तेथे कर माझे जुळती … १

Submitted by SureshShinde on 23 October, 2015 - 16:10

prayingHands.jpg

स्थळ: जर्मनी – १९६०

"डॉक्टर, आमचा नुकताच विवाह झालाय पण जेनीला निद्रानाशाचा विकार जडलाय! रात्रभर भुतासारखी जागी असते आणि त्यामुळे मी तर अगदी वैतागून गेलोय! काही तरी जालीम औषध द्या कि हिला रात्री छान झोप लागेल."
"हे पहा, झोपेचे औषध द्यायला माझी काहीच हरकत नाही पण अशा औषधांची सवय लागते आणि त्यामुळे कालांतराने 'औषधापेक्षा उपाय भयंकर' अशी परिस्थिती होण्याची शक्यता असते."
"पण असे एखादे सौम्य औषध असेलच ना?"
डॉक्टर महाशयांनी थोडा वेळ आपली दाढीवर हात फिरवीत विचार केला आणि म्हणाले, "गेल्या दोन वर्षांपासून एक नवे औषध बाजारामध्ये आले आहे. ते घेवून पहा. कंपनीच्या मते ते अगदी उत्तम आहे. हे कंपनीवाले तर असेही म्हणतात की 'हे औषध घेवून आत्महत्या करण्याचा विचारदेखील करू नका, फसाल!' इतके हे औषध सेफ आहे.रोज रात्री एक गोळी घ्या आणि निद्रसुखाचा आनंद उपभोगा."
डॉक्टरमहाशयांनी त्यांच्याकडील 'थ्यालीडोमायीड'च्या गोळ्या जेनीला दिल्या. त्या गोळ्यांनी चमत्कारच केला. जेनीला प्रथमच उत्तम झोप लागली. जेनीने मग त्या गोळ्या रोजच घेणे चालू ठेवले. यथावकाश जेनीला गर्भधारणा झाली आणि प्रसूतीसाठी ती हॉस्पिटलात दाखल झाली.
जेनीचा नवरा लेबर रुमच्या बाहेर येरझाऱ्या घालत होता.
तेव्हड्यात एक नुर्स लगबगीने बाहेर येवून त्याला आत घेवून गेली. आत डॉक्टर गंभीर चेहेरा करून उभे होते.
"मिस्टर, आपल्याकरता एक चांगली आणि एक वाईट बातमी आहे. आपल्याला मुलगी झाली आहे पण … "
"पण काय??"
डॉक्टरांनी पुढे काही न बोलता नर्सने हातामध्ये धरलेल्या ट्रेमधील बाळाकडे बोट दाखवले.
ट्रे मधील त्या गोजिरवाण्या बाळाला … हात आणि पाय नव्हते. हात आणि पायाचा वाकडातिकडा पंजा एखाद्या सील माश्यासारखा बाळाच्या शरीराला चिकटलेले दिसत होते.
'आपल्या बाळाच्या नशिबी असे व्यंग का यावे' याचे खापर आपल्या 'ब्याड कर्मा' वर फोडीतच जेनी घरी परतली.

picomelia.gif

शिकागो: १९३८

या काळात नुकताच 'सल्फा' या क्रांतिकारी औषधाचा शोध लागला होता. जंतूंमुळे झालेला संसर्ग व त्यामुळे होणारे अनेक जीवघेणे आजार या औषधामुळे बरे होवू लागले होते. पण या औषधाच्या गोळ्या आकाराने खूपच मोठ्या व भरपूर प्रमाणामध्ये खाव्या लागत होत्या. यावर 'मेसेन्गील' या कंपनीने एक शक्कल लढवली आणि या औषधाचा द्राव तयार केला. हे गोड मिश्रण लवकरच लोकप्रिय देखील झाले. पण हळूहळू हे पातळ औषध घेणारे रुग्ण मरू लागले. हे रुग्ण आजाराने मरत होते कि या नवीन औषधामुळे हे लवकर समजले नाही आणि तोपर्यंत सुमारे १०७ लोकांचा बळी गेला. मग मात्र अमेरिकेतील 'एफडीए' हे जनतेच्या अन्न आणि औषधे यावर नियंत्रण करणारी संस्था खडबडून जागी झाली. त्यांनी या द्रव औषधाचे घटक जनावरांना पाजून प्रयोग केले. सल्फा या औषधाला विरघळण्यासाठी जे द्रावण वापरले होते ते प्यालेले उंदीर आजारी पडले, लाल लघवी होवू लागली आणि पुढे लघवी होणे थांबले व ते सर्व उंदीर मेले. त्या द्रावणाचे नाव होते,'डायइथिलीन ग्लायकॉल'. (आपल्याकडे जे जे हॉस्पिटल कांडामध्ये ह्याच केमीकलची भेसळ झाल्याने अनेक रुग्ण दगावले होते.) 'एफडीए'च्या या शोधक्रियेमध्ये अग्रेसर होत्या वैद्यकीय औषधशास्त्र निष्णात डॉ. फ्रान्सेस केल्सी!

