घडी

Submitted by दाद on 30 January, 2009 - 22:29

जीवनात ही घडी अशीच राहूदे.....

चित्रपटात नक्की कसं घेतलय आठवत नाही. पण हे गाणं गाणारी कुणीही पांघरूणाची किंवा कपड्यांची झटकून घडी करीत असताना म्हणत असल्याचं डोळ्यासमोर येतं. त्यात ’ही’ वर झटका.

ghadee-daad.gifघडी!
स्वत:चे कपडे स्वत: घडी करून ठेवा आता... असं घडीघडी ऐकू येण्याआधीच कधीतरी ह्या घडीशी ओळख झालेली असते. घरात जिथे तिथे घड्या करून पडलेले कपडे, आधी पसरलेली आणि मग व्यवस्थीत घडी करून ठेवलेली अंथरूणं-पांघरूणं, परीट घडीचे शर्टं, पँन्ट्स, गंमत म्हणून शाळेत किंवा मैत्रिणींकडून शिकून घेतलेले कागदाच्या घड्या घालून करायचे वेगवेगळे पक्षी, प्राणी, फुलं...

आणि हो! घडीची पोळी! सुबक छोटा गोल लाटून, त्यावर साजुक पातळ तुपाचा चमचा फिरवायचा, अलगद पिठी पसरायची. एकावर दुसरा पदर घालून पुन्हा तेच... तूप अन पिठीची पाखर... घालायची घडी.... आणि शेकायची तव्यावर... मऊ सुती कापडाचा बोळा हातात घेऊन... कडा दाबत दाबत. टम्म फुगलेल्या पोळीला मग उग्गीच गंध लावल्यासारखा थोडासा तूपाचा चमचा फिरवायचा वरून....
पानात येते तेव्हा बाssरिक काठाची, घडी, घडीतून अलगद पदर ल्यालेली... अन्नदेवीचं हे काठ-पदराचं साधं सोज्वळ रूप किती मोहक... अन रुचकरही.

ही जशी घडी भेटते, तशीच...

कधीतरी आई-मावशी एकमेकींशी हळू आवाजात बोलताना, ’... बाकी काही म्हण. तिच्या आयुष्याची घडी काही बसली नाही शेवटपर्यंत. नाही?’ असलं काहीतरी ऐकताना ही घडी एक गहिरा अर्थ घेऊन येते.

घड्या घालण्यापेक्षा आपण उलगडण्यातली मजा आधी शिकतो. आपल्या नवीन फ्रॉकची, आईच्या नवीन साडीची, ताईच्या नवीन पंजाबी ड्रेसची... इतकच काय पण परीटाकडून आलेले स्वच्छ ताज्या वासाचे पलंगपोस, चादरी, पडदे... ह्यांच्या घड्या उलगडताना काहीतरी नवीन, उमदं, ताजं, उड्या मारायला लावणारं उलगडतं मनात. मला तर पुस्तकांचंही असच वाटतं. नवीन पुस्तकं... एखाद्या नवीन वस्त्रासारखी घडीघडीची असतात... पानापानातून उलगडत जातात.

अनेक दिवसांनी उघडलेलं आवडीचं पुस्तक आणि अनेक दिवसांनी नेसायला काढलेली एखादी ’ती’ साडी... मला सारखाच आनंद देतात.

आपल्यापैकी कुणालातरी कधीतरी भेटते एखाद्याच चिटोर्‍याची किंवा अगदी संपूर्ण फुलस्केप कागदाची, थरथरणारी घडी... ही अशी भेटते तशी परत कधीच भेटत नाही. आपल्या अन ती देणार्‍याच्या सगळ्या असण्या-नसण्याचा अर्थ उलटा-पालटा करणारी ती घडी. दोघांच्याही उर्वरीत आयुष्याच्या उरलेल्या घड्यांना ’घडी’ म्हणायचं की ’विस्कटणं’.... ते ठरवणारी...

