शरद ७६ - एका फॉन्टची गोष्ट

Submitted by nikhilmkhaire on 26 April, 2016 - 23:15

डी. एस. कुलकर्णी हे अाज पुण्यातलं मानाचं नाव. त्यांच्या जाहिराती बघितल्या, तर एक विशिष्ट शैली दिसून येते. कधी पत्र, कधी गोष्ट असं करत घराच्या स्क्वेअर फुटांचं रुक्ष गणितही अगदी सोप्पं वाटू लागतं. अतिशय साध्यासोप्या भाषेत डीएसके स्वत: लोकांशी संवाद साधतायत असं वाटतं. डीएसकेंच्या जाहिरातींच्या या शैलीचे जनक म्हणजे शदर मुरलीधर देशपांडे. १९६२पासून मराठी भाषेतील ग्राहकप्रिय अाणि वाचकांच्या संग्रही राहिलेल्या हजारो जाहिराती लिहिणारे मराठी कॉपीरायटर! कोल्हापूर अाणि पुण्यामध्ये नोकरी केल्यावर १९८५ साली त्यांनी ‘सेतू अॅडव्हर्टायझिंग’ ही जाहिरात संस्था सुरू केली. इथून सुरू झाला, केवळ शब्दांच्या जोरावर सुंदर मराठी जाहिरातींचा प्रवास!

1.0.jpg

1.1.jpg

डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स यांच्यासाठी लिहिलेल्या काही जाहिराती

शब्दांचं विलक्षण सामर्थ्य लाभलेल्या शरद देशपांडे यांना ते व्यक्त करण्यासाठी तशाच सुंदर हस्ताक्षराची देणगीही लाभली. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं, तर “काळीभोर फाऊंटन इंक भरलेलं पेन, त्या पेनाची नीबही सहाणेवर घासून देवनागरी वळणाचा फाटा दिलेली, पांढ-याशुभ्र कागदावर चांगलं चार बोटं मार्जिन सोडून लिहिलेला कागद जाहिरातदारासमोर ठेवला, की केवळ अक्षर पाहूनच त्या मजकुराच्या प्रेमात पडायचा…”

3_0.jpg

शरद देशपांडे यांचं हस्ताक्षर

या सुंदर हस्ताक्षरालाच दृष्ट लागली. काही वर्षांपूर्वी पॅरालिसीसच्या सौम्य अॅटॅकचं निमित्त झालं अाणि हाताची शक्ती कमी झाली. लिहिण्याची जिद्द कायम होती म्हणून मग कंम्प्युटरचा वापर सुरू झाला. पण ‘अापल्याला अापल्या अक्षरामध्ये लिहिता येत’ नाही ही खंत मनामध्ये कायम होती. एव्हाना पुढच्या पिढीनं व्यवसायामध्ये जम बसवला होता. शरद देशपांडे यांची मुलं ऋतुपर्ण अाणि ऋग्वेद यांनी वडीलांच्या ७५व्या वाढदिवसाला काही तरी वेगळं गिफ्ट द्यायचं ठरवलं. त्यातूनच २०१५ साली साकारला तो ‘शरद ७५’ हा शरद देशपांडे यांच्या हस्ताक्षरावर अाधारित फॉन्ट!

4_0.jpg

२०१५ साली शरद ७५ हा युनिकोड फॉन्ट सर्वांसाठी मोफत सादर करण्यात अाला.

मुंबईस्थित किमया गांधी हिनं हा फॉन्ट तयार करायची जबाबदारी घेतली. त्याविषयी ती सांगते “फॉन्ट तयार करायच्या या कामामध्ये शरद देशपांडे यांच्या अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं लिहिलेल्या डायर्‍या कामी अाल्या. जाहिरातींचा मजकूर, कविता, कथा अशा विविध प्रकारच्या मजकुरानं भरलेल्या या डाय-यांच्या पानांचे हाय रिझाॅल्यूशन स्कॅन्स घेतले गेले. अापण हातानं लिहितो, तेव्हा दोन अक्षरं कधीच सारखी नसतात. त्यामुळं ‘क’ हे अक्षर निवडताना मी अनेक प्रकारे लिहिले गेलेले ‘क’ शोधून काढले अाणि त्या सर्वांचं वैशिष्ट्य सामावणारं अक्षर हे फॉन्टच्या पहिल्या व्हर्जनसाठी- शरद ७५ साठी फायनल केलं गेलं. पुढे जाऊन हस्ताक्षरामध्ये लिहिण्याच्या अनुभवाच्या अधिकाधिक जवळ जाता यावं म्हणून मग फॉन्टच्या पुढच्या व्हर्जनमध्ये- शरद ७६मध्ये एकाच अक्षराची व्हेरीएशन्स देण्यात अाली अाहेत. त्यामुळे एकाच शब्दातील अथवा अोळीतील दोन ‘क’ एकसारखे दिसणार नाहीत. हस्ताक्षरासारखंच प्रत्येक अक्षर वेगळं दिसेल."

5_0.jpg

6.0.jpg

एकाच अक्षराचं व्हेरिएशन देणारा हा एकमेव देवनागरी फॉन्ट अाजपासून नि:शुल्क डाऊनलोड करण्यासाठी खुला करण्यात अाला अाहे. सोबतच्या लिंकवरून हा फॉन्ट डाऊनलोड करा, सुंदर हस्ताक्षरामध्ये एखादं पत्र, कविता, कथा लिहा. एका लेखकापासून सुरू झालेला हा अक्षरांचा प्रवास असाच पुढे चालू द्या!

