चकवा !

Submitted by कवठीचाफा on 6 January, 2009 - 10:49

" ओह, नो यार, नॉट अगेन!" वैतागुन हातातले पुस्तक टाकुन देत तन्मय उठला. म्हणजे त्याला तसं उठावच लागलं बॉसने हाक मारल्यावरही ढिम्म बसुन रहाणे निदान खासगी नोकरीत तरी शक्य नसते ना ! त्यात तन्मयचा बॉस म्हणजे बाप रे बाप ! आगदी त्याच्याच भाषेत सांगायचं तर पक्का खडूस म्हातारा. आणि त्याने बहुदा तन्मयला शांत बसु न देण्याची शपथ घेतली असावी. मनोमन शिव्या घालत का होईना पण नाईलाजास्तव तन्मयने ‘संपादक’ असे लिहीलेल्या दरवाजाची मुठ फ़िरवली.

तन्मय एका खाजगी वर्तमानपत्रात पत्रकारासाठी उमेदवारी करत होता. त्या बाबतीत त्याचा नाईलाज होता. कारण कुठल्याही प्रसिध्द वर्तमानपत्राच्या पत्रकारपदी त्याला विना अनुभव नोकरी मिळाली नसतीच. शेवटी सगळ्या इच्छांचा गळा आवळत त्याने इथे नोकरी पत्करली. इथे जॉईन होतानाच त्याच्या मनात पत्रकार या पदाबद्दल खुप काही अफ़ाट असे वाटत होते. पण भ्रमनिरास व्हायला कितीसा वेळ लागतो? आठव्या रस्त्यावरच्या चौथ्या ब्लॉक मधल्या कुणा विशाल महीलेचा कुत्रा हरवल्याच्या बातमीपासुन ते आगदी भारत पाकिस्तान वन डे मॅच न प्रत्यक्ष न पहाता त्याचा वृत्तांत देण्यापर्यंत त्याच्या कामाचा पसारा होता. वैतागला नसता तरच नवल. पण मनात कुठेतरी सुप्त ईच्छा दबा धरुन बसली होती की काही भव्य दिव्य करावे ज्यामुळे आपले नावं प्रत्येकाच्या ओठावर येईल. भारतातल्याच नव्हे तर जगातल्या सगळ्या वृत्तपत्रांतुन त्याला ऑफ़र्स यायला लागतील. पण आतापर्यंत तरी त्याची ही इच्छा सुप्तच राहीली होती. कारण एकच, मुळात असले काही स्कुप त्याला मिळत नव्हते, आणि मिळेल तरी कसे? त्याचा तो संपादक आजीबात पैसा टाकायला तयार नव्हता. उलट आपल्या प्रत्येक माणसाने वृत्तपत्रासाठी भरपुर जाहीराती मिळवाव्यात यासाठी तो जागरुक असे. बरं स्वत:च्या खिशातुन खर्च करण्याइतपत तन्मयची मिळकतच नव्हती. त्यामुळे त्याच्यासारखा धडाडीचा पत्रकार इथे सडत होता असे तन्मयचे प्रांजळ मत होते.

" हँSS, काय तर म्हणे जाउन त्या देवनारची मुलाखत आण, कुठुन? तर त्या वेड्यांच्या हॉस्पिटल मधे जाउन" चिडलेला तन्मय स्वत:शीच कदाचीत जरा जास्त जोरात बोलला.
" काय तन्मय, कुठे दौरा आज?" त्याला टेबलाची आवराआवर करताना पाहुन त्याच्या सहकार्‍याच्या डोक्यात वळवळलेल्या प्रश्नाच्या किड्याला त्याने तन्मयवर टाकले.
" मेंटल हॉस्पिटलमधे" तुटकपणे तन्मयने उत्तर दिले.
" अरे, इतक्या लवकर? नाही आपल्या शाकालच्या सोबत राहुन ही वेळ येणार हे माहीत होतं पण इतक्या लवकर येईल असं नव्हतं वाटलं" काही लोकांना पी.जे. मारायला काळवेळेचे बंधन नसते.
त्याच्याकडे एक जळजळीत नजर टाकुन तन्मय बाहेर पडला.

