गावशीव

Submitted by साजिरा on 22 January, 2009 - 09:53

त्याला योगायोगाचं खरंच नवल वाटलं. म्हणजे असं की जियाशिंग ते शांघाय या दीडेक तासांच्या अंतरात तो जो घरचा विचार करीत होता, त्या विचारांत आजीच्या आठवणी रेंगाळत होत्या. आणि शांघायच्या पुदाँग एअरपोर्टवर आल्या आल्या, जयाचा, त्याच्या धाकट्या भावाचा मेसेज मोबाईलवर आला- आजी गेली.

अलिकडे अशी, इतकी आतून तिची आठवण येत नसे. तिने नव्वदी पार केली, तेव्हापासून. विशेषत: तिने माणसं ओळखायचं बंद केल्यापासून. तिचे कान पुर्ण बाद झाल्यापासून. गेले दीड वर्षे तो तिला भेटलाच नव्हता. आता खरं तर हे कुणी सांगायच्या भानगडीतही पडलं नसतं कुणी, पण ही घटना आनंदाची! अन अनायासे तो येतच होता. अंत्यविधीपर्यंत पोचलाच असता.

पार्वतीआजी म्हणजे आईची आई. ती गेली ते चांगलंच झालं. शरीराची एकेक फॅकल्टी निकामी होत होती, तसतशी आयूष्यभर मानापानाने जगलेली ’पार्बता’ आजी अधिकाधिक दयनीय होत होती. आयूष्यभर संसारासाठी खस्ता खायच्या. आभिमानाने जगायचं. उगीचच कोणाचा चकार शब्द म्हणून ऐकून घ्यायचा नाही. अन शेवटी कान, डोळे, हात, पाय, स्मृती काम करीत नाहीत, म्हणून लोकांनी कंटाळा करायचा. सोन्यासारख्या आयूष्याचा असा शेवट, हे काही खरं नाही.

त्यामूळे आजी आज गेली, हे बरं झालं.
ती 'शेवटची' सापडली, हे आणखीच बरं.

थंडी भरून आल्यागत त्याला वाटलं, अन बाजूचं स्वेटर त्यानं अंगावर अन डोळ्यांवरही येईल असं त्यानं घेतलं. पण मुंबई येईस्तोवर आज्जीने काही झोपू दिलं नाही. त्याला वाटलं- आजी म्हणते आहे, की बाबा, तुला झोपविण्यासाठी मी कधीतरी गोष्टी सांगितल्या आहेत की नाही? आता माझी आयूष्याचीच गोष्ट संपली. थोडा जागा राहा बघू.

खिडकीतून दिसणाया दिव्यांचा, ढगांचा अंदाज घेत असतानाच त्याला कळलं, मुंबई आली. कुणी घ्यायला वगैरे येऊ नका, म्हणून त्याने आधीच सांगितले होते. आता तर ही आजीची घटना. मुंबई पोर्टवर प्रचंड गोंधळ. नुतनीकरणाचं काम चालू असल्यामूळे कशाचा कशाला मेळ नाही. लगेज मिळायला उशीर झाल्यामूळे वैतागला. त्या क्षणी तरी जगातलं सर्वात बकवास एयरपोर्ट असेल हे, असं वाटलं. सामानाची लढाई लढून झाल्यावर नशीब टॅक्सी लवकर मिळाली. आता इथनं आणखी तीन तासांची निश्चिती झाल्यावर तो पुन्हा एकदा आजोळच्या आठवणींत हरवून गेला.

***

गाडीसोबत प्रचंड धुळीचे लोट सुरू झाले, तेव्हा भानावर आला. आजीचे गाव जवळ आल्याची ही खुण. याच धुळभरल्या रस्त्याने कित्येक वेळा त्याने बुंगाट सायकल मारली असेल, पण आता मात्र ती धुळ काचेतून पाहूनही आत्ता नाका-तोंडात जातेय की काय, असं वाटू लागलं.

गाडी जरा दुरच उभी करून मग तो पन्नासेक पावले टाकीत घरात आला, तर एकच हलकल्लोळ उठला. अर्धा डझनभर मावश्या त्याला मिठ्या मारून, गाणी म्हणत रडू लागल्या. आजी ज्या पलंगावर झोपायची, त्यावर डोके आपटत आईही रडू लागली. त्याच्या मावस अन मामे बहिणीही त्यात सामील झाल्या.

खरे तर रडण्यात वेळ त्याला घालवायचा नाहीये. रडू असेही येणार नव्हतेच. अन रडणे-भेकणे हा तर मुर्खपणाच. पंचान्नव वर्षे जगली आजी. म्हणाजे तशी बरीच. अन शेवटी हालच व्हायला लागले होते. विचित्रपणाही करायला लागली होती. त्यामूळे, सुटली- असेच म्हणायचे. पण गेलेल्या आजीशेजारी शांतपणे थोडावेळ बसायचे आहे. तिला निरखून घ्यायचे आहे. तिचा शांत झालेला गोरा-पिवळा चेहरा शेवटचा पोटभर बघून घ्यायचा आहे. तर या लोकांनी गोंधळ घातलाय..

त्याने असहाय्यपणे आजूबाजूला बघितले, तर त्याच्याकडेच बघत राहिलेला मामा त्याची स्थिती ओळखून शेवटी बहिणींवर थोडा ओरडलाच. मग आवाज जरा कमी झाले, अन कुणीतरी भान आल्यागत त्याला आजीशेजारी बसायला वाट करून दिली.

आजीजवळ गेल्यावर तो थोडा हादरल्यासारखाच झाला. दोन वीतभरच दिसत होती ती. सगळी हाडं एकत्र गोळा करून ठेवल्यागत. एकाच हाताने सहज उचलता येईल अशी दिसत होती आजी.

