मराठी सिरिअलच्या प्रेक्षकांना विनंती....

Submitted by उडन खटोला on 21 July, 2014 - 03:04

मी अनेक वर्षापासुन मराठी सिरिअल्स बघत नाही...पण काल एका चॅनलवर काही मिनिटे थांबलेलो असताना "होणार सुन मी या घरची" नावाची एक सिरिअल बघितली (मोजुन ५ मिनिटे) आणि मराठी सिरिअल्सच्या वाढत्या लोकप्रियतेबरोबर घसरलेल्या निर्मितीमुल्यांची अक्षरश: कीव आली....मुख्यत्वेकरुन मनोरंजन हा भाग सिरिअल्सच्या किंवा मालिकांच्या निर्मितीमागे असतो. काहीवेळा मनोरंजनाबरोबर प्रबोधन, विनोद, समाजातील तत्कालीन घटनांचे अवलोकन करुन मांडलेले वास्तववादी चित्रण हे देखील अनेक मालिकांमधुन (पुर्वी) पहायला मिळत असे. कालची सिरिअल म्हणजे, पाचेक मिनिटातच मला अक्षरश: वीट आला अशी होती....
१) सामान्य प्रेक्षकांना सहजासहजी पचनी पड्णार नाहीत असे साहित्यातील जडबंबाळ शब्द ( जे आपण बोलताना किंवा बोलीभाषेत चुकुनही वापरत नाही) वाक्या वाक्यात पेरलेले होते. अशा शब्दांची वाक्ये बनवुन उद्या आपण बोलायला लागलो तर लोकं वेड्यात काढतील...अभ्युदय, अभिव्यक्ती, अप्रत्यक्षपणे वगैरे वगैरे...आणि या शब्दांच्या प्रचंड जडबंबाळ गुंतागुंतीतुन कथालेखकाला आवडेल असे तत्वज्ञान लोकांच्या माथी मारण्याचे उद्योग असह्य आहेत. जुन्या सिरिअल्समध्ये शब्दांचा वापर आणि वावर हा बराच सुसह्य होता. हमलोग, बुनियाद या हिंदीतल्या मालिका, मराठीतील चिमणराव गुंड्याभाऊ, किंवा अगदी आत्ताअत्ता आलेली अग्निहोत्र, झोका (श्रीरंग गोडबोले यांची) किंवा श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकांमध्येही उत्तम संवाद होते आणि त्या संवादात एक सहजता होती, कोणताही भाषीक-शाब्दिक अभिनिवेश नव्हता...
२) अभिनयाच्या बाबतीत काल मी बघितलेली अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान ही इतकी प्रचंड ओव्हर-ऍक्टींग करत होती की मी थक्क झालो. बोलण्यातला सहजसाधेपणा दाखवायलाही तिला अभिनय करावा लागत होता ( याच चुका पुर्वी निशिगंधा वाडने केल्या आहेत)...सोनाली कुलकर्णीही कधीकधी "मी अगदी तुमच्या आमच्यासारखं बोलतेय" हे दाखवायला असं कृत्रिम सरळसोप्पं बोलते..तो अभिनय आहे हे समजतं...कुठेतरी आपण Girl next door आहोत हे इतरांना आवडलंय, लोकांनी आपल्याला डोक्यावर घेतलंय, आपण खरोखरच एक अतीआदर्शवादी सुन आहोत हे महाराष्ट्रातल्या तमाम सासवांना पटलंय असा गोड गैरसमज तिने करुन घेतलेला आहे...असो. असा वास्तववादी (loud) अभिनय आजच्या लोकांना आवडतो आहे हे त्या सिरिअलच्या वाढत्या टीआरपीवरुन दिसतंय यावरुनच महाराष्ट्रातील तमाम मराठी मालिका प्रेक्षकांच्या अभिरुचीवर आता अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत...असं माझं स्पष्ट मत आहे.
