छायागीत ३ - जिस तरहा से थोडीसी तेरे साथ कटी है...

Submitted by अतुल ठाकुर on 19 January, 2014 - 10:12

hqdefault.jpghttp://www.youtube.com/watch?v=dKWT1XeDl4w

राजकुमारच्या विक्षीप्तपणाबद्दल कोणी काही म्हणो पण तो एक जबरदस्त अभिनेता होता आणि त्याच्यासारखा स्क्रीन प्रेझेन्स असलेल्या अभिनेत्यांची गणना हिन्दीत तरी फार नसावी. त्यानंतर काहीतरी झाले आणि उतारवयात जानीसाहेब पडद्यापेक्षा मोठे झाले आणि घशातुन जास्तच खरबरीत आवाज निघु लागला. पूढे त्यावर अनेक मिमिक्री आर्टीस्टनी त्यावर टाळ्या मिळवल्या. "आपका मंगलसूत्र कहां है" असे बप्पी लाहीरीला ऐकवणार्‍या जानीचा येथे विचार नाही. मला भावलेला राजकुमार हा अतिशय संवेदनशील अभिनेता आहे. अगदी उजाला, पैगाम ते वक्त पर्यंत.

"ये जुल्फ अगर खुलके बिखर जाये तो अच्छा" या गाण्याच्या सर्वप्रथम प्रेमात पडलो ते रफीमुळे. पुढे ते अनेकदा ऐकत असताना त्यातील सुरेख जागा समजु लागल्या. गाणे आणखि आवडु लागले. "जिस तरहा से थोडीसी तेरे साथ कटी है" मधल्या "साथ" शब्दावर रफीने केलेली कमाल एकदम स्पर्शुन गेली. त्यातच साहिरचे शब्द. "वैसे तो तुम्ही ने मुझे बरबाद किया है..इल्जाम किसी और के सर जायें तो अच्छा" आणि त्याचवेळी फ्रेम मध्ये बहुधा आपल्या शराबी नवर्‍याची वाटा पाहाणारी मीना कुमारी फ्रेममध्ये दाखवली आहे. दिग्दर्शनही लाजवाबच.

सुरुवातीला समोरच नाचणारी मदनिका हेलन येते. कोठ्यावरचा सीन. हेलनचं सौंदर्य त्यावेशात आणखि खुललेलं. पिंगट केस. आणि चेहर्‍यावर लोभस हसु. ती देखिल या मर्दात गुंतलेली आहे हे जाणवतं. आणि बाजुला राजकुमार. मर्दानी, खानदानी पुरुष. चषक घेऊन बसलेला आहे मात्र रस्त्यावरच्या बेवड्याप्रमाणे मान लटलट हलत नाही की नजर चळत नाही. रफीच्या मखमली स्वरात "ये जुल्फ अगर खुलके बिखर जाये तो अच्छा" सुरु होतं. आणि एक अतिशय संयत अभिनयाचा अविष्कार पाहायला मिळतो.

सारंगीच्या स्वरात हेलनचा चेहरा जाम मध्ये दिसतो. ती तो उचलुन त्याला देत असतानाच हसर्‍या चेहर्‍याने राजकुमार त्या लावण्यवतीला आणखि घायाळ करीत सुर आळवु लागतो. "इस रात की तकदिर सवर जाये तो अच्छा" म्हणत तो देखणा नट जाम उंचावतो आणि हेलनचे पाय थिरकु लागतात. गाणे हळुवारपणे पुढे सरकत जाते. प्रेक्षक त्यात गुरफटत जातात. शेवटी समर्पणोत्सुक हेलन गादीवर पहुडली असताना पाय लडखडत असलेला राजकुमार चषकातल्या मदिरेचा वर्षाव तिच्यावर करतो आणि तिच्या दिशेने पुढे सरकतो...

अतुल ठाकुर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक एक रत्न काढताय की पोतडीतुन Happy

का कुणास ठाऊक, पण त्याकाळी (आणि आताही कधीकधी) रफी, किशोर, मुकेश वगैरे गायकांनी अनेक ठोकळ्यांना जगवले असावे, असे वाटते Happy

>>>>"ये जुल्फ अगर खुलके बिखर जाये तो अच्छा" या गाण्याच्या सर्वप्रथम प्रेमात पडलो ते रफीमुळे. पुढे ते अनेकदा ऐकत असताना त्यातील सुरेख जागा समजु लागल्या. गाणे आणखि आवडु लागले. "जिस तरहा से थोडीसी तेरे साथ कटी है" मधल्या "साथ" शब्दावर रफीने केलेली कमाल एकदम स्पर्शुन गेली. त्यातच साहिरचे शब्द. "वैसे तो तुम्ही ने मुझे बरबाद किया है..इल्जाम किसी और के सर जायें तो अच्छा" आणि त्याचवेळी फ्रेम मध्ये बहुधा आपल्या शराबी नवर्‍याची वाटा पाहाणारी मीना कुमारी फ्रेममध्ये दाखवली आहे. दिग्दर्शनही लाजवाबच.<<<<<< +१

गाण्याचे शब्द, रफीचा आवाज, सर्वच सुरेख आहे.

