३ ते ६ महिन्यांच्या मुलांना कसे खेळवावे.

Submitted by तुमचा अभिषेक on 25 May, 2014 - 05:13

माझी मुलगी आता कुठे दोन महिन्यांची झाली आहे, पण सध्या मायलेक दोन्ही माहेरी असल्याने काही पंचाईत नाही. मात्र साधारण तीनेक महिन्याची झाल्यावर जेव्हा माझ्या घरी तिला घेऊन येईन तेव्हा याची गरज पडेल. त्याची पुरेशी तयारी करायला पुरेसा वेळ मिळावा म्हणून इन अ‍ॅडव्हान्स मध्येच हा धागा कारण इज्जतचा सवाल आहे. तिच्या आईच्या घरी तीनसाडेतीन महिने राहून ती अचानक माझ्या घरी आल्यावर अचानक गोंधळून बावरून जाऊ नये आणि "आमच्याघरी होती तेव्हाच ती खूप खुश होती" असा डायलॉग तिच्या आईकडून मला ऐकायला लागू नये एवढीच इच्छा. Happy

तसे थोडेफार माकडचाळे माझ्यात उपजत आहेत. नकला करून दाखवणे, वाकुल्या वगैरे जमून जातील. शक्य तितके वेडेवाकडे हसरे चेहरे बनवायची आरश्यासमोर प्रॅक्टीस सुरू झालीय. थोडेफार नाचताही येते तर आजच्या पिढीची चॉईस लक्षात घेता काही सौथेंडियन डान्स स्टेप या महिन्याभरात शिकून घेईन. अगदी मवाली टाईप शिट्ट्या मारता येत नसल्या तरी हलकीशी शीळ घालता येते जी पुरेशी असावी. बरेपैकी गाताही येते, पण जगातल्या कुठल्याही अंगाईगीताला सूट न होणारा माझा आवाज तिच्या चिमुकल्या कानांना कितपत झेपेल हि शंकाच आहे. तरी याउपर पारंपारीक खुळखुळे वाजवून मला माझ्या लेकीला बोअर करायचे नाही म्हणून काही नवीन खेळणी इथे कोणी सुचवल्यास आभारी राहीन. तसेच इतर काही कल्पक अपारंपारीक नावीण्यपुर्ण कल्पना असतील जसे की त्यात आमची रूम कशी सजवावी वगैरेचाही समावेश करू शकता तर सारेच सल्ले वेलकम Happy

तळटीप - आणि हो "मुलांना खेळ नाही तर वेळ देणे जास्त गरजेचे असते" ... ..प्लीजच हं, असले सेंटी नको. ऑफिसच्या कामातून जेवढा वेळ देणे शक्य आहे जास्तीत जास्त तेवढाच वेळ देऊ शकतो आणि देईनच Happy

तळटीप क्रमांक २ - सल्ले देताना वयोमर्यादा वर्षभरापर्यंतची धरली तरी चालेल. फायद्याचेच राहील. बाळ उठून रांगायला, चालायला, लुटूलुटू धावायला, कधीपर्यंत लागते याची मला कल्पना नाही. पहिलीच वेळ आहे ना. तोपर्यंत कसे खेळवायचे एवढाच प्रश्न आहे. एकदा त्या वयात पोहोचले तर तेच मला खेळवायला लागेल एवढे नक्की. Happy

अवांतर - या वयातील मुलांना खेळवताना मुलगा असो वा मुलगी फरक पडत नसावा असे गृहीत धरले आहे. तरी गृहीतक चुकले असल्यास कळवावे.

माबोवर या आधी या विषयावरचे वा पूरक अन्य धागे असल्यास लिंका वेलकम !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधारण तीनेक महिन्याची झाल्यावर जेव्हा माझ्या घरी तिला घेऊन येईन तेव्हा याची गरज पडेल.....................

ती जागी असेल तेव्हा जास्तीत जास्त बोलणे, मायेने हात फिरवणे,कुशीत घेणे इ.तिसरा पुरा झाला की मुले उपडी वळतात.साधारण चौथ्या महिन्यानंतर मुले हसून प्रतिसाद देतात.त्यावेळी वरीलप्रमाणे सुरु ठेवा. मऊ रबराची साधी साधी खेळणे द्या.नंतर कळेल तुम्हाला मुले आपणच वेगळी खेळणी शोधून काढतात.म्हणजे खेळण्यापेक्षा त्यचे खोके इ.
सध्या इतकेच पुरे.

