निरोप समारंभ !

Submitted by MallinathK on 13 February, 2009 - 00:17

आठवणींतले क्षण म्हंटले की मला नेहमी आठवतात ते माझ्या ग्रॅजुएशनचे (B.Sc) दिवस. ग्रॅजुएशनची ती तीन सोनेरी वर्ष ! माझेही कॉलेजचे अनुभव तुमच्या पेक्ष्या काही वेगळे नाहीत. पण ही तीन वर्ष माझ्या ’आठवणींतले क्षण’ म्हणुन मनात खोलवर रुतले आहेत. तो कॉलेजचा कट्टा, ते कॅंटीन, ते शिक्षक, ते मित्र-मैत्रीणीं नी त्या गप्पा, अश्या कितीतरी गोष्टी आहेत ज्यांच्या नुसत्या आठवणींनेही डोळ्यांना ओलावा मिळतो. ग्रॅजुएशन ची दोन वर्षे कशी सरली कळलेच नाही. तीस-या वर्षी वाटायला लागलं की ग्रॅजुएशन ४-५ वर्षाचे तरी हवे होते. शेवटच्या वर्षात येई पर्यंत माझं ही मित्र मंडळ चांगलं झालं होतं. सुहास (सॉस), संदीप (सॅन्डी), श्रीपाद, श्रीवल्लभ (श्री), अमीत, अश्वीनी, भक्ती (फुलराणी), मिनल नी रचना. सुहास, संदीप, अमीत यांचा शेवटच्या वर्षी Maths Specialization होते. श्री चे Chemistry आणी आम्ही बाकीची Electronics. आम्ही Electronics ची लोकं लेक्चर संपले की दुपारी जेवायला मिळुन बसायचो. तेव्हा Maths ची शेजारच्या वर्गात शेवटचा लेक्चर चालायचा. आमच्या वर्गाच्या कॉरीडोर मधे त्यांच्या वर्गाची खिडकी असल्याने त्यांना पिडायला खुप सोप्प जायचे मला. खिडकीतुन सुहासला खडु किंवा कागदाचे बोळे मारायचो मी. (एकदा चुकुन पलिकडच्या मुलीला लागला होता, सरांच्या शिव्याही खाल्या होत्या). एकंदरीत जेवताना दंगा खुप चालायचा आमचा. अन मुलींचा जेवतानाचा रोजचा तो ठरलेला विषय, ’K’ सिरीज च्या मालीका ! "अग, ’हिचं’ काय झालं ?", "’तिला’ ’त्याने’ मारले". मी नी श्रीपाद काहीतरी गुन्हा केल्याप्रमाणे एकमेकांकडे नुसते पाहत बसायचो. आम्हाला काही कळत नाही किंवा आम्हाला बोर होत आहे ते त्या मुलींच्या विश्वातच नसायचे. त्यांचं आपली जेवताना त्या विषयाचे तोंडी लावणे मस्त चाललेलं असायचं. आनखीण एक गोष्ट सांगायचे विसरलो. ते म्हणजे, श्रीपाद, मिनल नी रचना मला ’मधु’ म्हणत असत. हे नाव मला कसे पडले हा एक वेगळाच विषय आहे. पण मला त्यांचं ’मधु’ म्हणने आवडायचे. जेव्ह्य आपल्याला कोणीतरी एका वेगळ्याच नवाने हाक मारत असतो, त्यातला गोडवा नी प्रेम खरंच फक्त अनुभवना-यालाच माहीत असतं. तेवढं ठेवलेलं एकच नाव, त्या व्यक्तीची आपल्या बद्दलची आपुलकी, प्रेम सगळं सगळं काही एका शब्दात सांगुन जातं.

तर सारे दिवस असे मस्त सरत होते. पण माझ्या मनात मिठाचा खडा पडला, जेव्ह्या मला निरोप समारंभाची चाहुल लागली. आणी एके दिवशी सरांनी निरोप समारंभाची तारिख वर्गात जाहीर ही केली. वर्गात सगळेजण आनंदीत दिसत होते, पण काही जनांच्या नजरेतलं वेगळे पण माझ्या नजरेतुन सुटलं नाही. त्या दिवसापासुन आमच्या ग्रुप मध्ये निरोप समारंभाच्याच विषयावर चर्चा होऊ लागली. कार्यक्रमाच्या दिवशी कोणी कश्या प्रकारचे कपडे नेसायचे, काय-काय कार्यक्रम होऊ शकतात वगैरे वगैरे... पण माझं त्यांच्याकडे लक्षच नसायचं. तो विषय निघाला की माझ्या मनाला कसली तरी हुरहुर लगायची. कशाची तरी भिती वाटायची.... कदाचीत ’मधु’ म्हणनारे कोणी नसणार याची....? की हे कॉलेज चे दिवस संपणार याची.... ? की काहीतरी हरवनार आहे याची..... ? पण नक्की काय हरवनार याचा पत्ता लागत नव्हता. शेवटी मग मी निरोप समारंभालाच जायचे नाही असे ठरवले.

