हाय शरमाऊं किस किस को बताऊं...

Submitted by अतुल ठाकुर on 26 May, 2015 - 00:40

meragaon.jpg

"शोले" सर्वांना माहित आहे. सर्वांना तो चित्रपट आवडतोही. मात्र हिन्दी चित्रपटाचे जे जाणते रसिक आहेत ते त्या अगोदर प्रदर्शित झालेल्या "मेरा गांव मेरा देश" ला विसरले नसणारच. हा ट्रेड सेटर चित्रपट आहे. कारण "शोले"त गब्बर सिंग तर "मेरा गांव मेरा देश" मध्ये जब्बर सिंग. हा निव्वळ योगायोग वाटत नाही. "मेरा गांव मेरा देश" हा "शोले" चा पूर्वसूरी वाटतो. धर्मेंद्रला फिल्मफेअर नॉमिनेशन मिळालेला (बहुधा एकमेव) चित्रपट. "शोले" पासुन तंत्राचा बोलबाला हिन्दीचित्रपटात सुरु झाला. सिनेमास्कोप, पडदा व्यापणारे चित्रिकरण, साउंडमधील बारकावे, सर्जिओ लिऑनीच्या काही चित्रपटांची हुबेहुब उचललेली दृश्ये, अशा अनेक गोष्टी "शोले" वेगळा ठरण्यास कारणीभुत झाल्या. "मेरा गांव मेरा देश" मात्र परिपूर्ण हिन्दी चित्रपटच. अस्सल इये देशीच्या मातीत घडलेला. तंत्राचा भुलभुलैय्या नसण्याचे ते सुदैवी दिवस. राज खोसलासारखा अंगावर येणारी दृष्ये चित्रित करणारा काळाच्या पुढचा दिग्दर्शक. धर्मेंद्रला मिळालेला टिपिकल रोल. अगदी चेहर्‍यामोहर्‍यापासुन त्यात धरमसाहेब फिट्ट बसतात. आणि हिरोला खाऊन टाकणारा विनोद खन्नाचा क्रूर जब्बरसिंग. विनोद खन्ना खलनायक सुरेख वठवत असे. त्याची नजर, देहबोली आणि त्याला दिलेला डाकुचा गेटअप अगदी लक्षात राहण्यासारखा. विनोद खन्नाने अनेक खलनायक केले पण यासम हाच. जर हिन्दी चित्रपटात खलनायकांवर लिहिले गेले तर विनोदचा जब्बरसिंग वगळता येणारच नाही. चित्रपटातल्या इतर अभिनेत्यांबद्दल सांगायचं तर अभिनयाचे कसलेले शिलेदार येथे आहेत. "शोले" त अमजद आहे तर "मेरा गांव..." मध्ये अभिनयातही त्याचा "बाप" असलेला जयंत आहे. आशा पारेख आहे. सर्वच भट्टी मस्त जमलेली आहे. चित्रपट फार पुर्वी पाहिलेला आहे, त्यामुळे बारकावे फार आठवत नाहीत. मात्र एक गाणे पुन्हा पुन्हा आठवते त्यावरच येथे लिहायचे आहे.