काय करु नये हे लिहितो आधी..;)

सारखा सारखा गालाला हात लावु नये.
सारखे पप्प्या घेत बसु नये.
झोपेत असेल तर उठवु नये.
नाका शेंडा दाबु नये.
दोन्ही गाल ओढत बसु नये.
टाळु वरुन हात फिरवु नये.
बाळाला सारखे उचलुन घेउ नये
कान कुरवाळत बसु नये

-----------------------------
या सुचना मला होत्या .....त्या तुला फॉर्वर्ड केल्या आहेत Biggrin

राहिले बाळ कसे खेळवावे... ... ते स्वतच स्वतः खेळत असते फक्त त्याच्या नजरे समोर फिरणारी वस्तु धरावी ..

बाकी हाता बॅट रॅकेट फुटबॉल देउन आपल्या सारखे खेळ आता तरी खेळायला देउ नयेत.. Happy

उदयन
सारखा सारखा गालाला हात लावु नये.
सारखे पप्प्या घेत बसु नये.
झोपेत असेल तर उठवु नये.
नाका शेंडा दाबु नये.
दोन्ही गाल ओढत बसु नये.
टाळु वरुन हात फिरवु नये.
बाळाला सारखे उचलुन घेउ नये
कान कुरवाळत बसु नये

वगैरे वगैरे......... अरे हे बाळाला खेळवणे कुठे झाले? Uhoh हा तर आपला खेळ असतो Wink

याचे प्रमाण शून्य करणे कठीण आहे, पण सूचना लक्षात ठेवेन.
पैकी बाळाला झोपेतून मात्र मी कधीच उठवत नाही ना इतर कोणाला त्याची झोपमोड करायला देतो. मी स्वता प्रचंड झोपप्रिय आहे आणि माझी कोणी झोपमोड केली की प्रचंड चिडचीड होते त्यामुळे झोपेचे महत्व जाणतो.

Happy
अभिषेक, तुझं खूप कौतुक वाटतं.
महिन्याच्या मुलांना स्पर्श आणि ऊब दोन्ही हवेसे असतात. बर्प काढायला, फिरायला घेऊन जा. रोज एक अर्धातास तरी खाली स्वच्छ अंथरूणावर हातपाय मोकळे करू द्यावे. त्यांच्या बरोबर असतांना थोडावेळ बडबड ठीके. पण सवय करू नका. नायतर तुमी हपिसात आणि तिकडे रेडीओ चालु व्हायचा. रोज छान मालिश करावी. एखादी गोष्ट दाखवावी जसे पक्षी वगेरे. मिळून गाणी ऐकावीत. (गायला नाही तरी चालेल). दरम्यान नोट्स काढावेत. कुठल्या गोष्टीने बाळी हसते, काय केल्यास झोपते, का रडते (मोस्टली पोटात गडबड असल्यावर रडतात पोरं, ते समजेलच तुला हळुहळु).
जरा पायांची सायकल जोरात सुरु झाली, की मग पाळण्यावर एखादे सॉफ्ट टॉय बांधून ठेवावे. नाहीतर बेबी जिम मिळते ते आणावं. ही खेळणी मुलांची आवडती असतात. इतर वेळचे सवंगडी असतात. ते त्यांच्याशी हातपाय मारून खूप खेळतात. त्यांच्याशी बडबड गप्पा करतात. रोज सकाळी संध्याकाळी बाळीला सोसवेलश्या उन्हात फिरवणे. सोबत आईलापण नेणे.
एजगृपप्रमाणे लहान मुलांची पुस्तकं मिळतात, ती स्टोरीटाईममध्ये वाचून दाखवणे. टमीटाईम खेळणे. You'll love it for sure!
दर महिन्याच्या वाढदिवशी परीराणीला मस्त तयार करून छानसा फोटो काढून फेसबुकवर टाकणे Happy
हाताशी डॉक.चा, पेडीचा नंबर, हॉस्पिटलचा इमर्जन्सी नं., वॅक्सीन्स्चा चार्ट व पहिले काही महीने काढलेले नोट्स, रूटीन औषधं (डॉक.च्या सल्ल्याने), एखादे टॉय जे दिल्यावर बाळीला अश्वासक वाटेल-असं सर्व पटकन सापडेल असं ठेवणे. बाकी सल्ले येतच राहतील. ते पेशन्स ठेवून ऐकायची तयारी ठेवणे Happy
बाळ रडलं म्हणून विचित्र सवयी करून घेऊन नका. डॅलासमध्ये राहतांना एक बाबा लंचटाईमला घरी येऊन मुल आणि आईला कारमध्ये फिरवत असे. ती कार अपार्टमेंट्च्या चकरा मारतांना मुलाची आई त्याला भरवायची. असं केल्याशिवाय तो खायचा नाही म्हणे. WI मध्ये असतांना एक ताई पोराला स्ट्रोलरमध्ये ठेवून तो जोराजोरात पुढेमागे करायच्या. असं करणं थांबलं की पोर भोकाड पसरायचं. सवय झाली म्हणाली. so you know better now!
Enjoy!

