थांबता हृदय हे......

Submitted by SureshShinde on 8 September, 2014 - 11:42

arrest.jpg

"हृदयक्रिया थांबल्यानंतर पुढे काय?'' अर्थात "हृदयक्रिया बंद पडून मृत्यू'' या विषयावर अनेक लेखक, नाटककार, चित्रपट पटकथा लेखक व तत्ववेत्ते यांनी खूप लिखाण केलेले आपण वाचले असेलच, पण हृदयक्रिया बंद पडल्यानंतर म्हणजेच लौकीक अर्थाने मरणानंतरही पुन्हा जीवंत होऊन उत्तम आयुष्य जगण्याची किमया फक्त डॉक्टरच पाहू शकतात, घडवू शकतात. माझ्या पेशंटच्या बाबतीत असे प्रसंग अनेकदा घडले व त्यातील काही रुग्णांच्या हृदयांनी घेतलेल्या 'छोट्याशा विश्रांती' विषयीच्या या गोष्टी आपणाला निश्चितच आवडतील.

श्री गजानन जोशी :
साधारणतः एकोणीसशे ऐंशी सालातील गोष्ट. सारसबागेजवळील हरजीवन हॉस्पिटलमध्ये सुमारे पासष्ट वर्षाचे एक वृद्ध गृहस्थ छातीमध्ये दुखते म्हणून दाखल झाले. तेथील डॉ.मनोहर शेठ यांनी हृदय विकाराच्या झटक्याचे प्राथमिक निदान करुन त्या रुग्णाला तपासण्यासाठी व ईसीजी काढण्यासाठी मला फोन केला.
आजोबांना अचानक छातीमध्ये दुखू लागल्यामुळे त्यांची पत्नी व मुलगा त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये आले होते. आजोबांना भरपूर घाम आल्यामुळे कपडे ओलेचिंब झाले होते. छातीतील दुखण्यासाठी पेन किलरचे इंजेक्शन दिल्यामुळे छातीत दुखण्याचे प्रमाण कमी झाले होते. दोन्ही नाकपुड्यांमध्ये प्लास्टिकच्या नळ्यांवाटे प्राणवायूचा पुरवठा सुरु होता. मी माझे ईसीजी मशीन बरोबर आणले होते. त्यावर त्यांचा ईसीजी काढला. डॉ.शेठ माझ्याशेजारीच उभे होते. आजोबांना हृदयविकाराचा तीव्र झटका आलेला ईसीजीवर दिसत होते.
हृदयविकाराचा झटका येतो तेंव्हा आपल्या हृदयाच्या तीन मुख्य रक्तवाहिन्यांमधील एका रक्तवाहिनीमध्ये अथवा तिच्या एखाद्या शाखेमध्ये रक्ताची गुठळी तयार होते. हृदयाच्या ज्या भागाला या गुठळीबाधीत रक्तवाहिनीने रक्तपुरवठा होत असेल तो भाग रक्तपुरवठा थांबल्यामुळे तडफडू लागतो, काम करेनासा होतो, हृदयाच्या क्रियेमध्ये अडथळा आणतो, क्व चितप्रसंगी हृदयक्रियाही बंद करु शकतो आणि काही तासात रक्तपुरवठा पुन्हा सुरु न झाल्यास निकामी होतो. हृदयाचा तेवढा स्नायू मरतो. आजकाल आपण या रक्तगुठळीचे निदान होताच विशिष्ट औषधे देऊन ती गाठ विरघळवू शकतो अथवा मांडीमधून हृदयापर्यंत "कॅथेटर' घालून गाठीतून एक 'बलून' म्हणजेच फुगा फुगवून रक्तपुरवठा पुन्हा चालू करु शकतो व हृदयाच्या मरु घातलेल्या स्नायूंना जीवनदान देऊ शकतो. अर्थात त्याकाळी ही औषधे, ही प्रगती नव्हती. तेव्हा हृदयविकाराचा झटका आल्यानंतर हृदयाचा तो स्नायूंचा भाग शांतपणे मरु देणे व त्या रुग्णाची हृदयक्रिया बंद पडू न देणे एवढेच काम आम्ही डॉक्टर्स त्या काळच्या इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये करीत असू. अशी 'आय.सी.यु.'ची सोय काही ठराविक रुग्णालयांमध्येच उपलब्ध होती.