"हाय शरमाऊ" या गाण्याचा तसं म्हटलं तर चित्रपटात कदाचित शेवटचा नंबर लागेल. रफी लताचं "कुछ कहता है ये सावन" गाणं यात आहे. त्यावेळी अनेकांच्या तोंडी असणारं "मार दिया जाय के छोड दिया जाय" हे गाजलेलं गाणं या चित्रपटात आहे. सोना लई जा रे, आया आया अटरिया पे कोई चोर सारखी मनात रेंगाळणारी गाणी आहेत. गावचं वातावरण, आशा पारेखचे रंगीबेरंगी कपडे, वातावरणाला साजेसं लक्ष्मीकांत प्यारेलालचं ठसकेबाज संगीत आणि आनंद बक्षीची चपखल गीतरचना. तरीही "हाय शरमाऊ" मला आवडतं कारण त्याचं राज खोसलाने केलेलं जबरदस्त चित्रिकरण. सुरुवातीपासुन खिळवुन ठेवणारं, श्वास रोखायला लावणारं. गाण्याचा सुरुवातीलाच तणाव निर्माण करण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे. आणि हा तणाव गाणे संपेपर्यंत आणि त्यानंतरही ते संपूर्ण दृश्य संपेपर्यंत कायम राहतो. गावात जब्बरसिंगची दहशत बसलेली असते. त्याला पकडायला पोलिस जंगजंग पछाडतात. धर्मेंद्र त्यांना मदत करत असतो. जब्बरसिंगशी संबंध असलेली परंतु त्याचा तिरस्कार करणारी एक नाचणारी कलावंतिण धर्मेंद्रला मदत करायला तयार होते. जत्रेत येणार्‍या जब्बरसिंगची खुण ती गाण्यातुन सांगणार असते. यातुन एका उत्कंठावर्धक नाट्याला सुरुवात होते. जब्बरसिंगला खबर मिळालेली असते कि जत्रेत काहीतरी घडणार आहे. पण तरीही तो तेथे वेश पालटुन यायला निघतो. हे दृश्य अतिशय सुरेख घेतलं आहे. जब्बरसिंगच्या टोळीतील प्रत्येक जण वेष पालटुन त्याच्यासमोर उभा राहतो. त्याच्या पसंतीची मोहर त्यांना हवी असते. आवश्यक तेथे जब्बरसिंग त्यांना वेषाबाबत सुचना देतो. स्वतः जब्बरसिंगही ओळखु येणार नाही इतपत स्वतःला बदलतो. आणि जत्रेत आल्यावर सुरु होतं "हाय शरमाऊ...". लक्ष्मीछाया ठसकेबाज गावरान नृत्य करत धर्मेंद्रला पहिली खुण सांगते "काला कंबल काली पगडी". स्वतः धर्मेंद्रदेखिल वेष पालटल्यामुळे पोलिसांना ओळखु येत नाही. चोर पोलिस खेळ सुरु झालेला असतो.

जत्रेतली गडबड, खेडवळ चेहरे, निरनिराळी दुकाने, खेडवळ पोषाखातील खेडुत, त्यांचे जत्रेतील वावरणे आणि त्यात शिजत असलेले हे नाट्य मात्र मुळातुनच पाहण्याजोगे. राज खोसलाने टाईट क्लोजअप्सचा फार परिणामकारक वापर येथे केला आहे. विशेषतः विनोदखन्नाला म्हातार्‍याचा गेटअप देऊन त्याच्या चेहर्‍यावरचा संशय, तणाव आणि बारकाईने गर्दी निरखणारा जब्बरसिंग त्या क्लोजअप्स मधुन मस्त उभा राहिला आहे. "काला कंबल काली पगडी" ही खुण गाणे म्हणताना नृत्य करत करत लक्ष्मीछाया फक्त धर्मेंद्रलाच सांगते. मात्र गाण्याच्या पुढच्या ओळी "कुर्ता है नीला, रंग पगडीका पिला" अशा असतात त्यामुळे काही उंट लोक हा वेष केलेल्या भलत्यालाच पकडून त्याची दाढी वगैरे ओढुन पाहतात. वातावरणातील तणाव हळुहळु वाढत असतो. जब्बरसिंगची माणसे देखिल जागोजाग पोलिसांप्रमाणेच पेरलेली असतात. धर्मेंद्रला पोलिस प्रथम ओळखु शकत नाहीत पण तो कोपराने ढोसुन आपली ओळख पटवतो. येथे इन्सपेक्टरचे काम आपल्या सुधीरने केले आहे. तोच तो "हकीकत"मधला "मै ये सोचकर उसके दरसे उठा था" गाणारा सुधीर. गाणे शेवटाला येते, लक्ष्मीछायाच्या आईच्याही चेहर्‍यावर प्रचंड तणाव असतो. शेवटी गाण्याच्याच ओळीत "पिपल के नीचे मेले में सबसे पिछे" हे शब्द येतात आणि धर्मेंद्रची खात्री पटते. तो इन्सपेक्टरला बोटाने खुण करुन जब्बरसिंग कुठे आहे हे दाखवतो आणि बंदुकांचे आवाज सुरु होतात. जत्रेत एकच गोंधळ उडतो. या दृश्यात एखाद्या जंगली श्वापदाला धोक्याची अगोदरच जाणीव व्हावी आणि त्याचे शरीर त्याला तोंड देण्यासाठी तयार असावे अशातर्‍हेने आपली देहबोली विनोद खन्नाने राखली आहे. त्याच्या एकुण हालचाली बारकाईने पाहण्याजोग्या. गाणे संपल्यानंतरची हाणामारी अगदी खरीखुरी वाटावी अशी चित्रित केली आहे. पुढे काय होतं हे येथे सांगण्यापेक्षा पाहणे जास्त चांगले.