घराबाहेरून आल्यावर साबणाने हात धुवा. त्याशिवाय बाळाला हात लावू नका.
पाप्या घेणं मिनिमाईझ करा. आपल्या श्वासात अनेक जंतू असतात.
बाळाला सहज गिळता येतील अशा वस्तू तिच्या हाती लागणार नाहीत असे बघा. यात कौतुकाने केलेल्या "अंगठ्या" हा आयटम येतो. हट्टाने बाळाच्या बोटात ते सोन्याचं वेढं घातलं जातं, ते पटकन काढून ठेवले जातेय याकडे लक्ष द्या.

टीव्ही हा आयटम शक्यतो दाखवू नका. तेच मोबाईलचे.
मोबाईल व टीव्ही ही बेबीसिटींगसाठीची खेळणी नव्हेत. मोबाईल रेडिएशनचा त्रास बाळाच्या कोवळ्या हाडाच्या कवटीमुळे त्याला मॅक्झिमम प्रमाणात होतो. तेव्हा तो फोन बाळापासून दूऽर ठेवा.

बाकी माफक प्रमाणात मस्ती करणे, गप्पा मारणे भरपुर करा. अन हो, रात्री बेरात्री उठून बाळाचे कपडे बदलावे लागतात, फीड्स द्यावी लागतात, त्याची सवय करा. झोपेचे १२ वाजणार आहेत हे लक्षात ठेवा. Wink

एंजॉय.

वरच्या पोस्टींना अनुमोदन!

बाळाच्या पाळण्यावर किंवा खिडकीला रंगीबेरंंगी रुमाल टांगून ठेवला तरी बाळ हातपाय उडवत, तोंडाचं बोळकं पसरून त्या रुमालाकडे बघत छान खेळते. विंड चाइम्स (मधुर किणकिणाट करणार्‍या) चा आवाजही त्यांना आकर्षित करतो.

काय हाताळायला देऊ नका... तर त्या यादीत...

१. रिमोट (टीव्ही किंवा अन्य)
२. की चेन्स, चाव्या इत्यादी.
३. मोबाईल, फोन (कॉर्डलेस)
४. गिळता येणार्‍या कोणत्याही लहान आकाराच्या वस्तू
५. पाळीव प्राणी

हातात बिंदल्या वगरे कायम नका घालु.मि माझा मुलीला घातलेल्या.एक दिवस त्याचे जे हूक असत ते मुलिच्य कानतल्यांमध्ये(टोचलेल्या मुद्या) अडकल.माझिच चूक होति ति.पटकन त्या कडूनच ठेवल्या.
शक्यतो मिसेस न टिकल्या वापरू देऊ नका.टिकली बाळाच्या डोळ्यात चिकटलेलि केस ऐकलि आहे.
बाळाबरोबरच मातेने हि थोडे दिवस कमित कमी दागिने वापरलेले बरे.....

कसे खेळवायचे - सगळ्यांनि छानच सांगितले आहे,त्यात माझे तोडेसे....
मोकळ्या अंगाने खेळु देणे हे फार महत्वाचे.आपण इंटर्फियर नाहि करायचे जस कि सारख हात धरणे इत्यादि.
पाय मोजे वगरे नेहमि थोडे मोठे घालावेत.मि तरि घालुनका असेच सांगेन.
हातात पकडता येण्याजोगे आणि आवाज करणारे खेळणे.

अजुन एक. लहान मुलाला बॉल सारखे उडवुन झेलणे असा प्रकार करणारे लोकांचे नातेवाइक / मित्रमंडळी पाहिली आहेत. त्यांच्या पासुन दुर रहा. (त्यांना सांगितले तरी राग येतो, पण सांगाच. त्यात गय्गय करु नका) .

गप्पा मारणे भरपुर करा.>>> +१.

बाळी मान सावरायला लागल्यानंतर तिला घेउन नाचा. (खरोखर). मुलं खुप एन्जॉय करतात हा नाच प्रकार. आठवतील ती गाणी म्हणा. अगदी बालगीतापासून ते चित्रपट्गीते, जन गण मन, अगदी आरत्या सुद्धा. ते rhythem एंजॉय करतात. शब्द, अर्थ त्यांच्यासाठी बिनकामी.

जगातल्या कुठल्याही अंगाईगीताला सूट न होणारा माझा आवाज तिच्या चिमुकल्या कानांना कितपत झेपेल हि शंकाच आहे.>>> काही फरक पडत नाही. तिच्या बाबाचा आवाज तिच्यासाठी रफी पेक्शा सुंदर आहे.