ही अवघड घडी.... कधी उलगडते तीच मुळी न मावळणारी रातराणीच्या गंधाची चांदणी रात बनून.... तर कधी....
कायमची मिटून जाते... न संपणारी, एकटं एकटं करणारी, घुसमटवणारी सांजवेळ बनून... बाहेरच्या जगासाठी व्यवस्थीत दिसणार्‍या ह्या घडीने आत कोंडून घातलेले असतात दोन जीव... तिच्याच वेगवेगळ्या पदरांत... अन एकटेच, पुन्हा.

कुणी नीट घडी घातली तर कुणी उलगडणार ना? नीट घडी घालण्याचं महत्वं कळतं अन आपण खऱ्या अर्थाने मोठे होतो.... अन जरा निगुतीनं घड्या घालायला लागतो.... कागदांच्या, नवीन-जुन्या वस्त्रांच्या.... आपल्या-दुसर्‍यांच्या आयुष्यांच्याही.

लेक जर मोठा झाल्यावर एक दिवस त्याला सांगितलं, म्हटलं आजपासून तुझ्या पांघरूणाची घडी तू करायचीस. थंडीचे दिवस. इथे वापरायच्या जाडजूड क्विल्टची घडी करताना त्याचा चाललेला आटापिटा बघून मलाच दया आली. मी मदत करणार असं लक्षात येताच अगदी वडिलांसारखं नुस्तं हाताच्या पंजाने मला थांबवून, पठ्ठ्याने पूर्ण केलन.
मीच मग... अरे, असूदे. उन्हाळा सुरू झाला की कर हं... वगैरे म्हटलं. तेव्हा ’हे’च नंतर म्हणाले... मोठंही करतेयस त्याला आणि छोटंही ठेवायचय... कसं शक्यय? करू दे, त्याला.

सुरूवातीला महाशय उठल्यावर खोलीतून बाहेर यायला चांगली दहा मिनिटं लागायची. मग मग एकदम दोन मिनिटात बाहेर. मलाही कौतुक वाटलं, की भलताच तयार झाला गडी, घडी घालायला. बघावं तेव्हा त्याच्या कॉटवर, पायाशी, क्विल्टचा सुर्रेख चौकोन दिसायचा.
एकदिवस माझंच काहीतरी सापडेना म्हणून त्याच्या खोलीत शोधायला गेले. क्विल्टखाली असेल म्हणून उचललं तर त्या झक्कास चौकोनाखालून क्विल्टचा मोठ्ठा बोळाच बाहेर पडला. मी कपाळावर हात मारला.
गधडा वरून परफ़ेक्ट चौकोन करून बाकीचं व्किल्ट त्याखाली दडपत होता... ’दोन मिनिटात क्विल्टची घडी’चं रहस्य कळ्ळं!

’रात्री जे परत विस्कटायचय त्याची घडी काय म्हणून करायची? सगळी खोलीच पसरलेली असेल तर पसरलेलं पाघरूण वाईट दिसेल का? मग खोलीच लाऊया नको की! आणि ती घडी नाहीये हे तुला माहीत नव्हतं तो पर्यंत तू आनंदातच होतीस ना? मग?’ ... किती किती तणतणला!
बर्‍याच बोला-चालीनंतर त्याला घडीचं महत्वं पटवण्यात यश आलं... अजून मी कधीतरी घडी का चौकोनी बोळा ते बघते, हळूच जाऊन.

कुठेतरी त्याची घडी बसवायचा माझा प्रयत्नं होता, त्याचा त्याने काढलेला अर्थ, त्यानं स्वत: ती आपल्यापरीने बसवली ती गोष्टं वेगळी. पण त्याचे त्यावेळचे युक्तीवाद मला अजून आठवतात, आपल्या आयुष्याला चपखल बसणारे.
विस्कोट होणारच आहे तर घडी घालाच कशाला? लोकांची परीट-घडीतली आयुष्य आहेत म्हणून आपलंही घडीत बसवायचं का? का म्हणून? आपल्याला जी घडी दिसतेय ती नक्की घडी आहे की ’विघडी’?

खरच. घडी म्हणजे नक्की काय? कुठेतरी एक नीट-नेटकेपणा, काही नेम-नियम, काही बांध, काही शिस्त, संतूलन.... घडी म्हटली की, झटकणं आलं, थोडी मुरड आली, काही दुमडणं आलं.... काही दडपणं आलं... काही सुरकुत्यांचं सरळ करणं आलं, काही दाखवण्यासाठी काही झाकणं आलं.

