सsप्राईज! सsप्राईज!

Submitted by चिमण on 13 January, 2009 - 04:26

मोठा झाल्यावर बापाचं नाव काढणार असं सतत कानावर पडल्यामुळे मी माझं नाव प्रकाश महादेव माटे या ऐवजी प्रकाश माटे असं सुटसुटीत करून टाकलं. नाही. नाही. माझं श्री. म. माट्यांशी काही नातं नाही. काही लोकांना उगीचच नावांची यमकं जुळवायची खोड असते म्हणून आधीच सांगीतलं. तर गु. ल. देशपांड्यांचा पु. ल. देशपांड्यांशी जेवढा संबंध असेल तेवढाच माझा श्री. म. माट्यांशी आहे.

एके दिवशी माझ्या कंपनीनं माझी भारतातून उचलबांगडी करून इंग्लंडच्या एका बारक्या गावात तिथल्या सरकारचं काम करण्यासाठी एक वर्षाकरीता पाठवलं. तीन वर्ष उलटून गेली तरी ते वर्ष संपायचं आहे कारण सरकारी कारभार सगळीकडे थंडच चालतो. असल्या बारक्या गावात कुणी भारतीय असेल की नाही ही मला चिंता नव्हती. भारतीय आणि चिनी माणूस ढेकणासारखा सर्व विश्वात पसरलाय. हे एलियन दुसरे तिसरे कुणी नसून यापैकीच कुणीतरी आहे असा काही शास्त्रज्ञांचा दावा आहे. सांगायची गोष्ट ही की माझी भारतीय माणसाशी भेट लगेचच झाली.

एकदा मी दूध घ्यायला जवळच्या दुकानात घुसलो, दूध घेतलं व पैसे द्यायला काऊंटरवर गेलो आणि दुकानाच्या मालकानं एकदम गुजराथी भाषेत सरबत्ती केली. आधीच माझा गुजराथीचा अंधार व त्यातून एवढा भडीमार ऐकून मी बावचळलो.. दुधाच्या ऐवजी फिनेल घेतलं नाही ना याची खात्री केली.. मग भंजाळलेल्या चेहर्‍यानं त्याच्याकडे बघत राहीलो. मला काही समजत नाहीये हे त्याच्या लक्षात आलं बहुतेक आणि तो गुजराथीत, 'तमे गुजराथी बोलो छो?' असं काहीतरी म्हणाला. मला गुजराथी येतं का हे तो विचारतोय असं लक्षात येऊन मी केविलवाण्या चेहर्‍यानं म्हंटलं "मला नाही गुजराथी येत. मी मराठी आहे". मग आमचं हिंदीत बोलणं सुरू झालं.

नंतर रोजच मी त्या दुकानात जाऊ लागलो. त्याचं नाव संजय देसाई. त्याच्याकडून कळलं की आमच्या गावात कुणी मराठी नाहीत, सगळे गुजराथीच आहेत. तो ७८ साली इथे आला होता. आल्यावर दुकान टाकलं. गुज्जुन्ना नोकरी करण्यात कमीपणा वाटतो आणि आम्हाला धंदा करण्यात! गुजराथमधे नोकरी करणारी माणसं कशी काय मिळतात हा प्रश्ण मला नेहमी पडतो! तो आला तेव्हा लग्न झालेलं होतं, पण बायको तिकडेच होती. बस्तान बसल्यावर तो तिला घेऊन आला. नंतर 'सातार्‍याचा म्हातारा शेकोटीला आला.. म्हातार्‍याची म्हातारी शेकोटीला आली' च्या धर्तीवर त्याची भावंडं आईवडील सासुसासरे इ.इ. सगळे आले. हेच तर गुजराथ्यांच वैशिष्ट्य आहे. एकजण घुसला की तो त्याच्या सगळ्या आप्तेष्टांना खेचतो. म्हणतात ना.. गुज्जुला दिला व्हिसा, गुज्जु घुसले भसाभसा. अहो, खरं आहे. मुंबईच्या अमेरिकन काँसुलेटमधे बघा. तिथल्या पाट्या फक्त इंग्रजी आणि गुजराथी भाषेतच आहेत. प्रत्यक्ष महाराष्ट्राच्या बालेकिल्ल्यात येऊन मराठीचं नाक कापलेलं आहे, आहात कुठं?

