अधुरी एक कहाणी (सुधारून)

Submitted by tilakshree on 23 December, 2008 - 03:37

माझ्या वाचक मित्रांची मनापासून माफी मागून ही कथा दुरुस्त करतोय! मला ही कथा अशीच लिहायची होती. मात्र शेवट करताना खरं लिहायचं अवसान गळालं. आता मात्र खरं खरं लिहितोय. कथेच्या शेवटी वर्णन केली तशी खरोखर माझी मन:स्थिती काही काळ होती. मात्र खर्‍या प्रेमानेच मला त्यातून बाहेर काढलं. क्रेडिट गोज टू 'माझी बायको अ‍ॅंड सखी....`श्रुति'

दुपारचे तीन वाजलेले. काळ्या मिट्ट ढगांनी भरलेलं आभाळ. कुठलासा 'रुटिन' कार्यक्रम 'कव्हर' करून मी गाडीला 'किक' मारली. कार्यक्रम सामाजिक असो वा सांस्कृतिक; साहित्यविषयक असो वा क्रीडाविषयक; अध्यक्ष, उद्घाटक, प्रमुख पाहुणे तेच ते राजकीय पुढारी अन नेते. त्यांची तीच ती 'घसी-पीटी' भाषणं. तेच ते कार्यक्रम; त्याच तशांच 'असाईनमेंट्स' आमच्या नावावर मांडल्या जायच्या. इच्छा असो वा नसो आम्ही त्या करायच्या. लोकांनी दोन रुपये खर्च करुन आम्ही लिहिलेलं वाचावं म्हणून '..असे सांगून ते पुढे म्हणाले की;...' अशा छापाच्या बातम्या नव्या बाटलीत जुनीच दारू ओतल्यासारख्या लिहायच्या... कुठे चाललंय आपलं आयुष्य? कुठे नेतोय आपण त्याला? की तेच पुढून फ़रपटंत नेतंय आपल्याला त्याच्या मागे? आपण त्याच्या मागे टाचा घासंत निघालोय का? अगतिकपणे? धनगराच्या मागे निरुद्देश एका ओळीत निघालेल्या 'शिस्तबद्ध' मेंढरासारखे?

गाडीचं 'इंजिन' चाकाला गती देत होतं. चाकं पळत होती. मी गरजेप्रमाणे 'अक्सिलरेटर'ची मूठ पिळत होतो; कमी करत होतो. गाडीच्या यंत्राच्या क्रिया-प्रतिक्रियांएवढ्याच यांत्रिकपणे! माझं मन मात्र विचाराच्या वावटळीत भरकटंत होतं.... वावटळीच्या ठरलेल्या परिघात भिरभिरून पुन्हा तिथेच पडणार्‍र्‍या वाळक्या पाचोळ्यासारखं...!

..अचानक आभाळ गडगडलं. भीम-दुर्योधनासारख्या महायोद्ध्यांच्या गदा त्वेषानं एकमेकांना भिडाव्या तसे महाकाय काळे कभिन्न ढग एकमेकांना भिडले आणि त्या घर्षणातून प्रकटलेलं तेज आभाळभर चमकून गेलं... क्षणभरंच... डोक्यावर नळ सोडावा तसं पाणी आभाळातून कोसळायला लागलं आणि मी भानावर आलो. डोक्यातलं विचारचक्र आपोआपंच थिजून गेलं.

पावसात चिंब भिजून मी 'ऑफ़िस' गाठलं. गाडी पार्कींगमधे लावली. जुन्या अंकांच्या गठ्ठ्यातून काही पेपर काढून ओल्या अंगावर थापले आणि अंगावरचं पाणी निथळणार नाही एवढं टिपलं गेल्यानंतर टेबलवर गेलो. केलेल्या 'असाईन्मेंट'ची बातमी 'खरडायला' घेतली. तशीच ती निर्बुद्धपणे लिहिलेली; ओढून-ताणून 'लीड' काढलेली बातमी वृत्तसंपादकांच्या समोर ठेवली आणि निघालो. अगदी वीट आला या सगळ्याचा...! पावसाने थंड झालेली डोक्यातली वादळं पुन्हा थैमान घालायला लागली. 'काय करायचं या निरुद्देश आयुष्याचं...!' मी तंद्रीतंच स्वत:ला ढकलत पार्किंगमधे आलो. मागून शंकर धावत येत होता. आमचा ऑफ़िसबॉय. "साहेब; मोठ्या सायबानी बोलावलंय." शंकर मला गाठून म्हणाला. माझ्या डोक्यात तिडीकंच उठली. मनातल्या मनात संपादकांना शिव्यांची लाखोली वाहून टाकली. मला माझ्या या आधीच्या नोकरीतला एक प्रसंग साहजिकंच आठवला...

...दिवसभरात चार 'असाईन्मेंट्स' केल्या. त्यातल्या दोन 'निर्बुद्ध' प्रकाराच्या होत्या. ..असे सांगून ते पुढे म्हणाले की... या 'स्टाईल'च्या! पण उरलेल्या दोन 'स्टोरीज' मधे 'दम' होता. कामाची मजा होती. त्याची त्वरित प्रतिक्रिया मिळणार यात शंका नव्ह्ती. इंदिरानगरच्या पाण्याची; म्हणजे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आणि 'ड्रेनेजच्या लाईन' एकत्र येत असल्याची एक आणि दुसरीही अशीच कुठलीशी 'ह्युमन इंटरेस्ट स्टोरी' होती. सगळं काम उरकून नेहेमीच्या हॉटेलमधे जाऊन 'घसा ओला' केला आणि माझ्या आवडीची 'पालक खिचड्या'च्या डिशची ऑर्डर दिली. वेटरने किचनमधे ऑर्डर देऊन कांदा, लिंबू, लोणच्यासकट 'प्लेट्स' आणून मांडल्या. एवढ्यात माझा 'पेजर' किंचाळला. (तेव्हा मोबाईल अस्तित्वात नव्हते.) आमच्या तत्कालीन कार्यकारी संपादकांचा निरोप होता. 'रन इमिजिएटली टू ऑफ़िस. यू हऍव टू लीव्ह फ़ॉर सोलापूर ऍज अर्ली ऍज पॉसिबल. कार इज वेटींग फ़ॉर यू ऍट ऑफ़िस.' मी वैतागून त्यांना फोन केला.