इब्लिस + १.
बाळ कितीही मोठं झालं तरी ते रमावं, शांत रहावं म्हणून त्याला मोबाईलवरचे अ‍ॅनिमेटेड व्हिडियो, गाणी वगैरे दाखवण्याची सवय लावू नका कृपया.
मायबोलीवर बडबडगीतांचा भरपूर साठा आहे, ती गाणी पाठ करा. बाळ त्याच्या अंथरुणावर खेळत असताना त्याला गाणी म्हणून दाखवा, ऑफिसात काय झालं, प्रवासात काय झालं, कुठल्या मित्र-मैत्रिणीचा/ नातेवाईकांचा फोन आला होता, काय गप्पा मारल्या, दिवस कसा पार पडला इत्यादी सर्व गोष्टी बाळाला सांगा. बोबड्या शब्दांत नव्हे, स्पष्ट शब्दांत. सारखं उचलून घेण्याची सवय नको. आवश्यकता असेल तेव्हाच उचलून घ्या.

अजुन एक. लहान मुलाला बॉल सारखे उडवुन झेलणे असा प्रकार करणारे लोकांचे नातेवाइक / मित्रमंडळी पाहिली आहेत. त्यांच्या पासुन दुर रहा. (त्यांना सांगितले तरी राग येतो, पण सांगाच. त्यात गय्गय करु नका)

>> हे फारच कॉमन आहे हो. याहुन अघोरी प्रकार करणारे लोक्स पाहिलेत. एका हातात बाळाचे दोन्ही पाय धरुन त्याला उभे करणे इ.इ. पण दुर्दैवाने हे चुक आहे असे सांगितलेले बाळाच्या आज्जी-आजोबांना आवडत नाहीत.

(मागे लिंबुटिंबु यांनी असे खेळणे कसे कॉमन आहे आणि त्यात काही वावगे नाही हे पटवायचा प्रयत्न केला होता. Sad )

अभिषेक, खूप छान टीप्स मिळतायत तुम्हाला.

मी एकच सांगू इच्छिते स्वानुभवावरून ते असे की बरेचदा "बाबा" लोक लहान बाळाला कडेवर घ्यायला जरा घाबरतात, मान सावरेपर्यंत तर घेतच नाहीत. अशी भीती असेल, तर ती काढून टाकून तिला घ्यायचा थोडा सराव करत जा. कारण आईच्या उबदार स्पर्शाइतकीच बाळाला बाबाच्या masculine touch ची गरज असते, नव्हे त्याला आवडत असतं. मी बाळंतपणासाठी माहेरी असतांना माझा नवरा भेटायला येत असे आणि बाळाला काही वेळ कडेवर पण घेत असे, पण जर तो सलग २-३ दिवस नाही येऊ शकला तर त्याच्या येण्याच्या वेळेला माझा मुलगा काही कारणाशिवाय रडत असे. नंतर माझ्या लक्षात येऊ लागले की त्याला बाबा हवा असायचा. बोलता येत नसलं तरी बाळ भावना प्रदर्शित करू शकतं. त्याने घेतल्यावर स्वारी एकदम खूश असायची.

तेवढाच वेळ देऊ शकतो>> वेळ देउ नका ... बाळांच्या वेळात जगा .... अगदी स्वछंदी पणे ते क्षण परत मिळणे नाही

भुषण ३ महिन्याच्या आमच्या पिल्लाला खांद्या वर घेउन हळु हळु चालणे ,
मग थोडा हळुहळु नाच करणे यात सगळ्या बेस्ट [ माझ्या मते] त्याचे गाणे गुण्गुणने होते
या वेळी मि कॅमेर्याने हे सगळे टिपत होते
अजुन हि ते व्हिडिओ पाहिले तर
तिथेच बसुन रेकॅर्ड करत असल्याचे वाटते
एकदम सही फिलिंग आहे

नंतर माझ्या लक्षात येऊ लागले की त्याला बाबा हवा असायचा. बोलता येत नसलं तरी बाळ भावना प्रदर्शित करू शकतं. त्याने घेतल्यावर स्वारी एकदम खूश असायची.>> +१००
आमच्या कडे पण असेच होते

बाळ स्वतः होऊन उपडे पडेन ह्याची वाट पाहू नये. बाळाला शक्यतो जास्तीत जास्त वेळ पोटावर टाकत जा. मांडीवर घेताना सुद्धा एका मांडीवर पोटावर ठेवायचे. ह्याने बाळाची मान लवकर आणि व्यवस्थित बसते. मान आवटळणे सारखे प्रकार होत नाहीत. प्रत्येक बाळ हे जन्माच्या पहिल्या दिवसापासून रांगू शकते पण आपण त्याला साधारण पहिले २-३ महिने ही संधीच देत नाही. तुमचे बाळ रांगताना पहायचे असेन तर त्याला स्वच्छ जागी पोटावर टाका व त्याच्या पायाशी आपला तळहात ठेवा. अगदी एक दिवसाचं बाळपण तुमच्या हाताच्या अधाराने पुढे सरकते. मी दवाखान्यात माझ्या आज्जीला तसेच काही नातेवाईकांना दुसर्‍या दिवशी बाळ रांगवून दाखवले होते.
बाळ पाठीवर असेन तर त्याला फक्त छत दिसते पण जर पोटावर असेन तर त्याला आजुबाजूच्या सगळ्या वस्तू, हालचाली दिसतात.
बाळाला रनिंग कॉमेंट्री देण्याचा खूप फयदा होतो. बाळ तुमच्या सोबत असताना तूम्ही काही करत असाल तर ते त्याला/ तिला एकवावे. बाहेर फिरायला जात असाल तर आजुबाजूला काय आहे ते सांगत रहावे. उदा. इथे एक मोठे झाड आहे. ते साधारण दिसायला कसे आहे. त्याला फुले असली तर त्यांचा रंग काय. त्याचे नाव काय.