बाहेर पडून बसस्टॉपकडे जाताना तन्मयचे विचारचक्र चालु झाले. ‘निषाद देवनारची’ बातमी त्यानेच शोधुन आणली होती, इतकेच नाही तर त्याची बॅगही त्याने मिळवली होती. काही खास माहीती मिळेल म्हणुन, आणि ती मिळालीही होती. हा निषाद देवनार नावाचा पुरातत्वतज्ञ कुठल्याश्या जुनाट ममीजवर काम करत होता आणि तिकडेच त्याला काही चित्रविचीत्र अनुभव आले. आणि त्याचा परीणाम म्हणुन त्याच्या डोक्यावर परीणाम झाला. त्याच्या डायरीत तन्मयने त्याचे अनुभव वाचले होतेच. बहुतेक डायरी लिहीण्याआधीच त्याचे डोके फ़िरले असावे. अरे ममीज काय, तो चमत्कारी चबुतरा काय, कसले ते ग्रंथ आणि काय ते चमत्कारीक पुस्तक. बहुदा हॅरी पॉटर बरेचदा पाहीला असणार या प्राण्याने. पण ......... त्याच्या बॅगेत एक पुस्तक होते खरे ! समोरुन रोरावत आलेल्या बसमुळे त्याची विचार श्रृंखला तुटली. आतल्या गर्दीत कसाबसा अडकवुन घेत तन्मय मानसोपचार केंद्राकडे निघाला.

मानसोपचार केंद्रातला अनुभव फ़ारसा चांगला नव्हताच, निदान त्या निषाद देवनारच्या बाबतीत तरी, हा माणुस इतक्या व्यवस्थीत वागत होता की कुठे खोड काढायला जागा नव्हती. अपवाद फ़क्त एकच,..... ‘पुस्तक’ ! पुस्तकाचे नाव घेतले की जणु जगातली सर्वात विषारी वस्तु समोर दिसावी तसा किंचाळत होता. बाकी त्याचे त्या माणसाचे नॉलेज थक्क करणारे वाटत होते. त्याचा पुस्तकाबद्दलचा राग मात्र कळण्या पलीकडला होता हे नक्की. एकुणच या मुलाखतीतुन काहीही साध्य न झाल्याने आता बॉस बोंबलणार होता इतके मात्र त्रिकालबाधीत सत्य होते.

त्याच ‘संपादक’ असे लिहीलेल्या दरवाजा मागुन बाहेर येताच तन्मयने सुटकेचा निश्वास टाकला. कसेतरी एकदाचे त्याने बॉस नावाच्या त्या प्राण्याला पटवले खरे, पण एक स्कुप म्हणुन त्या देवनारची कल्पीत मुलाखत लिहून द्यायचा आग्रह (?) मात्र त्याला मोडता आला नाही.
"उद्यापर्यंत देतो" म्हणुन आजचे मरण उद्यावर ढकलण्याचा प्रयत्न मात्र त्याने केला. आता आज रात्री आपली कल्पनाशक्ती पणाला लावायची वेळ पुन्हा एकदा त्याच्यावर येणार होतीच. देवनारच्या बॅग मधुन मिळालेली सगळी कागदपत्रे त्याने आपल्या बॅगेत भरली आणि सरळ घरचा रस्ता धरला.

थंड, शांत, संध्याकाळ, सोबत ‘सिग्नेचरची’ हल्कीशी किक, आणि भरपुर निवांत वेळ. इतरवेळी अशी संधी त्याला पर्वणी वाटली असती पण आज हीच कटकट वाटत होती. जवळपास सातव्यांदा त्याने डायरी रागाने मिटली.
" साला संशोधक होता की पटकथा लेखक?, प्रत्येक पानावर ‘इंडीयाना जोन्स’ ची आठवण येतेय" वैतागत तन्मय बडबडला. याचा शोध लावायला नक्की जायचे तरी कुठे?
‘झक मारत गेला तो आणि त्याचे संशोधन’ मनातल्या मनात एक सणसणीत शिवी देत त्याने डायरी बाजुला फ़ेकली. पुन्हा आपला ग्लास भरत त्याने सावकाश सीप मारायला सुरुवात केली.
कदाचीत थोडावेळ शांत राहील्याने असेल कींवा मेंदुवर पसरलेल्या अल्कोहोलच्या तरलतेने असेल. तन्मयने पुन्हा एकदा डायरी उघडली. यावेळी मात्र मनात काहीही पुर्वग्रह न धरता एकदम त्रयस्थपणे त्याने ती पुन्हा वाचुन काढली. या वेळी मात्र त्याला देवनारच्या खरेपणाचा शोध घेण्यासारखे काहीतरी सापडले.