दुनिया हलली, तरी आजीला नेहेमी भेट असायची त्याची. लहान होता तेव्हा सायकल मारीत एकटा जायचा. इंजिनियर व्हायला बाहेरगावी गेला, तेव्हा घरी एक दिवस आला तरी दोन तास आजीसाठी बाजूला निघतच. मग इंजिनियर होऊन काही दिवसांनी मोटरसायकल घेतली, तर त्या सात-आठ किमी अंतराचं काहीच वाटेना झालं. गावी आल्यावर आजी आणि आजोळच्या रस्त्यावरची खंडोबा आणि महाल़क्ष्मीची देवळे कधी टळली नाहीत.

दीडेक वर्षापूर्वी, तो तिला भेटायला आला, तेव्हा आजीने त्याच्या केसा-कपाळावरून हात फिरवला खरा, पण ते तो तिच्या ’माहेरचं’ कुणीतरी असल्याच्या समजात. आजीला माहेरचा कोण अभिमान. कधीतरी प्रचंड श्रीमंत असावं ते घर. आजी म्हातारी झाल्यावर तिला तिच्या माहेरी घेऊन जाणारे तिचे जिवलग आजीच्या आधीच देवाघरी गेले. मग सैरभैर झल्यासारखी आजी माहेरचं कौतूक करीत राहिली. तिथली नंतरची पिढी पार बरबाद निघाली- विकून फुंकून खाणारी, पण आजीला ते सांगूनही पटेना. अजूनही तिथे हत्ती झुलताहेत, अन मला कुणीतरी तिथं ’माहेरपणासाठी’ घेऊन जाईल- ही आशा मरेपर्यंत राहिलीच तिची. तर मुद्दा असा, की त्याच्या दृष्टीने अशा भिकारी झालेल्या माहेरचं माणूस तिने त्याला समजल्यामूळे त्याचं डोकंच हललं. तावातावानं घरी येऊन आईजवळ त्याने सांगितलं, मी यापूढे आजीला भेटायला जाणार नाही..!

आता तिच्या चेहेयावरचे सुरकुत्यांचे दाट जाळे पाहून त्याला वाटले, आपण नालायक. आजी आपल्याला ’ओळखत’ होती तो पर्यंत आपण इथे यायचो. म्हणजे आपल्यासाठीच. आजीसाठी नाहीच! आपण इतकी वर्षे खंड न पाडता इथे भेटायला येत राहिलो, ते आपलं ’लाडका नातू’ हे बिरूद सिध्द करण्यासाठी. आजीसाठी नाहीच!!

आजूबाजूचे आता आजीला सोडून त्याच्याकडे बघत होते. आजीचा हा सर्वांत लाडका नातू असल्याचं कुणीतरी बोललं. तो आजीच्या मुठभर झालेया चेहेर्‍याकडे बघत राहिला. आजी आताही त्याला ओळखत नव्हतीच. खरे तर कुणालाच ओळखत नव्हती. आजी शांत पडली होती. माहेरी गेली असावी बहूतेक.

त्याला सांगावसं वाटलं, अगं आज्जी, मी माहेरचा माणूस तुझ्या. लुगडं घेतो बघ तुला. पाहिजे होतं ना तुला..?

पण तो असं काही बोलला नाही. गप्पच राहिला. पण मनातलं आजीला ऐकू गेलं असेल का, असं मात्र त्याला वाटत राहिलं.

मग त्याला अगदी असह्यच झालं ते सगळं. आता आणखी थॊडा वेळ थांबलो, तर रडू-बिडू येईल, अन ते काही बरोबर नाही असं त्याला वाटलं. तो आजीच्या चेहेर्‍याकडे पाहत उठलाच निग्रहाने. बाहेर आला. ओसरीमध्ये थोडावेळ बसला. पण त्याला जाणवलं, त्याच्याकडेच बघताहेत सगळे. मग उगीचच वर बघत बसला. तर तीच पंचवीसेक वर्षापूर्वीची मोठीच्या मोठी लोखंडी गर्डर अन लोखंडी बीम वगैरे दिसले त्याला. रघूमामाने हट्ट करून आणलेले. नाहीतर लाकडी धाबी बांधत असत सगळे लोक. असा लोखंडी गर्डर अन बीमचा खर्च कोण उगीचच करीत नव्हते गावात कुणी. काय असे आभाळ कोसळणार आहे, म्हणून.

रघूमामा. आजीच्या आधीच गेलेला. दारूमूळे.

ओसरीतूनच त्याला ग्रामपंचायतीची पाटी दिसली. त्याच्याच मामाने केलेली, आता मोडकी झालेली. क्षणभर त्याला वाटले, त्या पाटीखाली रघूमामा उभा आहे, कोणाला तरी शिव्या देत, दांडगाईने अगदी.

अन त्याला वाटले, या ओसरीत आता काहीच नाही आपले. एकतर आत सगळ्या नाटकी रडणार्‍या बायका, आणि इथं सगळे सुतकी चेहेरे करून बसणारे पुरूष. त्यांना अजिबात न शोभणारे. म्हणजे आजीनेही केले असतील असे चेहेरे, अन असे गाणी म्हणून केले जाणारे कस्टमाईज्ड शोक. ती जिवंत असताना. पण आता बाहेरच जावे त्या पाटीपाशी. तिथे एखादे वेळेस भेटेलही रघूमामा.
अन आज्जीही. त्याला तावातावाने शिव्या देणारी.

