निर्णय

Submitted by सुपरमॉम on 8 January, 2009 - 12:31

डोळ्यावरचं वर्तमानपत्र बाजूला करत नानासाहेबांनी मनगटावरच्या घड्याळाकडे बघितलं. चक्क सकाळचे अकरा वाजले होते. भिवानं आणलेला चहा समोरच्या टीपॉयवर ठेवल्या ठेवल्याच गार झाला होता. हलकीशी सायही जमून आली होती त्यावर. बाजूलाच एका बशीत सुबक चिरलेली फळं नि थोडा सुका मेवा होता. निरुत्साहानंच त्यांनी ती बशी बाजूला सरकावली नि तो गारढोण चहा तोंडाला लावला. एरवी असा चहा नजरेसमोरही येऊ दिला नसता त्यांनी... पण या सहा महिन्यात सार्‍याच गोष्टींच्या व्याख्या बदलल्या होत्या...

एक मोठा सुस्कारा टाकत त्यांनी दिवाणखान्यावर नजर फिरवली.

सुमित इंडस्ट्रीजच्या वैभवाच्या खुणा सगळ्या वस्तूंवर दिसत होत्या. मध्यभागी महागडा सोफासेट, खोलीच्या या टोकापासून ते त्या टोकापर्यंत पसरलेले मखमली गालिचे, जागोजागी विराजमान झालेल्या छोट्या घडवंच्यांवर ठेवलेले उंची पुतळे, पुष्पपात्रं... नि हवेवर लहरणारे सुरेख पडदे...

या सार्‍या ऐश्वर्याला गालबोट लावल्यासारखं....खोलीच्या मुख्य भिंतीवर उदासवाणं दिसणारं सुमितचं...त्यांच्या थोरल्या मुलाचं छायाचित्र..चंदनी हार घातलेलं....

सुमितच्या हसर्‍या, रुबाबदार चेहर्‍यावरून मोठ्या कष्टानं नजर वळवीत त्यांनी भिवाला हाक दिली...
'भिवा, अरे भिवा....'
आतल्या खोलीतून भिवा धावतपळतच आला.
'काय मालक? च्या गरम करून आनू का?'
'नको.. सुनंदा काय करतेय?'
'देवघरात हायेत...बलावू का?'
'नको नको... जा तू...'

भिवा जरा अनिच्छेनंच मागे वळला.

नानासाहेब पुन्हा विचारात गढून गेले.
इतकं हसतंखेळतं घर...जणू कोणाचीतरी नजर लागावी तशी उलथापालथ झाली होती गेल्या सहा महिन्यात. नवीनच घेतलेल्या गाडीतून सहज फेरफटका मारायला म्हणून सुमित बाहेर पडतो काय नि कोपर्‍यावरच्याच मोठ्या वळणावर एक ताबा सुटलेला ट्रक त्याला उडवतो काय.. ती वाईट्ट बातमी ऐकताच किंकाळी फोडून बेशुद्ध झालेल्या पत्नीचं सांत्वन करावं.. की नातवाला छातीशी धरावं.. की उरात दाटून येणारे उमाळे आवरावे... काहीच कळेनासं झालं होतं नानासाहेबांना.

हं... काय करावं हे अजूनतरी कुठे कळतंय आपल्याला? भरला संसार.. नुकती चाळीशी ओलांडलेली पत्नी नि बारा वर्षांचा कोवळा सौरभ मागे सोडून गेला सुमित... नि कितीतरी प्रश्न अनुत्तरितच ठेवून गेला. गेल्या वीस वर्षात त्याच्या प्रयत्नानं केवढा विस्तार झाला होता कारखान्याचा...

नानासाहेब देशपांडे म्हणजे सुमित इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा... मोठं प्रस्थ.... ऐन पंचविशीतल्या सुमितला... मोठ्या मुलाला हाताशी घेऊन काढलेला कारखाना आता चांगलाच नावारूपाला आला होता. अनेक अवाढव्य उद्योग नि कारखान्यांत रूपांतर झालं होतं त्याचं..

