अमिताभ बच्चन आणि “दिवार” (१९७५) चित्रपटातील संतप्त अंगार

Submitted by अतुल ठाकुर on 12 January, 2014 - 10:20

amithabh_bachchan_deewar1-300x212.jpg

सर्वसाधारणपणे लोकांमध्ये असा समज आहे कि अमिताभचा “अँग्री यंग मॅन” हा “जंजीर” या सुपरहिट चित्रपटातुन जन्मला. या समजात तथ्य आहे. मात्र याचा अर्थ असा नाही कि “जंजीर” पूर्वी अमिताभने त्याच्यातली आग पडद्यावर दाखवलीच नाही. “जंजीर” पूर्वी फार अगोदर अमिताभने “परवाना” चित्रपटात खलनायक साकारला होता. मदनमोहनचं संगीत लाभलेल्या या चित्रपटात “सिमटी सी शरमायी सी” हे किशोरचं आणि “यू ना शरमा फैलादे अपनी गोरी गोरी बाहें” हे रफी-किशोरचं द्वंद्व गीत होतं. किशोरने नवीन निश्चलसाठी गायिलेला भाग आनंदी मूडमध्ये होता तर रफीचा आक्रोश अमिताभसाठी होता. जिच्यावर आयुष्यभर प्रेमे केलं ती प्रेयसी दुसर्‍याच्याच प्रेमात आहे हे कळल्यावर उध्वस्त झालेल्या अमिताभच्या हातून गाण्याच्या शेवटी संतापाने दारुचा ग्लास हातातच फुटतो. या नैराश्याला जोड आहे ती रफीच्या धारदार परंतु आर्त स्वराची, मदनमोहनच्या विस्मयकारक संगीताची आणि अमिताभ नावाच्या येऊ घातलेल्या वादळाच्या पोटातील आगीची. ही आग अधुन मधुन “आनंद” चित्रपटात देखिल दिसते.

“जंजीर” पासून अमिताभच्या “अँग्री यंग मॅन” चं साम्राज्य हिन्दी चित्रपटसृष्टीत सुरु झालं. या नायकाने दाखवलेला संताप हा त्याच्या पुर्वासूरींपेक्षा फारच वेगळा होता. अन्याय सहन करत असताना व्यवस्थेविरोधी सतत साठत असलेला राग, द्वेष ज्याचा भडका कुठल्याही क्षणी होऊ शकेल अशा प्रकारे हा अंगार पडद्यावर साकार केला गेला.अमिताभला अमाप लोकप्रियता लाभल्यावर या विशिष्ठ तर्‍हेच्या सिच्युएशनचा वापर जवळपास प्रत्येक चित्रपटात झाला. मात्र ज्या तर्‍हेने “दिवार” चित्रपटात हा अंगार वापरला गेला त्याला तोड नाही. म्हणुन या लेखाद्वारे मला असं म्हणायचं आहे की अमिताभच्या कारकिर्दीतला सर्वोच्च पातळीवरचा “अँग्री यंग मॅन” हा “दिवार” (१९७५)चित्रपटातच साकारला गेला.या आधी आणि नंतरही त्याने “अँग्री यंग मॅन” साकारले पण या सम हाच. पुढे जाण्याआधी एक गोष्ट येथेच स्पष्ट केलेली बरी. हा लेख “दिवार” चित्रपटाबद्द्ल नाही. त्या चित्रपटातील एका कालखंडाबद्दल आहे. निळा गणवेश घातलेला, खुरटी दाढी वढवलेला, संपूर्ण व्यक्तीमत्वातच राख वर पडलेल्या निखार्‍यांप्रमाणे धग दाबुन ठेवलेला, ओझी उचलणारा डॉक मधला हमाल अमिताभ या लेखाचा नायक आहे. त्यानंतरचा सुटाबुटातला, स्मगलर झालेला अमिताभ अनेक चित्रपटांमध्ये आपण पाहिला आहे. त्याचा विचार येथे केलेला नाही.

