मेरा नाम चिन चिन चू…….

Submitted by अतुल ठाकुर on 26 December, 2013 - 10:15

helen03-236x300.jpg

हिन्दी चित्रपटाच्या पडद्यावर शृंगार आणि विभीत्सपणा यांच्या सीमारेषा बरेचदा फारच पुसट झालेल्या आढळतात. यात शुद्ध शृंगाराचा अनुभव हेलनने तीन दशकं प्रेक्षकांना दिला. वासना हा शब्द मला वापरण्याची इच्छा नाही कारण त्याला अनेक अर्थांची पुटं चढली आहेत. मात्र माणसातली “काम” ही आदीम प्रेरणा जागवण्याची कला या मदनिकेत होती. प्रदीर्घ काल हेलन स्वतः निवृत्त होइपर्यंत तिला या कलेत अनेकांशी स्पर्धा करावी लागली. हेलनच्या समोर उभ्या असलेल्या अभिनेत्री साध्या नव्हत्या. सौंदर्यात मधुबाला, अभिनयात मीना कुमारी, नृत्यात वैजयंती माला असे अनेक मानदंड त्यावेळी प्रतिष्ठा पावले होते. तरी देखिल पडद्यावर कॅब्रे नृत्य करताना अभिजातपणा न सोडता, पाहणार्याला घायाळ करणे हे सातत्याने केवळ हेलनंच करु शकत होती. सहज वावर, अभिनयाचं नाणं देखिल खणखणीत, शरीराचा बराचसा भाग अनावृत्त असतानासुद्धा मादकतेची सीमारेषा ओलांडून मुद्राभिनय किंवा हालचाली विभीत्सपणाकडे झुकत नाहीत हे आणि असे अनेक गुण या अभिनेत्रीकडे होते. अलिकडील काही “आयटम साँग्ज” पाहताना हेलनच्या अभिजातपणाची कमतरता फार फार जाणवते. मात्र हेलन बद्दल बोलताना फक्त नृत्य अथवा कॅब्रे यांचाच विचार करणे म्हणजे या अत्यंत गुणी अभिनेत्रीवर अन्याय केल्यासारखंच आहे. अतिशय सशक्त व सहज अभिनयाची देणगी असलेल्या हेलनने अशोककुमारपासून ते अमिताभपर्यंत सर्व अतीरथी, महारथींशी पडद्यावर सहजतेने टक्कर घेतली आहे. अशोककुमारच्या “हावडा ब्रिज” पासून ते अमिताभच्या “डॉन” पर्यंत हा देखणा प्रवास चाहत्यांना घायाळ करतच हेलनने केला आहे. हिन्दी चित्रपटसृष्टीला देखण्या, नृत्यनिपूण, कमनीय बांधा असलेल्या मदनिका अनेक मिळाल्या. किंबहूना दक्षिणेकडुन येथे आलेल्या बहुतेक अभिनेत्री या नृत्यांगना असायच्याच आणि त्यांची ती परंपरा आजदेखील अबाधीत आहे. तरीही हेलनने तीन दशकं अनभिषिक्त साम्राज्ञीप्रमाणे येथे राज्य केलं आहे यातच तीचं खरं यश आहे.