माझी एक जरा लांबची मैत्रिण आहे. तिची आई अन माझी आई मैत्रिणी म्हणून ती माझी "लांबची" मैत्रिण म्हणायची. ती इतकी नीटनेटकी होती की, त्यातलं दहा टक्के माझ्यात आलं असतं तर माझ्या आईनं मला तासाभरासाठी नाही तरी दहा मिनिटंतरी देव्हार्‍यात बसवली असती.
लग्नानंतरही मी फारशी बदलले नाहीये, तीही नाही.

पण... तिच्या संसाराची घडी माझ्या लेकाने करून ठेवलेल्या घडीसारखी. दिसायला सुरेख, फक्तं. नक्की काय बिनसलय माहीत नाही, पण जे काही आहे ते, सहजासहजी न दिसणारं, वरून सुखाचं, आतून टोचणारं... डोळ्यातलं हासू कायमचं पुसणारं... असं... विघडलेलं.
घडी घालायला म्हणून घेतलेली आणि विस्कोट झालेली किती आयुष्य दिसतात आपल्याला. नक्की कुठला पदर निसटला हातातून ते कळे कळेपर्यंत निव्वळ बोळा.... एक अस्ताव्यस्तं ढीग होऊन बसतो, आयुष्याचा. कारण चारच टोकांचं असत नाही आयुष्यं... त्याला अनेक बाजू आहेत, अनंत पदर आहेत... प्रत्येक आयुष्याची घडी वेगळी... ती कशी घालायची ती "त्या" विणकरालाच ठाऊक.

मधे कधीतरी एका मोठ्या वीकान्ताला काहीच घाट घातला नव्हता. घराची स्वच्छता नाही, जेवणं-खावणं नाहीत, कुठे जाण्याचा, कुणी येण्याचा कार्यक्रम नाही... काही नाही. मनाचं मोकळं आभाळ घेऊन नुस्तीच चहाच्या कपाच्या संगतीने बाहेर येऊन बसले. शेजारचीने घरातल्या असल्या नसल्या सगळ्या अंथरूणांना सूर्यदर्शन करवायचा घाट घातला होता. मला एकदम आठवलं..... आज्जी असं वर्षातून एकदा तिच्या ठेवणीतल्या पातळांना सूर्य दाखवायची, नाही?

वाळ्याचा, केवड्याच्या कणसाचा, बकूळीच्या वळेसराचा, किंवा चमेली सारख्या वासाच्या उदबत्तीचा, असले गंध ल्यालेली तिची नऊवारी पातळं.... पातळ मऊशार सुती जुन्या साडीत अलगद बाधून ठेवलेली....
एक मोरपिशी, एक बैगणी, एक झक्क गडद्द गुलाबी आणि एक पिवळंधम्मक.... त्यावरल्या लाल कुंकवाच्या बुंदींचं... माझं सगळ्यात आवडतं... किती अलवार हातांनी घडी उलगडायची ती, हलक्या हाताने नाजुक झटकत आंगणात न्यायची. साडीचे जरी काठ, पदरावरली नक्षी, अंगावरली बुंदी, रेशिम कुयर्‍या.... हे सगळं सूर्याचं जरा कुठे निरखून होतय, तोच आत आणायचीही. असं प्रत्येक नऊवारीचं कौतुक... तोपर्यंत मी आणि माझ्यासारखीच इतर मॅड नातवंड त्या पेटीतून येणाऱ्या त्या मॅड वासांवर तरंगत असायचो....

आजोबा गेल्यावर आज्जीनं कधीच उलगडल्या नाहीत त्या घड्या.... चुरगाळून फेकूनही दिल्या नाहीत.... देऊनही टाकल्या नाहीत... नाळ तोडून त्यावेगळी... मोकळी झाली ती.
मी विचार करीत राहिले.. त्या घड्यांचं काय? प्रत्येकाच्या काही काही घड्या अशाच.... माणसांनी त्यांच्या आयुष्यातून हद्दपार केलेल्या... बेवारशी. जपूनही ठेवलेल्या नाहीत अन टाकूनही दिलेल्या नाहीत.