चित्रपटाच्या सुरुवातीलाच युनियन लिडर असलेल्या अमिताभच्या वडीलांना कामगारांशी गद्दारी केल्याच्या आरोपावरुन कामगारांकडुन मारहाण होते. कुटूंबाच्या सुरक्षिततेसाठी ते मालकांशी तडजोड करतात.मात्र हा अपमान सहन न होऊन ते परागंदा होतात. येथुन त्या कुटंबाच्या दुर्दैवाचे दशावतार सुरु होतात. समाजाकडून होणार्‍या कुचेष्टा, हेटाळणी, अपमानांना मर्यादा राहात नाही. लहानग्या अमिताभच्या हातावर “मेरा बाप चोर है” हे गोंदलं जातं. एका झंझावाताची ही नांदी असते.वय वाढतं तसा हा द्वेष सघन होत जातो. अमिताभची “एंट्री” च मुळात देवळाच्या बाहेर बसलेला दाखवुन झाली आहे. हमालाचा निळा गणवेश घातलेला, देवावर विश्वास नसलेला, गप्प बसलेला हा तरूण पोटात ज्वालामुखी दडवुन आहे याची सुजाण प्रेक्षकांना तत्काळ कल्पना येते.पुढे गूंड हप्ता मागायला येतात. तो न दिल्याने एका साथिदाराचा अपघातात मृत्यु ओढावतो. ही उंटाच्या पाठीवरली शेवटची काडी ठरते. अमिताभ हप्ता न देण्याचं ठरवतो. आणि त्यानंतर ती गोदामातली प्रसिद्ध हाणामारी होते.

आपल्याकडे हाणामारीच्या दृश्याकडे पाहण्याची प्रेक्षकांची दृष्टी चमत्कारीक आहे. काही फक्त देमार चित्रपटाचे प्रेक्षक असतात. काहींना वास्तवाशी कसलाही संबध नसलेली हिंसक दृश्ये आवडतात. बर्‍याचशा दक्षिणात्य चित्रपटांमध्ये दिसणारी नारळाच्या बागेत अर्ध्या लुंग्या लावुन चाललेली हाणामारी देखिल चवीने पाहणारे प्रेक्षक असणारच. (यात नायकाच्या एकेका फटक्यात माणसे उंच आकाशात उडतात आणि गरगर गिरक्या घेत खाली कशावर तरी आदळतात.)तर काहिंना हे सारेच खोटे वाटते. मात्र “फाइट” सीन चांगला होण्यासाठी उत्तम अभिनयाची आवश्यकता असते, तो सीन जर चांगला झाला असेल तर त्यात काम केलेल्या अभिनेत्यांनी चांगला अभिनय केलेला असतो हे बहुधा प्रेक्षक मंडळी विसरलेलीच असतात. मारामारीचा अभिनयाशी संबंध काय??? पण “दिवार” मधील हे गोदामातील हाणामारीचं दॄश्य बारकाईने पाहिलं तर जाणवेल कि अमिताभच्या प्रत्येक हालचालित अभिनय भरला आहे. त्या त्वेषाचं “बेअरिंग” त्याने शेवटपर्यंत टिकवलं आहे.

गुंड अमिताभला शोधत गोदामात येतात आणि तो बर्फाळ थंड पण अंगावर काटा उमटवणारा आवाज त्यांच्या कानावर पडतो. “पिटर…. तुम लोग मुझे ढूंढ रहे हो और मै तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा हूं”. पुढचं वर्णन करण्यात अर्थ नाही. ते पाहायलाच हवं. हातात फावड्यासारखं काहीतरी गावल्यावर अमिताभ प्रत्येकाला तो खाली पडेस्तोवर हाणत राहतो.सत्तरच्या दशकाच्या मानाने हे दृश्य अतिशय हिंसक आहे. मात्र त्याने कथा पुढे जाते. ते ठिगळ जोडल्यासारखं किंवा काही प्रेक्षकांची सोय करण्यासाठी टाकलेलं नाही हे जाणवतं. गळ्यात दोरखंडाने जेरबंद केलेला अमिताभ त्वेषाने दोन्ही बाजूंना खेचुन एकमेकांवर आपटतो हे अतिरंजित वाटत नाही केवळ अमिताभच्या अभिनयामुळे. हा सीन कमालिचा नैसर्गिक वाटण्यात अमिताभच्या अभिनया बरोबरच दिग्दर्शक यश चोप्रा , पटकथाकार सलिम जावेद, संगीतकार आर. डी. बर्मन आणि फाइट कंपोजर शेट्टीचाही हात आहेच. युनुस परवेझचा (हा एक अतिशय कसलेला अभिनेता) रहीम चाचा, मास्टर अलंकार (लहानगा अमिताभ)निरुपा रॉय, शशी कपूर या सार्‍या सहकलाकारांच्या अभिनयानेच अमिताभमधील द्वेष जास्त गडद वाटु लागतो. त्यांच्या अगतिकतेच्या, आदर्शवादाच्या आणि मध्यमवर्गिय विचारसरणीच्या पार्श्वभूमीवर हा संताप आणखि अधोरेखित होतो.