३) कथानके देखील व्यवहारात "अशक्य" वाटणारी, वारंवार "असं कसं घडु शकतं बरं?" असे प्रश्न निर्माण करणारी आहेत. कोणाची स्मृती जाते काय? कोण नात्यातल्याच बहिणभावंडांवर कुरघोडी करण्यासाठी सतत कसलेतरी भंकस प्लॅन करतो काय? नणंदा भावजयांवर आणि भावजया नणंदांवर काय काय कृष्णकृत्ये करत असतात? भरजरी साड्या घालुन, दुष्टाव्याचा फील आणण्यासाठी उभ्या टिळ्यापासुन काळ्या कुंकवापर्यंत काहीतरी भडक मेकप करुन दुष्टाव्याने बोलायचं काय?....सगळंच असह्य...नुसत्या अभिनयातुन आणि बोलण्यातुन दुष्टावा दाखवणाऱ्या दया डोंगरे, पदमा चव्हाण,ललिता पवारांना असले भडक मेकप कधीच करावे लागले नव्हते...ही सगळी एकता कपुरछाप हिंदी हिणकस मालिकांमधुन घेतलेली कथानके, मेकपचे तंत्र हे आपण मराठी दिगदर्शक निर्माते कधी झुगारुन देणार आहोत?
४) निर्माते आणि दिग्दर्शकांचंही फार चुकतंय असं नाही. बरेच प्रमाणात आपल्या प्रेक्षकांचाही दोष आहेच हे मुद्दाम नमुद करावेसे वाटते. वाट्टेल ती कथानके, हिणकस अभिनय, भडक संवाद यांना आपण प्रेक्षकच डोक्यावर घेतात, रोज नित्यनेमाने ती सिरिअल बघतात...म्हणुन त्याचा टीआरपी वाढतो आणि दिवसेंदिवस अशाच छापाच्या रद्दड मालिका आपल्या माथी मारल्या जातात. कुठेतरी सातत्याने प्रेक्षकांनी आपला विरोध हा अनेक माध्यमांतुन निर्माता दिग्दर्शकापर्यंत पोहोचवायला हवा, मालिकांवर बहिष्कार टाकायला हवा असं माझं प्रांजळ मत आहे. तरच त्यांचे डोळे उघडतील आणि चांगल्या दर्जेदार कथानकांवर आधारित, भक्कम बांधणीच्या, उत्तम अभिनय असलेल्या मालिका आपल्याला पहायला मिळतील. for a change म्हणुन एकाही दिग्दर्शकाच्या मनात जुन्या कथानकांवर आधारित (चिमणराव गुंड्याभाऊ सारख्या) नवीन मालिका बनवुन ते कथानक पुनरुज्जीवित करावं असं येत नाही याचं आश्चर्य वाटतं...
....मराठी व हिंदी मालिकांच्या प्रेक्षकांनो स्वत:ची अभिरुची बदला, चांगलं वाचा, चांगलं लिहा, चांगलं पहा....ही सवय लावुन घ्या....जुने अभिरुचीसंपन्न विनोद वाचत जा, जुन्या कथाकादंबऱ्या वाचा, नव्या लेखक-कवींनीही खुप नवीन सृजनात्मक लिहिलं आहे ते वाचत जा...पण या सांसारिक कटकटी, हेवेदावे यापलिकडचं विश्व नसलेल्या मालिका बघणं बंद करा
(आधारित)
साभार-सचिन मधुकर परांजपे (पालघर)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जे घरात असतात त्यांना काही ऑप्शनच नाहीये, आजकाल चांगल्या आणि दर्जेदार मालिकाच येत नाहीत ( एकता कपुरची कृपा) तर प्रेक्षक काय करतील