लताबाईंचा आवाज हा या गाण्याचा सुरेख आणि अर्थातच सुरेल भाग. बरेचदा एखाद्या दृश्याचे रसायन इतके मस्त जमलेले असते कि कुठल्या गोष्टीचे विवरण आधी करावे कळत नाही. लता नुसती नायिकेला चपखल बसेल असे गात नाही तर वातावरणाराला अनुसरुन गाते हे या गाण्यात अगदी अधोरेखित होते. जत्रा आणि त्यात गाणारी कलावंतिण, अशावेळी आवाजातला नायकिणीचा अवखळपणा लताने बरोबर पकडला आहे. "हाय शरमाऊ" शब्दांवर सुरुवातीला सुरेल करामत केली आहे. प्रत्येक कडव्याच्या शेवटी ही करामत आणखी मजा आणते. आनंद बक्षी हा कलावंत उपेक्षित राहीला असे माझे स्पष्ट मत आहे. मागणीप्रमाणे पुरवठा करणार्‍यांच्या यादीत हा कलावंत ढकलला गेला. खरं तर हे कसबदेखिल महत्त्वाचे आहेच. सिच्युएशनला चपखल बसणारे गाणे आनंदबक्षींनी लिहिले आहे. ते "हाय शरमाऊ" सारखे गाणे ही लिहु शकतात आणि "नमक हराम" मध्ये "मै शायर बदनाम" सारखे जबरदस्त गीत देखिल लिहु शकतात इतकी मोठी रेंज या कलावंताची आहे. तीच कथा लक्ष्मीकांत प्यरेलाल यांची. पारसमणी, दोस्ती सारख्या चित्रपटापासुन सतत सुरेल संगीत देणे सोपे नव्हे. "मेरा गांव मेरा देश" मध्ये वातावरणाला सजेशा चाली त्यांनी दिल्या आहेत. लक्ष्मी छायाचे नृत्यही झकास. "शोले"हा चित्रपट म्हणुन थोर असेल पण माझ्या सारख्याच्या मनात "मेरा गांव मेरा देश" अशा तर्‍हेच्या दृश्यांमुळे घर करुन बसला आहे. कधी कधी वाटतं अशा सार्‍या गोष्टी जमुन आल्यावर त्या वातावरणातला गंध दरवळणे इतकेच बाकी राहते इत़कं ते सारं खरं वाटत राहतं.

अतुल ठाकुर

गाण्याची युट्युब लिंक
https://www.youtube.com/watch?v=Nm7rDfyv_F0

संपूर्ण चित्रपट येथे पहता येईल
https://www.youtube.com/watch?v=x3jFi8Kn9BY

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहीले आहे, माझे आवडते गाणे आणि चित्रीकरणही खासच.
लताची व्हर्सटॅलिटी सांगताना सारखे 'आ जाने जां' किंवा 'कैसे रहूं चूप'चेच का उदाहरण का देतात कोणास ठाऊक, पण 'हाय शरमाऊं' आणि 'दिलबर दिल से प्यारे' सारख्या गाण्यातही ती फार वेगळी गायकी दाखवते.

मला वाटतं "आ जाने जा" चं उदाहरण खास कॅब्रे साठी देत असावेत कारण तो प्रांत आशाबाईंचा आहे Happy

काय मस्त लिहिलेय....

हे गाणे माझेही खुप आवडते. चित्रपट आता आठवत नाहीय. शोधुन पाहावा लागेल परत.

दिनेशदा धन्यवाद. पण कच्चेधागे ची कथा दोन कुटूम्बातल्या सूडाची आहे.

मला वाटते शोले पासुन ते सर्जिओ लिऑनीच्या फिस्ट्फुल ऑफ डॉलर्स पर्यंत त्या तर्‍हेच्या सर्व चित्रपटांचे मूळ हे अकिरा कुरोसोवांच्या युजिंबो / सेवन समुराई मध्ये आहे.

मस्त लिहिलय.

