साहित्य उचलेगिरी आणि त्यावर कारवाई वगैरे ?

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 December, 2014 - 11:45

कालच मला समजले की माझा मायबोलीवर प्रकाशित झालेला "ब्रेक अप % के बाद !!" हा लेख एका बेदुंधलहरी नामक संकेतस्थळावर माझे नाव आणि मायबोलीचा संदर्भ देऊन, पण मला न कळवता, विचारता आपल्याच आवडीने प्रकाशित करण्यात आला आहे. (हे मला कळवल्याबद्दल चेतनजी यांचे आभार) आता याला साहित्यचोरी वगैरे म्हणतात की नाही कल्पना नाही, पण उचलेगिरी म्हणायला हरकत नाही. हे आज माझ्याशी घडले तरी ईतर सर्वांशीही घडत असेलच. तर याला आळा घालण्यासाठी काय करता येईल? किंवा तसा आळा घालणे खरेच गरजेचे आहे का?

कारण कॉपीराईट अ‍ॅक्ट वगैरे उपाय म्हणून ऐकले तर, अरे देवा, आता हे सगळे पण करत बसायचे का असाच पहिला विचार मनात येतो. आणि माझे सांगायचे तर आपले लिखाण कोणीतरी उचलले याचा अर्थ ते चांगले झाले असणार, मूळात या विचारानेच मी आनंदित झालोय, त्यामुळे भांडायची इच्छाच उरली नाही. किंबहुना तिथे भांडून त्रागा करून स्वत:ची डोकेदुखी करण्यापेक्षा या उचलेगिरीत त्यांचा काही फायदा होत असेल तर होऊ दे ना, पण माझे काही नुकसान तर होत नाही ना म्हणत दुर्लक्षून पुढे जाणेच मला योग्य वाटतेय. किंबहुना त्यायोगे आपले लिखाण सर्वदूर पोहोचतेय असाही सकारात्मक विचार करून हा किस्सा खतम करू शकतो.

पण हे माझे विचार झाले, माझ्याद्रुष्टीने बरोबरही असतील, पण सर्वांसाठी नाही, वा माझाही हा अ‍ॅप्रोच चुकत असेल. तर अश्यावेळी इतर काय विचार करतात आणि काय अ‍ॅक्शन घेतात हे जाणून घ्यायचे आहे.

(यासंदर्भात या अगोदर काही उपयुक्त चर्चा घडली असेल तर कोणी लिंक्स दिल्या तरी प्लीज धन्यवाद. मी शोध घेता ब्लॉग्स संदर्भात वगैरे चर्चा सापडली जी माझ्य कामाची वाटली नाही. )

खाली लिंक देतो, कदाचित आणखी कोणाचे लेख सापडावेत
http://www.bedhundlahari.com/literature_read?i=story-breakup_ke_baad

आभारी आहे,
ऋन्मेऽऽष

Group content visibility: 
Public - accessible to all site users

साहित्य उचलेगिरी या गोष्टी चुकीच्या आहेत. आणि चुकीच्या गोष्टीसाठी कारवाई ही व्हायलाच हवी . तुम्हाला कल्पना देउन किंवा तुमची परवानगी घेउन जर का साहित्य प्रकाशीत केले असेल तर ते ठीक आहे.परंतु परस्पर अश्या प्रकारे लेख किंवा साहित्य प्रकाशित करणे चोरीच आहे.याबाबतीत नियम आहेत .मला यातील फार माहीती नाही परंतु ज्यांचे ब्लॉग आहेत ते याविषयी जास्त चांगली माहीती देवु शकतात..
(याचा एक अर्थ असाही होऊ शकतो की तुम्ही लिहिलेल्या साहित्याची चोरी करुन त्या व्यक्तीला ते स्वताच्या नावावर टाकून किंवा ब्लॉग वर टाकुन ती व्यक्ती फायदा करुन घेते जे कोणत्याही प्रामाणिक लेखकासाठी योग्य नाही.)

परंन्तु>>आळा घालणे खरेच गरजेचे आहे का? >> हो , कारण उचलेगिरी असे प्रकार चुकीचे आहेत,त्याला आळा घालणे गरजेचे आहे.. हेही कॉपीराईट कायद्यानुसार योग्य आहे.कारवाई करणे न करणे हे तुमच्या वर डिपेंन्ड आहे.

>>किंबहुना त्यायोगे आपले लिखाण सर्वदूर पोहोचतेय असाही सकारात्मक विचार करून हा किस्सा खतम करू शकतो.>>हे च योग्य वाटतय. कारण त्या संकेतस्थळावर त्याने ऋन्मेऽऽष चे नाव आणि मायबोलीचा संदर्भ देऊन
प्रकाशित केले आहे. कदाचित तो ऋन्मेऽऽष ला संपर्क करु शकला नसेल.