'एफडीए हेड क्वार्टर्स' वॉशिन्गटन डी सी: १९६०

औषधशास्त्र निष्णात डॉ. फ्रान्सेस केल्सी यांची नेमणूक 'नवीन औषध परवानगी' झाली तो महिना होता ऑगस्ट आणि त्यांच्या पहिल्या अर्जदार औषध कंपनीचे नाव होते 'मेरेल' आणि औषधाचे नाव होते, 'थ्यालीडोमायीड'!
"डॉक्टर केल्सी, तुमच्या पहिल्या जबाबदारीचे औषध म्हणजे एक झोपेचे औषध आहे. तसे हे औषध गेले तीन वर्षे युरोपमध्ये भरपूर वापरले जात आहे. हे इतके सेफ आहे कि जर्मनीमध्ये डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय मिळू शकते. त्यांनी अमेरिकेतही काही डॉक्टरांना प्रयोगाखातर दिले आहे. तेंव्हा तुमचे काम अगदी सोपे आहे. फक्त सही करणेच बाकी आहे."
डॉ. केल्सी अतिशय कडक शिस्तीच्या म्हणून प्रसिद्ध होत्या. आज देखील 'एफडीए'चे नियम अतिशय कडक आहेत. एका औषधाच्या मान्यतेसाठी जवळजवळ दीडशे मोठे ग्रंथ-सद्दृश कागदपत्रे सादर करावे लागतात व अनेक चाचण्या व चाळण्यातून त्यांना जावे लागते. त्या वेळीही मेरेल कंपनीने अशी चारपाच मोठ्ठी भेंडोळी सादर केली होती. दोन महिन्याच्या आत कंपनीला उत्तर देणे आवश्यक होते. केमिकल एक्सपर्ट, औषधतज्ञ व मेडिकल तज्ञ स्वतः डॉ. केल्सी अशा तिघांनी ह्या औषधविषयक पुराव्याचा बारकायीने अभ्यास केला. केल्सी यांचे वाचन दांडगे होते. त्यावेळी आपले 'गुगलगुरु' देखील मदतीला नव्हते. बीएमजे नावाच्या वैद्यकीय नियतकालिकामध्ये लंडनमधील एका डॉक्टरांचा या औषधाबद्दलचा अनुभव त्यांनी वाचला. थ्यालीडोमायीड खाल्यामुळे काही रुग्णांच्या नसांना सूज येवून अतिशय वेदना होवू लागल्या होत्या. डॉ. केल्सी यांनी मेरेल कंपनीला विचारले असता त्यांनी योग्य उत्तरे दिली नाहीत. या कंपनीने केलेल्या जनावरांवरील प्रयोगाचा अभ्यास केल्यानंतर गरोदर प्राण्यांवर या औषधाचे प्रयोग केलेले त्यांना आढळले नाहीत. म्हणून त्यांनी या औषधाला परवानगी नाकारली. या निर्णयाचा दूरवर परिणाम झाला. त्यांना अनेक आमिषे दाखवली गेली, अगदी सर्व - साम, दाम, दंड ! कंपनीने अनेक 'तज्ञ' डॉक्टरांची बैठक घेवून त्यांना पटवण्याचा प्रयत्न केला. कोण म्हणाले, "तुम्हाला शेगडीची धग सोसत नसेल तर स्वैपाकघरातून बाहेर पडा!" अनेक मित्रांनी सबुरीचा सल्लादेखील दिला. पण केल्सी आपली निर्णयावर दृढ होत्या. कागदी घोडे नाचाविण्यामध्ये एक वर्ष निघून गेले. कंपनी हातघाईवर आली. गयावया करू लागली. आणि तेव्हड्यात बातमी आली की जर्मनी आणि इंग्लंडमध्ये या औषधामुळे हातपाय नसलेली अनेक मुले जन्माला आल्याची!

