गाडी लावली..तशी पाठिवर थाप पडली...
पाठिमागे वळालो तसे....
'कार्ट्या डोक्यावर पडलायस की काय? असा काय मख्खपणे बघत होतास माझ्याकडे? मी स्माईल दिली तर साधी स्माईलपण दिली नाहीस!'....माझी मैत्रीण आशु (Friend-girl, Girl-friend नव्हे! उगाच शंका नको!) वैतागून, थोड्या रागातच म्हणाली.
'अगं पण कधी?'...मी गोंधळून विचारले.
'अरे आत्ताच की!...सिग्नलवर रे!'
'ए येडेSSSSSS... ती...तू होतीस होय!...आणि ते स्माईल होते होय ग? त्या तुझ्या मफलरमुळे मला कसे कळणार की तू हसतेस का रडतेस ते? म्हणे स्माईल दिली...' मी जवळ जवळ ओरडतच म्हणालो.
'अय्याSSSSSS...होय की रे....विसरलेच!' आशु जीभ चावत म्हणाली.
'अशा सगळ्या पोरींकडे बघत हसत सुटलो ना....तर एकतर कॉलेजला येईपर्यंत माझा चेहरा सुजून बजरंगबलीसारखा होईल.. नाहीतर दगडं मारत मारत येरवड्याच्या मेंटल हॉस्पिटल मध्ये डांबतील मला पुणेकर!!!'
यावर तिघेही खो खो हसलो!

डोक्यात असे विचार चालू असतानाच दूरच्या एका आकृतीने (Figure ने) माझे लक्ष वेधले...सडपातळ बांधा, गोल चेहरा, गोरा रंग, मानेच्या खालीपर्यंत रुळणारे मोकळे काळेभोर केस, पांढरा गोल गळ्याचा-लांब बाह्याचा टी शर्ट, निळी जीन्स, डोळ्यांवर काळा गॉगल....अशी एक सुंदर (खल्लास!) पोरगी कायनेटीक होंडावरुन येताना दिसली...
'आयला काय पोरगी आहे रे!...' पक्या.
मी शांतच...(Ohh God! She was just irresistible! Why are some girls so beautiful that you just can't take your eyes off them?)
खरेतर ती एक डेडली का काय ते काँम्बिनेशन होती...एकतर ती फारच सुंदर होती, बाकी पांढरा टी शर्ट, निळी जिन्स आणि काळी कायनेटीक होंडा!

काळी कायनेटीक होंडा बघितली की माझ्या मनात काहीतरी खळबळते. पुर्वी कोल्हापुरला असताना, माझीही एक काळी कायनेटीक होती.
तिच्यावर बसलो की माझ्या अंगात काहीतरी संचारायचे! पागलसारखा मी गाडी पळवायचो....पेट्रोल तर फारच खायची. खायची म्हणजे अगदी ढसा ढसा प्यायची!..गाडी रस्यावर कमी पंपावरच जास्त!
माझी एक मैत्रिण (Friend-girl) मला नेहमी म्हणायची... 'अरे कार्ट्या गाडी जरा हळू चालवत जा! कधीतरी दात घशात घालून घेशील! पोरगी मिळायची नाही मग लग्नाला!'
पण ऐकेन तो मी कसला?

त्याच कायनेटीकवरुन जाताना, एका निमुळत्या बोळात...चक्क एका लठ्ठ म्हैशीला धडकल्याचे आठवते!. (दिवस: चौदा फेब्रुवारी-व्हॅलेंटाईंन्स डे). म्हणजे झाले असे की...भरधाव वेगाने जाता जाता, मनामध्ये दिवसभराचे प्लॅन आखत होतो. समोरच लावलेल्या एका रिक्षामागे असलेली लठ्ठ म्हैस मला दिसलीच नाही! मी रिक्षाजवळ पोहोचलो तोच....ती म्हैस एकदम रस्त्याच्या मधेच आडवी येऊन थांबली! आता आली का पंचाईत! मी दोन्ही ब्रेक करकचून दाबले.... पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही, आणि मी सरळ जाऊन त्या म्हैशीच्या पोटावर धडकलो! मी अक्षरशः उडून पडलो...पण सुदैवाने मला जास्त काही लागले नाही...थोडेफार हाता-पायाला खरचटले होते.
तरी नशीब!...म्हैशीने अंगावर आलेले शिंगांवर निभावले नाही..नाहीतर बाशिंग बांधायच्या आधीच मी......