संजयला गाण्याची आवड होती. तो गाण्याबद्दल भरभरून बोलायचा. कुठलीशी मीराबाईंची भजनं पहाडी रागात आहेत असं एकदा मला त्यांन सांगीतलं. त्याला काय माहीती की मला 'पहाडी आक्रोश' रागाव्यतिरिक्त इतर कुठलाही राग येत नाही म्हणून! संजयनं मला त्यांच्या गाण्याच्या ग्रुपमधे येण्याचं आमंत्रण दिलं.. माझी गाण्याची धाव बाथरुम पलीकडे गेलेली नाही हे सांगीतलं तरी सुध्दा! ठरलेल्या वेळेला संजयच्या घरी गेलो. संजय व त्याची बायको कांता सोडता कुणीच नव्हतं. संजयनं त्याचा सीडी प्लेयर काढला. त्याच्याकडे हिंदी गाण्यांच्या ढीगभर कॅराओके सीडी निघाल्या. एक सीडी लावून संजयनं त्यातली काही गाणी म्हंटली. छान म्हंटली. आवाज चांगला होता त्याचा, सुरात गात होता, ताना व्यवस्थित मारत होता, बरोबर ठिकाणी गाणं उचलत होता आणि मुख्य म्हणजे यॉडलिंगपण उत्तम करत होता. हळुहळू इतर मेंबर यायला लागले. मेंबर उगवला की प्रथम 'तमे केम छो? हुं सारो छू!' असली छाछूगिरी व्हायची, मग माझी ओळख. ओळख झाल्यावर प्रत्येक जण छू! छू! करत अंगावर यायचा आणि मी छे! छे! करत परतवून लावायचो. एकीकडे कांताबेनच्या ढोकळ्यांचा समाचार घेणं चालू होतं. दुसरीकडे गाण्यांची कत्तल! गाणी न म्हणणार्‍यांची टकळी चालू होती . ते माझ्याविषयीच बोलत असावेत कारण त्यांच्या बोलण्यात मधून मधून 'माटे' असं येत होतं. मी एकदोन वेळा ओ दिली पण त्यांनी दुर्लक्ष केलं. मग माझी ट्यूब लागली. गुजराथी शब्द माटे आणि माझं आडनाव याची मी गल्लत करत होतो, त्यानंतर हाक मारल्यावरसुध्दा मी ओ देईनासा झालो. संजय सोडता बाकी सगळे संगीतातले बेदर्दी - म्हणजे संगीतातले दर्दी नव्हते, त्यामुळे माझी भीड चेपली आणि मी पण २-३ गाण्यांचा बळी घेतला.