"जेऊ का नको?"

"नको. ताबडतोब निघ. वाटेत कुठेतरी जेवा. आणि अगदी नाहीच जेवलास एखाद दिवस तरी हडकणार नाहीस. उलट ढेरी जरा कमी होईल... सकाळी सात वाजता सोलापूरच्या काँग्रेस भवनमधे शरद पवार आपल्याला मुलाखत देतायत. 'एक्स्क्लुजिव्ह' आहे."

मनातल्या मनात 'पालक खिचड्या'ला 'इदं न मम' म्हणत निरोप दिला आणि मला त्याच्यापासून दुरावणार्‍या 'पेजर'ला उचलू-उचलून आपटला. अर्थात मनातल्या मनातंच!

..आताही संपादकांनी बोलावलंय म्हणजे असंच काहीतरी धर्मसंकट आलंय असं माझ्या मनात आलं. पण करणार काय! पावलं ओढत केबिनमधे गेलो. संपादकांनी सुहास्यवदनाने स्वागत केलं. मग तर माझ्या मनाची खात्रीच झाली की आता हे आपल्या उरावर काही तरी ओझं नक्कींच टाकणार! कारण 'बॉस' लोक सहसा हसत नसतात. 'नॉर्मली' ते आपल्याला बोलावतात ते केवळ 'तासण्यासाठी'! मी आत गेल्यावर तर संपादक स्वत: त्यांच्या गुबगुबीत खुर्चीतून उठून उभे राहिले. एवढं स्वागत बघून माझ्या काळजाचे ठोके जरा जास्तंच वाढले. संपादकांनी आमच्या पब्लिकेशनचं पांढरं पाकीट माझ्या हातात ठेवलं आणि हात पुढे केला.

"अभिनंदन! तुझं प्रमोशन झालंय. 'ऍज अ चीफ़ रिपोर्टर!' त्यानुसार 'इन्क्रिमेंट'ही!"
हे सांगून संपादकांनी माझं अभिनंदन केलं.

"खरंतर सिनिऍरिटीप्रमाणे त्या नानाचा क्लेम होता. पण मी मॅनेजमेंटकडे तुझ्या नावाचा आग्रह धरला. अरे नुसती सिनिऍरिटी काय कामाची? गुणवत्तेलाही काही महत्व हवं ना! म्हणून मी तुझ्यांच नावाचा पाठपुरावा केला."

संपादकांनी हे मला आवर्जून सांगून एका दगडात दोन पक्षी मारायचा प्रयत्न केला. एक म्हणजे माझं प्रमोशन त्यांच्या 'रेकमेंडेशन'ने झाल्याचं सांगून मला त्यांच्या 'गोटा'त ओढायचा डाव साधायचा आणि नानाची 'सिनिऍरिटी' डावलून मला प्रमोशन दिल्याची पुडी सोडून त्याच्या माझ्यात 'काडी' लाऊन द्यायची! या राजकारण्यांमधे राहून आम्ही पत्रकार ही 'कूटनीती' तेवढी लवकर शिकतो बघा!

..असो! मी संपादकांशी हात मिळवला आणि बाहेर पडलो. गाडीला किक मारुन मी निघालो. संपादकाचे मला प्यादं म्हणून वापरण्याचे 'प्लॅन' गृहित धरुनही मला प्रमोशनचा आनंद होतांच! तसंही संपादक तरी कुठल्या चक्कीचा आटा खात होते की ते आपल्याला वापरून घेणार! चाणक्यनीती कोळून प्यायलोय आम्ही पण!

मी गाडीला किक मारून निघालो. माझी गाडी जमिनीपासून चार बोटं वर होती! धर्मराजाच्या रथासारखी! काही तासांपूर्वी माझ्या मनावर साचलेलं मळंभ कुठल्या कुठे पळून गेलं.

'माझी बढती झाली. आता मी चीफ़ रिपोर्टर'! आता 'असाईन्मेंट्स' मी 'मार्क' करणार! मी फ़डतूस 'असाईन्मेंटस' करणार नाही. फ़क्त 'एक्स्क्लुज़िव्ह'!...

रस्त्यावर दिसलेल्या पहिल्या एस.टी.ड़ी. बूथकडे माझ्या गाडीची चाकं आपोआपंच वळली. मी फ़ोन लावला... ०२२ ********

"हाय! कशी आहेस? काँग्रॅच्युलेट मी! माझं प्रमोशन झालंय! ऍज अ चीफ़ रिपोर्टर! पगारही वाढलाय!"
मी धडाधड बोलतंच होतो. तिने माझं अभिनंदन केलं. मला त्याचं भानही नव्ह्तं. मी माझ्याच तंद्रीत...