6.1.jpg

खरं हस्ताक्षर अाणि फॉन्ट यांच्यातील साम्य लक्षणीय अाहे.

विन्डोज अाणि मॅक या दोनही अॉपरेटिंग सिस्टिमवर चालणारा ‘शरद ७६’ हा फॉन्ट अाज खास मायबोलीकरांसाठी सादर केला जातोय. मोफत डाऊनलोड करण्यासाठी भेट द्या - www.setuadvertising.com

फॉन्ट डिझायनरविषयी - किमया गांधी या स्वत: एक फॉन्ट डिझायनर अाहेत. ‘मोटा इटॅलिक’ या मुंबईतील टाईप फाऊंड्रीमध्ये त्या भागीदार अाहेत. तिथे त्यांनी कॉर्पोरेट तसंच रिटेल क्षेत्रासाठी अनेक इंडिक अाणि लॅटिन फॉन्ट्‌स्‌वर काम केलं अाहे.

***
विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह!! हा कॅलिग्राफिकल फॉन्ट तर सुंदरच आहे.
माहिती दिल्याबद्दल आणि फॉन्ट उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद !!!

फॉन्ट सुरेख आहे. इथे माहिती दिल्याबद्दल आणि डाऊनलोड करण्यास उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. >+११

वॉव, मस्तच फॉंट.

मला फारच आवडतात असे फाँट्स वापरायला. माहिती देऊन डाऊनलोड उपलब्ध करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

मस्तच ! माझेही अक्षर सुंदर झालं. Happy

पण शरद देशपांडे यांच्या पॅरालिसीसबद्दल वाचून फार वाईट वाटतंय.

डालो केल्यानंतर विन्झीप फोल्डर मधे एक "installation guide" नावाची पीडीएफ फाईल आहे. त्यात व्यवस्थित स्टेप्स दिल्या आहेत. त्यानुसार Download & install Google Marathi Input Tool from http:www.google.com/inputtools/windows असं करावं लागेल. माझ्या कडे या स्टेप ला अडकलंय. हे डालो होतच नाहीये. त्यामुळे कदाचित वर्ड फाइल मधे इंग्रजीतच अक्षरं उमटतायत Sad

वाह! फारच सुरेख लेख.. डीएसके यांच्या जाहिराती नेहमीच लक्ष वेधून घेतात. पण त्या मागच्या व्यक्ती विषयी आज माहिती मिळाली.
हा फाँट सुंदर दिसत आहे! शरद देशपांडे यांच्या मुलांची कल्पना ही फार आवडली!

खुप छान Happy

झिप फाईल मधे 'डॉट ऑटीएफ' एक्स्टेंशनची फाईल आहे ती डबल क्लिक करून (उघडून) फाँट इन्स्टॉल केला का?
ते केलं आणि पीडीएफ मधल्या सुचना पाळल्या की मला तरी जमलं बुवा सुंदर अक्षरात लिहायला.

हर्पेनदा, बहुतेक तुझ्या कडे Google Marathi Input Tool आधीच install केलेली आहे .
माझ्या कडे Input Tool install होतंच नाहीये, त्यामुळे वर्ड फाइल मधे शरद ७५ सिलेक्ट केलं तरी इंग्रजीच उमटतंय.

सुंदर लेख! शरद सरांशी कामानिमित्त परिचय होता.. त्यांच्या हस्ताक्षरातली कागदपत्रे वाचतानाही अक्षरांवर लक्ष खिळून राहायचे..
फॉन्टमधून ते अक्षर कायम जवळ राहील Happy

मित हो माझ्याकडे Google Marathi Input Tool आधीच install केलेली आहे.
मायबाप बाकी त्यांनी लिहिलेल्या सुचनांचे पालन जसेच्या तसे केलं. म्हणजे मला त्यात फार डोकं नाहीच्चे Proud

वाह! फारच सुरेख लेख.. डीएसके यांच्या जाहिराती नेहमीच लक्ष वेधून घेतात. पण त्या मागच्या व्यक्ती विषयी आज माहिती मिळाली.
हा फाँट सुंदर दिसत आहे! शरद देशपांडे यांच्या मुलांची कल्पना ही फार आवडली! >>>>>+१११११

श्री. शरद देशपांडे यांचे हस्ताक्षर पुन्हा पुन्हा पहात रहावे असे आहे.... Happy

हो.. तेच करून बघतो.. शेवटाचा डेडलिस्ट मार्ग आहे तो. सौ सोनार की एक रिस्टार्ट की Wink

मी तो ही करुन पाहिला.. काही फरक नाही पडला Sad
बहुतेक आमच्या ऑफिसने Google Marathi Input Tool डालो करणंच ब्लॉक केलं असणार.. घरी लॅटॉ वर प्रयोग करुन पहावा लागणार आता.

फॉन्ट सुरेख आहे. इथे माहिती दिल्याबद्दल आणि डाऊनलोड करण्यास उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. >+१

गुगल इनपुट dwl केल्याने इथे प्रतिसाद मध्ये मराठी / english toggle करायची गरज भासत नाही.

Pages