परिणाम ! ( गफलत भाग २ )

Submitted by कवठीचाफा on 26 December, 2008 - 11:37

दोस्तलोक,
कथामालिका तयार करण्याचा माझा प्रयत्न चालुच आहे `गफलत' चा पुढचा भाग म्हणुन त्यातली कथा पुढे चालु करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रयत्न केलाय आता तुम्ही ठरवायचे असेच एकमेकात गुंफत कथामालिका लिहीत जायचे की.....
****************************

आदित्य, माझा खास मित्र, सध्या काहीतरी सैरभैर झाल्यासारखे वागतो. एकदम नक्की सांगायचं झालं तर तो त्या `झांबीडी' नावाच्या गावाला जाउन आल्यानंतरच. त्याच्या लेखाला योग्य तो प्रतीसाद न मिळाल्यामुळे असु शकेल कदाचीत. आणि तसं असेल तर त्यात अशक्य असं काही नाही कारण आपल्या लेखाच्या प्रसिध्दीसाठी कुठे कुठे फ़िरला हा माणुस.... पण त्याला योग्य न्याय मिळाला नाहीच.
त्या दिवशी मी त्याच्याकडे गेलो तेंव्हाच त्याची अवस्था पाहुन मला वाईट वाटले. खरोखर उत्तम आणि अभ्यासपुर्ण लेखन असते त्याचे अर्थात त्याची मेहनतही तितकीच असते त्या मागे. एकेका दंतकथेचा मागोवा घेत त्याचे सध्याचे भौगोलीक ठिकाण शोधत त्यातली सुक्ष्मांशाने असलेली तथ्ये शोधत फ़िरणे म्हणजे नक्कीच दमवणारे काम आहे. पण तो ते आवडीने करतो तरीही त्याच्या मागचे दुर्दैवाचे शुक्लकाष्ठ काही सुटत नाही.
आता त्या शषाल आणि शेषालच्या दंतकथेबद्दलच घ्या ना ! इतक्या दुर निलगीरी पर्यंत जाउन या माणसाने त्या दंतकथेची शहानिशा केली आणि त्याच्या नशीबी काय तर भुक्कड अंधश्रध्देवर विश्वास ठेवतो म्हणुन उपेक्षा, अर्थात त्यानेही तो काळ्या मांजराच्या फ़ोटोचा स्टंट करायला नको होता म्हणा ! पण अतिरीक्त ताण पडल्याने असे झालेही असेल.
त्या दिवशी.......... दिवशी कसला रात्री, मी त्याच्याकडे गेलो तेंव्हा मला जे जाणवले ते मी मोकळेपणे त्याला सांगुन टाकले खरे पण मलाही आता त्या प्रकारात रस वाटायला लागलाय. जर त्याच्या घरुन जाताना मला अपघात झाला नसता तर एव्हाना मी त्या झांबीडीत पोहोचलोही असतो. आता रस्त्यावर गाडी घसरुन अपघात होत नाहीत का कधी ? पण त्या मागेही या माणसाने त्याचे अजब तर्कट लावले. म्हणे त्या काळ्या मांजराच्या फ़ोटोमुळे हे घडले !
असो तो काही खास मुद्दा नाही पण एकंदरीत आता बरा झालोयच तर त्या झांबीडी गावाला एक भेट द्यावी असे म्हणतोय ! त्या मुर्ती म्हणजे खरोखर ममीज आहेत की नुसती फ़ोटोग्राफ़ीक ट्रीक ते तरी पहायलाच हवं ! एकुणच पुराणातली शस्त्र आणि अस्त्र हा माझा अभ्यासाचा खास विषय असल्यामुळे जर खरोखर त्या ममीज पहाता आल्या तर अनुभवात एक नवीन भर पडेल हे नक्की.

