अश्वेत राष्ट्राध्यक्ष आणि अश्वेत टी.व्ही. स्क्रीन!

Submitted by ललिता-प्रीति on 22 January, 2009 - 06:12

मी कीर्ती सुपुत्रे. इ. ९ वी.
सध्या आमच्या वर्गात वार्षिक परिक्षेसाठी निबंधलेखनाचा सराव चालू आहे. आमच्या बाई म्हणतात की "नेहेमीच्या ’दूरदर्शन : शाप की वरदान’, ’फलाटाचे आत्मवृत्त’, ’जिचे हाती पाळण्याची दोरी...’ यांसारख्या हमखास येणार्‍या विषयांव्यतिरिक्त - (त्याला आम्ही मैत्रिणी ’हमखास भेडसावणारे विषय’ म्हणतो!) - तर त्यांव्यतिरिक्त चालू घडामोडींपैकी एखाद्या विषयावर पण निबंध लिहिता आला पाहिजे." आला पाहिजे तर आला पाहिजे! पण आजच्या ’चालू घडामोडी’ या परिक्षेच्या वेळेपर्यंत ’घडून गेलेल्या घडामोडी’ नाही का होणार? मग आत्ता केलेल्या सरावाचा काय उपयोग तेव्हा? आणि परिक्षेच्या वेळी ज्या घडामोडी चालू असतील त्यावर तेव्हा बिनसरावाचा निबंध कसा काय लिहायचा?
मुंबईवर अतिरेकी हल्ला झाल्यानंतर बाईंनी आम्हाला "त्यासंदर्भात एकतरी निबंध येणारच" असं ठामपणे सांगितलंय. "पुढचे काही दिवस रोजचा पेपर वाचा, अग्रलेख वाचा, त्या विषयाची तयारी करून ठेवा" असंही त्या सांगत असतात. पण रोजच्या पेपरमध्ये त्याविषयी जास्त काही माहिती मिळतच नाही. ’कसाब आमचा नाही’ आणि ’तुमच्या देशातले अतिरेकी तळ उद्ध्वस्त करा’ या दोन वाक्यांवर आधारित दोन शॉर्ट-नोट्स लिहिता येतील फारफार तर, पण एक आख्खा निबंध कसा काय लिहिणार? ’आदर्श निबंधमाला’ची मदत घेतलेलीही बाईंना चालत नाही. (मदत घेतलेलं त्यांना कळतं कसं कोण जाणे!)
तरीसुध्दा, कसंतरी करून मी तो निबंध तयार केला होता; या सोमवारी शाळेत दाखवायचा होता... इतक्यात काल बाईंनी शाळेत सगळ्यांना फर्मान सोडलं - अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी होतोय, त्यानिमित्तानं ’जागतिक बदलाचे वारे’ हा अजून एक निबंध तयार करा!!
मला तर ते ऐकून खारे वारे, मतलई वारे, व्यापारी वारेच आठवले. म्हणजे, त्या वार्‍यांमुळे नाही का जगातलं हवामान, पाऊस, पीक-पाणी यांत बदल घडतो ... मग तेच जागतिक बदलाचे वारे! (मराठीच्या तासाला मला नेमका भूगोल आठवतो ... आणि भूगोलाच्या तासाला नेमकी झोप येते!!)
हे खारे वारे वगैरे सगळं रफ वहीच्या मागच्या पानावर लिहून मी वही उजवीकडे सुजातासमोर सरकवली. ते वाचून तिला फुस्सकन हसू आलं, ते पाहून मलाही आलं. (माझा जोक वाचून तिची झोप गेली असं तिनं मला नंतर सांगितलं.) त्या नादात बाईंची पुढली ४-५ वाक्यं कानांच्या स्टॉपवर न थांबता तशीच निघून गेली. "... पुढच्या गुरूवारी अतिरेकी हल्ला आणि बराक ओबामा दोन्ही निबंध लिहून आणा." पुढलं फर्मान आलं. बोलता बोलता बाईंनी ’जागतिक बदलाचे वारे’च्या जागी ’बराक ओबामा’ टाकलं. ’शब्दसमूहाच्या जागी एक शब्द लिहा’ असतं ना, तसं!
’बाई काहीपण बोलतात. ब. ओ. = जा. ब. वारे का गं?’ मी पुन्हा रफ वहीमार्फत सुजाताला विचारलं. तर तिचं डोकं भलतीकडेच निघालं होतं... वही तिच्याकडून परत आली तेव्हा माझ्या प्रश्नाखाली तिनं ’बराकीत बसलेला बारीक बराक बराच बेरकी, बरं का, बारक्या’ असलं काहीतरी लिहिलं होतं!! ही सुजी, गधडी, कुठे काय बोलावं हिला काहीही कळत नाही. हसू आवरायचं तरी कसं? बरं तर बरं, तेवढ्यात तास संपल्याची घंटा झाली.