र्माते आणि दिग्दर्शकांचंही फार चुकतंय असं नाही. बरेच प्रमाणात आपल्या प्रेक्षकांचाही दोष आहेच हे मुद्दाम नमुद करावेसे वाटते. वाट्टेल ती कथानके, हिणकस अभिनय, भडक संवाद यांना आपण प्रेक्षकच डोक्यावर घेतात, रोज नित्यनेमाने ती सिरिअल बघतात..<<< हे सार आहे. त्यामुळे दुसर्‍याला दोष देण्यात काही अर्थ नाही. आपण पाहिलंच नाही तर मालिका बंद पडणार हे निश्चित.

कविता, टीवीवर असंख्य चॅनल्स आहेत आणी त्यामध्ये उत्तमोत्तम कार्यक्रम चालू असतात. आपण पाहतो का हा प्रश्न आपल्याला विचारायला हवा!!

नंदिनी , बरोबर आहे तुमचं पण मी हे घरात असणार्‍यांबद्द्ल लिहीलंय , मी स्वतः जॉब करते आणि शक्यतो अश्या सीरीयल्स पाहत नाही, बर्‍याचदा ही चर्चा घरात आणि शेजारी झालीये ,त्यांच जे उत्तर आहे तेच लिहिलंय.

लेख छान वाटला. चपखल शब्दांत उतरवलेला आहे.

वेळ मिळाला आणि रस असला तर ह्यावरतीही धावती नजर टाकावीत. (ही रिक्षा नाही, विषयाशी संबंधीत म्हणून नोंदवत आहे इतकेच)

http://www.maayboli.com/node/46731

http://www.maayboli.com/node/48719

मला वाटते प्रेक्षकांना अधिक चांगले पर्याय मिळाले तर प्रेक्षक नक्की स्वीकारतील ते! Happy

धन्यवाद!

नळी फुंकली सोनारे ,इकडून तिकडे गेले वारे
गाढवापुढे वाचली गीता , कालचा गोंधळ बरा होता
पालथ्या घड्यावर पाणी
यातील जी कोणती म्हण आवडत असेल ती स्वतःवर लागू करावी आणि चालायला लागावे

सर्व मालिकांवर जोरदार बंदी घातली पाहिजे आणि लहान मुलांसाठी मनोरंजक, ज्ञानवर्धक मालिका,
मोठ्यांसाठी खाणे आणि फिरणे संबंधित मालिका. रोजच्या जिवनात उपयोगी पडतील असे ज्ञान देणार्या मालिका असाव्यात असे फार वाटते.

का म्हणून? (मधू मुलुष्टे चालीत वाचावे)
काय मोठ्यांना मनोरंजन नको असते? काय लहान मुलांना खाणे व फिरणे आवडत नाही?
आज औरंगजेब असता, तर त्याने मालिकाच काय, सर्वच टीव्ही प्रोग्राम्सवर बंदी घालून फक्त कुराण टीव्ही, गॉड टीव्ही, संस्कार टीव्ही इ. वाहिन्या सुरू ठेवल्या असत्या. Wink

आमची अभिरुची फक्त उच्च दर्जाची, बाकीच्यांची फाल्तू अश्या अहंगंडातुन हा लेख आला आहे.

मला पण नाही आवडत मालिका, मी बघत नाही. ज्यांना आवडतात त्यांन्नी बघाव्यात की.

तेजश्री प्रधान समोर असताना, ती काय अभिनय करते आहे हे बघणे म्हणजे अरसिकता च आहे.
मी तर त्या सीरीयल मधल्या ५ जाड्या बायका सुद्धा सहन करतो तेजश्री प्रधान साठी.

मी तर त्या सीरीयल मधल्या ५ जाड्या बायका सुद्धा सहन करतो तेजश्री प्रधान साठी.>>>>>तेजु त्याच मार्गावर आहे आता.:दिवा:

तेजु त्याच मार्गावर आहे आता.>>>>>> हे दुर्दैवाने खरे होताना दिसते आहे. असेच चालू राहीले तर दुसरी मालिका शोधायला लागेल.

जुने एपिसोड रेकॉर्ड करून किंवा यूट्यूबवरून पहा की Wink नैतरी आपण कथानक, अभिनय इ. साठी थोडंच पहाणार आहोत? 35.gif

आमची अभिरुची फक्त उच्च दर्जाची, बाकीच्यांची फाल्तू अश्या अहंगंडातुन हा लेख आला आहे.<<<

नाही पटले. तसा काही पवित्रा भासला नाही लेखात! क्षमस्व!

५ जाड्या बायका सुद्धा सहन करतो तेजश्री प्रधान साठी
/
मग आपलं बर चाललेय …. श्रेनु पारीख स्टार प्लस वर, सोबत दोघी पण मस्त आहेत. सासू तिची बहीणच जास्त वाटते

माननीय रा.रा. श्री उर्फ़ श्रीरंग गोखले .... आपल्या पत्नी सौ. जान्हवी यांची स्मृती गेल्याचे गेल्या महिन्यात समजले.... तुमच्या अथक प्रयत्नांना अजूनही यश येत नाही म्हणून काही सूचना वजा उपाय सुचवित आहे.

मुळातच सौ. जान्हवी यांची स्मृति स्पेशल टाईप ने गेली आहे .... म्हणजे त्यांना बरोबर घरचे सगळे आठवते फ़क्त लग्न आठवत नाही. तुम्ही स्वतः कधी त्यांना भेटत होतात... ते आठवत नाही.... त्यांच्या Bank मध्ये तुमचे अकाउंट होते.... तुम्ही त्यांचे प्रीमियम client होतात, असले काहीही आठवत नाही... हे विशेष. असो उपाय सांगतो.....

