तुम बीन जाऊं कहां...

Submitted by अतुल ठाकुर on 1 May, 2014 - 10:57

hqdefault_1.jpghttps://www.youtube.com/watch?v=TKxirYqKfdU

"तुम बीन जाऊं कहां" या गाण्याचा विषय निघाला कि रफी आणि किशोरचे चाहते तलवारी पाजळुन बसतात आणि मग खणखणाट सुरु होतो. राजेशखन्नाच्या जमान्यात चित्रपट पाहायला सुरुवात केलेली पिढी निर्विवादपणे या गाण्यात किशोरच वरचढ आहे असा निवाडा देते. मला या वादात पडायचं नाहीय. माझं रफीप्रेम मला रफीच वरचढ आहे असं म्हणायला लावणार. मात्र चित्रपटापुरतं बोलायचं झालं तर किशोरवर अन्याय झाला आहे असं नक्कीच वाटतं. चित्रपट पाहताना गाणं बेमालुमपणे सिच्युएशन मध्ये मिसळलं असेल तर त्याची लज्जत काही औरच असते. त्याचं चित्रिकरण सुरेख झालं असेल, त्यात प्रसंगाला गडद करणारं दिग्दर्शन असेल तर पाहायलाच नको. त्यातही सोन्याला सुगंध यावा असे कलाकार पडद्यावर असतील तर लता, रफी, किशोर, मुकेश, तलत, मन्नादा सारखे पडद्यावर स्वरांची माणकं उधळतात त्यांना योग्य कोंदण मिळाल्यासारखं वाटतं. दिलिप कुमार, राज कपूर, नुतन, मीना कुमारी, मधुबाला, हेलन असे अनेक कसलेले कलाकार गाण्याला आणखि उंचावर नेऊन ठेवित असत. मात्र पडद्यावर किशोरच्या "तुम बीन" ने मला जेवढा धक्का दिला तेवढा क्वचितच कुठल्या गाण्याने दिला असेल.

धुंद होऊन, आपल्याच मस्तीत, युडलिंग करीत गायिलेले किशोरचे गाणे ऐकताना शरीरावरुन वय गळुन पडत असल्यासारखं वाटतं आणि पडद्यावर दिसतो कोण तर भारत भुषण! मात्र मी ठोकळा वगैरे शब्द कधीही वापरणार नाही इतका या लोकांसाठी मी हळवा आहे. भारतभुषण, प्रदिपकुमार यांची त्या त्या चित्रपटात त्यावेळी गरज होती आणि तेथे ती माणसे शोभुन दिसली असेच माझे मत आहे. मात्र किशोरसाठी भारतभूषण ही निवडच चुकल्यासारखी वाटली. एकंदरीत गावाचे दृश्य, हातात टोपले घेतलेली निरुपा राय, समोर बसलेलं छोटंसं गोड मुल या पार्श्वभुमीवर हे गाणं असेल अशी कल्पना डोक्याला खुप ताण देऊनदेखिल करता येत नाही. त्यातुन युडलिंगच्या वेळी आकाश आणि नारळाचे झाडच दाखवले आहे. कारण भारतभूषणला त्यावेळी फारसे काही करता आले नसावे.त्यावेळी राजेश खन्ना असता तर मजा आली असती असे वाटत राहते. "चला जाता हूं किसी की धुन में" मध्ये त्याने युडलिंगला न्याय दिला आहे. अगदी कुणी नाही तर हे गाणं चित्रपटाचा नायक शशी कपुरवर चित्रित झालं असतं तरी चाललं असतं.

हा चित्रपट मी पाहीलेला नाही. मात्र माझ्या माहितीप्रमाणे हे गाणं चार वेळा वाजते. दोन वेळा पूर्ण गाणे हे आनंदी मुडमध्ये आहे. ते किशोरच्या आणि रफीच्या आवाजात अनुक्रमे भारतभूषण आणि शशी कपूर गातात. आणखि दोन वेळा हे गाणे गंभीर मुडमध्ये आहे. मात्र त्यातही गायक आणि नायक बदलेले नाहीत. म्हातारा झालेला भारतभूषणदेखिल किशोरच्याच आवाजात गाताना ऐकुन जरा बुचकळ्यातच पडायला होतं. या सार्‍यामागे काहीतरी कथा असणार. जी मला माहित नाही. मात्र येथे मला रफीच्या गाण्याविषयी काही लिहावंसं वाटतं. संपूर्ण भावनिक अंगाने गायिलेले हे गाणे किशोरपेक्षा सरस आहे असे माझे प्रामाणिक मत आहे. किशोरचेही गाणे मला खुप आवडते. किंबहुना तेच माझे आवडते होते. मात्र रफीचे ऐकल्यावर आत कुठेतरी काहीतरी हलल्यासारखे वाटले हे खरे. यावर वाद होऊ शकतात. मात्र किशोरचे गाणे बसल्याबसल्या डुलायला लावते, अंगात सळसळता उत्साह भरते. तर रफी "अब है सनम हर मौसम प्यार के काबिल" म्हणताना हृदयात प्रवेश करुन जातो. शशी कपुर काही दिलिप कुमार नव्हे. पण तो गाणे पाडत नाही. त्याच्या टिपीकल खांद्याच्या हालचाली, विशिष्ठपणे उड्या मारत चालणे आणि हात पाठीमागे बांधुन छाती किंचित पुढे झुकवुन गाणे म्हणणे या सार्‍या अदा यात आहेत. त्या त्याला आणि गाण्याला शोभतात.