'आ जाने जा' एखाद्या हिंदीचा गंधही नसलेल्या माणसाला त्यातला वाद्यमेळ काढून फक्त ऐकायला (बघायला नाही) दिले तर त्याच्या मनात शांत रसच निर्माण होईल. लताला कॅब्रे म्हणून ते गाणं अजीबात जमलेलं नाहीये. त्या गाण्याची जी काही जादू आहे ती हेलन आणि ल.प्यां.च्या संगीतामुळेच.

कॅब्रे नसला तरी गाव की गोरीच्या तोंडी असलेली ठसकेबाज गाणी लताने अप्रतीमच म्हटली आहेत.

१. बंगली के पिछे
२. सोना लै जा रे
३. दिलबर दिल से प्यारे
४. गोरे रंगपे ना इतना गुमां कर
५. बिंदिया चमकेगी

अशी अनेक उदाहरणे देता येतील.

छान लिहिलंय. अगदी ठेका धरायला लावणारं गाणं आहे.
चित्रपट पाहिलेला नाही. पण गाणं अनेकदा ऐकलं आहे. वर्णनामुळे सगळी सिच्युएशन डोळ्यापुढे सरकत गेली.

विनोद खन्ना + / - दोन्ही भूमिकांमधे आवडतो. त्याच्याबद्दलची मतं एकदम पटली.

माधव, लताची आणखी काही ठसकेबाज गाणी आठवली... दुंगी तेणू रेशमी रुमाल ( प्रेम पुजारी ) हाय हाय दिल की हालत ( जिस देश मे गंगा बहती है ) नैनोवालींने हाय मेरा दिल लूटा ( मेरा साया ) तूम जैसे बिगडे बाबू ( देव आनंद आशा पारेखचा सिनेमा.. आत्ता नाव विसरलो ) हो मोरा नादान बालमा (उजाला ), मेरा नाम है चमेली ( राजा और रंक )...

हेलनच्या आधीही ( जरा जास्त कपड्यातला कॅब्रे होताच ) त्यापैकी काही लताची गाणी, दिल जले तो जले ( टॅक्सी ड्रायव्हर ) आवारा ए मेरे दिल ( रात और दिन )..

अतुल... हेच कथानक पुढे चायनागेट पर्यंत चालले होते ( हा चित्रपट उर्मिला , ममता यांनादेखील आठवत नसेल )

सही लिहिलेय, हटके रसग्रहण, डोळ्यासमोर एकेक बारकावे उभे केलेत.

विनोद खन्ना तुमचा लईच फेव्हरेट दिसतोय. आधीही अमिताभशी तुलना करून झालीय बहुधा.

हा चित्रपट फार पूर्वी लहानपणी पाहिलेला, फारसा आठवत नाही, पण आवडलेला, एकूणच गाणी मस्तच.

चायनागेट .. ( हा चित्रपट उर्मिला , ममता यांनादेखील आठवत नसेल )
>>>>>

कसे शक्यंय, खूप भारी चित्रपट होता. कलाकार तर एकेक दर्जेदार होते..
मसालाटाईप होता पण मी बघितलाय २-३ वेळा ..
त्यातला तो डायलॉगही सही.. मेरे मन को भाया, मै कुत्ता काट के खाया Happy

हाय हाय दिल कि हालत शराबी....दिनेशदा कसल्या जबरदस्त गाण्याची आठवण काढलीत.

बाकी राज कपुरच्या चित्रपटात लताबाई आपला राखीव आवाज वापरतात असं मला उगाचच वाटतं. त्याच्या चित्रपटाची गाणी गाताना लताच्या आवाजात येणारा मधाळपणा वेगळाच.

अतुल, परवा इप्रसारण वर लताच्या आवाजातली, दाग चित्रपटातली लावणी ऐकवली, देखो आया ये कैसा जमाना..

आशा जशी मराठी लावण्यात आवाज फिरवायची, तसाच लताने या लावणीत फिरवलाय.

आणखी एक करामत वसंत देसाईंनी केली होती, अमर भूपाली मधल्या, तूझ्या प्रितीचे दुख मला दावू नको रे, च्याच चालीवर तिच्याकडूनच, बडे भोले हो, हँसते हो सुनके दुहाई, कन्हाई कन्हाई कन्हाई.. असे गाणे गाऊन घेतले होते.
दोन्ही गाणी अर्थातच सुंदर.