गाडी म्हैशीच्या पोटाखालून घसरत जाऊन रस्याकडेला पडली....(समोरचे फायबर तुटून, फोर्कला क्रॅक वगैरे गेल्यामुळे, २००० रूपयांचा फा@#$ लागला!). म्हैस जागेवरुन हललीदेखिल नाही! पण तिने जोरात हिसका देऊन मान हलवली....तसा तिच्या गळ्यातल्या घंटांचा किण किण आवाज आला. मी घाबरुन उठू लागलो...सहज लक्ष गेले....तर नेमका त्याच दिवशी मी लाल भडक शर्ट घातलेला!
झ@ मारली आणि लाल शर्ट घातला असे वाटून गेले...व्हॅलेंटाईंन्स डे जोरदार होण्याची चिन्हे दिसत होती! (म्हैशीसोबत??). मला उगाचच म्हैशीची शिंगे-बिंगे मोठी दिसू लागली...मारकुटी होती की काय ती? वाटले की आता काय खरे नाही आपले....मागे लागते की काय ही बया!....पोरी मागे लागायच्या सोडून म्हैशी मागे लागायची पाळी!....

पण नशीब माझे!...तिने परत एकदाही माझ्याकडे वळून बघितले नाही, आणि मला काहीही रिस्पॉन्स(?) न देता निघून गेली!
हुश्श!......सुटलो एकदाचा!

आयला......पोरींना...साधी धडक राहु दे, नुसता धक्का जरी लागला तरी काय काय रिस्पॉन्स देतात सांगू! आणि वर आमचीच मापे काढतात!

बर आता जरा पुण्यात परत येऊ...
तर अशी ती सुंदर हिरॉईन आमच्यासमोरुन भरधाव वेगाने कर्वे रोडकडे निघून गेली...जाताना एक मस्त सुगंध दरवळला...
ती गेली, तशा आमच्या नजरा १८० कोनातून वळून, तिच्या पाठमोर्‍या आकृतीकढे बघत होत्या...

सिग्नलजवळ जाताच, तिने डावीकडे वळण्यासाठी इंडिकेटर दिला...तेवढ्यात....तिच्या समोरुन येणारा एक जण...गडबडीने नो एंन्ट्रि मध्ये घुसलेला दिसला. Red Karizma वरुन आलेला तो हिरो काही कळायच्या आतच तिच्या गाडीला समोरासमोर धडकला!

हिरॉईनच्या तोंडून 'आईSSSSSS ग!' ऐकू आले....तसे काळजात एकदम धस्स्..झाले...पण पोरगी मराठी आहे हे समजल्यामुळे भारीपण वाटले! (च्यायला वेळ-काळ काही नाहीच!...काहीही चालू असते डोक्यात!).

हिरॉईनची गाडी रस्त्याच्या डावीकडे पडली होती...आणि शेजारीच ती पालथी पडलेली दिसली..हिरोपण गाडीसकट उजवीकडे पडलेला दिसला....
हिरॉईनचे सामान आजूबाजूला विखुरलेले होते..

ती दोघे पडलीत तसे आजूबाजूचे दहा-बारा जणं त्यांच्या मदतीला धावले. अर्थातच दहा जणं हिरॉईनकडे आणि दोघे हिरोकडे! मी हिरोकडे धावलो होतो आणि पक्या हिरॉईनकडे...