घड्या कधी पुन्हा न उलगडण्यासाठी घालायच्या असतात का? मला नाही वाटत... जाणुनबुजून तर अशी घडी कध्धीच घालायची नसते.
काही पत्रं, काही वस्त्रं, काही आठवणी... हळवं होऊन कुरवाळायच्या, हलक्या हाताने त्यांची अलवार घडी घालायची, आणि मनाच्या आतल्या आतल्या कप्प्यात कायमच्या.... हळूवारपणे ठेवायच्या.... कारण...

कारण... त्या पुन्हा उलगडायच्या असतात.... खूप खूप दिवसांनी.... वर्षांनी का होईना, पण उलगडायच्या असतात, म्हणूनच.

जे उलगडायचं नाही ते, एकतर चुरगाळून, बोळा करून, फाडून फेकून देतो नं आपण... किंवा नाळच तोडून टाकतो, नाही?
त्यांच्याशीतरी असा दुस्वास का?

(घडी त्याचीच घालायची जे पुन्हा उलगडायचं आहेत.... तेच जपून ठेवायचय.... )
घडी त्याची तर घालायचीच, अन जपून ठेवायचं, जे पुन्हा उलगडायचंय.......

अन त्याची ही घडी घालायची, जे एका विरक्तं क्षणी तोडून टाकून द्यावसं वाटतं... छान सुबक होडी बनवायची... बिन नांगराची हं... आणि द्यायची सोडून काळाच्या प्रवाहावर...

समाप्त!

(रेखाटनः पल्लवी देशपांडे)

गुलमोहर: 

मस्तच दाद. याची घडी मस्तच जमलिये.:)

दाद, नेहमीप्रमणेच मस्त!!

>>>घडी त्याचीच घालची जे पुन्हा उलगडायचं आहेत.... तेच जपून ठेवायचय....

>>>नक्की कुठला पदर निसटला हातातून ते कळे कळेपर्यंत निव्वळ बोळा.... एक अस्ताव्यस्तं ढीग होऊन बसतो, आयुष्याचा. कारण चारच टोकांचं असत नाही आयुष्यं... त्याला अनेक बाजू आहेत, अनंत पदर आहेत... प्रत्येक आयुष्याची घडी वेगळी... ती कशी घालायची ती "त्या" विणकरालाच ठाऊक.>>>>>
क्या बात है!!

शलाका विचार मंथन छान आहे .मला वाटत जे पुन्हा उलगडायच नाही व जपून ठेवायच नाही त्याचिही
छान घडी घालून रवानगी करावी .जी वस्तू वापरली ,जिने आपली गरज भागवली त्या वस्तूचा आदर
करावा .जशी आदराने आणली तशीच आदराने योग्य जागी पोहोचवावी .

>>खरच. घडी म्हणजे नक्की काय? कुठेतरी एक नीट-नेटकेपणा, काही नेम-नियम, काही बांध, काही शिस्त, संतूलन.... घडी म्हटली की, झटकणं आलं, थोडी मुरड आली, काही दुमडणं आलं.... काही दडपणं आलं... काही सुरकुत्यांचं सरळ करणं आलं, काही दाखवण्यासाठी काही झाकणं आलं. >>>

अगदी वास्तविक....!!!

खरच. घडी म्हणजे नक्की काय? कुठेतरी एक नीट-नेटकेपणा, काही नेम-नियम, काही बांध, काही शिस्त, संतूलन.... घडी म्हटली की, झटकणं आलं, थोडी मुरड आली, काही दुमडणं आलं.... काही दडपणं आलं... काही सुरकुत्यांचं सरळ करणं आलं, काही दाखवण्यासाठी काही झाकणं आलं.

दाद खुपच छान.

किती छान.....!!

दाद, तुझी ही घडी मात्र जसजशी उलगडत जाईल तसतशी अजुनच सुंदर होत जाते.
सुरेख.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!