१. तुमच्या घरी एवढ्या बायका आहेत, त्यांच्या हौसेकरीता किमान तुमच्या लग्नाचे विडियो शूटिंग केले असेल, गेला बाजार किमान फोटो तरी काढले असतिल तर एक नेहमी प्रमाणे सोहळा आयोजित करून त्या जान्हवीला ते फोटो नाहीतर लग्नाची सीडी दाखवा.

२. परत एक एक्सीडेंट चे नाटक करा, गाडी खरी वापरा....

काहीही करा पण तुमच्या बायकोची स्मृति परत आणा.
...म्हणजे आम्ही एकदाचे मोकळे होउ.

ऐन वेळी महत्वाची Match चालू असताना, तुमच्या या रडारडी चा कार्यक्रमासाठी बायको रिमोट काढून घेउन Channel बदलते .... यातील आमचे दुःख शब्दातीत असते.

सोडवा एकदा ... दया करा.

आपला
एक त्रस्त नवरा....

साभार - व्हाटसअ‍ॅप

>>काय मोठ्यांना मनोरंजन नको असते? काय लहान मुलांना खाणे व फिरणे आवडत नाही?
अहो अगदी शब्दशः अर्थ घेऊ नका (अंतू बर्व्यासारखे खेकसून), साधारण कल्पना दिलेली आहे,
अगदी असेच्या असेच असावे असे नाही, पण या सद्ध्या चालू असलेल्या भुक्कड मालिका नकोत.

सिरियल्स न बघणे हाच उपाय आहे. किमान पक्षी करमणूक तरी झाली पाहिजे ना? उबग येतो चुकून कधी या सीरियल्स दिसल्या
तर!
टीव्हीवर इतर अनेक चांगले कार्यक्रम असतात की!

आमची अभिरुची फक्त उच्च दर्जाची, बाकीच्यांची फाल्तू अश्या अहंगंडातुन हा लेख आला आहे.<<<

नाही पटले. तसा काही पवित्रा भासला नाही लेखात! क्षमस्व!>>>>>>>>

@बेफी, माझी अभिरुची उच्च आहे हा पवित्रा दाखवणारी लेखातली काही उदाहरणे.

१. मराठी सिरिअल्सच्या वाढत्या लोकप्रियतेबरोबर घसरलेल्या निर्मितीमुल्यांची अक्षरश: कीव आली...
२. असा वास्तववादी (loud) अभिनय आजच्या लोकांना आवडतो आहे हे त्या सिरिअलच्या वाढत्या टीआरपीवरुन दिसतंय यावरुनच महाराष्ट्रातील तमाम मराठी मालिका प्रेक्षकांच्या अभिरुचीवर आता अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत...असं माझं स्पष्ट मत आहे.
३. सगळी एकता कपुरछाप हिंदी हिणकस मालिकांमधुन
४. वाट्टेल ती कथानके, हिणकस अभिनय, भडक संवाद यांना आपण प्रेक्षकच डोक्यावर घेतात, रोज नित्यनेमाने ती सिरिअल बघतात...म्हणुन त्याचा टीआरपी वाढतो
५. मराठी व हिंदी मालिकांच्या प्रेक्षकांनो स्वत:ची अभिरुची बदला, चांगलं वाचा, चांगलं लिहा, चांगलं पहा....ही सवय लावुन घ्या....जुने अभिरुचीसंपन्न विनोद वाचत

>>>>तेजश्री प्रधान समोर असताना, ती काय अभिनय करते आहे हे बघणे म्हणजे अरसिकता च आहे.
मी तर त्या सीरीयल मधल्या ५ जाड्या बायका सुद्धा सहन करतो तेजश्री प्रधान साठी.
.
तू काय घोडा हाय काय रे

पण मुळातच आपन टी व्ही मनोरंजन म्हणुन पाहतो ना..सिरियल्स मला पण आवड्त नाही..मला डब्ल्यु डब्ल्यु पाहयला आवडते.पण आता घरि साबा आनी जाबा पाहतात सिरियल्स मला चॉईसच नाये..पण मनोरंजन म्हणुन पाहते मग..नवीन नवीन साड्याचे,ड्रेसचे पॅर्टन पाहता येतात....

