लेंडीपिंपळीचा काढा..............एक किस्सा!(काढ्याच्या रेसिपीसह)

Submitted by मानुषी on 15 November, 2013 - 04:50

थोडी पार्श्वभूमि...........
माझ्या लहानपणापासून घरात व्यायाम आणि योग्य आहार यावरच भर असल्याने मीही साधारणपणे मुलांना याच सवयी लावल्या, किंबहुना त्या त्यांना लागल्या. जश्या आपापल्या आईच्या, घरात पूर्वापार चालत आलेल्या, बर्‍याचश्या गोष्टी आपण पुढे नेतो.
माझ्या मुलांना लहानपणापासून सर्दीखोकल्यावर लेंडीपिंपळी आणि इतर काही जिन्नस घालून केलेला काढा, पोट बिघडल्यावर बेलफळाचा मुरंबा, असंच काही देत आल्याने माझी लेक उसगावातही शक्यतो याचाच उपाय करते.
माझा जावई (त्याचे वडील अ‍ॅलोपॅथीचे डॉक्टर असल्याने) आधी बायकोची चेष्टा करायचा. "त्या लेंड्या बिंड्या तूच घे. मला नको ते" इ.इ. पण हळूहळू त्यालाही कधी लागलंच तर हेच उपाय सूट व्हायला लागले. आता तिकडे पाठवण्याच्या सामानाच्या लिस्टमधे "लेंडीपिंपळी" असतेच.
आता किस्सा:
माझ्या लेकीच्या ऑफिसला येण्याजाण्याच्या वेळी लिफ्टमधे एक साधारण समवयस्क मुलगी तिला बर्‍याच वेळा दिसायला लागली. काही महिने असेच गेल्यावर मग "हाय हॅलो" झालं. हळूहळू हसणं बोलणं सुरू झालं. एकमेकींची नावं, सेल फोन नंबर्स विचारून झालं. काधी तरी संध्याकाळी एकत्र बाहेर कॉफी झाली.
ती मुलगी इजिप्शियन होती. नाव "नोहा".
मधे २/३ दिवस काही त्या भेटल्या नाहीत. कारण नोहा कुठे दिसलीच नाही. २/३ दिवसांनी लिफ्टमधे त्या भेटल्या तर ही नोहा सर्दी खोकल्याने त्रस्त होती. लेकीने चौकशी केली.
तर म्हणाली," २/३ दिवस झोपूनच होते. आता डॉक्टरकडे जावं की काय विचार करतीये. आज ऑफिसला जायलाच पाहिजे."
संध्याकाळी परत लिफ्टमधे गाठ! पण नोहाला काही डॉक्टरकडे जायला जमलं नव्हतं.
मग लेकीचा दुसर्‍याला मदत करण्याचा स्वभाव अगदी उफाळून आला. तरी तिला जावई(माझा) नेहेमी म्हणायचा ,"या तुझ्या होम रेमेडीज इथे अमेरिकेत उगीच कुणाला सुचवू नकोस बरं!"
तरी ती नोहाला म्हणाली, " नोहा, माझ्या जवळ एक होम रेमेडी आहे, तुला चालणार असेल तर मी देईन तुला."
नोहा म्हणाली.........चालेल.
लेकीने लेंडीपिंपळीचा काढा केला. आणि नोहाला नेऊन दिला. मध्ये एक दिवस गेला. तिसर्‍या दिवशी संध्याकाळी नोहा फोन करून माझ्या लेकीकडे आली. एकदम फ्रेश दिसत होती.
हातात एक डेकोरेटेड छोटी गिफ्ट बास्केट......रिबन्स, बो, वगैरे लावलेली.
नोहा म्हणाली, "तुझी होम रेमेडी अगदी जादुई होती हं! मी एकदमच बरी झाले."
मग त्यांच्या गप्पा झाल्या. आणि तिने ती बास्केट लेकीला गिफ्ट दिली. त्यात "पम्प्किन स्पाइस"च्या कॅन्ड्लस होत्या. आणि हे ग्रीटिंग कार्ड.