आर्ध्या-पाऊण तासाने जेंव्हा तन्मय आपल्या टेबलाजवळ बसला तेंव्हा मात्र त्याच्या मनात देवनारबद्दल काहीही गैरसमज नव्हता. देवनारने सुरुवातीलाच उल्लेख केलेल्या त्याच्या मित्राचा पत्ता शोधणं म्हणजे निदान तन्मयसाठी तरी डाव्याहातचा मळ होता. मग त्याने केलेली विधाने त्यांची सत्यासत्यता पडताळणे आणखी सोपे काम. एकुणच देवनार त्याच्या शोधकार्यात पुर्ण विश्वासपात्र माणुस होता हे खरे. मग त्याचे अनुभव? ते खरे असु शकतील का? तन्मयने बाजुलाच पडलेल्या कातडी बांधणीच्या पुस्तकाकडे नजर टाकली. आता ते वाचावे की न वाचावे? ..........
बराच वेळ असा अनिश्चीत अवस्थेत गेल्यावर तन्मयने मनाशी एक ठाम निश्चय करुन पुस्तक उचलले, नुसतेच पुस्तक नव्हे तर देवनारच्या बॅगमधे सापडलेली सगळीच कागदपत्रे घेउन तो किचन मधे गेला आणि एकजात सगळ्या वस्तु गॅसच्या शेगडीवर ठेउन त्याने काडी लावली.
‘उगीच ज्या गोष्टीबद्दल आपल्याला शाश्वती नाही त्यांची पडताळणी करावीच कशासाठी’
समोरच्या धगधगत्या कागदांकडे पहाताना एकच विचार तन्मयच्या मनात घोळत राहीला, ‘ जे काही पवित्र, अपवित्र असेल त्याला आता अग्नीने गिळंकृत केलेय, एव्हाना कदाचीत होवु पहाणारा अनर्थ मी टाळलाय’. समोरच्या कागदांची राख, राख होईपर्यंत तो तिथे उभा राहीला आणि मगच शेगडीचे बटन बंद करुन बाहेरच्या खोलीत आला.

रायटींग टेबलाजवळ आल्यावरच तन्मयला वस्तुस्थितीची जाणिव झाली, उद्या संपादकाला काय देणार होता तो? मनातल्या मनात या प्रश्नाचे उत्तर शोधत तो खुर्चीत बसला.
पानांमागे पाने टरकावुन झाली पण लिहायला सुर लागेना ! शेवटी वैतागुन त्याने हाताची मुठ टेबलावर आपटली, आणि........ एक सुटा कागद हळुवारपणे गटांगळ्या खात जमिनीवर विसावला. जरा आश्चर्यानेच त्याने तो कागद उचलला. जिर्णावस्थेत असलेल्या त्या कागदाकडे नजर जाताच त्याच्या मेंदुवरची धुंदी साफ़ उतरली.

पुन्हा, पुन्हा निरखुन पाहील्यावर त्या कागदावर नकाशाच असल्याची तन्मयची खात्री पटली. नकाशावरच्या खाणाखुणा त्याच्या परीचयाच्याच होत्या. आणि त्यातली भाषा चक्क मराठी म्हणता येईल इतपत समजत होती. पण एक मात्र घोळ होता, एका दगडी कमानी पासुन हा नकाशा चालु होत होता. आणि ही कमान नेमकी कुठे आहे याचा मात्र उल्लेख नव्हता.
‘नक्की कसला नकाशा असावा हा ?’ आता त्याला आपल्या मघाच्या कृत्याचा पश्चाताप व्हायला लागला होता. कदाचीत त्या पुस्तकातच यबद्दल काही सापडण्याची शक्यता होती, आणि ती एकमेव शक्यता त्याने आपल्या हाताने अग्नीच्या स्वाधीन केली होती. वैताग, वैताग झाला नुसता मनाचा. नुसता नकाशा हाती असुन जमणार नव्हते तर त्यातल्या खुणांमधे असलेल्या दगडी कमानीचे नक्की स्थान कळायला हवे होते. नाहीतर अवाढव्य पसरलेल्या जगात त्याने नक्की कुठे शोधले असते ते नेमके ठिकाण?

रात्रभर विचार केल्यावर त्याने नकाशाचा नाद सोडायचे निश्चीत करुन टाकले. आणि सरळ सकाळी संपादकांना पाठवण्यासाठी सिकनोट तयार केली, सोबत दोन दिवसात मुलाखत देतो असेही लिहून ठेवले. नाहीतरी सकाळी संपादकांना उत्तर देण्याची त्याची मनस्थिती नव्हतीच. एकदा मनातला विचार पक्का झाल्यावर त्याने सरळ झक्कपैकी ताणुन दिली. निदान दोन दिवसांची निश्चिंती.