एक गोष्टतर सिध्द झाली ऋन्मेऽऽष छान लिहतो.अभिनंदन.

बेफिकीर,
लिंकबद्दल धन्यवाद, तेथील अजय यांच्या पोस्टमध्ये बर्‍याच प्रश्नांची उत्तरे मुद्देसूद मिळाली.

सिनी,
कोणी आपले नाव टाकून लेखन चोरले असते तर मग नक्कीच आयुष्य खडतर केले असते त्याचे, पण साहित्यचोरीबद्दल नाही तर अश्या उचलेगिरीबद्दल काय करावे, करायची कितपत गरज, ते सुद्धा स्वताला त्रास वा मनस्ताप करून न घेता हे सर्वात महत्वाचे. मुळात (माझे) लिखाणच आनंदासाठी असते, आणि तोच मिळायचा बंद झाला तर काय फायदा.

उचलेगिरीबद्दल काय करावे, करायची कितपत गरज, ते सुद्धा स्वताला त्रास वा मनस्ताप करून न घेता>> उचलेगिरी करणार्या व्यक्तीला समज देणे किंवा कारवाई करणे यात मनस्ताप झाला , तरी प्रॅक्टीकली ते योग्यच ठरते . प्रत्येक लेखकाचे लिखाण ही त्याची स्वतःचा ऐवज (प्रॉपर्टी)असतो आणि त्यालिखाणाची पुर्ण जबाबदारीही लेखकाची असते त्यामुळे इतर कोणी उचलेगिरी करुन लिहिणाराही त्या लिखाणाच्या चांगल्या वाईट परीणामांना तीतकाच जबाबदार ठरु शकतो .त्यामुळे उचलेगिरी करणारया व्यक्तीला समज देणे योग्य आणि कायदेशीर आहे.

त्या वेबसाईटची लिंक द्या ना. आणखी कुणाचे लेख वगैरे चोरले असतील तर सर्वांनी मिळून कारवाई करणे शक्य होईल.

तुमचे नाव आणि तुमच्या मायबोलीवरच्या लेखाची लिंक दिली असेल तर फार गैर आहे असे मला वाटत नाही. जर तुम्हाला वैयक्तिकरित्या ही गोष्ट खटकली असेल तर आपल्या लेखात लिखाणाच्या आधी अथवा नंतर 'हे लिखाण केवळ मायबोलीवर प्रसिद्ध केले आहे इतर ठिकाणी प्रकाशित करण्यासाठी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक' अशा अर्थाचे एक वाक्य घालत जा.
And be happy! Your writing is getting popular Happy What else does an amateur writer want?

'हे लिखाण केवळ मायबोलीवर प्रसिद्ध केले आहे इतर ठिकाणी प्रकाशित करण्यासाठी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक' अशा अर्थाचे एक वाक्य घालत जा. >>

असे वाक्य नसेल तर अनधिकृतपणे कुठेही प्रकाशित करण्याचा हक्क ग्राह्य समजायचा का ?

तुमचे नाव आणि तुमच्या मायबोलीवरच्या लेखाची लिंक दिली असेल तर फार गैर आहे असे मला वाटत नाही. <<<< नाही. तरी परवानगीशिवाय कुणाचाही लेख प्रसिद्ध करणे पूर्णपणे चुकीचेच आहे. द्यायचेच असेल तर केवळ मायबोलीवरच्या लेखाची लिंक देणे संयुक्तिक. नुसते नाव देऊन कुणाचेही लेखन ढापणेच असते. याआधी मायबोलीवरचा लेख परस्पर वर्तमानपत्रांमध्ये छापणे वगैरे प्रकार झालेले आहेत. त्यामुळे असे प्रकार दिसताक्षणी थांबवणे गरजेचे.

याआधी माझे दोन तीन लेख फेसबूक आणि ब्लॉगस्पॉटवर स्वतःच्या नावानं खपवले होते तेव्हा मी फेसबूक आणि गूगल दोन्हीकडे तक्रार केली होती. फेसबूकने ते कंटेंट ताबडतोब काढून टाकले. गूगलने महिन्याभरानंतर का होइना, पण कंटेंट काढून टाकल्याचा रीप्लाय केला होता. त्यावेळी अजय आणी चिनूक्स यांनी व्यवस्थित मदत केली होती. मायबोली लेखकांच्या प्रताधिकाराबद्दल कायमच जागरूक राहिलेले आहे.