काढ्याची रेसिपी:
४ कप पाणी, ४/५ मिरे, ४/५ लवंगा, १ च. धणे, १/२ च. जिरे, २ वेलदोडे, १तमालपत्र, एक छोटा दालचिनीचा तुकडा, १छोटा आल्याचा तुकडा खिसून किंवा चिमूटभर सुंठ, थोडा गवती चहा(एखादा शूट) , ५/६ तुळशीची पाने, एक खारीक आणि........ ७/८ लेंडीपिंपळ्या! ( हे कसं वाटत?...परेश रावल, बिंदू, जॉनी वॉकर, प्रेम चोप्रा आणि .........................शाहरुख खान!)
हे सर्व उकळायला ठेऊन याचे साधारणपणे ४ कपाचे २ कप होईपर्यंत उकळावे. म्हणजेच निम्मे करावे.
आता या तयार २ कप काढ्यात चवीप्रमाणे गूळ घालावा.
गाळण्याने गाळून घ्या. आता हे मिश्रण दिवसात ४/५ वेळा थोडे थोडे गरम गरम घ्यावे. आवडत असल्यास घेतेवेळी थोडे दूध घालावे.
यातली शिजलेली खारीक खाऊन बघा. बाकी गाळण्यातले इन्ग्रेडियन्ट्स पुन्हा १/२दा मी उकळते. व याचाही काढा म्हणूनच वापर करते. व नंतरच गाळ टाकून देते.
शेवटचा डोस अगदी झोपायच्या आधी घ्यावा. आणि पांघरुणात गुर्गुटून झोपावे(:स्मितः). .........शक्यतो हा काढा घेतल्यावर अंगावर वारे घेऊ नये.
आणि मुख्य म्हणजे एखादा इन्ग्रेडियन्ट नसल्यास त्याव्यतिरिक्त काढा करावा.
हा काढा कुणीही वैद्यांनी वगैरे प्रिस्क्राइब केलेला नाही. पण याचा फायदा नक्कीच होतो.
एक टीपः जर हा काढा घेतल्यावर पोटात थोडं गरम वाटलं तर डोस डायल्यूट करावा.
२ चमचे डिकॉक्शनमधे अर्धा ग्लास पाणी घालून अगदी गरम गरम प्या. मी यात दूध घालत नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त किस्सा!

अँटीआयुर्वेदवाल्यांनी अजून वाचलेला दिसत नाही हा लेख. एका झणझणीत टोमण्यासाठी तयार रहा मानुषी Proud

एका झणझणीत टोमण्यासाठी तयार रहा मानुषी >>>>>>>>>>> ओक्के मंजूडी!
धन्स शैलजा!
@लेंडी पिंपळी >>> =)) काय नाव आहे सालं!!! =))
>>>>>>>>> हं असतात काही काही नावं विचित्र! (:खोखो:)

काल एका हॉलीवूडी चित्रपटात एका बाईने " खोकला येतोय ? हे घे होमीओपथिक गोळ्या, जीभेखाली ठेव" असं सांगितलेलं ऐकून आ वासला.

Lol

मला असं तेथली बाई जेव्हा सांगेल तो दिवस तर तिच्यासाठी अजुनच धन्य म्हणावा लागेल आणि माझ्यासाठी काळा Proud

मानुषी
किस्सा भारी आहे! हा काढा वाचून मला आईची आठवण आली. मी हा लहानपणी बरेचदा घेतलाय, अगदी अशाच पद्धतीने. बेलफळाचा मुरंबाही आई नेहेमी करते आणि मी नेहेमी तिच्याकडून घेऊन येते. Happy

maanushee,

Can you please tell where can this "lendipimpalee" be bought? Any specific ayurvedic store or some other store? Also, what should I be asking for (in the store)?

मानुषी,
धन्स !
हा अस्सल-जालीम काढा लगेच सेव्ह केला, उद्या करुन मुलांना देणार आहेच.
आणखी काढे येऊ देत...