"चलो अभी आप की पापा से बात करेंगे. अब हम शादी करेंगे. आतापर्यंत लपून छ्पून करत असलेलं प्रेम आता जाहीर करु या. तू पपांशी बोल. वेळ ठरव. मी मुंबईला येतो. त्यांच्याशी बोलतो. ते सांगतील तेंव्हा माझ्या आई- बाबांना घेऊन येतो. इट्स हाय टाईम! लेट्स मॅरी! आपण आपलं आयुष्य घडवू! फ़क्त तू पपांशी बोलून वेळ ठरव. दॅट्स ऑल!..."

ती संध्याकाळ 'सेलिब्रेशन'ची होती. मध्यरात्रीपर्यंत मजा चालू होती. काही ऑफ़िसमधले मित्र; सहकारी; काही ऑफ़िसबाहेरचे! अर्थातंच काही मित्र म्हणवणारे जळू सहकारीही! मी त्यांच्याबरोबर मजा घेत होतो खरा... पण माझं मन भूतकाळात होतं....

....ती आणि मी... आमची लहानपणाची मैत्री... आमचं हातात हात घालून शाळेत जाणं... डबा शेअर करणं... मुलुंडच्या शोनार बांगला बागेत हुंदडणं... रेल्वे स्टेशनच्या चार नंबर प्लॅट्फ़ॉर्मवर जाऊन तिथल्या झाडाखाली लाल-चुटुक गुंजा जमवणं... खरंतर अजाणत्या वयातली काही वर्षांचीच मैत्री! पण इतकी घट्ट की जणू जन्मोजन्मीचं नातं असावं... काही वर्षातंच आम्ही मुलुंड पुन्हा सोडलं आणि आमच्या गावी परतलो. तिचा अन माझा फ़ारसा संपर्क राहीला नाही. एकतर तेव्हा फ़ोन-बिनच्या भानगडी नव्हत्या. आणि जे काही फ़ोन होते ते केवळ अत्यंत तातडीचे निरोप द्यायला वापरायचे अशी सार्वत्रिक धारणा असायची. गप्पा वगैरे मारण्यासाठी फोन वापरणं कुणाच्या गावीही नव्हतं. पूर्वीच्या पिढीत पोस्टमन दारात 'तार' घेऊन उभा ठाकला की काळीज धडधडायचं म्हणे. कारण नोकरीसाठी किंवा मुलाखतीसाठी 'कॉल' वगैरे कारणं वगळता बहुतेकदा तारेद्वारे वाईट बातम्यांच कळायच्या. तसं माझ्या लहानपणी फोनचं होतं. आमच्या गावात तेव्हा फोन फ़क्त कारखान्यात. आणि आम्हाला त्यावर बोलावून बहुतेकवेळा 'आजीची तब्येत बरी नाही. ताबडतोब मुलुंडला या' एवढेच निरोप यायचे... असो... तर तिचा अन माझा संपर्क तुटला. तसं त्याचं त्यावेळी फ़ारसं काही वाटलंही नाही. 'नवा गडी नवा राज' प्रमाणे पुन्हा मी गावातल्या नव्या-जुन्या मित्र-मैत्रिणींमधे रममाण झालो. तसं दिवाळी- उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही मुलुंडला जायचो. पण त्यावेळी ती तिच्या गावाला 'मेंगलोर'ला गेलेली असायची आणि मला तिची आठवणही येत नसे. आताचे उद्योग बदलले होते. दिसामासानं मुलुंडही बदलंत होतं. आग्रा रोड मोठा झाला. 'हाय-वे'ला चालत चालत फिरणं आवडीचं झालं. पुढे सुंदरसा मुलुंड जिमखाना, केळकर कॉलेज असं काय काय वाढत गेलं. आमच्या पूर्वेलाही छानशी बाग उभी राहिली. आमच्या सोसायटीच्या मागची दलदल गायब होऊन तिथे टोलेजंग इमारतीचं बांधकामही सुरू झालं. तरीही आमच्या सोसायटीतली भली मोठ्ठी विहीर, आंब्याची, तुतीची, चाफ्याची, एक फणसाचं आणि एक काजूचं झाड मात्र शाबूत होतं; आणि त्या झाडांच्या घेर्‍यात उभी असलेली आमच्या गोपाळाची कोकणातल्यासारखी झोपडीही! हे सगळं बघायला खूप मजा वाटायची आणि त्याहून मजा यायची ती पुन्हा गावी आल्यावर आपल्या 'गावंढळ' मित्रांसमोर या सगळ्यांचं मीठ-मिरची लाऊन वर्णन करायला. ते ही बिचारे अपूर्वाईने कान देऊन ऐकायचे आणि अवाक व्हायचे. मग माझी कॉलर ताठ!

दहावी झाली आणि पुढच्या शिक्षणासाठी मुलुंडला जायचं की पुण्याला असा प्रश्न पडला. आई-बाबांनी नेहेमीप्रमाणेच दोन्हीचे फायदे-तोटे समजावून निर्णय माझ्यावरंच सोडला. मी थोडा द्विधा मन:स्थितीत...! एकीकडे आजी, आजोबांबरोबर रहाण्याची उत्सुकता, लहानपणच्या मुंबईत असून रम्य असलेल्या मुलुंडचं प्रेम, कात टाकणार्‍या मुलुंडचं आकर्षण; तर दुसरीकडे स्वतंत्र जगण्याची अनिवार ओढ! त्यातंच भर म्हणून पुण्याबद्दल आणि त्यातही का कुणास ठाऊक पण एस.पी. कॉलेजबद्दल माझ्या मनात कुठेतरी आत्मीयता होती. पुणं आजोळ म्हणून समजू शकतो; पण या कॉलेजचं आणि माझं नातं कुठून, कसं आणि का जुळलं होतं हे मला अजूनही उमगलेलं नाही. असो... तर अखेर मी तिथेच प्रवेश घेतला आणि पुणेकर झालो.

