हा छंद जीवाला लावी पिसे...

Submitted by अतुल ठाकुर on 5 April, 2014 - 11:43

Mohd-Rafi-261x300.jpg

चित्रपटात “पाहुण्या” कलाकाराची एंट्री हा एक जबरदस्त प्रकार असतो. तो आला कि कदाचित आधी माहित असुनदेखिल प्रेक्षकांना आनंदाचा धक्का बसतो. आणि ते सावरुन बसतात. अनपेक्षीतपणे जिव्हाळ्याचा मित्र भेटावा तसे वाटते आणि मन आनंदुन जाते. आपल्याकडे सिनेमात हा प्रकार बरेचदा वापरला गेला आहे. मात्र त्यासाठी काही अलिखित नियम, पथ्य पाळावी लागतात. ज्याला पाहुणा कलाकार म्हणुन बोलवायचं तो अत्यंत लोकप्रिय असायला हवा. त्याला साजेशी छोटी भुमिका असायला हवी वगैरे. मात्र काहीवेळा पाहुणे कलाकारच तेवढ्या दृश्यापुरता बाजी मारुन गेले असंही घडतं. आणि तेवढ्या वेळासाठी त्या चित्रपटातले कलाकार जणु फेड आउट होतात, फिके पडतात. रफीचं मराठीतलं आगमन हे असंच बाजी मारुन गेलेल्या यशस्वी पाहुण्या कलाकारासारखं आहे असं मला नेहेमी वाटतं. प्रस्तुत लेखात रफीच्या मराठी कारकिर्दीबद्दल लिहिण्याचा मानस आहे. हा त्याच्या मराठीतील कारकिर्दीचा आढावा नाही.

अमराठी गाजलेले गायक मराठीत गाणं ही दुर्मिळ गोष्ट नाही. तलतने “यश हे अमृत झाले”, “हसले आधी कुणी तु का मी” ही गाणी गायिली आणि ती गाजली देखिल. मन्नाडे तर “घनघन माला नभी दाटल्या” सारखे गाणे गाऊन गेला. त्यानंतरही मन्नाडेची कित्येक गाणी लोकांनी उचलुन धरली. “धुंद आज डोळे हवा धुंद झाली” हे त्यातलेच एक. त्यानंतर अभंग गायिले. ते तर आजदेखिल लोकप्रिय आहेत. “हाती वीणा मुखी हरी”, “आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी” अशी कितीतरी उदाहरणे आहेत. हेमंत कुमारच्या नावावर “मी डोलकर डोलकर” हे मराठीतील अजरामर कोळीगीत आहे. भूपेंद्र ने “हसलीस एकदा भिजल्या शारद राती” हे नितांत सुंदर भावगीत गायिले आहे. येसुदासचे ” आहे गुणाची मोठ्या मनाची” हे फारसे माहित नसलेले गाणे आहे मात्र तो ही मराठीत गायला आहे याची साक्ष द्यायला ते पुरेसे आहे. पुढे “प्रितीचं झुळझुळ पाणी” पासुन शैलेंद्र सिंग आणि मग अनेक. या सर्वांना पुरुन उरला असेल तर दुसरा अमराठी गायक महेंद्र कपूर. याने मात्र जवळपास मुख्य प्रवाहातील मराठी गायक असण्याचा मान मिळवला. दादा कोंडकेंच्या चित्रपटामुळे त्यावर शिक्कामोर्तबच झालं. मराठी गाणे गाताना “ण” “ळ” ही अक्षरे महत्त्वाची. त्यासोबतच जोडाक्षरांचे उच्चरही महत्त्वाचेच. त्यातदेखिल महेंद्र कपूर हा इतर अमराठी गायकांना वरचढ होता असे माझे मत आहे. हे विधान करताना महेंद्र कपूरची “रेंज” देखिल विचारात घेणे आवश्यक आहे. दादांच्या “गंगु तारुण्य तुझं बेफाम” पासुन ते “रात्रीस खेळ चाले” आणि “ती येते आणिक जाते” पर्यंतची गाणी या अत्यंत गुणी आणि अत्यंत दुर्दैवीदेखिल अशा या गायकाने गायिलेली आहेत.

