सुखात्मे

Submitted by स्वाती_आंबोळे on 12 October, 2007 - 09:17
दीनानाथ सुखात्मे हा एक फार चांगला माणूस होता. यावर त्याला ओळखणार्‍या सगळ्यांचंच एकमत होतं. चांगला होता यावरही, आणि विचित्र होता यावरही. विचित्र म्हणजे... नाही, विचारायला गेलात तर कुणालाच नक्की सांगता येणार नाही.
तसा टापटीप रहायचा. ऑफिसमधली क्यूब काय किंवा दादरच्या चाळीतली त्याची ती ब्रह्मचार्‍याची मठी काय.. कधीही पाहिलं तरी अतिशय नेटकी दिसायची. कायम परीटघडीच्या पांढर्‍याशुभ्र कपड्यांत असायचा. आता कायम पांढर्‍या हे म्हटलं तर विचित्र, म्हटलं तर नाही. तसंच कायम असायचं ते त्याच्या चेहर्‍यावरचं स्मित. त्याला कधीही कुणीही कोणत्याही कारणाने कोणावरही चिडलेलं पाहिलं नव्हतं. खरंतर यात तरी काय विचित्र आहे, नाही का? आता अबोल होता, पण मदतीला कायम तत्पर. फुलस्केप्सची बाडं, लिफाफे, स्टँप्स, पेन्सिली, खोडरबर, पेपरपिन्स, खडू, असल्या फुटकळ स्टेशनरी आयटम्सचा त्याच्याकडे अक्षय भाता असावा. आणि डाळीचं पीठ, दाण्याचं कूट, विरजणाला दही, अडीनडीला एक्स्ट्रा दुधाची पिशवी, यांची द्रौपदीसारखी अक्षय थाळी. त्यामुळे चाळीत रोज कुणी ना कुणी त्याचं दार वाजवायला जायचंच. आणि तरीही गेल्या दहा वर्षांत कोणाला त्याच्याशी गप्पा मारल्याचं काय, कामाव्यतिरिक्त एखादं वाक्य बोलल्याचंही आठवणार नाही. म्हटलं ना, काहीतरी विचित्र होतं त्याच्या बाबतीत. खडूबिडू मागायला गेलेली मुलं तर फटाके लावताना मागे पळायच्या तयारीत असतात की नाही, तश्याच पवित्र्यात जायची. मोठ्यांना इतकी नाट्यमय ऍक्शन करणं शक्य नसायचं इतकंच.
अगदी बोटच दाखवायचं तर.. त्याला कसला छंद नव्हता. म्हणजे नसावा. बहुतेक. त्याच्या घरात रेडिओ, टीव्ही यातलं काही नव्हतं. एकाही भिंतीवर कसलं चित्र, फोटो, वॉल हँगिंग – असलं काही नव्हतं. नाही म्हणायला एका भिंतीवर कालनिर्णय आणि बाकी भिंतींवर आधीच्या भाडेकरूंनी जिथे फोटोबिटो लावले असतील तिथे कदाचित पिवळट म्हणता येईल अश्या रंगांचे धब्बे यांनीच काय वैचित्र्य आणलं असेल तितकंच. उरलेल्या भिंतींचा रंग ओळखण्याच्या पलिकडे गेलेला होता. त्याला कधी कोणी साधं गुणगुणताना पाहिलं नव्हतं. बाकी लोकांसारखे पत्ते म्हणा, बुद्धीबळ म्हणा, कश्यातच नसायचा. सार्वजनिक सणाकार्यक्रमांची वर्गणी सर्वांत आधी त्याची पोचती होत असे, पण तो कधी कुठल्या कार्यक्रमाला आला नाही. कधीमधी रद्दी नेताना दिसायचा. त्या नीटस बांधलेल्या गठ्ठ्यातली वर्तमानपत्रंसुद्धा इतकी कोरी दिसायची की तो ती वाचतच नसणार ह्याची बघणार्‍याला खात्रीच पटावी. त्याच्या त्या दोन खोल्यांत बसून तो काय करायचा कोण जाणे! गावाकडे त्याचे वृद्ध आईवडील असतात अशी कुणकूण होती, पण ते, किंवा खरंतर कुणीच कधी त्याच्याकडे आलेलं दिसलं नाही, की हा कधी कुठे गेलेला दिसला नाही.
अर्थात, सुमीला यातलं काहीच माहीत नव्हतं. सुमी म्हणजे चाळीत नुकत्याच रहायला आलेल्या देशपांड्यांची मुलगी. चाळीत नवीन होती म्हणूनही, आणि बरेचदा आपल्याच नादात असायची म्हणूनही, पण महिना झाला तरी तिची म्हणण्यासारखी कुणाशी ओळखच झालेली नव्हती. चाळीला सुमी म्हणजे चष्मा, चापून चोपून बांधलेल्या दोन वेण्या आणि सदैव हातात एखादं पुस्तक – इतकीच ओळख होती. आणि दहावीला चांगले मार्क मिळाले म्हणून मुंबईच्या कॉलेजमधे घालायला आणल्ये ही तिच्या आईने दिलेली ऍडिशनल माहिती.
तर त्याचं झालं काय, की सुमीचे बाबा घरी यायच्या वेळी घरातलं दूध नासल्याचं तिच्या आईच्या लक्षात आलं. आता निदान आल्यावर त्यांना चहा तरी करायला हवाच होता.. शेजारच्या काकूंकडचंही दूध नेमकं संपलं होतं, पण कधीही लागलं तर दीनानाथाकडे मिळेल ही माहिती मात्र त्यांनी दिली. त्या कामावर सुमीची रवानगी झाली.