नियमित जाऊन जाऊन सगळ्यांची नावं, चेहरे आणि वैशिष्ट्ये याची सांगड डोक्यात बसली. संजय बर्‍याच वेळी तंद्रीत असायचा. त्याचा धंदा कसा चालायचा हे एक कोडंच होतं मला. तो गिर्‍हाईकांना अधनं मधनं कमी जास्त पैसे परत करायचा. कमी मिळाले की गिर्‍हाईकं हमखास लक्षात आणून देत, जास्त मिळाले की बिनबोभाट निघून जात. बहुतेक सगळे मेंबर पन्नाशी उलटलेले होते. फक्त अनुराधा पटेल आणि मीच काय ते तरुणात मोडणारे. अनुराधा सुंदर नसली तरी आकर्षक नक्की होती. किमान मला तरी तसं वाटायचं. किनर्‍या आवाजात निष्कारण लाडिक उच्चार करत गाणी म्हणणं हे तिचं वैशिष्ट्य. 'हाल कैसा है जनाबका' हे गाणं ती 'हालि कैसा है जनाबिका' असं म्हणायची... त्यातल्या 'हालि' तला 'लि' आणि 'जनाबि' तला 'बि' चा उच्चार अगदी सूक्ष्म, त्यातला 'इ' ऐकू येईल न येईल इतपत असायचा. असल्या अघोरी लाडिकपणामुळे ती गाणी म्हणायला लागली की माझा फार मानसिक छळ व्हायचा पण मी तो तिच्या चेहर्‍याकडे बघत सहन करायचो... अनुराधा कशी पटेल याचा विचार करत. माझ्या गाण्याबद्दल न लिहीलेलंच बरं. निम्म लक्ष गाणं कसं होतंय याकडे आणि उरलेलं अनुराधाकडे ठेवल्याने मी हमखास भलत्याच ठिकाणी गाणं उचलतो. आणि पट्टीचं म्हणाल तर शाळेतल्या मास्तरांच्या पट्टीशिवाय इतर कुठल्याही पट्टीशी माझी जवळीक झालेली नाही.

अंजली शहाचा आवाज फार चांगला नव्हता तरी ती गाणी बरी म्हणायची. पण आशा लता रोज घरी पाणी भरतात असा आव असायचा. ती काही शब्दातल्या 'च' चा उच्चार 'छ' असा करायची.. गुजराथी भाषेत 'छ'परीपणा जास्त आहे म्हणून असेल कदाचित. त्यामुळे 'कांची रे कांची रे' मधली 'कांचा रे कांचा रे' ही ओळ कांचीनं शिंकत शिंकत 'कांछा रे कांछा रे' अशी म्हंटल्यासारखी वाटायची. अंजलीला किशोरकुमार आवडत नाही हे ऐकल्यावर तर ती माझ्या मनातून साफ उतरली.

राजेश मेहताला बहुतेक 'श' म्हणता येत नव्हतं, तो 'स' म्हणायचा. तो 'ये साsम मस्तानी मदहोssस किए जा' हे गाणं घेऊन सुटला की सायकलच्या चाकातून हवा सुटल्यासारखं वाटायचं. एक पाय पुढे टाकून गाण्याच्या ठेक्याशी पूर्णपणे विसंगत रीतीने हलवत तन्मयतेने गाणं म्हणणं ही त्याची खासीयत.

आम्ही सगळे कुठल्याही गायक / गायिकेची गाणी म्हणायचो. पण मुकेशची गाणी म्हणायचा आग्रह नेहमी सागर कपाडियाला व्हायचा. 'चांदीकी दीवार ना तोडी प्यार भरा दिल तोड दिया' सारखी हृदयद्रावक, आतड्याला पीळ पाडणारी, काळजाला घरं पाडणारी गाणी त्याच्या होणार्‍या चुकांमुळे एकदम हलकीफुलकी वाटत. तो थोडा मंदमति होता की काय कुणास ठाउक, पण त्याला इतरांच बोलणं पटकन समजायचं नाही. कधी कधी तो सांगितलेल्या गोष्टीपेक्षा भलतच काहीतरी करून बसायचा.. कधी भलतीच सीडी लावायचा तर कधी भलता ट्रॅक.