आजोबांचे सतत चालू असलेले छातीमधील दुखणे, घामेजलेले शरीर व शंभरच्या आसपास असलेले ब्लडप्रेशर ही सर्व लक्षणे पाहून हा झटका चांगलाच मोठा असल्याचे आमच्या लक्षात आले होते. असा रुग्ण दगावण्याची शक्यता भरपूर! म्हणूनच मी व डॉ.शेठ यांनी आजोबांच्या नातेवाईकांना परिस्थितीच्या गांभीर्याची कल्पना देऊन रुग्णाला रुबी हॉल येथे आय.सी.यु.मध्ये हलवावे असे सुचविले. सुदैवाने नातेवाईकही ताबडतोब तयार झाले. हॉस्पिटलची रुग्णवाहिका तयारच होती. आजोबांना ईसीजी मशीनसह रुग्णवाहिकेमध्ये झोपवून मी व आजोबांची पत्नी निघालो. मुलगा आमच्या आधीच रुबी हॉलमध्ये गेला होता. मी रुग्णवाहिकेमध्ये दर मिनिटास ईसीजी पहात होतो. पण दुर्दैवाने, स्वारगेट ओलांडून शंकरशेठ रोडने आम्ही थोडे अंतर गेलो असतानाच आजोबांनी डोळे फिरवले. ईसीजीवर दिसत होते की त्यांची हृदयक्रिया थांबली होती. वैद्यकीय परिभाषेमध्ये त्यांना झाला होता "व्ही एफ'' म्हणजेच "व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन''!

vfib.jpg

आपले हृदय हा एक स्नायुंनी बनलेला पंप आहे. या स्नायुचे अनेक तंतू असतात. ते सर्व तंतू एकसाथ लयबद्ध काम करतात. एखाद्या सैनिकांच्या 'मार्च करणाऱ्या पलटणीप्रमाणे'! कल्पना करुया की या पलटणीमधील दहा-बारा सैनिक अचानक चक्कर येऊन पडले तर बाकीच्यांच्या लयबद्धतेमध्ये दोष येऊन संपूर्ण पलटणीचे 'टायमिंग' चुकते. तसेच काहीसे हृदयामध्ये होते. हृदयाच्या तंतूंचे 'टायमिंग' बिघडल्यामुळे प्रत्येक तंतू आपल्या मनाप्रमाणे काम करु लागतो. परिणामतः हृदयाचे स्नायू फक्त थरथरु लागतात व आकुंचन-प्रसरण क्रिया बंद पडते. हृदयरुपी पंप बंद पडतो, हृदयातून बाहेर पंप होणारे रक्त थांबते व थोड्याच वेळात म्हणजेच दोन-तीन मिनिटांमध्ये श्वसनक्रियाही थांबते. म्हणजेच लौकीक अर्थाने माणूस मरतो. नेमकी या तीन मिनिटांमध्ये हृदयक्रिया पुन्हा सुरु झाल्यास माणूस पुन्हा "जीवंत'' होतो.
अर्थात हृदयक्रिया बंद पडल्याचे निदान झाल्यास छातीला जोरात गुद्दा मारल्यास, हृदयाचे "टायमिंग'' पुन्हा प्रस्थापित होऊन किे्रया पूर्ववत होऊ शकते. असा रुग्ण हॉस्पिटलमध्ये असल्यास काही विशिष्ट औषधे दिल्याने अथवा विशिष्ट मशीनद्वारे छातीला वीजेचा झटका दिल्यास हृदयाच्या स्नायूतंतूंची हालचाल क्षणभर पूर्णपणे थांबते व नंतर ती पुढील क्षणी जेव्हा हृदय पुन्हा सुरु होते तेव्हा पुन्हा टायमिंगप्रमाणे 'लयबद्ध' सुरु होते. अशा विजेचा शॉक देणाऱ्या मशीनला "डिफिब्रिलेटर'' म्हणतात. परदेशामध्ये अशी मशीन्स् अनेक गर्दीच्या ठिकाणी सरकारने बसविलेली आहेत. अगदी आपल्याकडील कॉईन बॉक्स पीसीओ बूथ प्रमाणे! अर्थात हे सर्व उपचार होईपर्यंत हृदयाचे काम व श्वसनाचे कार्य कृत्रिमरितीने चालू ठेवण्याचा प्रथमोपचार म्हणजेच "सीपीआर'' पेशंटला दिला जाणे अतिशय महत्त्वाचे असते. नाहीतर हृदयक्रिया चालू होते पण तीन मिनिटांपर्यंत मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यामुळे मेंदूला अपरिमित हानी पोहोचते व माणूस "ब्रेनडेड'' होतो. गड येतो पण सिंह जातो!
आजोबांना "व्ही एफ'' झाल्याचे मला मशिनवर दिसत होते. हाताला नाडी लागत नव्हती. आजोबांची शुद्ध हरपली होती. त्यांच्या पत्नीलाही जाणीव झाल्यामुळे तिनेही नकळतपणे रडण्यास सुरुवात केली होती. मी रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरला गाडी रस्त्याच्या कडेला थांबविण्यास सांगून आजोबांना "कार्डीयाक मसाज'' सुरु केला.