मी आणि अजून एकाने हिरोला हात दिला...तो कपडे झाडत झाडत उठला. तो थोडा घाबरलेला दिसला. हिरो दिसायला स्मार्ट होता, अंदाजे २०-२२ वर्षांचा असावा, जवळ जवळ ६ फुट उंची, तब्येतीने तगडा, गव्हाळ वर्ण, काळे केस (बहुदा शाहरुखसारखी हेअर स्टाईल...समोर केसांचा कोंबडापण होता!), निळा हाफ टी शर्ट - काळी जीन्स...दोन्हीही चिखलाने खराब झाले होते.
त्याच्या दोन्ही कोपरांना खरचटले होते, बाकी...हाताच्या तळव्याला आणि गुडघ्याला खरचटले होते..की..चिखल लागलेला दिसला. एवढ्यात कोणीतरी पाणी आणून दिले.

हिरॉईनला ४-५ जणांनी(?) हाताला धरुन उठवले! (अशी संधी परत परत येत नसल्याने सहसा कोणीही सोडत नाही!). तिलाही पाणी दिले.
तिला फार काही लागल्यासारखे वाटत नव्हते....बहुदा उजव्या हाताच्या तळव्याला खरचटले होते. पांढरा टी शर्ट समोरुन काळा झाला होता...जीन्स दोन्ही गुडघ्याजवळ घासून काळपट दिसत होती.
तिच्या चेहर्‍यावर भितीचे आणि संतापाचे मिश्र भाव दिसले. तशा अवतारातही ती सुंदर दिसत होती.
ती २० वर्षांच्या आसपासची असावी...साडे पाच फूट उंची...गोल चेहरा...काळे डोळे...थोडेसे कुरळे केस. मी मघाशी केलेले अर्धे निरीक्षण..पूर्ण करून घेतले.

त्या दोघांचेही नशीब चांगले की त्यांना जास्त मार लागला नव्हता.

हिरोच्या गाडीचे समोरचे मडगार्ड अर्ध्यातून तुटून बाजूला पडले होते....उजव्या बाजूच्या हँडल-ग्रिपचा आणि फुटरेस्टचा रस्त्यावर घासल्याने कलर गेलेला....पेट्रोलच्या टाकीवर खरके पडलेले...उजवीकडचा इंडिकेटर मान मोडल्यासारखा लोंबकळत....एक आरसा फुटलेला दिसला.
हिरॉईनच्या गाडीचे समोरचे मडगार्ड चिंबलेले....समोरच्या फायबरला तडा गेलेला...दोन्ही आरसे फुटलेले...बहुदा डिक्कीला तिचा गुडघा लागल्याने, डिक्कीचा दरवाजा तुटून त्यातून पेन, २-३ वह्या व बाकी सटरफटर सामान बाहेर पडलेले दिसले....जवळच गॉगल पडलेला होता.

बघ्यांपैकी काहींनी दोघांच्या गाड्या उचलून बाजूला स्टँडवर लावल्या...सामान उचलून दिले.

तोपर्यंत आजूबाजूला गर्दी जमली होती. गर्दीमुळे रस्त्यावरुन जाणार्‍या बाकीच्या गाड्यांना अडचण होत होती. कुणी एका गाडीवाल्याने ओरडल्याने...गर्दी रस्त्याच्या डाव्या बाजूला सरकली.

हिरॉईनजवळ उभारलेले एक टक्कल पडलेले काका...'आजकालच्या पोरांना काही मॅनर्रसच नाहीत, कसेही गाडी चालवतात, काही झाले असते तर कितीला पडले असते'... असे काहीतरी बाजूच्याला सांगत होते.
बाजूचाही नंदीबैलासारखी मान हालवत 'होय होय' म्हणत होता!