ऋन्मेष... त्यात ममता केवळ २ सीन्स पुरती आणि उर्मिला एका नाचापुरतीच होती... ममता तर त्या चित्रपटाचा विषयच टाळायची. ( कारण उर्मिलाच जास्त गाजली होती. )

मस्त लिहीले आहे, माझे आवडते गाणे आणि चित्रीकरणही खासच. >> +१ मस्त लेख. ! विनोद खन्ना जबरदस्त वावरलाय मेरा गांव मधे.

लताची व्हर्सटॅलिटी सांगताना सारखे 'आ जाने जां' किंवा 'कैसे रहूं चूप'चेच का उदाहरण का देतात कोणास ठाऊक, पण 'हाय शरमाऊं' आणि 'दिलबर दिल से प्यारे' सारख्या गाण्यातही ती फार वेगळी गायकी दाखवते. >> सोज्वळ सात्विक ईमेजमूळे ?

काय सुरेख लिहिलंय अतुलराव, वाचताना चित्र उभं राहिलं. प्रतिक्रियांत उल्लेख झालेली गाणीही खासच. काही नवीन आहेत मला, ऐकतो आता.

काय सुरेख लिहिलंय अतुलराव, वाचताना चित्र उभं राहिलं. >> सहमत. मस्त लिहीले आहे. फार पूर्वी पाहिलाय हा चित्रपट. पुन्हा पाहायला हवा.

दिनेशदा, ओके, या अर्थाने म्हणालेलात का...
येस्स उर्मिला जास्त लक्षात राहते.. छम्मा छम्मा गाण्यामुळे .. पुन्हा एकदा यातही, गाण्याची आणि चित्रिकरणाची जादू Happy

दिनेशदा, सुरेख गाण्याची आठवण काढलीत. तुझ्या प्रितीचे दु:ख...

बाकी "चायनागेट" चित्रपट स्टार्सचा नसुन अ‍ॅक्टर्सचा होता. आपल्याकडे असे गुणी चित्रपट चालणे कठिणच.

अतुल...

~ काहीसा उशीरा पाहिला मी हा लेख....अर्थात लेखाच्या शीर्षकानेच स्पष्ट केले की तुम्हाला हे गाणे का आवडले शिवाय चित्रपटही. कलावंतीण गाणे सादर करीत आहे इतकेच त्याचे रुप नसून त्या गाण्यातून तिला काहीतरी इशारे कुणाला तरी पोहोच करायचे आहेत आणि आनंद बक्षी यानी आपल्या लेखणीने ते काम सुरेख केले आहे. लक्ष्मी छायाने अगदी हेलेन, अरुणा इराणी इतके स्थान हिंदी मार्केटमध्ये जरी निर्माण केले नसले तरी आपल्या सहजसुलभ देहबोलीने ती नाचाबरोबर अभिनयही चांगलाच करायची. धर्मेन्द्र आणि विनोद खन्ना दोघांनीही आपल्या भूमिका त्या कथेच्या अनुषंगाने अगदी चोख बजाविल्या होत्या. शोलेसोबत जरी याची चर्चा होत होती तरीही या चित्रपटांनेही अगदी सुवर्णमहोत्सवी यश प्राप्त केले होते.

धर्मेन्द्रला या चित्रपटातील भूमिकेसाठी फ़िल्मफ़ेअरचे बेस्ट अ‍ॅक्टरचे नॉमिनेशन मिळाले होते हे सत्य (मिळाले अर्थात राजेश ख्नन्नाला आनंदसाठी), पण त्याच्या कारकिर्दीत केवळ याच चित्रपटासाठी नव्हे तर त्याहीपूर्वी "फूल और पत्थर" (त्यावेळी देव आनंदने "गाईड" भूमिकेसाठी बाजी मारली होती), नंतर रेशम की डोरी आणि यादों की बारात साठीही नॉमिनेशन्स मिळाली होती...पण ती हुकली.

व्यक्तीशः मला धर्मेन्द्रला "सत्यकाम" साठी फिल्मफेअर अवॉर्ड मिळायला हवे होते असे आग्रहपूर्वक वाटत होते. पण चालायचेच.

आहा.. फेव सिनेमा.. क्या याद दिलाई.. विनोद खन्ना.. द मोस्ट हँडसम खलनायक सो फार!!

लता च्या आवाजा शिवाय इतर कोणत्याही आवाजात हे गाणं इमॅजिन सुद्धा करू शकत नाही..

Pages