cpr1.jpg

आजोबांचे नशीब बलवत्तर म्हणा किंवा बायकोचे नाव 'सावित्री' म्हणून, पण मी मसाज देत असतानाच आजोबांचे हृदय पुन्हा सुरु झाले. हाताला नाडी पुन्हा लागू लागली. ईसीजीवर पुन्हा 'नॉर्मल' लयबद्ध 'ऱ्हिदम' दिसू लागला. काही मिनिटांतच आजोबांनी पुन्हा डोळे उघडले. आम्ही पुन्हा रुग्णवाहिका सुरु करुन रुबी हॉलच्या दिशेने प्रयाण केले. रुबी हॉलमध्ये दहा दिवस मुक्काम करुन आजोबा पुन्हा घरी परतले.
आजोबांचा तो लांबलचक ईसीजी मी बरेच दिवस संग्रही ठेवला होता. पुढील अनेक वर्षे त्यांचे दिपावली शुभेच्छा पत्र न चुकता येत असे. सुमारे दहा वर्षांनंतर त्यांच्या मुलाने आजोबांना अन्ननलिकेचा कॅन्सर होऊन त्यातच ते गेल्याचे पत्र पाठविल्यानंतर शुभेच्छांची ती 'पत्रावली' संपली.

साहेबराव बांदल!
वीस वर्षांपूर्वी हृदयक्रिया जवळजवळ दहा मिनिटे बंद पडूनही आजपर्यंत ठणठणीत तब्येत असलेला एक नशिबवान माणूस! भोरजवळचे 'आळंदे' गाव बांदलांचेच! या गावातील अनेक बांदल माझे पेशंटस्! पैकी साहेबरावांचा स्वारगेटजवळ दूधाच्या डेअरीचा व्यवसाय. पंचेचाळीशीच्या आसपासचा साहेबराव म्हणजे एकदम हसतमुख माणूस. हसताना त्याचे दात इतके छान दिसत की माझा मदतनीस सुभाष त्याला थट्टेने 'कोलगेट बांदल' म्हणत असे. एके दिवशी सकाळीच 'कोलगेट बांदल' रडवेला चेहरा घेऊन मित्राबरोबर माझ्या क्लिनिकमध्ये आला तो छातीवर हात दाबूनच! तीव्र वेदनांमुळे त्याला बोलताही येत नव्हते. तातडीने त्याला झोपवून मी बी.पी. तपासले व ईसीजी काढला. त्याला जोरदार 'हार्ट-ॲटॅक' आला होता.
"तुला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायला हवे !''
"डॉक्टर, मी स्वारगेटहून माझ्या भावाला घेऊन तसाच रिक्षाने पुढे ससूनला जातो. तुम्ही चिठ्ठी द्या''
"हे पहा, तू मुळीच वेळ घालवू नकोस. ताबडतोब दवाखाना गाठ, जास्त चालू नकोस.'' असे सांगून मी त्याच्या मित्रास परिस्थितीच्या गांभीर्याची कल्पना देवून ससून हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी पत्र देऊन रवाना केले व मी पुढील पेशंट तपासण्यास सुरुवात केली.
सुमारे दहा मिनिटांनंतर साहेबरावाचा मित्र धापा टाकीतच पुन्हा परत आला.
"काय रे परत का आलास?''
"सर, आम्ही स्वारगेटपर्यंत पोहोचतानाच साहेबरावाला चक्कर आली. तो खाली रिक्षात आहे. जरा पटकन येऊन पाहिले तर बरे होईल.''
माझ्या मनात कुशंकेची पाल चुकचुकली. शेजारीच लॅबोरेटरीत काम करणाऱ्या माझ्या पत्नीस बरोबर घेऊन पळतच मी खाली सातारा रोडवर उभ्या असलेल्या रिक्षापर्यंत पोहोचलो. एका बाजूला मान कलंडलेला पण तरीही रिक्षाच्या कडेला आधार घेऊन निचेष्ट बसलेला साहेबराव बहुतेक गतप्राण झालेला दिसत होता. नाडी पहात असतानाच सारे काही संपल्याचे माझ्या लक्षात आले. डोळ्यांवर प्रकाशझोत टाकून पाहीले असता बाहुल्याही रुंदावलेल्या दिसल्या. आता केवळ साहेबरावला मृत घोषित करण्याची औपचारिकताच काय ती बाकी होती. पण केवळ आपण काही प्रयत्न केला नाही असे वाटू नये याच उद्देशाने मी व त्या मित्राने मिळून त्यांना खाली रस्त्यावर झोपविले व कार्डीयाक मसाज सुरु केला आणि काय आश्र्चर्य ! साहेबरावाने एक सुस्कारा टाकला! जणू त्याने मला सांगितले की, "डॉक्टर, मी जीवंत आहे, मला वाचवा.'' मी मसाज चालूच ठेवला. सौ.माधुरीने पळत जाऊन शेजारील डॉ. नितीन भगलींना बोलावून आणले.