अशा प्रसंगात हे मात्र नक्की आहे की, मुलीची चूक असु दे...वा नसु दे, तिला कोणीही काही बोलत नाही. उलट लोकांकडून सहानुभुती मिळते!
मला एक जुना प्रसंग आठवला, असाच एकजण रस्त्याच्या बाजूने निवांतपणे चालला होता.
त्याच्या मागील बाजूने एक मुलगी स्कुटीवरून येत होती...ती बहुतेक खड्डा चुकवायच्या भानगडीत होती आणि अचानक तिचा गाडीवरचा ताबा सुटला...तिने सरळ जाऊन त्या पाठमोर्‍या माणसाच्या ढेंगेत गाडी घातली!! त्या बिचार्‍याला काय झाले काही कळालेच नाही..तो इतका घाबरला की मागे न बघताच तो समोर पळत सुटला!...त्याला बहुतेक म्हैस मागे लागल्यासारखी वाटले असावे! मुलगीने गाडी थांबवली. ती त्याला सॉरी वगैरे म्हणायचे सोडून तिथेच खो खो हसत बसली! तो बिचारा काही न बोलता ओशाळून निघून गेला...त्या मुलगीला कोणीही काही बोलले नाही...उलट त्या बिचार्‍याला सगळेजण...'सरळ चालता येत नाही काय? रस्याच्या मधे कुठे चालत होता? वगैरे वगैरे म्हणत होते.

'आप ठिक तो हो ना? आय एम सोSSSS सॉरी. मै जरा जल्दी मे था'...हिरोच्या आवाजाने मी भानावर आलो. तो हिरॉईनकडे अपराधी नजरेने पहात बोलत होता.
त्याने हिंदी बोलल्या बोलल्या माझ्यातले मराठी रक्त परत उसळून आले...तो नॉन-महाराष्ट्रियन होता तर! मी वैतागून त्याच्यापासून दूर उभा राहीलो!!

एकतर कॉलेजमधल्या बहुदा सगळ्या....मराठी पोरींचे बॉय फ्रेंड्स...नॉर्थ इंडियन का असतात हे मला समजत नाही!

मागे एकदा...देशमुखांच्या प्राजक्ताला कॉफीसाठी विचारायचे ठरवले.
मग काय!...२ गुप्तहेरांकडून माहिती घेऊन....२ महिने सेटींग लावून.....रोज थोडे थोडे हसुन-बोलून....नोट्सची अदलाबदल...SMS...Phone calls..वगैरे स्टेजेस पार करुन....शेवटी तिला कॉफीसाठी म्हणून विचारायला गेलो. थोडेसे इकडचे तिकडचे बोलून झाल्यावर...एकदाचं मी तिला विचारणार...इतक्यात तिचा फोन वाजला.

'हॅलो....हां बोलो....क्या कर रहे थे?'
------
'देखो....छे बजे का शो है....पता है ना? जल्दी आ जाओ....तुम हमेशा लेट करते हो....अब कहा पे हो तुम?' प्राजक्ता लाडात येऊन म्हणाली. माझे डोके गरम होत होते!
----
'क्या?...कॉलेज के पास हो?...मगर कहां?....मै तो मेन बिल्डिंग के पास खडी हूं.'
---------
'हां....ठीक है....मै गेट के पास आती हूं.'

एवढे बोलून तिने फोन ठेवला.

मला उगाचच 'अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का...' वगैरे गाणी आठवू लागली.
(आयला!....इथे कशात काय नाही आणि मला 'बेवफाईची' वगैरे गाणी सुचतातच कशी काय?)