नानासाहेबांना तीन मुलगे. थोरला सुमित.. मधला सलील नि धाकटा संजय... पैकी फक्त सुमितच खर्‍या अर्थानं हाताशी आला होता त्यांच्या. मधला सलील कॉलेजमधे असल्यापासून संगीत विषयात रस घेणारा... नानासाहेबांच्या इच्छेविरुद्ध गाणं शिकला होता तो. तेव्हा खूप विरोध होता नानासाहेबांचा तरी जिद्दीनं संगीतातच करियर केलं होतं त्यानं... नि त्यात बर्‍यापैकी यशस्वीही झाला होता तो. मोठमोठ्या शहरात त्याचे कार्यक्रम होत.... पेपरमधे फोटोही येत..

धाकटा संजय अमेरिकेतच उच्च शिक्षण घेत होता. त्याच्याकडूनही नानासाहेबांना फार आशा नव्हत्याच. आपण तिकडेच स्थायिक होणार असल्याचं त्यानं मागेच प्रामाणिकपणे नानासाहेबांना सांगितलं होतं. मुलं सगळीच उच्च विद्याविभूषित, सद्गुणी असली तरी एकट्या सुमितनंच व्यवसायाची धुरा सांभाळली होती.

अशात सुमितच्या अपघाती मृत्यूनं सगळ्याच स्वप्नांचा चुराडा झाला होता. नानासाहेब तर भान हरपल्यासारखंच वागत होते तेव्हापासून. त्यांची पत्नी...सुनंदा त्यामानानं लवकर सावरली होती. फक्त तिचं बोलणं मात्र कमालीचं आटलं होतं गेल्या काही दिवसात...

'ऐकलंत का...'

सुनंदा दारात उभी राहिली तसे केवढ्यानं दचकले नानासाहेब.

'काय म्हणतेस...'
स्वतःच्या आवाजातल्या यांत्रिकपणाने त्यांनाच कसंतरी झालं..

'कल्याणी माहेरी जायचं म्हणतेय काही दिवस...'

'कल्याणी?...'
काहीच न उमजल्यासारखे ते बघतच राहिले.
'हो.. सौरभलाही घेऊन जायचं म्हणतेय...'

मनावरच्या दुखा:चे सारे पापुद्रे भराभर उलगडत जावे तसं काहीसं झालं नानासाहेबांना...
इतके कसे स्वार्थी झालोत आपण? त्या पोरीचा कसा विसर पडला आपल्याला? आपलंच दुखः कुरवाळत, पोसत बसलो... या सहा महिन्यात तिची काय अवस्था झाली असेल हा विचारही डोकावला नाही आपल्या मनात...गेल्या पंधरा वर्षात तिला सासरा असून बापाची माया दिली आपण... नि याच वेळी ती जबाबदारी कशी विसरलो?

वयाचं भान विसरून ते ताडकन उभे झाले. नि परत तसेच खाली बसले.

कोणत्या शब्दात सांत्वन करायचं पोरीचं? जमेल आपल्याला?

त्यांच्या मनातले विचार ओळखल्यासारखी पत्नी हळूच त्यांच्या शेजारी येऊन बसली.

' किती दिवसांनी माणसात आल्यासारखे दिसताय तुम्ही.'

'असं किती दिवस चालणार? अहो धीर धरावा लागेलच तुम्हाला. कारखान्यांचं कामही रेंगाळायला लागलंय आता... अन त्या पोरीशी बोला जरा... धीर द्या तिला. तुम्हीच असे हातपाय गाळून बसलात तर तिनं कुठे जायचं? आठवतं तुम्हाला.. ती या घरात नववधू म्हणून आली तेव्हा तिला जवळ घेऊन तुम्ही म्हणाला होतात,..'बेटा, तुझे वडील नाहीत असं यापुढे मुळीच वाटू द्यायचं नाही. '... नि आता तुम्हीच असे खचून जाता? तिच्याकडे तर बघवत नाहीय मला..कुठे मन गुंतवायचं त्या पोरीनं? सौरभसाठी उसनं अवसान आणून आयुष्य काढतेय ती..'

'काय करू ग... सुमित सारा जीवनरसच सोबत घेऊन गेलाय माझा...'

नानासाहेबांच्या डोळ्यांतून आसवांची एक लड निखळली.

'सगळं कळतं मला.. पण असं होऊ द्यायचं नाही. अहो.. जंगलातल्या हत्तींचा कळप...त्यातलं एक पिल्लू वाघ ओढून नेतो. पण दुखः करत बसायलाही सवड नसते त्या गजराजाला. बाकीच्या कळपाचं रक्षण जिवात जीव असेपर्यंत करायचं असतं त्याला.. तीच भूमिका जगायची आहे तुम्हाला शेवटपर्यंत...'