cpr3.jpg

आम्ही सर्वांनी पुढील दहा मिनिटे केलेल्या 'सीपीआर'मुळे साहेबराव इहलोकी परत आले. ते खूप असंबद्ध, आक्रमक झाले होते. दोघाचौघांनाही आवरत नव्हते. बराच वेळ मेंदूला रक्तपुरवठा खंडीत होऊन पुन्हा चालू झाल्याचीच लक्षणे होती ती! तोपर्यंत रुग्णवाहिका आली होती. हॉस्पिटलमधील पुढील दहाबारा दिवस व आतापर्यंतची जवळजवळ वीस वर्षे काहीही त्रास न होता निघून गेली आहेत. अजूनही कृतज्ञ 'कोलगेट बांदल' माझ्याकडे येताना कधीही रिकाम्या हाताने येत नाही, काहीतरी 'गावरान मेवा' घेऊनच येतो.
वरील दोन्ही प्रसंगांमध्ये हृदयक्रिया पुन्हा पटकन पुन्हा सुरु झाली पण डॉ.पाटीलांच्या आईने मात्र माझी परीक्षाच पाहिली. डॉ.पाटीलांचा माझा परिचय झाला पंच्च्याहत्तर साली. त्यांच्या वडीलांच्या कॅन्सरचे निदान मी केले होते. त्यामुळे मी जेव्हा खासगी व्यवसाय सुरु केला तेव्हा अनेक पेशंट पाठवून सुरुवातीच्या काळात मला खूपच मदत केली. त्यामुळे आमचे अगदी घरोब्याचे संबंध निर्माण झाले. एके दिवशी सकाळी डॉ.पाटीलांचा मला फोन आला.
डॉ.पाटील : "डॉक्टर, माझ्या आईच्या छातीमध्ये दुखते आहे. तुम्ही तपासावे अशी इच्छा आहे. मी त्वरीत घेऊन येऊ का?''
मी : "डॉक्टर, जर छातीमध्ये दुखत असेल तर जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन पटकन ईसीजी काढून मला कळवा, मी जरुर पडल्यास तिथे येतो.''
डॉ.पाटील : "एवढा जास्त त्रास नाही होत. आता ती आंघोळ करते आहे. तिचे आवरले की आम्ही तुमच्याकडे येतो.''
सुमारे अर्ध्या तासातच पाटील मायलेकी माझ्या क्लिनिकमध्ये आल्या. डॉक्टरांच्या आई सुमारे साठ वर्षांच्या, थोड्याशा स्थूल प्रकृतीच्या होत्या. खरोखरच त्यांचे दुखणे आता कमी झाले होते, पण तरीही ईसीजी काढून पहाण्याचे ठरवून मी त्यांना कोचवर झोपविले. ईसीजी सुरु झाला. सौ.माधुरी मला मदत करीत होत्या. निम्मा ईसीजी काढून झाला, तो नॉर्मल होता. आता चेस्टचा ईसीजी काढणे सुरु झाले आणि तेवढ्यात पेशंटने डोळे फिरविले. ईसीजीवर दिसत होते की त्यांचे हृदय बंद पडले होते व त्यांनाही झाले होते "व्ही फिब''! त्यांची शुद्ध हरपली होती. तोंडाला फेस येऊ लागला होता. डॉ.पाटीलांनी हे दृष्य पाहून गर्भगळीत होऊन जमिनीवर बैठक मारली होती. मी तातडीने "कार्डीयाक मसाज'' सुरु केला. सौ.माधुरीने पेशंटच्या तोंडाचा फेस पुसून तोंडावर तोंड लावून "माऊथ टू माऊथ'' कृत्रिम श्वासोच्छवास सुरु केला.