सगळ्या चुका काही आमच्या संगीताच्या अलौकिक ज्ञानामुळे नाही व्हायच्या. काही निव्वळ परिस्थितीजन्य होत्या. सीडी प्लेयरला असलेलं माईकचं कनेक्शन ढिलं होतं. गाणं चालू असताना मधेच सायलेंसर लावल्यासारखा गायकाचा आवाज गुल व्हायचा आणि नुसतंच ढॅण ढॅण संगीत ऐकू यायचं. काही गाण्यांच्या कॅराओके रेकॉर्डिंगमधे एखादं कडवं कमी असायचं पण सीडीबरोबर आलेल्या कागदामधे सर्व कडवी असायची. कधी नेमकं उलट. त्यात काही गाणी रोमन लिपीत छापलेली, मग ती वाचायला लागणार्‍या वेळामुळे गाण्याच्या लयीबरोबर लपंडाव व्हायचा. बर्‍याच सीडी बरोबर आलेले कागद हरवलेले होते. ती गाणी त्यांनी गुजराथी लिपीमधे लिहून ठेवली होती. अशा गाण्याचा कागद माझ्या हातात आला की मला वेलबुट्टीचं डिझाईन असलेल्या कठड्याकडे बघतोय असं वाटायचं. काही गाण्यांचं कॅराओके मूळ गाण्यापेक्षा वरच्या पट्टीत किंवा दृत लयीत असायचं, ते पकडता पकडता हवा टाईट व्हायची. गाण्याच्या आधी थोडं संगीत असलं तर गाणं कुठं सुरू करायचं याचा थोडातरी अंदाज बांधता यायचा. पण 'कहना है कहना है' किंवा 'ख्वाब हो तुम या कोई हकीकत' सारखी गाणी एकदम सुरू होणारी.. त्यात सागर नेमका चुकीची सीडी नाहीतर ट्रॅक लावणार.. मग 'नैना बरसे रिमझिम रिमझिम' च्या ट्रॅकवर 'कहना है कहना है' म्हणण्याचा अद्वितीय पराक्रम व्हायचा. गाण्यांचा असा खग्रास चिवडा मूळ गायकानं किंवा संगीतकारानं ऐकला असता तर मानसिक संतुलन बिघडून रस्त्यावर केस उपटत फिरला असता.

एक दिवस संजयनं आम्हा सगळ्यांना फोन करून राजेशच्या घरी प्रॅक्टीसला बोलावलं. कांताला ५० वर्ष पूर्ण होणार होती म्हणून त्याला एक सरप्राईज पार्टी द्यायची होती. त्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक. कांताबेन हे आमच्या गावातलं एक बडं प्रस्थ. वेळी अवेळी लोकांना मदत करण्याची वृत्ती व सगळ्यांशी मिळून मिसळून रहाणारी असल्याने सर्व लोक तिला मानायचे. तिच्यामुळेच आमच्या गावात गुजराथी कल्चरल असोसिएशन (GCA) उभे होते. अशा बाईचा ५०वा वाढदिवस साजरा करायला सगळे एका पायावर तयार झाले. त्या दिवशी आपण एक गाण्याचा कार्यक्रम करावा असं संजयच्या डोक्यात होतं. मग कुठली गाणी घ्यायची यावर गोंधळ सुरू झाला. एकानं 'ओ निगाहे मस्ताना' घ्यायला सांगीतलं कारण ते म्हणे संजयनं त्यांच्या हनीमूनला म्हंटल होतं.. ते अर्थातच संजयला आठवत नव्हतं. दुसर्‍यानं 'मेरा जीवन कोरा कागज' सुचवलं कारण त्याचा स्टेशनरीचा धंदा होता. एवढ्या मंडळींनी आपली प्रतिभा उगाळल्यावर जो अर्क तयार झाला तो असा - कांताच्या जीवनावर एक कहाणी लिहायची आणि त्या कहाणीला सुसंगत अशी गाणी मधे मधे पेरायची. हे सगळं तीन आठवड्यांच्या आत करायचं होतं म्हणून मंडळी लगेच कामाला लागली. सोबत राजेशनं आणलेली बिअर होतीच.