बाकी, यातलं "१ च. धणे, १/२ च. जिरे ?? हे वाचुन "एका" जिर्‍याचे दोन तुकडे कसे करायचे असा प्रश्न पडला होता, पण नंतर लक्षात आलं...:हाहा:

मस्तच Happy त्या मैत्रिणीनेही किती छान अ‍ॅकनॉलेज केलंय... आणि रेसिपी दिलीस ते बरं झालं, त्याबद्दल तुझे आणि ज्यांनी ज्यांनी मागितली त्या सगळ्यांचे पण आभार Happy

ते लेंडीपिंपळ मार्केट मध्ये काय नावाने मिळतं?
असलं लेंडीपिंपळ बिंपळ मी नाही बाई जाऊन मागणार Uhoh Blush
दुसरं नावं सांगा! सोफेस्टिकेटेड! प्लिज

आमच्या येथेही आम्ही हेच इलाज करतो. सर्दी साठी असा काढा व कफ झाल्यास लेंडी-पिंपळीच चाटण म्हणजे लेंडी पिंपळी च चुर्ण व मध एकत्र करुन घ्यायच.याने कफ कमी होतो. तसेच पित्त वाढल्यास सुंठ-साखर, हे घरगुती इलाज करतो.

दुसरं नावं सांगा! सोफेस्टिकेटेड! प्लिज<< बहुतेक ब्रॅन्डी असावं Happy

सर्वांना धन्यवाद!
अनील ......... Biggrin
रिये (वत्से! )............आणि इतर सर्वांना ज्यांना सोफिस्टिकेटेड नाव हवंय..........आयुर्वेदिक दुकानात जाऊन लेंडीपिंपळीच मागावी लागेल. लागलं तर आवाजात, बोलण्यात, वागण्यात सोफिस्टिकेशन आणून (ते आधीच असणारे! थोडं अजून वाढवून)मागा हवं तर!( Wink )
हो आणि वरती "तोषवी" यांनी काय नावाने गुगलायचं तेही सांगितलंय. पण आयुर्वेदिक दुकानात गुगलीय(सोफिस्टिकेटेड!!!!) नाव सांगून जे हवं ते मिळेलंच याची खात्री मी देऊ शकत नाही!(:दिवा:)
NSP......................सगळ्या आयुर्वेदिक उत्पादने विकणार्‍या दुकानात लेंडीपिंपळी या नावाने मागितल्यास मिळते.
हो आणि दुकानदार हसत वगैरे नाहीत.(पुन्हा :दिवा:)
ओक्के हे घ्या याचं सायंटिफिक(बोटॅनिकल म्हणता येईल का?) नाव.जे तुम्ही गुगलू शकता. खूप छान माहिती मिळेल. आणि काय मेडिसिनल वॅल्यूज आहेत तेही कळेल.
Piper longum

@तुझं काय मत आहे या काढ्याबद्दल .....लिहिशील?

लॅटीन नेम- piper longum.
मराठी बोली भाषा-लेंडी पिंपळी, संस्कृत मध्ये-पिप्पली म्हणतात. उपयोगी भाग- फळ
ति़खट चवीचे उष्ण गुणाचे आणि मधुर विपाकी (post-digestive effect) द्रव्य आहे म्हणूनच प्रामुख्याने त्रिदोष(वात पित्त कफ)शामक आहे. (एक दोष कमी करताना दुसरा वाढवत नाही) त्यामुळे सर्वप्रकारच्या खोकल्यात वापरली जाउ शकते. त्यामुळे बर्याच सर्दी खोकल्याच्या औषधात पिंपळी असते. वरील काढ्यात वापरलेली (मिरे लवंग दालचीनी आले)ही इतर द्रव्येही प्रमुख्याने उष्ण गुणाची आहेत त्यामुळे कफज खोकल्यात याचा चांगला उपयोग होतो. इतर वेळी (खोकल्याबरोबर बारीक कणकण किंवा ताप असेल (flu like symptoms) आल्या ऐवजी सुंठ वापरावी आणि लवंग मिरे यांचे प्रमाण खूप कमी करावे.
सुंठ-मिरे-पिंपळी यांना त्रिकटू म्हणून ओळखतात हे भूक वाढवणारे,पाचक,शूलघ्न(anti colic), कृमीघ्न आहे.
तमकश्वास(Bronchial Asthma) काही अवस्थात खूप उपयोगी आहे. respiratory diseases मधे प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठीही दिली जाते.

तोषवी धन्यवाद! खूप छान स्पष्टीकरण!
काढा घेतल्यावर बरेच फायदे जाणवतातच. पण आता क्लिअर झालं कशाचा काय गुणधर्म ते. आता जरा डोळसपणे वापरले जातील हेच इन्ग्रेडियन्ट्स!
आलं आणि सुंठ याच्याही परिणामात वेगवेगळ्या वेळी घेतल्यास वेगवेगळा उपयोग असतो हेही नव्यानेच समजलं.
असं वाटत होतं...साधारणपणे आलं सुंठ एकच.