cpr4.png

माझ्या मदतनीस सुभाषने पळत जावून डॉ.भगलींना बोलावून आणले. पाच मिनिटे आमची धडपड व 'सीपीआर' चालू होता पण हृदयक्रिया काही पुन्हा चालू होत नव्हती. मसाज करुन माझे हात भरुन आल्यामुळे डॉ.भगली व मी आळीपाळीने मसाज करीत होतो. पण यश येत नव्हते. आमच्याकडे 'डिफिब्रिलेटर' मशिन नव्हते. डॉ.भगलींच्या नर्सेसने सलाईन सुरु केले होते. आता पेशंटला "झायलोकेन'' नावाचे औषध देणे आवश्यक होते. हे औषध भूल देण्यासाठी वापरतात. डॉ.भगली हे अस्थिरोगतज्ज्ञ असल्यामुळे त्यांच्याकडे ते उपलब्ध होतेच. हे इंजेक्शन डायरेक्ट हृदयामध्ये टोचण्याचे ठरले. पाठीच्या मणक्यात भूल देण्यासाठी वापरतात ती तीन इंच लांबीची सुई व सिरींजमध्ये पाच मिली झायलोकेनचे औषध घेऊन मी सज्ज झालो. थोडा वेळ कार्डीयाक मसाज देणे थांबवून मी देवाचे नाव घेऊन डाव्या बाजूच्या छातीमध्ये हृदयाच्या जागेचा अंदाज घेऊन सुई टोचली. सिरींजचा दट्ट्या थोडासा ओढताच भरपूर रक्त सिरींजमध्ये आले व सुई हृदयाच्या पोकळीमध्ये पोहोचल्याचे दिसून आले. पटकन इंजेक्शन टोचून मी सुई बाहेर काढली. डॉ.भगलींनी पुन्हा मसाज सुरु केला. मी ईसीजी मशीनवर पहातच होतो. निसर्गाचा चमत्कार व वैद्यकशास्त्राची कमाल! हृदयक्रिया पुन्हा पूर्ववत सुरु झाली. हृदयाची लयबद्ध हालचाल पुन्हा सुरु झाली. हाताची नाडी पुन्हा लागू लागली. अचेतन देहामध्ये हळूहळू पुन्हा चेतना निर्माण झाली. मेंदूला सूज येऊ नये म्हणून आम्ही शिरेतून बायकार्बोनेट, स्टेरॉईडस् अशी औषधे सुरु केली. पुढील अर्ध्या तासामध्ये सौ.पाटील पुन्हा बोलू लागल्या. काही दिवस हॉस्पिटलमध्ये काढून त्या पूर्ण बऱ्या होऊन घरी गेल्या. पुढे दहाबारा वर्षे उत्तम आयुष्य जगल्या.

असे एक ना अनेक प्रसंग! केवळ माझ्याच नव्हे तर माझ्या अनेक डॉक्टर मित्रांच्या आयुष्यात असे अनेक रुग्ण येऊन गेले व त्यातील अनेक वाचले तर काहींना प्रयत्न करुनही वाचविता आले नाही. पण बऱ्याच वेळा हृदयक्रिया बंद पडून येऊ घातलेला मृत्यू टाळता येतो, त्यासाठी वेळीच कार्डियाक मसाज, सीपीआर देणे व लवकरात लवकर जवळच्याच उत्तम हॉस्पिटलमध्ये नेणे फार महत्त्वाचे आहे.
प्रत्येकाने सीपीआर शिकणे महत्त्वाचे आहे.
जगामधील सर्वात मोठ्या यशस्वी सीपीआरची नोंद आहे, दिड तास !

म्हणूनच सांगावेसे वाटते, "थांबता हृदय हे.... थांबवू नका प्रयत्न! कोणी सांगावे यमाकडे रद्बदली करुन तुमच्या प्रयत्नांनी एखादा 'सत्यवान' कदाचित परत येईल !"

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार फार उपयुक्त माहिती प्रत्येकाने जरूर वाचावी एवढच म्हणू शकते !

धन्यवाद डॉक. !

छान माहिती! मला तर वाटते ह्या सीपीआर चा १० वी- १२ वी च्या अभ्यास्क्र्मात समावेष करावा. खुप लोकांचे प्राण वाचतील.