मग तो बाहेर आला, तर मंडप घातलेला, अन कूठच्या तरी गावातनं आलेल्या भजनी मंडळाने काम चालू केलेलं. काही त्यांच्यासमोर बसलेले, तर काहींनी ओट्यावर जागा सांभाळलेली. म्हणजे कसं, की केव्हाही सहज उठून जाता येईल. बाहेरच्या ओट्यावरुन समोरचा एक मोठा ओटा दिसत होता, त्याला लहाणपणीचा सोनाआजीचा ओटा. सोनाआजी ही त्याच्या आजीची अगदी जवळची मैत्रीण. एकाच वाड्यातली म्हणता येइल अशी. आजीची चुलत-चुलत-चुलत जाऊ असावी. पण आजीपेक्षा फारच आधी म्हणजे तिच्या सत्तरीत वगैरेतच गेलेली. तर आजी लहाणपणी आजी जितक्या शिव्या द्यायची, त्याच्या दुप्पट या सोनाआज्जीने दिलेल्या. तिचा ओटा मोठा, त्यामूळे तिच्या ओट्यावरच सगळे खेळ रंगायचे. मग तिचा निम्म्यापेक्षा जास्त वेळ पोरांना शिव्या देण्यात जायचा. त्याची आजी कधी शिव्या देण्यात सामील व्हायची, तर कधी कडाकडा भांडायची सोनाआजीशी. तिच्या नातवांना बोलल्याबद्दल. पण काहीही असलं, तरी शेवटी दोघी एक व्हायच्या. दोघींनी असा असहकार पुकारला, की मग पोरांची पंचाईत. मग खेळण्याची जागा बदलायची. रामदास वाण्याच्य़ा दुकानाच्या समोरचं अंगण, किंवा तिथनं पन्नासेकच पावलांवर असलेला ओढा अन त्याकडेची मोठमोठ्या झाडांची दाट रांग.

अन त्यावेळचे सगळे खेळगडी आता इथेच त्याच्या आजूबाजूला होते. अगदी थोराड झाले होते सगळे. बरेचसे ओळखू येत होते, अन काही शरीरे अवाढव्य वाढल्यामूळे ओळखण्याच्या पलीकडे. तो आजीला भेटायला येत असे खरा, पण तेव्हा कुठे एवढे सारे भेटायला. आता आजीच्या निमित्ताने किंवा कर्तव्य म्हणूनही असेल, सगळे एकत्र आले होते, हजर होते. मामाच्या मुलाने, दादूने सगळ्यांची ओळख करून दिली. सर्व जण अंतर राखून उभे होते. जवळ आले, तरी माफक, अपराध्यासारखे हसत होते. त्याने बोलून वातावरण मोकळं करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ते सगळं आणखीच कृत्रिम वाटू लागलं.

मग एकदम उदासच झाला तो, अन झटकन म्हणाला, येतो जरा चक्कर टाकून. त्या पोरांनाही मग जरा सुटल्यासारखे वाटलं असावं!

***

वीस तीस पावले चालल्यावर मारूतीचे मंदीर दिसले अन तो थबकला. हा अड्डा. रात्री उशीरापर्यंत इथे दंगा असायचा. अन तो आतला मारूती म्हणजे मित्रच होता जसा. खेळताना त्याच्या डोक्यावर चढून बिढून सगळे दंगा करीत. कुणीतरी मोठ्या माणसाने ते पाहिले, की पोरांना तो दम भरे, पण ते तेवढ्यापूरतेच. लगेचच मारूतीच्या अंगाखांद्यावर आणि देवळाच्या कळसावर चढून धिंगाणा सुरू. अन आवाज एवढा, की अख्ख्या गावात ऐकू जाई. मग तात्याआजोबा काठी घेऊन धाक दाखवत आणि जरबेने सगळ्यांना घरी पिटाळत.

आता त्या सुन्या मंदीराकडे एकवार पाहून त्याने पुन्हा घराकडे पाहिले, तर सगळे त्याच्याकडेच बघत होते. हेच ते सगळे दंगा करणारे, त्याला बुक्के, चिमटे घेऊन दांडगाई करणारे. हे मोठे झाले, ते ठीक आहे, पण गावातली पोरेबाळेच संपली की काय?

अन हा पिंपळ. त्या मारूतीवर अखंड सावली धरणारा. जास्त दांडग्या कार्ट्यांचं नुसतंच मारूतीवर चढून समाधान होत नसे. पिंपळाच्या शेंड्यापर्यंत ती पोचत. याचा फायदा असा होई, की मारायला, धाक दाखवायला येणाया तात्याआजोबा सारख्यांच्या तावडीतून सहज सुटता येई. आणि पिंपळाची ती अखंड सळसळ. तिने तर संपूर्ण लहाणपणच व्यापून टाकलं. आता पाने अन फांद्या कमी झालेल्या, अजिबात पाने न हलवता चुपचाप अपराध्यासारखा उभ्या राहिलेल्या या, समोर प्रत्यक्ष उभ्या असणार्या पिंपळापेक्षा तो लहाणपणीचा चैतन्याने रसरसून गेलेला पिंपळच कितीतरी स्पष्ट दिसतो आहे.

त्या तुलनेत या समोर दिसणार्‍या पिंपळाचं काही खरं नाही. केव्हाही पडेल. हा तो पिंपळ नाहीच दिसत. किंवा हा पिंपळ नाहीच..!

मग डाव्या हाताला झेड. पी. ची शाळा. तो लहान असताना चौथीपर्यंत होती बहूतेक. आता कितवीपर्यंत असावी? आता तारेचं कुंपण केलंय. पण आतली झाडे पाडलेली किंवा पडलेली दिसताहेत. नाही म्हणायला वृ़क्षारोपणाचं 'टार्गेट' पुर्ण करण्यासाठी लावलेली दहा-पाच रोपटी, अन त्यांच्यासाठी केलेल्या गोल जाळ्या वगैरे. पण बाकी शाळेसमोरचं मैदान भक्क उन्हात अगदी. झाडांच्या दाट सावलीत पोरं प्रार्थना म्हणताना कसं छान वाटायचं अगदी. आता ऊन्हाचे चटके बसत असणार पोरांना.