बघता बघता कॉलेजचे सोनेरी दिवस कसे सरले ते कळलं ही नाही. कॉलेज करता करता केवळ योगायोगानेच एका वृत्तपत्रात लिखाण करण्याची संधी मिळाली आणि पत्रकारितेच्या क्षेत्राने जणू भुरळंच घातली. मी पत्रकार झालो. पुण्याहून मुंबईला आजी-आजोबांकडे जाता यावं यासाठी रेल्वेचा पास काढत होतो. महिन्यातून एखाददुसरी चक्कर व्हायची मुलुंडला. मग आजी-आजोबांबरोबरंच 'तिच्याशी'ही गाठीभेटी व्हायच्या. ती मुलुंडमधेचं नोकरी करायची. तिचं ऑफिस संपल्यावर आम्ही भटकायला जायचो. मुंबई, नवी मुंबईला जोडण्यासाठी नव्यानंच उभारण्यात आलेला ऐरोलीचा नितांत सुंदर पूल हे आमचं भटकण्यासाठीचं आवडतं ठिकाण. या पुलावर बसून मावळत्या सूर्याला साक्षी ठेऊन आम्ही तासनतास गप्पा मारायचो. कधी कधी तर काही न बोलता आभाळातल्या रंगांच्या नजरबंदी करणार्‍या खेळाकडे बघत रहायचो. कधी प्रभादेवीला जाऊन सिद्धिविनायकाचं दर्शन तर कधी बांद्रा लिंक रोडला जाऊन शॉपिंग...