पण पुढच्याच क्षणी वाटले....तो कसा आहे...ते तरी बघुया.
थोड्याच वेळात तो गेटवर पोहोचला. गोर्‍या, उंच, किडकिडीत, लांब केस वाल्या त्या प्राण्याकडे बघितल्यावर वाटले...हिने त्याच्यात काय बघितले असावे? तिने त्याची ओळख...तिचा बॉय फ्रेंड म्हणून करून दिली.
माझ्या भेजामध्ये एकदम जळजळाट का काय ते झाला....बॉय फ्रेंड्च पाहिजे होता तर....आम्ही काय मेलो होतो?
आता...आम्ही कुठल्या जन्मात...कुणाचे घोडे मारले आहे काय माहीत?.....अशी वेळ यायला!
रूमवर गेल्यावर...पहिल्यांदा त्या दोन गुप्तहेर मित्रांना बदडून काढले...!! कसली डोंबलाची हेरगीरी करत होते काय माहित! तिला बॉय फ्रेंड आहे, हे पण माहित नाही त्यांना!....

बस्स्....तेव्हापासून कुठल्याही मराठी पोरीबरोबर-नॉर्थ इंडियन पोरगा दिसला की आपला भेजा सटकतो!!

'जल्दी मे थे..तो क्या नो एन्ट्रि मे घुस के सामनेवाले को ठोक दोगे क्या?'....हिरॉईनच्या आवाजाने मी (परत) भानावर आलो.
आयला....मला वाटले होते की..ती क्युट चेहर्‍याची पोरगी जरा आवरतं बोलणं घेईल...पण हिने तर सरळ तोफंच डागली त्याच्यावर!
त्याला पुढे बोलू न देता म्हणाली....'कुठे बघत असतात काय माहित??' (पोरगी आता मराठीवर आली होती...पण त्याला तर मराठी कळत नाही ना!)
'तुमच्याकडेच बघत होतो!!!...'. हिरो बोलला...(अरे व्वा! हिरो मराठी होता तर! ऐकून मनाला एकदम भारी वाटले...भेजा शांत झाला!)
तो बोलला खरा...पण आपण काय बोललो....हे कळाल्यावर त्याने जोरात जीभ चावली.......
'काSSSSSSSSSSSSSSSSय?????.......' हिरॉईन अक्षरशः ओरडली...ती इतक्या जोरात ओरडली की, बाजूने जाणारा एक सायकलस्वार घाबरुन गडबडलाच!!....पडता पडता वाचला बिचारा!
'अहो म्हणजे तसं नाही ओ, समोरच बघत होतो.' हिरो शक्य तितक्या शांत स्वरात म्हणाला.
'अहो...असे कसे तुम्ही नो एन्ट्रि मधे घुसता? काही पध्दत-बिध्द्त आहे का नाही गाडी चालवायची?'
'मी सांगितले ना एकदा? मला वेळ झाला होता!'
'म्हणून काय कुठेही-कशीही गाडी चालवणार काय? मला चांगली माहिती आहेत तुमच्या सारखी लोकं...उगाच शायनिंग मारत फिरत असतात!....एखादी चांगली मुलगी दिसली की मुद्दामहून समोर जाऊन धडकणार!!' हिरॉईन तावातावाने बोलत होती.....(काय पोरगी आहे! कसली बोलतेय?)
'हे बघा तुम्ही माझ्यावर काहीही आरोप करु नका! समजले? मी माझी चूक आहे म्हणून ऐकून घेतले आतापर्यंत.....' हिरो तिच्याकडे बघत ओरडला.