कौलारू छप्पर असलेला शाळेचा व्हरांडा. केवढा मोठा वाटायचा तेव्हा. एखाद्या ऑडिटोरियम एवढा. आता इवलासा दिसतो आहे. तात्याआजोबा गावातल्या कसल्याशा सोसायटीचे चेअरमन की व्हाईस चेअरमन असावेत. त्या सोसायटीचं ऑफिस खुप लहान असल्यामूळे सभा वगैरे या व्हरांड्यात व्हायच्या. मग ती सभा संपल्यावर केळे-सफरचंदासारखं एखादं फळ आणि बुंदीचे लाडू वगैरे. ते मिळवण्यासाठी केवढी फिल्डिंग अन खटाटोप. तेव्हाचा शेणाने सारवललेल्या व्हरांड्यावर आता फरशी वगैरे आलीय. पण असा भकास का दिसतोय तो?

रस्त्याच्या डाव्या हाताला शाळा आणि उजव्या हाताला तीन मोठी गुलमोहराची झाडे होती, तीही आता दिसत नाहीयेत. हे गुलमोहर म्हणजे फुल टाईमपास. गच्च भरलेली लाल तांबडी फुले जितकी अप्रूप दिसायची, तितकीच समोरच्या शाळेतली पोरं रांगेत प्रार्थना म्हणायला उभी राहिल्यागत दिसणाया नाजूक पानांच्या रांगा. ही झाडे तर सवंगड्यांमधलीच एक होऊन बसली होती. एक मोठा उकिरडा अन उन्हाने तापलेली पांढरी माती होती तिथे आता. येणार्‍या जाणार्‍या गाड्यांसोबत नाकातोंडात उडून खाली बसत होती, अन त्या तीन झाडांची आठवण आणखीच तीव्र करीत.

शाळेच्या मागे भल्या थोरल्या झाडांची रांगच. म्हणजे ओढ्याच्या कडेला. ओढ्याचे अक्षरशः गटार झाले होते अन ती उरलीसुरली झाडे हरल्यासारखी, केविलवाणी दिसत होती. गर्द फांद्यांनी अख्खे गाव झाकणार्‍या या झाडांमधून आता गावाच्या एकाकडेला असलेली पाण्याची टाकी अगदी स्पष्ट दिसत होती. ओड्यात भर टाकून सरळ रस्ताच केला होता, अन त्याच्याकडेला ठिकठिकाणी सांडपाणी साचलेलं.

संपूर्ण लहाणपण भारून टाकणार्‍या या परिसरात आपण गेली कित्येक वर्षे चक्करही मारलेली नाही, हे त्याला आता जाणवलं. आजीला भेटायला येऊन आजूबाजूला काहीच न बघता तसाच तो निघून जाई. किंवा हे सगळे बदल इतके हळूहळू होत गेले, की ते जाणवले नाहीत. आता इतक्या वर्षांनी ते अगदी नव्याने पाहत असल्यासारखे दिसताहेत.

हे सगळं सहन न होऊन की काय, त्यानं मागे नजर वळवली, तर आजीला बाहेर काढलं होतं. आंघोळीची वगैरे तयारी सुरू होती.
मग मान खाली घालून तो चालू लागला. आजीला शेवटचं बघण्यासाठी.

***

बायकांनी गद्यात अन पद्यात रडून गोंधळ घातला होता. काही तर कोरड्या डोळ्यांनीच. आजीसाठी रडून रडून अश्रू आटले असण्याचीही शक्यता होती. त्यातच न-कळत्या लहान पोरांनीही सुर लावला. जाणती माणसे घाई करा, आवरा म्हणत होती. काही जण सोपस्कार उरकण्याच्या मागे होते. पण एकवेळ हे बरे. त्या विटलेल्या, जीर्ण झालेल्या देहावर पडून, रडून भेकून, आणखी किती गोंधळ घालायचा?

शेवटी आजीला उचलले तेव्हा कल्लोळ झाला. त्याने घरात बघितले, तर त्या लांबलचक घरातून सरळ मागली गल्लीच दिसत होती. हे घर इतकं मोकळं कधी बघितलं आहे का आपण? इतकं मोठं आहे हे?

तिरडी पुढे निघाली, तशी एकवार मान खाली घालून त्याने पुन्हा घरात पाहिले, तर एका रांजणात खांबाच्या आधाराने पुरुषभर उंचीची रवी मोठ्या दोरीने घुसळून, दोन्ही हात आणि कंबर यांची लयबध्द हालचाल करीत ताक करणार्‍या आजीच्या सावलीचा भास झाला. अगदी तो लहान असताना ताक घुसळवून लोणी करणार्‍या आजीची नाचरी सावली त्याला थेट अंगणातूनही दिसायची तशीच. एक क्षण त्याला वाटून गेलं. पळतच आत जावं, अन आजीच्या तारस्वरात ओरडण्याला भीक न घालता रांजणात बचकन हात घालून मुठभर लोणी काढावे. अन परत खेळण्यासाठी बाहेर धुम ठोकावी.

आजीच्या नऊवारी लुगड्याला नेहेमी लोण्याचा-तुपाचा वास यायचा. हवा हवासा. आजकाल यायचा की नाही काय माहिती नाही. शेवटी तर भेटणंच बंद होतं, पण त्याआधीही आपण आजीच्या इतक्या जवळ थोडंच जायचो- लहान असताना तिच्या कुशीत शिरल्यासारखं?

आजीवर फुलं, माळा अन कायकाय पडलं होतं. अन नवं लुगडं नेसली होती ती. त्या लुगड्याचा वास घ्यायला हवा. आज ती शेवटचं नेसलीय म्हटल्यावर येतही असेल लोण्या-तुपाचा वास.

मग मागे राहिलेल्या बायकांचा कल्लोळ आता डोक्यात घुसला आहे, असं त्याला वाटलं.