अमिताभला “दिवार” मध्ये सुरुवातीपासून पाहताना ह्या ज्वालामुखीचा केव्हा आणि कसा स्फोट होणार हे पाहण्याच्या उत्सुकतेने प्रेक्षक बसलेला असतो. तो जवळपास अमिताभमयच झालेला असतो. त्याच्या सार्‍या निराशा, व्यवस्थेविषयीची चीड त्याने अमिताभला दिलेली असते. अमिताभच्या गुंडांवर हाणल्या जाणार्‍या प्रत्येक जोरकस फटक्यागणिक प्रेक्षकाच्या संतापाचा निचरा होत असतो. शेवटी लढाई जिंकुन अमिताभबाहेर येतो. त्याचे सहकारी हमाल त्याचा जयजयकार करतात्.आणि हा त्यांच्या काँडाळ्यातुन बाहेर पडुन नळाकडे जातो. नळ चालु करुन पाण्याच्या धारेखाली डोकं धरतो. त्याच्यातल्या धगधगत्या ज्वालामुखीला तात्पुरतं का होईना शांत करण्यासाठी, काबुत ठेवण्यासाठी. आणि अशा तर्‍हेने एका परिपूर्ण दृश्याची सांगता होते.

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहेमीप्रमाणेच प्रभावी लेखन ..

विषय तसा जुना-पुराणाच आहे आणि इथल्या मित्र-मंडळींशी अमिताभ सर्वोत्कृष्ट अभिनेता (किंवा त्यापैकी एक) आहे का असा वाद तर भरपूर वेळा घालून झाला आहे .. त्या वादाचा निर्णय काहीही असो, पण "अँग्री यन मॅन" फक्त अमिताभच .. तो जे अशा भूमिकेमध्ये करू शकतो ते आणखी कोणीच नाही .. Happy

>>“पिटर…. तुम लोग मुझे ढूंढ रहे हो और मै तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा हूं”<<

या डायलॉग मधला "और मै तुम्हारा" नंतरचा पॉज… एकदम खतरनाक

https://www.youtube.com/watch?v=AKB0nCYXokM

छान लिहीले आहे. अजून जमेल तसा प्रतिसाद देतो.

अमिताभ सर्वोत्कृष्ठ अभिनेता नसेलही कदाचित, त्याने इतर अनेकांएवढे वैविध्य असलेले रोल्स केले नाहीत यात तथ्य आहे, भूमिकेत शिरल्यावर त्यातील "अमिताभ" विसरला जाईल एवढे त्याचे कधी झाले नसावे (त्याचे कारण त्याची लार्जर दॅन स्क्रीन पर्सनॅलिटी हे जास्त आहे). त्यामुळे निव्व्ळ अभिनय यावर तुलना केली तर लोक इतर काहींची नावे त्याच्या आधी घेतील. मला त्यात काही वाद नाही.

पण अभिनयक्षमता, प्रेझेंटेशन, नैसर्गिक स्टाईल, एखादी भूमिका प्रचंड लोकप्रिय होईल अशा तर्‍हेने पडद्यावर साकारण्याचे कौशल्य (जे कमर्शियल सिनेमाला अत्यंत आवश्यक आहे), भूमिकेत, संवादात काही दम नसला तरी चित्रपट बघणेबल करण्याचे कौशल्य, आणि गरीब-श्रीमंत, स्त्रिया-पुरूष यांच्यात सारखीच लोकप्रियता - हे "कमर्शियल पॅकेज" त्याच्याइतके दुसर्‍या कोणाचेच नाही.