या थ्यालीडोमायीडमुळे संपूर्ण जगामध्ये सुमारे दहा हजार अपंग मुले जन्माला आली. परंतु अमेरिकेमध्ये मात्र केवळ सतरा व तीदेखील बाहेरील देशांतून आलेली होती. डॉ. केल्सी मुळे अमेरिकेवरील फार मोठे संकट टळले होते! त्यांच्या या कार्याची दखल घेवून स्वतः जॉन केनेडी यांनी १९६२ चे राष्ट्रीय समाज सेवा मेडल देवून गौरव केला. यापुढेही त्यांना अनेक बहुमान मिळाले.

DrKelsism.gif

केवळ दोनच महिन्यांपूर्वी डॉ. केल्सी यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी निधन झाले. त्यांना आपणा सर्वांतर्फे माझे शतशः प्रणाम!

================

हेच औषध पुढे लेप्रसी म्हणजे कुष्ठरोगावर उपयोगी असल्याचे आढळून आले. अनेक प्रकारच्या रक्ताच्या कर्करोगावर देखील ते वापरले जात आहे. थ्यलेसेमिया नावाचा एक अनुवांशिक आजार आहे ज्यामध्ये दर महिन्यातून अनेक वेळा रक्त भरावे लागते. या औषधामुळे रक्त भरण्याचा अवधी खूपच लांबविता येतो. कोठलेही औषध हे दुधारी शस्त्र असून ते जपून आणि अभ्यासून वापरले पाहिजे हेच यातून अधोरेखित होते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख.:)
डॉ. केल्सी यांना निधनापूर्वी एक दिवस 'ऑर्डर ऑफ कॅनडा' या सर्वोच्च किताबाने त्याच्या लंडन, ओंटारिओ मधल्या घरी गौरवण्यात आले होते. त्यांना सलाम.

नेहमीप्रमाणे अतिशय माहितीपूर्ण लेख. धन्यवाद डॉक्टर काका.

पुढील लेखाच्या प्रतीक्षेत.

डॉ केल्सी ना अभिवादन.

औषध क्षेत्रातील संशोधनासंदर्भात एक प्रश्न मला नेहमी पडतो. एखादे औषध प्राण्यांच्या शरीरावर जो परिणाम करते तोच परिणाम मनुष्य प्राण्याच्या शरीरावर होतो का? इतर प्राण्यांवर होणारे परिणामच मनुष्य प्राण्यावर होतील असे १०० टक्के मानतात का?

वाह डॉ.साहेब - बरेच दिवसांनी तुमचा अजून एक सुरेख लेख वाचायला मिळतोय ...

डॉ केल्सी ना अभिवादन. >>>+११११

डॉ केल्सीसारख्या अतिशय अतिशय कडक शिस्तीच्या व अभ्यासू मंडळींमुळे यूएस एफ डी ए चा एक दबदबा अजूनही जगभर आहे. यूएस एफ डी ए ची मान्यता मिळवणे आजही खूप जिकीरीचे आहे - सगळ्यात कडक नियमावली असणारे म्हणून ते प्रसिद्ध आहेत.

वी मिस्ड यु डॉक. कुठे होतात इतके दिवस.
तुमची खरंच मनापासुन आठवण आली अनेक वेळा.

हाही लेख नेहमीप्रमाणेच ___/\___

प्लीज लिहित राहा. मला तुमचे लिखाण खुप आवडते.

ओह ! केल्सीना सलाम

नवीन लेखनात डॉ सुरेश शिंदे हे नाव वाचून बर वाटल . अपेक्षेप्रमाणेच उत्तम लेखन वाचायला मिळाल . आता लेखनात खंड पडू देऊ नका प्लीज

नेहमीप्रमाणेच छान लेख.. अनेक बाबतीतली माहिती सर्वसामान्यांना माहित नसते, असे लेखन सातत्याने होणे गरजेचे आहे.. आणि ते तूमच्यासारख्या तज्ञ आणि तरीही सोप्या भाषेत लिहिण्याची विलक्षण हातोटी असलेल्या व्यक्तींनी करणे फार गरजेचे आहे.

नवीन लेखनात डॉ सुरेश शिंदे हे नाव वाचून बर वाटल .>>>+११

अतीशय सूंदर लेख. पूढच्या भागांच्य प्रतिक्षेत.>>+१

Pages