"कोण हवंय?"
"अं.. कोण नाही.. काय."
"काय?"
"नाही, म्हणजे दूध हवंय.. तुमच्याकडे दूध मिळेल असं बर्वेकाकू म्हणाल्या."
"हो हो.. आहे हं. तुम्ही…?"
चाळीशीच्या माणसाने अहो जाहो केल्याने सुमी आणखीनच गडबडली.
"मी सुमी.. म्हणजे.. सुमती.. देशपांडे. आम्ही नवीन आलोय ना चाळीत. आपली ओळख नाहीये. मी जाते."
"दूध..?"
"अं.. हो.."
"थांबा. आणतो."

आणि इथे या कहाणीला निराळीच कलाटणी मिळाली. म्हणजे गोष्ट साधीच, पण आत्तापर्यंत कधी न घडलेली.. आणि.. पण ते येईलच पुढे..
तर कलाटणी म्हणजे काय, की दीनानाथ दुधाची पिशवी आणायला स्वयंपाकघरात गेल्यावर सुमी सहज त्याच्या घरात शिरली. आणि समोरच मेजावर उघड्याच असलेल्या डायरीकडे तिचं लक्ष गेलं. तिथे एका पानावर किरट्या तिरक्या अक्षरांत लिहीलेल्या चारच ओळी होत्या..

वाट सापडण्याआधी जसे सरावे पाथेय
काट्यांतून चालल्याचेसुद्धा मिळू नये श्रेय
शब्द असे हतबुद्ध अर्थ तसे मृगजळ
बुडबुड्याचीच कहाणी बुडबुड्याचेच तात्पर्य

"दूध."
सुमी इतकी दचकली !!
"ही कविता…"
दीनानाथने झटकन पुढे होवून डायरी ताब्यात घेतली.
"हे दूध. या तुम्ही."

