कृष्णमेघ कुंटे या एका रानवेड्याची जंगलातली मुशाफ़िरी.....! ख-याखु-या जंगलपुत्रासारखं राहून.... जे अनुभवलं ते सहजसुंदर शैलीत लेखकानं रेखाटलंय.
"काही पुस्तकं वाचायची नसतात, तर अनुभवायची असतात" असं म्हणतात ते अगदी खरंय. मिलिंदनं हे पुस्तक जरुर वाच असं सुचवलं तेव्हा ह्या पुस्तकात काहीतरी जबरी असणार ह्याची खात्री होती.... आणि झालंही तसंच ह्या पुस्तकासोबत आपण अक्षरश: जंगलात वावरतो. जंगल, निसर्ग ह्यावर मनापासून प्रेम करणा-या ह्या "कृ्ष्णमेघा"ची लेखन शैली इतकी ओघवती आहे ना...की आपण कधी त्याच्या सोबत जंगलात निघतो ते कळतंच नाही.
अतिशय मधुर आणि अलंकारिक भाषा ! आता हे बघा.....
पण फक्त त्या पळसाकडेच इतरांच्या नजरेला वेड लावायचा मक्ता नव्हता. पिवळ्या मोहरात आंधळं करणारं सोनं घेऊन झुकलेला बहावा, टपो-या लाल फुलांचे मधुरसाचे कुंभ घेऊन उभ्या ठाकलेल्या काटेसावरी, ठिणगीलाही फिक्कं पाडेल अशा रक्त-लालीच्या फुलांचे शिरपेच ल्यालेले पांगारे.. हे सारेच खांद्याला खांदे लावून उभे होते. मोयार गॉर्जच्या कपाळावर गर्दी केलेल्या बांबूची पानं सोनपिवळी पडली होती. वा-याच्या हळूच स्पर्शाबरोबर ती थरारून कापायची. सकाळी सूर्याच्या कोवळ्या किरणांनी डोंगरामागून बांबूच्या बेटाशी सलगी केली की मागच्या काळ्याशार कातळाच्या पार्श्वभूमीवर ही पानं कशी लकाकायची ! काय तो उठाव !
जागोजागी ही अशी शब्दालंकारांची उधळण....!! आपण इतकं तॄप्त होतो ना हे सगळं वाचताना....अनुभवताना.....!! प्रेमात पडल्याशिवाय शब्दांची अशी कशिदाकारी होऊच शकत नाही. लेखक सबंध एक ऋतूचक्र जंगलात उपभोगून आलेला आहे. त्यामुळे प्रत्येक ऋतूमधला जंगलाचा साज अतिशय कलात्मकतेनी आणि आत्मियतेनी चितारलाय. त्यांच्या अनुभवात प्रचंड थरार आहे, जो वाचक अनुभवू शकतो. हे त्यांचं कथन म्हणजे, जंगलरसात न्हाऊन निघालेलं आणि वाचकांनाही रानवेडाची दीक्षा देणारं "मदुमलाई सूक्त" ! जे हातून निसटलं त्याची हुरहुर लेखकाला होते..तश्शीच वाचकालाही जाणवते.
पुस्तक उघडल्याबरोबर जाणवतं ते पुस्तकाचं देखणेपण !! गुळगुळीत, चकचकीत वेष्टनात गुंडाळलेलं गिफ़्ट उघडताना जसं वाटतं ना....तसं वाटतं हे पुस्तक उघडताना ! जिवंत चित्रं, मखमली पानं आणि जंगलातला थरार..... नितळ पारदर्शी लिखाण........ अहा..... मजा आ गया !!
अगदी वाचून अनुभवायलाच हवं असं पुस्तक !!
जयू, यात
जयू, यात वर्णन केलेलं जंगल कुठलं आहे?
हे वाचून मला मारुती चितमपल्लींचं चकवाचांदणं आठवलं, त्यातही असे जंगलात 'जगण्याचे' वर्णन आहे...
मागच्या
मागच्या भारतवारीत हे पुस्तक विकत घेतले. त्या आधी कधी मी या पुस्तकाबद्दल वाचले, ऐकले नव्हते पण माझ्या एका क्लाससमेटने सांगितले की आपल्या एका सिनीअरने लिहीलेय ते पुस्तक, छान आहे, तू घेच म्हणुन घेतले. एका फटक्यात वाचुन संपवले. छान आहे पुस्तक. जंगलाबद्दल, हत्तींबद्दल, अदिवासींबद्दल बर्याचशा (अजिबातच) माहीत नसलेल्या गोष्टी कळल्या.
मला स्वत:ला लेखकाने यात अजून जास्त सायंटिफीक माहितीवर भर दिली असती तर आवडले असते, (कोणी म्हणेल मग ह्यापेक्षा सरळ जर्नलमधले रीसर्च पेपरच का नाही वाचत :))
भाग्या.....मद
भाग्या.....मदुमलाई च्या जंगलाबद्दल लिहिलंय त्याने !! हत्ती, अजगर, रानकुत्री, अस्वल, रानगवे, बिबळ्या.... अशा भरपूर प्राण्यांच्या जगण्यातल्या गमती जमती...... ते शोधत असताना अनुभवलेला थरार.... इतका मस्त शब्दबद्ध केलाय ना...!
रुनी..... ह्म्म... तू म्हणते आहेस ते बरोबर आहे..... पण सर्वसामान्यांसाठी कदाचित त्याने जास्त खोलात माहिती दिली नसेल असं वाटलं मला. कारण तो तिथे संशोधनासाठी तर गेला होताच पण खरं गेला तो त्याच्या जंगलप्रेमामुळे.....! आणि आपल्याला जंगल का आवडलं हे सांगण्यात रमल्यामुळे किंवा जास्तीत जास्त लोकांच्या जंगलजाणीवा चाळवण्यासाठी त्याने असं केलं असावं
मदुमलाईच्
मदुमलाईच्या जंगलातल्या अनुभवांविषयी कृष्णमेघ कुंटे म.टा. मध्ये दर रविवारी एक गेस्ट कॉलम लिहीत होते. तेव्हाच त्यांच्या लेखणीची जादू थोडीफार अनुभवायला मिळाली होती. कित्येक दिवसांपासून लायब्ररीत त्यांच्या पुस्तकांसाठी क्लेम लावून ठेवलाय, अजून मिळत नाहीयेत पुस्तकं.
खरचं छान
खरचं छान आहे तो वरील उतारा. मी वाचले हे पुस्तक पण त्यावेळी खूप असे भावले नव्हते. आता वरील उतारा वाचून परत एकदा हेच पुस्तक वाचावेशे वाटत आहे.
जयश्री,
जयश्री, आता ह्या वेळच्या भारतवारीत जरुर वाचिन हे पुस्तक. पुस्तकाची माहीती सांगितल्याबद्दल धन्यवाद.
जयाबाई,
जयाबाई, धन्स. नक्की मिळवेन हे पुस्तक
एक यडचाप प्रश्न - पुस्तकाचं नाव - 'एका रानवेड्याची शोधयात्रा' असं आहे? का काय वेगळं?...
प्रश्न माझा नाही. माझे प्रश्न चारतरी यडचाप असतात... एक नाही
दाद...... तू
दाद...... तू पण ना.....!! तुझा यडचाप पणा सर आ़खो पर रे....
हो अगं.... पुस्तकाचं नाव "एका रानवेड्याची शोधयात्रा" असंच आहे.
ही कलाकॄती
ही कलाकॄती साक्षात एक जिवंत अनुभूती आहे.त्यात जंगल कसं छान सजीव म्हणून आपल्या भेटीस येतं.जरूर वाचावी.