भर दुपारी सुर्य डोक्यावर येउन आपल्या गरम डोक्याचा नमुना दाखवायला लागल्यावरच तन्मयला जाग आली. आरामात उठून आवराआवरी केल्यावर बाहेर हॉटेलात बर्‍यापैकी उदरभरण केल्यावर इकडेतीकडे उगीचच टाईमपास करत भटकत राहीला. असाच एका बुकस्टॉलवर समोरच्या पुस्तकांवरुन नजर फ़िरवताना त्याची नजर ‘ एका इंस्पेक्टरची डायरी’ असे ठळक नावं असलेल्या पुस्तकावर पडली आणि त्या देवनारच्या डायरीची त्याला पुन्हा आठवण झाली. सकाळपासुनच्या सगळ्या आनंदी मुडचे पार खोबरे झाले. मनाची घालमेल आणखी वाढली शेवटी त्याने असेच भटकंती करत शहराच्या गर्दीतुन बाहेर पडायला सुरुवात केली. एव्हाना उन्हं कलायला लागली होती. वाटेतल्या वाईन शॉप मधुन त्याने सिग्नेचरची पिंट खरेदी केली. डिस्पोझेबल ग्लास, पाण्याची बाटली आणि वेफ़र्सचे पॅकेट घेउन सरळ शहराबाहेरचा रस्ता धरला.

’डोंगरवाडी’ असेच नाव होते बहुतेक त्या भागाचे. तन्मय कधी कधी इकडे यायचा असा सगळा सारंजाम घेउन. इथे निवांतपणा होता, शहरी कोलाहलाचे नामोनिशाण नव्हते. आजुबाजुला जी काही पंधरा-वीस घरे असतील तीच पण तीही धनगर किंवा तश्याच कुठल्यातरी लोकांची असावीत. शहरी वातावरणाचा इथे काही परीणाम नव्हता की संबंधही नव्हता. ती एक स्वतंत्र वस्ती होती.रस्त्याच्या डाव्या बाजुला संथपणे वहाणार्‍या नदीचे पात्र आणि उजव्या बाजुला अर्धवट कापलेल्या तरीही आपला विस्तार दिमाखाने मिरवणार्‍या डोंगराची सोबत. वेळ फ़ार छान जात असे इथे. मुळ रस्त्यापासुन जरा वरच्या बाजुला डोंगरात असलेल्या एका प्रशस्त दगडावर तन्मयने सगळा सारंजाम मांडला. इथे कुणी त्याला डिस्टर्ब करणार नव्हते. आरामात ग्लास भरुन एक एक सिप मारताना हळूहळू डोक्यातले विचार तरल होत एका दिशेला वहायला लागले.
‘ साला, त्या देवनारची डायरी आपण उगीचच जाळुन टाकली कमीत कमी या नकाशाचे रहस्य तरी उलगडले असते.’ स्वत:वरच चरफ़डत तो विचार करत राहीला. आणि ग्लासातल्या सिग्नेचरची पातळी कमी होत राहीली. शेवटी ‘आता पुरे’ असा विचार करुन तो उठायची तयारी करायला लागला तेंव्हा सिग्नेचरने तळ गाठला होता. सुर्य डोंगराआड जाताना त्याच्या पायाने उडालेल्या धुळीप्रमाणे आकाशात तांबड्या रंगाचे मागोवे तेवढे राहीले होते. घरी वाट पहाणारं कुणी नसलं तरी एका नेमक्या वेळी घरी पोहोचण्याचा प्रयत्न सगळेच करतात, तन्मयही त्याला अपवाद नव्हता. घरी जाण्यासाठी त्याने रस्त्याच्या दिशेने पावले उचलली. आणि............. मावळत्या प्रकाशात त्याला उजव्या बाजुला थोड्या वरती काहीतरी दिसले.

ती एक झाडावेलीत लपलेली दगडी कमान होती. आता मात्र तन्मयला चांगलाच धक्का बसला. इथे यायची त्याची ही पहीली वेळ नव्हती. या आधीही तो अनेकदा आपला एकटेपणा सेलिब्रेट करण्यासाठी तो इथे येत असे, पण..... आज पहील्यांदाच त्याला ही कमान दिसत होती. आता याला सुदैव म्हणायचे की दुर्दैव हे त्याला कळत नव्हते. धक्क्यातुन सावरता, सावरता त्याला कालची रात्र आणि आजच्या दिवसाची मनस्थिती अस्वस्थ करुन गेली. कदाचीत तो शोधत असलेली कमान ती हीच तर नसेल ना?