***

आजी कडक अन तापट म्हणुन वाड्यात प्रसिध्द होती, अन तिचा मुलगा, म्हणजे रघूमामा याबाबतीत तिचा बाप. त्यामूळे दोघांची नेहेमी भांडणं व्हायची. आधी गरीब असलेलं हे घर मोठा काशीनाथमामा अन आजीने कष्ट करून वर आणलं. पण त्यांना हा रघूमामा हमाल म्हणायचा. श्रीमंत व्हायला कष्टाची नाही, तर चातूर्याची गरज असते म्हणायचा. नापीक जमीन विकून नवीन शेते, शिवाय मेंढ्या, शेळ्या, म्हशी घेण्याचा निर्णय त्याचाच. दुधाच्या पैशांवर, आजीच्या सोन्यानाण्यावर नेहेमी याचा डोळा. गावातली पहिली जावा गाडी याच्याकडे आल्यावर हा सुटलाच. तालूक्याच्या गावात याच्या नावावर बारमध्ये चाळीसेक हजारांवर 'उधारी' करण्यापर्यंत त्याची मजल गेली. तात्याआजोबांनी ती उधारी थकविल्यावर घरी येऊन यथेच्छ बडविला. पण स्वभाव असे बदलते तर काय हवं होतं आणखी?

मग हा सरपच झाला. गावातल्या इतर विरोधकांना हाणून मारून. पण मग रस्ते केले. टाकी अन नळावाटे पाण्याची सोय केली. शाळा वाढवली, सुधरवली. बस-स्टँड केला. एस्.टी.च्या फेर्‍या वाढवल्या. सरकारी योजनांची माहिती काढून गावापर्यंत आणल्या. स्वच्छता अन नीटनेटकेपणा सर्वांना शिकविला. सुट्टीत आम्हाला वाचायला गोष्टींची पुस्तके हवीत, असं एकदा म्हटल्यावर मग कशी कुणास ठाऊक, पण गावात लायब्ररीच सुरू झाली. त्यासाठी एका जीर्ण घराचा उध्दारही झाला. आणि बरंच काय काय.. गावाचा जणू कायापालट झाला.

हा राजबिंडा रघूमामा यावेळी आमचा अक्षरशः आदर्शच झाला. त्याचं वागणं, बोलणं, कपडे घालायची अन एकूणच वावरण्याची पध्दत आम्हा लहान मुलांसाठी कुतूहलाचा विषय झाली.

पण आततायी स्वभाव नडलाच. काही लफडी अंगाशी आली, अन सरपंचपदावरनं मामाला पायऊतार व्हावं लागलं. मग दारू अन दांडगाई आणखीच वाढली. वाटेल त्याच्याशी भांडण उकरून काढू लागला. नसती बिलामत नको, म्हणून मग लोक चार पावले दुरच राहू लागले. सकाळी उठल्यावर बाटलीच घेऊन बसू लागला. मनात आलं की बायकोला मार मार मारू लागला. आजीने तिची बाजू घेतल्यावर त्याने आजीवरच डुख धरला. अन एका भांडणात आजीने भर गल्लीत सांगितलं, हा मेला, तरच मला शांतता लागेल.

रघूमामा खरेच गेला. लिव्हर कँसरने. मग आजी ऊर फुटेस्तवर रडली. मलाही आताच मरायचं म्हणाली. पण तसं काही झालं नाही. त्यानंतर पंधरा-वीस वर्षे आजी जगली. पोटचा पोर डोळ्यांसमोर गेल्याचं दु:ख बाळगत.

आता ती पण गेली. उरलेली भांडणे करतील बहूतेक दोघे भेटल्यावर..!

समोरच्या धडधडत्या चितेकडे तो एकाग्र नजरेने पाहत राहिला. असाच एकेकाळी तो काशीनाथमामा, रघूमामा अन तात्याआजोबांनाही निरोप देऊन आला होता. पण तेव्हा गावाची शीव ओलांडून परत गावात यावसं त्याला वाटलं होतं कमीत कमी.

आता शेवटच्या दुव्याचीही राख झाली. संपूर्ण बाळपण समृध्द करून टाकणार्‍या त्या गावात आता आपलं कुणी राहिलं नाही. आता का जावं परत तिथं?

***

रणरणत्या उन्हात अन भकास धुळीत अनवाणी लोकांसोबत निमूटपणे तो चालत आला, खाली मान घालून. परत आल्यावर हात-पाय धुवून लोक जेवायलाच बसले सरळ, तसं त्याला मळमळून आलं. ताटात दोन घास इकडे तिकडे करून तो कसाबसा उठला.

तो परदेशात असल्यामूळे चौकशांना उधाण आलं होतं. जुन्या खेळगड्यांनी जवळ येऊन जुने दिवस आठवावेत, विचारपूस करावी, असं त्याला वाटत होतं. पण ते दुर राहत होते, अन नसतेच लोक प्रश्न विचारून भंडावत होते. शेवटी धाकट्या मामाच्या मुलाला, दादूला ’चल जरा इथनं दुसरीकडे' म्हणाला.

मग गावविहिरीवर जाऊन ते बोलत बसले. गाव मला अचानकच भकास अन उध्द्वस्त वाटू लागले आहे- असे तो म्हटल्यावर दादू म्हणाला- झाले आहेच मुळी बकाल हे गाव. पंधरा-वीस वर्षांपूर्वी कसं अगदी गजबजलेलं असायचं. आता ज्यांना शेतीच करायची आहे, किंवा दुसरा पर्यायच नाही, अशा निम्म्याअधिक लोकांनी मळ्यात बंगले बांधले. त्यांची गावातली घरे ओस पडली. ज्यांची शेती कमी, किंवा करणे जमत नाही अशांच्या मुलांनी रोजगारासाठी शहरांचा रस्ता धरला. आता ते सणवार राहिले नाहीत. दिवाळीला फटाक्यांचे आवाज आले, एखादा आकाशदिवा दिसला, तर नवल वाटावे अशी अवस्था आहे. जो तो स्वत:पूरतं बघतो. जुनी-जाणती मंडळी एकेक करून गेली, आज आपली आजी गेली तशी. राहिलेली आला दिवस ढकलत आहेत. मलाही ही विपन्नावस्था बघवत नाही. पण शेती सोडून जाता येत नाही..