पण अभिनयक्षमता, प्रेझेंटेशन, नैसर्गिक स्टाईल, एखादी भूमिका प्रचंड लोकप्रिय होईल अशा तर्‍हेने पडद्यावर साकारण्याचे कौशल्य (जे कमर्शियल सिनेमाला अत्यंत आवश्यक आहे), भूमिकेत, संवादात काही दम नसला तरी चित्रपट बघणेबल करण्याचे कौशल्य, आणि गरीब-श्रीमंत, स्त्रिया-पुरूष यांच्यात सारखीच लोकप्रियता - हे "कमर्शियल पॅकेज" त्याच्याइतके दुसर्‍या कोणाचेच नाही.>> +१/

अमिताभ बच्चन "डोळ्यांतून" अभिनय करतो. दीवारमधल्या काही सीनमम्देह याच्या डोळ्यामधली बेफिकीरी, काही सीनमधली व्ह्ल्नरेबिल्लिटी अमेझींग आहे.

त्याच्या उदयाच्या दरम्याने चित्रपटसृष्टीचं ग्रामर परफेक्टली डीफाईन झालं होतं (काय ती भाषा!!) त्यामुळे अमिताभ आणि त्याच्या नंतरच्या सर्वच अभिनेत्यांनी तांत्रिक बाजू समजून घेऊन अभिनय करायला सुरूवात केली.सेम सीनमधे क्लोजपमधे चेहर्यावरचे भाव कसे असावेत आणि लॉम्ग शॉटमधे कसे यासाठी अमिताभ बच्चन टेक्स्ट बूक आहे.

सेम सीनमधे क्लोजपमधे चेहर्यावरचे भाव कसे असावेत आणि लॉम्ग शॉटमधे कसे यासाठी अमिताभ बच्चन टेक्स्ट बूक आहे.

नंदीनीजी, सुरेख प्रतिसाद Happy आभार Happy

पण अभिनयक्षमता, प्रेझेंटेशन, नैसर्गिक स्टाईल, एखादी भूमिका प्रचंड लोकप्रिय होईल अशा तर्‍हेने पडद्यावर साकारण्याचे कौशल्य (जे कमर्शियल सिनेमाला अत्यंत आवश्यक आहे), भूमिकेत, संवादात काही दम नसला तरी चित्रपट बघणेबल करण्याचे कौशल्य, आणि गरीब-श्रीमंत, स्त्रिया-पुरूष यांच्यात सारखीच लोकप्रियता - हे "कमर्शियल पॅकेज" त्याच्याइतके दुसर्‍या कोणाचेच नाही.

अगदी सहमत Happy

दिवार सारख्या चित्रपटांतुन अमिताभने मनातला ज्वालामुखी चेहेर्‍यावर ज्या थंडपणे दाखवला आहे त्याला तोड नाही.
वर उल्लेखिलेल्या मारामारीच्या प्रसंगानंतर घरी अमिताभ, शशी आणि आई बोलत असतात. शशी कपूर की आई कोणीतरी विचारते "तुम्हे क्या जरूरत थी वहाँ जाने की" यावर अमिताभचे एकच वाक्य आणि दुसर्‍या क्षणी आईचा हात जोरात त्याच्या कानाखाली. आहाहा एकाच वाक्यात काय जबरदस्त ताकद आहे.
"तो क्या मैं भी मुँह छुपा के भाग जाता ?"

पुन्हा वाचला. मस्त लेख. अगदी चपखल निरीक्षणे आहेत.

पूर्वी आम्हाला अमिताभच्या त्या फायटिंग मुळे त्याचे पिक्चर आवडायचे. नंतर समजू लागले की त्याची नजर, बॉडी लँग्वेज, पडद्यावरचा वावर हे त्यापेक्षा खूप जबरी होते. आपण काहीही कृत्रिम हावभाव, अनावश्यक अ‍ॅक्शन्स न करताही पडद्यावर उठून दिसतो (तो वरचा फोटो ही तेच दाखवतो) याची जाणीव झाल्यानंतर ते कौशल्य भरपूर वापरणारा अमिताभ साधारण दीवार पासून दिसला.