पण मुंबईला नसतानाही आमच्यातल्या संवादात फारसा खंड पडत नव्हता. नवं तंत्र उपलब्ध झालं होतं इंटरनेटचं. नेटवर आमच्या भरपूर गप्पा व्हायच्या. असंच एकदा गप्पा 'चॅट'ताना तिने एकदम माझ्यावर 'मोहिनी अस्त्रा'चा प्रयोग केला. मला विचारलं; 'अगदी मनापासून खर्र खर्र सांग; मी कोण आहे रे तुझी?' प्रश्न अगदी अनपेक्षित होता आणि खोचंकही! असल्या खोचकपणाच बायकांना जन्मजात वरदान असतं हे ऐकून होतो पण आता अनुभवांती खात्री पटलीय. अशा प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रसंग म्हणजे एक दिव्य अनुभव असतो. ...घनदाट जंगल... किर्रर्र झाडी... एका बाजूला ताशीव कडे... दुसर्‍या बाजूला अथांग दरी... एका पावलापुरती वाट... अशा परिस्थितीत आपल्यासमोर हिरवे भेदक डोळे रोखून वाघ उभा ठाकला तर आपण काय करायचं? वाघाला पाठ दाखवून त्या अवघड वाटेवरून जीव मुठीत घेऊन पळत सुटायचं? खोल दरीत आत्मसमर्पण करायचं? 'सुपरमॅन, स्पायडरमॅन किंवा तत्सम जमातीतले 'अति'मॅन भिंती चढतात तसा कडा सर करायचा प्रयत्न करायचा की वाघाच्या नजरेला नजर भिडवून केवळ नजरेने का होईना; त्याला आव्हान द्यायचं? बायकांचे प्रश्न साधारणपणे अशाच 'कोंडीकर' प्रकाराचे असतात. आई, बहिण, बायको, प्रेयसी, मैत्रीण अशी प्रश्नकर्त्या बायकांची रुपं आणि परिस्थिती नुसार प्रश्नांचं स्वरुप बदलंत असलं तरी त्याची भेदकता तेवढीच असते...
...तर तिच्या प्रश्नाने मी असाच खिंडीत सापडलेलो! मात्र आम्ही (स्वयंघोषित का होईना...) शब्दप्रभू! शब्दांशी खेळणं हा आमच्या 'दोन्ही' हातांचा खेळ! (लेखणी चालवायला एक हात पुरायचा. हल्ली 'की-बोर्ड'ला दोन्ही हात लावावे लागतात.) बाजीप्रभूंनी दोन हातात दोन समशेरी घेऊन खिंड लढवली त्याच त्वेषाने 'या शब्दप्रभू'ने शब्दांच्या शस्त्रांनिशी पहिली चाल केली; " हे काय नवीन नाटक? तब्येत ठीकाय ना तुझी? तू माझी कोण हा काय प्रश्न झाला?" बॉल 'गनिमा'च्या कोर्टात!
"हो. हाच प्रश्न आहे आणि मला उत्तर हवंय."
बॉल व्यवस्थित परतवला गेला.
"या प्रश्नाcअं उत्तर द्यायलाच हवं? अन ते ही शब्दांत?" शब्दांचेच खेळ...
"मग कसं देणार?"
हा मात्र 'इन्स्विंग बाऊन्सर'! 'डक' करणंही मुष्कील! पण माघारी वळणे नाही मर्‍हाटी शील!
खरंतर हा प्रश्न शब्दांच्या खेळातंच टोलवला जावा अशी माझी इच्छा होती. मनातलं खरं उतर द्यायचा धीर होत नव्हता. एकीकडे तिच्या प्रश्नातंच तिचं उत्तर दडलंय असंही जाणवंत होतं. खरंतर तिच्या मनातल्या भावना माझ्या तोंडून वदवून घेण्यासाठीच तिने मला हा प्रश्न विचारलाय याची खात्री होती. प्रश्न ऐकतांच पायापासून मेंदूपर्यंत एक शिरशिरी शरीरभर सरसरुन गेली. वाटलं सांगूनंच टाकावं; 'माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.' पण धाडस होत नव्हतं. याची कारणं दोन. पण दोन्ही कारणांचं मूळ मात्र एकंच! 'अहं'! केवळ 'अहं'!!! मी जसा विचार करतोय तसं तिच्या मनात नसलं कदाचित आणि तरीही मी तिला खरं सांगून टाकलं; ते तिला रुचलं नाही तर मी तिची मैत्रीही गमावून बसेन... वर्षानुवर्ष जपलेली... माझं तिच्यावर प्रेम होतं ही गोष्ट खरी. पण म्हणून तिचंही माझ्यावर प्रेम असलंच पाहिजे हा माझा हट्ट नव्हता. माझ्यासाठी तिची मैत्रीही पुरेशी होती. पण हे समजून घेण्याएवढी प्रगल्भता तिच्यात नसेल तर? (पहिला अहं) ...तर मी तिला गमावणार! प्रेयसी म्हणून; आणि मैत्रीण म्हणूनही!
दुसरा भाग असा की अनेकदा बायकांच्या खोचक किंवा सूचक प्रश्नातंच उत्तर दडलेलं असतं. त्या त्यांच्या भावना आपल्या तोंडातून वदवून घेऊ इच्छितात. मला तिच्या 'मी कोण तुझी' या प्रश्नात तेच जाणवंत होतं. जर तसंच असतं तरी त्यातला 'रोमँटिसिझम' मला तेव्हा कळला नव्हता. माझं डोकं भलतीकडेच धावंत होतं; 'तिने शब्दांच जाळं का पसरावं? आणि त्या जाळ्यात गुरफटून मी कबुली का द्यावी?' (दुसरा अहं) मी शब्दांचे ख़ेळ सुरू ठेवणंच पसंत केलं. ...
"तू माझी 'प्रियसखी' आहेस." पुन्हा एकदा शब्द:च्छल!
"हुं...." स्क्रिनवर उमटलेल्या अक्षरचिन्हातून मला एका तुच्छतादर्शक नि:श्वासाचा बोध झाला.
"महाभारतात पांचाली द्रौपदी श्रीकृष्णाची प्रियसखी होती तशी?" 'लारवूड'च्या शरीरभेदी गोलंदाजीपेक्षाही भेदक असा 'मनोभेदक' प्रश्न! आता मात्र माझं अवसान गळालं. मेंदूला झिणझिण्या आल्या. कथित 'शब्दप्रभुत्वा'चा तिरस्कार दाटून आला. स्साला..... ; हे शब्दांचे खेळ करण्यापेक्षा आपण थेट भिडत का नाही प्रश्नांना? याच नव्हे; सगळ्यांच...!
खरंच तिच्या-माझ्यात द्रौपदी-कृष्णसख्यासारखं नातं आहे का? असलेलं आपल्याला चालणार आहे का? मी गडबडलो. अस्वस्थ झालो. अशा अनाम नात्याचा मी कधी विचारही केला नव्हता. मला त्यावेळी तरी ते सहनही होत नव्हतं. मला नेहेमी अभिमान वाटायचा; खरंतर अजूनही वाटतो; की मी बुद्धीने विचार जास्त करतो आणि भावनाभरात कमी. पण त्या क्षणी अगतिक झालेल्या माझ्या मेंदूचा ताबा भावनेने घेतला आणि मी नकळतपणे तिला सांगून गेलो... 'आय लव्ह यू'... तू मला हवींयस... आयुष्यभर...!
मी अनावरपणे बोलून गेलो खरं; पण ती नि:शब्द! माझ्या काळजाचं पाणी पाणी... तिची प्रतिक्रीया काय असेल... माझ्या काळजाचे ठोके वाढलेले...
"आर यू जोकिंग? ऍज ऑलवेज?"
"नो माय डियर... अगदी खरंच! आय लव्ह यू अ लॉट!"
परिणामाच्या काळजीत असतानाही शब्द सुटून गेले. पुन्हा एकदा...
"थँक्स! थँक्स अ लॉट!"