आलं आणि सुंठ ह्यांच्या औषधी गुणधर्मात फरक काय?

मी फ्रिजमध्ये हळद, मध, सुंठ पावडर आणि लसूण ह्यांचं मिश्रण करुन ठेवते आणि आठवण होईल त्या दिवशी सकाळी काही खाल्यानंतर किंवा दूध पिऊन झाल्यावर थोड्यावेळाने एक गुंजभर खाते. ह्या वेळेस मी शॉर्टकट म्हणून (काय फरक पडणार आहे? असं समजून) हळद, मध आणि स्वयंपाकात वापारण्यासाठी आणलेली आलं लसणाची पेस्ट असं मिक्स करुन ठेवलं आहे फ्रिजमध्ये. मला माहित आहे की हा आळशीपणाचा कहर आहे Sad

पण आलं आणि सुंठीच्या गुणधर्मात फरक असेल तर परत कधी असा शॉर्टकट मारणार नाही. कृपया तोषवी किंवा अजून कुणी आयुर्वेदाचे डॉक्टर्स असतील त्यांनी अश्या अज्ञानाने क्षुल्लक समजल्या गेलेल्या बाबींवरही मार्गदर्शन करावे.

धन्स मानुषीताई,
वाळलेले आले म्हणजे जरी सुंठ असली तरीही त्यांच्या गुणात आणि विपाकात (पचनानंतर होणार्‍या त्यांच्या कार्यात) फरक आहे. आलं रुक्ष गुणाचे आणि कटू(तिखट) विपाकी आहे तर सुंठ स्निग्ध गुणधर्माची आणि मधुर विपाकी आहे. म्हणून कोरड्या खोकल्यात सुंठ तर कफज खोकल्यात आल्याचा उपयोग होईल असे...
पित्त प्रकृतीच्या माणसाला जास्त प्रमाणात आलं सोसवणार नाही पण अशावेळी सुंठ नक्की चालेल

धन्यवाद तोषवी Happy

मला खोकला, कफ अगदी रेअरली होतो. गुंजे एवढ्या गोळीत आलं अगदी किंचीतच येत असेल. थोडं मिश्रण उरलं आहे तेवढं संपवते आणि नंतर सुंठ पावडरच वापरेन. रुक्ष पदार्थापेक्षा मी स्निग्ध पदार्थच प्रिफर करेन कारण आहाराचा परिणाम आपल्या भावशारिरी गुणांवर थोडा तरी होतच असतो ह्यावर माझा विश्वास आहे. शरिर प्रकृती आणि मन प्रवृत्तीचा समतोल राखण्यासाठी कधी रुक्ष्/लघु गुणी पदार्थही घ्यावे लागतात. मी घेते त्या मिश्रणात लसूण ही लघू गुणी आहेच पण ती हृदयासाठीही चांगली असतेच.

मानुषीताई, आजोबा असताना लेंडीपिंपळी, बाळ हरडा, अनंतमूळ वगैरे पदार्थ पाहिले होते. आज कित्येक दिवसांनी/वर्षांनी परत त्याबद्दल वाचतेय :-). आई अजून एक 'कढईतला काढा' करायची. त्यात ती काय घालायची माहित नाही. मी बासुंदीसारखा आवडीने घ्यायचे. खारीक वगैरे असायची बहुतेक त्यात.

हा काढा मला खूप आवडतो.. एक वेगळीच मधूर चव असते. गुळ व वेलची असल्याने इतका तिखट नाही लागत.
जालीम औषध आहे. एक तासात दरदरून घाम येवून ताप उतरतो. सर्दीने डोके जड असल्यास बरे होते. मग कफ बाहेर पडतो.
पण चवीला सुंदरच लागतो. काळमिरी , लवंगा कमी करून सुंठ घालून पहायचे. तोषवीने म्हटल्याप्रमाणे आल्याने जळजळ्ते तर सुंठ गोडसर लागते म्हणूनच अष्टमीला हा प्रसाद खूप छान लागतो सुंठवडा.

Pages