मी टीव्ही सिरीयल बघणं क्षणात सोडते. फक्त एकच नाही सोडू शकले प्रयत्न करूनही ती म्हणजे 'माझे मन तुझे झाले', आधी खूप चांगली होती पण गेले तीन महिने बोअर झाली. अर्थात मध्ये मध्ये मी gap घेतली पण सुटली नाही हे खरं. नाहीतर राधा, सून, बे दुणे दहा एका क्षणात बघायच्या सोडल्या त्यापेक्षा डिस्कव्हरी, TLC वगैरे बघते.

लोक सिरीयल आवडत नाहीत तरी त्या बघण्यात आपला अमुल्य वेळ फुकट घालवतात आणि ती किती वाईट आहे आणि का आवडत नाही याची पुन्हा चर्चा करण्यात अजून . ती का बघावी लागते याचे स्पष्टीकरण देण्यात अजून काही वेळ वाया.

मालिका बनवणारे आपल्याला त्या बघण्यासाठी जबरदस्ती करत नाहीत. त्या बघणे न बघणे आपल्या हातात आहे. इतर चांगले कार्यक्रम पण असतात . आणि तसे ही टिव्ही ऑन असलाच पाहिजे अशी सवय आपणच लावून घेतो न?

@ उडन खटोला
तरी बरे तुम्ही फक्त पाचच मिनिटे बघितलेत
जास्त बघितले असते तर एक एक भारी विषय आणि मराठी परीक्षकांच्या आवडी निवडी कळल्या असत्या.
आत्ताच बंद झालेल्या तू तिथे मी चा विषय Satyajit Mudholakar and his incest sexual relationship with his cousin sister Riya
चांगले तीन वर्ष चालले ते झेंगट. याच मायबोलीवर धागा पण होता, कोणी आक्षेप तर सोडा चांगले तीन वर्ष सगळे मजेत चालले होते.
आमच्याकडे चालते असले ?
गप्प डोके बाजूला ठेवा आणि बघा , असेपण तुम्ही लकी आहात फक्त पाच मिनिटात चैनल बदलला तरी तुमच्या घरात.
प्रेक्षकांना विनंती वगैरे करण्यासाठी मायबोली हि साईट नक्कीच नाही.
इथे फक्त अय्या तो हिरो किती छान दिसतो आणि हिरोयीन ची साडी किती छान होती यावर चर्चा करा.
इथले लई भारी विनोद फक्त जुन्या मायबोलीकरानाच कळतात.
नव्या येर्या गबाळ्याच ते काम नाय.

च्यामारी, गोखले आणि सहस्त्रबुध्दे यांच्या घरात काय चाललय हे पहायला श्री परांजपे यांना काय जड झाल आहे काही समजत नाही. घरात बोलतो असे संवाद ( नाटकी नसतील ) तर त्याच नाट्य होणार कस ?

काही वेळा संस्क्रुती नाही जुळली तर पहाण्यात रस निर्माण होत नाही म्हणुन ज्ञातीचा उल्लेख होता.

श्रीला निसर्गाविषयी प्रेम आहे. श्रीच्या घरचे मंडळी व्यवसाय निपुण आहेत. ते सामन्य मराठी माणसांसारख्या नोकर्‍या करत नाहीत. जान्हवीची आई लुबाडणारी असली तरी वडील तत्वाशी मुरड करत नाहीत. इ किती चांगल्या गोष्टी या मालिकेतुन दिसतात.

सदान कदा सासु - सुनांची भांडणे, विबांस इ पहाण्यापेक्षा ही मालिका चांगल देऊन जाते अस माझ मत आहे.

काही लोकांना मराठी सिनेमे, मालिका या विषयी नावड असते त्याबद्दल माझा आक्षेप नाही.

लेखाच्या निमित्ताने गंगाधर टिपरेंची आठवण काढलीत, हे झ्याक झाले.

आजही काही ज्येष्ठ कलावंत सहज वावरावे तसे अभिनय करून जातात. आणि खरे तर त्यांच्यामुळेच बराचसा भाग सुसह्य होतो.

डेलीसोप म्हटले की हे चालायचेच हे स्विकारायला हवे.

बाकी विनंती कितीही रास्त असली तरी आई रिटायर्ड किंवा बायको हाऊसवाईफ असेल तर मात्र पर्याय खुंटतात.