नानासाहेबांनी पत्नीच्या हातावर अलगद आपला सुरकुतलेला हात ठेवला.

'किती सोप्या शब्दात सगळं सांगते सुनंदा..' त्यांच्या मनात आलं..

'का ग... कल्याणीच्या पुनर्विवाहाचं... म्हणजे बोलून बघायचं का?'

'कालच बोलले मी तिच्याशी...'
सुनंदाचा चेहरा गंभीर होता.

'तिनं ठाम नकार दिलाय. म्हणाली, 'आता पुन्हा डाव मांडायची या वयात मला इच्छाही नाही नि गरजही नाही. सुमितच्या आठवणी नि सौरभचा भविष्यकाळ सोबत घेऊन पुढची वाटचाल करीन मी....या घरची सून म्हणून आले ते आता लेक म्हणून राहीन..इतकंच..'

'मी बोलून बघू का?..'

स्वतःच्या प्रश्नातला फोलपणा नानासाहेबांना ठाऊक होता. कल्याणीच्या निश्चयी स्वभावाची ओळख त्यांना यापूर्वीच कित्येकदा झाली होती.

मनाशी कसलासा विचार करत ते उठले.

'ठीक आहे. रात्रीची जेवणं झाली की माझ्या स्टडीमधे ये तू... बोलू जरा आणखी...'

त्या रात्री नानासाहेब नि सुनंदाबाई कितीतरी वेळ स्टडीरूममधे बोलत होते. दिवा बराच वेळ जळत होता.

दुसर्‍या दिवशी तातडीने फोन करून नानासाहेबांनी दोन्ही मुलांना बोलावून घेतलं. सलील लगेच आला.. संजय थोडा उशिरा.. चार दिवसांनी.

संजय आल्याच्या दुसर्‍या दिवशी सकाळी सुनंदाबाईंनी कल्याणीला तयार व्हायला सांगितलं. नानासाहेब मात्र सकाळपासून फोनवरच बोलत होते.

'कुठे जायचंय आई?'

'सांगते नंतर....जरा ती गुलाबी चंदेरी साडी नेस...'
कल्याणीनं जरा चमकूनच पाहिलं पण ती जास्त बोलायच्या मनस्थितीत नव्हती.

सगळं कुटुंब तयार झाल्यावर नानासाहेबांच्या आदेशाप्रमाणे ड्रायव्हरनं मोठी गाडी बाहेर काढली. गाडी कारखान्याच्या आवारात उभी झाली तसं कल्याणीला अजूनच आश्चर्य वाटलं...

सगळे मिळून नानासाहेबांच्या केबिनकडे गेले. केबिनचं दार नानासाहेबांनी ढकललं मात्र... आतल्या विशाल गोलाकार मेजाभोवती बसलेले कारखान्याचे इतर वरिष्ठ अधिकारी अदबीनं उभे राहिले.

गोंधळलेल्या कल्याणीला हाताशी धरून नानासाहेबांनी त्यांच्या खुर्चीजवळ आणलं.

'ह्या माझ्या थोरल्या सूनबाई... आजपासून कारखान्याची जबाबदारी मी त्यांच्यावर सोपवली आहे. मी त्यांच्या पाठीशी आहेच सदोदित.. पण मला आपण सर्वांनी जो मान नि जे सहकार्य दिलंत ते त्यांनाही द्यावं ही माझी अपेक्षा आहे..'

बावरलेल्या कल्याणीनं सुनंदाबाईंकडे पाहिलं. त्यांच्या एका डोळ्यात हसू नि एका डोळ्यात आसू होते.

कल्याणी खुर्चीत बसली तसा सलील झटकन तिच्या पायाशी वाकला. संजयनंही त्याचंच अनुकरण केलं.

गेले सहा महिने झुकलेले नानासाहेबांचे खांदे आज पूर्वीसारखेच ताठ उभे होते.

-समाप्त.

गुलमोहर: 

ओहो! सुरेख, सुमॉ!
वाचायला सुरूवात केली काय आणि संपलीही गोष्टं. अगदी खर्र खर्र सांगायचं तर.... गोष्टीचा नुस्ता गोषवारा वाचल्यासारखं अपुरं वाटलं. तुझं लिहिणं वेधक आहे, सुमॉ.... त्यामुळेच, अजून विस्ताराने वाचायला आवडलं असतं... असा स्वार्थी विचार!

