छायागीत ७ - हम तेरे प्यारमें सारा आलम...

Submitted by अतुल ठाकुर on 2 April, 2014 - 02:43

dilekmandir.jpghttps://www.youtube.com/watch?v=UyqzDF2gK1A

"दिल एक मंदिर", दिग्दर्शक श्रीधर यांचा एक झपाटुन टाकणारा चित्रपट. अतिशय सशक्त कथा. पतीला असाध्य कोटीतला आजार जडलेला आणि समोर डॉक्टर म्हणुन पुर्वाश्रमीचा प्रियकरच उभा. त्याच्या मध्ये सापडलेली नायिका. तिची कुतरओढ. "याद न जाये बीते दिनोंकी" असे आर्तपणे आळवत अजुनही तिच्यातच गुंतलेला डॉक्टर. आणि जगण्याची आशा सोडलेला "बुलावा आ गया" म्ह्णुन ऑपरेशन थियेटरमध्ये जाण्याची तयारी करणारा आणि तेथुन परत येण्याची खात्री नसलेला पती. त्याने तीला आपल्या बंधनातुन मोकळे केले आहे. आणि तेव्हाच नायिका आपल्या भावना बोलुन दाखवते आहे "हम तेरे प्यारमें सारा आलम..."

दुर्दैवाच्या फेर्‍यात सापडलेल्या स्त्रीची सारी वेदना या गाण्यात उतरली आहे. हसरत जयपुरींचे काव्य या वेदनेला आणखि गडद करते.

पंछी से छुड़ाकर उसका घर, तुम अपने घर पर ले आये
ये प्यार का पिंजरा मन भाया, हम जी भर-भर कर मुस्काये
जब प्यार हुआ इस पिंजरे से, तुम कहने लगे आज़ाद रहो
हम कैसे भुलायें प्यार तेरा, तुम अपनी ज़ुबाँ से ये न कहो
अब तुमसा जहां में कोई नहीं है, हम तो तुम्हारे हो बैठे
तुम कहते हो कि ऐसे प्यार को भूल जाओ, भूल जाओ

प्रेमाचा झाला तरी ति पिंजराच. पुर्वीच्या मोकळ्या आभाळाची पक्ष्याला आठवण होत नसेल काय? हा गुढरम्य प्रश्न कवीने तसाच अनुत्तरीत टेवला आहे. आणि आता तर त्या पिंजर्‍याचीच इतकी सवय झालीय की स्वातंत्र्याची भीती वाटु लागलीय. एकंदरीत नायिकेची व्यथा तिच्या सुरुवातीच्या आयुष्यालादेखिल स्पर्श करते आहे.

शंकर जयकिशन ऐन भरात असतानाचे संगीत. आणि त्यांनी लताच्या आवाजातल्या तीव्रतेचा केलेला चपखल वापर. "तुम कहते हो कि ऐसे प्यार को भूल जाओ, भूल जाओ" गाताना, पतीने आशा सोडली, आपल्याला आधीच स्वतःपासुन वेगळे केले याचे दु:ख स्वरात नुसते उचंबळुन येते. हा चमत्कार फक्त लताच करु शकते.

श्रीधर यांच्या दिग्दर्शनात अनेक सुंदर जागा त्यांनी घेतलेल्या असतात. गाण्याच्यावेळी तर ते खासच दिसुन येते. "जब प्यार हुआ इस पिंजरे से", ही ओळ येताना कॅमेरा हळुवारपणे पलंगाच्या गजांच्या अलिकडे ठेवला आहे. त्यातुन पिंजर्‍याचे प्रतिक सुरेख उभे केले आहे आणि त्यानंतर "तुम कहने लगे आज़ाद रहो" म्हणताना कॅमेरा राजकुमारवर येतो. गाण्यात पुढे "हम प्यार के गंगाजल से बलम जी, तनमन अपना धो बैठे" म्हणताना मीनाकुमारीच्या डोळ्यांतुन आसवे वाहु लागतात आणि पडद्यावर अश्रुंमधुन पलंगावर बसलेला हताश राजकुमार पाहायला मिळतो.

राजकुमारने संपूर्ण गाण्यात कसलिही आशा नसलेला आणि शेवटची तयारी केलेला पती उभा केला आहे. त्याने लहानसहान हालचालींमध्ये ते सहजपणे दाखवुन दिलंय. त्याच्या चेहर्‍यावर ते कारुण्य सुरुवातीपासुन दिसुन येतं. जणुकाही तो मनोमन तयारी करतो आहे आपल्या पत्नीपासुन दुर जाण्याची. सुरुवातीलाच गाणे ऐकताना त्याच्या भावना उचंबळुन येऊ लागतात. श्वास जोरात चालताना, नाकपुडी किंचित फुलवुन राजकुमारने मनातली आंदोलनं छान दाखवलीत.