पुन्हा घरी जाण्याची आठवणही त्याच्या मनातुन पुसुन गेली. पावले आपोआप त्या कमानीकडे वळली. दगडांवरुन घसरत, धडपडत तो एकदाचा त्या कमानीपर्यंत पोहोचला. जवळुन पहाताना त्यावरचे कोरीवकाम स्पष्ट दिसत होते. दगडातुन बांधुन काढलेली ती कमान उत्कृष्ठ कोरीवकामाचा नमुना होती. त्यावरच्या कोरीवकामाचा काही संदर्भ लागत नव्हता तरी त्यावरुन नजर हलत नव्हती हे मात्र खरे. पण मनात कुठेतरी आत, तन्मयच्या मनाला लागलेली ओढ त्याला कमानीच्या आत खेचत होती. खिशातला नकाशाचा कागद चाचपत त्याने कमानीच्या आत पाउल टाकले. सुर्य दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी केंव्हाच अंधाराच्या दुलईत शिरला होता. आणि तन्मय समोर दिसणार्‍या पाउलवाटेवर चालतच होता. मनातल्या मनात नकाशातल्या खुणांची उजळणी चालु होती. जर कदाचीत त्याचे लक्ष आजुबाजुला असते तर त्याच्या लक्षात आले असते, मघा तो डोंगराच्या चढणीवर होता आणि आत्ता तो एका सरळसपाट दगडी जमिनीवरुन चालत होता, मघा डोंगरातल्या झाडीतली पाखरं आपापल्या परीने वातावरण आवाजाने भारुन टाकत होती आणि आत्ता सर्वत्र एक जिवघेणी शांतता पसरली होती.

तन्मयचा आपल्यापरीने नकाशातल्या खुणा शोधण्याचा आकांताने प्रयत्न चालु होता पण आजुनही त्याला एकही खुण सापडली नव्हती. त्या स्मशान शांततेत तो फ़क्त पुढे चालत राहीला होता. कुणाच्याही मनाने या असल्या वातावरणात धोक्याची सुचना देउन परत फ़िरायला भाग पाडले असते पण तन्मयचे मन जणु त्याच्या ताब्यात नव्हतेच. एका अनामिक ओढीने तो पुढे पुढे चालत राहीला. अखेर तो थांबला, नव्हे त्याला थांबावेच लागले समोर जायचा रस्ताच एका अजस्त्र खडकाने व्यापुन टाकलेला होता. पुढे जायचा मार्ग आता खुंटला होता, आणि मागे जायचा मार्ग विस्मरणात गेला होता.

एखादा क्षण फ़क्त एखादाच सेकंद तन्मय थांबला असेल. पुढे कुणितरी आधीच सांगीतल्याप्रमाणे त्याच्या हालचाली सुरु झाल्या. त्याच भारलेल्या अवस्थेत तो समोरच्या खडकातल्या एका पोकळीकडे तो सरसावला. आत बसवलेला गोल गुळगुळीत दगड त्याने जोर लाउन बाहेर खेचण्याचा प्रयत्न सुरु केला. एका माणसाचे काम नक्कीच नव्हते ते, पण तन्मयच्यामागे एखादी अमुर्त शक्ती कार्यरत असावी नाहीतर असले धाडस तो करु शकलाच नसता. आणि कदाचीत त्याच्या हे ही लक्षात आले असते की ज्या दगडाला तो बाहेर खेचण्याचा प्रयत्न करत आहे त्यावर काहीतरी कोरुन लिहीलेले आहे. आणि त्यावरच्या शेंदरी रंगाचा पुसटसा का होईना अंश आजुनही बाकी आहे. पण...............

ज्या क्षणी तो दगड बाहेर निघाला त्या क्षणी जणु सारे अंतराळ गोठले, कालचक्राची चाके एकमेकात गुंतल्यासारखी थांबली. आणि त्याच क्षणी तन्मय भानावर आला. ‘आपण कुठे आहोत? काय करतोय?’ कदाचीत हे प्रश्न सुध्दा त्याच्या मनात उमटले नसतील. एका अंतहीन पोकळीत खेचल्या जात असल्याची जाणिव तरी त्याला होती की नाही कुणास ठाउक.