ती झटकन 'लॉग आऊट' झाली. मी ही मेसेंजरमधून बाहेर आलो. माझं डोकं गरगरंत होतं. मी माझं प्रेम व्यक्त केलं. 'आय लव्ह यू' हे शब्द टाईप करताना मन थरारुन गेलं. शरिरातून एक वीज चमकून गेली. ती 'थँक्स' म्हणाली. रागवली नाही. चिडली नाही. डोक्यावरचं मणामणाचं ओझं उतरल्यासारखं वाटलं. पण... पण ती नुसतंच थँक्स म्हणाली. 'आय लव्ह यू' कुठे म्हणाली? ..ड़ोक्यात नवांच कीडा वळवळायला सुरूवात झाली...
त्याच गोंधळलेल्या मन:स्थितीत ऑफिसवर पोहोचलो. मन मुळीच थार्‍यावर नव्हतं. कशातरी बातम्या खरडल्या. कुणी तरी काही तरी बोललं. मी ही काही बाही उत्तरं दिली. कशी तरी कामं उरकून गाडीला 'किक' मारली. पेट्रोल-पंपावर जाऊन टाकी 'फुल' केली आणि गाडी मुंबईच्या दिशेने वळवली. डोक्यात विचारांचं वादळ सुरु होतं. गाडी आपोआपंच पुढे सरकत होती. पावसाळ्याचे दिवस होते. लोणावळ्यात भुर-भुर अंगावर झेलतंच पुढे आलो. घाटात पावसाचं थैमान होतं. पण मला त्याची तमा नव्हती. पनवेलला पोहोचलो तेव्हा शिणवठा आला होता. संध्याकाळचे सात वाजले होते. एस.टी. स्टँडसमोरच्या 'शेर ए पंजाब' समोर गाडी लावली. तिथेच काम करणार्‍या राजाकडून छत्री घेतली आणि जवळच्याच मार्केटमधे जाऊन आतल्या कपड्यांसकट 'शॉर्ट- टी शर्ट' घेऊन आलो. परत हॉटेलमधे येऊन कपडे बदलून टेबलवर येईपर्यंत राजाने रमचा पेग भरुन ठेवला होता. एक सिगरेट शिलगाऊन पावसाकडे बघत मी घुटके घ्यायला सुरूवात केली. डोक्यात केवळ एकंच विचार होता. तिच्या 'थँक्स' म्हणण्याचा नेमके किती प्रकारचे अर्थ लागू शकतात याचा विचार करण्याचं काम करण्यात मेंदू तल्लीन ज़ाला. त्यामुळे राजाची बडबड कानावर पडली तरी तिथून पुढे ती मेंदूपर्यंत पोहोचू शकत नव्हती. माझ्या नुसत्या आविर्भावावरुनंच परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन राजाही गप्प झाला. तिथेच माशांवर ताव मारून मी 'कोकण भवन' मधल्या शासकीय विश्रामगृहात मुक्कामाला गेलो. दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर आटोपून मुलुंडला रवाना झालो. तिच्या ऑफीसला जाण्याच्या रस्त्यावर जाऊन थांबलो. थोड्या अंतरावरून ती येत असलेली मला दिसली. मला ती आज नेहेमीपेक्षा सुंदर वाटली. तिच्या सावळ्या रंगाला शोभेल असा फिक्कट आकाशी रंगाचा पंजाबी ड्रेस तिने घातला होता. ती जवळ येण्यापूर्वीच मोगर्‍याच्या सुगंधाने जणू तिच्या आगमनाची वर्दी दिली. एवढ्या सकाळी मला रस्त्यात बघून ती एकदम चकीत!
"अरे तू इथे असा अचानक? आणि तो ही 'बाईक'वर? काय 'हिरोगिरी' करायचा मूड आहे?"
तिच्या चेहेर्‍यावरचं प्रसन्न हास्य बघून माझा दिवस सार्थकी लागला.
"तुला भेटावं असं खूप वाटलं म्हणून आलो धावत."
"वा रे माज़ा रोमिओ... असा रोज थोडासा धावलास तर ढेरी तरी जरा कमी होईल. चल कॉफी घेऊ."
ती म्हणाली. आम्ही स्टेशनबाहेरच्या 'विश्वमहल'मधे शिरलो.
"बरं आता तुज़ी भाषणबाजी बंद कर आणि सांग अचानक कसा काय आलास? आजी-आजोबा ठीक ना?"
"हो; अगदी मजेत आहेत दोघेही. मी तर अजून घरी गेलोही नाहीये. खरोखरंच तुला भेटावंसं वाटलं म्हणून आलो. मी अगदी सहजपणे तिचा हात हातात घेतला. ही क्रिया अगदी सहजपणे घडून गेली. तिला मात्र जरा अवघडल्यासारख़ं झाल्याचं तिcया चेहेर्‍यावरून स्पष्टपणे दिसून गेलं. तिने अलगदपणे आपला हात माझ्या हातातून सोडवून घेतला आणि पुन्हा आपल्या नेहेमीच्या ख़ट्याळ मूडमधे म्हणाली;
"ज्यादा रोमँटिक बनने की जरुरत नही हैं मेरे हिरो; मला ऑफीसला उशीर होतोय. निघूया?"
मी तिला ऑफीसला सोडलं आणि निरोप घेतला. खरंतर मला कालच्या बोलण्याचा; म्हणजे 'थँक्स'चा उलगडा करून घ्यायचा होता. तिचंही माझ्यावर प्रेम आहे हे ऐकायला माझे कान आसुसलेले होते. पण तसं नसेल तरी ते ऐकून घेण्याची माझी मानसिक तयारी होती. फक्त मला काय तो उलगडा व्हायला हवा होता. तिला भेटून त्याबद्दल स्पष्टंच विचारायचं असं ठरवूनंच मी इथे आलो. मात्र प्रत्यक्ष भेटल्यावर मात्र का कुणास ठाऊक; मला काहीच विचारता आलं नाही. म्हणजे खरंतर विचारावंस वाटलं नाही. कदाचित अज्ञानातलं सुखंच मला हवं हवंसं वाटलं असेल. मी मुकाट्याने परतीची वाट धरली. त्यानंतरही आमच्या एकमेकांशी वागण्या-बोलण्यात फारसा फरक पडला नाही. एक मात्र खरं की दिवसेंदिवस मी तिचं आपल्यावर प्रेम आहे हे मी गृहित धरत गेलो.
दिवस पुढे सरकंत होते. वय वाढत होतं. नातेवाईक मंडळी आणि आई-बाबाही माझ्या लग्नाच्या मागे लागले. दोन-चार स्थळंही आली. मग मात्र मी आई-बाबांना 'तिच्या'बद्दल सांगितलं. खरंतर माझे आई-बाबा फारसे पुढारलेल्या विचारांचे वगैरे नसले तरी त्यांनी दुनिया बघितलेली आहे. त्यामुळे त्यांच्या विचारात थोडासा मोकळेपणा आलाय. आणि अफाट जनसंपर्कातून म्हणा; अध्यात्मिक ओढीमुळे म्हणा किंवा आयुष्यभराच्या अनुभवाची शिदोरी म्हणून म्हणा; त्यांचा प्रत्येक माणसाच्या मूलभूत चांगुलपणावर विश्वास आहे. दुसरं म्हणजे आपले विचार, मतं किंवा आपली स्वप्न इतरांवर लादण्याची त्यांची वृत्ती नाही. त्यामुळे मी जेव्हा त्यांना 'तिच्या'बद्दल सांगितलं तेव्हा त्यांना नाही म्हटलं तरी एक 'सांस्कृतिक धक्का' निश्चितपणे बसला असणार. पण त्यांनी आक्रसताळी भूमिका घेतली नाही. नेहेमीप्रमाणे त्यांची मतं व्यक्त केली आणि माझं निर्णयाचं स्वातंत्र्य अबाधित राखलं. मी माझ्या मतावर ठाम होतो. आता तर मला बढती मिळाली. पगारवाढ मिळाली. तिला तिच्या राहणीमानानुसार रहाता येईल इतपत आर्थिक स्थैर्‍याची खात्री पटली आणि मी नव्या आयुष्याची स्वप्न रंगवंत मुलुंडला निघालो. तिला भेटायला. तिला 'प्रपोज' करायला. सजलेल्या नववधूच्या रुपातली 'ती', नेहेमीचा अवखळपणा सोडून सलज्जपणाने मान खाली घालून उभी असलेली ती माझ्या नजरेसमोर तरळून गेली. मला सर्वात भावली ती तिच्या केशसंभारांना सजवणारी खास दाक्षिणात्य पद्धतीची वेणी....!