सुमी घरी आली, पण त्या ओळी, आणि तिने त्या वाचल्याचं पाहिल्यावर कोरा झालेला दीनानाथचा चेहरा हे काही तिच्या डोक्यातून जाईना. तिला त्या ओळींचा फार काही अर्थबोध झाला होता असं नाही, पण ते लिखाण या माणसाला खूप खासगी वाटतंय आणि खूप खूप उदास करणारं आहे हे तर स्पष्टच होतं.
एरवी खरंतर सध्या वाचत असलेल्या पुस्तकाच्या नादात ती असल्या गोष्टी केव्हाच विसरून गेली असती. पण मग हळूहळू जशी तिच्या आईची चाळीतल्या बायकांशी घसट वाढली, तशी दीनानाथच्या त्या अलिप्त विक्षिप्तपणाची वर्णनं तिच्या कानावर आली. आणि मग का कोण जाणे – बहुधा सुट्टीचा रिकामा वेळ आणि सद्ध्या नव्यानेच लागलेलं रहस्यकथांचं खूळ, इतकंच कारण असावं – पण एखाद्या रहस्यकथेसारखा दीनानाथ तिच्या डोक्यात घोळायला लागला. आणि त्या रहस्याची किल्ली त्या डायरीत असल्याची तर तिची खात्रीच पटली.
त्यानंतर एक दोन वेळा ऑफिसला जाता येता तो रस्त्यात दिसल्यावर सुमी आपण होवून त्याच्याशी – अगदी सहजच - बोलली.

"काय म्हणताय?"
"अं? ठीक आहे.. ठीक आहे."
"चाळीच्या मीटिंगला येणार आहात का रात्री ?"
"मी? नाही. बरं.. येतो."

त्याच्या मानाने इतकं बोलणं म्हणजेही लिमिटच असावं. म्हणजे डायरी बियरीबद्दल बोलण्याइतका तो मोकळा व्हायला पुढचा जन्म घ्यावा लागला असता. पण ती डायरी तो कायम त्याच मेजावर नाहीतर त्याच्या उजव्या बाजूच्या ड्रॉवरमध्ये ठेवतो हे तिने दोनदा साखर आणि तीनदा पेन्सिल वगैरे मागायच्या निमित्ताने बघून ठेवलं होतं. आता हालचाल करायला हवी होती.
मग एक दिवस हिय्या करून तिने एका रविवारी दुपारी त्याचं दार वाजवलं.

"अं.. तुमच्याकडे लांब काठी आहे का हो?"
"काठी?"
"ते.. माझं पुस्तक चुकून खालच्या गच्चीच्या छपरावर पडलं.."
"अरे, बघू.."
"तेSS बघा. लायब्ररीचं आहे हो, नाही परत करता आलं तर.."
"काठी नको. मी काढून देतो."
"थँक्यू हं!!"

दीनानाथ छपरावर उतरून पुस्तक काढेपर्यंतचा वेळ डायरी खांद्यावरच्या पिशवीत जायला पुरेसा होता. त्याचे तोंडभर आभार मानून ती पळाली. घरी येऊन धडधडत्या उत्सुकतेने तिने डायरी चाळून शेवटचं लिहीलेलं पान काढलं. असते एकेकाला सवय उलटीकडून पुस्तकं वाचायची! तारीख अर्थातच कालची होती. इथे अजून चार ओळी होत्या.

कुठे पोचायचे नाही तरी चालला प्रवास
किंवा जागच्या जागीच फक्त चालल्याचा भास
कशासाठी? कुणासाठी? किती काळ? कुठवर?
नाही प्रश्नांचे कौतुक नाही उत्तरांचा सोस

तिला एकदम वाईट वाटलं. इतकी शून्यता जाणवण्याइतकं ना तिचं वय होतं, ना स्वभाव. आणि तरीही या ओळींतलं काहीतरी तिच्यापर्यंत पोचलं. शिवाय आता डायरी ‘चोरल्याबद्दल’ अपराधी वाटायला लागण्याची वेळ झालीच होती. तिने पान उलटलं.