हेच ते झांबीडी तर ! आदित्य म्हणाला होता तसंच किचकट गाव दिसतय खरं. आता उन्हं कलायला लागलीत त्यामुळे बाकी सगळं सकाळी पाहु, म्हणजे गावं नाही बरं का ! गाव तर एका नजरेतच आख्खं दिसतय इतकं लहान आहे. बरोबर टेंट आणलाय ते एका अर्थी बरं आहे नाहीतर या गावात रहाण्याची सोय होण्याची शक्यता नाहीच. आणि बाहेर रहायचं तर थंडीने गोठुन जायची वेळ येईल.
थंडीमुळे असेल पण लवकर जाग आली आणि सुर्य उगवण्याच्या आतच मी टकटकीत जागा झालो. सकळची सगळी आन्हीकं गावाबाहेरुन वहाणार्‍या एकमेव नदीवर आवरुन आता मी त्या मुर्तींकडे जायला तयार आहे. रस्ता अर्थातच एखाद्या गावकर्‍याला विचारावा लागेल, पण ठिक आहे. तितकी मदत हे गावकरी नक्की करतील याचा अनुभव आदित्यनेही घेतलाच आहे. मला आता लवकरात लवकर तिथे पोहोचायचेयच.
सापडले एकदाचे ते मंदीर. ‘इथे जवळच’ म्हणता म्हणता तीन चार मैल चालायला मात्र लागले, गावातल्या माणसांची सांगण्याची अंतरे नेहमीच फ़सवी असतात. आपल्याकडे नाही का ! हाकेच्या अंतरावरची ठिकाणे एखाद मैलावर असतात तसाच प्रकार. पण इथले दृष्य पहाण्यासारखे नक्कीच आहे. चारही बाजुच्या लहान लहान टेकड्या आणि मधेच वाटीसारख्या आकाराचं हे मोकळं पटांगण. याबद्दल काही बोलला नाही आदित्य ! अर्थात तो इथल्या निसर्गाचा आनंद घ्यायच्या मुड मधे नसणारच. आणि त्या पटांगणाच्या मधोमध लहानश्या घुमटीखाली असलेल्या त्या जुळ्या मुर्ती सध्यातरी मुर्तीच म्हणतो जर मला वाटतय तश्या ममीज असल्या तर पुढची गोष्ट.
माझ्या नेहमीच्या पध्दतीप्रमाणे मी आजुबाजुच्या परीस्थीतीकडे आणि अवषेशांकडे बारकाईने पहायला सुरुवात केली. कधी कधी एखादी लहानशी गोष्ट आपल्या नजरेतुन सुटते आणि कदाचीत तीच महत्वाची असु शकते. त्या घुमटीच्या भोवती एक चक्कर मारल्यावर एक गोष्ट प्रामुख्याने माझ्या लक्षात आली ती म्हणजे घुमटीची अवस्था फ़ार वाईट होती. जागोजाग ढासळलेल्या बांधकामाचे अवषेश पसरलेले होते. पण लक्षणीय गोष्ट म्हणजे दोन्ही मुर्ती जणु आत्ताच कोरल्याप्रमाणे व्यवस्थीत होत्या. आदित्यने घेतलेल्या फ़ोटोग्राफ़मधे खरोखर काही ट्रीक नव्हती. मुर्ती खरोखर आगदी प्रमाणबध्द आकारात आणि रेखीव दिसत होत्या. जणु आत्ता डोळे उघडतील. माझ्या मनातल्या स्पर्शास्त्राच्या संकल्पनेने पुन्हा उचल खाल्ली. आता यांच्या प्रतापाबद्दल मला माहीत असल्यामुळे मी मन शक्य तितके कोरे ठेवण्याचा प्रयत्न करत राहीलो. मुर्तींचे निरीक्षण संपवल्यावर जरा थकल्यासारखे वाटले, कुठेतरी जरा विसावा घ्यावा म्हणुन आजुबाजुला नजर फ़िरवली. मोकळ्या पटांगणाच्या बाजुला दिसलेल्या एकमेव झाडाखाली विसावण्यायोग्य जागा दिसली मग तिथेच सोबत आणलेली फ़ोल्डींग चटई अंथरुन मी विसावलो.
बरोबर सकाळीच तयार करुन आणलेल्या चहाचा थर्मास होताच आणि अश्या अडचणीच्या जागी जाताना मी नेहमी नेत असलेले डबाबंद खाद्यपदार्थही. त्यांचा यथेच्छ समाचार घेउन मी एक सिगारेट शिलगावली. धुराची वलये हवेत सोडतानाच मी आदित्यच्या लेखात वाचलेल्या दंतकथेबद्दल विचार करत होतो. खरोखर त्यात तथ्य असेल? खरोखर त्या मुर्ती आपल्या मनातली इच्छा पुर्ण करत असतील? आता याची परीक्षा घ्यायची म्हणजे काहीतरी मागणे आले आणि जर आदित्य म्हणतो तसे घडत असेल तर ? उगीच विषाची परीक्षा नकोच.
सिगरेट आणि आराम संपवुन पुन्हा मुर्तींचे विश्लेषण करायलाच हवे होतेच. पुन्हा एकदा मुर्तींच्या सहवासात जायच्या कल्पनेने का कुणास ठाऊक अंगावर शहारा आला.
यथावकाश माझ्या सगळ्या कसोट्या लाउन मी दोन्ही मुर्त्या तपासल्या. त्या कसोट्यांबद्दल मी अर्थातच सांगणार नाही, कारण शेवटी ते माझे स्वत:चे गुपित आहे. पण आता माझी पुर्ण खात्री झालीये की या मुर्ती नाहीतच. आदित्यच्या दंतकथेत नक्कीच तथ्य आहे या दोघांवर स्पर्शास्त्राचा प्रयोग झाला असावा. या ममीजच आहेत हे आता नक्की झालंय.