कांताला लहानपणापासूनच माणसांची आवड होती. ती शाळेत जायला तासभर आधीच निघत असे. जाता जाता रस्त्यातल्या प्रत्येक मित्रमैत्रिणीला बरोबर घेऊन सगळ्यांची वरात शाळेत जात असे. इथे 'ज्योतसे ज्योत मिलाते चलो' हे गाणं घालायचं ठरलं. गुजराथी मुली त्याकाळी फार शिकत नसल्या तरी कांताला बीए व्हायचं होतं. घरच्यांच्या 'लग्न जमणार नाही अशानं तुझं' या भीतिला भीक न घालता ती युनिव्हर्सिटीत गेली. पण ती दोनदा नापास झाली. इथे 'जिंदगी का सफर है ये कैसा सफर' हे गाणं 'जिंदगी' ऐवजी 'व्हर्सिटी' हा शब्द घालून. शेवटी ती एकदाची बीए झाली. इथे 'आज मै ऊपर आसमाँ नीचे' हे गाणं. नंतर कांतानं एक नोकरी धरली आणि तिथेच तिला संजय बॉस म्हणून भेटला. तिथे दोघंही 'कोई मिल गया' च्या गाण्यावर एकमेकांच्या प्रेमात पडले. पण संजयची आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नसल्यामुळे कांताच्या घरचा विरोध होता. संजयला आईवडीलांच्या परवानगीशिवाय लग्न करणं बरोबर वाटत नव्हतं. त्यान कांताला 'मला विसरून जा' असं दु:ख्खी अंतःकरणानं सांगीतलं. इथे 'मै तो एक ख्वाब हूं इस ख्वाबसे तू प्यार ना कर' हे गाणं 'ख्वाब' ऐवजी 'बॉस' हा शब्द घालून. राजेशच्या बिअरचा परीणाम आता दिसायला लागला होता... 'शूं करे छे' असं बरळून शू करायला जाऊन यायची गति वाढली होती... मग उरलेली कथा नंतर पाडायचं ठरलं.

दुसर्‍या दिवशी परत राजेशच्याच घरी जमलो. संजयच्या घरी जमणं शक्यच नव्हतं. नेहमी प्रमाणे वेळेवर कुणीच आलेलं नव्हतं. त्यानं यावेळेला मल्ड वाईन बनवली होती. लोकाग्रहास्तव त्यानं रेसिपी सांगीतली.. पाण्यात लवंग, दालचिनी, सफरचंदाचे तुकडे असं काहीबाही घालून उकळायचं. नंतर त्यातंच रेड वाईन घालायची आणि आणखी गरम करायचं की झाली मल्ड वाईन. मस्त मल्ड वाईनच्या जोरावर कथा पुढे सरकली... कांताच्या काकांच्या मध्यस्थीनं त्यांच लग्न ठरलं. 'मांग के साथ तुम्हारा मैने मांग लिया संसार' यातल्या घोड्यांच्या टापांवर त्यांच लग्न लागलं. लग्नानंतर काही दिवसांनी संजय इंग्लंडला आला. संजयचं बस्तान बसल्यावर कांता येणार होती. इथं विरह गीताला पर्याय नव्हता. तो मान 'सुहानी रात ढल चुकी ना जाने तुम कब आओगी' ने पटकावला. काही महिन्यानंतर कांता आली आणि ते दोघे सुखाने राहू लागले. 'ये राते ये मौसम नदीका किनारा' या गाण्यानं कथेचा शेवट झाला. एवढी गाणी कमी पडली की काय म्हणून 'ये शाम मस्तानी' च्या चालीवर कांताला वाढदिवसाच्या शुभेच्छा कोंबल्या.

ओ कांताजी जनमदिन मुबारक हो
तुम जियो हजारो साल ऐसी दुवाए है ||धृ||

मां बहन या दोस्त क्या हम कहे आपको
तुमही एक बडा जीसीएका इन्सपिरेशन हो
जिसीए जिये तुमभी जियो ये दुवां हम करेंगे बारबार

असं शब्दांना धोबीपछाड टाकून चालीत कसंबसं बसवलेलं होतं. पहिल्यांदा ऐकल्यावर माझा चेहरा लस्सी समजून चुन्याची निवळी प्यायल्यासारखा झाला. पण काही बोलू शकलो नाही.. गाणं अनुराधानं केलेलं होतं. अजूनही माझ्या कटाक्षांकडे ती कटाक्षानं दुर्लक्ष करीत होती.