ह्म्म, दादशी सहमत. लवकरच संपल्यासारखी वाटली..
जमलं तर वाढव ना..

छान जमलंय... पण माझंही मत , अजुन वाढवलस तर चालेल.
--------------------------------------------------------------------------------

ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

कधी संपली कळालंच नाही, पण संपु नये वाटत होती एवढे नक्की !

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

कळत नकळत ?????

==================
वाटेवर काटे वेचीत चाललो
वाटले जसा फुलाफुलात चाललो

मस्त कथा.
......................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

मलाही कळत नकळत या मालिकेची आठवण झाली.
Happy

व्वा, थोडक्यात पण बरच काही! सुरेख! Happy
वाढवली नाही तेच बरे केले, म्हणजे इम्पॅक्ट नीट होतो! (बर्‍याच गोष्टी वाचकान्च्याही विचार/कल्पना शक्तिवर सोपविल्या जातात, अन तेच या कथासुत्राच यश हे)
अन वाढवायच म्हणजे काय करायच? जस काय तिला गुलाबी साडी नेसायला सान्गितल्यावर, लगेच घाला लिटरभर पाणी अन वाढवा आमटी, तस, फिरवुन आणा तिला गुलाबी रन्गाच्या, साडीच्या नि इतर अशा बर्‍याच आठवणीत, पाssssर दाखविण्याच्या कार्यक्रमापर्यन्त मागे न्या, थोड रडवा, थोड हसवा..... हाय काय अन नाय काय! अशा पद्धतीने वाढवत नेल्यास शेवट कधी सापडणारच नाही!
शेवटी ही एक गोष्ट आहे! कथा आहे! मर्यादाशीर! थोडक्यातच बराच आशय सान्गत आटपली पाहिजे
ही काय कादम्बरी हे का? की आत्मवृत्तान्त? की चरित्रकथन? त्या प्रकारान्ना किलो किलोच्या हिशेबाने मजकुर भरावा लागतो! Proud (गेलाबाजार, अगदी माझ्या स्वगतात देखिल वजनाच्या हिशेबाने छटाक दोन छटाक मजकुर अस्तोच अस्तो! Lol )
बाकी हे आपल माझ मत बर का!
सुमॉकडून जास्तीची अपेक्षा असण वाईट नाही, पण या कथाप्रकारात ते योग्य नाही! Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु

छान आहे कथा... आवडली.

सुमा,

शलाका आणि लिम्बुटिम्बु या दोघांच्याही मताशी मी सहमत आहे. आता तू म्हणशील दोघांची मते वेगळी आहेत. मला काय म्हणायचं आहे, ही कथा 'रचलीय' ती लघुकथा म्हणून; पण तुझी प्रवृत्ती वर्णनात्मक / शब्दचित्रात्मक आहे. त्यामुळे ही कथा त्रोटक वाटते. आणखी दोन प्रसंग वाढवून (ती माहेरी जाते; तिथलं भावांचं तुटक वागणे वगैरे, इकडे नानासाहेबांनी सखोल केलेला विचार वगैरे) नंतर मग फॅक्टरीच्या चाव्या सुनेच्या हातात दिल्या असत्या तर कदाचित जास्त परिणामकारक कथा झाली असती.

शरद
.............................
"मैं क्यों उसको फोन करूं?
उसके भी तो इल्म में होगा; कल शब, मौसमकी पहली बारिश थी!" 'परवीन शाकर'
............................

सुपरमॉम, सुंदरच झालीये कथा.

आणखी दोन प्रसंग वाढवून (ती माहेरी जाते; तिथलं भावांचं तुटक वागणे वगैरे, इकडे नानासाहेबांनी सखोल केलेला विचार वगैरे) नंतर मग फॅक्टरीच्या चाव्या सुनेच्या हातात दिल्या असत्या तर कदाचित जास्त परिणामकारक कथा झाली असती.>> पण त्यामुळे मुळात निश्चयी असलेल्या कल्याणीची असहाय्य, अबला नारी झाली असती की!

छान.
अतिशय योग्य निर्नय वतल.
पुरेपुर आन्दि आनि सह्मत आहे मि तुजशि.