तुम्ही म्हणाल की ३ महिन्याच्या बाळाला काय उपयोग? तर ते बाळ हि सगळी निरीक्षणं तुम्ही दिलेल्या माहितीसह नोंदवत असतं.
लाल रंगात लिहिलेली मोठी अक्षरं, शब्द दाखवावे. त्याने त्यांची नजर, दृष्टी स्थिर व्हायला मदत होते. पानाच्या एका बाजूला एकच चित्र चिकटवून प्राण्यांची, पक्षांची, रंगांची, आकारांची, भाज्यांची वही बनवावी. अशाप्रकारे बनवलेल्या वाहितील चित्र फक्त नाव सांगून फ्लॅश करत दाखवायची.

ह्या विषयावर लिहायला खूप आहे. मी मुलासाठी केलेले बरेच प्रयोगपण आहेत. अर्थात मला ह्यातले बरेच काही ISP च्या क्लासमधे शिकायला मिळाले.

इब्लिसभाऊंना अनुमोदन !
बोबडे बोलत मस्ती करा साधारण १ महिण्याने बाळाला नजर पुर्ण येते ते हालणार्या वस्तुकडे लवकर पाहते, तेव्हा अशा वस्तु पाळण्याला बांधा, वा स्वत: मागेपुढे होईल असे खेळा !

नलु माफ कर, पण टमीटाईम उर्फ पोटावर टाकणे ३ महिन्याच्या नंतर केलेलं बरं असं मला वाटतं. तोपर्यंत बाळाची शारीरिक क्षमता त्या गोष्टीसाठी तयार नसते. अर्थात ३ महिने झाल्यावरही उपडे पडायची चिन्हे नसल्यास तू सुचवलेला उपाय नक्की उपयोगी आहे. तू सुचवलेले इतर टीप्स छानेत Happy

चेस बोर्ड घ्या मोठ्या साईझचा किंवा पांढर्‍या काळ्या चौकोन आखा मोठ्या साईझचे आणि त्यातत विरुद्ध रंगाची चित्र लावा. म्हणजे पांढर्‍यात काळी आणि काळ्यात पांढरी. आणि ती चित्र किंवा ते आकार कसले आहेत ते सांगा. बाळाची नजर जास्तीत जास्त वेळा जिथे जाते तिथे ते लावा.

बाळाला वेगवेगळ्या चित्रांची फ्लॅश कार्डस दाखवा.

बाळ सहा महिन्याच झालं की मांडीत बसलेलं असताना त्याला मोठ्या आकाराचे साधारण दीड २ इंचाच्या आकारचे शेप्स सॉर्टर द्या. बाळाचा हात स्वतः ते हातात धरून त्या सॉर्टर मध्ये टाका. मजा येते मुलांना माझ्याकडे फोटो असतील ते देईन तुम्हाला अंदाज यायला.

वेल, होय.

चिन्नु, अगं टमीटाईम पहिल्या दिवसापासून सुरू करावे असं सांगतात. त्याने शारीरिक क्षमता वाढायला मदतच होते.

अर्थात मुल झोपताना मात्र पाठीवरच झोपवावे.

बेबीसेंटरवरची ही लिंकः http://www.babycenter.com/0_tummy-time-how-to-help-your-baby-get-comfort...

एक छोटासा व्हिडीओ: http://www.youtube.com/watch?v=UEnzqSK-j_s

ह्यासोबतच बाळाला grip exercise पण द्यायला हवी. त्याने मुलांची अगदी छोट्यात छोटी वस्तू तसेच मोठी वस्तू ह्यावरची पकड घट्ट होते. बाळाची मुठ करंगळीच्या बाजूने आपल्या हाताच्या अंगठ्याने अलगद जरासा दाब देत उघडायची. २-४ दा केल्यास तुम्हाला जाणवेल की बाळाची मुठ आणखीच घट्ट होते. तेच होणे अपेक्षित आहे. हा व्यायाम सातत्याने देण्याचा फायदा होतो.

ओके, मला नव्हते माहीत. थँक्स.
grip exercise बद्दल +१. तू एक लेख लिही ना. उपयोग होईल सर्वांना.