नंदिनी यांच्याशी सहमत, जे गैर ते गैरच. माझ्याही मनात पहिला विचार हाच आला होता की अरे हि काय फालतूगिरी आहे, असा कसा लेख डायरेक्ट उचलला.
त्याचबरोबर जिज्ञासा म्हणतात ते (ईंग्लिश वाक्य) सुद्धा सध्या माझ्या द्रुष्टीने बरोबरच आहे, तुर्तास तरी मी तसाच विचार करून आहे.
पण हे आणिक काही वेळा किंवा वारंवार घडले तर मात्र मी असाच विचार करू शकेल का याबाबत शंका आहे, बघूया किमान तिथे त्यासंदर्भात तशी पोस्ट टाकणे गरजेचे.

खाली लिंक देतो, कदाचित आणखी कोणाचे लेख सापडावेत
http://www.bedhundlahari.com/literature_read?i=story-breakup_ke_baad

आपला मायबोलीकर मिल्या याने लिहिलेल्या कविता/ विडंबने ही दुसर्‍याच्या नावाने वा बिनानावाने फॉर्वर्डस म्हणून फिर फिर फिरलेली आहेत. अजूनही फिरत असतील त्यामानाने नाव देऊन उचलले हे कमी त्रासाचे आहे.

आजकाल लेखन्चौर्य हा प्रकार मी शांत चित्ताने पाहू शकेन इतपत माझी बढती झालेली आहे.
मागच्या वर्षी न्यू एयरचा मीच लिहिलेला मेसेज मलाच फॉरवर्ड्स मधून आला आणि हा मी लिहिलाय सांगितल्यावर गप्पे काही पण असा शेरा मिळाल्यापासून मी संतमोडात!
आता कशाचे काही वाटत नाही.

असो!

बाकी ऋन्मेषची लेखन्चौर्याबद्दलची मते (माझं लेखन चोरावं इतकं भारी आहे हे बघुन मला आनंद झाला वगैरे) कोणाशी तरी मिळती जुळती आहेत नाही Wink
ओळखा कोण Wink

आत्ता कविता पण पाहील्या. एकही धड नाही. ईमेल मधे फॉर्वर्ड्स येतात त्या टाईपच्या आहेत सर्वच्या सर्व. एकंदरीतच त्या साईटची आवड निवड लक्षात येते. दर्जेदार लिहीणा-यांनी काळजी करण्याची गरज नाही (सन्माननीय अपवाद सोडून).

एकदा नेटवर काही टाकलं कि ते सार्वजनिक झालं, याच भावनेने आता बघावे लागेल. माझा तरी हाच दृष्टीकोन असतो.

काही लेखक ( अगदी मायबोलीवरचेही ) इतरत्र पोस्ट केलेले लेखच इथेही पोस्ट करतात. त्याबद्दल त्या वेबसाईटचा उल्लेख करावा अशी विंनति केली तरी नजरेआड करतात.

मला माग्लंदर्शन हवं आहे.....
कपृया.....

मीच वेगळ्या नावाने एखादी वेबसाईट काढली त्यावर माझाच इथला लेख उचलून समजा टाकला आणि माझे लेखन चोरले हो अशी हाळी मारत त्याची रिक्शा फिरिवली तर प्रेताधिकार कायद्याचा भंग होऊ शकेल का? एक कायदेशीर पण भा.प्र.

रुन्म्या ... अभिनंदन ... तुमचे लिखाण चोरीच्या लायकीचे आहे हे तरी सिद्ध झाल्रे ... आता तुम्हाला इथे टाकून बोलणार्यांना तोंड लपवायला जागा नाही ... पु ले शु ..

प्रेताधिकार ......असतात?
<<
हो.

प्रेतालाही कायदेशीर अधिकार असतात.

अतृप्त आत्मा.. येस्स.. तरीच मै बोल्या ये नाम जानापैचानासा लगताय, पाहिलेले आपलेही नाव तिथे.