पुरातन काळात आर्य आणि द्रवीड अश्या दोन परस्पर विरोधी संस्कृती अस्तित्वात होत्या. त्यांच्यात कायम युध्दं होत असत, त्यातल्या आर्य संस्कृतीकडे अश्या स्पर्शास्त्र, वातास्त्र, वाताकर्षणास्त्र अश्या अनेक अस्त्रांची माहीती होती. त्या मुळे ते जवळपास अजिंक्य होते. या अश्या बलाढ्य आर्य संस्कृतीशी लढताना हे दोघे स्पर्शास्त्राला बळी पडले असावेत. स्पर्शास्त्राचा उपयोग शत्रुला पुतळ्याप्रमाणे एकाच जागी खिळवुन ठेवण्यासाठी होत असे. यासाठी कदाचीत गुरुत्वाकर्षणावर काही प्रक्रीया करुन ते अफ़ाट वाढवल्या जात असावे. या अस्त्राला बळी पडलेली व्यक्ती गोठल्याप्रमाणे एकाच ठिकाणी अडकत असे. यातुन सोडवणे फ़क्त त्यातल्या जाणकारांनाच शक्य होते आणि ते ज्ञान द्रवीड संस्कृतीकडे नक्कीच नव्हते. पण कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यांनी चिरंजिवित्व मात्र प्राप्त केले असावे.
त्या ममीज समोर उभे राहुन मी माझ्याच विचारात गुंतत चाललो होतो. आज मानवाने केलेली प्रगती, अणुशक्ती, नॅनो टेक्नॉलॉजी या त्या काळात कीती पुर्णत्वाला नेल्या गेल्या होत्या याचे हे धडधडीत उदाहरण होते. ‘ जर काही करुन मला या दोघांना या स्पर्शास्त्राच्या अंमलातुन सोडवता आले तर?’ मनात क्षणभर विचार चमकुन गेला. तसे झाले तर कदाचीत ज्ञानाचे एखादे भंडारच आपल्या समोर उघडल्या जाईल...... विचारांच्या तंद्रीत गुरफ़टलेलो असतानाच अचानक बाजुच्या रानातुन घुबडाचा घुत्कार ऐकु आला. आणि मी भानावर आलो. दिवसाढवळ्या घुबड घुत्कारले? मनात अशुभ विचार आल्याशिवाय राहीले नाहीत. आणि त्याच वेळी माझी नजर समोर गेली.........आणि मी दचकलोच, मी आजुनही त्याच ममीजच्या समोर उभा होतो. जर आदित्यने मांडलेले विचार बरोबर असतील तर? माझ्याकडून नकळत का होईना एक मागणे मागितल्या गेले होते. जर ते ‘त्यांनी ऐकले असेल तर?’......... ऐकले असेल तर आणि जर ते पुर्ण होण्याचा आशिर्वाद दिलाही असेल तर मी काही वावगं मागितलं नव्हतं, खरोखर जर त्या दोघांना मी यातुन सोडवु शकलो तर नक्कीच अशी काही माहीती मिळण्याची शक्यता होतीच की ज्यासमोर आजचे विज्ञान तिळमात्र वाटेल.

इतका वेळ उन्हात उभं राहील्यामुळे असेल किंवा आणखी कशाने असेल पण मला जरा भोवंडल्यासारखे झाले म्हणुन मी पुन्हा त्या मघाच्याच झाडाचा आसरा घेतला...... जरावेळ शांतपणे डोळे मिटून बसल्यामुळे थोडी तरतरी आली. आणि मनात पुन्हा विचार गर्दी करायला लागले. खरोखर असे आशिर्वाद वगैरे काही शक्य आहे का? की केवळ काही योगायोग आणि गैरसमजाची मालिका असावी ती?

विचारांच्या नादात आजुबाजुला असलेल्या खड्यांमधले खडे उचलुन मी इकडे तिकडे फ़ेकत होतो. कारण काही नाही फ़क्त हाताला एक चाळा म्हणुन बस्स. असच एक खडा उजव्या हाताला उडवला आणि खण्णकन आवाज आला. खड्याचा असा आवाज?? मी पुन्हा खडा तिकडेच फ़ेकला फ़क्त या वेळी माझे लक्ष त्याच्याकडे होते, खडा उजव्या बाजुला असलेल्या एका दिड-दोन फ़ुट उंचीच्या दगडाच्या एका चौकोनी स्तंभावर आदळला होता. हो स्तंभच ! कारण एकाच दगडात घडवलेला नव्हताच तो, लहान लहान आयताकार दगडांची संरचना होती ती. अर्थात तसेही असले तरी दगडावर दगड आपटल्याने लोखंडावर आपटल्यासारखा खणखणाट नक्की होत नाही. आता मला उत्सुकता शांत बसु देईना ! मनातले सगळे विचार विसरुन मी त्या स्तंभाकडे धावलो.
सहजासहजी नजर पडेल अशी जागा नव्हतीच ती आजुबाजुच्या लहान-मोठ्या दगडांमधे तो स्तंभ वेगळा असा उठुन नक्कीच दिसत नव्हता पण जवळुन पहाताना लक्षात येत होते की तो बनवण्यासाठी किती मेहनत घेतल्या गेली असेल. एकाच मापाच्या दगडी विटा कोणत्याही तिसर्‍या पदार्थाशिवाय एका रचनेत बसवणे सोपे काम नक्कीच नाही. पण मला त्या कलाकृतीपेक्षा महत्वाचे होते मघाच्या आवाजाचे उगमस्थान शोधणे......
फ़ार शोधाशोध करावी लागलीच नाही. त्याच स्तंभाच्या एकाच बाजुला एक धातुचे गोलाकार कडे होते, जुन्या किल्ल्यांच्या, देवळांच्या बांधकामात अश्या कड्या दिसतात घोडे बांधायला त्यांचा वापर करत असावेत. पण अश्या वस्तुची या ठिकाणी मी मुळीच अपेक्षा केली नव्हती, कारण त्या काळात केवळ आर्यच घोड्यांचा वापर करत होते द्रविड नाही. द्रविडांचे वाहन म्हणजे ‘बैल’ त्यासाठी असल्या कड्यांचा वापर होणे शक्य नाही. म्हणजे हा स्तंभ आर्यांचा तर......... ?
मनात विचार चालु असतानाच एकीकडे माझे निरिक्षणही चालुच होते. त्या कडीवरची सध्या दिसत असलेली कलाकुसर नक्कीच द्रवीड संस्कृतीची नव्हती. मी सहजच त्या कडीला हात लावला. अंगातुन एक अनामीक शिरशीरी निघुन गेल्यासारखे वाटले. कडी ओढुन पहाण्याचा प्रयत्न केला पण ती दगडात पक्की बसलेली दिसत होती. मग त्या कडीचे बारकाईने निरीक्षण करत राहीलो, ती कडी ईकडे तिकडे हलवताना माझ्या हातुन नक्की काय झाले ते मलाही कळले नाही. पण अचानक जमिनीखालुन काही घरघराट ऐकु यायला लागला. दचकुन मी बाजुला झालो आणि पहाता पहाता समोरच्या स्तंभाचे चारही भाग एखाद्या कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे उलगडून बाजुला झाले.