मात्र याविवेचनानंतर मनात विचार येतो तो हा की, हिन्दीत कमालिचे यश मिळवलेल्या तलतने मराठीत गायला सुरुवात केली आणि एकदम तलतची लाट आली असे झाले नाही. “घनघन माला नभी दाटल्या” नंतर मन्नाडेचे मराठीत राज्य सुरु झाले नाही. हेमंतकुमारला भावगीतापलिकडे मराठीत फारशी संधी मिळालीच नाही. त्यानंतर येसुदास, शैलेंद्र सिंग, भुपेंद्र बद्दल बोलायलाच नको. मात्र मुख्य प्रवाहात गाणार्‍या महेंद्रकपूरची अवस्था काहीशी घरकी मुर्गी दाल बराबर सारखी झाली. तो प्रवाहात इतका काही मिसळुन गेला आणि एकजीव झाला कि त्याला अमराठी असं काही वेगळं स्थान उरलंच नाही. त्यामुळे त्याच्याबाबत वेगळं असं आकर्षणदेखिल वाटलं नसावं. आपल्याच घरातील काका, मामा बद्दल, प्रेम आणि माया असावी मात्र आवडत्या नायकाबद्दल वाटणार्‍या आकर्षणाची भावना तेथे नसावी असा काहीसा प्रकार महेंद्र कपूरच्या बाबतीत घडला.

रफीच्याबाबतीत मात्र गोष्टच वेगळी होती. “बा अदब बा मुलाहीजा” चा पुकारा व्हावा आणि शहेनशहाचं आगमन व्हावं तसं त्यावेळी घडलं. तो आला त्याने गायिले आणि त्याने जिंकले. असं म्हणतात “अरे ए दु:खी जीवा बेकरार होऊ नको” हे मराठीतील श्रीकांत ठाकरेंच्या संगीतदिग्दर्शनाखाली रफीने गायिलेले पहिले गाणे आहे. रफीच्या मराठीतील प्रवासाचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. श्रीकांत ठाकरेंनी रफीच्या उच्चारांवर घेतलेली मेहनत, रफीचा निरागस स्वभाव, त्याची शिकण्याची मनोवृत्ती, श्रीकांत ठाकरेंनी सारी मराठी गाणी उर्दुत लिहुन देणे वगैरे. मात्र या सार्‍या मेहनतीनंतर “शोधीसी मानवा राऊळी मंदिरी” ने मराठीत रफी युग आणले यावर दुमत नसावे. एखाद्याला रातोरात प्रसिद्धी मिळावी त्याप्रमाणे रफी मराठीत एकदम लोकप्रिय झाला. ऑर्केस्ट्रात हे गाणे वाजवले जाऊ लागले. त्यावेळी रफीच्या भक्तगणांमध्ये “शोधीसी मानवा” आणि त्यानंतर “हसा मुलांनो हसा” हे देखिल लोकप्रिय होते. तो चिरपरीचित मखमली आवाज मराठीतुन गायला लागल्यावर आनंदाची गोड शिरशिरी शरीरभर पसरु लागली. त्यानंतर एकाचढ एक गाणी आली. “हे मना आज कोणी बघ तुला साद घाली”, “खेळ तुझा न्यारा”, “हा छंद जीवाला लावी पिसे”, “हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाणा”, “अग पोरी सम्हाल दर्याला तुफान आईलय भारी” हे कोळी गीत, “माझ्या विराण हृदयी पाहु नकाच कोणी”, “विरले गीत कसे”, “नको आरती कि नको पुष्पमाला”, “नको भव्य वाडा” अशी गाणी रफी गाऊन गेला.