'ऐकून घेतले म्हणून काय उपकार केले काय माझ्यावर? चूक तुमचीच आहे.' हिरॉईन अगदी हातवारे करुन बोलत होती.
'उपकाराचा काय संबंध इथे? माझी गाडी मी पूर्णपणे कंन्ट्रोल केली होती...अगदी डेड स्टॉप झाली होती...तुम्हीच येऊन धडकला माझ्या गाडीवर!!' हिरोपण आता चिडला होता बहुतेक.
'काय बोलताय काय तुम्ही? माझी गाडी तुमच्या गाडीवर धडकली? काय म्हणायचयं काय....'
'गाडी चालवता येत नाही तर चालवायची कशाला? उगाच गावभर मिरवत बसतात...मोकळ्या मैदानात फिरवायची..रस्त्यावर कशाला यायचे? असल्यांना गाड्या कशा काय घेऊन देतात घरातले काय माहित?' हिरो तिला तोडत मध्येच म्हणाला.
'हे बघा माझ्या घरातल्यांना बोलायची काहीही गरज नाही.....' हिरॉईन जव़ळ जवळ ओरडंतंच बोलली.
'अहो तुम्ही काय बोलत बसलाय त्यांच्याशी? सरळ पोलिसात द्या त्यांना. एकतर स्वत:ची चूक आहे, आणि वर तुम्हालाच बोलतायत!'....मुलीजवळ उभारलेले टक्कल पडलेले काका.
'आजोबा! पोलिसात जायचे का नाही...ते आमचे आम्ही ठरवतो. तुम्ही मधे बोलू नका!' हिरो टक्कल पडलेल्या काकांच्याकडे रागाने बघत म्हणाला.
टक्कल पडलेल्या काकांना..आजोबा म्हणाल्यामुळे ते फार चिडल्यासारखे दिसले. पण ते पुढे काहीही बोलले नाहीत.
हिरॉईनपण काहीही बोलली नाही.
'हे पहा, मी माझी चुक आहे....हे आधीच कबूल केले आहे.' हिरो.
'चूक कबूल केले...तर मग्...माझ्या गाडीचे सगळे पार्टस् मला भरुन द्या.' हिरॉईन आता थोडी शांत झाली होती.
'अहो भरुन दिले तरीही लावणार कसे ते?' हिरोने वेंधळा प्रश्न्न विचारला.
'अहो भरुन द्या म्हणजे...नुकसान भरपाई द्या!!' हिरॉईन आवाज चढवत म्हणाली.
'ओके ओके...ठिक आहे. आपण एखाद्या मॅकेनिक कडे जाऊया आणि मग तिथेच पाहू या काय ते'.
'ठिक आहे. तुमचा फोन नंबर द्या मला.' हिरॉईन.
'ओके......९८५०.................अनुप. तुमचा पण असू दे माझ्याकडे. जस्ट मिस्ड कॉल द्या तुमच्या सेलवरुन.' हिरोचे नाव अनुप होते तर....
हिरॉईन ने फोन कानाला लावून मिस्ड कॉल दिला.
'नाव काय तुमचे??' हिरो.
'शालिन...' शाSSSSलिन???? नाव पण अगदीच शोधून शोधून ठेवलेय बापाने!!...शालिन म्हणे! पोरगीतर फारच शालिन आहे....वाणीतर काय मधुर आहे...आSSSSहाSSहा.
'शाSSSलिन??' हिरोने आश्चर्याने....थोडे हसतच विचारले. त्यालापण माझ्यासारखाच प्रश्न्न पडला असावा बहुतेक.
'होय.'