पहाटे पहाटे नदीवर आपले विधी उरकण्यासाठी गेलेल्या एका धनगराला समोरच्या डोंगराच्या पायथ्याशी पडलेली एक मानवाकृती दिसली. अश्यावेळी नक्की काय करायचे हे न सुचल्याने त्याने थेट वाडीकडे धाव घेतली. डोंगरवाडीतल्या मानकर्‍यांनी येउन त्या माणसाला पाहीले. श्वास चालु होता त्याचा, कदाचीत डोंगर उतरताना तोल गेला असावा. शरीरावर जखमातरी कुठेच दिसत नव्हत्या. पण म्हणुन काही तो ठणठणीत असेल असे म्हणता येत नव्हतेच ना ! वाडीतल्या चार-पाच दणकट तरुणांच्या मदतीने त्या माणसाला वाडीत आणल्या गेले. आणिबाणीची परीस्थिती म्हणुन थेट वाडीतल्या वैदुच्या घरातच त्याला ठेवल्या गेले. शक्य तितक्या त्वरेने आपले कर्तव्य बजावत त्या वैदुनेही त्या माणसाला शुध्दीवर आणले. डोळे उघडताच त्याची भकास नजर पाहुनच वाडीतले जुनेजाणते समजुन गेले या दुर्दैवी जीवाने आपली स्मरणशक्ती गमावलीय. तरीही एक प्रयत्न म्हणुन त्याला नावं, गाव, पत्ता विचारुन घेण्याचा प्रयत्न केला गेला पण आजुबाजुच्या मंडळींकडे आपली भकास, अशिक्षीत नजर टाकण्या पलीकडे त्याने काहीही प्रतीसाद दिला नाही. अखेर वाडीतल्या मान्यवरांनी आपापसात सल्ला मसलत करुन त्याची रवानगी भिवबाच्या घरी केली. गावातला हा एकमेव माणुस ज्याच्या घरात तो आणि त्याची दोन मुले या पलिकडे कुणीही नव्हते. आणि असल्या अगंतुकाला ठेवण्यासाठी घरात बाईमाणुस असलेला कुणीही तयार झाला नसताच. भिवबाची गोष्ट निराळी तो आणि त्याची ऐन विशी- बावीशीतली दोन दणकट मुले या पलीकडे त्या घरात कुणीच नव्हते. आणि पाहुण्याची सोय करण्यात त्याला काही अडचण भासत नव्हती. ‘ काय? खाईल ना दोन भाकर? खाउ देत, खंडोबाच्या कृपेनं भरपुर आहे आपल्याकडे’ गावातल्या निर्मळ मनाच्या माणसांचे विचार इतके सरळ असतात.

एक-दोन दिवस भकास विसरल्या नजरेने बिछान्यावर पडून काढल्यानंतर आता तो पाहूणा थोडाफ़ार चाला-फ़िरायला लागला. पण आजुनही त्याला आपल्याबद्दल काही आठवत नसावे कारण त्याने अद्यापही एक चकार शब्द उच्चारला नव्हता. आणि एका भल्यापहाटे भिवबाच्या शेजार्‍याच्या घरातुन जबरदस्त कोलाहल ऐकु आला. वाडितल्या जवळपासच्या सगळ्या माणसांनी हातातली कामे टाकुन तिकडे धाव घेतली. भिवबाचा शेजारी आरडाओरडा करत होता, त्याच्या आजुबाजुला रक्तामांसाचा सडा पडलेला त्यातच माखलेली पिसे तिथे नक्की काय घडले असावे याची साक्ष देत होती. त्या बिचार्‍याच्या खुराड्यातल्या एकुण एक कोंबड्यांची कत्तल झाली होती. कदाचीत एखादे रानटी जनावर रात्री वाडीत शिरले असावे. तरी..... तरी एक प्रश्न आ वासुन उभा होताच. कुठलेही रानटी जनावर असा रक्तामांसाचा सडा घालुन जात नाही, तर गुपचुप एखादा प्राणी उचलुन पळ काढते. आणि जरी एखाद्या कोल्ह्या-लांडग्याचा हा पराक्रम असला तरी मग कोंबड्या न ओरडता गप्प कशा राहील्या. कुठल्याही धनगराची झोप इतकी सावध नक्कीच असते की त्याच्या प्राण्याने जरा जरी वेगळा आवाज केला तरी तो खाडकन जागा होतो. मग हा कसा इतका गाढ झोपला? की आवाज झालाच नाही? अनुत्तरीत प्रश्न मनात ठेउनच मंडळी आपापल्या कामाला गेली.

झाल्या प्रकाराची दखल गावातल्या अनेक पावसाळे झेललेल्या जाणत्या मंडळींनी नक्कीच घेतली होती त्यामुळे रात्री पहारा ठेवावा या निर्णयावर त्यांची खलबतं चालु झाली होती. त्यातच त्याच रात्री वाडीतल्या आणखी एका ठिकाणी मेंढरांच्या रक्ताने अंगण न्हाले. अखेरीस वाडीत फ़िरता पहारा चालु करायचा निर्णय पक्का झाला. आठ- दहा दणकट तरुण त्यासाठी तयार झाले. अंगावर घोंगड्या पांघरुन एका हातात कंदील आणि दुसर्‍या हातात दणकट लाठी घेतलेले तरुण रात्री वाडीत हाका देत फ़िरायला लागले. त्यांना माहीत होते का त्यांचा सामना नक्की कुणाशी होता ते?