सगळ्यांचे आभार. छायाताई, तुमचे विशेष आणि अनेक. तुम्ही मांडलेला विचार इतका भावला की, ह्या लेखाला एक सुरेख वळण लागलं. तुमची परवानगी न घेता, तोच विचार लेख बदलून लिहिला आहे.
मुळ लेखातला भाग कंसात तसाच ठेवलाय. नवीन भाग बोल्ड आहे.
परत एकदा, धन्यवाद.

छान लिहिलं आहेस दाद

अन त्याची ही घडी घालायची, जे एका विरक्तं क्षणी तोडून टाकून द्यावसं वाटतं... छान सुबक होडी बनवायची... बिन नांगराची हं... आणि द्यायची सोडून काळाच्या प्रवाहावर...
>>>> हे वाक्य भावलं!

-----------------------------------
तेरी उम्मीदपे ठुकरा रहा हूँ दुनियाको
तुझेभी अपनेपे यह ऐतबार है की नहीं..

या घडीलाही भारीच, दाद! Happy

(या निमित्ताने 'घडीघडी' हा खान्देशात की विदर्भात 'पुन्हापून्हा' या अर्थाने वापरला जाणारा शब्द आठवला. 'घडी'शी आपली गाठ जगताना पुन्हापून्हा पडतेच- या संदर्भाने तो शब्द तयार झाला असावा, असे उगीचच वाटून गेले..:))

--
आतली पणती, तेवायला अशी;
अंधाराची कुशी, लागतेच..!!

दाद .............सुंदर विचार....नेहेमीप्रमाणेच!
जीवनातली घडी अशीच राहू दे
प्रीतीच्या फुलांवरी वसंत नाचु दे!

एकदम सुरेख लिहिलंय हे सहज विचारमंथन. अन छायाताईंचा विचारही छान...

खरच अप्रतिम ! परत पुन्हा जुन्या घड्या अलगद उलगडल्या.

हर घडीके काँटे हम दोबारा नही घुमा सकते!

काही वेळा काही आठवणींची घडी की बोळा करून आपण फेकून देतो खर पण..
घडी त्याचीच घालायची जे पुन्हा उलगडायचं आहेत.... तेच जपून ठेवायचय.... > खराय!
Happy

ये कोई अचरज की बात नहीं है आप ने बहुत ही बढिया लिखा है! Happy

सुन्दर दाद! आईला वाचून दाखवला तेंव्हा आवडलं हे लिखाण!

काही घड्या अशाही असतात ... दुसर्‍यांच्या आयुष्याच्या ज्या आपण उलगडाव्यात.. किंवा आपण त्यातला सुगंध आपल्यामध्ये साठवावा! शिक्षकी पेशा किती चांगला ना? जे मनापासून करतात ते कितीतरी आयुष्यांच्या मूळ घड्या घालत असतात, जेणेकरून जेंव्हा ह्या घड्यांपासून घडलेल्या बोटी प्रवाहात उतरतात तेंव्हा त्यांचा पाया मजबूत असतो.

ह्या लेखाच्या निमित्ताने अशा व्यक्तीची आठवण झाली.

जाईजुई, अगदी अगदी! ह्या आणि अशाच घड्यांमधून आपण घडलेले असतो. हे त्या व्यक्तींचं देणं!
(आईला विचारलय म्हणून सांग)

नेहमीप्रमाणे फार मस्त लिहीलयस तू दाद.

छानच लिहिलय. लेकाचं घडी घालणं आणि नंतरचा युक्तीवाद- दोन्ही छान.
हेच तर आपण सगळ्यात जास्त करत असतो- घड्या घालणं, मग त्या कशाच्याही असू दे.

छान ग शलाका.

खूपच छान,सुंदर.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

दोन घडीचा डाव ...
याला जीवन ऐसे नाव ...

दाद... खुप सुंदर ... किती अर्थ आहेत... शोधावे तितके कमी... विचारांना चालना देणारा लेख... खुप आवडला.

घडीभरात वाचून होईल म्हटलं तर इतक्या घड्या उलगडल्या आणि इतक्या नव्या घड्या पडल्या की घडीभर काही सुचलचं नाही. घडी घडी असं लिखाण घडो.
.........................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

खुप सुंदर दाद.
-------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

छान, अगदी सहज शैली आहे तुमची.

Pages