हेलनच्या हिन्दी चित्रपटसृष्टीतील कर्तृत्वाचा विचार करताना तिला असलेली स्पर्धा विचारात घ्यायला हवी. नृत्याच्या बाबतीत अगदी सुरवातीपासून वैजयंतीमाला, रागिणी, पद्मीनी, हेमामालिनी या दाक्षिणात्य अभिनेत्री इथे आघाडीवर होत्या. शिवाय त्यांच्या भूमिका नायिकेच्या होत्या. दाक्षिणात्य नायिका जरी वगळल्या तरी वहीदा रेहमान, आशा पारेख यांच्यासारख्या नृत्यनिपुण अभिनेत्री समोर होत्याच. मधुबाला, मीनाकुमारी, नुतन, नर्गिस या आघाडीच्या अभिनेत्रीदेखिल जरी नृत्यांगना म्हणून ओळखल्या जात नसल्या तरी जेथे गरज भासेल तेथे नृत्यात कांकणभरदेखिल कमी पडत नव्हत्या. “मोगले आजम” मधील मधुबालाचं नृत्य हे याचं उत्तम उदाहरण आहे. नंतरच्या पिढीतील सायरा बानू, तनुजा, मुमताज, शर्मिला टागोर, साधना, बबिता यांच्याबद्दलदेखिल हेच म्हणता येइल. यानंतर झीनत अमान, परवीन बाबी यांनी तर नायिका असुन स्वतःच अंगप्रदर्शनाचा मार्ग पत्करला. हिन्दी चित्रपटातील सोज्वळ नायिकेच्या नेहेमीच्या प्रतिमेला बदलण्याचे प्रयत्न सुरु झाले. खुद्द हेलनला स्वतःच्याच अंगणात बिंदु आणि पुढे पद्मा खन्ना यांचा सामना करावा लागला. या सार्या तीव्र स्पर्धेतुन ही अभिनेत्री तावुन सुलाखुन निघाली. इतकंच नाही तर नायिकांची कामं नायिका करतीलच पण जेथे हेलन हवी तेथे हेलनच हवी असं युग हिन्दी चित्रपटसृष्टीने पाहीलं. पुर्वी नायक, नायिका, खलनायक, विनोदासाठी वेगळा अभिनेता अशी मांडणी असायची. विनोदी अभिनेत्याच्या बाबतीत मेहमूदने मुख्य नायकावर देखिल बरेचदा कुरघोडी केली. हेलनने सुद्धा तिला मिळालेल्या प्रत्येक रोलचं सोनंच केलं. चित्रपटाच्या कुठल्याही फ्रेममध्ये, केव्हाही आणि कुणाही समोर हेलन आल्यास पहील्या दर्जाचा अभिनयच दिसणार. रोल खलनायिकेचा असो किंवा एका नृत्यापुरता असो हेलनने नेहेमीच जीव ओतुन काम केलं. हिन्दी चित्रपटसृष्टीने अशोककुमार, प्राण, दिलीपकुमार यांच्यासारखे कलाकार पाहीले ज्यांनी पाट्या टाकणे हा प्रकार कधी केलाच नाही. हेलनसुद्धा याच परंपरेतली अभिनेत्री आहे.

हेलनच्या अफाट कारकिर्दीतुन फक्त चार दोन गाण्यांबद्दल बोलणं काही खरं नाही. पुढे दिलेली गाणी ही माझ्या आवडीची आहेत ज्याबाबतीत मतभेद पुर्णपणे शक्य आहेत. मात्र हेलनबाबत बोलताना तिने पडद्यावर गाजवलेल्या गाण्यांचा उल्लेख अपरिहार्यच आहे. शम्मी कपूर बरोबरचं “ओ हसीना जुल्फोंवाली” हे गाणं पाहताना शम्मी कपूरच्या वैशिष्ट्यपूर्ण नाचण्याच्या ढंगासमोर हेलन अगदी सहज नाचली आहे. मला या दोघांचं “चायना टाउन” मधलं “तु परवाना मै शम्मा” हेदेखिल खास हेलन साठी आवडतं. शोलेतल्या “मेहबूबा मेहबूबा” बद्दल वेगळ्याने सांगण्याची आवश्यकता नाही. जिप्सी ढंगाचं हे गाणं आता हिन्दी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अमर होउन बसलं आहे. अरेबिक पद्धतीच्या साजात घडवलेलं “जश्ने बहारा मेहफीले यारा” हे आणखि हेलनचं पडद्यावरील नितांत सुंदर गाणं. “अबदुल्ला” चित्रपटात हेलन या गाण्यावर यादगार नृत्य करताना समोर झीनत अमान होती हे विसरता येणार नाही. लता मंगेशकरने कॅब्रे साठी क्वचितच आवाज दिला. रसिकांनी देखिल त्या दालनावर फक्त आशा भोसलेंचाच हक्क मानला. मात्र एक अतिशय परीपूर्ण कॅब्रे गीत लता गावुन गेली आणि ते इत़कं जबरदस्त गाजलं कि आज देखिल लताच्या वैविध्यपूर्ण गाण्यांची निवड करायची झाल्यास त्या गाण्याचा उल्लेख टाळता येणार नाही. “इन्तकाम” चित्रपटातलं “आ जाने जा” हेच ते पेटवणारं गीत. लताच्या वेगळ्याच मधाळ आवाजाला जोड लाभली आहे ती हेलनच्या कमनीय देहाची आणि देह तापवणार्या नृत्याची. सोन्याला सुगंधाचा स्पर्श म्हणतात तो हा असा. हे गाणं सुरु झाल्यावर बहुधा पडद्यालाच आग लागायचं शिल्लक राहतं.