सर्वच प्रतिसादांचे धन्यवाद Happy
येथील सल्ले मलाच नाही तर बरेच जणांना फायद्याचे ठरावेत.
माझे म्हणाल तर अपेक्षेपेक्षा चार गोष्टी जास्तच आणि चांगल्याच समजल्या. ते ही एकाच दिवसात.
दिवसभरात पडणारी प्रत्येक नवीन पोस्ट वाचत होतो, पैकी कित्येक पोस्टी तर बरेपैकी पाठच झाल्यात हे बायकोला फोनवर सांगताना समजले. तरीही याची प्रिंट घेऊन जे शक्य आणि योग्य वाटेल ते करेनच.

यापुढेही येणार्‍या प्रतिसादांना याच पोस्टमध्ये आगावू धन्यवाद बोलतो. Happy

बाळाला मुद्दाम कडेकोट बंदोबस्त करून शांत खोलीत झोपवण्यापेक्षा माफक घरगुती आवाज जसे माणसांचे बोलणे/ स्वयंपाकाचे आवाज/ आणि इतर संयत आवाज असलेल्या ठिकाणी झोपायची सवय असलेली आम्हाला खूप बरी पडली.
स्ट्रोलर मधून लहानशी फेरी/ कारसीट मधून चक्कर याने मुलं पटकन गुंगीत येतात.
रात्री किमान २-३ वेळा उठून डायपर बदलणे/ बायकोला दूध पाजायला मदत करणे/ formula करून देणे आणि सकाळी रोजच्याच वेळेवर ऊठून कामास जाणे ह्याची आनंदाने सवय करा. Happy वेलकम

एक लहानसा अनुभव, जो मला कायम शिकवतो.
मी माझा मुलगा लहान असताना दोन गोष्टीची हवेत टक्कर/ चेंडू वर उडवणे इ. प्रकार केले की तो हसत असे. अगदी खळखळून हसत असे. ते इतकं लाघवी हसू सारखं बघावसं वाटे. हे पाडणे आम्ही कटाक्षाने खेळण्याच्या गोष्टींचेच करत असू. पुढे तो २ वर्षाचा झाल्यावर डेकेयर मधून तक्रार आली की तो रचून ठेवलेली खेळणी पडतो आणि हसतो. उचल सांगितलं की उचलतो पण पाडायला आवडतात. कधी जेवणाच्या ताटातलं काही पाडतो. त्या नंतर त्याला घरी समजावून/ पाडणे आणि हसणे बंद करून १-२ आठवड्यात सगळं सुरळीत झालं. पण मी कुठलीही कृती करताना आता २ वेळा विचार करतो. त्याच्या समोर जे जे घडतंय ते जास्त डोळस पणे पाहतो.

तिच्या आईच्या घरी तीनसाडेतीन महिने राहून ती अचानक माझ्या घरी आल्यावर अचानक गोंधळून बावरून जाऊ नये >> आपल्या घरी म्हणा हो. आता ते तुमचं सगळ्यांच घर आहे हो.

बाळाला मुद्दाम कडेकोट बंदोबस्त करून शांत खोलीत झोपवण्यापेक्षा माफक घरगुती आवाज जसे माणसांचे बोलणे/ स्वयंपाकाचे आवाज/ आणि इतर संयत आवाज असलेल्या ठिकाणी झोपायची सवय असलेली आम्हाला खूप बरी पडली.>> + १०००

मी कुठलीही कृती करताना आता २ वेळा विचार करतो. त्याच्या समोर जे जे घडतंय ते जास्त डोळस पणे पाहतो.>> + १०००

- इतक्या लहान मुलांना खेळवण्याचा अगदी सोप्पा उपाय म्हणजे त्यांच्या डोळ्यांत थेट पाहत त्यांच्याशी बोलायचं. एखाद्या मोठ्या माणसाशी आपण गप्पा मारू तसं. मी आणि माझी बहीण तर एकमेकींना जे सांगायचं ते बाळाकडे बघतच सांगायचो. सांगताना, जे सांगतोय त्याला अनुसरून चेहर्‍यावरचे, डोळ्यातले हावभाव करायचे, ओठांची स्पष्ट, जरा भडकच वाटेल अशी हालचाल करायची. कोणते आवाज कानावर पडताना बोलणार्‍याच्या कोणत्या हालचाली होतात हे निरखणं हा या वयाच्या बाळांचा एक प्रमुख विरंगुळा असतो.
गाणी म्हणा, कविता ऐकवा, रामरक्षा, अथर्वशीर्ष, अगदी काहीच नाही तर सरळ बाराखडी म्हणायची.
मात्र बोलण्यात विविधता हवी. तेच तेच परत बोललेलं बाळांना कळतं आणि ती रडून त्वरित निषेध नोंदवतात. Lol

- घरात कपडे वाळत घालायची दोरी / स्टँड असेल, तर (शक्य असल्यास) बाळाला दोरीच्या खाली, स्टँडच्या जवळ ठेवा. हलणारे, विविध आकारातले, विविध रंगांचे कपडे बाळांना खूप आवडतात.