डॉन चा अपवाद वगळता सलीम जावेद च्या पटकथांमधे अमिताभची एण्ट्री अन-ग्लॅमरस असायची.
डॉन मधे पहिल्या अमिताभची ग्रॅण्ड एण्ट्री ही कथेची गरजच होती. तीही ओव्हर अ‍ॅनिमेटेड अजिबात नाही. एकदम डिग्निफाईड स्मगलर वाटतो तो. त्या तिघांपैकी दोघांनी पिस्तुले काढल्यावर त्याची प्रतिक्रिया पाहा, आणि त्यावेळचे इतर नायक अ‍ॅक्शन सीन्स मधे कसे भूकंप झाल्यासारखे दचकत ते आठवा :). अन-ग्लॅमरस असली तरी केवळ नैसर्गिक स्टाईल एण्ट्रीची येथे पाहा (हाच शॉट त्या गँग्ज ऑफ वासेपुर मधे होता)

अतुलदा छोटा वाटला हो लेख.. अजून चार पॅराग्राफ तर बनत होते हो दिवारमधल्या अमिताभसाठी.. Happy

बाकी शतप्रतिशत सहमत, अमिताभची (किंवा कोणाचीही म्हणा, एकच) अँग्री यंग मॅन म्हणून यापेक्षा भारी भुमिका नाही.. अँग्री यंग मॅनपेक्षाही तुम्ही वापरली ती राख बसलेला धगधगता निखार्‍याची उपमा अगदी चपलख बसते..

आजही मला क्या डायलॉग मारा बोले तो दिवारच आठवतो...

जो पिछले बीस साल मे नही हुवा वो कल होगा, कल और एक कुली हप्ता देने से इन्कार करेगा..
तुम लोग मुझे वहा ढूंध रहे थे और मै तुम्हारा यहा इंतजार कर रहा था..
आज खुश तो बहोत होगे तुम....
जाओ पहले उस आदमी की साईन लेके आओ..
मेरे पास गाडी है बंगला है.... तुम्हारे पास क्या है...??? ( यानंतरच मेरे पास मा है ऐकण्यातली मजा ! )
मै आज भी फेके हुए पैसे नही उठाता..
मेरे साथ सिर्फ मेरी तकदीर होगी..
सुना है लिफ्ट के दिवारोंके कान नही होते..
मै किसीसे दुश्मनी करता हू तो सस्ते मेहंगे की पर्वाह नही करता..
अगर इसे मजाक समझा तो तुम बहोत पछताओगे....... काही छोटे मोठे कोणलातरी दिलेल्या प्रत्युत्तरात मारलेले डायलॉग तर सिनेमातच ऐकण्यात मजा.. क्लास बेअरींग खर्रेच !

त्या निळ्या शर्टाबद्दल काय बोलावे.. मी डिप्लोमाला असताना माझ्याकडे एक त्याच शेडचे निळे शर्ट होते, जे त्याची खालची दोन बटणे सोडून पुढे गाठ मारून मी फिरायचो.. अमिताभ वाटायचो कधीच नाही ती गोष्ट वेगळी..

अमिताभने तर स्वताबरोबर शशी कपूरला सुद्धा त्या सिनेमात एका उंचीवर नेऊन ठेवला.. किंबहुना आजची पिढी शशीकपूरला त्यासाठीच ओळखत असली तरी नवल नाही..

अश्याच सिमिलर भुमिकांमध्ये दिवार नंतर मला तो त्रिशूलमध्ये देखील आवडलेला... भले दिवारची उंची गाठणे अशक्य होते.. पण उल्लेख करावासा वाटला सो केला Happy

एक दिवारचा अमिताभ आणि एक शराबीचा शराबी अमिताभ, हे दोन त्या त्या भुमिकेचे बेंच मार्क आहेत..