आणखि दोन गाण्यांचा उल्लेख अत्यावश्यक आहे कारण ती दोन्ही गाणी हेलनच्या कारकिर्दीतील महत्वाचा टप्पा आहेत. पहिलं “गुमनाम” चित्रपटातलं “हम काले है तो क्या हुवा दिलवाले है”. मेहमूदने पडद्यावर घातलेला धुमाकूळ आणि त्यात रफीचा आवाज, जोडीला खुद्द मेहमूद्चा नृत्यातला कसबीपणा. हे सारं रसायन सोपं नव्हतं. पण हेलन या गाण्यात इतकी धमाल नाचून गेली आहे की रफी, मेहमूद बरोबरच हेलनदेखिल अविस्मरणीयच. दुसरं “इन्कार” मधील “मुंगळा मुंगळा” हे गाणं. जुनाट झोपडपट्टीतील बकाल बारचा सेट. आजुबाजुचे दारु पिणारे तर्र चेहरे देखिल चपखल निवडलेले. राजेश रोशनची मराठी ठेक्यातली चाल. हेलन मराठमोळ्या वेशात लवंगी मिरची सारखी आवाहन करत कोयता घेउन पडद्यावर आल्याबरोबरच पावलं ठेका धरायला लागतात. यापुढलं सारं काही पाहण्याजोगच. वर्णनात अर्थ नाही. हेलनचं “गुमनाम” साठीचं फिल्मफेअर अवॉर्ड हुकलं. ते तिला तब्बल चौदा वर्षांनी “लहु के दो रंग” साठी मिळालं. पुढे “लाइफटाईम अचिव्हमेन्ट” अवॉर्ड देखिल दिलं गेलं. तरीही माझ्यामते हेलनचा अभिनय पाहावा तो “गुमनाम” मध्येच. सर्व भट्टी मस्त जमुन आली आहे. हेलनला मिळालेला रोल, गाणी, संवाद, प्रसंग, सारंच आव्हानात्मक. आणि समोर एकाचढ एक अभिनयातले मेरुमणी. मेहमूद, प्राण, मदन पूरी, धुमाळ, तरुण बोस, नंदा आणि यासार्यांशी हेलनने नुसती टक्करच घेतली नाही तर ती वरचढ देखिल ठरली. समोर असले जबरदस्त नट पाहुन हेलनचं अभिनय सामर्थ्य आणखी उफळुन आलं असावं. या चित्रपटाच्या कुठल्याही फ्रेममध्ये केव्हाही हेलन आल्याबरोबर इतर गोष्टी जणु काही धुसर झाल्यासारख्या वाटतात आणि दिसते फक्त हेलनच.