एक क्षणभर माझाच माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना, समोर उलगडलेल्या स्तंभाच्या गाभ्यातुन खाली उतरत जाणार्‍या पायर्‍या स्पष्ट दिसत होत्या. जणु एका नव्या विश्वाचे दार माझ्यासाठी उघडले गेले होते..... खाली उतरावे की नाही या असल्या विचारांसाठी माझ्याकडे वेळ आजिबात नव्हता, सॅकमधला चार सेलचा मोठा टॉर्च उचलुन मी पायर्‍या उतरायला सुरुवात केली.

एक एक पाउल जपुन टाकत पायर्‍या उतराव्या लागत होत्या कारण या असल्या ठिकाणी छुपे सापळे असण्याची दाट शक्यता असते, आणि ते नक्की कसे कार्यरत होतील याचाही भरवसा नसतो. एखाद्या क्षणी पायाखालची पायरी सरकुन तुम्ही अंतहीन विवरात कोसळु शकता कींवा कुठल्याश्या कोपर्‍यातुन एखादा विषारी शर तुमच्या शरीरात शिरुन तुम्हाला कायमचा झोपवु शकतो..... सुदैवाने यातले काही झाले नाही आणि मी शेवटची पायरी उतरुन सपाट जमिनीवर आलो. स्पर्शावरुन तरी जमिन फ़रसबंद असावी असे वाटत होते पण इतक्या दाट काळोखात चार सेलचा दणदणित टॉर्च देखील मिणमिणता वाटतो आणि त्याचा एकमेव किरण जमिनीकडे फ़िरवुन मला समोरच्या बाजुला दुर्लक्ष करायचे नव्हते.
एक एक पाउल जपुन टाकताना नकळत एक हलकासा खटका दाबल्यासारखा आवाज झाला, एखाद्या गुप्त कळीवर पाय पडल्याने ती कार्यरत झाली असावी. कल्पनेनेच अंगातले रक्त गोठले, मी शक्य तितक्या त्वरेने जमीनीवर लोळण घेतली. पण मला वाटले तसे काहीच घडले नाही पण दूर एका टोकाकडून पुढे सरकणार्‍या एका अंधुक प्रकाशाने माझे लक्ष वेधले. पहाता पहाता त्या प्रकाशाने माझ्यापर्यंतचे अंतर पार केले आणि आजुबाजुचा गडद अंधारा भाग उजेडाच्या ट्प्प्यात यायला लागला एव्हाना प्रकाशाची तिव्रताही वाढली आणि लख्ख सोनेरी प्रकाशाने आजुबाजुचा परीसर उजळला.

मला आधी वाटलं होतं तशी ती लहानशी जागा नव्हतीच. एक भलाथोरला प्रशस्त हॉल होता तो. आता टॉर्चची काही गरज नसल्याने तो बंद करुन मी एका बाजुला ठेउन दिला आणि कुतुहलाने आजुबाजुचे निरिक्षण चालु केले. मघाशी मला जाणवल्या प्रमाणे जमिन फ़रसबंद होतीच पण छतही एकदम कोरीव होते. जमिनीपासुन छताला आधार देणारे खांब गोलाकार आणि नक्षीदार दिसत होते. पण या पेकशा जास्त लक्ष वेधणारी समोरची भिंत होती. तिथे एक कोरीव मुर्ती आपल्या शांत नजरेने माझ्याकडे पहात होती. जरी शांत म्हणत असलो तरी त्या नजरेत एक विलक्षण जरब होती. त्याच मुर्तीच्या समोर, पायाशी ओळीने मांडलेल्या भुर्जपत्रांच्या चळती दिसत होत्या. मनोमन समोरच्या मुर्तीला नमस्कार करत मी त्या भुर्जपत्रांकडे झेपावलो.

भुर्जपत्रांवरच्या मजकुराकडे आता माझे मन ओढ घेत होते. अश्या भुर्जपत्रांना फ़ार सांभाळुन हाताळावे लागते. एकतर ती फ़ार जिर्ण असतात आणि कधी कधी त्यांना एका खास वातावरणात ठेवले जाते. आपल्या नेहमीच्या वातावरणात येताच त्यावरची शाई आपोआप उडुन जाते. आणि माझी कोणताही धोका पत्करायची तयारी नव्हती. मी सरळ तिथेच बसकण मारुन ती चाळायला सुरुवात केली.

भुर्जपत्रातली भाषा संस्कृतच होती, हे एका अर्थी बरे होते, दुसरी कुठली पौराणिक भाषा असती तर मला वाचायला कदाचीत वेळ लागला असता पण संस्कॄत म्हणजे मला आपल्या मातृभाषेसारखी आहे. त्यामुळे वाचताना काहीच त्रास वाटत नव्हता. पण त्यातला मजकुर म्हणजे पानागणिक माझ्यासाठी बाँबशेल ठरत होता. बापरे ! पंचतत्वांवर आधारीत त्यांची शास्त्र आणि शस्त्रप्रणाली म्हणजे खरोखर वेड लावणारा प्रकार होता. अणुची संरचना त्यांचे विभाजन या गोष्टी म्हणजे त्यांच्यासाठी पोरखेळ असावा. होय ! मी नक्कीच एका आर्यदालनात होतो, त्यांच्या खेरीज इतके प्रगत शास्त्र कुणाचेच नव्हते.