मनात भावी आयुष्याची सुखद स्वप्न रंगवत मी पुण्याहून मुलुंडपर्यंत कसा पोहोचलो ते कळलं ही नाही. मी तडक घर गाठलं आणि तिला फोन केला. संध्याकाळी ६ वाजता स्टेशनवर भेटून ऐरोलीच्या पुलावर जायचं ठरलं. ठरल्याप्रमाणे ती आली. मी मोठ्या खुशीने तिचं स्वागत केलं. तिच्या चेहेर्‍यावर मात्र काहीसा तणाव होता. तसाही तो साहजिकंच म्हणा! तिच्या घरातल्या मंडळींकडून होकार मिळणं सोपं नव्हतं. माझा आत्मविश्वास मात्र ओसंडून वहात होता. नथुलालाना (तिच्या पपांना मी नथुलाल म्हणतो. त्यांच्या मिशा 'शराबी' मधल्या; 'मुछे हो तो नथुलाला जैसी' अशा आहेत) आपण सहज पटवू शकू ही माझी खात्री होती. आईचा फारसा प्रश्नंच नव्हता. एक तर ती माझ्या 'गोटातली' असल्याची मला खात्री होती आणि दुसरं म्हणजे घरातल्या निर्णयप्रक्रियेत तिला फारसा 'से' नव्हता. नथुलालचाच निर्णय कायम असे.
.
..तर ती आणि मी रिक्षात बसून ऐरोलीच्या पुलावर आलो. ती अस्वस्थ होती. मावळणार्‍या सुर्याकडे टक लाऊन बघत होती. मी काही बोलण्या पूर्वीच म्हणाली; "श्री; प्लीज फरगिव मी; तू खूप चांगला आहेस. माझा खूप जवळचा मित्र आहेस. पण आपण केवळ मित्र नाही का राहू शकत श्री? आपण जीवनसाथी नाही होवू शकत... श्री काही वर्षापूर्वी मला एक असाच जवळचा मित्र मिळाला होता. त्याचं खूप प्रेम होतं माझ्यावर... तो लग्नाची बोलणी करायला पपांकडे आला होता. पण पपांनी त्याला अपमान करुन घालवून दिलं. त्या क्षणी मी एक निर्णय घेतलाय श्री! मला खात्री आहे तू मला समजू शकशील... मी माझ्या आई-वडलांना दुखवू शकत नाही. त्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन मी लग्न करू शकत नाही. कारण माझ्या दोघा भावांनी तेच केलं आणि त्याचा त्रास पपांनी किती करुन घेतलाय ते मी बघतेय. पपांनी त्यांना आपल्या आयुष्यातून बेदखल करुन टाकलंय. ते दोघेही दुबईत स्वत:चा व्यवसाय उभा करुन सुखात आहेत. पण पपांनी अजून त्यांना क्षमा केलेली नाही. ते वर्षाकाठी कधीतरी येतात तेव्हा हे मेंगलोरला निघून जातात. त्यांना उतरत्या वयात केवळ माझाच भावनिक आधार आहे श्री! मी त्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न करू शकत नाही आणि तसं करू इच्छितही नाही. मी त्यांना दुखवू इच्छित नाही तसंच श्री मी केवळ त्यांना सुखावण्यासाठी त्यांनी निवडलेल्या पण मला अनभिज्ञ असलेल्या कुणाशी मी लग्न करणार नाही हे ही निश्चित! श्री मी आयुष्यभर एकटी राहीन. लग्नाशिवाय! आई- वडील असेपर्यंत त्यांना सांभाळीन. नंतर... एकला चालो रे... श्री ही माझ्या आई-वडलांसाठी मी केलेला त्याग आहे. पण श्री मी माझ्या आई-वडलांना दुखवू शकत नसल्याची सजा मला करून घेतेय ती माझ्या सुखी संसाराची स्वप्नं मोडून! श्री प्लीज मला समजून घे आणि मला साथ दे श्री..."