- बाळ मॅक्सिमम वेळ ज्या खोलीत असतं, तिथे भिंतींवर मोठे, रंगीत भौमितिक आकाराचे पुठ्ठे कापून लटकवा. त्याकडे बघत बाळ स्वतःच स्वतः खेळेल.

- बाळाच्या चेहर्‍यापासून साधारण दोन फूट उंचीवर आपल्या हाताची बोटं वळवळल्यासारखी हलवायची. रात्री आपल्याला झोप येत असते आणि बाळांचा खेळण्याचा मूड असतो तेव्हा त्यांच्याशेजारी पडल्यापडल्या हा उपाय कामी येतो. (वरती इब्लिस यांनी म्हटल्याप्रमाणे झोपेचं खोबरं होतंच.)

असा डायलॉग तिच्या आईकडून मला ऐकायला लागू नये एवढीच इच्छा.
तुमचे 'बाळ' साठ वर्षाचे झाले तरी आईकडून डायलॉग ऐकावेच लागतील तुम्ही काही केले, नाही केले तरी.
आपल्या इच्छेप्रमाणे होणे हे आता विसरा - लग्न केलत ना? भोआक!
Happy Light 1

>>पाडायला आवडतात
खेळणी रचून पाडायला आवडणे हे कॉमन आहे असे मला वाटते. पण कोणत्याही मुद्द्याचा विचार करणे आवश्यक हे मान्य.

तीन महिन्यापर्यंत बाळाला कायम आपल्या जवळ ठेवायला हवे आणि ३ ते ६ पर्यंत (म्हणजे रांगू लागे पर्यंत) आपण बाळाच्या नजरेच्या टप्प्यात असायला हवे. पालथे ठेवण्याबद्दल नलिनीशी सहमत. सगळ्यात सोपे म्हणजे आपण टेकून बसून बाळाला आपल्या छातीवर पालथे ठेवणे. बाबा लोकांनी शर्ट काढून बाळाला थेट त्वचेचा स्पर्श जाणवू द्यावा. Happy

काळी पांढरी खेळणी, पुस्तके एकदम मस्त. बाळांना चघळता येतील अशी पुस्तके मिळतात (उदा. इन्डिस्ट्रक्टिबल्स) ती चावायला/ वाचायला द्यावीत.

मोबाइल रेडियेशन विषयी असहमत. मोबाइलच्या लहरी सगळीकडेच असतात. त्या फोनच्या जवळ जास्त प्रमाणात आणि इतरत्र कमी असे काही नसते. मोबाइल स्वतः ज्या लहरी सोडतो त्याची पॉवर अत्यंत कमी असते. त्यामानाने सूर्याकडून येणार्‍या लहरी (उदा यूवी) खूप जास्त तीव्र असतात. तरी मोबाइल खेळायला वगैरे देऊ नये याबाबत सहमत. लाळेने सर्किटात घोळ होऊ शकतो. दणादण आपटल्याने एखादा तुकडा मोडून तोंडात जाऊ शकतो, बॅटरी लीक होऊ शकते..

मोबाईलचा कळफलक, तो आपण कानाला लावतो ती जागा, त्याचे कव्हर येथे सर्वाधिक जंतूंचे प्रमाण असते असे वाचले होते. कॉर्डलेस फोन, नेहमीचे फोन रिसीव्हर्स, रिमोटबद्दलही सेम वाचले होते.
लोक मोबाईल कोठेही ठेवतात, कसाही हाताळतात. अशा प्रकारे हाताळली गेलेली वस्तू लहान मुलाच्या हाती दिल्यावर ते अनेकदा ती वस्तू तोंडात घालते, किंवा तेच हात / बोटे तोंडात घालते.

अहो आपण झोपतो ती गादी सगळ्यात जास्त जन्तुमय असते, अगदी संडासच्या सीट पेक्षा सुद्धा, असंही वाचलंय मी कुठेतरी.
आणि लहान मुलं काय वाट्टेल ते तोंडात घालतात. जमीन चाटतात, माती तोंडात घालतात, काच/ आरसा दिसला की त्याला जीभ लावल्याशिवाय पुढे जात नाहीत. कुठे कुठे लक्ष ठेवायचं, जमेल तेवढं करावच पण बाकी शरीरातील आम्ल इ. घटक मारतात. उरलेल्यांनी डॉक्टरचे पोट भरायचे.
माझ्या पोराने संडासात हात घालून पाणी पिण्याचा प्रयत्नही केला होता. मी पहिला हो अयशस्वी होता, कुठला यशस्वी असेल तर त्यालाच ठावूक. तेव्हा पासून आंघोळ करताना त्याला पाणी प्यायची लहर आली की नाही म्हणत नाही, हे पाणी बरं. Happy फार चिंता करू नका. हलके घ्या.