दादूचं आणखी बरंच काय काय बोललेलं तो ऐकत राहिला. इतकी वर्षे आजी आहे, म्हणजे, ते गावही तसंच आहे या समजात असलेला तो सैरभैर झाल्यासारखा तो इकडेतिकडे बघत राहिला. आता या गावात काढलेले असंख्य दिवस स्वप्न तर नव्हते असं एकदा त्याला वाटून गेलं.

खिन्न होऊन पुन्हा खाली मातीशी खेळत असलेल्या आपल्या हातांकडे तो बघत राहिला. त्या हातांनाही तिथल्या विहिरीच्या बाजूच्या त्या बारीक रेतीची ओळख पटली असावी.

पण ती रेती मात्र मुठीतून त्याच्या इच्छेविरूध्द निसटून जात असल्याचा त्याला भास झाला.

***

घरात आल्यावर तात्याआजोबांच्या फोटोकडे त्याचं लक्ष गेलं.

भरपूर उंची, अन सावळा रेखीव चेहेरा. आजीही त्यांना साजेशी. गोर्‍यापिवळ्या रंगाची. हे दोघे म्हातारे इतके छान दिसायचे. तरूण असताना तर विचारायलाच नको. काय जोडी आहे- असं बघताक्षणीच म्हणत असणार लोक.

पण स्वभावाला तेवढीच विजोड होती ही दोघं. आजी हेकट, तापट, कडक. एखादी गोष्ट मनात घेतली की मेले तरी बेहेत्तर असा खाक्या. या स्वभावातूनच तरूण असताना कष्ट करून व्यवहार सांभाळून घराला तिने पुढे नेले. त्यामूळे रघूमामा सोडला, तर तिला उलट उत्तर देणारे वाड्यात, नात्यातच काय, पण गावातही कुणी जन्मले नाही! पण याचा परिणाम ती आणखीच एककल्ली, हेकट होण्यात झाला, हेही तेवढंच खरं.

तात्याआजोबा मात्र एकदम शांत, विचारी. पण कष्ट वगैरे? छे छे! थोडे शिक्षण झाले होतेच, पण नेहेमी कसकसले वाचनही चालू असायचे. नाहीच मिळाले काही वाचायला, तर परीकथांपासून युनोच्या अहवालापर्यंत त्यांना काहीही चालायचे वाचायला. चतूर बोलण्यावागण्यामूळे गावात, पंचायतीत, सोसायटीत, स्कूल कमिटीत त्यांच्या मताला मान होता. मग या वर्तूळाच्या बाहेर ते निघालेच नाहीत. काम, कष्ट, समस्या यांच्याशी त्यांनी कधी संबंधच ठेवला नाही.

त्यामूळे आजी त्यांच्यावर नेहेमीच चिडल्यागत दिसायची.

पण आता ती सुध्दा तिथं त्या फोटोंच्या रांगेत जाऊन बसणार. रीतसर हार वगैरे घालून. तात्याआजोबांच्या शेजारी. तिची इच्छा असो, नसो.

ऊन्हं कलली, तसं गाव अधिकच ओबडधोबड दिसू लागलं त्याला. गावात कधीतरी केलेल्या डांबरी रस्त्यांची पार दुर्दशा झाली होती. खडी अन धुळ सगळीकडे पसरलेली. गावाला कुणी वालीच नाही की काय? लहान असताना होती का ही धूळ? की तेव्हा तिचं फारसं काही वाटत नव्हतं? बाहेर गल्लीत आल्यावर जीव गुदमरतोय की काय, इतकी अंगावर येणारी ही धुळ. या लोकांना काहीच त्रास होत नसेल या धुळीचा?

मुळात लोक दिसताहेत तरी कुठे? आज आजीचं असं झालं म्हणून जमलेत सगळे. क्रियाकर्म सगळं आटोपलं, की सारेच जातील, आपापल्या घरी. हे घरही भयानक होईल.

आजीशिवायचं घर या कल्पनेचा विचार मनात आल्याबरोबर तो पुन्हा एकदा हलूनच गेला. आजीच्या हातांच्या निगूतीची या घरालाही कित्येक वर्षांची सवय. त्याला काय वाटत असेल आज?

तो एकदम सटपटूनच गेला, अन आता या क्षणी कुणीही जवळ नको असं त्याला वाटलं. कुणी आलंच जवळ, तर बोलता येणार नाही, तोंड उघडले तर हुंदके वगैरे बाहेर पडतील, अशी भीती त्याला वाटली. मग तो आईजवळ जाऊन मी घरी जातो म्हणाला. परदेशातून वर्षानं आलेल्या पोराची भेट तिची झाली होती, तीही अशा प्रसंगात. पण तिला तर इथेच थांबावे लागणार होते. काळजीने त्याच्याकडे बघत, ठीक आहे, शेजारच्या मावशीला फोन करते, तिच्याकडे जेव अन उद्या सकाळी 'राखेला' ये वगैरे कायकाय बोलत होती. यंत्रवत मान डोलावत कसाबसा बाहेर पडला. गाडीजवळ येऊन तू पुढे चल, अन स्टँडजवळ- गावच्या वेशीजवळ जाऊन थांब असे ड्रायव्हरला सांगून पायीच निघाला.