या गाण्यात मीनाकुमारीने मुर्तीमंत वेदना व्यक्त केली आहे. सुरुवातीपासुन शेवटपर्यंत तिच्या चेहर्‍यावरची रेष न रेष फक्त तिचे दु:खच व्यक्त करत राहते. एकाच रंगाच्या अनेक छटा दिसाव्यात त्याप्रमाणे गाण्याच्या अर्थागणिक ती आर्तता निरनिराळ्या प्रकारे तिच्या चेहर्‍यावर व्यक्त होत राहते. त्यात निराशा आहे, पतीने आधीच स्वतःला दुर केल्याचे दु:ख आहे, अगतिकता आहे. "शेवटच्या क्षणी आता मला दुर लोटु नकोस" अशी आर्तपणे केलेली आळवणी आहे. या गाण्याची नायिका मीनाकुमारीच. गाण्याबरोबरच तीची आर्तता, दु:ख वाढत जातं आणि शेवटी तिच्या हृदयाचा बांध फुटतो...

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान. लता स्पेशल गाणं अत्यंत आवडतं, बघण्यापेक्षा ऐकायला जास्त आवडणारं. शंकर जयकिशन आणि हसरत जयपुरींबद्दलही गाण्याच्या अनुषंगाने काही अधिक उल्लेख यायला हवा होता असं वाटतं.

माझी बहीण फार सुरेख म्हणते हे गाणं. ती शाळेत होती तेव्हापासूनच म्हणायची हे. तिच्या तोंडून ऐकेतोवर या गाण्याकडे तितकं लक्ष गेलं नव्हतं असं म्हटलं तरी चालेल. तिची गाण्यांची निवड ऑफ बीट आहे थोडी. एका छान गाण्याची आट्।अवण करून दिल्याबद्दल थँक्स Happy

एका अत्यंत छान गाण्याची आठवण. इयत्ता ६वीत हे गाणं माझं अत्यंत फेवरिट झालं. तेव्हापासून कुणी गाणं म्हण म्हणालं की मी हेच गाणं गायची. ते गाणं तेव्हा इतकं का आवडलं माहित नाही. संगित्/शब्द/वेदना/ अभिनय हे तेव्हा काही कळायचं नाही. पण भिडलं असेल कदाचित हे नक्की. Happy

अतुल…

तुम्ही ज्या ज्या वेळी अशी गीतांची तार झंकारता त्या त्या वेळी मला नक्षत्रमंडळातून कोणत्यातरी दुर्दैवामुळे निसटणा-या चांदणीची आठवण येऊ लागते. ती नशीबाला दोष देत नाही…ललाटी आलेले सारे भोग भोगायला ती तयार आहे, पण तशा अवघड स्थितीतही त्याच मंडलातील कुणाची तरी मधु आठवण ती विसरूही शकत नाही. काही दूरस्थ आवाज आजही तिला स्मरतात पण ती तन आणि मन दोन्ही घटकांच्या सोबतीने नवीन ठिकाणाला आपले कायमचे स्थान मानत आहे. मीना कुमारी पडद्यावर काय किंवा प्रत्यक्ष जीवनात काय….एक अशीच तुटलेल्या ता-याची प्रतीक होती…मीरा होती खरे तर :

“दिन डुबा तारे मुरझाये….. झिसक झिसक गयी रैन
बैठी सूना पंथ निहारू…. झर झर बरसत नैन….”

“दिल एक मंदिर”ची कथा प्रामुख्याने जरी डॉक्टरांच्या जीवनमरणाभोवती फ़िरत असली तरी पेशंट आणि डॉक्टर यांच्यातील सेतू ठरला तो मीनाकुमारीच्या अस्तित्वाचा. कालचा प्रियकर आणि आजचा पती या चक्रात सापडलेली ती युवती द्विधा मन:स्थितीतील नाही कारण ती जरी तिच्या मनाविरुद्ध निसटलेली चांदणी असली तरी नव्या मंडलातील तारा तिने आपला मानला आहे. प्रत्यक्षात त्या ता-यानेही तिला आपली मानली आहे आणि तिच्या मनातील द्वंद्व आता तिनेच शमविले पाहिजे हेही त्याने तिला प्रत्यक्ष शब्दात जरी सांगितलेले नसले तरी सुचविले आहे बरोबर. सर्वात शेवटी भारतीय संस्कृतीमधील परंपराही अधोरेखीत केली आहे गीतातून गीतकाराने आणि दिग्दर्शकाने आपल्या कौशल्यातून.

सर्व प्रतिसादकांचे आभार Happy

अशोकराव तुमच्या प्रतिसादातुन नेहेमी नवीन पैलु समोर येतो हा अनुभव आहे Happy धन्यवाद Happy