मोजुन तीन, तीनच दिवस शांततेत गेले आणि चौथ्या दिवशी पहाटे भिवबाच्या घरातुन आक्रोश सुरु झाला. आपल्याच मुलांच्या शरीराच्या झालेल्या चिखलात भिवबा वेड्यासारखा डोके पिटत होता. यावेळी भिवबाचीच दोन्ही मुले बळी पडली होती. बिचार्‍या भिवबाच्या दोन्ही मुलांची अवस्था फ़ार वाईट होती चेहरेच काय पण हात पाय देखील वेगळे असे ओळखता येत नव्हते नक्कीच हे काम कुठल्याच जंगली प्राण्याचे नव्हते यामागे अशुभ, अमंगळ असे काहीतरी होते. आता मात्र लोकांच्या संशयाची सुई वाडीतल्या अगंतुकाकडे फ़िरली. पण तो अगंतुक होता तरी कुठे?......... ताबडतोब वाडीतल्या शिकारी कुत्र्यांना माग काढायला सोडल्या गेले, पण एका ठरावीक अंतरापर्यंत जाउन कुत्री फ़क्त भुंकत राहीली. बळजबरीने पुढे न्यायचा प्रयत्न केला तर अभद्र पाहील्या प्रमाणे हेल काढायला लागली. शेवटी तो नाद सोडून मंडळी मागे फ़िरली इतक्यात गावाकडून धावत आलेल्या एका तरूणाने एक बातमी आणली. भिवबाच्या घरात रक्तामासांत लडबडलेले एक पाकीट सापडले होते. जे काही थोडेफ़ार पैसे असतील तेच पण आणखी एक महत्वाची गोष्ट त्यात सापडली, एक कसलेसे कार्ड होते ते. वाडीतल्या बर्‍यापैकी शिकलेल्या एकाने ते वाचले. पत्रकाराचे ओळखपत्र होते ते, आणि.................... त्यावर नाव होते ‘तन्मय अभ्यंकर’

"आयला, तन्मय तु? लेका ओळखलाच नाही तुला, कसला टवटवीत दिसतोयस ! नेहमीचा मरेल चेहरा कुठे सांडून आलास?" वाटेतच भास्करने हटकले.
"तन्मय लेका कुठे गायब होतास तु? शाकाल खवळला तुझ्यावर तुला डिसमीस करतोय म्हणाला. जा आधी जाउन त्याला भेट" आगदी अचानक तन्मयला रस्त्यात बघुन चमकलेल्या भास्करने थांबुन त्याला झाल्या घटनांची सुचना दिली.
" ओये, तन्मय... तन्या लेका कुठे लक्ष आहे तुझे? " त्याला काहीही उत्तर न देता पुढे जाताना बघुन भास्कर ओरडला. पण तरीही तो चालतच राहीला. शेवटी हाताची तर्जनी डोक्याच्या बाजुला ‘ चक्रम आहे’ या अर्थी फ़िरवत भास्कर आपल्या रस्त्याने निघाला.

या मुर्ख मानवाकडे लक्ष द्यायला आता त्याला मुळीच वेळ नव्हता. सहस्त्रावधी वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता त्याला बाहेर पडता आले होते. ते ही एका व्यसनाधीन लेच्यापेच्या शरीराच्या आधाराने, त्याच्या हव्यासाचा आणि गलथानपणाचा फ़ायदा घेउन. ज्या महान पुस्तकाचा तो सर्वनाश करायला निघाला होता त्याच महान पुस्तकातल्या सुट्या झालेल्या पानावर खाणाखुणांचा उल्लेख करुन संपत्तीच्या मोहात पाडल्यावर. मग चालु काळाशी जुळवुन घ्यायला काही वेळ वाया गेला. चालु काळातले अन्न त्याला मानवणारे नव्हते पण गेल्या काही दिवसाचा अनुभव पहाता त्याला थोडा संयम पाळावा लागणार होताच. तसे त्याने आधीच बरेच काही जुळवुन आणले होते. जसे आधी त्याने तन्मयच्या शरीरातल्या आत्म्याला काळाच्या अवकाशात भिरकावुन देवुन त्याचे शरीर मिळवले आणि काल त्याने ते मरतुकडे शरीर टाकुन ताज्या दमाच्या बळकट शरीरात प्रवेश मिळवला आणि जुना देह नष्ट केला पण त्याच्या चेहर्‍याचे साधर्म्य मात्र टिकवुन ठेवले. त्याच्यासाठी काहीही अशक्य नव्हते कारण .... कारण तो ‘द्राविक’ होता द्रवीडांचा राजा, त्यांच्या अफ़ाट शक्तीचा सार्वभौम सम्राट. आता त्याला पुन्हा आपले राज्य उभारायचे होते. काम फ़क्त त्याने आधीच बेमालुमपणे मानवसंस्कृतीत मिसळवुन टाकलेले त्याचे हस्तक शोधण्याचेच. पण आता त्याला चिंता नव्हती तो आल्याचे कळताच त्याचे हस्तक आपोआप त्याला भेटणार होते.