पंचमदांचे या दोन गायकांबद्दल काही आराखडे असावेत असे मानायला जागा आहे. ही गाणी ऐकुन मला त्यानंतर अनेक वर्षांनी आलेल्या "हम किसीसे कम नही" मधल्या "चांद मेरा दिल" ची आठवण आली. भावनिक अंगाने गायिले जाणारे मृदु मुलायम, मोरपिस फिरवल्यासारखे वाटावे असे गाणे किशोर हाताशी असताना देखिल पंचमदाने रफीला दिले आहे. "तुम बीन" मध्येही असेच घडल्यासारखे वाटते.

आशा पारेख सुरेख दिसली आहे. तिच्या चेहर्‍यावरचे झरझर बदलणारे भाव अप्रतिमच. या गाण्यात दिग्दर्शकाने ओलेत्या रमणीच्या पुतळ्याचा वापर केला आहे. पार्श्वभागी चिकटलेले ओलेते वस्त्र त्या सौंदर्यवतीचे सौष्ठव दाखवत असतानाच आशा परेखदेखिल तशीच तिच्या बाजुला पाठमोरी उभी दाखवली आहे. नजर असलेल्यांना यापेक्षा जास्त काही सांगण्याची आवश्यकता नाही. प्रत्यक्ष सुंदर कि प्रतिमा या संभ्रमात रसिक पडतो हे नक्की. हे नशीले दृश्य काही क्षणच आहे. त्यासोबत ऐकायची आहे ती रफीची मखमली स्वरातली करामत...

अब है सनम हर मौसम...प्यार के काबील
पडी जहां छांव हमारी... सज गयी महफील
महफील क्या तनहाईमें भी...लगता है जी
तुमको चाहके....

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय. Happy

मला रफीच्या आवाजतलं गाणं जास्त आवडतं. Happy

मात्र किशोरचे गाणे बसल्याबसल्या डुलायला लावते, अंगात सळसळता उत्साह भरते. तर रफी "अब है सनम हर मौसम प्यार के काबिल" म्हणताना हृदयात प्रवेश करुन जातो. >>>>>+१ Happy

सुंदर लेखन अतुलराव. किती बारकाईने विचार करून तुम्ही लिहिता याचे अप्रूप वाटते नेहेमी.

किशोर जास्त आवडता त्यामुळे त्याचेच गाणे आवडते. एरवी कैच्याकै वाटणारा भारत भूषण या गाण्यात सुसह्य वाटला होता. त्याने स्वतःच्या मर्यादा ओळखल्यामुळे की काय कोण जाणे अति अभिनय वगैरे करायचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे किशोरचा गहिरा आवाज उरात थेट उतरतो. रफीचे गाणे चालू असताना शशी कपूर बाकड्यावर लोळणे, खांदे उडवत आशा पारेखकडे येणे अशा लीला करत असल्याने थोडा इंपॅक्ट कमी होतो असे वाटले होते. रफीचे गाणे (आनंदी व्हर्शनसुद्धा) र्‍हिदमला किंचित स्लो आहे असेही वाटते.

रफीचे गाणे (आनंदी व्हर्शनसुद्धा) र्‍हिदमला किंचित स्लो आहे असेही वाटते.>>> बरोबर अमेय. पण मलाही ह्या गाण्यामध्ये रफीचाच आवाज जास्त आवडला...

रच्याकने - अतुलराव अशी अजुन काही उदाहरणं माहिती आहेत का (ज्यात एकच गाणं दोन वेगवेगळ्या प्रसिद्ध गायकांनी गायलं आहे) रफि आणि किशोर ह्यांचेच अजुन असे गाणे असले तर ऐकायला आवडेल.

आवडलाच लेख... मस्त जमलाय.
माझ्यासाठी रफी... मार डाला आहे.
हे गाणं कसलं भन्नाट चालू होतं... तालात म्हणायचय मला. ऑफ बीट आणि त्यानंतरही किंचित ऑफ... तालातल्या वेड्यांना हे कळेल. एकदा ताल सुरू झाला की सोप्पय, तुम बिन उचलायला.
एक सांगायचं राहिलं... माझा एक मित्रं हे गाणं बेदम सुरेख गायचा... प्रत्येक वेळी वेगळ्या रितीनं 'तुम बिन' उचलून... तेव्हढ्यासाठी त्याचे अनेक बेसूर गुन्हे माफ करायचो आम्ही.

सुरूवात ऐका... आधीच्या बीट्सचा संदर्भ नसल्याने माझ्याच हृदयाचा एक ठोका चुकवून सुरुवात केलीये हे नक्कीच. Happy
अशा पद्धतीने आज दहा तरी ठोके झालेच नाहीत Happy
मजा आया, अतुल साहेब. एका झक्कास गाण्याची नव्यानं भेट.. तुम्हाला ते सगळे चुकले ठोके बहाल आहेत Happy