पुढचं सगळं भराभरा ठरलं. कार्यक्रम सेंट जोसेफ होलमां ठरवला. कार्यक्रमानंतर खाण्यासाठी महिलांना स्नेक्स बनवायला सांगीतलं. कॉफीची व्यवस्था सागरकडे आली. कार्यक्रमाला काही अंग्रेजी मंडळी येणार होती म्हणून कथा इंग्रजीत सांगायचं फर्मान सुटलं. सगळ्या गाणार्‍यांनी पांढरा शर्ट, टाय आणि काळी पँट घालून यायचं होतं. सागरचा गोंधळ होऊ नये म्हणून ठरलेल्या सगळ्या गाण्यांचं कॅराओके एकाच सीडीवर कथेतल्या क्रमाने आणलं. होता होता समारंभाचा दिवस उजाडला.

समारंभाला सगळे चक्क वेळच्या वेळी हजर होते. मी एकटाच पांढरा शर्ट, टाय आणि काळी पँट घालून आलो होतो. बाकी सगळे कॅज्युअल ड्रेसमधे! इज्जतीचा आणखी पंचनामा व्हायला नको म्हणुन हळुच टाय काढून टाकला. कांता येण्याच्या आधी हॉलमधे फुगे इ.इ. चिकटवण्यास मी अनुराधाला मदत केली. ठरलेल्या वेळी कांता आली आणि 'सsप्राईज! सsप्राईज! हॅपी बर्थडे टू यू' चा गजर झाला. केक कापणं झाल्यावर आमची कथा सुरू झाली. लाकडी स्टेजवरच्या व्हायब्रेशन मुळे सीडी अचानक ट्रॅक बदलून बेगुमानपणे भलतीकडेच धावायची. मग तिच्या मुसक्या बांधून परत जागेवर आणले जायचे. यात संजयचा सायलेंसर आपलं काम अधून मधून चोखपणे पार पाडत होता. प्रेक्षक टाळ्या वाजवून दाद देत होते(?). सर्व भानगडी नंतर कार्यक्रम एकदाचा संपला. सगळे खाण्यासाठी पळाले. खाताखाता लोकांनी माझ्या गाण्याचं कौतुक केलं. ते खोटं बोलताहेत हे माहीत असलं तरी मनाला थोड्या गुदगुल्या झाल्याच. सागरनं कॉफी ऐवजी मल्ड वाईन आणली होती. वाईन पिणारे कमी असल्यानं ती संपवायची जबाबदारी अर्थातच पिणार्‍यांनी घेतली. न पिणार्‍यांना कॉफीची तहान पाण्यावर भागवायला लागली. पिता पिता मी कांताला सरप्राईज पार्टी कशी वाटली ते विचारलं. तिनं हळूच माझ्या कानात सांगीतलं की तिला पार्टीबद्दल माहीत होतं. मला वाटलं संजयनं घोळ घातला असणार. आमच्या कॉलेजमधला एक मास्तर 'पुढच्या सोमवारी मी सरप्राईज टेस्ट घेणार आहे' अशी धमकी द्यायचा तसंच काहीतरी! पण संजयच्या वाढदिवस लक्षात रहात नाहीत आणि मग त्याला वाईट वाटतं म्हणून कांतानं तिच्या बहीणीकरवी संजयला अशी पार्टी करायचं सुचवलं होतं. वर कांतानं 'सांगू नको कुणाला! हे फक्त तुला, मला आणि माझ्या बहीणीलाच माहीती आहे' हेही बजावलं मग मी मल्ड वाईन गिळून गप्प बसलो.