रफीच्या मखमली आवाजात “शोधीसी मानवा “ए‍कणे हा एक खरोखरच सुंदर अनुभव होता. सोपी चाल आणि अर्थपूर्ण शब्द. मला तर अलिकडे “शोधीसी मानवा” म्हटले कि “मनके खजाने में माया ही माया” हे रफीचे सुरेल गाणे आठवते. मराठीत कोळी गीताची परंपरा मोठी आहे. त्यातदेखिल “अग पोरी सम्हाल दर्याला तुफान” मध्ये धमाल आणली. त्यात जास्त ठसका पुष्पा पागधरे यांनी आणला. रफीची रोमँटीक गाणी ही त्याच्या आवाजातल्या मखमलीमुळे जास्त भावतात. ते “हा छंद जीवाला लावी पिसे”,आणि “हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाणा” या गाण्यांनी दाखवुन दिले. भगन हृदयी प्रेमिकाची व्यथा रफी आवाजातुन किती चपखलपणे व्यक्त करु शकतो हे “माझ्या विराण हृदयी पाहु नकाच कोणी”, “विरले गीत कसे” यागाण्यात रसिकांना पुन्हा एकदा दिसले. माझ्यामते रफीची गायकी दिसली ती मात्र “विरले गीत कसे” मध्येच. काहीसं शास्त्रीय बाजाचं हे गाणं हिन्दी चित्रपटसृष्टीतल्या या अनभिषिक्त सम्राटाच्या ताकदीची किंचित चुणुक दाखवुन देतं.

रफीला मराठीत मिळालेल्या यशात निर्विवादपणे त्याच्या गुणवत्तेचाच मुख्य वाटा आहे. कुठल्याही तर्‍हेचे गाणे सहजपणे गाण्याची अजस्त्र क्षमता, त्या गाण्यात योग्य ते भाव चपखलपणे आणण्याची आश्चर्यकारक देणगी. त्यासोबत तो वेड लावणारा मखमली, मुलायम स्वर, ही रफीची गुणवत्ता इतकी प्रचंड होती की काही वेळा त्यामुळे त्याचे क्वचित सदोष वाटणारे उच्चार देखिल दुर्लक्षिले गेले. रफीनंतर कित्येक वर्षांनी “अश्विनी ये ना” अशी आरोळी ठोकुन मराठीत आलेल्या किशोरकुमारने असा चमत्कार घडवुन आणण्याची शक्यता निर्माण केली होती. मात्र दुर्दैवाने त्याला तेवढा वेळच मिळाला नाही. मात्र रफीचा मिडास टच किशोरकडे होता असे म्हणवत नाही. शास्त्रिय बाजाची मराठीतील गाणी ही फक्त रफीच गाऊ शकला असता. रफीच्या आवाजात जे गायिल त्याचे सोने होईल हा गुण होता त्यामुळे त्याने गायलेली एकुण एक मराठी गाणी आजदेखिल लोकप्रिय आहेत. आमच्यासारखे रफीभक्त त्याच्या हिन्दीतील गाण्यावर कायमचे लुब्ध आहेतच. मराठीतही या बादशहाचा छंद त्याच्या गायकीमुळे आमच्या जीवाला पिसे लावुन गेला.

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतुल मस्त लिहिले आहेस.... रफी ला ऐकताना नेहेमी ते गाताना कसे हावभाव करत गात असतील असे बहुतेक वेळा विज्युअलाईझ करते मी ...आणि ते नकळत होते...बहुतेक वेळा शम्मी ची गाणी ऐकताना. त्यांचा निरागस चेहरा नेहेमी डोळ्यासमोर येतो. त्यांना गाताना बघायला मिळायला हव होत असे खूप वेळा वाटते. हिन्दी शास्त्रिय गाणी ऐकताना तर, अरे किती आरामात गायले असेल ना हे गाणे असे मनात येतेच येते.
लेख खूप खूप आवडला. रफी, जगजीत आणि लता हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
लता आणि जगजीत ला प्रत्यक्ष बघायची आणि ऐकायची इच्छा पुर्ण झाली. रफी ला बघायला खूप आवडले असते.

सर्वांचे आभार. Happy हा लेख प्रतिसादाविनाच मागे पडला होता Happy वाटलं कुणालाच आवडलेला दिसत नाहीय Happy

लेख चांगला लिहिलाय. मला व्यक्तिशः रफींची मराठी गाणी तितकी आवडत नाहीत. मन्नादा, तलत, महेंद्र कपूर, शैलेंद्र सिंग हे केव्हाही सरसच गायले आहेत. अगदी किशोरही. अ‍ॅट ईझ म्हणता येईल असं. ते लोक जेवढे भावले तेवढा रफींचा प्रभाव पडला नाही असं मला वाटतं.
'अगं पोरी'चा मात्र अपवाद... ते गाणं जमलेलं आहे एकदम!