थोडक्यात आणि छान लिहिलंय.
"चषकातल्या मदिरेचा वर्षाव तिच्यावर करतो " >>> हे दृश्य मस्तच चित्रित केलंय.
राजकुमारने बेपर्वाईने उडवलेली दारू हवेतून तिच्या अंगावर पडताना दाखवणे हे जबरदस्त छान.

बाकी हेलनबद्दल एकाच शब्दात सांगायचं तर ..... लाजवाब.
या गाण्यातील "जिस तरह से थोडीसी तेरे साथ कटी है "या ओळीच्या वेळी (1:12 - 1:15) राजकुमारपाशी बसलेली हेलन खांद्यांपासून कमरेपर्यंत जे काही थरथरली/थिरकली आहे त्याला तोड नाही, अफलातून आहे ते.
--------------------------------------------------------------------------------------------------------------

लिरिक्स जास्त आवडले. >>> ज्ञानेशजी, ती गझल आहे ना ?
smriti.com या वेबसाइट्वर चौथ्या शेरात चुकीचे शब्द दिले आहेत.
प्रत्यक्ष गाण्यात "इल्जाम किसी और के सर जाए तो अच्छा" असे शब्द आहेत.

काजल सिनेमातील या गीतात आणखीही एक/दोन शेर आहेत.त्यातील एक आठवला :
"जिस सुबह की तकदीर में लिखी है जुदाई
उस सुबह से पहलेही कोई मर जाए तो अच्छा"
(पडद्यावर या ओळी गात असताना दुर्गा खोटे अंतिम श्वास घेत असते.)

----------------------------------------------------------------------------------------------------------------
माझ्या तरुण वयात मी राजकुमारचा फॅन होतो. त्यावेळी मलाही तो उत्तम अभिनेता वाटायचा.
परंतु, थोडी अधिक समज आल्यावर, त्याच्या अभिनयाच्या मर्यादा लक्षात आल्यानंतर कळून चुकले की
राजकुमार हा स्टार अधिक होता आणि थोडाफार अभिनेता होता.

पण त्याचा आवाज, त्याचा विशिष्ट रुबाब, चालण्याची ढब, आणि (एकसुरी) डायलॉग डिलिव्हरी हे सारं
त्या काळातल्या अभिनेत्यांमधे उठून दिसायचे हे नक्की.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
वेळ मिळाल्यास आणखीही लिहायचं मनात आहे.

उल्हास जी....

"...हेलन खांद्यांपासून कमरेपर्यंत जे काही थरथरली/थिरकली आहे त्याला तोड नाही, अफलातून आहे ते...." तुमचे हे निरीक्षण जबरदस्त आहे....याला म्हणतात आवडलेले गाणे आवडीनेच पाहणे म्हणजे काय ! मला असा अनुभव वैजयंतीमालाच्या "होठो में ऐसी बात..." ह्या गाण्याप्रसंगी येतो. तिच्या प्रियकराला गाण्यानंतर मारले जाणार आहे याची तिला अगोदरच कल्पना आलेली असते आणि त्या दरम्यान ते कौशल्याचे नृत्य सादर करताना त्याच्याबद्दल होणारी विलक्षण घालमेल तिने उत्कृष्ट अदाकारीने...विशेषतः डोळ्यांनीच... दाखविली आहे. हा प्रसंग ऑडिओ माध्यमातून आपल्यासमोर येत नाही....वरील काही गाणी अनुभवायची असल्यास ती दृष्यरुपातच पाहणे म्हणूनच गरजेचे बनते.

दुनिया की निगाहोंमें भला क्या है बुरा क्या, ये बोझ अगर दिलसे उतर जाए तो अच्छा!-
तथाकथित 'रोमँटीक' गाण्यात एकद्म ज्याला दार्शनिक म्हणता येईल अशी ओळ लिहून जाणे हा खास साहिरपणा!

राजकुमारने बेपर्वाईने उडवलेली दारू हवेतून तिच्या अंगावर पडताना दाखवणे हे जबरदस्त छान.

खरंच ते दृश्य फारच सुंदर आहे.

धन्यवाद उल्हासजी. सविस्तर प्रतिसादाबद्दल. उशीराने उत्तर देत आहे त्याबद्दल क्षमस्व.

सर्व प्रतिसादकांचे आभार.