वाईन ढोसता ढोसता अनुराधाला मी तिचं गाणं फार छान झालं असं सांगून थोडा गूळ लावला. तिनं खूष होऊन मला तिच्याबरोबर पिक्चरला यायचं आमंत्रण दिलं. ती जे सांगतेय तो वाईनचा परीणाम नाही याची मी परत एकदा विचारून खात्री केली आणि मनात म्हंटल 'सsप्राईज! सsप्राईज!'

(टीप: या कथेतील पात्रे पूर्णपणे काल्पनिक असून जर कुणाला एखाद्या जिवंत वा मृत व्यक्तिशी साम्य आढळले तर त्याने आपणास बुध्दिभ्रंश झाला आहे असे समजावे)

-- समाप्त --

गुलमोहर: 

खतरनाक्...लै भारी....अरे एवढे चांगले वाचायच कस राहिल माझ्याकडुन ?
एकदम नादखुळा..!!.. Happy

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

अर्रे! मी हे इतक्या दिवसांनी वाचले. खूपच सुंदर.
<<<आणि पट्टीचं म्हणाल तर शाळेतल्या मास्तरांच्या पट्टीशिवाय इतर कुठल्याही पट्टीशी माझी जवळीक झालेली नाही.>>> Lol Lol <<<कार्यक्रमानंतर खाण्यासाठी महिलांना स्नेक्स बनवायला सांगीतलं.>>> Lol Lol

चिमण माझा प्रवास उर्दु सारखा चाललाय , आधी मी अंतिम सsप्राईज वाचला आणि ह्या सsप्राईज! सsप्राईज! विषयी कळलं.
सगळेच पंचेस अगदी बेफाट आहेत. ..

च्यायला हे एवढ उशिरा कसं दिसलं मला ....?
जाम मजा आली.
Proud
Proud
Rofl
Rofl
Rofl

मला पण उशीरच झाला वाचायला..पण खरंच सरप्राईझ होतं...खुप मजा आली वाचुन

Lol

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

सर्वांना धन्यवाद! अचानक या लेखातला इंटरेस्ट जागृत झाल्यामुळे 'सsप्राईज! सsप्राईज'

मस्तच, लय भारी राव!
>>> बापाचं नांव काढणार (?) सुरवातच भारी........

भारतीय आणि चिनी माणूस ढेकणासारखा सर्व विश्वात पसरलाय. हे एलियन दुसरे तिसरे कुणी नसून यापैकीच कुणीतरी आहे असा काही शास्त्रज्ञांचा दावा आहे.

हे खरं आहे.

एकानं 'ओ निगाहे मस्ताना' घ्यायला सांगीतलं कारण ते म्हणे संजयनं त्यांच्या हनीमूनला म्हंटल होतं.. ते अर्थातच संजयला आठवत नव्हतं.
>>> आणि याला कसे आठवत होते Wink
पुर्वी वाचलेली आज परत वाचली मजा आली.

अरे वा! जवळपास एका वर्षानंतर हा लेख जिवंत झाला? धन्यवाद!

>> >>> आणि याला कसे आठवत होते
@ निलीमा, तो फॅमिली फ्रेंड होता त्याचा Wink

ज्या कुणी हे वर आणलं..त्यास धन्यवाद...... Happy

आणि माझ्याकडून इतका सुंदर लेख कसा वाचायचा राहून गेला..म्ह्णून स्वताचीच कान उघाडणी.

खत्तरनाक !! Biggrin Lol :हहगलो:.....हसण्याच्या सगळ्या प्रकाराच्या स्मायल्या कमी पडतील इतका मस्त लेख आहे.
व्वा व्वा !!

धमाल..

अ प्र ति म पंचेस...!
Rofl Rofl Rofl

फक्त कांताबेनच्या वाढदिवस समारंभाचा प्रसंग ताणल्यासारखा आणि बोअरिंग वाटला.

Pages