अस्त्रपणालीची माहीती असलेला भाग जेंव्हा समोर आला तेंव्हामात्र मी त्यातला शब्द न शब्द मन लाउन वाचायला सुरुवात केली. यातही शब्दसामर्थ्याने पंचतत्वांवर ठेवला जाणारा ताबा हेच महत्वाचे तत्व, एक उदाहरणच द्यायचे तर एखाद्या ठराविक ठिकाणातला ऑक्सिजन शोषुन घेणे हे वाताकर्षण अस्त्राचे कार्य. त्यासाठी त्यांनी नक्की कोणते उपाय वापरले ते बहुदा त्यांचे काही कोडवर्ड असावेत कारण त्यांचा अर्थ लागत नाही. पण आजच्या युगात असे करण्यासाठी किती उपद्व्याप करावे लागतात? स्पर्शास्त्रासाठी त्यांनी वापरलेले तंत्र म्हणजे शत्रुच्या शरीराजवळच्या भुभागाचे गुरुत्वाकर्षण प्रचंड प्रमाणावर वाढवणे, यामुळे शत्रुचे वस्तुमान प्रचंड प्रमाणात वाढुन त्याचे चलनवलन बंद पडले नसते तरच नवल !

योगायोगाने (?) स्पर्शास्त्राचा उपाय इथे लिहिलेला सापडला. त्या भुर्जपत्राकडे पहात असताना अंगावरुन उगीचच शहारा येउन गेला. सगळ्या चित्तवृत्ती सैरभैर व्हायला लागल्या. मनातल्या मनात देवाचे नाव घ्यायचा प्रयत्न करुन पाहीला पण मनाची उलघाल जरा जास्तच असावी, चित्त स्थिर होईना !
शेवटी मनातला उरला सुरला धिर एकत्र करुन मी त्या मंत्राचा उच्चार केला. आता यातली किचकट व्यंजने, स्वर यांची मला काहीच कल्पना नव्हती पण न जाणे कसे काय ते, पण मला मुखोद्गत असल्यासारखा तो मंत्र मला वाचता आला. मी पुन्हा पुन्हा म्हणुन पाहीला पण मनात असुनही मी त्याच्या उच्चारात फ़रक करु शकलो नाही..... कदाचीत यापुढेही काही अस्त्रांवरचे उपाय असु शकतील या अपेक्षेने मी पुढे वाचायला सुरुवात केली. पण त्या पुढच्या पानापासुन फ़क्त आर्य संस्कृतीचा इतीहास या पलिकडे काही नवीन नव्हते. नाईलाजास्तव मी दुसरे बाड उघडले.

यात मात्र सगळीच तंत्रज्ञानावरची माहीती भरलेली दिसत होती. बहुदा एखाद्या भौतीकशास्त्राच्या किंवा पदार्थविज्ञानशास्त्रातल्या जाणकारालाच त्याबद्दल अधिक कळू शकेल म्हणुन मी ते बाड सरळ उचलुन माझ्या शर्टाच्या आत कोंबले. आता एक शेवटचे........ बाड नाही म्हणता येणार, कारण त्याची कातडी बांधणी मुळीच पोथीसारखी वाटत नव्हती. त्याला पुस्तकच म्हणावे लागेल. पण एव्हाना आजुबाजुचा प्रकाश मंदावला होता आणि टॉर्चची मला परतीचा रस्ता सापडण्यासाठी गरज होती त्यामुळे मागचा पुढचा विचार न करता मी तेही पुस्तक उचलले आणि परतीचा रस्ता धरला.

वर जाण्याच्या शेवटच्या पायरीवर असतानाच मी तो आवाज ऐकला..... एखादा लाव्हारस उकळत असावा त्या प्रमाणे, मनात कुशंका दाटल्या शिवाय राहीलीच नाही. झपझप पावले उचलत मी एकदाचा शेवटच्या पायरीवर पोहोचलो. आता मात्र पायाखालची पायरी हलत असल्याची स्पष्ट जाणिव झाली. शेवटची पायरी ओलांडली मात्र, भुकंप झाल्यासारखी जमीन थरथरायला लागली. मी शक्य तितक्या वेगाने तिथुन दुर झालो. आणि................ माझ्या डोळ्यादेखत मघा उलगडलेला तो स्तंभ जमिनीच्या पोटात गडप व्हायला लागला. सुन्न मनाने मी समोर पहात राहीलो. मी आत शिरत असताना ज्या बद्दल सतत सावध राहीलो होतो तो छुपा सापळा हा होता तर ! कदाचीत परक्याच्या हाती आर्यांचे ज्ञान भंडार लागल्यामुळे त्यांचे ते दालन नष्ट केल्या गेल्या असावे. आता पुन्हा तिथे जाणे शक्य होणार नव्हते हे मात्र नक्की.