आता पुढचा आठवडाभर हा शपथविधी आणि निबंध मानगुटीवर बसणार... ’शपथविधी’चा विग्रह कसा होईल बरं? शपथेसाठी करावा लागणारा विधी, शपथेवर करायचा विधी की शपथ आणि विधी? सगळे मध्यमपदलोपी समासच आहेत की! म्हणजे विग्रह चुकला तरी समासाच्या प्रकाराचा अर्धा मार्क नक्की मिळेल. (बाई म्हणतात - रोजच्या संवादांचा, शब्दांचा सुध्दा व्याकरणाच्या दृष्टीकोनातून लगेच विचार करायचा.)
न्यूज चॅनल्सवर शपथविधीचं डायरेक्ट टेलीकास्ट पहायचं ठरवलं. शपथविधी होता रात्री साडेदहा वाजता पण टी.व्ही. वाले संध्याकाळपासूनच दळत होते. ’ब्रेकिंग न्यूज : सेंट जॉर्ज चर्च जाएंगे ओबामा’; ’चर्चसे समारोह में जाएंगे ओबामा’; ’शपथ लेनेसे पहले चर्च पहुंचे ओबामा’ - या असल्या बातम्या ऐकून काय कप्पाळ लिहिणार निबंध! तरी दुपारी मी चक्क पेपर वाचला होता त्यामुळे ’ओबामा ४४वे राष्ट्राध्यक्ष आहेत; बास्केटबॉल चांगला खेळतात; ते जिथे शपथ घेणार आहेत त्या जागेला ’कॅपिटॉल हिल’ म्हणतात; ’१६००, पेनसिल्वानिया अव्हेन्यू’ हा (बहुतेक) त्या जागेचा पत्ता आहे’ इ. गोष्टी कळल्या होत्या. ’ओबामा हे एक चांगले वक्ते आहेत आणि जॉन फेव्हर्यू नावाचा एक माणूस नेहेमी त्यांना त्यांची भाषणे लिहून देतो’ अशीही एक बातमी होती. किती छान ना! त्या जॉनला शाळेत निबंधलेखनात पैकीच्या पैकी मार्कस मिळत असणार!
मध्येच एका चॅनलवर ओबामांना घेऊन जाणारी काळी लिमोझिन दाखवली. लिमोझिनला दोन एक्झॉस्ट होते आणि त्यातून भकाभक धूर बाहेर पडत होता. (तिथे पी.यू.सी.चा नियम नाहीये वाटतं!) एकीकडे ब्रेकिंग न्यूजचा सपाटा सुरूच होता - ’पहले अश्वेत प्रेसिडैंट’ वगैरे! (यांना ’प्रेसिडेंट’साठी एक हिंदी शब्द नाही सापडला.) आम्ही तेवढं इतिहासाची प्रश्नोत्तरं लिहिताना ’वर्णभेदाविरुध्द आंदोलन’, ’अब्राहम लिंकन’ वगैरे रट्टे मारायचे आणि इथे मात्र वर्णभेदाची धडधडीत ब्रेकिंग न्यूज!
रात्री ओबामांचं भाषण ऐकायचं ठरवलं. ते इंग्रजी भाषण कितपत कळेल शंकाच होती... पण एका चॅनलवर ते हिंदीत दाखवणार होते - तेच पहायचं ठरवलं.
घाईघाईत शाळेचा, क्लासचा अभ्यास, जेवण सगळं १० च्या आत उरकलं आणि टी.व्ही. लावला... बघते तर काय - तो टी.व्ही. स्क्रीनच अश्वेत झाला होता! केबलवाल्याकडचे लाईट गेलेले होते!
कीर्ती मॅडम, अजून लिहा... निबंध! आता दुसर्‍या दिवशीचा पेपरही वाचावा लागणार होता त्यासाठी... सगळा वैताग नुसता!
तिकडे अमेरिकेत जागतिक बदलाचे वारे वाहून उपयोग काय? लाईट जातात आणि ते वाहणारे वारे इथपर्यंत ’थेट’ पोचतच नाहीत हे कळणार आहे का त्या पहिल्यावहिल्या ’अश्वेत’ राष्ट्राध्यक्षांना?