मस्तं लेख.
हल्लीच माझ्या वर्गमित्राने ९० मिनीटे रिससिटेशनचा एक विक्रम आपल्या महाराष्ट्रातच केला आहे.
ही लिंक-
http://m.timesofindia.com/city/aurangabad/Maharashtra-doctors-revive-man...

डो तुमचे लेख वाचणे म्हणजे पर्वणीच असते.

सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेत लिहिण्याच्या कौशल्यास सलाम.

माझ्या वडिलांना असे तुमच्यासारखे डॉ. मिळाले असते तर ते हयात असते बिचारे.
त्यांची सगळी लक्षणे अ‍ॅटॅकची दिसत असूनही अ‍ॅसिडीटीची औषध देणारा महान डॉ. आमच्या नशिबी आला.
असो. तुमचा लेख वाचता वाचता अनेकदा श्वास रोखला गेला.
योग्य शिर्षक!

खूपच माहितीपूर्ण लेख ...

पण हे सीपीआर , "कार्डीयाक मसाज'', "माऊथ टू माऊथ'' कृत्रिम श्वासोच्छवास इ. सारे तुम्ही वा कोणी इतर डॉ.नी नीट उलगडून चित्राद्वारे इथे समजावून दिले तर सगळ्यात चांगले होईल (सर्वसामान्यांनाना उपयोगी होईल) असे वाटते. (मी स्वतः हे सारे फक्त ऐकून आहे - डिटेल काहीही माहित नाहीये )

इथे डॉ. सातींनी जी लिंक दिली आहे ते सारे ही केवळ एक चमत्कार वाटावे असेच आहे... खूप आभार डॉ. साती .. Happy

अरे बापरे!
डॉक्टरला पृथ्वीतलावरचा देव का म्हणतात ते सांगायला याशिवाय दुसरं कोणतं उदाहरण द्यावं?

खूपच माहितीपूर्ण लेख.
सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेत लिहिण्याच्या कौशल्यास सलाम.>> +१

जबरदस्त लेख!

डिझास्टर मॅनेजमेंट वॉलंटिअरचं ट्रेनिंग घेताना सीपीआर शिकले आहे. पण प्रत्यक्ष पुर्ण सीपीआर करण्याचा अनुभव नाही. एकदा फक्त इमर्जन्सी म्हणून माझ्याच घरी आत्याच्या यजमानांना मी आणि आतेबहिणीने (आत्याच्या परवानगीने) जोरात मसाज दिला होता. अगदी १ मिनिटांतच ते जिवंत असल्याचं लक्षण दिसल्यावर हुश्श केलं होतं. तेवढ्यात अँब्युलन्स आल्यावर हॉस्पिटलात आय.सी.यू.मध्ये रवानगी केली होती. तिथल्या डॉक्टरना त्यांना घरी काय झालं ते सांगून, आम्ही प्रथमोपचार म्हणून काय केलं तेही सांगून टाकलं. डॉक्टरांनीही आम्हाला शाबासकी दिली होती. त्यानंतर ते १० वर्षं जगले.

ते ७२ वेळा पंपिंग आणि १८ वेळा श्वासाची वेळ पाळणं जमण्यासाठी प्रॅक्टिस हवी आणि छातीच्या पिंजर्‍याचं शेवटचं टोक बरोबर लोकेट करता यायला हवं.

अजून एक विचारायचं होतं, आत्याचेच यजमान होते म्हणून आम्ही तसं केलं. पण बाहेर कुठे अनोळखी व्यक्तीला किंवा थोड्याफार ओळखीच्या व्यक्तीला इमर्जन्सी म्हणून सीपीआर करावं लागलं आणि दुर्दैवाने ते यशस्वी नाही झालं तर सीपीआर देण्यार्‍याला दोष येऊ शकतो का? कधी कधी मेडिकल हेल्प मिळायच्या आतच ही वेळ येऊ शकते.

जबरदस्त अनुभव. खरच, सर्वसामान्याना कळेल अश्या भाषेत लिहील्यामुळे वाचायला खूप मजा येते. सीपीआर बद्द्ल वाचायला हवे नक्की.

एक बाळबोध प्रश्न - हार्ट अटॅक आल्यावर रुग्ण डोळे फिरवतो म्हणजे नक्की काय? खरच त्याचे डोळे (बुब्बुळ) फिरतात का? असे का होत असावे?

Pages