मनाशीच हसत त्याने आपला मोहरा जवळच्या रेल्वे स्टेशनाकडे वळवला. एक मोठा मानवी रक्तपात तो आल्याचे कळायला त्याच्या हस्तकांना पुरेसा होता.

गुलमोहर: 

मस्त रे चाफ्फ्या....

३रा भाग ही मस्त जमलाय....

(४था कधी...?... आशाळभूत चेहेरा...)
_______
हम है राही प्यार के, फिर मिलेंगे चलते चलते...!

वाट बघतोय रे. फार पुर्वी कालश्रुंग, कालिकामुर्ती, चंद्रकांता वगैरे कादंबर्‍या वाचल्या होत्या. त्याची आठवण येतेय. पुढचा भाग लवकर येवु दे.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

ख त र ना क !!
श्वास रोखून वाचाव्या लागतात तुझ्या कथा..
----------------------
I'm sure..I'm not the Best, still I'm happy.. I'm not like the Rest..!! Happy

छानच

सॉलीड भिडु. तुला आपला सलाम.

सागर आढाव
औरंगाबाद

सॉलीड भिडु. तुला आपला सलाम.

सागर आढाव
औरंगाबाद

एकदम झक्कास.....

पुढचा भाग कधी????

>>तन्मय एका खाजगी वर्तमानपत्रात पत्रकारासाठी उमेदवारी करत होता

वर्तमानपत्र सरकारी सुद्धा असतं का? गैरसमज नसावा, मला माहित नाही म्हणून विचारलं...

आणखी एक... कथेचं नाव 'चकवा' का बरं?

बाकी, कथा फारच छान आहे. वाचायला सुरुवात केली की संपल्याशिवाय थांबता येत नाही...

योगी, तसं पाहायला गेलं तर सगळीच वर्तमानपत्रे सरकारी असतात.
फक्त कुठला पक्ष सरकारपदी आहे, यावर वर्तमानपत्राचं सरकार ठरतं..

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

धन्यवाद दोस्तलोक
>>वर्तमानपत्र सरकारी सुद्धा असतं का?
सरकारी नसतं, पण ते पुर्ण खासगीही नसतं इतकं नक्की Happy
>>>>>आणखी एक... कथेचं नाव 'चकवा' का बरं? >>कारण यात कुणाला तरी चकवल्या गेलेय, याचं कारणही आहे कथेतच.

>>>>फक्त कुठला पक्ष सरकारपदी आहे, यावर वर्तमानपत्राचं सरकार ठरत>>>> विशाल Happy

....................................................................
इथे रात्रंदिन, युद्धाचाच प्रसंग, ........... !

चाफ्फ्या... तुझ्या या कथेच्या पुढच्या भागाची वाट बघते आहे मी...
पुढचा भाग जस्त डेंजरस असणार!!!!!
---------------------------------------------------------------

ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

छान जमतंय Happy
फक्त काहीतरी फालतुपणा करुन थांबवु नकोस.
********************************************
The trouble with being punctual is that, no one is there to appreciate it!!

चाफ्या, तुझी सिरिज आता वेगळ्या वळणावर पोहोचलीय. शैतानाने जन्म घेतलाय म्हणजे कुठेतरी त्याला संपवण्यासाठी कुणीतरी अवतार घेतलाच असेल. बघू तो केव्हा येतोय.

......................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

जबरदस्त चाफ्या, उत्कंठा शिगेला पोचली...लवकर पुढचा भाग येऊदे!!!!

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

आयला. चाफ्या, तु माणुस आहेस की कोण? मस्त रे

चाफा बोलेना..
चाफा चालेना..
चाफा काही केल्या पुढचा भाग टाकेना.......!!!

चाफ्या तलवारीला धार लावायला पाठवलीये, लवकर पुढचा भाग येवु दे. नाहीतर ......! Happy

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

मज्जा नहि आलि मला
मला नाहि सम्ज्ल .
त्याने आस रक्त पात का केला.????
शेवत जरा नित हवा होत.
बाकि थिक आहे.
लिखन सुरु थेव.

कल्पना चांगली आहे. पण काही लिंक्स अजून मजबूत करता आल्या असत्या. जरा अर्धवट राहिल्यासारखी वाटतेय. चुभुद्याघ्या.