अनुपने बहुदा तिचा नंबर स्टोअर केला व ते दोघेही गाडीकडे चालू निघाले.
बघ्यांपैकी एका-दोघांनी जवळचा मेकॅनिक कोठे आहे ते सांगितले.
एव्हाना गर्दी पांगू लागली होती.
गर्दीमधली काही लोकं (जी भांडणाची मजा बघायला आले होते ते), भांडण लवकर संपल्याने हिरमुसल्यासारखे दिसले!

दोघांच्या गाड्या जवळ-जवळ खेटून लावल्या होत्या.
'थांबा...मी माझी गाडी थोडी इकडे घेतो...तुमच्या गाडीचे फुटरेस्ट माझ्या गाडीच्या फुटरेस्टला तटतेय.' अनुप त्याची गाडी सरकवत म्हणाला.
'अय्याSSSSSSSS तुम्ही सांगलीचे का कोल्हापुरचे?' शालिन अनुपकडे पहात लाडात येऊन म्हणाली! च्यायला! हिला काय झाले अचानक?? डायरेक्ट...रेडियो मिरचीवरुन विविधभारतीवर कशी काय आली ही??
मी अनुपच्या गाडीचा नंबर बघितला...MH-10 AE.....गाडी तर सांगलीचीच होती....म्हणजे अनुप पण सांगलीचाच होता बहुतेक...पण हिला कसे काय कळाले?
अनुप पण अशा अचानक आलेल्या प्रश्न्नाने गोंधळला....म्हणाला...'मी सांगलीचा आहे पण तुम्हाला कसे काय कळाले?'
'अहो....तुम्ही ते 'तटतेय' म्हणाला ना त्यावरुन ओळखले मी! इकडे पुण्याकडची लोकं तशी भाषा वापरत नाहीत.' शालिन हसत हसत म्हणाली.
मी उगाचच तिच्या गाडीचा नंबर बघितला..MH-12 AN....ती पुण्याचीच वाटत होती.
'मग तुम्हीपण...'
'नाही...मी इथलीच आहे, पण माझे आजोळ आहे सांगलीला...विश्रामबागमध्ये' शालिन अनुपला मध्येच तोडत म्हणाली. अच्छा!...आत्ता कळाले मला!...तरीच म्हटलो!.........
'ओक्केह...मी बालाजी नगरमधे रहातो.....पण सॉरी....मी मघाशी रागाच्या भरात जरा जास्तच बोललो तुम्हाला.' अनुप हळूवारपणे म्हणाला.
तशी ती गोड हसून म्हणाली...'ओह...इट्स ओके. मीच जास्त बोलले जरा.' (जरा???)....'प्लिज डोंट माईंन्ड.'

त्यानंतर अनुप आमच्याकडे वळत...मला आणि आसपासच्यांना थँक्स म्हणाला..आम्ही थोडक्यात एकमेकांची ओळख करुन घेतली.

अनुपची गाडी एक-दोन प्रयत्नात चालू झाली. शालिनच्या गाडीने सुरवातीला थोडा त्रास दिला. मला माझ्या कायनेटीकचे सगळे नखरे माहित असल्याने, पुढे होऊन मी तिची गाडी चालू करून दिली. बोलता बोलता शालिनचीपण ओळख झाली.

त्यानंतर ते दोघे सगळ्यांना थँक्स म्हणून सोबतच निघून गेले.
पक्या सोबत आणखी एक चहा मारून मी दुसर्‍या लेक्चरला हजर झालो.

जवळ जवळ एका महिन्याने मला अनुप मंगला थियटरजवळ भेटला...इकडचे-तिकडचे बोलत समोरासमोर उभे होतो, तोच...तो माझ्या मागे बघत (थोडा वैतागत) म्हणाला. 'अगं किती वेळ? कधीचा थांबलोय मी इथे?' मागून ओळखीचा आवाज आला.....'अरे किती वेळ काय? फक्त दहा मिनीटे तर लेट झालेय!' तेवढ्यात शालिन समोर आली...मला बघून एकदम बावरली आणि हसली....
मी हसून अनुपकडे पहात म्हणालो...'अरे तुम्ही दोघे, अहो वरुन अरे-तुरे वर कधी आलात? आणि काय रे? चांगलीच नुकसान भरपाई देतोयस की तू तिला!' तशी शालिन चक्क लाजली!!...आयला!!....हिला लाजता पण येतय होय!!......
तशी शालिन डोळे मोठे करत म्हणाली.....'न देऊन काय करतोय तो?'
यावर अनुप अगदी कोपरापासून हात जोडत नाटकी आवाजात म्हणाला.....'बरोबर आहे बाईसाहेब, तुमच्याशी कोण पंगा घेणार?'
तसे आम्ही तिघेही खळखळून हसलो.