धंधा करना तो तुम्हे नही आता सेठ,,, इस बिल्डिंगके और भी दस लाख रुपये आप मांगते तो मै दे देता.....
****
हां हां मैं जानता था की आप मजाक कर रहे थे ... (मदन पुरीला उद्देशून)

रॉहू - हे दोन्ही संवाद फार जबरी आहेत. " बीस साल पहले यहॉ मेरी मॉ ने इटे उठायी थी, और आज मै ये बिल्डिंग उसे तोहफे मे देने जा रहा हूँ", म्हणताना गॉगल मधे त्या बिल्डिंग चे प्रतिबिंब! त्याआधी त्या सेठ चा "ऐसी क्या बात है इस बिल्डिंग मे?" विचारतानाचा चेअराही प्राईस्लेस :). लहानपणी एखाद्याने गोंधळलेल्या अवस्थेत काही माहितीवजा प्रश्न विचारला की आम्ही तो त्याच्या सारखा बघतोय म्हणायचो Happy

बॉस अपुन तो अमिताभ के स्टाईलमेच बाल रखता था उस जमानेमे. माझे कान चेहरा सोडुन बाहेर आहेत. अमिताभ प्रमाणे कानवर केस ठेवायला योग्य नाहित हे कळायच वयच नव्हत. परमेश्वराने अमिताभ सारखी उंची दिली होती मग त्याची कॉपी करण्याचा प्रयत्न प्रत्येकजणच करायचा.

लेख चांगलाच आहे. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. पुलाखालच्या प्रसंगावर आणखी एक लेख येऊ शकतो जिथे शशीकपुर आणि अभिताभ च्या अभिनयाची जुगलबंदी आहे.

फार एन्ड त्याच. नाव सप्रू... डी के सप्रू (मुराद नावाच्या नटात आणि त्यात नेहमी गल्लत व्हायची)

सच कहूं तो विजय तुम्हे धंधा करना नहीं आता...

धन्यवाद रॉहू. हो सप्रू, नाव ऐकलेले आहे. विकीवर कळाले की तो तेज सप्रू त्याचा मुलगा आणि प्रीती सप्रू मुलगी. तेज सप्रू बर्‍याच पिक्चर्स मधे दुय्यम व्हिलन ई. असतो, प्रीती सप्रूही नाव ऐकलेले आहे.

>> तेज सप्रू

मि. इंडिया मध्ये प्रचंड थिक मिशा असलेला मोगॅम्बो च्या हाताखालचा व्हिलन म्हणजेच ना तेज सप्रू ..

प्रीति सप्रू कोण?

प्रीती सप्रू ही मागच्या पिढीतील खलनायक सप्रूची मुलगी पन्जाबी चित्रपटांची मुख्य नायिका. हिन्दीतही तिने कामे केली आहेत. सप्रू हा घार्‍याडोल्याचा आणि करड्या आवाजाचा व्हिलन साहिब बीबी और गुलाम , मध्ये होता

सिनियर सप्रू डी के , प्रीती सप्रू आणि तेज सप्रू
images (3).jpgdownload (1)_0.jpgdownload1_0.jpg

वरचे दोन फोटो (रॉहू आणि स्वाती ने दिलेले) एकाच व्यक्ती चे वाटत आहेत ..

माझा अंदाज तेज सप्रू बद्दल बरोबर नाही .. मी शरत सक्सेना आणि तेज सप्रू मध्ये गोंधळ घातला बहुतेक ..

अतुल ठाकूर आता आपल्याला हाकलून देतील असं वाटतंय .. Lol

नाही नाही फा. अजिबातच नाही. आणि आवाज कित्त्तीतरी निराळे होते त्यांचे. मुरादचा आवाज दमदार होता एकदम. रजा मुरादचा आहे तसाच. रजा त्याचाच मुलगा.
(आणि मुराद स्मार्टर दिसायचा - इफ आय मे से सो. :P)

हे बघ मुराद आणि रजा मुराद :
murad.jpg

फालतू पीजे सुचला, लिहीतोच Proud

अतूल ठाकूर म्हणतील, माझ्या बच्चनच्या बीबीवर रजा मुराद बद्दल मनमुराद चर्चा करुन झाली असेल तर आता इथून रजा घ्या! Biggrin

Pages