हेलन ही आता माझ्यासारख्या हिन्दी चित्रपटाच्या चाहत्याच्या आयुष्याचा भाग होउन राहीली आहे. अनेक चित्रपट हे हेलनसाठी, तिच्या गाण्यांसाठी आठवतात. तिची अंग तापवणारी नृत्य आठवतात. हेलनला पडद्यावर पाहताना कुठलाही निर्बंध नसलेल्या अनेक सुप्त इच्छा मनात सळसळतात हे मान्य करायला मला कसलाही संकोच वाटत नाही. माणसाला कायम तरुण ठेवणारं, तरुण राहावसं वाटायला लावणारं हे व्यक्तीमत्व. हिन्दी चित्रपटसृष्टीने अनेक अभिनय साम्राज्ञी पाहील्या. त्यांनी आपली कारकिर्द नायिका म्हणुन गाजवली. हेलनला पूर्ण नायिकेचे रोल फार मिळाले नसावेत. छोट्याशा रोलमध्ये, आपल्या नृत्याच्या कसबावर आणि सामर्थ्यशाली अभिनयाच्या जोरावर सतत तीन दशकं राज्य करणे हा मला तरी मोठाच चमत्कार वाटतो. हेलन व्यतिरिक्त असा चमत्कार करणारं दुसरं नाव चटकन आठवत नाही. आपल्या पुराणामध्ये ऋषींची तपस्या भंग करण्यासाठी इंद्राने अप्सरा पाठवल्याच्या कथा आहेत. इथे या अप्सरेला पाहण्यासाठी चाहते स्वतःच थियेटर मध्ये जात आणि तृप्त होत. हेलनसमोर अनेक नायिका आल्या नि गेल्या. काहींना रसिकांनी त्या विशिष्ट चित्रपटापुरताच नावाजलं. हेलनने मात्र आपल्या चाहत्यांच्या मनात अढळपद मिळवलं यात शंका नाही.

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडला.

बाकी योग आणि नंतर एकदम हेलन, हे मजेदार वाटले. बरेचशी गाणी मनात ठसलीय ती हेलनमुळे.

तिला हम दिल दे चुके मध्ये बघुन बरं वाटलं होतं. अगदी सात्विक भाव चहर्‍यावर दिसत होते. Happy

हेलनबद्दलचा भाग आवडला. विशेषतः आ जानेजा, मुंगळा या गाण्यांबद्दलचे.
पण हेलनने अभिनयात इतरांना टक्कर दिली, इ. पटत नाही. एक चित्रपट म्हणजे वेगवेगळ्या अभिनेत्यांतील स्पर्धा असते की त्यांचे टीमवर्क असते?
तसेच "हेलनच्या हिन्दी चित्रपटसृष्टीतील कर्तृत्वाचा विचार करताना तिला असलेली स्पर्धा विचारात घ्यायला हवी" हा संपूर्ण परिच्छेद पटला नाही. त्यात वर्णन केलेल्या सगळ्या नायिका होत्या. हेलन बहुतांशाने नृत्यांगना होती. क्लब , कॅब्रे डान्सर असायची. नायिकांनी अशा भूमिका करण्याची कल्पनाही शक्य नव्हती.
<जेथे गरज भासेल तेथे नृत्यात कांकणभरदेखिल कमी पडत नव्हत्या> नूतन आणि नर्गिस यांनी नृत्य केलेले आठवत नाही. मधुबाला आणि मीनाकुमारी कॅमेर्‍याच्या मदतीने नृत्य करायच्या. त्यांच्या नृत्यातही अभिनयच असायचा .हावडा ब्रिजमधलेच 'आइए मेहरबां' किंवा मुघल-ए-आजम मधले 'प्यार किया तो डरना क्या' घ्या.

"सायरा बानू, तनुजा, मुमताज, शर्मिला टागोर, साधना, बबिता" यांना नृत्याच्या बाबत हेलनच्या रांगेत बसवणे हा हेलनच्या नृत्याचा अपमान आहे. मुमताजचा अपवाद करता येईल. तीही सुरुवातीला बहुधा नृत्यप्रधान भूमिकांतूनच आली असावी.

बिंदू, पद्मा खन्ना, जयश्री टी, कल्पना अय्यर हेलनची गादी चालवण्यात अगदीच तोकड्या पडल्या. यात हेलनचे महत्त्व दिसते.

<विभीत्सपणा> बीभत्सपणा म्हणायचंय का?
कामुक नृत्ये करणारी हेलन शॉट देऊन झाला की कोपर्‍यात बायबल वाचत बसायची असे आशाने तिच्या कार्यक्रमात सांगितल्याचे आठवते.