त्या नंतर कधी एफ सी रोडवर, कधी जे एम रोडवर, कधी पर्वतीवर ती जोडगोळी फिरताना दिसू लागली. दोन महिन्यांनी दोघेजण टू व्हिलर ब्रिड्जवर एकमेकांना खेटून बसलेले दिसले....

आता....तुमच्यापैकी काही हुश्शार..शंकासुरांना वाटले असणारच.....की मी अशा ठिकाणी...कोणाबरोबर आणि काय करत होतो!!......बरोबर आहे! तुमच्या हुश्शारीला दाद देतोय मी!
म्हणजे झाले असे की....आता कसे सांगू....(इथे चक्क मी लाजलोय बर का!)...ओके...सांगतोच आता.....मी आणि पक्या लक्ष्मीरोडवर फिरायला (पोरी बघायला) गेलो होतो....तिथेच माझी आणि तिची (गाड्यांची नव्हे!) अगदी समोरासमोर धडक झाली....मग काय बोलता?...'काय डोळे फुटलेत काय? कुठे लक्ष असते काय माहित?'...वगैरे वगैरे डायलॉग ऐकू आले..पुढे काय घडले असेल याचा अंदाज तुम्हाला आला असेलच..ती स्टोरी मी नंतर कधीतरी निवांत सांगतो.
पण त्याच्या नंतर मी आणि ती असेच कुठे कुठे..भटकत फिरत असतो!!

समाप्त.
------------------------------------------------------------------------------------

वरील कथेतील सर्व पात्रे व घटना पूर्णपणे काल्पनिक आहेत. त्यांचा कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तिशी काहीही (काडीचा) संबंध नाही, तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा..व त्यांना माझ्याकडे पाठवून द्यावे!...मी बघतोच मग त्यांचे काय करायचे ते!!

वरील कथेत मी काही ईंग्लिश शब्दांचा व वाक्यांचा उपयोग केला आहे. खुप प्रयत्न करूनही मी त्यांना avoid (हे पण ईंग्लिशमधेच काय!) करू शकलो नाही....लहान असताना ईंग्रजांचे विमान डोक्यावरून गेले आहे!...असे ऐकण्यात आले आहे!! (मात्र ते खरे आहे का नाही ते माहित नाही!)

लिखाणाचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे, त्यामुळे तुम्हा सर्वांच्या सुचनांचे स्वागत आहे. काही बदल करावे लागत असतील तर कळवा.

-mokaat...
http://www.mokaat.blogspot.com/

गुलमोहर: 

धन्यवाद योग्या..:-)

नाद खुळा... गणपतीपुळा...>>> Lol
काटा किर्रर्र्.....>>> Rofl

----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/

फारच सुन्दर ............. भन्नाट

व्वा!! सह्हीच आहे हे......आणी ही काल्पनीक कसली १००% सत्यकथा वाट्तेय! मी तर सगले प्रस्न्ग डोळ्यासमोर आणूनच पुढे वाचत होते...
बाकी ती म्हशीची धड्क जर कोल्हापूरातली असेल तर मी त्याची जागाही ईथे बसून सान्गु शकते....ही .ही...
फुलराणी.

मागे एकदा माझा ३-४ वर्षांचा पुतण्या पुण्यात आला होता. तो....हे असले सोंग(ममी) बघितले की, घाबरून 'बागुलबुवाSSSSSSSSSSS.....' करत रडायचा!>>>

भन्नाटच लिहीतोस मित्रा !! अगदी मोकाट सुटलाहेस... Happy

____________________________________________

आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही Happy )

मोकाट,

अतिशय सुंदर विनोदी लेखन...

मला फार कमी वेळा मायबोलीवरचे (विनोदी) लेखन आवडले आहे. पण तुमचा लेख जबरदस्त्..मला माझ्या कॉलेजमधे नेउन उभे केलेत.

शुभेच्छा!

मस्त, धम्माल आली. फारच खुसखुशीत लेख.
'ममी'...अगदी अगदी. Happy

छान! Happy

Pages