मोबाइल रेडियेशन विषयी असहमत. मोबाइलच्या लहरी सगळीकडेच असतात. त्या फोनच्या जवळ जास्त प्रमाणात आणि इतरत्र कमी असे काही नसते. मोबाइल स्वतः ज्या लहरी सोडतो त्याची पॉवर अत्यंत कमी असते. त्यामानाने सूर्याकडून येणार्‍या लहरी (उदा यूवी) खूप जास्त तीव्र असतात.
<<

मी पेडिअ‍ॅट्रिशिअन नाही. सर्जन आहे. तेव्हा माझा प्रथमपुरुषी अभ्यास नक्किच कमी पडलेला असावा, परंतू, पेडिअ‍ॅट्रिशिअन मित्र व त्या विषयातील ज्ञानी लोकांनी दिलेली लेक्चर्स ऐकून वरील प्रतिसाद दिला होता.

आपल्या अवलोकनार्थ खालील लि़ंक्स देत आहे. हे पिअर रिव्ह्यूड मेडिकल लिटरेचर नव्हे, पण आपण केलेल्या छातीठोक विधानांत कोणतेही पुरावे दिलेले दिसले नाहीत, हे नमूद करतो. यूव्ही रेडिएशनचा मोबाईल रेडिएशनशी संबंध समजला नाही. यूव्हीपेक्षा एक्सरे वा अगदी मायक्रोवेव्ह ओव्हनमधील रेडिएशन देखिल जास्त स्ट्राँग असावे असे वाटते.

http://www.cancer.gov/cancertopics/factsheet/Risk/cellphones

http://www.dailymail.co.uk/news/article-1058989/Children-use-mobile-phon...

http://www.greenhealthwatch.com/newsstories/newsmobilephones/childrens-h...

या अभ्यासांव्यतिरिक्त अनेक स्टडीज असू शकतात. त्याच वेळी, लहान बाळाची कवटी पूर्णपणे कडक हाडाची बनलेली नसते, इतकेच नमूद करतो. बाकी आपण सूज्ञ आहातच. रेडिएशन हजार्ड्सबद्दल माझा स्वतःचा कोणताही ओरिजिनल रिसर्च पेपर आजपर्यंत पब्लिश झालेला नाही. शिवाय बाळही आपलेच आहे. त्याला कोणत्या रेडिएशनला किती एक्ष्पोज करावे हा निर्णय सर्वस्वी आपलाच आहे.

धन्यवाद!

धागा वाहता आहे का?
>>>>>>>
वाहता धागा म्हणजे आधीचे जुने प्रतिसाद गुडूप असे ना, तसे गप्पांचे पान असेल तरच होते ना? हा धागा "नवीन प्रश्न" म्हणून उघडलाय. मला फारशी याबाबत कल्पना नाही, पण इथे तर सुरुवातीपासून दिसत आहेत सारे प्रतिसाद, आणि तसेही मला हे रेकॉर्डला हवेच आहेत.

बाळाशी खेळायला/बघायला मुलीच्या ताया /दादा वगैरे कंपनी आली तर एक डोळा सतत बाळावर ठेवून त्यांच्या हातात न देता किंवा मांडीवर दिल्यास तुम्ही हात धरा.कारण तीही( ताया /दादा) मंडळी छोटी असतात.माझ्या मुलाच्या (त्यावेळी त्याचे वय २.५ वर्षे) मांडीवर असेच एकीने कौतुकाने ५ महिन्यांचे बाळ दिले.आणि बाळाची आई दुसरीबरोबर बोलण्यात गुंग झाली होती.ते बाळ हात हलवताना त्याच्या चिमकुल्या नखाचे चिमटे माझ्या लेकाला बसत होते.पटकन त्याने ढकलून देऊ नये म्हणून मी बाळाला धरले होते.पण लेकाची दया आली आणि बाळ त्याच्या आईकडे दिले.. हुश्श!

थोडक्यात काय तर कोणीही येवो,त्यांच्याशी बोलताना बाळाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.बाकी मुलीची आई ,आजीकडून व्यवस्थित सूचना घेऊन येइलच.

आपले जेवण झाल्यावर व्यवस्थित हात, तोंड साबणाने स्वच्छ धूवून, मुखशुद्धी खाऊन मगच बाळाला जवळ घ्यावे / बोलावे. मोठ्या माणसांच्या तोंडाला / हाताला जेवणानंतर येणार्‍या वासामुळे इतक्या लहान बाळाला उलटी होऊ शकते.