सुर्याची किरणे डोळ्यावर पडल्याने मी भानावर आलो. दिवस मावळायला लागला होता. मला माझ्या गावातल्या तंबुकडे परतणे भाग होते. मी शक्य तितक्या लवकर माझे सामान आवरले सॅक उचलली आणि परत निघालो........... अं हं ! काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते, पण नक्की काय ते मात्र जाणवत नव्हते. मनातले विचार दूर सारत परतीचा मार्ग धरला. जाता जाता त्या ममीज कडे एक नजर टाकावी म्हणुन मी त्या बाजुला गेलो आणि ............... समोरच्या ढासळलेल्या, उजाड रिकाम्या घुमटीकडे पहातच राहीलो. त्या ममीज गायब होत्या....
एखाद्या विजेच्या उघड्या तारेला हात लागावा त्या प्रमाणे सर्वांगातुन झिणझीण्या आल्या. वर्षानुवर्ष या ठिकाणी असलेल्या त्या ममीज अचानक कुठे गेल्या?
पायातले त्राण निघुन गेल्याप्रमाणे मी जमिनीवरच बसकण मांडली.

किती वेळ गेला कुणास ठाउक, पण मला विचारांच्या गरदोळातुन बाहेर यायला बराच वेळ लागला असावा. आजुबाजुला बरेच अंधारुन आले होते. तरी माझ्या मनातल्या प्रश्नाला उत्तर सापडले नव्हते. त्या ममीज गेल्या कुठे?.............. काही वेळ असेच उलटसुलट विचारांचे प्रवाह डोक्यात चालु राहीले आणि अचानक........ अचानक मला आठवले, मी मघाशी त्या दालनात स्पर्शास्त्राच्या उपायाचा मंत्र उच्चारला होता. एकदा नव्हे पुन्हा पुन्हा, कदाचीत त्या मंत्राची काही ठरावीक आवर्तने व्हायला हवी होती त्यामुळेच मला तसे करायची इच्छा झाली असावी. मग त्या काळापुरते माझे मन माझ्या ताब्यात नव्हते की काय....? प्रश्न डोक्याच्या प्रत्येक पेशीला झटका देत गेला. खरंच असं झालं असेल..?
विचारांच्या नादात मी गावाच्या दिशेने पाउल उचलले. आणि दुसरा धक्का माझी वाट पहात असावा. मघा ज्या टेकड्यांनी ही जागा वेढलेली होती त्या टेकड्या...... ! त्या..... त्या जागेवर नव्हत्या. आता मात्र माझा धीर सुटला शक्य तितक्या वेगाने मी गावाकडे निघालो.

माझ्या टेंट मधे पोहोचल्यावर पहील्यांदा चेहर्‍यावर पाण्याचे हबके मारले, मनात वेडी आशा होती कदाचीत हे स्वप्न असावे ! पण परीस्थीतीत काहीच फ़रक पडला नाही. आता डोके शांत ठेउन यामागची कारणमिमांसा शोधायला हवी होती.
नक्की काय घडले असावे या विचारात गढलेला असतानाच मला मी आणलेल्या त्या भुर्जपत्रांच्या बाडाची आणि त्या कातडी आवरणातल्या पुस्तकाची आठवण झाली. धडपडत मी सॅककडे धावलो, सॅक उघडण्याच्या भानगडीत न पडता मी सरळ सॅक उपडी केली. आणि खाली पडलेल्या त्या दोन्ही वस्तुंकडे झेपावलो.

भुर्जपत्रांवरचे अवरण अक्षरश: ओरबाडून काढले. मघाच्या प्रकाराचे गुढ उलगडले तर कदाचीत यातुनच उलगडू शकणार होते. प्रचंड अपेक्षेने मी त्याचे पान उलगडले आणि तिसरा धक्का मला हलवुन गेला, पान कोरे होते. पटापट मी पुढची पाने उलगडली सगळीच पाने कोरीच. बापरे ! म्हणजे ही खास पुरातन काळातली खास प्रक्रीया केलेली पाने होती तर ! आता काही सापडणे पुर्ण अशक्य होते. निराश मनाने मी डोक्याला हात लावुन बसलो.... इतक्यात मघाच्या त्या पुस्तकाची आठवण झाली......
जरा सांशकतेनेच मी ते पुस्तक उघडले पान कोरे असणार ही अपेक्षा ठेउनच.... !

माझा अंदाज फ़ारसा चुकला नाही, पण आगदी बरोबर मात्र नव्हता. पुस्तक कोरेच होते मात्र त्याच्या पहील्याच पानात एक कागदासारखे दिसणार्‍या पदार्थाचेच पान ठेवलेले होते, म्हणजे आपण वाचन अर्धवट ठेवताना जशी वाचनखुण ठेवतो ना ! तसे. त्यावर लिहीलेल्या मजकुराचा लावलेला अर्थ असा,
‘ द्रवीड संस्कृतीच्या शेवटाला कारण ठरलेली एकमेव गोष्ट म्हणजे त्यांनी दुष्ट अतीमानवी शक्तींचा वापर सुरु केला. याला मायाजाल म्हंटले जात असे. यात माणसाच्या सुप्तमनावर ताबा मिळवल्या जात असे. थोडक्यात माणसाचे मनच त्याच्याविरुध्द शस्त्र म्हणुन वापरल्या जात होते. यातुनच त्यांनी काही अमानवी प्रचंड आकारही तयार केले होते ( इथे मला मघा गायब झालेल्या टेकड्यांची आठवण झाली ) शेवटी द्रवीडांच्या अतीमानवी शक्तींशी लढा द्यायला आर्य उभे ठाकले. आणि त्यांच्या युध्दाचा परीणाम म्हणुन बरेचसे द्रवीड नष्ट झाले, आणि उरलेले कोणत्याना कोणत्या प्रकारे बंदिस्त झाले. पण..... पण तरीही जाता जाता त्यांनी त्यांची अतीमानवी शक्ती एकत्रीत करून त्यांना एक मुर्त स्वरुप देण्याचा प्रयत्न केला, पण तो ही वेळीच लक्षात आल्याने आर्य जाणकारांनी ती शक्ती बंधनात अडकवली. आणि ती शक्ती म्हणजेच............... हे पुस्तक’