या धाग्यावरच्या एका प्रतिसादात चोरीला गेलेल्या लेखनाची यादीच आहे.
पुढचं नाव वाचून ब्रह्मांड आठवले.

http://purandarchawaghsardar.blogspot.in/2010/07/blog-post.html या ठिकाणी माझ्या ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.... प्रश्नोत्तरातून सुसंवाद या पुस्तकाची लेखमाला उपक्रमवर प्रसिद्ध झाली होती ती जशीच्या तशी उचलली आहे. ही ती उपक्रमाची लिंक http://mr.upakram.org/node/1065 माझे व उपक्रमाचे नाव या ब्लॉगकर्त्याने त्यातून वगळले आहे. मला न विचारता मूळ संदर्भ न देता अशी स्वतःच्या ब्लॉगवर टाकणे याला साहित्यचोरी म्हणायचे का? माझ्यामते ही चोरीच आहे पण मी हा जो कोणी ओंकार पुरंदरे नावाचा पुरंदरचा वाघ सरदार आहे त्याच्याकडे मी दुर्लक्ष केले. त्याने आपला ईमेल ही ब्लॉगवर दिलेला आहे. पण मी संपर्कही केला नाही. हा ब्लॉग वाचणार्‍याचा समज होतो की हे ओंकार पुरंदरे यांनी लिहिलेले आहे. लेखकाचे व संकेतस्थळाचे नाव देउन जर त्याने ब्लॉगवर न विचारता जरी टाकल असत तर मला ते खटकल नसत. जाउ देत आपला विचार तर लोकांपर्यंत पोहोचतो आहे ना? असा विचार मी केला.

खर तर हे पुस्तक मी लोकांना डाउनलोड करुन घेता याव म्हणून http://www.arvindguptatoys.com/arvindgupta/jyotishakade%20janypurvee.pdf या ठिकाणी ठेवले आहे. यावरुन अनेकांनी ते आपल्या साईटवर डाउनलोड करण्यासाठी ठेवले आहे.कारण ते आता आंतरजालावर खुल आहे. बाजारा॑तील आवृत्त्या संपल्या आहेत. अंनिस मधे ते दोन भागात पहिली आवृत्ती पुस्तिका स्वरुपात उपलब्ध आहे. तिथेही त्यांनी त्याच नाव मला न विचारता बदलल आहे. असच पोलिस टाईम्स सारख काहीतरी सनसनाटी ठेवल आहे. पण मी फार दखल घेत नाही. दाभोलकरांना अंनिस ने पुस्तक प्रकाशित करायची परवानगी दिलेली होती.

प्रकाश घाटपांडे, मला वाटते आपल्याकडे अजून लोकांना इंटलेक्चुअल प्रॉपर्टी बद्दल फारसे माहित नाही. त्यामुळे व्हाट्सअप, फेसबुक, ब्लॉग इत्यादी ठिकाणी सर्रास गोष्टी कॉपी-पेस्ट केल्या जातात. ते करणाऱ्यांना विचारले की ते तुम्ही लिहिले आहे का, तर बऱ्याच वेळा ते प्रांजळपणे 'नाही, मी ते कॉपी पेस्ट केले आहे', 'अमुक अमुक ने मला पाठवले ते मी सर्वांसाठी इथे टाकले' - अशी उत्तरे देतात. खरे तर ही कारणे अजिबात त्यांना कॉपी करण्याचा अधिकार देत नाहीत, त्यामुळे ती चोरीच आहे. पण ते चोर 'ही चोरी आहे' या गोष्टीपासूनच अनभिज्ञ आहेत.

माझी तुम्हाला विनंती आहे, की ओंकार पुरंदरे यांना आणि अश्या कॉपी करणाऱ्यांना कृपया 'हे माझे लेखन प्रताधिकार-प्राप्त आहे, त्यामुळे प्रताधिकार उल्लंघन टाळण्या-करीता कृपया मूळ लेखकाचे नाव, प्रकाशन व प्रकाशनाचे वर्ष (अथवा वेब-लिंक) लेखासोबत द्यावी' - असा संदेश पाठवावा. तुमचे लेखन श्रेयाशिवाय तिथे राहू देण्यास तुमची हरकत नसली, तरी अश्यांना मूळ स्रोत, श्रेय वगैरे गोष्टींबाबत साक्षर करणे गरजेचे आहे. कारण तुमचेच नाही तर इतर लेखकांचे लेखनही असे लोक कॉपी करतात. त्यापासून परावृत्त करण्यासाठी आपण काही हातभार लावावा असं मला वाटतं. (स्वतःच्या लेखाबद्दल 'हे माझे लेखन आहे, श्रेय द्या' - वगैरे सांगणे ऑकवर्ड वाटते, पण योग्य शब्दात सांगितले तर चांगला परिणाम होतो असा अनुभव आहे. उगाच 'कारवाई करीन' वगैरे धमक्या देऊन जे होत नाही, ते प्रेमाने सांगण्याने होते.)

चोरट्यांचा कस तरी बघा,
भरत यांच्या ब्रह्मांडावरुन "चोर तो चोर वरुन शिरजोर" आठवले.