---------------------------------------------------------------------------

पुढील भाग इथे वाचा : http://www.maayboli.com/node/5525

गुलमोहर: 

लले, मस्त लिहिलयस !

*
मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर - "माझं एक स्वप्न आहे की, एक दिवस माझी चार छोटी मुलं अशा राष्ट्रांत राहतील की जिथे कातडीच्या रंगावरुन नाही तर शीलसंपदेवरुन त्यांची पारख केली जाईल."

लई लई झ्याक...
दुसर्‍या भागाची अपेक्षा आहे... दुसर्‍या दिवशीचा पेपर वाचुन काय लिहीलं सुपुत्रेंच्या कीर्तीने वगैरे वगैरे वाचायला आवडेल... Happy

-योगेश

छान लिहीलयस ललिता. बाकी (टीव्हीवरच्या) हिंदीत कृष्णवर्णीयसाठी अश्वेत शब्द प्रचलित आहे हे माहित नव्हते.
हा भाग क्रमशः आहे का, नसेल तरी करुन टाक आणि पुढचा भाग येवू दे Happy

>>’हमखास भेडसावणारे विषय’
अगदी अगदी! Happy

मी तोच प्रश्ण विचारणार होते, अश्वेत म्हणजे काय? मग खालच्या प्रतिक्रीया वाचून कळला त्याचा अर्थ.
अश्वेत= काळा

मनु,
ते अश्वेत बहुदा Any Non White म्हणजेच (उरलेले सगळे) ब्लॅक, ब्राऊन, यलो या अर्थाने असेल.
अश्वेत = (श्वेत) पांढरा नसलेला.

श्वेत ला फक्त अ लावला आहे. जसे आदर अनादर. अश्वेत पेक्षा कॄष्णवर्णीय शब्द बरोबर होता पण आपल्या केबल टिव्ही वाल्यांचे ज्ञान कधी कधी भंयकर रित्या पाजळते.

ललिता - चांगले लिहीलेय पण अजुन मजा आली असती. (तुम्ही नेहमी भारी(च) लिहीता)

>श्वेत ला फक्त अ लावला आहे. जसे आदर अनादर
नाही रे राजा.. तो "न" लावलाय आदर या शब्दाला.. असो.
ललिता, छानच लिहीले आहे.. आवडला फ्लो. अजून लिहीत रहा...

हां बरोबर. ते चुकून दिले गेलेय.

एकदम राजा Happy बापरे. त्या पक्तींत नको बसवुस रे.

ललिता, खरच मस्तं लिहिता. (त्यामुळेच मला नेहमीच ते अपुरं वाटतं... अजून थोडं असायला हवं असं.... तो पेप्सिकोला चोखून संपला की कसं वाटायचं ... माझ्या लहानपणी... तस्सं)

दाद ना अनुमोदन, एकदम मस्त. पुढच्या भागाची वाट पहातेय.

छान लिहीलेय, आवडलं ! Happy

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु .......
कल्पनेतला ’ताजमहाल’ हिणकस ठरला !!! Happy

abruptly संपल्यासारखं वाटलं......... म्हणजे आधीच्या सगळ्या व्रुत्तांताचा भारनियमनाशी येऊन पूर्णविराम होणार आहे असं वाटलं नाही......
बाकी शैली as usual झक्कासच...........

उत्कृष्ट लेख,मूळ कल्पना भन्नाट आहे.पण मलाही थोडा अचानक संपल्यासारखा वाटला,दुसरा भाग खरचं शक्य आहे.अलीकडे अश्वेत शब्दच वापरला जातो कारण तो 'पॉलीटीकली करेक्ट' समजला जातो.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

छान .......

शब्द रचना, मांडणी पण मस्त केली आहे ....

सुंदर .......

!! पुढच्या लेखणासाठी शुभेच्या !!

आनंद आ. राजगोळे

हे हे हे.....मस्त मस्त Happy