शेवटले विधान वाचताच माझ्या हातातले पुस्तक नकळत गळुन पडले. कसे काय कोण जाणे पण त्याचे पहीले पान उघडल्या गेले. त्यावरचा मजकुर चक्क देवनागरीत दिसत होता, पण..... मघाशी तर हे पुस्तक कोरे होते ! आत्ता, हे कुणी लिहीले?
धक्क्यातुन सावरुन घेत मी पुस्तक उचलले आणि वाचायला सुरुवात केली.
‘ आम्ही फ़ार मोठा कालखंड याच क्षणाच्या प्रतीक्षेत घालवला आहे. आज आम्ही मुक्त होत आहोत, आम्ही मुक्त होत आहोत, आमचा सर्वनाश करण्याचा प्रयत्न करणार्‍या प्रत्येक आर्यवंशीयाचा निर्वंश करण्यासाठी. आम्हाला हा आकार टाकता येणार नाही याची आम्हाला फ़िकीर नाही. पण आम्ही तुमच्या मनाला पुर्ण वाचु शकतो, आमच्या प्रत्येक प्रतीकृतीत म्हणजेच प्रत्येक पुस्तकात आम्ही आमची शक्ती विखरुन टाकु शकतो. प्रत्येक पुस्तकामार्फ़त तुमच्या मनावर ताबा मिळवु शकतो. आज तुम्हाला वाचवण्यासाठी तुमचे ते श्रेष्ठ आर्यही नाहीत. आता आम्ही अजिंक्य आहोत, अमर्याद आहोत’

शक्तीपात झाल्यासारख्या अवस्थेत मी उभा राहीलो, हाता-पायातले त्राणच निघुन गेले.
भोवंडलेल्या अवस्थेतुन बाहेर येण्यासाठी बराच वेळ लागला. परीस्थीतीची जाणिव होताच मी ताबडतोब ते पुस्तक शोधायला सुरुवात केली. त्याला ताबडतोब नष्ट करायला हवे होते नाहीतर त्या दुष्ट शक्तींनी जगातली सारीच पुस्तके आपल्या अंमलाखाली आणुन सगळ्या जगावर सत्ता गाजवली असती. पण........ ........... ते पुस्तक, पुस्तक सापडत नाहीये ! देवा रे ! वाचव आता, हे पुस्तक आता किती पुस्तकांना भ्रष्ट करेल ते तुलाच ठाउक.

वर्तमानपत्रात त्यानंतर काही काळाने पहील्या पानावर आलेल्या बातमीचा भाग :
‘ बहुचर्चीत पुराणवस्तु संशोधक ‘निषाद देवनार’ यांना शहरातल्या मानसोपचार इस्पितळात दाखल केल्या गेले, कालचा संपुर्ण दिवस ते भ्रमिष्टावस्थेत ठिकठिकाणच्या वाचनालयात जाउन ‘पुस्तके वाचु नका, ते तुम्हाला नष्ट करण्यासाठी टपले आहेत’ असा आरडाओरडा करत होते.

"निषाद देवनारच्या वेडेपणाचे हे रहस्य आहे तर !" हातातली निषादची डायरी खाली ठेवत ‘त्या’ने मनातले शब्द जरा जोरातच उच्चारले.
गंमतच आहे खरी असे पुस्तकांना झपाटायला पुस्तक म्हणजे माणुस आहे काय? या पुरातत्ववाद्यांची डोकी तिरकीच चालतात हे बाकी खरे. याची खरी जागा तो आत्ता आहे तीच बरोबर आहे.
मनातल्या विचारांची गंमत वाटून त्याच्या चेहर्‍यावर स्मित झळकले आणि डोके झटकुन टाकत त्याने निषादच्या सामानात सापडलेल्या पुस्तकाचे पान उघडले.

गुलमोहर: 

कुठं गायबला होतास भौ?
नाय वाचत जा.

--
.. नाही चिरा, नाही पणती.

सही रे चाफ्फ्या Happy
कथामालिका चालु राहु दे Happy
********************************************
The trouble with being punctual is that, no one is there to appreciate it!!

सुपर्ब! इंडिआना जोन्स चा पिक्चर बघितल्यासारख वाटतय. चाफा आता थांबणे अलाउड नाहि तुला. लवकरात लवकर 'त्याचि' कथा टाक बघु.

नाय वाचत जा- म्हणून लगेच वाचायला घेतली आणि न थांबता संपवलीही. सही जमवलीस रे. आधीच्या गफलतीपेक्षाही सही..:)

च्यायला, पण तुझी कथा नाही ना झपाटलेली?
माझं काही झालं तर चाफ्फ्याला पकडा म्हणून चिठ्ठी तयार करून ठेवतो आता.

--
.. नाही चिरा, नाही पणती.