"न्या. साखर न्या. गोडधोड करा. तेवढाच करण्यात - खाण्यात - पचवण्यात वेळ जातो. आधीचे आणि नंतरचे दोन तीन दिवस बोलायला एक विषय असतो. ह्या दोन खोल्यांतल्या शून्य पोकळीतून एक एक निरर्थक वस्तू न्या आणि चिमटी चिमटीने आपापल्या पोकळ्या भरायचे प्रयत्न करत रहा." बोधचित्रः 'सुखात्मे' चित्रकारः नीलू

तिला वाटलं अश्शीच्या अश्शी ही डायरी होती तिथे परत तरी ठेवून यावं किंवा चुलीत वगैरे घालून जाळून टाकावी. हे इतकं उदासवाणं लिखाण असंच वाचत राहिलं तर आपण वेड्या होवू. आणि तरी भारावल्यासारखी ती पानं उलटत राहिली.

"आत येऊ नका प्लीज. इथली शांतता अशीच राहू दे. तुमच्या धक्क्याने ती फुटेल. फार असह्य असतो शांतता फुटल्याचा आवाज.
त्या रात्री आईने आपलं शरीर मागच्या आडात लोटून दिलं तेव्हा आला होता तसा.
खरंतर असा आवाज आता येणार हे कळलं होतं. तरीही असह्यच होता तो.
अजून पडसाद ऐकू येतात त्याचे.
आधीही आले होते. ती अंधारात माझ्या शेजारून उठली तेव्हा. तिने मी झोपलोय असं समजून माझ्या केसांतून हात फिरवला तेव्हा. दबक्या पावलांनी निघाली तेव्हा. तसंच मागे न वळता हात मागे करून दार लावून घेऊन गेली तेव्हा.
तेव्हाच कळलं होतं.. की आता काही मिनिटांतच तो आवाज येणार आहे, आणि कल्लोळ होणार आहे."

आता मात्र सुमी घाबरली. हे तिच्या अपेक्षेपेक्षा भलतंच अवघड होत चाललं होतं. शिवाय डायरीचं त्याच्या लक्षात कधीही येऊ शकतं याचंही आता तिला टेन्शन यायला लागलं होतं. आणि एकीकडे कुतूहल तर शिगेला पोचलं होतं. आता प्रत्येक पान वाचत बसण्यात अर्थ नव्हता. मग ती अंदाजा अंदाजाने पानं चाळायला लागली.

"पण म्हणजे तिचं सुख – सगळं सुख – दादांवरच अवलंबून होतं? इतकं? ते तिचं त्याही परिस्थितीत नेटकं राहणं, तो प्रत्येक हालचालीतला, वावरण्यातला, प्रत्येक कामातला रेखीवपणा, सौंदर्यदृष्टी, तोच तो रोजचा रगाडा उपसण्यातलीसुद्धा असोशी, ‘घर म्हणजे हे हवंच’ असं म्हणत जमवेला संसार, अडीनडीला उपयोगी पडून जोडलेले शेजारीपाजारी, उंबर्‍यावरची सुबक रांगोळी, ते भरतकामाचे नमुने, ती तिची फुलझाडं, रोज संध्याकाळी माळायचा आपल्या हाताने गुंफलेला गजरा, ते स्वतःशीच गुणगुणणं, लोणच्याची फोड तोंडात टाकल्यावर डोळे गच्च मिटून खूश होणं, तिचे डोळे.. ते काहीतरी मजेशीर बोलायच्या आधीच लकाकायला लागणारे तिचे काळेभोर डोळे.. यातलं काहीच तिचं – तिचं स्वतःचं नव्हतं? यातलं काहीच तिच्या जगण्याचं कारण बनू शकत नव्हतं?
आणि मी??"

