ती दोन पावसाळी गाणी...

Submitted by अतुल ठाकुर on 4 July, 2014 - 01:47

rain.jpg

लताच्या आवाजाचे पावसाशी नक्की काय नाते आहे मला माहीत नाही मात्र काहीतरी गहीरे नाते असावे याची खात्री आहे. याचं कारण असं की पावसाची कुठलीही गाणी गाताना तिचा आवाज पाण्याने नखशिखांत चिंब भिजल्यासारखा वाटुन त्याला वेगळाच गोडवा येतो. वरील दोन्ही गाण्यात ही गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवते. पुढे जाण्याआधी काही गोष्टींचा उल्लेख येथे करुन त्यांच्यापासुन सुटका केलेली बरी. दोन्ही गाणी पावसातील आहेत. हिन्दी चित्रपटात बरेचदा पाऊस कशासाठी वापरतात याची माहीती जाणकारांना मुद्दाम देण्याची गरज नाही. त्या दृष्टीने सजेशा नायिका या गाण्यात आहेत आणि कॅमेराने आपले काम व्यवस्थित केलेले आहे. मात्र दोन्ही गाणी अतिशय सुरेख चालीने बांधलेली असुन रसिकांमध्ये कित्येक वर्ष लोकप्रिय आहेत. दोन्ही लता किशोरने गायिली आहेत आणि दोन्हीचे संगीत पंचमने दिलेले आहे. त्यादृष्टीने त्यांची तुलना करणे गमतीशीर होईल. अभिनेत्यांबद्दलही बोलावे लागेलच कारण गाणे पाहताना त्यांच्या अभिनयाचाही भाग त्या गाण्याचा परिणाम गहिरा करण्यासाठी होत असतोच.

पहिले गाणे काका आणि झीनतचे आहे. “अजनबी” चित्रपटात ही जोडी शोभुन दिसली होती. झीनतने वाईट काम केल्याचं मला तरी आठवत नाही मात्र तिचा शहरी लहेजा आणि लूक ही तिची मर्यादा ठरली असावी. या गाण्यात ती सर्वार्थाने सामिल होऊन ते गाणे स्वतःच एंजॉय केले असावे असे वाटण्याइतपत तिने सुंदर अभिनय केला आहे. काकासाहेबांची मान जास्त तिरपी होत नव्हती तेव्हाच्या देखण्या राजेशखन्नाचा हा चित्रपट आहे. आपल्या नृत्याच्या मर्यादा त्याने नेहेमीच अभिनयाने भरुन काढल्या आणि नृत्याची स्वतःची शैली पडद्यावर पेश केली. त्या शैलीची कितीही थट्टा होऊ दे पण अशा गाण्यात काकाचे नृत्य मस्त वाटते हे एकदम मान्य व्हावे. आधी भिजायला नकार देऊन नंतर विजेच्या कडकडाटाने घाबरुन प्रियकराच्या बाहुपाशात शिरणारी आणि त्यानंतर बेहोश होऊन पावसात भिजणारी झीनतची नायिका मस्त. बाकी गाण्याचे सोने करावे ते राजेश खन्नानेच. ते सामर्थ्य अमिताभचेही नाही असे माझे नम्र मत आहे.

दुसृर्‍या गाण्यात जंपिंग जॅक जितेंद्र असुन त्याला जंप करण्यास फारसा वाव दिलेला नाही. निव्वळ गाणे म्हणुन हे पहिल्याइतकेच श्रवणीय असले तरी राजेशखन्नाचे गाणे पाहण्याच्या दृष्टीने जास्त उजवे आहे असे माझे मत आहे. यात अर्थातच मतभेद असु शकतात. पण रिना रॉय सुंदर दिसली तरी ज्या तर्‍हेने झीनतने गाण्यात स्वतःला झोकुन दिल्यासारखे वाटते तसे येथे वाटत नाही. जितेंद्रला काही विशेष करण्यासारखे यात नव्हतेच. एकुणच गाणे जास्त सेन्शुअल आणि इरॉटीक करण्याच्या नादात काही स्टेप्स या टिपिकल घेतल्या गेल्या असुन त्यात पुढे नाविन्य असं वाट्त नाही. रिना रॉयचा उत्तान वेष आणि तिच्या चेहर्‍याचा पाण्याने निथळणारा क्लोजअप यापेक्षा पाण्यात बेहोश होऊन गाणारी झीनत मला जास्त इरॉटीक वाटली.

गाण्यात मात्र लताबाईंनी बाजी मारली आहे. गाणे न पाहताही प्रियकराबरोबर पाण्यात खेळताना त्याला आवाहन देणारी, काहीवेळा खोडकर तर काहीवेळा त्याला चेतवणारी प्रेयसी फक्त आवाजातुन उभी करण्याची किमया लताच करु जाणे. निव्वळ आवाजात सेन्शुअल्नेस आणणे याबाबत आशाचे कौतुक कितीही झालेले असो मात्र लता जेव्हा या क्षेत्रात प्रवेश करते तेव्हा एकुण सर्व परिणामच जास्त गडद होतो असे माझे मत आहे. किशोरची साथ उत्तमच. दोन्ही नायकांना त्यांच्या अभिनयाची, चेहर्‍यावरील हावभावाशी जुळेल असा चपखल आवाज देण्यात किशोरदांनी सिद्धीच प्राप्त लेकी होती असं म्हटल्यास वावगं ठरु नये. पडद्यावर काका म्हणजे काकाच गातो आहे आणि जितेंद्र म्ह्णजे जितेंद्रच गातो आहे असे वाटावे इतका परकायाप्रवेश किशोरदा करु शकतात.

दोन्ही गाण्यांच्या सुरेख चाली आरडीने बांधल्या आहेत. जाणकारांना ही पंचमदांच्या मुशीतली गाणी आहेत हे जाणवावे इतकी त्यावर आरडी छाप आहे. आरडी ऐन भरात असतानाचे हे संगीत. दोन्ही गाण्यात सरस कुठले हे निदान मला तरी ठरवता आले नाही इतकी ही दोन्ही गाणी मला आवडतात. “अबके सावन में जी जले” हे आपल्याला विचार करायला वेळ न देता आपलीच अवस्था “मनमें लगे आगसी ” अशी करुन टाकते तर “भीगी भीगी रातोंमे” हे काहीसे संथ चालीतले गाणे रसिकाला डोलायला लावते. त्यातील वाद्यांचे काही पिसेस आणि ती चाल आपल्याला कुठेतरी भुतकाळात नेऊन आपल्याच आयुष्यातल्या काही प्रसंगांवर जलवर्षाव करते आणि ती जुनी कळ जागी होते, हुरहुर लागते…

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users