चाफ्या, अभ्यास दांडगा झालाय मित्रा. पुढच्या प्रकरणाची वाट पहातोय.
....................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

मस्त.. पण बालकथा वाटली यावेळेस.. Happy

अच्छा तु झांबिडीला गेला होतास तर.
तरीच इतके दिवस दिसला नाहीस जीटॉक वर.
मस्त जमली आहे. Happy

मला कन्सेप्ट आवडला Happy भरपूर मोठे होऊ शकते हे कथानक.

सर्वात आधी सर्वांना धन्यवाद !

>>>>च्यायला, पण तुझी कथा नाही ना झपाटलेली?
नाय रे भौ, आणि असलीच तर तुझे काही बिघडवु शकता नाही Happy
>>>>>मस्त.. पण बालकथा वाटली यावेळेस..
पर्याय नाही कथानक एका दिशेला वळवायला हे असले चमत्कार Happy
>>>>>मधे मधे hollywood फार obviously येतंय ते सांभाळा>>>>>
आईशपथ थेट हॉलीवुड? अज्जुक्के त्यांचा `द ममी' आणि `हॅरी पॉटर' डोक्यावर घेतला होता गं त्यातल्या सगळ्या अशक्यता गृहीत धरूनही, मग आपण का मागे रहायचे Wink
>>>>भरपूर मोठे होऊ शकते हे कथानक.
भरपुर????? बाप रे !! संपवायला काय करावे ते सुचत नव्हते Happy तरी बरीच कापाकापी केलेय

.....................................................
इथे रात्रंदिन, युद्धाचाच प्रसंग, ........... !

>>आईशपथ थेट हॉलीवुड? अज्जुक्के त्यांचा `द ममी' आणि `हॅरी पॉटर' डोक्यावर घेतला होता गं त्यातल्या सगळ्या अशक्यता गृहीत धरूनही, मग आपण का मागे रहायचे <<
मित्रा मागे रहायचेच नाही पण बेमालूम करायचे रे!
आता स्तंभ विभागणे हे अजून एका हॉलिवूडपटाची आठवण करून देणारे होते. Fifth Element का असा काहीतरी ब्रूस विलिस पट होता. त्याबद्दल म्हणाले रे!!
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

आवडली रे कथा..
---------------------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

बापरे!!!
लहानपणी वाचलेल्या शापित खजिना , सोनेरी सापळा असल्या पुस्तकांची आठवण झाली.
---------------------------------------------------------------------------
I'm sure..I'm not the Best, still I'm happy.. I'm not like the Rest..!! Happy

मस्तच... अगदी खिळवून ठेवणारी शैली आहे तुझी. पुढील भागाची वाट बघतेय.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे...:)

>>>>आता स्तंभ विभागणे हे अजून एका हॉलिवूडपटाची आठवण करून देणारे होते.
बघितलंस ? माझ्या आयडियाच्या कल्पनेची हॉलीवुडने कशी कॉपी केली ती पण मी लिहायच्या आधीच Lol
असो पण हा प्रकार बर्‍याच हिंदी, इंग्रजी चित्रपटात आहे खरा. पण मी काही भट नव्हे हो Happy
>>>>>>लहानपणी वाचलेल्या शापित खजिना , सोनेरी सापळा असल्या पुस्तकांची आठवण >>>>>>आशु याचा योग्य अर्थ पोहोचला बरं Happy
.....................................................
इथे रात्रंदिन, युद्धाचाच प्रसंग, ........... !

चाफ्या रे चाफ्या, मस्त रे चाफ्या. अज्जुकाशे सहम्त. मलाही इंडियाना जोन्स आठवला. पण 'तुझा' खास टच असल्यानं सगळं छाने. एक राह्यलंच, आमच्या इथली एक टेकडी नुकतीच गायबलीय. स्थानिक लोक म्हणतात, नवीन मोठी बिल्डींग बनवायला पाडलीय म्हणे. आर्य स्वतःचा नाश स्वतः करतील असा काही मंत्र द्रविडांनी लिहुन ठेवला होता का रे?

याचा पहिला भाग कुठे वाचायला मिळेल.....

>>>>>>आर्य स्वतःचा नाश स्वतः करतील असा काही मंत्र द्रविडांनी लिहुन ठेवला होता का रे?
देव जाणे...... दुर्दैव आपले, आपणच अश्या आख्ख्या टेकड्या गायब करतोय Sad
>>>>>>>याचा पहिला भाग कुठे वाचायला मिळेल>>>>>>>
ही घ्या त्याची लिंक !
http://www.maayboli.com/node/4682
....................................................
इथे रात्रंदिन, युद्धाचाच प्रसंग, ........... !

अरे चाफ्या, भेसटलेला आहेस का रे मित्रा तू? काय भन्नाट आणि अफाट लिहीतोस बाबा तू!! लिहीत रहा आम्हाला असंच चांगलं वाचायला मिळू दे!

सही चाफा!!!! खुप मज्जा आली वाचुन ...एका झपाट्यात वाचली कथा, कथा मालिकेच्या कल्पनेने उत्सुकता आणखी वाढवली आहे...येऊद्या लवकर लवकर Happy

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

चाफा, काय लिहीतोस बाबा तू....... वाचताना भीतीच वाटते..यार झकास जमवतो पण.... तुला पण वाचकांच्या मनाचा ताबा कसा घ्यावा हा मंत्र शिकवला की काय आर्यांनी? मस्तच....
*********
Happy योगेश Happy
*********

शुभान्गी
मी सहसा वाचत नाही अश्या दन्त-भयकथा पण तुमचे नाव वाचुन कथा वाचली आणी मी चक्क तुमचा पन्खाच झाले.
मस्तच आहे