आता दोन्ही बाजूला दिसणार्‍या सर्व गोष्टी पाहून घेत तो निघाला. नवलाने त्याच्याकडे पाहणार्‍या बाया-बाप्प्यांकडे लक्ष न देता.
रघूमामाची टाळं लावलेली, रंग विटलेली दोन्ही घरं..
मग भलं थोरलं- आता थकून कंबरेत वाकलं असल्याचा भास होणारं लिंबाचं झाड..
पलीकडचं विटकं पोस्टऑफिस, अन बाहेरची तीच कधीकाळी लाल असलेली- पोरांनी दगडांनी अक्षरशः ठेचून काढलेली पोस्टाची पेटी..
मग विठ्ठल मांत्रिकाचं घर. तो नसणारच. तेव्हाच तो किती भितीदायक अन म्हातारा दिसायचा. आता फाटक्या कपड्यातली पोरं शेंबूड पुसताना दिसत होती. त्याची नातवंडं बहूतेक. पण पणतूही असतील एखादेवेळेस. साप-विंचवांपासून ते भानामती-भुतं उतरवणारा विठ्ठलबाबा. लहाणपणी भिती दाखविण्यासाठी हमखास वापरला जाणारा हा प्राणी. कसा मेला असेल तो?
मग शंकर पाटील- रामचंद्र पाटलांची घरं. गावातली बड्या आसाम्या. म्हणजे तेव्हा तरी होत्या. आता शांतताच दिसत होती घरात..
मग थोडं मोकळं मैदान, अन मग सोसायटीचं ऑफिस. तात्याआजोबांच्या वेळी गजबजलेली जागा ही. आता तिथं उकिरडे, डुकरे अन दगडांचे ढीग होते..
शेजारी लायब्ररी. म्हणजे तेव्हा होती. आता पुस्तके तर दुरच, पण तिच्या भिंतीही राहिल्या नव्हत्या. मातीच्या भिंती वार्‍यापावसाने अर्धवट कोसळल्या होत्या, अन मातीचे ढिगारे रस्त्यापर्यंत पोचले होते.
दुसर्‍या बाजूला रांगेत पाच-पंचवीस घरे. बरीचशी बंद. उघडी दिसणार्‍यांतही वावर दिसत नव्हता.
पाठीमागे गर्द आमराई होती. पाटलांचीच. ती जागा साफ दिसत होती. डाळिंबासाठी गोडाऊन बनविण्याचे घाटत होते तिथे..
मग एस्टी-स्टँड. इथंही दिवसभर तरण्याताठ्यांचे गप्पांचे फड अन पोरासोरांचे खेळ चालायचे दिवसभर. सोमवारी बाजार भरायचा याच पटांगणात. आता भरतो की नाही माहिती नाही. लोकांची वर्दळच कमी झाली म्हटल्यावर रघूमामाने भांडून वाढवलेल्या एस्टीच्या फेर्‍याही कमी झाल्या असाव्यात.
पलीकडे राजवाडा. म्हणजे भिल अन महारांची वस्ती. तेही किती राहिलेत, देव जाणे..

पुढे शंभरेक पावलांवर ड्रायव्हर गाडी उभी करून थांबलेला त्याला दिसला. मग तो थबकला. वळून त्याने पुन्हा गावाकडे पाहिले. अन बघत राहिला निश्चलपणे.

पुन्हा येणार की नाही आपण आता इथे? कशासाठी?

अन आता त्याला प्रचंड एकटे, अनाथ-अनाथ वाटले. जाणीवे-नेणीवेत भरून राहिलेल्या कळत्या, न-कळत्या वयातल्या कोटीकोटी आठवणी अचानक त्याला खोट्या, भासमान वाटू लागल्या.

कधीच नव्हता, असा केविलवाणा झाला तो. लहाणपणी, एका खेळात कोरडीखट्ट वाळलेली आंब्याची कोयटी मारूतीच्या पारावरच्या काळ्या दगडावर घासल्यावर व्हायचे, तसेच काहीसे विचित्र आवाज त्याच्या घशातून निघाले, अन तो दचकल्यासारखाच झाला.

मग बांध फुटलाच. गळून गेल्यागत त्याने गुडघे जमिनीवर टेकून हात खालच्या पांढर्‍या मातीत हळूवार घासले. अन मग खाली मान घालून लहान बाळासारखं दुखर्‍या आवाजात तो हळूहळू, केविलवाणं रडू लागला.

***
***
संपूर्ण
***

गुलमोहर: 

कथा टकास आहे
पण प्रवीण...............
तुझी चाल तुरु तुरु
उडते केस भुरु भुरु

अफाट लिहिले आहेस साजिरा ! सुंदर !!

बाप रे मला तर काही कळतच नाहीये काय प्रतिक्रिया द्यावी. माझ्या दोन्हीकडच्या आज्या गेल्या त्याचा रिप्ले म्हनावा की काय असे वाटले. साजिर्या तू शब्द्सम्राट आत्तोय्तू आणि मी एकाच पार्श्वभूमीतून आलेलो आहोत त्यामुळे अगदी पुनः अनूभूती अनुभवली....

पुन्हा पुन्हा लिही यार. पुन्हा पुन्हा.......

apratim. khup gahivarun ala. lekhan vatlach nahi. ek anubhav anubhavtana janavla.
svatahcya bhutkalat jaun pohochlo.
gavchya sarva athvani dolyasmor taralya. lahanpani je nahi milala te te sara kahi aaj svatahjaval aahe. pan tari kahitari apurna aslyasarkhe vatte. teva matra khup samadhani hoto.
ya shahari jivnat sarva sukhsuvidhani yukta aslela jivan asunahi apurna vatta tevha kahi navta tarihi samadhani hoto. ek avyakta ananda hota. shevti vatta ki tyach ayushyat khara chaitanya hota. ayushyat nemka kay hava asta tech kalat nahi. jeva kalta teva phar ushir jhalela asto.

मस्त रे मस्त. नेहेमीप्रमाणे ग्रेट!!!!!!!

तिरडी पुढे निघाली, तशी एकवार मान खाली घालून त्याने पुन्हा घरात पाहिले, तर एका रांजणात खांबाच्या आधाराने पुरुषभर उंचीची रवी मोठ्या दोरीने घुसळून, दोन्ही हात आणि कंबर यांची लयबध्द हालचाल करीत ताक करणार्‍या आजीच्या सावलीचा भास झाला. अगदी तो लहान असताना ताक घुसळवून लोणी करणार्‍या आजीची नाचरी सावली त्याला थेट अंगणातूनही दिसायची तशीच. एक क्षण त्याला वाटून गेलं. पळतच आत जावं, अन आजीच्या तारस्वरात ओरडण्याला भीक न घालता रांजणात बचकन हात घालून मुठभर लोणी काढावे. अन परत खेळण्यासाठी बाहेर धुम ठोकावी.