समारंभाचा दिवस ! त्या दिवशी पहाटेच जाग आली. जाग आली की.... कदाचीत मी झोपलोच नव्हतो. रात्रभर मनाचं नी डोक्याचं युद्ध चालु होतं. समारंभाला जायचं की नाही जायचं. दिवसाची सुरवात तर झाली, पण सरतच नव्हता. अत्ताशा कुठे सकाळचे नुसते ९ वाजलेत, राहुन राहुन असेच वाटायचे. दिवस खुपच मोठ्ठा वाटत होता. दुपारचे दोन वाजले तरी माझं मन अजुन शांत होत नव्हतं. शेवटी मनावर डोक्याने मात केली, सगळ्यांसोबत शेवटची म्हणुन आनखीण काही 'क्षण' घालवता येतील म्हणुन मी समारंभाला जायचे ठरवले.

मग झटपट तयार होऊन, ठरल्या प्रमाने टाय (खिशात) घालुन कॉलेज मध्ये आलो. वर्गाच्या दारात रांगोळी होती. सगळेजण ठरल्या प्रमाणे वेळेवर येऊन काही ना काही काम करतच होते. आत जायची मनाची तयारीच होत नव्हती. माझी स्तिथी अशी झाली होती की तिथल्या चाललेल्या गोंधळाचा आवाजही ऐकु येईनासा झाला. जणु काही मी मुक चित्रपट पाहत होतो. श्रीपाद नी रचना आत बोलवत होते, नुसते ते हातवारे करताना दिसत होते. "मधु...... !" रचना जवळ जवळ ओरढलीच माझ्यावर, तेव्हा कुठे भानावर आलो. काही न झाल्या सारखे भासवत आत गेलो. नंतर आम्ही सगळेजण अंताक्षरी, दम शेर वगैरे वगैरे खेळ खेळलो. मस्त मजा केली. चार वाजता कार्यक्रमासाठी वर्गात जमलो. HOD, Class Teachers, Department Staff, Principal आदी मान्यवर उपस्थित होते. नेहमी प्रमाणे सरांनी प्रस्तावना देऊन कर्यक्रमास सुरवात केली. नंतर विद्यार्थ्यांनी बोलायला सुरवात केली. काही जणांनी काय बोलायचे ते लिहुन, पाठ करुन आणली होती. पण प्रत्येकजण dice वरुन उतरताना डोळ्यांना रुमाल लाऊनच उतरत होता. माझेही मन भरुन आले होते, रडावेसे मलाही वाटत होते, पण रडुच येत नव्हते. सा-यांची भाषणं झाली. सरांना बोलायला सांगीतल्यावर सर म्हणाले "वर्षभर आम्ही बोलतच असतो, आज तुमच्या बोलण्याचा दिवस". तेही बरोबरच होते ! सर काही बोलले नाहीत, वाटले संपला समारंभ. पण इतक्यात सरांनी माझ्याकडे हात करुन म्हणाले की सारेजण बोलुन झालेत, तु सुद्दा काहीतरी बोल. माझी तर इथे यायचीच मनस्तिथी नव्हती, भाषणासाठी कुठली असनार. मी नाही म्हंटलं तरी सर सोडेनात. त्यात श्रीपादची भर "अबे, बोल जा ! सर बोलवत आहेत तर थोडं बोलुन ये." शेवटी मी बोलण्यासाठी dice वर पोहोचलो.

तयारी नसल्यामुळे सहज सुरवात केली "नमस्कर मंडळी !". इतकावेळ शांत असणारा, नाक ओढुन मुसमुसनारा वर्ग टाळ्यांच्या आवाजाने भरुन गेला. आधीच माझ्याकडे बोलायला शब्द नव्हते, नी त्यात टाळ्यांच तो आवाज...., इतके गहीवरुन आले की डोळ्यांच्या कडांना ओलावा जाणवला. समोरचे सारे पुन्हा अंधुक होऊ लागले. पटकन स्वत:ला सावरुन मी बोलु लागलो. आज ५-६ वर्ष झाली पण माझ्या त्या दिवशीच्या बोलण्यातला शब्द न शब्द आठवतो. माझी एक आवडती कवीता मी ऐकवली होती. मला वाटते आठवीला असताना शाळेत शिकलो होतो, ’कणा’ कवी कुसुमाग्रजांची.