माझं बोलणं खुंटलं होतं... मी नि:शब्द राहून फक्त ऐकत राहिलो... तिचं बोलणं तिचं वागणं चूक की बरोबर माहित नव्हतं. शक्यता दोन होत्या. एकतर तिच्या भावना प्रामाणिक असतील; पण अतर्क्यही... अजून एका शक्यतेची मला अनेक दिवसापासून जाणीव होती. तिचं एका महाराष्ट्रीयंच डॉक्टर मुलावर प्रेम होतं. पण एकतर्फी! खरं तर माझंही तिच्यावरचं प्रेम एकतर्फींच असावं. मला अनेकदा ते जाणवायचंही! आम्ही जेव्हा भटकायचो तेव्हा मला एकमेकांचे हात हातात घट्ट पकडून चालायला आवडायचं. पण ती फार वेळ हे सहन करू शकत नसे. कदाचित तिच्या मनात अपराधीपणाची भावना असेल... कारण तिचं खरं प्रेम होतं त्या डॉक्टरवर... त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्याला 'जळवण्या'साठी म्हणा किंवा आपल्याही प्रेमात कुणी पडू शकतं अशी स्वतःची समजूत काढण्यासाठी म्हणा... ती मला भ्रमात खेळवंत होती आणि मी ही त्या भ्रमात गुंग झालो होतो. पण आता तिनी मला उध्वस्त केलं. माझं अज्ञानातलं सुखही माझ्यापासून हिरावून घेतलं. तिचा निर्णय ऐकवून ती निघून गेली. मी मात्र मुलुंडमधल्या त्या पिंपळाच्या पारावर बसून खूप खूप वर्षांनी पोटभर रडलो.
मला रडताना पहाणं तसं दुर्मिळंच! त्या दिवशी मुलुंडमधे मला रडताना अनेकजणांनी पाहिलंही असेल... पण सगळे अनोळखी... पण एके दिवशी माझ्या जवळच्या मित्राने कधी नव्हे ते मला रडताना पाहिलं. माझा मित्र आणि माझ्या टीम मधला कॅमेरामन ऊंट उर्फे अभिजीत त्या दिवशी खूपच खूश होता. त्याच्या ६ फूट ३ इंच उंचीमुळे मी त्याचं नाव `उंट' ठेवलंय. त्याचं लग्न ठरलं. `लव्ह मॅरेज'! त्याबद्दल त्याने मला पार्टीसाठी बोलावलं. सातारा रस्त्यावरचं `बासुरी' हॉटेल. मी हॉटेलमधे गेलो तेव्हा 'उंट' आलेलाच होता. मी लगेच त्याचं अभिनंदन केलं.
`सर; तुम्हीही आता उरकून टाका ना' म्हणत त्याने माझी मोठ्या कष्टाने दाबलेली जखम पुन्हा खरवडली. त्याने तिला पाहिलं होतं. कुठलीशी उत्तरेकडची 'मूंह दिखाई'ची रस्म म्हणून त्याने त्या भेटीतही तिच्या उपस्थितीत पार्टीही दिली होती. आता मात्र त्याच्या बोलण्यावर मी विषण्ण्पणे हसलो. वेटरने रमची बाटली आणून पेग भरले. अभिजीत त्याच्या होणार्‍या बायकोबद्दल कौतुकाच्या गोष्टी सांगत होता. मी ही रस घेऊन ऐकत होतो. इतक्यात हॉटेलमधल्या साऊंड सिस्टीमवर गाणं लागलं;
`इस प्यार को मैं क्या नाम दूं'
पुन्हा एकदा माझे डोळे भरून आले. माझ्या डोळ्यासमोर दक्षिणी गजरा घातलेली `ती' नववधूच्या रुपात नटून थटून उभी राहिली. क्षणभरंच मी तिच्या आठवणीने भावूक झालो आणि माझ्या नकळतंच मी ढसा ढसा रडायला लागलो. अभिजीत कावरा बावरा...!
मात्र क्षणार्धात मी मला सावरलं. माझ्यातला देवदास संपून गेला. मनातला विषाद संपून आता त्याची जागा तिच्याबद्दलच्या विद्वेषाने घेतली. आता मला सूड घ्यायचायं. केवळ तिच्यावरंच नव्हे तर सगळ्या `स्त्री' जमातीवर! तिनी मला फसवलंय...! मलाही कुणाला तरी फसवायचंय...! शोध जारी आहे...!!!

गुलमोहर: 

पण मला तिला दाद द्यावीशी वाटली आणि साथही...!
>>>>>>>>>> सुंदर !!!!!!!
---------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

बर्‍याच दिवसांनी तुमची कथा दिसली मायबोलीवर. तुमची लिहीण्याच्या स्टाइल आणि कथा आवडली.

कथा म्हणुन छान आहे, पण अगदिच अतर्क्य , म्हणजे लग्न करून जाणार्या मुलिंना काय आइ वडिलांची काळजि नसते का? आणि समेटाचा अगदी एक साधा प्रयत्नही नाहि? डायरेक्ट माघार?
कोणत्या आईबापांनाही आवडेल, स्वत:चा सुखी संसार उभारायचं सोडून लेक आयुष्यभर आपल्या काळजीचा भार वाहत बसलिये?
शेवट अगदीच नाहि पचला.

अश्या मुली कुणाला भेटु नये Happy ,
मिळाल्या की एक गोष्ट ,मुलांसोबत मात्र नक्की होते ...

आधी अक्क्ल जाते,मग शहाणपण येते Happy