मस्तच.

साजिरा फार मस्त वातावरण निर्मिती केली आहेस.. कुणीतरी वर म्हणल्याप्रमाणे स्वतःच सर्व अनुभवतोय असे वाटले वाचताना..

  -------
  स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले
  स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले

   आजीच्या जाण्याचं, मागच्या पिढिशी असलेला शेवटचा दुवा निखळण्याचं दु:ख अन गावच्या बदलत्या परिस्थितीने होणारं दु:ख - दोन्ही अगदी नेमकी पकडलीयेस. आजी अन इतर सर्व नातेवाईक तर डोळ्यापुढे उभे रहातातच पण एक एकेकाळचं सुरेख, नांदतं गाजतं गाव देखील डोळ्यापुढे आलं.

   माझ्यासारख्या शहरात वाढलेल्या, रूढार्थाने आजोळ नसलेल्या मुलीच्या गळ्यात आवंढा आला वाचताना!

   सुरेख लिहिलंय अतिशय

   फारच छान... हळुवार कुठेही घाइ नाही... कथानायक होउन सार अनुभवाव उगाच कुठेही न रेंगाळता न घाई करता कथेचे पदरा पदरा ने मोकळी होते. आणि नेमक्या ठिकाणी थांबते कथा नायक न कळत आपल्या पासुन वेगळा होतो.
   अन मग खाली मान घालून लहान बाळासारखं दुखर्‍या आवाजात तो हळूहळू, केविलवाणं रडू लागला. >>

   अतिशय ताकदीने लिहील आहेस... अगदी साजिरं...!!! अजुन एक अप्रतिम कलाकृती..!!!!

   अतिशय ह्रद्य आणि सोपं सहज एकदम आतून आलेलं.
   काही आठवणींना अगदी थेट हात घातलांस.....

   -----------------------
   2b || !(2b)

   कथा वाचली ........
   खूपच आवडली.अभिप्राय व्यक्त करायला शब्थच सुचत नाहीत. अनेक भावना दाटून आल्या.
   लहानपणचा साजिरा आठवला. असाच लिहीत रहा.

   आजी शांत पडली होती. माहेरी गेली असावी बहूतेक>>>
   साजीर्‍या खुपच नितांत सुंदर लिहीले आहेस. मला माझ्या आज्जीची आठवण झाली.

   कजिरया,
   खरंच , सुंदर, एकदम बारीकसारीक गोष्टी खुप विचार करायला लावतात रे .
   असच लिहित जा रे.

   खरच खुपच छान लिहिलि आहे कथा...
   ह्रुदय्स्पर्शि....
   - श्रुती

   कितीरे छान आणि ह्रदयस्पर्शी लिहीतोस साजीर्‍या. अस वाटल ते शव माझ्याच आजीच आहे आणि मी कथा लेखक इतक गुंगवलस गड्या.

   अनेक मोठे कथाकार जशी वाक्ये वापरतात त्या ही पेक्षा काकणभर उत्तम असा प्रत्यय "कधीच नव्हता, असा केविलवाणा झाला तो. लहाणपणी, एका खेळात कोरडीखट्ट वाळलेली आंब्याची कोयटी मारूतीच्या पारावरच्या काळ्या दगडावर घासल्यावर व्हायचे, तसेच काहीसे विचित्र आवाज त्याच्या घशातून निघाले, अन तो दचकल्यासारखाच झाला. या वाक्यातुन तु दिलास.

   तु ग्रेट आहेस. कथा लेखन करत रहा. एक नव्या पिढीचा दमदार कथालेखक म्हणुन जगाला तुझा परिचय होऊदे गड्या.

   गावशीव..! मनात घर करुन राहिलेल्या 'गोष्टीं' पैकी एक. खरं सांगायचं तर ही कथा मी कधीच एकसलग वाचू शकत नाही. प्रचंड रिलेट होते. The more you write personal, the more it becomes universal चा पुनःप्रत्यय येतो.
   अन आता त्याला प्रचंड एकटे, अनाथ-अनाथ वाटले. जाणीवे-नेणीवेत भरून राहिलेल्या कळत्या, न-कळत्या वयातल्या कोटीकोटी आठवणी अचानक त्याला खोट्या, भासमान वाटू लागल्या.
   कधीच नव्हता, असा केविलवाणा झाला तो. >> हे इतकं शब्दात कसं पकडता येतं जसंच्या तसं?

   'लार्जर दॅन लाईफ' प्रकरण आहे हे सारंच माझ्यासाठी. साजिर्‍या, अजून लिही असं...

   अप्रतिम! गुदमरायला होत होतं कथेबरोबर पुढे जाताना. महानिर्वाण वाचतानाचा सुन्नपणा आठवला.

   जानेवारीमधे लिहिली गेलेली ही कथा इतक्या उशिरा माझ्याकडून वाचली जावी हे माझं दुर्दैवच म्हणायचं.

   साजिर्‍याची ही कथा 'माहेर'च्या जानेवारी २०११च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अभिनंदन साजिर्‍या Happy

   साजिर्‍याचे मनःपूर्वक अभिनंदन! त्याचसोबत चिनूक्सचा "किनारा तुला पामराला" हा 'चाकोरीबाहेर' सदरातील लेख, श्रध्दाची 'सती' ही कथा आणि चमन ची 'मेघाची गोष्ट' हे ही 'माहेर' जानेवारी २०११ मध्ये प्रसिध्द झाले आहेत. सर्वांचे खूप खूप अभिनंदन! मायबोलीकरांच्या नवीन वर्षाची सुरुवात धडाक्यात झाली!! Happy

   खुप छान आहे.. खुपच छान..
   साजिरा, चिनूक्स, श्रद्धा आणि चमन खूप खूप अभिनंदन.

   Pages