ओळखलत का सर मला? - पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन.
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे,
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे.
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,
पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेउन, फक्‍त लढ म्हणा!

कवीतेची शेवठची ओळ संपते न संपते पुन्हा टाळ्या. या वेळेस टाळ्यांचा आवाज जास्तच होता. इतका की डोळ्यांतल्या अश्रुंना वाट सापडत नव्हती. कवीता संपल्यावर मी थोडावेळ बोलायचे थांबलो, पण टाळ्या थांबल्याच नव्हत्या. जणु आजपर्यंतच्या माझ्या सा-या प्रश्नांची उत्तरेच देत होती. तेव्हा मला कळत होते, या समारंभानंतर ’काहीतरी’ म्हणजे नक्की काय हरवणार आहे. त्या टाळ्यांनी मनातला गुंता सोडवला. मला पुढे बोलुन भाषण संपवायचे होते. पण टाळ्यांनी अश्रुला वाट करुन दिली, नी मी फक्त ’धन्यवाद’ म्हणुन dice वरुन उतरलो. उतरताना माझाही हात नकळतच डोळ्यांकडे गेला होत.

-- मल्लिनाथ करकंटी

गुलमोहर: 

छान सांगितल्या आहेत आठवणी... कॉलेज चे दिवस खुप आठवले.
--------------------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

मल्लिनाथ उत्तम लिहील आहे .

मल्लिनाथा, खरंच रे! त्या सोनेरी दिवसांची आठवण करुन दिलीस... छान वाटलं.
सगळ्यांच्याच आयुष्यातले हे दिवस अविस्मरणीय असेच असतात. कारण तोपर्यंत आयुष्यातल्या महत्त्वाच्या जबाबदार्‍यांचं ओझं खांद्यावर पडलेलं नसतं. कॉलेज, कट्टा, कॅन्टीन आणि ग्रुप हेच आपलं विश्व असतं. आणि हे विश्व फारच मोहक आणि वेडावणारं असतं.

कॉलेजच्या शेवटच्या दिवशी माझी आणि माझ्या ग्रुप मधल्या सर्वांचीच अवस्था थोडीफार अशीच झाली होती. आता आपलं एकमेकांना भेटणं कमी होणार याची हुरहुर वाटत होती. आणि मुख्य म्हणजे त्यावेळी आज सारखे प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोनही नव्हते. कॉलेजमधून निघताना आम्ही अक्षरशः सगळं कॉलेज पुन्हा फिरुन घेतलं. लायब्ररी, बेसमेंट मधले वर्ग जिथे आम्ही पी.एल. मधे दिवसभर पडिक असायचो आणि अभ्यासासोबतच खुप धमालही करायचो, आमची लॅब, ऑफीस... अगदी सगळं सगळं डोळे भरुन पाहून घेतलं. लायब्ररीयन पासून ते पियुन पर्यंत आणि लॅब इन्स्ट्रक्टर पासून ते डायरेक्टर पर्यंत सगळ्यांना पुन्हा भेटून घेतलं. आणि जडावलेल्या मनाने तिथून निघालो.

सुदैवाने, आजही आमच्या ग्रुपमधले सगळे जण एकमेकांच्या संपर्कात आहेत. प्रत्यक्ष भेटी क्वचितच होत असल्या तरी फोनवरुन झालेल्या भेटीही तितक्याच महत्त्वाच्या, नाही का? पुण्यात सगळेजण कधी कर्मधर्मसंयोगाने एकत्र आलोच तर पुन्हा कॉलेजला सुद्धा भेट देउन येतो.

-योगेश

प्रतिसादा बद्दल सर्वांना धन्यवाद....
योगी तेव्हा आम्हीही सगळं कॉलेज पुन्हा फिरुन घेतलं होतं. आणि आजही मी जेव्हाही घरी जातो, कॉलेजला आर्वजुन भेट देतो... डिपार्टमेंट च्या सरांना भेटतो... Happy आणी तु म्हणतोस तसे सुदैवाने, आजही आमच्या ग्रुपमधले सगळे जण एकमेकांच्या संपर्कात आहेत (शिवाय काही मैत्रींनच्या Sad ).

माझी सुद्धा ही सगळ्यात आवडती कविता आहे.
पुन्हा कॉलेजच्या दिवसांची आठवण करुन दिलीत तुम्ही.

मल्लिनाथ,
फारच छान. मला सुद्धा कुसुमाग्रजांची 'कणा' कविता खुप आवडते. माझी सुद्धा 'कणा' नावाची एक कविता आहे पण ती वेगळी आहे.
जे.डी. भुसारे