बिंदू, पद्मा खन्ना, जयश्री टी, कल्पना अय्यर हेलनची गादी चालवण्यात अगदीच तोकड्या पडल्या. यात हेलनचे महत्त्व दिसते.<<< +१

बीभत्सपणा ह्यालाही अनुमोदन!

एक चित्रपट म्हणजे वेगवेगळ्या अभिनेत्यांतील स्पर्धा असते की त्यांचे टीमवर्क असते?<<< ह्याबाबतः

निर्माते दिग्दर्शक ह्यांच्यासाठी ती टीमवर्कने केली जाणारी बाब असणे आवश्यक असेल तर प्रत्येक सहभागी अभिनेत्यासाठी स्वतःचा ठसा उमटवता यावा ह्याची एक संधीही! ही संधी मग काही वेळा मनातील टीमवर्कच्या भावनेपेक्षा एखादी वेगळी भावना निर्माण करत असेलही.

लेख छानच आहे. पण हेलन आज जरी ज्येष्ठ झाली असली तरी त्या काळात तिची बहुतांशी नृत्ये ही अत्यंत हिडीस हालचाली व बीभत्स अंगविक्षेपांनी युक्त असायची. त्यावर कळस म्हणून तो अती भडक मेक अप आणि उत्तान ड्रेस.

(बहुधा हेलन ह्या विषयावर मागे कोठेतरी चर्चा झालेली होती, की धागा होता कोण जाणे)

हेलन आज जरी ज्येष्ठ झाली असली तरी त्या काळात तिची बहुतांशी नृत्ये ही अत्यंत हिडीस हालचाली व बीभत्स अंगविक्षेपांनी युक्त असायची. त्यावर कळस म्हणून तो अती भडक मेक अप आणि उत्तान ड्रेस.

पसंद अपनी अपनी Happy

नूतन आणि नर्गिस यांनी नृत्य केलेले आठवत नाही.

नुतनचे सरस्वतीचंद्र मधील "मै तो भुल चली बाबुल का देस Happy

नर्गीसः गा मेरे मन गा, घर आया मेरा परदेसी तर मस्तच.

"सायरा बानू, तनुजा, मुमताज, शर्मिला टागोर, साधना, बबिता" यांना नृत्याच्या बाबत हेलनच्या रांगेत बसवणे हा हेलनच्या नृत्याचा अपमान आहे. मुमताजचा अपवाद करता येईल. तीही सुरुवातीला बहुधा नृत्यप्रधान भूमिकांतूनच आली असावी.

यावर पुन्हा पसंद अपनी अपनी. बाकी साधनाचं "झुमका गीरा रे" हे मला माइलस्टोन म्हणतात तसे वाटते अगदी नृत्याबाबत देखिल Happy

आत्ता गा मेरे मन गा पाहिले. चित्रपटही पाहिला होताच

यात नर्गिसने नृत्य केले आहे असे म्हणता येईल? पदलालित्य आहे? कंबर हलवणे तर त्या वयात शक्यच नाही. तिने वेगवेगळ्या पोझेस दिल्यात. ग्रुपमधल्या नर्तकींनी केलेल्या नाचाच्या स्टेप्समधली एकही तिने केलेली नाही. फक्त लयीत पळण्यासारख्या अ‍ॅक्शन आहेत.
बाकी तुम्ही नोंदवलेली गाणी पुन्हा पाहण्याचा प्रयत्न करेन.
सॉरी हे मी खूप कठोर शब्दांत लिहिले आहे. पण हेलनने केलेली कोणती नृत्ये या अभिनेत्रींना जमली असती ? (वैजयंतीमाला, वहिदा, हेमा सोडून)

सॉरी हे मी खूप कठोर शब्दांत लिहिले आहे.

मला ते चालतं. सॉरी म्हणण्याची आवश्यकता नाही. मला न पटल्यास मी प्रतिसाद देत नाही त्यामुळे माझ्या धाग्यावर माझ्यामुळे वाद आता संभवतच नाही.

तिने जे काही केले आहे ते मला नृत्य वाटतं. विषेशतः घर आया मेरा परदेसीत तर जास्तच.

Happy Happy Happy