"पण त्यांचं ते प्रकरण तुला कळायच्या आधीतरी कधी गं त्यांनी लक्ष दिलं तुझ्याकडे? कधीतरी उशीरा दिवेलागणीनंतर घरी परतायचे. तू इतक्या निगुतीने रांधलेलं अन्न अक्षरशः नुसतं चिवडून पानावरून उठायचे. त्यांनी तुझ्या कुठल्याच गोष्टीची वाखाणणी तर लांब, दखलही घेतल्याचं आठवत नाही मला. संवाद असा काय होता तुमच्यात? मग तुझा जीव काय नुसता त्यांच्या भासात अडकलेला होता? का??
आणि मी? मी कुणीच नव्हतो? माईआज्जीच्या ताब्यात मला देऊन जाताना काहीच वाटलं नाही तुला?
या सगळ्या गुंत्यात सगळ्यात कमनशिबी कोण? जातीबाहेरची म्हणून इच्छा असलेल्या बाईशी लग्न न करता आलेले दादा? लग्न नाही झालं तरी त्यांच्यातच गुंतलेली ती बाई? लग्न झालंच आहे म्हणून गुंतलेली तू? उतारवयात लेकीच्या संसाराचे धिंडवडे आंधळ्या डोळ्यांनी बघायला लागलेली माईआज्जी?
की मी??"


"ऐलतीरास कातळ निसरड्या मीपणाचे
पैलतीरी घनगूढ बन आंधळ्या वाटांचे
पात्र वाळूचे कोरडे सुरुवात ना शेवट
मोडलेली डोलकाठी वस्त्र फाटके शिडाचे"

"पाश वाईट. तेव्हा तुम्ही बोलू नकात. ‘काय, कसं काय?’ इतकंसुद्धा नको. आधी साधी चौकशी, मग सवय, मग आवड, मग जिव्हाळा, आणि मग गुंता. मग तो सोडवावा म्हणता सहज सुटत नाही. मग शेवटचा उपाय म्हणून विहीर जवळ करावी लागते. तेव्हा ते नकोच."

"स्टेशनवरून येताना फूटपाथवर एक माणूस खडूने चित्र काढताना दिसला. का काढत असेल? कशासाठी? कोणासाठी? लोक त्यावरून पाय देऊन जात होते, आणि तो हसत होता. हसायची सवय वाईट. कारण मग कधीतरी चुकून मोठ्याने हसलं जातं. आणि मग एकदम चरा उठतो शांततेवर. शिवाय मग एक दिवस समजा एकदम विहीर जवळ करावी वाटली, तर मग त्या चित्राचं काय? ते पूर्ण झालेलं असलं तरी पंचाईत, नसलं झालेलं तर अजून कठीण परीस्थिती!"

सुमीने सुन्न होऊन डायरी मिटली. यंत्रवत् ती उठली. आतून एक वाडगा उचलून घराबाहेर पडली.

"अगं, आत्ता कुठे चाललीस आणि तिन्हीसांजेची? भारी नादिष्ट झाल्ये कार्टी. तुम्ही तरी खडसावा तिला एकदा.."

आईची बोलणी तिच्या कानावर पडलीच नसावीत. संथपणे चालत ती दीनानाथ सुखात्मेच्या दारात जाऊन उभी राहिली. डायरी डाव्या हातात पाठीमागे लपवत तिने कडी वाजवली. दीनानाथने दार उघडलं. एक क्षण तिने त्याला ओळखलंच नाही. केस अस्ताव्यस्त, डोळे हरवलेले.. भिरभिरणारे.. काहीतरी शोधणारे.. काय ते फक्त तिलाच माहीत होतं.

"आई विचारत होती, वाटीभर डाळीचं पीठ मिळेल का म्हणून.."
"अं? काय? काय हवंय?"
"डाळीचं पीठ."
"हां.. हो.. देतो."

दीनानाथ वाडगा घेऊन आत जायला लागला. सुमीने त्याच्या पाठीकडे बघत डायरी मेजावर ठेवलीच होती, इतक्यात तो मागे वळला. सुमी जागच्या जागी थिजली. दोन मिनिटं – म्हणजे बहुतेक दोन मिनिटं असावीत – सगळं स्तब्ध झालं. आणि मग भानावर येत सुमी आल्या पावली मागे पळाली.
त्या रात्री दीनानाथ सुखात्मे गेला. गेला म्हणजे वारला.

स्वाती आंबोळे

AttachmentSize
Image icon illustration_sukhatme.jpg239.63 KB
विशेषांक लेखन: